काळापुढची पावले

Primary tabs

अनुराधा काळे's picture
अनुराधा काळे in दिवाळी अंक
14 Nov 2020 - 10:00 amकाळापुढची पावले

"राम राम दादाजी"
"राम राम जीजी" इति चाचाजी, बोरिवली रेल्वे क्वार्टर्स, आमच्या देवघराच्या खिडकी-कम-दरवाजातून डोकावून. दादा-जीजी दोघांनी ऐकले न ऐकले केले. दोन-तीन दिवस हीच पुनरावृत्ती!
रेल्वे वर्कशॉपमध्ये काम करणाऱ्या चाचाजींना रविवारी रजा.
चाचाजी आले पुढील दाराने.
"क्या हम से कुछ गलती हुई क्या?"
"गलती हुई?" जरा कडक आवाजात, "आप तो रोजाना बुरी से बुरी बात कर रहे हो!" इति माझी आजी - म्हणजेच जीजी.
चाचाजी क्षणभर वरमले.
दादा-जीजींसमोर बसून हात जोडून ढसाढसा रडू लागले.
माझ्या आजोबांनी - दादांनी चाचाजींना उठवून शेजारी बसवले.
"आप रोजाना चरस गांजा हुक्कापान करते हो, क्या यह अच्छी बात है? आप के बीबी-बच्चे क्या खाते है, पता है आप को?" जीजीने विचारले.
ही सत्य घटना १९५० सालची.
चाचाजींनी कबूल केले, ह्या व्यसनाबरोबरच पैसे लावून पत्तेसुद्धा! वर्कशॉपचा चौकीदार सगळे पुरवतो. महिन्याच्या पगाराची भर त्याचे देणे फेडण्यात!
"तुम्हाला खरेच व्यसनातून बाहेर पडायचे असेल तर आम्ही मदत करू."
चाचाजींनी कसम घेतली.
दादा-जीजी त्यांना घेऊन डॉक्टरकडे गेले. डाॅक्टरांनी सांगितले की "पत्त्यांचा नाद लवकर सुटू शकतो, पण चरस-गांजातून सुटका व्हायला वेळ लागेल. एकदम बंद केला तर झेपणार नाही. पण आपण तुमच्या पाठिंब्याने त्यांना बाहेर काढू. रोज त्यांना आठ-दहा बदाम भिजवून एक ग्लास दूध द्या."
जीजीने हे व्रत म्हणून स्वीकारले.
दादा-जीजीने वाण्याचे देणे दिले.
आज ज्याला काउन्सेलिंग म्हणतात, तेच सुरू केले. तेव्हा व्यसनमुक्ती केंद्र वगैरे नव्हते.
चाचाजी व्यसनमुक्त झाले. दोन वर्षे लागली.

ह्यात माझ्या आजीचा - जीजीचा मोठा रोल होता.
मी चौथ्या इयत्तेपासून ते पदवीधर नोकरी ते विवाह इतका काळ आजी-आजोबांकडे होते.
जीजीचे हे असे अनेक संस्कार कळत-नकळत माझ्यात झिरपत होते.
अशी माझी जीजी इंदौरच्या अहिल्याबाई होळकरांना आदर्श मानणारी. चौथी पास.. त्या काळी मुली इतके शिकत हेच खूप!
विवाहानंतर राजस्थान, मध्य प्रदेश उत्तर प्रदेश, गुजराथ अशा ठिकाणी वास्तव्य. मराठी, हिंदी, गुजराथी अस्खलित बोलणे लिहिणे वाचणे. तसेच पाककलेची आवड, त्यामुळे विविध प्रकारच्या रेसिपी. आजोबांच्या निवृत्तीनंतर मामाच्या नोकरीमुळे बोरिवली, सांताक्रूझ इथे वयाच्या ९६/९७वर्षांपर्यंत वास्तव्य.
माझे-तिचे नाते आजी-नात मायेचे प्रेमाचे व मैत्रीचे!
'समय से आगे की सोच'असे म्हणतात, तसेच तिचे विचार.

माझा जन्म आग्रा (उत्तर प्रदेश) १९४० साली आजीआजोबांकडे. त्या वेळी घरीच सुईण बोलावून प्रसूती.
आग्ऱ्याला महाराष्ट्रीय कमीच. नेमक्या त्या वेळी एक परिचित तीन मुलींना घेऊन आल्या. मुलगी झाल्याचे समजताच स्वत:ला दूषणे देऊ लागल्या. तीन मुलींचा पायगुण वगैरे वगैरे.
जीजीने त्यांना सांगितले की "मुलगी / मुलगा आधीच ठरलेले असते, असे कुणाच्या येण्याने बदलत नसते. आम्हाला मुलगा / मुलगी काही फरक पडत नाही. प्रसूती सुखरूप होणे हे महत्त्वाचे."
पण त्या बाईंचे "मुलगी झाली हो" तुणतुणे चालूच.
आजीने तिच्या बहिणीला कॉफी करायला सांगितले.
त्यानंतरचा किस्सा.
त्या वेळी पोलसन कॉफी प्रसिद्ध, पण महाग. सर्वसाधारण कॉफीच्या वड्या मिळत, त्या परवडत.
त्याच वेळी घरी बाळंतिणीला विडा देताना काथ (तिकडे कथ्था म्हणत) त्याही वड्या आजीने आणून ठेवल्या होत्या. आजीच्या बहिणीने चुकून कॉफीऐवजी काथवडी घातली. दूध घातल्यावर कॉफी लालेलाल!!
मग तर मुलगी झाली गोंधळ सुरू झाला.
जीजीच्या ध्यानात आले काय झाले असेल ते!
इतक्या गडबडीत त्या बाईंना समज यावी, म्हणून तिने कॉफीच्या वड्या घालून केली कॉफी. छान वेलची घालून.
जीजी म्हणाली, "बघा कशी छान झोपली आहे माझी नात!"
माझी आई हा किस्सा अगदी मी मोठी होईपर्यंत सगळ्यांना सांगायची. जीजीचे विचार किती सुधारणावादी होते. जणू काही आपल्याला जन्मतः सगळे आठवते अशा थाटात मीसुद्धा सांगायची व आत्ता ह्या निमित्ताने तुमच्याशी शेअर करते आहे.
आज २१व्या शतकात आपण बेकायदेशीर गर्भलिंगचाचणी करून मुलगी असेल तर गर्भपात केल्याच्या, बुवाबापूंच्या आहारी गेल्याच्या सत्य घटना वाचतो. ह्या पार्श्वभूमीवर १९४० साली उत्तर प्रदेशसारख्या मागासलेल्या भागात असूनही माझ्या जीजीचे विचार किती प्रगत होते! अशा आजीचा नातीला अभिमान वाटणारच! तुम्हीच सांगा!

आम्ही मैत्रिणीही होतो. कुटुंब मोठे. आला-गेला, पाहुणारावळा खूपच!
आहे त्या सामग्रीची कशी सांगड घालून चांगला स्वयंपाक करायचा, ही सिक्रेट्स फक्त आमच्या दोघीतच!
नवीन पाककृती करायला सगळे साहित्य आणून तिला मदत करायची. त्यामुळे मलाही आवड लागली स्वयंपाकाची. सगळ्या प्रकारच्या भाजण्या, चटणीपूड, मेतकूट, मसाले घरीच.

थालीपीठ भाजणी किस्सा!
टप्परवेअरचे आपल्याकडे आगमन झाले, तेव्हा त्यांनी 'वन डिश मील' अशी पाककृती स्पर्धा ठेवली.
कांदा-पानकोबी-मेथी बारीक चिरून घालून, भरपूर तीळ पसरून 'जीजी स्पेशल भाजणीचे थालीपीठ' 'वन डिश मील" स्पर्धेत सादर केले. काकडी-टोमॅटो डेकोरेशन!
मला पहिले बक्षीस टप्परवेयरचे डबे! पदार्थाचे इन्ग्रेडिएंट्स लिहायचे होते. तुम्हीच सांगा, नातीला आजीची आठवण येणार नाही? इथे वय आड येत नाही.

त्या वेळी कसलीही विशेष खरेदी म्हणजे दादर!
खरेदी आटोपून आम्ही रानडे रोडवरील 'आदर्श दुग्ध मंदिर'मध्ये आमच्या आवडीची कोथिंबीर वडी खात असू. ते आमचे सिक्रेट होते. एकदा मामा-मामीसुद्धा तिथेच आले आणि आमचे सिक्रेट ओपन झाले. पण घरी कोणीही काहीही बोलायचे नाही असे ठरले, कारण त्या वेळी बाहेर सहसा हॉटेलमध्ये जात नसत. अर्थात आदर्श दुग्ध मंदिर टिपिकल हॉटेल नव्हते. तिथे मसाला दूध, खरवस, शेंगदाणा लाडू, साबुदाणा वडे, खिचडी असे मिळायचे. पण आजी-नात मात्र कोथिंबीर वडी घ्यायच्या.

जीजी माझ्या पदवीदान समारंभाला आली. तसेच मरीन ड्राइव्हवर नौदलाच्या विमाने-हेलिकॉप्टर्सची प्रात्यक्षिके होती. (बहुधा १९५९/६० साल असावे. थोडे पुढे-मागे होऊ शकते.) आम्ही दोघी घरचे सर्व आटोपून गेलो. तुफान गर्दी! एका हेलिकॉप्टरला हत्तीचे रूप दिले होते. सोंड वाऱ्याने हलत होती. परतताना आमचे हात सुटले. चुकामूक झाली. शेवटी चर्चगेटला लोकल पकडली. घरी आजोबा रागावणार हे नक्की!
पण एकाच लोकलने सांताक्रूझ स्टेशनवर उतरल्यावर भेटलो. जीजी म्हणाली "ए वेडे! काळजी करू नकोस. दोघीही सुखरूप परतलो की नाही? गर्दीत होते असे. दिवसाची तर वेळ आहे." अशी माझी आजी जीजी!!

आमचे अगदी परिचित १९६० साली अमेरिकेला जाणार होते तीन वर्षे. दुसऱ्या वर्षी ते एकटे परतले कामानिमित्त. त्यांना सहा महिने तिथे राहण्याची तयारी असलेली खातरीची महिला हवी होती. त्यांच्या पत्नीच्या प्रसूतीनंतर मदतीला. ते जीजीला भेटायला आले की "तुमच्या खूप ओळखी आहेत, बघा कोणी खातरीलायक."
आमच्याकडे मालूताई म्हणून झाल्याकेल्याला स्वैपाक करायला येत. त्यांच्या दोन मुली लग्नाच्या! यजमान पक्षाघाताने घरातच! मालूताईंच्या कमाईवरच मुख्यतः घर चालत होते. मुली थोडेफार काम मिळाले की करत असत.
जीजीने मालूताईंना निरोप धाडला. प्रथमतः मालूताईंनी साफ नकारच दिला. मग मुलींना बोलावले. "आज सहा महिने आई नसेल तर तुम्ही वडिलांचे बघाल की नाही?" सगळे समजावून सांगितले. "घर संभाळून मिळाले तर कामही करायचे. आता तुम्ही लग्नाच्या वयाच्या आहात. तुम्हालाही जबाबदारी पडणार. बघा! ज्यांच्याकडे जायचे ते सगळे अतिशय चांगले आहेत."
मालूताईंच्या यजमानांना जीजीला अन् अमेरिकेला ज्यांच्याकडे जायचे त्यांना भेटायचे होते. जीजी परिचितांना घेऊन गेली मालूताईंच्या घरी. खूपच बोलणे झाले, काही शंकानिरसन झाले आणि ठरले की पुढील पासपोर्ट वगैरे हालचाली करायच्या.
पगारही अगदी व्यवस्थित ठरला. थोडे अ‍ॅडव्हान्ससुद्धा दिले. सहा महिन्यांनी मालूताई अगदी समाधानाने परतल्या. सांगितल्यापेक्षा जास्तच पैसे त्यांनी इथे जमा केले. मुलींना भेटवस्तू, यजमानांना गरम पांघरूण, स्वेटर, खूप खाऊ दिला. मुलींच्या लग्नाच्या वेळी पैसे कुठुन आणू? हा मालूताईंना प्रश्न पडला नाही.
त्या चार चार वेळा जीजीचे आभार मानत की तुम्ही समजावले, पाठिंबा दिला म्हणून मी निर्धास्त जाऊ शकले.

एकमेकांना मदत करण्यातला आनंद बाजारात मिळत नाही, हे मी शिकले.
अशी माझी आजी जीजी!

आमच्याकडे नवरात्रात देवीला खव्याच्या साटोऱ्यांचा फुलोरा असायचा. पण रात्री उंदीर साटोऱ्या कुरतडून खाऊन नासधूस करीत. मुंग्यांना आमंत्रण! दादा-जीजी दोघांनी देवीला नम्रपणे विनवले की यंदापासून झेंडूचा फुलोरा बांधू. नवरात्र समाप्तीला नैवेद्यासाठी साटोऱ्या करू.
काही महिन्यांनी आमच्याकडे एक अपघातात अपमृत्यू झाला, पण दोघांनी त्याचा संबंध फुलोऱ्याशी लावला नाही किंवा देवीचा कोप झाला वगैरे म्हटले नाही.

जीजीने इंग्लिश शिकण्यासाठी त्या वेळी प्रसिद्ध असलेली तर्खडकरमाला पुस्तके मागवली होती. अगदी मनापासून ती अभ्यास करायची. शंका असेल तर मला विचारायची. त्यामुळे मला आपण फारच हुशार आहोत असे वाटायचे. तिला कामचलाऊ बोलता येऊ लागले, समजायचे सगळे!

जीजीच्या ओळखी खूप! ती खातरीशीर स्थळे सुचवायची. आमचे मामा तिला 'वधुवरसूचक मंडळ' म्हणून हाक मारायचे. माझे लग्न तिनेच जमवले. तिच्या मैत्रिणीचा भाचा (दिल्लीत नोकरीला) म्हणजे माझे होणारे पतिदेव! मुली सांगून येतात, पण दिल्ली म्हटले की नाही. तर बघ तुझ्या नातीसाठी!
आमचे सगळे खानदान पुणे-मुंबई सोडून सगळीकडे पसरलेले. माझे आईवडील कोटा राजस्थान. बहीण पंजाबला! तो मुद्दा गौणच होता. आमच्या लग्नानंतर माझ्या नणंदेसाठीही तिनेच सुचवलेल्या स्थळावर जमले. तर असे हे 'नांदा सौख्यभरे!'

आमच्याकडे दूध घालायला रहीमचाचा येत. तर मामा व्हायोलिन वाजवायचा, त्याचा ग्रूप होता - सुप्रसिद्ध बासरीवादक श्री. मल्हारी कुळकर्णी, तबलावादक श्री. देवळे, मेंडोलिन वादक श्री. महादेव भोईर, सतारवादक पं. बाबूराव कुळकर्णी असे अनेक होते. सगळे जण जीजीला आईसमान मानत. जे असेल त्यात ती आदरातिथ्य करायची. जातपात, धर्म ह्यापेक्षा माणुसकी मोठी! तसेच ती वागायची. अशी माझी आजी जीजी! अशी ही वर्तनसंस्कार शिदोरी मला अजूनही पुरते आहे.

संत तुकारामभक्त, गाथाअभ्यासक जीजीने शिकवलेले जीवनाचे तत्त्वज्ञान -
'गतजन्मी आपण काय केले माहीत नाही, पुनर्जन्म आहे की नाही माहीत नाही. पण हा जन्म आपण जगतो आहोत. त्यातही गीतेमध्ये सांगितले तसे भविष्यात काय आहे माहीत नाही, तेव्हा वर्तमानकाळात नेहमी मदतीचा हात पुढे करावा. जमणार नसेल तर बाजूला राहावे. पण कोणाच्याही दुःखाला / त्रासाला कारणीभूत होऊ नये. तळतळाट घेऊ नये. कोणी आपल्याला फारच त्रास देऊ लागले, तर तुकोबांच्या वचनाची योग्य रितीने अंमलबजावणी करावी - 'नाठाळाचे माथी हाणू काठी.'

तर अशी माझी आजी जीजी ९० वर्षांची असताना पडून कंबरेचे हाड फ्रॅक्चर झाले.
माहीमचे डॉ. बावडेकर तपासणी करून म्हणाले, "Her heart is as young as a sixteen year old girl."
ती छान बरी होऊन घरी आली. जोपर्यंत आमच्या घराचे तीन मजले चढून माझी आजी जीजी - माझी मैत्रीण जीजी येऊ शकत होती, तोवर मी किंवा माझा मुलगा तिला एक महिनाभर आणत असू. खूप खूप गप्पा-आठवणीत केव्हाच तिची परतायची वेळ यायची.

अनुभवसंपन्न आयुष्य जगून, वयाच्या ९७/९८व्या वर्षी वृद्धापकाळाने ती गेली... पण माझ्यासाठी संस्काररूपाने माझ्याबरोबर असते माझी आजी जीजी!! तिच्या विचारांच्या माझ्यावरच्या प्रभावाचे एक उदाहरण देऊन लेख पूर्ण करते.

२०१९ साल. सदाशिव पेठ, पुणे. सकाळी साधारण ११ वाजता.
एरव्ही कटाक्षाने ग्राहक पेठेची ग्राहक, त्या दिवशी जरुरीचे काही सामान घेण्यासाठी वाण्याच्या दुकानात घ्यायला शिरले.
तीन-चार ग्राहक खोळंबलेले. वाण्याचा मुलगा हातात पूजेचे तबक, कलश, सिल्कचे धोतर नेसून वाण्याला बायकोबद्दल सांगायला लागला. दोघांनी तिला शिव्या घातल्या. कोणीही काहीच बोलत नव्हते. मीसुद्धा गप्प राहिले त्यांची वैयक्तिक गोष्ट म्हणून. पण जेव्हा त्याने माझ्या हातातून १००ची नोट घ्यायला नकार देऊन "ऐंय्या नीचे मुको मुको! अमे बायडी ने हाथ थी नथी लेता!" असे म्हटले, तेव्हा मात्र मी माझ्या मोडक्यातोडक्या गुजराथीत व हिंदीत विचारले, "तमे ऐंय्या धरतीपर जनम् केवी रित्या लीदा? तमारो छोकरो. जेने तमारी बहूने माटे गाली आयपी? वो केवी रिते?"
तो चांगलाच चमकला. इतर ग्राहकही मग बोलले.
मला म्हणाले, "आजी! बरे झाले तुम्ही बोललात! आम्हालाही आवडले नव्हते."
मी सामान काउंटरवर टाकून माझी नोट उचलून बाहेर पडले.

तर असे माझ्या जीजीचे विचार जणू माझ्यात मुरलेले आहेत.

अनुराधा काळे
9930499598

प्रतिक्रिया

सिरुसेरि's picture

14 Nov 2020 - 4:02 pm | सिरुसेरि

लेख आवडला . +१ .

'गतजन्मी आपण काय केले माहीत नाही, पुनर्जन्म आहे की नाही माहीत नाही. पण हा जन्म आपण जगतो आहोत. त्यातही गीतेमध्ये सांगितले तसे भविष्यात काय आहे माहीत नाही, तेव्हा वर्तमानकाळात नेहमी मदतीचा हात पुढे करावा. जमणार नसेल तर बाजूला राहावे. पण कोणाच्याही दुःखाला / त्रासाला कारणीभूत होऊ नये. तळतळाट घेऊ नये.

🙏

- (काळाच्या पुढे राहण्याचा प्रयत्न करणारा) सोकाजी

टर्मीनेटर's picture

15 Nov 2020 - 1:18 pm | टर्मीनेटर

@अनुराधा काळे

'काळापुढची पावले'

हा लेख आवडला  👍

पुढील लेखनासाठी शुभेच्छा!

✨ शुभ दीपावली ✨

टर्मीनेटर

सुधीर कांदळकर's picture

15 Nov 2020 - 5:23 pm | सुधीर कांदळकर

धन्य ती जीजी माता.
"Her heart is as young as a sixteen year old girl." हे डॉ बावडेकरांचे उद्गार किती समर्पक आहेत!
शेवटचा किस्सा तर छानच. आपण जीजींची शिकवण अंगी बाणवली हेही छान.

मस्त लेख, धन्यवाद.

स्मिताके's picture

17 Nov 2020 - 12:14 am | स्मिताके

छान आठवणींचा ठेवा उलगडलात. _/\_ जीजी

तुषार काळभोर's picture

17 Nov 2020 - 8:28 am | तुषार काळभोर

लेख आवडला. छान आठवणी.

नूतन's picture

17 Nov 2020 - 5:52 pm | नूतन

छान आठवणी

मित्रहो's picture

20 Nov 2020 - 3:31 pm | मित्रहो

छान रम्य आठवणी

सविता००१'s picture

21 Nov 2020 - 7:08 pm | सविता००१

किती छान आजी होत्या तुमच्या...सुंदर लिहिलंय

बबन ताम्बे's picture

21 Nov 2020 - 8:05 pm | बबन ताम्बे

जिजी खूपच काळाच्या पुढे होत्या. आवडले व्यक्तिचित्रण.

लेख वाचून माझ्या आज्जीची आठवण झाली

प्राची अश्विनी's picture

22 Nov 2020 - 9:18 pm | प्राची अश्विनी

डोळ्यासमोर उभी राहिली जीजी. सुंदर लिहिलंय.

दुर्गविहारी's picture

22 Nov 2020 - 10:41 pm | दुर्गविहारी

मस्त आठवणी आहेत.

ज्ञानोबाचे पैजार's picture

23 Nov 2020 - 12:22 pm | ज्ञानोबाचे पैजार

छान लिहिले आहे, आवडल्या आठवणी
पैजारबुवा,

सौ मृदुला धनंजय शिंदे's picture

23 Nov 2020 - 5:17 pm | सौ मृदुला धनंजय...

छान आठवणी
..

चलत मुसाफिर's picture

23 Nov 2020 - 10:01 pm | चलत मुसाफिर

उत्तर भारतात राहिल्या-वाढलेल्या मराठी माणसांनी लिहिलेले असे फार कमी वाचायला मिळते. लेख खूप आवडला.

अनिंद्य's picture

7 Dec 2020 - 9:17 am | अनिंद्य

खूप छान.
जीजींसारखी माणसे कोणत्याही काळात कमीच असतात.

चौथा कोनाडा's picture

7 Dec 2020 - 10:37 am | चौथा कोनाडा

+१
लेख आवडला. छान आठवणी.