अफझलखानाचा वध-अभ्यासकाच्यानजरेतून ( भाग ३)

Primary tabs

दुर्गविहारी's picture
दुर्गविहारी in जनातलं, मनातलं
13 Oct 2020 - 8:08 pm

आधीच्या भागाच्या लिंक
अफझलखानाचा वध-अभ्यासकाच्यानजरेतून ( भाग १)

अफझलखानाचा वध-अभ्यासकाच्यानजरेतून ( भाग २)

अफझलखानाचे नियोजनः-
अफजलखानाने मे महिन्यात पुण्याजवळ शिवाजी राजांना त्वरित लढाईसाठी बाहेर काढण्याचे उद्दीष्ट ठेवले होते. जून महिना सुरू झाला आणि शिवाजी महाराज राजगड येथे राहिले. काही आठवड्यांनंतर मुसळधार पावसाळा सुरू झाला, ज्यामुळे कोणत्याही प्रकारच्या मोठ्या सैन्याच्या हालचाली अशक्य झाल्या. आता अफझलखानाला काही नवीन सुरुवात करण्यापूर्वी चार महिने थांबावे लागेल.परंतु शिवाजी राजांनी मुत्सदीगिरीने एक डोकेदुखी टाळली होती - उघड्यावर अफझलखानचा सामना करणे.

 अफझलखानाने शिवाजी राजांच्या स्वराज्यावर पाठविलेले सरदार

वाईजवळ आल्यावर खानाने शिवाजी राजांच्या प्रदेशात ठिकठिकाणी आपले सरदार रवाना करून शिवाजी राजांचे राज्य ताब्यात घेण्याची व त्याचे लष्करी बळ ठिकठिकाणी विखुरले जावे यासाठी कारवाई आरंभली. त्यानुसार पुणे प्रांती सिद्दी हिलाल, सुप्यावर जाधव, शिरवळवर नाईकजी पांढरे, सासवडवर खराटे तर तळकोकणात सैफखानास अफझलखानाने रवाना केले. या सरदारांच्या प्रतिकारार्थ शिवरायांनी काय योजना आखल्या याची पुरेशी माहिती मिळत नाही. लष्करी कारवाई सोबत खानाने --- विशेषतः आदिलशहाने शिवाजी राजांच्या विरोधात राजकीय आघाडीवरही बरीच मुसंडी मारली होती. शिवाजी राजांना सामील झालेल्या व त्यांच्या राज्यातील बहुतांशी देशमुख वतनदारांना फितवण्याची त्याने पराकाष्ठा केली व त्याच्या प्रयत्नांना बऱ्यापैकी यशही आले. शेवटी दीडशे वर्षांच्या प्रस्थापित राजवटीचे जनमानसावरील परिणाम हे त्या राजवटीस अनुकूल असेच होणार !
वाईला तळ ठोकून खानाने जी काही राजकीय - लष्करी मोहीम महाराजांविरुद्ध चालवली होती त्यांस शक्य तितका प्रतिकार करण्याची शिवाजी राजांनी शिकस्त केली असली तरी या लढ्याचा निर्णायक टप्पा नजरेत येत नव्हता व या पद्धतीने निकाल लागणंही शक्य नव्हतं. लष्करीदृष्ट्या उभय पक्ष तुल्यबळ असले तरी एकाच लढाईत सर्व बळ एकवटण्याचा जुगार खेळणे शिवाजी राजांच्या नव्या सत्तेला परवडणारे नव्हते. त्याचप्रमाणे मोहिमेकरता आदिलशहाने कितीही प्रचंड प्रमाणात आर्थिक तसेच दारुगोळा, अन्नधान्याची तरतूद केली असली तरी औरंगजेब तख्तारूढ झाल्याने मोगलांच्या हस्तक्षेपाची शक्यताही नाकारता येत नव्हती.
तात्पर्य, मोहीम कशाही प्रकारे का होईना शक्य तितक्या लवकर आटोपणे उभयतांनाही आवश्यक झाले होते व त्यानुसार खानाने वाटाघाटीचा मार्ग अवलंबला. ज्यानुसार शिवाजी महाराजांनी तहास प्रवृत्त होऊन आपल्या भेटीस येण्यास तयार व्हावे अशी खानाने खटपट आरंभली. खानाच्या हेतूंची शिवाजी महाराजांना कल्पना असल्याने त्याने खानाच्या गोटात जाण्याचे अखेरपर्यंत टाळले व खानाचे आवडते भक्ष्य -- म्हणजे जावळीचा प्रांत व स्वतः शिवाजी --- यांची त्यांनी खानास लालूच दाखवत त्यांस जावळीत खेचण्याचा उपक्रम आरंभला. इथे जावळीचे रणक्षेत्र कोणाच्या सोई वा अडचणीचे हा प्रश्नच मुळी उद्भवत नाही. कारण हे रणक्षेत्र तसेही उभयतांच्या सोईचेच होते. शिवाजी महाराज व त्यांचे सरदार जसे या प्रदेशाचे जाणकार होते तद्वत खानाच्या फौजेतील मोरे, खोपडे प्रभूती मंडळीही इथली माहितीगार होती. शिवाय आरंभी खान जावळीकडे यावा अशी शिवाजी राजांचीच इच्छा असल्याचे उपलब्ध माहितीवरून दिसून येते. परंतु एकदा खानाचा कल त्या भागातच घुसण्याकडे विशेष असल्याचे लक्षात येताच शिवाजी महाराजांनी स्थिती अनुकूल बनवण्याकरता शक्य तितके प्रयत्न केले.
त्यानी प्रथम खानास हरप्रयत्ने ससैन्य जावळी खोऱ्यात, प्रतापगडानजीक येण्यास भाग पाडले. लष्करासह त्या प्रदेशात शिरण्याचे प्रलोभन खानास आवडणारेच होते. अनायासे त्या प्रदेशात होणारा शिरकाव व प्रत्यक्ष भेटीचा होणारा लाभ या गोष्टींचा मोह तो कसा काय टाळणार होता ? खान प्रतापगडानजीक येईपर्यंत त्याला कसलाही उपसर्ग पोहोचू नये याची शिवाजी राजांनी पुरेपूर काळजी घेतली. याचाच अर्थ असा कि, सावज टप्प्यात येईपर्यंत गप्प राहून वाट पाहण्याची भूमिका त्यांनी स्वीकारली. त्याचप्रमाणे अंतस्थरीत्या त्यांनी आणखी एका डावाची तयारी आरंभली होती ज्याची अफझल वा आदिलशहास बहुधा अजिबात कल्पना नव्हती !
नव्याने तयार केलेला जावळीमधला प्रतापगड राजांनी खानाविरुद्ध लढण्यास नक्की केला. एकतर सर्वश्रुत कारण म्हणजे खानाची जडशीळ फौज. पण अजून एक कारण म्हणजे शिवरायांची लढाईची रणनीती. शक्यतो लढाई ही आपल्या प्रदेशात न होता सीमेवर किंवा बाहेर व्हावी ह्या करता ते नेहमी स्वराज्याच्या सरहद्दीवरील किल्ले नक्की करीत. ज्या किल्ल्यावर मी असेन तिथे अफझलखान पोचणार हे राजांना ठावूक होते आणि म्हणूनच त्यांनी प्रतापगड जवळ केला. लढाईचे क्षेत्र खानाने नव्हे तर राजांनी निवडले होते. नकळतच खानाचा पहिला पराभव झाला होता.
दुखाचा आणखी एक घास :-
सप्टेंबर महिन्याच्या सुरवातीला एक वाईट बातमी राजगडावरून प्रतापगडी पोचली. गेली २-३ वर्षे दुखणे घेऊन आयुष्य ढकलणाऱ्या महाराणी सईबाईंचा मृत्यू झाला होता. शंभू बाळाची आई गेली होती. राजांची राणी गेली. स्वराज्यावर दुख्खाचे आकाश कोसळले. राजगडावर ५ सप्टेंबर १६५९ ला स्वराज्याच्या महाराणी सईबाईसाहेबांचे निधन झाले. शिवरायांसाठी हा खूप मोठा धक्का होता, कारण शंभूराजे जेमतेम सव्वादोन वर्षांचे होते, सईबाईंचे दुःख अन त्यात हा राक्षस स्वराज्यावर चालून आला. दुःख करीत बसायला आता त्यांना अजिबात वेळ नव्हता.
खानाशी पत्रव्यवहारः-
या दरम्यान अफझलखान आणि शिवाजी महाराज यांच्यात जो पत्रव्यवहार झाला तो अत्यंत रंजक आहे,सभासदाच्या बखरीमध्ये हा मुळ पत्रव्यवहार सभासदाने लिहून ठेवल्याने तो आपल्याला जसाचा तसा वाचायला मिळतो. कृष्णाजी भास्कर प्रतापगडी राजांची भेट घ्यायला आला पण राजे भेटच देईनात. त्याने मोरोपंत पिंगळे याना विचारलं काय कारण, तेव्हा पंत बोलले, “खान आला हे ऐकून महाराजांनी भयंकर धसका घेतलाय, ते खूप आजारी पडलेत, जाम घाबरलेत, अशक्तपणा आलाय त्यांना, त्यांनी अन्नपाणी सोडलंय हो. काल तर चक्कर येऊन पडले, ताप सुद्धा खूप भरलाय.” कृष्णाजी दोन दिवस प्रतापगडावर होता पण महाराज काही त्याला भेटले नाहीत. गडावर सारखी धावपळ सुरू होती, राजांच्या महालाकडे सारखा लोकांचा अन राजवैद्यांचा राबता सुरू होता. आणि तिसऱ्या दिवशी राजे कृष्णाजीला भेटले, ते ही अंगावर जाड कांबळ घेऊन.कृष्णाजीने राजांना खानाच पत्र दिल. अफझलखानाचे पत्र त्यांच्याकडे येऊन पोचले होते ज्यात मजकुर आहे.
पत्रात खान म्हणत होता (स्वैर अनुवाद)
१. विजापूर दरबाराने निजामशहा कडून जिंकून घेतलेला आणि मुघलांना तहात दिलेला दुर्गम दुर्गांचा हा संपूर्ण डोंगरी प्रदेश तू बळकावून बसला आहेस. तो परत कर.
२. कोकणात राजपुरीच्या राजाला (दंडा राजपुरी येथील सिद्दी) त्रास देणे तू ताबडतोब बंद कर.
३. शत्रूस प्रवेश करण्यास दुर्गम असलेला हा चंद्ररावचा प्रदेश (जावळी) तू मला परत कर.
४. तू कल्याण आणि भिवंडी काबीज केलीस आणि मला कळलाय की तिथे तू मशीद सुद्धा जमीनदोस्त केलीस.
५. तू मुसलमानांना लुटलेस आणि त्यांचा अपमान केला आहेस.
६. इतकेच नव्हे तर तू इस्लामचा अपमान करून स्वतःच्या हाताखाली मुसलमानांना कामावर ठेवले आहेस.
७. तू स्वतःला एक स्वयंघोषित राजा म्हणून, कोणालाही न घाबरता हवे ते निर्णय देतो आहेस. म्हणून तुला संपवायला मला आदिलशहाने पाठवले आहे.
८. मुसेखान आणि माझे बाकीचे सैन्य तुझ्याविरुद्ध लढण्यास अतिशय उत्सुक आहे. मी कधी एकदा त्यांना जावळीवर हल्ला करावयास सांगतो असे झाले आहे.
९. सिंहगड आणि लोहगड सारखे बळकट किल्ले, पुरंदर आणि चाकण सारखे मोक्याचे किल्ले, या शिवाय भीमा आणि नीरा नद्यांच्या मधला सर्व प्रदेश मुकाट्याने दिल्लीच्या बादशहाला परत कर.
पत्र वाचल्यावर राजांनी काय विचार केला असेल? शरण जावे? कदापि नाही. तह म्हणजे साक्षात मृत्यू हे राजांना ठावूक होते. अश्या कसोटीच्या क्षणी राजांनी एक वेगळाच व्युव्ह रचला. कृष्णाजीने राजांना पत्राचे उत्तर विचारले, राजे बोलले आम्ही आमचा वकील पाठवू. पण कृष्णाजी भास्करची जवळपास खात्री पटली की राजे भयंकर घाबरलेत. अन हा डाव राजांच्या मनाप्रमाणे पडला.
इकडे कृष्णाजी भास्कर वाईला आला, अन शिवरायांची ही अशी अवस्था पाहून त्याला अतिआत्मविश्वास झाला असावा. तो खानाला बोलला की शिवाजी राजे तर भयंकर घाबरलेत, आपण एवढी रणनीती अशा घाबरट माणसासाठी का आखतोय. पण खानाला विश्वास वाटला नाही.
इकडे प्रतापगडावर महाराजांनी सदर बोलावली आपला वकील निवडण्यासाठी. त्यावेळी राजांकडे तीन वकील असावेत असा अंदाज आहे. या तिघांना सगळ्या भाषा यायच्या. परंतु राजांनी यातील कोणालाच वकील म्हणून खानाकडे पाठवले नाही. राजांनी वकील म्हणून निवड केली ती पंताजी गोपीनाथ बोकील. खूप अनुभवी माणूस. पंताजी हे मूळचे कारीचे. पण त्यांचे पूर्वज सिंदखेडराजा येथे स्थायिक झाले. पंताजी बोकील हे चौरस नावाच्या सोंगट्याच्या खेळात खूप हुशार होते. थेट आउसाहेब आणि शहाजी महाराज यांच्याशी त्यांचा घरोबा होता.अशा माणसाची निवड राजांनी या मोहिमेपुरती वकील म्हणून केली.पंताजी राजांचा निरोप घेऊन वाईस आले.
त्या पत्रात अस लिहल होत की
१. कर्नाटकाच्या सर्व राजांना हरवणारे खुद्द आपण माझ्या भेटीला आलात ह्या सारखा आनंद कोणता.
२. तुम्ही तर या पृथ्वीतलावरचे एक दागिने आहात. तुमच्या बरोबर युद्ध म्हणजे आगीशी लढाई.
३. तुम्ही खरच येथे या आणि मनभरून जावळीचे दर्शन घ्या.
४. तुम्ही लवकरात लवकर इकडे आलात तर बरे होईल, म्हणजे माझी सर्व भीती निघून जाईल.
५. मला मुघल आणि विजापूरच्या सैन्याबद्दल अतिशय आदर आहे ज्यांच्याकडे तुमच्यासारखे पराक्रमी योद्धे आहेत.
६. येथे नक्की या. मी तुम्हाला माझे सर्व किल्ले सुपुर्द करीन. अगदी जावळी देखील.
७. तुमचे रूप म्हणजे एखाद्या वीर योद्धयाप्रमाणे आहे. आपली भेट होईल तेंव्हा मी माझी तलवार तुम्हाला सुपुर्द करीन.
८. जावळीच्या ह्या घनदाट, खोल आणि दूरवर पसरलेल्या जंगलात तुमच्या सैन्याला जगातल्या सर्वोच्च सुविधा मिळतील.
पंताजी राजांचा निरोप घेऊन वाईला आले, अन खानाला बोलले, “खानसाहेब राजे तुम्हाला खूप घाबरलेत हो. राजे लपून बसलेत. भितात खूप तुम्हाला. कृपया तुम्ही जावळीत यावं अन राजाची भेट घ्यावी.”अन हे ऐकून खान अस्वस्थ झाला, जावळी म्हणजे भयानक जागा हे त्याला ठाऊक होतं अन तो पंताजींना म्हणाला. “पंत जी, नही नही, मै जावली कदापि नही जाऊंगा. बडी कदीम जगह है जावली. हम इस बारेमे सोचेंगे.”
त्यावर पंताजी काका बोलले, “आपण आपली सगळी फौज घेऊन या, आम्ही आपणास यायला रस्ता करून देऊ.” अन पंत प्रतापगडी आले. परंतु दोन दिवसांतच राजांनी पंताजींना पून्हा वाईला पाठवले. यावरून शिवरायांच्या चाणाक्ष बुद्धीची कल्पना आपण करू शकतो, शत्रूच्या डोक्यात घुसून त्याला आपल्या मनाजोगत पाऊल उचलण्यासाठी भाग कस पाडायचे अन त्यासाठी वकिलामार्फत वारंवार निरोप पाठवून जवळपास त्याचा विचारच बंद करायचा. अन पंताजींनी तसच केलं. ते पुन्हा वाईला आले अन खानाला म्हणाले “खानसाहाब आप बेवजह सोच रहे है, प्रतापराव मोरे आपके साथ है, वो तो इस इलाके का चप्पा चप्पा जनता है.” हे ऐकून मोरेची सुद्धा छाती फुगली, तो खानाला बोलला," जी हुजूर, मै हु ना आपके साथ". अन नाही नाही म्हणत सरतेशेवटी खान तयार झाला. हा शिवरायांचा सगळ्यात मोठा विजय होता, की खान जावळीत येतोय.
अफझलखान जावळीच्या जंगलातः-
सुमारे बारा हजार निवडक सैन्यासह अफझलखान अखेर जावळीत उतरला. शिवाजी राजांच्या विनंतीवरून खान प्रतापगडाकडे निघाला खरा परंतु मार्गातील मोक्याच्या जागा ताब्यात ठेवण्याचा त्याने काही प्रयत्न केल्याचे उल्लेख आढळून येत नाहीत. जर तो जावळी जिंकण्यास आत शिरला होता तर त्याने अशी बेपर्वाई दाखवावी याचं मोठं आश्चर्य वाटते. असो. प्रत्यंतर पुराव्यांअभावी याविषयी अधिक न लिहिणे श्रेयस्कर.

 वाई ते पारची छावणी-अफझलखानाचा मार्ग
शिवाजी महाराजांची युध्दनिती:-
शिवछत्रपतिंची युध्दनिती हा जगभरातील युध्दशास्त्राच्या संशोधकांच्या संशोधनाचा विषय आहे.शिवाजी महाराज त्यावेळी एका विशेष प्रकारच्या युध्दपध्दतीचे जनक होते. ते शास्त्र म्हणजे ‘गनिमीकावा’ होय. सावशीच्या लढाईचे वर्तमान ऐकल्यानंतर पुण्याहून पटवर्धनांच्या वकिलाने मिरजेस जे पत्र लिहिले त्यात गनिमी लढाईचा अर्थ आला आहे. तो असा - “शत्रूचे सामान भारी असल्यास बुणगे एकिकडे लावून द्यावे आणि सडी फौज करून आज या ठाण्याजवळ, उद्या दुसऱ्या ठाण्याजवळ याप्रमाणे गनिमाई करावी.”समर्थांनी वर्णिलेल्या महाराष्ट्रधर्मात गनिमी युध्दास ‘वृकयुध्द’ (लांडगेतोड) असे नाव दिले आहे. या युध्दात थोडया सैन्यानिशी मोठया सैन्याला तोंड देऊन त्याचा नाश करता येतो. शिवाय अशा युध्दास डोंगराळ प्रदेश असल्यास त्याची युध्द करणाऱ्यास चांगली मदत होते.
ज्या प्रदेशात युध्द करावयाचे असेल तेथील खडान् खडा माहिती सेनापतिस असावी लागते. ती माहिती महाराजांस जितकी होती, तितकी खानाला नव्हती. कारण स्वतः खान हा महाराजांइतका त्या प्रांतातून युध्दशास्त्रातील तजविजींच्या व हालचालींच्या दृष्टीने विचार करित फिरलेला नव्हता. दुसऱ्याने दिलेल्या माहितीवर विसंबून त्याला आपल्या मोहिमेच्या तजविजी व हालचाली ठरविणे भाग पडले होते. दहा वर्षे या भागात राहिल्यामुळे इथली थोडीफार माहिती त्याला होती. पण लढाईच्या वेळी खास प्रसंगी उपयोगी पडेल अशी या प्रांताची पहाणी त्याने केली नसावी.
महाराज लढाईशिवाय इतर वेळीही असल्या प्रदेशाच्या सर्व भागातून, दऱ्याखोऱ्यातून, जंगलांतून, घाटांतून फिरून वेळप्रसंगी कोणत्या जागेचे काय महत्त्व आहे व तिचा पुढे काय उपयोग होईल याचा आपल्या आरंभिलेल्या कार्यक्रमावर दृष्टी देऊन विचार करित असत. फौजा लपविण्यासाठी जागा कोठे आहेत, लहान लहान टोळयांनी रहाण्यामध्ये जंगलांचा व झाडीचा किती फायदा होतो, रात्रीचा व अंधाराचा फायदा घेऊन शत्रूचे पहारे व चौक्या लुटता येणे व चुकविणे कसे शक्य असते, त्या चुकवून त्याच्या छावणीमध्ये सडया टोळयांनी आंत घुसून त्याची नासधूस कशी करता येते, त्यामुळे शत्रूचा गोंधळ होऊन त्या धावपळीत अंधारामुळे त्याच्याच गोळागोळीने त्याचीच माणसें कशी जायबंदी होतात, अशा अचानक हल्ल्याने धाडशी सेनापतिचा वचक शत्रूवर कसा बसतो, यामुळे शत्रूचा जोम व हिम्मत कशी कमी होते, त्याच्या गोळागोळीने झालेली त्याचीच हानी ही स्वतःच्याच माऱ्यामुळे झाली हे न कळून प्रतिपक्षाच्या छाप्यामुळे झाली असे वाटून हल्ला करणाऱ्या सैन्याचा दरारा व भय त्याला कसे वाटते, ह्या कारणांमुळे हल्लेवाल्या छोटेखानी सैन्याचा जोम कसा वाढतो वगैरे सर्व गोष्टी व युध्दातील खाचाखोचा महाराजांना पूर्णपणे स्वानुभवाने माहित होत्या. अशा रितीने भौगोलिक माहितीचा फायदा घेऊन महाराजांनी आपला हेतू तडीस नेऊन खानाची कशी दुर्दशा केली हे या प्रतापगड युध्दामुळे लक्षात येते.(आपले उद्दिष्ट साधण्यास अनुकूल असलेले रणक्षेत्र निवडून काढणे व तेथे शत्रूशी लढाई देणे हे सेनापतीचे मुख्य काम व युध्द शास्त्रातील धोरणांच्या अनेक अंगापैकी एक मुख्य अंग आहे.)
आपण ठरविलेल्या रणक्षेत्रात शत्रूस लढाई खेळण्यास भाग पाडणे हे युध्द शास्त्रातील एक मोठे महत्त्वाचे तत्त्व आहे. महाराजांनी आपल्या मुत्सद्दीपणाने ते साधून घेतले ही गोष्ट महत्त्वाची आहे. राजकारणाचा युध्दकौशल्याशी किती व कसा निकटचा संबंध असतो त्याचे हे एक उत्तम उदाहरण आहे. कालक्षेप करणें हे जसे युध्दकलेतील एक तत्त्व आहे, त्याप्रमाणे शत्रूचा उत्साह कमी करणे, आपली तयारी वाढविणे, शत्रूला गोंधळात पाडून आपला कार्यभाग साधणे ही सुध्दा त्यापैकीच दुसरी तत्त्वे आहेत.
विजापूर दरबारने ‘आम्ही तुमच्यावर मोहिम करतो वा तुमचे बरोबर युध्द करतो’ असे महाराजांस कळविले नव्हते. महाराजांचा कोणीही वकिल विजापूर दरबारात नव्हता. तरीसुध्दा त्यांचे हेर खाते इतक्या श्रेष्ठ प्रतीचे होते की, शत्रूच्या दरबारात ठरलेली प्रत्येक गोष्ट त्यांना तात्काळ कळत असे. विजापूर दरबारने आपल्या विरूध्द युध्द पुकारल्याची बातमी महाराजांना त्यांच्या हेरखात्याकडून समजली. आणि येणाऱ्या प्रसंगाला तोंड देण्याची तयारी महाराजांनी सुरू केली.
प्रतापगडाच्या पायथ्याशी खानः-
इकडे खानाच्या फौजेसाठी रस्ते बनवायचं काम चालू झालं, वाई ते सावित्रीचे खोरे असा रस्ता बनवला गेला. पण रस्ता अशाप्रकारे बनवला की प्रत्येक डोंगर उतारावर दर तीन फुटांवर एक झाड कापून वळण बनवलं होत. त्यामुळे हत्ती व घोडे नीट येणारच नाहीत. असा अवघड रस्ता असल्यामुळे तोफा आणता येणार नाहीत. फार फार तर सुतरनळ्या म्हणजे लहान तोफा फक्त आणता आल्या असत्या. तत्कालीन सलातीन मध्ये असलेल्या नोंदीप्रमाणे खान २५००० एवढी फौज घेऊन जावळीला निघाला. त्याचे खूप सारे हत्ती, घोडे जखमी झाले. खानाला ते सर्व डोंगर उतरत यायला जवळपास ७ दिवस लागले. म्हणजे जवळपास ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात खान जावळीत आला. अन वाईहून जावळीला येत असताना खानाचे १९७ लोक ठार झाले. इकडे खान सावित्रीच्या खोऱ्यात आला. मागे महाबळेश्वर, सूर्य मावळताना डोळ्यावर सूर्य येतो अन वरच काही दिसत नाही पण वरून सगळं दिसत अशा जागी महाराजांनी खानाची छावणी बसवायला जागा करून दिली. पण इथे सुद्धा राजांनी एक मेख मारली. खानाच्या छावणीसाठी जी झाडे तोडली गेली व त्या झाडांचे ओंडके हे तेथील घाटवाटांवर टाकले वर सगळे रस्ते बंद करून टाकले, जवळपास पोलादपूर घाट, रणतोंडी घाट, पारचा घाट, बोचेघळ आणि बाकी घाटवाटा बंद केल्यामुळे खानाला जी रसद येऊ शकणार होती ती राजांनी बंद केली.
आता या युध्दात हेरखाते सगळ्यात महत्वाचे. खानाच्या भटारखान्यात राजांनी आपले विश्वासू विश्वासराव मुसेखोरेकर यांना पाठवलं. महाराजांना बहिर्जी नाईक अन आबाजी सोनदेव हे महत्वाच्या खबरा देत होतेच पण विश्वासरावांकडे राजांनी वेगळी जबाबदारी दिलेली ती म्हणजे खान कसा आहे ते सांगणे, त्याच्या शरीराची रचना, वजन, उंची, त्याच वर्णन आम्हाला सांगणे.

   
प्रतापगडाच्या पायथ्याशी जवळपास दीड - दोन कोसांच्या अंतरावर पार गावनजीक कोयना नदीच्या काठी खानाच्या फौजेचा तळ पडला. खानाची फौज जावळीत येण्यापुर्वीच शिवाजी राजांनी आपल्या लष्कराचा पेरा केला होता. त्यानुसार कोयनेच्या पूर्वेस बोचेघोळीच्या घाटात बालाजी शिळमकर याची नेमणूक करण्यात आली होती. प्रतापगडाच्या नैऋत्य दिशेला असलेल्या पार घाटात मोरोपंत पिंगळे, शामराजपंत रांझेकर व त्रंबक भास्कर यांची नियुक्ती करण्यात आली. नेताजी पालकर यांना जावळी व वाईच्या दरम्यान घाटमाथा सांभाळण्यास सांगितले होते. प्रसंगी वाई येथील अफझलखानाच्या मुख्य छावणीवर चालून जाण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली होती. भेटीच्या प्रसंगी खानाची फौज प्रतापगडावर जर चालून आली तर तिला रोखण्याची जबाबदारी कान्होजी जेधे व बांदल देशमुखांवर सोपवण्यात आली. तसेच वेळप्रसंगी शिवाजी महाराजांना मदत करण्याची जबाबदारी देखील कान्होजी जेधेवर टाकण्यात आली होती. याखेरीज भेट झाल्यावर गडावर तोफांच्या इशारतीचे आवाज करण्यात येतील. तोफेचा आवाज ऐकताच सर्वांनी खानाच्या छावणीवर हल्ला करावा अशी आज्ञा देखील शिवाजी राजांनी आपल्या सरदारांना दिलेली होती. शिवाजी महाराजांनी आपल्या लष्कराची जी काही रचना केली होती ती पाहता, कोणत्याही परिस्थितीमध्ये खानाच्या सैन्याला बचाव करण्याची संधी मिळू न देण्याची त्यांनी खबरदारी घेतली असल्याचे दिसून येते. एकूण, नुसता खानच नाही तर त्याच्या लष्कराला देखील बुडवण्याची त्यांनी पुरेपूर तयारी केली होती. खानाला मात्र याची अजिबात कल्पना नसल्याचे दिसून येते.
( ईथे बोचेघोळीचा घाट या उल्लेखावरुन गैरसमज होण्याची शक्यता आहे.रायगडाच्या उत्तरेला असलेल्या डोंगररांगेत चांदर या गावाजवळून बोचेघोळ नाळ नावाची वाट उतरते.मात्र या वाटेचा वरील उल्लेखाशी काहीही संबंध नाही.या ठिकाणी म्हणजे रायगडाजवळ सैन्य ठेवून काहीही उपयोग नव्हता.अफझलखानाचा वध या श्री.वि.ल.भावे यांच्या पुस्तकात हा बोचेघोळ घाट , महाबळेश्वरला जिथून आपण सुर्यास्त बघतो त्या मुंबई पॉईंटच्या दक्षिणेला असलेल्या कर्नाक पॉईंट्च्या खाली आहे असा उल्लेख आहे.अशी वाट आज अस्तित्वात आहे कि नाही ? याची वैयक्तिक मला माहिती नाही,पण कदाचित ईथे शिळीमकरांची तुकडी लपवून भेटीच्या दिवशी जंगलातून पुढे आणून तसेच त्या बाजुला पळणार्या आदिलशाही फौजेला कापायला तैनात केली असु शकते. )
वकिली बोलाचाली होऊन खान - शिवाजीच्या भेटीचा तपशील, सावधगिरीच्या उपाययोजना कशा प्रकारे ठरल्या याची तपशीलवार चर्चा बऱ्याच शिवचरित्रांत आल्याने त्याची इथे उजळणी करत नाही. मात्र प्रत्यक्ष भेटीच्या आरंभी उभयपक्षी परस्परांना दगा करण्याची इच्छा मनात भरपूर असल्याचे सूचक निर्देश करणारे तपशील मात्र उपलब्ध साधनांत भरपूर प्रमाणात आढळत असल्याचे नमूद करतो.
ससैन्य खान प्रतापगडाच्या पायथ्याजवळ येताच शिवाजी राजांनी चौफेर लष्कराचा पेरा करून ज्या प्रकारे त्याची छावणी वेढून घेतली होती, त्यावरून भेटीचा निकाल काहीही लागला तरी खानाचे सैन्य बुडवण्याचा त्यांचा निर्धार यातून स्पष्ट होतो. त्याचप्रमाणे खान शक्यतो एकाकी भेटीस कसा येईल याकडेही त्यांनी विशेष लक्ष पुरवले होते. शेवटी विजापुरी दरबारचा तो मुख्य आधारस्तंभ होता. त्यालाच फोडल्याशिवाय विजापुरी सत्ता नरमणार नाही, याची शिवाजी राजांना पुरेपूर जाणीव होती.

क्रमशः

इतिहासलेखसंदर्भ

प्रतिक्रिया

नीलस्वप्निल's picture

13 Oct 2020 - 10:15 pm | नीलस्वप्निल

लगेच वाचुन काढले ......मस्तच

आनन्दा's picture

14 Oct 2020 - 11:21 am | आनन्दा

हे सगळे वाचताना एक प्रश्न राहुब राहून मनात येतो..

जसे शिवाजीराजांना खानाच्या हेतू बद्दल माहिती मिळत होती तसे खानाने त्याचे हेर लावले नव्हते का?

राजांचे सैन्य जंगलात दबा धरून बसले आहे याची जाणीव त्याला झाली नसेल काय?
त्याचे हेर काय करत होते?

दुर्गविहारी's picture

14 Oct 2020 - 1:11 pm | दुर्गविहारी

अतिशय योग्य शंका. वास्तविक खानाचे हेर प्रतापगडावर असावेत असा अंदा,, पण त्यांचा काही उल्लेख नाही. कदाचित ते हेर सापडले असावेत किंवा त्यांची दिशाभूल केली असावी.
अर्थात खानाचा अति आत्मविश्वास हाच त्याचा सर्वात मोठा शत्रू ठरला.

गामा पैलवान's picture

17 Oct 2020 - 2:17 am | गामा पैलवान

आनन्दा,

कुठल्याही सैन्याच्या सुरक्षेसाठी आक्रमक टेहेळणी अत्यावश्यक असते. या पार्श्वभूमीवर खानच्या सैन्याची स्थिती बघूया.

पहिल्याप्रथम नजरेत भरणारी गोष्ट म्हणजे खानचं सैन्य त्रिभाजित झालं होतं. वाई, पार आणि प्रतापगड अशा तीन ठिकाणी विखुरलं गेलं होतं. वाईत टेहेळणी करूनही काहीच फायदा झाला नसणार. जिथे टेहेळणी व्हायला हवी होती ती स्थानं दुसऱ्या व तिसऱ्या विभागांची होती, जे जावळीत उतरलेले विभाग होते. पण ते केवळ मराठ्यांनी दाखवलेल्या वाटेनेच चालणारे होते. ती वाट सोडून हेरगिरीसाठी इतरत्र एक पाऊलही टाकायची सोय नव्हती.

तसंच हेरांचं जाळं विणायला अवधी देणं आवश्यक असतं. आणि खान तर घायकुतीस आला होता. जर का अफजलखान वर्ष/सहामहिने ठिय्या देऊन बसला असता तर कदाचित हेरांपासनं मावळी सैन्य दडवणं शक्य झालं नसतं.

ही सारी माझी चिंतित मतं आहेत. यांच्या पुष्टीसाठी कुठलाही पुरावा माझ्याकडे नाही.

आ.न.,
-गा.पै.

इरसाल's picture

14 Oct 2020 - 1:35 pm | इरसाल

वकिली बोलाचाली होऊन खान - शिवाजीच्या भेटीचा तपशील, सावधगिरीच्या उपाययोजना कशा प्रकारे ठरल्या याची तपशीलवार चर्चा बऱ्याच शिवचरित्रांत आल्याने त्याची इथे उजळणी करत नाही.

तरीही कृपा करुन तुम्ही लिहावे. तुमच्याकडुन हे सगळे लेखात वाचताना खुप भारी वाटतय.

दुर्गविहारी's picture

15 Oct 2020 - 10:12 pm | दुर्गविहारी

प्रतिसादाबध्दल धन्यवाद ! पुढच्या भागात नक्कीच सविस्तर माहिती येईल.

बेकार तरुण's picture

15 Oct 2020 - 1:07 pm | बेकार तरुण

खूप मस्त लेखन....
खानाचे हेरखाते कुचकामी होते का??
बादवे - राजे हेरखात्यावर प्रचंड खर्च करतात अन त्यामुळे त्यांना प्रचंड यश मिळते असे कोणीतरी समकालीनांने लिहिले आहे ना....

दुर्गविहारी's picture

15 Oct 2020 - 10:10 pm | दुर्गविहारी

खानही नक्कीच हेर घेउन आला असणार.पण अफझलखानाचे काय त्या आधी स्वराज्यावर आक्रमण केलेल्या फत्तेखान असो किंवा नंतर आक्रमण केलेल्या सिद्दी जोहर असओ किंवा शाहिस्तेखान्,कारतलबखान्,नामदारखान,जयसिंग्,बहलोलखान,उदयभान असे कोणीही शत्रु एकालाही शिवाजी महाराजांनी केलेल्या योजनेचा आधी पत्ता लागलेला दिसत नाही.प्रत्येकाने स्वराज्यात येउन मात खाल्लेली दिसते.या सर्व सरदारांसोबत गुप्तहेर नव्हते हे शक्यच नाही.पण यांच्या गुप्तहेरांना कधीही शिवाजी महाराजांच्या योजनेचा पत्ता लागलेला दिसत नाही. या उलट या शत्रुंच्या सर्व हालचालीचा पत्ता महाराजांना अगदी चोख समजत असे.हिच खरी गुप्तहेर खात्याची ताकद आहे. त्यामुळे शिवाजी महाराज पन्हाळ्यावरुन सुटका करुन घेणार आहेत किंवा कारतलबखानाला उंबरखिंडीत गाठणार आहेत किंवा शाहिस्तेखानाला ठार मारण्यासाठी लालमहालात घुसणार आहेत याचा पत्ता या शत्रुंना कधीही लागला नाही आणि शिवाजी राजांना त्यांच्यावर आरामात मात करता आली. हेच अफझलखानाच्या बाबतीत घडले.
अर्थात गुप्तहेर खात्याचा कारभार तसा गोपनीय असल्यामुळे त्यांच्यावर किती खर्च होई याची कागदपत्रे निदान माझ्या पहाण्यात नाहीत.तसेही रायगडावरचे दप्तर जळाल्यामुळे यासंदर्भात कितपत पुरावे असतील याची साशंकता आहे.मात्र महाराज किल्ल्यांच्या उभारणीसाठी आणि दुरुस्तीसाठी जो निधी उपलब्ध करुन देत त्याची अस्सल पत्र आहेत.तसेच गुप्तहेर खात्यासारख्या अत्यंत महत्वाच्या खात्यासाठी मोठी तरतुद नक्कीच केली जात असणार हे खात्रीपुर्वक म्हणता येते. त्याखात्यावरच मोहीमेचे यश -अपयश अवलंबून असणार ,त्याच्यासाठी तरतुद करायला हात नक्कीच आखडता घेतला जाणार नाही.

अर्धवटराव's picture

16 Oct 2020 - 1:06 am | अर्धवटराव

उपरोक्त सर्व मोहिमांआगोदर जावळी जिंकताना देखील हेरखात्याचा फार उपयोग झाला असणार.
कुठल्याही पातशाहीला जावळी जिंकता आलि नाहि, पण महराजांनी ति त्यामानाने सहज जिंकली. त्यात घातपात जरी असेल तरी तो कसा, कुठे करायचा याचं गणीत हेरखात्याच्या मदतीशिवाय शक्य नव्हतं.
महाराजांचं हेरखातं निव्वळ पगारी नव्हतं, तर जीवाभावाची कमिटमेण्ट होती हे ही एक कारण होतं त्यांच्या यशाचं.

याव्यतिरिक्त अजून एक गोष्ट होती ती म्हणजे गुप्तहेर खाते सेनापतीला नव्हे तर थेट राजाला रिपोर्ट करत होते.
शिवाजीराजांनी स्वतः कष्ट करून ते नेटवर्क उभे केले होते.. त्याचा खर्च देखील कदाचित खासगीतून होत असावा.

नंतरच्या राजांनी इतके कष्ट घेतलेले असावेत असे वाटत नाहीत. संभाजीराजांचा घातपात हे गुप्तहेर खात्याचे अपयशच होते एक प्रकारे. पानिपतात झालेला पराभव हे दुसरे.

अवांतर - पानिपत चित्रपट अगदीच बोगस निघाला.. ग्रॉस एरर आहेत त्यात. असोच!!

शिवधनुष्य पेलण्यासारखं आहे ते. क्वचितच कोणाला जमेल.
तानाजी देखील मला संवादाच्या बाबतीत अगदीच बोगस वाटला.
महाभारत-कथा म्हणुन महाभारताचं दुसरं व्हर्जन आलं होतं. कलाकार बरेचसे जुनेच होते. पण भट्टी अजीबात जमली नाहि.

पटकथेला, संवादाला, कलाकारांना त्या विषयाचं गमक उमगल्याशिवाय या कलाकृती नीट अवतरणं कठिणच.

दुर्गविहारी's picture

18 Oct 2020 - 12:03 am | दुर्गविहारी

शतशः सहमत

कानडाऊ योगेशु's picture

18 Oct 2020 - 10:07 am | कानडाऊ योगेशु

महाराजांचे व खानाचे वय काय होते ह्या घटनेच्यावेळी?
खान बहुदा शहाजीराजांचा समवयस्क होता. त्यामुळे राजांना कदाचित अननुभवी समजण्याची चूक केली असावी.

ज्ञानोबाचे पैजार's picture

16 Oct 2020 - 9:32 am | ज्ञानोबाचे पैजार

शेवटी विजापुरी दरबारचा तो मुख्य आधारस्तंभ होता. त्यालाच फोडल्याशिवाय विजापुरी सत्ता नरमणार नाही, याची शिवाजी राजांना पुरेपूर जाणीव होती.

य वाक्यातच महाराजांनी खानाचा वध का केला याचे सार दडले आहे. आणि या करताच खानाचा वध होणे अतिशय गरजेचे होते

भेटीच्या वेळी जरी खानाने पहिला वार केला नसता तरी सुध्दा महाराजांनी त्याला यमसदनाला धाडलेच असते.

पैजारबुवा,

दुर्गविहारी's picture

18 Oct 2020 - 12:06 am | दुर्गविहारी

बरोबर ! ज्याक्षणी खानाने महाबळेश्वर ओलांडून जावळीत प्रवेश केला त्याक्षणी तो संपला होता.पुढे फक्त योजनेची अंंमलबजावणी करायची होती.

टवाळ कार्टा's picture

17 Oct 2020 - 1:06 am | टवाळ कार्टा

भन्नाट लिहिताय

बापू नारू's picture

17 Oct 2020 - 10:51 pm | बापू नारू

खूपच विस्तृत माहिती दिली आहे , खूप छान.
अफजल खान वधाशी related एक किस्सा शाळेत असताना गुरुजींनी सांगितला होता ,तो इथे टाकतो. या गोष्टीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला पण कुठेही लिखाणात ही गोष्ट नाही सापडली , तुम्हांस कल्पना असेल तर अनुमोदन द्या.
एकदा महाराजांच्या दरबारात एक लंगडा मनुष्य आला व त्यानें महाराजांना विनंती केली की मला ही स्वराज्याच्या सैन्यात सामील करून घ्यावे. त्याच्या या विनंती वर दरबारातील सर्व लोक हसले( अर्थात रत्नपारखी सोडून). महाराजांनी त्याला विचारले तू तर अपंग आहेस मग तू काय करणार सैन्यात येऊन? तुझ्याकडे असलेला एक गुण मला सांग. यावर तो इसम म्हणाला , महाराज मी झाड असे कापतो की ते पडत नाही. बस्स या एका गुणावर तो स्वराज्याच्या सैन्यात सामील झाला आणि पुढे मग जेव्हा हा प्रसंग आला , त्यावेळी महाराजांनी त्यांच्या या लंगड्या सैनिकांचा पुरेपूर उपयोग केला. खानाच्या सैन्यासाठी बनवलेल्या रस्त्यावरील योजनेनुसार झाडे अशी कापली गेली की रस्ता लवकरात लवकर बंद करता येईल. आणि मग नंतरचा इतिहास.....

दुर्गविहारी's picture

18 Oct 2020 - 12:06 am | दुर्गविहारी

अशी कोणतीही कथा माझ्या वाचनात नाही.पण शिवाजी महाराज गुणग्राहक होते हे अनेक उदाहरणावरुन निश्चित समजते.

दुर्गविहारी's picture

18 Oct 2020 - 12:09 am | दुर्गविहारी

माझा हा धागा शिफारसमध्ये समाविष्ट केल्याबध्दल मिसळपाव प्रशासन्,मालक,साहित्य संपादक या सर्वांचे मनापासून आभार.त्याचबरोबर प्रतिसाद देणार्‍या सर्वच मिपाकरांचे आणि वाचकांचे मनापासून आभार,_/\_

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

18 Oct 2020 - 10:58 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

तपशीलवार आणि उत्सुकता वाढविणारे लेखन. उच्च. पुभाप्र.

-दिलीप बिरुटे

महासंग्राम's picture

21 Dec 2020 - 6:17 pm | महासंग्राम

अफजलखान वध यावर कोणी काव्य केले आहेत का

अफझलखानवधावर अज्ञानदासाचा पोवाडा अतिशय प्रसिद्ध आहे.

http://www.powade.com/lyrics/agindas/agindas.pdf

तुषार काळभोर's picture

24 Dec 2020 - 5:45 pm | तुषार काळभोर

खालील काव्य काही वर्षांपूर्वी वाचले होते.
खूप छान रचन आहे, पण खूप शोधूनही मूळ रचनाकाराचे नाव कळले नाही.

दुंदुभी निनादल्या, नौबती कडाडल्या, दशदिशा थरारल्या,
केसरी गुहेसमीप मत्त हत्ती चालला, मत्त हत्ती चालला ||धृ.||

वाकुनी अदिलशहास कुर्निसात देवुनी,
प्रलयकाल तो प्रचंड खान निघे तेथुनी ,
हादरली धरणि व्योम शेषही शहारला ||१||

खान चालला पुढे, अफाट सैन्य मागुती,
उंट, हत्ती, पालख्याही रांग लांब लांब ती !
टोळधाड ही निघे स्वतंत्रता गिळायला ||२||

तुळजापुरची भवानी माय महान मंगला,
राउळात आदमखान दैत्यासह पोचला,
मूर्ती भंगली मनात चित्रगुप्त हासला ||3||

श्रवणी तप्त तैल से शिवास वॄत पोहोचले,
रक्त तापले मनात खडग सिध्द जाहले,
देउनी बळी अदास तोशवी भवानीला ||४||

सावधान हो शिवा !! वैर्याची रात्र ही !!
काळ येतसे समीप, साध तूच वेळ ही,
मर्दण्यास कालियास कृष्ण सज्ज जाहला ||५||

केसरी गुहेसमीप, मत्त हत्ती मारला, मत्त हत्ती मारला!!

हरवलेला's picture

9 Jan 2021 - 3:23 am | हरवलेला

पूर्ण काव्य इथे ऐकता येईल. https://www.youtube.com/watch?v=K1ZWFjOxC6g

रंगीला रतन's picture

29 Dec 2020 - 1:41 pm | रंगीला रतन

इतिहास मोठ्या रंजक पद्धतीने सांगता तुम्ही. वाचताना जराही कंटाळा येत नाही.
पुलेशु.

श्रीगुरुजी's picture

9 Jan 2021 - 11:21 pm | श्रीगुरुजी

अत्यंत रंजक मालिका!