शिवप्रतापाची झुंज ( भाग १)

दुर्गविहारी's picture
दुर्गविहारी in जनातलं, मनातलं
7 Sep 2020 - 11:38 pm

आषाढाच्या सरी थांबायचे नाव घेत नव्हत्या. तरी अश्या पर्जन्यकाळात कान्होजी जेधे लगबगीने राजगडाच्या पायर्‍या चढत होते. पाली दरवाज्याने आत येउन त्यांनी तातडीने सदर गाठली आणि आत सांगावा दिला. पहारेकर्‍याच्या वर्दीनंतर कान्होजी अंग पुसून आत गेले आणि राजांना मुजरा घालून सदरेवर टेकले.
"इतक्या तातडीने येणे केलेत कान्होजी काका ! काही विशेष ?" राजांनी पृच्छा केली.
"वखुतच तसा आलाय राजं. तुम्हास्नी जावळीचा समदा पेच म्हायतीच आहे. जावळीचा ह्यो तिढा सोडवायला ईजापुरास्न अफझुलखान वाईला येउन बसलाय. आपण यशवंतरावास जावळीचा चंद्रराव नामजद केला, ते या ईजापुर दरबाराला खटकलयं. त्यात आता खानाला जोहर खोर्‍याचा ताबा पाहीजे. त्यो भाग अडचणीचा, त्यात त्या भागाचा मी जाणकार म्हणून खानाला तिथल्या स्वारीत माझी मदत पाहीजे झालीया. महिन्यामाग एक खलिता आला, ह्यो पाठोपाठ परवा दुसरा खलिता बी आला.वर खान मागचे गुन्हे माफ करतो म्हणतोय.आता रायरेश्वरावर स्वराज्याची शपथ घेतली, तिथनं आम्ही तुमच्या संगट हायच की. आनि ह्ये देवा धर्माचे कार्य म्हणजे गुना ?आपल्याला काय ह्ये रुचल न्हायी.कारीस्न राजगड लांब न्हायी.तवा लगोलग आलो." कान्होजींनी येण्याचे कारण सांगितले.
"हं! आम्हालाही हे असे काही होणार याचा अंदाज होताच. काका जेव्हा आपण रायरेश्वराच्या पिंडीला रक्ताचा अभिषेक घातला तेव्हाच हा रक्तरंजित संघर्ष नक्की झाला आहे. ह्या सगळ्या पेचाची मुळ आहे, आम्ही यशवंतरावास जावळीचा चंद्रराव केला तिथेच. आधीचा चंद्रराव, दौतलराव मोरेंचे निधन झाल्यावर त्यांच्या धर्मपत्नींना माणकाईंना जावळी विजापुरकर बळकावतील अशी भिती वाटली आणि त्या राजगडावर आमच्याकडून मदत घेण्यासाठी आल्या, बाईंनी शिवथरच्या यशवंतराव मोरेना दत्तक घेउन जावळीचा चंद्रराव करायचे ठरवले. जावळी फार मोक्याची जागा आहे. ईथे जो सत्ता मिळवेल त्याचे कोकणात दाभोळ बंदरातून देशावर होणार्‍या व्यापार्‍यावर निंयत्रण रहाते.शिवाय घनदाट झाडीमुळे हा भाग खुप दुर्गम आहे.एक वेळ गवताच्या गंजीतील सुइ सापडेल्,पण ईथे माणुस हरवला कि सापडायचा नाही. आमची झुंज सध्या विजापुरकरांशी असली तरी ती पुढे नक्कीच मोंघलाशी आहे.त्यासाठी आम्हाला हा प्रदेश आपल्या स्वराज्यात हवा आहे.पण एक विधवा बाई आमची मदत मागायला येते, तेव्हा राजकारण बाजुला ठेवून आम्ही तीला जो हवा तो माणुस चंद्रराव म्हणून नेमला. हा चंद्रराव आमच्या शब्दाबाहेर नसला तरी सध्याच्या घडीला पुरेसे आहे. अपेक्षेप्रमाणे आदिलशाहीला हे राजकारण आवडणारे नाही. त्यांनी हा तिढा सोडावायला मोठा नामी माणुस पाठवला आहे. अफझलखान ! तुम्हाला तर माहितीच आहे कान्होजी काका.आमच्या आबासाहेबांसोबत तुम्ही बेंगळूरास होतात. हा अफझल मोठा हिकमती आहे, पराक्रमी आहे, पण तितकाच दगाबाज आहे. साध्या भटार्‍याचा हा मुलगा अब्दुल्ला खान भटारी आपल्या कतृत्वावर पुढे येतो आणि विजापुर दरबार त्याला 'अफझलखान' हि पदवी देतो. आमच्या आबासाहेबांबरोबर याने अनेक लढाया मारल्या.आमचे थोरले बंधु संभाजी राजे याच्याच दगलबाजीने कनकगिरीच्या वेढ्यात मारले गेले. आम्ही याला पुरते जोखून आहोत. हा वाईचा परगणा रणदुल्लाखानसाहेबांकडे होता, तेव्हा हा अफझल त्यांच्याबरोबर या भागात येउन गेला. या भागाचा जाणकार आणि या भागात आपले स्वराज्य वाढू नये म्हणून विजापुर दरबाराने खानाला खास ईकडे पाठविले आहे. अर्थात खान काही कायमस्वरुपी ईथे रहायचा नाही.तिकडे कर्नाटकात धामधुम सुरु आहे, कधी ना कधी खानाला तिकडे जायला लागणार. सध्या आपणही मोठी हालचाल न करणे चांगले. खान थेट जावळीत शिरेल असे वाटत नाही.आमच्या या मावळी भागात तसेही आदिलशाही आणि मोंघल फौजा कधी शिरायचे धाडस दाखवू शकल्या नाहीत.फक्त इथेल गड घेउन त्यांनी मुलुख ताब्यात घेण्यावर समाधान मानले आणि मिळेल तो महसुल मान्य केला. असो. सध्या आपण खान वाईतून कधी हलतोय, याची वाट पाहू"
"मग राजे, खानाला काय जवाब पाठवू ?आम्ही तर तुम्हाला स्वराज्याच्या कामात मदत करायचा शबुद दिलाय, त्यो मोडणार कसा ?" कान्होजींनी विचारले.
"कान्होजी काका, तुम्ही चिंता करु नका.खानाचा फारच दाब आला तर तुमच्या मुलाला शिवाला पाठवा.मात्र तुम्ही स्वता जाउ नका" राजे म्हणाले, पण त्यांची मुद्रा काहीशी व्यग्र झाली.
------------------------------------------------------
राजे नित्यनेमाने सदरेवर बसुन पत्रव्यवहार तपासत होते, तोच हेजीब आला आणि मुजरा घालून म्हणाला, "महाराज ! जावळीकड्ची खबर घेउन आलो आहे."
"हं! सांग" राजांनी हातातील खलिता बाजूला ठेवला.
"महाराज, मुसेखोऱ्यातील सहा गावचा कुळकर्णी 'रंगो त्रिमल वाकडे' याने एका विधवेशी सिंदळकीचा गुन्हा केला आणि शिवाजीराजे शासन करतील या भीतीने तो जावळीस आश्रयास गेला.चंद्ररावने त्यास आश्रय दिला आहे." हेजीबाने बातमी कथन केली आणि खलिता पुढे केला.
"चंद्ररावाची फार पुंडाई चालु आहे एकंदरीत ! या आधीही बिरवाडी टप्प्याखालील काही गावांचा अधिकार बाजी पाटील व मालोजी पाटील यांच्याकडे होता परंतु चंद्ररावाने त्यांना हुसकून लावले.ती गावे स्वतः बळकावली होती. तेव्हा पाटील आमच्याकडे मदत मागण्यासाठी आले आणि हा बंडावा मोडून आम्ही त्यांची वतनावर पुनर्स्थापना केली.त्यावेळी चंद्रराव चिडला पण गप्प बसला नाही. पुढे चिखलीचा रामाजी वाडकर व चंद्रराव यांचे पूर्वीपासून वैर होते त्याला चंद्ररावाने जीवे मारले. या रामाजीचा पुत्र लुमाजी प्राणभयाने आमच्या रोहीडेखोऱ्यात आला.चंद्ररावाने सुद्धा त्याचा पाठलाग सोडला नाही. स्वराज्याच्या कक्षेत असणार्या रोहीडखोऱ्यात घुसून त्याने लुमाजीला ठार केले. ईतक्यावरच हे थांबले नाही तर गुंजणमावळात देशमुखी कोणाकडे यावरून शिंदे-चोरघे-शिलिमकर यांच्यात जुना वाद होता. शिलिमकरांनी यापूर्वी फत्तेखानाविरुध्दच्या मोहिमेत आम्हाला साथ दिली होती, त्यामुळे आम्ही त्यांचा पक्ष देशमुखीसाठी उचलून धरला. परंतु चंद्रराव हे शिलिमकरांचे मामा असल्याने मन वळवण्याच्या प्रयत्न चंद्ररवाने केला.हे वृत्त समजताच शिलिमकरांना ताबडतोब अभयपत्र पाठवले. आणि आता हे त्रिमल प्रकरण. एकंदरीत चंद्रराव डोईजड होतो आहे. आम्ही यास जावळीचा मुलुख दिला तो आमच्या शब्दात राहिल म्हणून पण आता हा आमच्या राज्यातील गुन्हेगारांना आश्रय देणार असेल तर त्याची गय कोण करतो ? आबाजी खलिता लिहायला घ्या आणि तातडीने जावळीला रवाना करा"
आबाजीनी तातडीने कागद उघडला आणि शिक्का मारुन लिहायला सुरवात केली, महाराज मजकूर सांगू लागले.
"तुम्ही स्वताला राजे म्हणवितां. राजे आम्ही. आम्हास श्रीशंभूनें राज्य दिलें आहे तर तुम्ही राजे न म्हणावें. आमचे नोकर होऊन आपला मुलुख खाऊन चाकरी करावी. नाहीतर बदफैल करून बंद कराल, तर जावळी मारून तुम्हांस कैद करून ठेवुं."
----------------------------------------------------------------------------------------
सह्याद्रीच्या एन रांगेत महाबळेश्वराचे भव्य पठार आडवेतिडवे पसरले आहे. घनदाट झाडीने झाकलेल्या या पठारावर वर्षभर थंड हवा खेळत असते. याच महाबळेश्वराच्या माथ्यावर इशान्य बाजुला छोटी टेकडी आहे.या टेकडीच्या पायथाशी एक मंदिर आहे, ".पंचगंगा मंदिर".ईथून पाच नद्या उगम पावतात. याची एक मोठी मनोरंजक हकीगत सांगितली जाते. ईथे या क्षेत्री ब्रम्हदेवाने यज्ञ केला.साज शॄंगारात रममाण झालेली ब्रम्हदेवाची पत्नी सावित्री येउ शकली नाही.त्यामुळे ब्रम्हदेवाने आपली दुसरी पत्नी गायत्रीला घेउन यज्ञाचा मुहूर्त साधला. ईतक्यात नटून थटून सावित्री तिथे पोहचली. आपल्याशिवाय यज्ञ संपन्न झालेला पाहून तिने ब्रम्हा-विष्णू-महेश यांना शाप दिला कि ते नदीरुपाने या शिखरावरुन वाहू लागतील.कारण नसताना मिळालेल्या शापामुळे विष्णुने देखील सावित्रीला शाप दिला की ती देखील नदीरुप घेउन वाहू लागेल. यावर रुसलेली सावित्री महाबळेश्वराच्या पश्चिम कड्यावरुन उडी टाकून सिंधु सागराच्या दिशेने वाहु लागली तर विष्णु कृष्णा नदी होउन, शिव वेण्णा नदीच्या रुपाने , गायत्री आपले तेच नाव घेउन पुर्वेच्या बाजुने नदी रुपाने वाहू लागले. भगवान विष्णू पश्चिम कड्यावरुन कोयनेच्या रुपात झुळूझुळू वहात सिंधु सागराच्या ओढीने निघाले.मात्र भोरप्याच्या डोंगराने दोन्ही हात पसरून त्यांची वाट अडवली आणि कोयनामाई दक्षिणवाहीनी होउन पुढे उगवतीकडे वळण घेउन कृष्णेच्या ओढीने करहाटक नगरीकडे निघाली. पुढे कॄष्णा हि एकच नदी सगळा जलौघ घेउन श्रीशैल्य क्षेत्री शिवशंकराला पदस्पर्श करुन वंगसागरात विलीन होते आणि रामेश्वराच्या दर्शनाला जाते. हि कोयनामाई ज्या कड्यावरुन झेप घेते त्याचे टोक एका हत्तीसारखे पश्चिमेकडे पुढे आले आहे. हा आहे डोमेश्वराचा कडा. याच कड्याच्या पायथ्याशी वसले होते जावळी. दुर्गम आणि गचपण असलेल्या प्रदेशाची राजधानी. अश्या मोक्याच्या जागी जहागिरी मिळालेल्या चंद्ररावाला आपले महत्व समजले नसते तर नवल.शिवाजी महाराजांचा खलिता घेउन वकील जावळीची अवघड वाट तुड्वत होता.
------------------------------------------------------------------------------------------
गादीला टेकून चंद्रराव मोरे आरामात टेकून आलेले खलिते वाचत होते.इतक्यात कारकुनाने एक खलिता पुढे केला आणि तो म्हणाला, "राजगडावरुन श्रीमंत शिवाजीराजे भोसले यांचा खलिता आला आहे"
"हं! काय लिहीले आहे पाहू" चंद्ररावांनी खलिता उघडला आणि वाचु लागले.जसजसा मजकूर नजरेखालून सरकू लागला तशी चंद्ररावाची भिवई चढली, कपाळ्यावर आठ्यांचे जाळे झाले.चंद्रराव उठून फेर्‍या मारु लागला. बराच वेळ विचार झाल्यावर रागाने धुसफुसणारा चंद्रराव आपल्या आसनावर टेकला आणि कारकुनाला म्हणाला, "बाजी आम्ही सांगतो तो खलिता लिहा आणि आजच त्या शिवाजीच्या दुताबरोबर पाठवा". चंद्ररावाची कृध्द मुद्रा बघून अंग चोरून कारकून मजकूर टिपू लागला,'
"तुम्ही काल राजे जाहला. तुम्हांस राज्य कोणें दिलें? मुस्तफद राजा आपले घरी म्हटलीयावरी कोण मानितो? येता जावली जाता गोवली. पुढे एक मनुष्य जिवंत जाणार नाही. तुम्हांमध्ये पुरुषार्थ असला तर, उदईक याल तर आजच यावे - आम्ही कोकणचे राजे असून आमचा राजा श्रीमहाबळेश्वर. त्याचे कृपेने राज्य करितों. येथे उपाय कराल तर अपाय होईल. यश न घेता अपयशास पात्र होऊन जाल". मायना लिहील्यावर मोर्तब उमटवून कारकून घाईघाईने राजांच्या दुताकडे गेला आणि म्हणाला, "पंत चंद्रराव महाराजांनी उत्तर लिहीले आहे.महाराज फार चिडलेले दिसत आहेत, तुम्ही तातडीने जावळी बाहेर निघा". शिवाजी महाराजांचा वकील तो उत्ताल महाबळेश्वराचा डोंगर चढून राजगड जवळ करु लागला.
------------------------------------------------------------------------------------------
चंद्रराव मोऱ्याचे हे उर्मट उत्तर ऐकून महाराज परम संतप्त झाले. सदरेवर त्यांनी आबाजींना मोऱ्यासाठी अखेरचे एक पत्र लिहायला सांगितले, 'जावली खाली करोन, राजे न म्हणोन, मोरचेल दूर करून, हात रुमाले बांधून भेटीस येऊन हुजुराची काही चाकरी करणे. इतकीयावर बदफैली केलीया मारले जाल.'.
शेजारी सदरेत बसलेले मोरोपंत, माणकोजी दहातोंडे यांनी न रहावून महाराजांना विचारले, "महाराज, मोरे माजला आहे.त्याची बेदीली का खपवून घ्यायची ? आपण हुकूम करा , आम्ही तातडीने जावळीवर जातो".
"तो अखेरचा मार्ग आहे काका ! पंत यशंवतरावांना आम्ही चंद्रराव म्हणून नामजद केले ते आमच्या हुकुमात राहातील असे वाटले म्हणून. हे पातशाही सरदार आमचे कोणी नाहीत, त्यांच्यावर तलवार उगारताना यत्किंचितही किंतु मनात येत नाही.पण हि आमची माणसं. यांना आमच्या स्वराज्य स्थापनेचा धडपडीचा हेतु समजत नाही. आजुबाजुला जनतेवर चाललेला अन्याय दिसत नाही.आमची दैवत आज सुरक्षित नाहीत, कधी एखादा मुसलमान सरदार येणार आणि घणाचे घाव मुर्तीवर पडणार याचा नेम नाही.या सर्व घडामोडी आजुबाजुला घडत असून हे आमचेच लोक जहागिरीचे कातडे डोळ्यावर ओढून गप्प बसतात याची खंत आहे.यांना शक्य तितके समजावून द्यावे आणि स्वराज्यकामासाठी वापर करावा हा मनसुबा घेउन पुन्हा पुन्हा चुचकारतो आहोत. बघूया चंद्ररावांना हि अखेरची संधी असेल. नाहीतर जावळी आपल्याला लांब नाही".
---------------------------------------------------
पुन्हा एकदा शिवाजी राजांचा खलिता बघुन चंद्ररावाच्या कपाळावर आठी उमटली, पण त्याने कारकुनाला पत्र वाचायला सांगितले. मजकूर वाचून संतापाने चंद्रराव थरथरू लागला. रागारागाने त्याने खलिता कारकुनाच्या हातून हिसकावून जमीनीवर आपटला ,"हा शिवाजी समजतो कोण स्वताला ? अरे आम्हाला गादीवर बसण्यासाठी त्याने मदत केली हे मान्य पण आम्ही जहागिरदार आहोत. हे वतन आमचे आहे. आम्हाला हे उपरे सल्ले नकोत.या चंद्ररावाच्या बळाची कल्पना नाही म्हणून तो शिवाजी राजगडावर बसून जावळी ताब्यात घेण्याची भाषा करतो आहे.आम्ही त्याला कडक जवाब देतो". आणि तातडीने मजकूर लिहायला फर्मावले,
भितीने थरथरणार्‍या कारकुनाचा बोरु कागदावर चालु लागला "दारुगोळी महझूद आहे. काही बेजबाबास खुते घालून लिहिले ते कासियास ल्याहाविले? थोर समर्थ असो."
-------------------------------------------------------------------
चंद्रारावाचा खलिता सदरेवर हेजीब वाचून दाखवत होता.वातावरण बरेच तणावपुर्ण झाले. केवळ आज्ञेचे उल्लघंन नव्हे तर खलित्यातील उर्मट भाषा चीड आणणारी होती.
"एकंदरीत समोपचाराने जावळी प्रकरण प्रकरण मिटत नाही हे आता स्पष्ट झाले आहे. बळाचा वापर केल्याशिवाय पर्याय दिसत नाही.जावळीवर आक्रमण करणे तितके सोपे नाही.विजापूरकर अजूनही चंद्ररावाची पाठराखण करीत आहेत. शिवाय वाईच्या सुभ्यात अजून अफजलखाना मोहरा धरुन बसला आहे. आमचे आबासाहेब शाहजीराजे नुकतेच अटकेतून मुक्त झाले आहेत. काहीकाळ थांबून अनुकूल संधीची वाट पाहुया". राजांनी स्थिरचित्त होउन मनसुबा सांगितला.
"पण राजे तोपर्यंत चंद्रराव पुंडाई करतच रहाणार " सदरेतून तक्रारीचा सुर उमटला.
"नाईलाज आहे. खान जोपर्यंत वाईत आहे, तोपर्यंत हालचाल करणे म्हणजे आत्मनाश होईल.दबा धरुन रहाणे चांगले.चंद्ररावाचा अजून घडा भरायचा आहे. शिशुपालाचे शंभर अपराध होईपर्यंत श्रीकॄष्णालाही थांबावे लागले.आपल्यालाही थोडाच काळ थांबावे लागेल". शिवाजी राजे निश्चयाने उत्तरले.
-------------------------------------------------------------------------------
मार्गशीर्षाची थंडी राजगडावर उतरली. अश्या थंड वातावरणात सदरेखालच्या खलबतखान्यात मोरोपंत, माणकोजी दहातोंडे,कान्होजी, नेतोजी जमले होते.त्यांना राजांची प्रतिक्षा होती. त्यांची काही चर्चा सुरु होती ईतक्यात राजे आलेच. लगबगीने सगळ्यांनी उठून मुजरा घातला आणि बैठकीला सुरवात झाली. राजांनी खलबताचे निमित्त सांगितले, "गेले काही दिवस आपण चंद्रराव मोर्‍यांची अरेरावी सहन करीत आहोत. कर्नाटकातून खबरा आल्या आहेत कि तिकडे कनकगिरीकडे बंड सुरु झाले आहे. विजापुर दरबार अफझलखानाला कर्नाटकात पाठवणार आहे. एकदा हा अफझलचा शह गेला कि आपल्याला मोर्‍यांविरुध्द हालचाल करायची चांगली संधी आहे. चंद्रराव मोर्‍यास मारल्यावीना राज्य साधत नाही. अर्थात जावळी कठीण जागा आहे याची आम्हास कल्पना आहे.मोर्‍यांविरुध्द साम्,दाम याचा उपयोग झालेला नाही, आता वेळ आहे ती भेद निती वापरण्याची. रघुनाथ बल्लाळ सबनीस काही निमित्त काढून जावळीला मोर्‍यांच्या भेटीला जातील आणि मोर्‍यांचा काटा काढावा. ते शक्य न झाल्यास निदान कमजोरी काय आहे याचा अंदाज घ्यावा."
एकुण मनसुबा जाणून सगळ्यांनीच माना हलविल्या आणि खलबत संपली. ठरल्याप्रमाणे कान्होजी जेधे आणि हैबतराव शिळीमकर फौज घेउन राजगड उतरुन महाबळेश्वराच्या मुलुखाकडे रवाना झाले. आठवडाभरात महाराज पुरंदर गडावर गेले, तर सव्वाशे लोक घेउन रघुनाथ बल्लाळ, संभाजी कावजी विवाहाची बोलणी करण्याच्या निमित्ताने जावळीच्या जंगलात शिरले. त्यांनी बोलण्याचे निमित्त काढून जावळीत प्रवेश मिळवला. निवडक पंचवीस स्वार घेउन कान्होजी,माणकोजी आणि हैबतराव जावळी गावात शिरले.बाकी फौज जावळीच्या रानात दबा धरुन बसली. जावळीच्या कीर्र जंगलात हत्ती आरामात लपेल तिथे या फौजेची काय कथा. रात्री इशारा देण्याचे ठरले होते. मार्गशीर्षाची थंडी उतरली आणि पहार देणारे निवडक हशम सोडले तर बाकी सगळे जाड वाकळी खाली अंग चोरुन निजले. रात्रीचा दुसरा प्रहर लोटला आणि अचानक मोर्‍यांच्या वाड्यातून घुबडाचा घुत्कार एकू येउ लागला. जाग आलेल्या पहारेकर्‍याला हा आवाज नवा नव्हता.मात्र याच आवाजाकडे कान देउन बसलेले मावळे तातडीने झाडावरुन उड्या मारुन खाली उतरले आणि जपून पावले टाकत गावाच्या रोखाने निघाले. ईतक्यात पहार्‍याच्या हशमांना जाग आली आणि होशिय्यारचे ईशारे जावळीच्या रानात उठले.तोपर्यंत मावळ्यांनी सप्पकन तलवारी बाहेर काढून एकच कापाकापी सुरु केली. मोर्‍यांची माणसेही सावध झाली. घाईघाईने मिळेल ती शस्त्रे घेउन प्रतिकार करायला बाहेर पडली. चंद्रराव मोरे हा गलका एकून जागा झाला. ईतक्यात मावळ्यांचा एक जमाव त्याच्या वाड्याकडे चालून आला.पण तितक्यात वाड्याच्या ओसरीकडून एक वीर आकाशातून उल्का पडावी तसा अंगणात उडी टाकून उतरला आणि दोन्ही हातांनी पट्टे फिरवू लागला. हा होता मोर्‍यांचा पराक्रमी मोहरा मुरारबाजी देशपांडे !एखादे चक्र घुमावे तसे तो अंगणात फिरत होता, त्याला ओलांडून जाणे मावळ्यांना अवघड झाले होते. त्यामुळे काही मावळे अंधाराचा फायदा घेउन वाड्याच्या मागच्या बाजुने उडी मारून चंद्ररावाला शोधायला वाड्यात घुसले. आता आपण सापडणार या भितीने चंद्रराव, बाजी, कृष्णाजी हि त्याची दोन मुले आणि कुटूंब कबिला घाईघाईने घोड्यावर घालून पळाला. अंधारामुळे हे मावळ्यांना समजेपर्यंत मोरे पशार झाला होता. ईकडे मुरारबाजी अजूनही मोहरा घेत होता. ईतक्यात माणकोजी, कान्होजी आणि हैबतराव तिथे आले. मुरारबाजीचे पट्टा चालविण्याचे कौशल्य बघुन ते थक्क झाले.त्यांनी तातडीने दोर टाकून मुरारबाजीला जिवंत पकडण्यास सांगितले. मुरारबाजी दोरखंडात सापडला.आपल्याला कैद केल्याचे बघून ईंगळासारखे डोळे कान्होजींवर रोखून तो म्हणाला, "अरे, कशासाठी मला कैद करताय ? हिम्मत असेल तर मान मारा".
"न्हायी पोरा.आरं मर्द मावळा गडी हायेस तु. असा अन्यायाच्या बाजूने लढण्यापरास आमच्या राजाच्या चाकरीत ये. देवा धर्माच आमचं स्वराज्य हाय.पातशाही गुलामगिरीतून प्रजा आज सुटली हाय.ह्या मुलुखाला तुझ्यासारख्या पराक्रमी मर्दाची गरज आहे. ह्योच डाव पातशाही फौजेला दाव. शिवाजी राजं तुला नावाजतील.जावळी ताब्यात घेतल्या बरुबर महाराजांस्नी सांगावा धाडायचा हाय, तवा या मर्दाला त्यांच्यासमोर उभ करु.काय नाव रे पोरा तुझं?"
"हं ! हे असं कपटाने मला कैद करताय आणि स्वराज्याचे कौतुक सांगताय ? आम्ही मोर्‍यांचे सेवक.असे दगाबाजी करणारे नाही.मला मुरारबाजी देशपांडे म्हणतात". मुरारबाजी त्वेषाने म्हणाला.
"घेउन जा रे याला! राजं आले की याला म्होर आणुया.नीट नजर ठेवा ,एकट्यादुकट्याला आवरायचा न्हायी ह्यो" हैबतरावांनी हुकुम दिला आणि दोरांनी बांधलेल्या मुरारबाजीला मावळे घेउन गेले.
"चंद्रराव मोरे कोठे आहे ?" माणकोजीनी विचारले.
"सुभेदार, अंधाराचा फायदा घेउन पळाला त्यो" एक मावळा मान खाली घालून म्हणाला.
"काय हरकत न्हायी.जाउन जाउन कुठं जाईल? आज ना उध्या घावलच तवा तलवारीखाली यिल" माणकोजी मिश्या पिळत म्हणाले.त्यांनी हेजीबाला बोलावले आणि राजांसाठी खलिता लिहून त्याच्या हातात दिला. सकाळी महाबळेश्वराचा उंच डोंगर चढून हेजीब पुरंदराकाडे रवाना झाला.
दोनच दिवसता संभाजी कावजी आणि रघुनाथ बल्लाळ जावळीत उतरले. मोर्‍यांच्या वाड्यात दुपारी बैठक जमली. रघुनाथ बल्लाळंनी चर्चेला सुरवात केली.
"जावळीचा मुलुख बराच पसरला आहे. केवळ जावळी गाव घेतले म्हणजे हा मसला संपत नाही. कोयनेच्या खोर्‍यात चर्तुबेटात हणमंतराव मोरे आहे, हि खबर मिळाल्यावर तो गप्प बसणार नाही.आज ना उद्या तो चालून येणारच. शिवाय शिवथर खोर्‍यात बाबाजीराव मोरे आहे.हा ही गप्प बसेल असे वाटत नाही.तुर्त संभाजी कावजीला चतुर्बेटला पाठवुया.राजांना पुरंदरी निरोप धाडला आहेच.ते आले कि पुढचा मनसुबा ठरवता येईल".
नवीन कामगिरीने खुष झालेला कावजी दुपारीच कोयनेच्या खोर्‍यात शिरला.
-------------------------------------------------------------------------
पुरंदरावर पौषाचे प्रसन्न वातावरण पसरले होते.किल्लेदार नेतोजी पालकरांना बरोबर घेउन राजांचा नेहमीप्रमाणे केदारेश्वराच्या संध्याकाळचा फेरफटका सुरु होता. महाराजांना याच पुरंदरवर फत्तेखानाला मात दिल्याचा प्रसंग आठवत होता. ईतक्यात खबरी काही बातमी घेउन आला होता.
मुजरा घालून हेजीब म्हणाला, "राजे, रघुनाथपंतानी निरोप धाडला आहे कि जावळीचा मुलुख निष्कंट्क झाला आहे.कान्होजी,हैबतरावांनी जावळीवर हल्ला केला आणि वाडा ताब्यात घेतला, मात्र या दंग्यात चंद्रराव मोरे पळाला. रघुनाथ बल्लाळांनी संभाजी कावजीला चतुर्बेट गावात रहात असलेल्या हणमंतराव मोरे याला मारायला पाठवला.कावजीने एकांतात हणमंतरावाला सोयरीकेच्या निमित्ताने बोलावून घेतले आणि कट्यारीचे घाव घालून मारले.आता जावळी काबीज झालीच आहे".
राजे खुष होउन म्हणाले, "नेतोजी काका, आता जावळी आपलीच झाली.आम्ही आजच सैन्य घेउन महाबळेश्वराकडे निघतो.चंद्रराव पळाला असला तरी त्याला पाताळातून सुध्दा शोधून काढू आणि स्वराज्य द्रोहाची काय शिक्षा असते हे जगाला दाखवून देउ.म्हणजे पुन्हा हे धाडस कोणी करायला नको".
दुसर्‍या दिवशी पुरंदराचा घाट उतरुन फौज वाईच्या दिशेने दौडू लागली. वाईचा मुक्काम आवरला आणि धुंद थंडीच्या आवरणातून वाई जागे होते आहे तोपर्यंत राजांनी पसरणी घाटाची चढण पार करुन महाबळेश्वर, अतिबळेश्वर,पंचगंगा आणि कृष्णामाईचे मंदिर खुणावत होते.
"ट्ण्ण- - - - " घंटेचा प्रसन्न नाद झाला. खुप वर्षांची या देवस्थानांची प्रतिक्षा आज संपली होती.सदैव सुलतानी वरवंट्याच्या दहशतीमधून सर्व देवस्थान आज मुक्त झाली. आता ईथे मुक्त मनाने आचमन होणार होती, शिवलीलामृताचे मनमोकळे पारायण होणार होती. कोणत्याही पातशाही सरदाराची काळी सावली पडणार नव्हती. दर्शन आणि भोजन आटोपून राजे आपल्या फौजेसह निसणीच्या वाटेने उतरु लागले. खाली दरीत जावळी,दरे हि गावे दिसत होती.
एन संक्रातीला राजांचे आगमन जावळीत झाले. सगळेच जण खुशीत होते. मोर्‍यांच्या वाड्यासमोर अंगणात सगळे जमले.क्षेमकुशल झाले आणि एकंदर मोहीमेचा आढावा घेतला जाउ लागला. चंद्रराव मोरे पळाला होता.त्याचा माग काढणे आवश्यक होते.
माणकोजीनी पुढचा मसला विचारला. "माणकोजी आमची एक फौज शिवथर खोर्‍यात पाठवून द्या.चंद्रगड, कांगोरी ताब्यात घ्यायाला हवेत.शिवथर खोर्‍यातील बाबाजी मोरे असाच पुंडावा धरुन आहे. साप,अग्नी आणि शत्रु कधीही अर्धवट जखमी करुन सोडू नये.कधी उलटतील याचा नेम नाही. बाबाजी आमच्या बाजुला येतात का, पुन्हा एकदा विचारा. अन्यथा त्याचाही बंदोबस्त करावा लागेल."
बोलून झाल्यानंतर राजांनी विशिष्ट प्रकारे टाळी वाजवली. भोवती जमलेल्या गर्दीतून एक धनगर पुढे आला. डोक्यावर घेतलेल्या घमेल्यात मधाचे पोळे होते.घमेले बाजूला ठेवून धनगराने मुजरा घातला. बाकीच्यांना हा काय प्रकार चालला आहे ते समजेना. हैबतरावांनी न रहावून राजांना विचारले, "महाराज कोन ह्यो धनगर ?"
"हैबतराव, अहो यांना ओळखले नाहीत ? हे तर आमचे बर्हिजी नाईक.जावळीच्या खबरा आणण्यासाठी यांनी हे मध गोळा करणार्‍या कातकर्‍याचे सोंग घेतले होते. सगळ्या खबरा आम्हाला अचुक मिळत होत्या, कारण आमचा हा तिसरा डोळा ईथे फिरत होता"
हे बोलणे एकून गावकरी आवाक झाले.म्हणजे ईतक्या दिवस आपल्याबरोबर जंगलात फिरणारा हा कातकरी शिवाजी राजांचा माणुस होता तर !बाकी सगळे मात्र हसु लागले. कान्होजींनी तर चेष्टेने बहिर्जीला विचारले, "बहिर्जी ,अरे कारभारीण तर वळखते का तुला?". हास्याचा एक मोठा धुरळा उडाला. एकुण हि संक्रांत प्रसन्न झाली होती.
बहिर्जी थोडे गंभीर होउन म्हणाले "राजे, एक गडबड झाली. या धामधुमीत प्रतापराव मोरे झोलाईचा खिंडीतुन पळाला.माझी माणसं त्याच्या मागावर हुतीच.पण रात्रीचा अंधाराचा फायदा घेउन तो पळाला.बहुतेक बामणोलीमार्गे विजापुरला पळायच्या बेतात असलं.शिपायी धाडलेत, बघुया सापडतोय का?"
"हं.एकजण सुटलाच तर ! हरकत नाही.प्रतापरावाची हि जहागिर आहे.आज ना उद्या तो पुन्हा येथे येईलच.नीट नजर ठेवा" महाराज म्हणाले.
"जी राजे" मुजरा घालून बर्हिजी निघून गेले.
ईतक्यात हैबतरावांना आठवण झाली.त्यांनी शिपायांना फर्मावले, "अरे, आणा त्या मुरारबाजीला".
"मुरारबाजी ? हा कोण ?" राजांनी प्रश्न केला.
"मोर्‍यांचा माणुस आहे राजे.लयी तलवारबाज वीर हाय म्हाराज.चक्रावाणी पट्टे फिरवतोय.अवो चार जणास्नी आवरना. याच्याबरुबर मुकाबला करण्यात मावळ गुतल तवर चंद्रराव पळाला,न्हायीतर आज सुटत नव्हता". हैबतराव बोलत होते तेवढ्यात काढण्या घातलेला मुरारबा़जीला घेउन मावळे आले.
"सोडा त्याला" राजे म्हणाले.मोकळा झालेला मुरारबाजी धुमसत होता.
"हि तुमची रित झाली काय ? आम्ही मोर्‍यांची ईमानी माणसे आहोत.त्यांच्या खाल्लेल्या मीठाला जागून आम्ही लढलो तर कैद करताय ?काय गुन्हा माझा ? पाहिजे असेल तर माझी गर्दन उतरवा, कैद कशाला करता ?" मुरारबाजी त्वेषाने म्हणाला.
"शांत हो मुरारबाजी, आम्ही तुला मोकळे करतो.शरणागत आलेल्याला स्वराज्यात मानाची वागणूक मिळते.दगाबाजी करायला हि सुलतानशाही नाही. तुझ्या पट्टा चालवण्याचे कौशल्य आम्ही एकले.तुझा पराक्रम अजोड आहे. पण तो चुकीच्या ठिकाणी वाया चालला आहे. मोरेही आमचेच होते.आम्ही त्यांना हरप्रकारे समजावले.आमच्या आज्ञेत ते राहीले असते तर ही वेळ आली नसती. पण आमच्या स्वराज्याचा भगवा सोडून त्यांना आदिलशाहीचा चांदतारा जास्त प्यारा वाटला.विजापुरवरुन जावळीवर अफझल चालून आला तरी चंद्ररावांचे डोळे उघडले नाहीत. नाईलाजाने आम्हाला हे पाउल उचलावे लागले. मोरे आमच्या रयतेला त्रास देत होते.स्वराज्यातील गुन्हेगारांना आश्रय देत होते. आम्ही त्यांना खुप पत्र लिहीली,पण जावळी अजिंक्य आहे या भ्रमात ते राहीले.पण पापी राजवटीचा कधी ना कधी अंत हा होतोच.आता अश्या राजवटीला तु साथ द्यायची कि महादेवाच्या साक्षीने आम्ही योजलेल्या स्वराज्याच्या कामात साथ द्यायची हे तु ठरव". राजांचे सडेतोड बोलणे एकून निमुट्पणे मान खाली घालून एकणारा मुरारबाजी पुढे झाला आणि राजांचे पाय धरुन म्हणाला, "राजे चुकलो मी ! आज हा मुरारबाजी स्वराज्याचा शिलेदार झाला.आपण द्याल ती कामगिरी जीवाची बाजी लावून पार पाडेन"
"शाब्बास! कान्होजी, गर्द झाडीची हि जावळी ताब्यात आली त्यापेक्षा याच झाडीतील वाघासारखी ही माणसे आम्हाला मिळाली याचे समाधान आहे". सगळ्यांनी समाधानाने माना हलविल्या.
--------------------------------------------------------------------------------
सुमारे दोन महिने राजे जावळीला मुक्कामी होते.वासोट्यासारखा दाट जंगलात लपलेला दुर्गम गड स्वराज्यात आला होता. महाडचा कोट्,चांभारगड्,सोनगड,मानगड ह्यावर स्वराज्याचे भगवे निशाण फडकत होते. नाही म्हणायला कांगोरी थोडा भांडला, पण तो ही स्वराज्यात आलाच. एक मोठी मसलत यशस्वी झाली होती.स्वराज्याची हद्द थेट आता समुद्राला भिडली होती. दाभोळ बंदरातून घाटावर जाणार्‍या मालावरील जकात आता महाराज वसूल करणार होते. जावळीसारखा दुर्गम मुलुख स्वराज्याला जोडला गेल्यामुळे एक भक्कम कवच मिळाले होते.आता फक्त एक अडचण होती.चंद्रराव रायरीच्या गडावर लपून बसला होता. तो तेवढा ताब्यात आला की कोकणाकडे लक्ष देता आले असते.
रायरीच्या किल्ल्याला फौजांनी वेढलेले होते.राजे आज तिकडेच जाण्यासाठी निघाले.ईतक्यात तानाजी पुढे आला आणि मुजरा घालून म्हणला, "राजं,उद्या जावळी उतरायची हाय तर माझ गाव उमरठ लांब न्हायी.तवा गरीबाच्या घरी पायधुळ झाडली तर ?"
"तान्ह्या, अरे तु तर आमचा बालपणीचा सवगंडी.तुझ्या घरी आलो न्हाई तर तुझी माय पुढच्यावेळी आम्हाला घरात घ्यायची नाही,आपण जरुर तुझ्या घरी जाउ.फौजेला दुसर्‍या वाटेने पुढे पाठवुया आणि आजचा मुक्काम तुझ्या घरी"
तानाजीने समाधानाने मान हलविली.
दुसर्‍या दिवशी राजे,तानाजी,मोरोपंत्,कान्होजी,कावजी आणि निवडक मावळे उमरठच्या वाटेला लागले.थोडी दौड मारल्यानंतर राजांनी समोरच्या डोंगराकडे बोट दाखवून तानाजीला विचारले, "तान्ह्या हा डोंगर कोणता?"
"ह्यो ! ह्याला भोरप्याचा डोंगर म्हणत्यात. ह्यालाच रान आडवा गौड बी म्हणत्यात." तानाजी उत्तरला.
"फार मोक्याच्या जागी उभा आहे हा भोरप्या. पंत आधी आम्ही हा डोंगर नजरेखाली घालणार.जावळीतून हा रोज बघायचो.आज ह्याची पहाणी करुया"
"जावळीचा मुलुख लई अडचणीचा हाय.फार कोन जात न्हायी डोंगरावर. वर पहार्‍याची एक चौकी तेवढी हाय" तानाजीने माहिती पुरवली.
राजांनी भोरप्याच्या डोंगराची बारकाईने पहाणी केली. मोठी नामी जागा होती. दुर कोकणापर्यंतचा मुलुख दिसत होता.राजगड्,तोरणा,महाबळेश्वराचे आडवेतिडवे पसरलेले पठार, मकरंदगड लांबाचा प्रदेश ध्यानी येत होता.
"ईथे बांधणे आहे" राजांनी मनातील विचार पंताना बोलून दाखविला. पंतानाही हि मोक्याची जागा आवडली.त्यांनी लगेच हेजीब राजगडावर पाठवले.
----------------------------------------------------------------------------
महाडमधून निघालेली फौज चांभारगड आणि सोनगडाच्या खिंडीतून सुसाट उत्तरेला निघाली. आकाशाला टेकलेला रायरीचा दुर्ग दिसू लागला. राजांनी गडाच्या पायथ्याच्या पेठेत पाचाडात मुक्काम केला. गेले तीन महिने चंद्रराव रायरीच्या डोंगरावर दडून बसला होता.वैशाख वणवा सुरु झाला तरी गडाचा वेढा जरासुध्दा ढिला झाला नव्हता.शेवटी चंद्रराव मोर्‍यानी गडावरुन शरणागतीचा निरोप पाठविला.चंद्रराव आणि त्याचे दोन मुलगे बाजी व कृष्णाजी हात बांधून राजांच्या छावणीत दाखल झाले.त्यांना कैदेत ठेवण्याची आज्ञा करुन राजे माणकोजी, मोरोपंत, कान्होजी रायरीच्या दुर्गम गडावर निघाले. रायरीची ती गगनचुंबी उंची, उभे ताशीव कडे आणि सभोवतालचे अभेद्य डोंगराचे कडे पाहून राजे हर्षभरीत झाले.
"महाराज गड मोठा चखोट आहे.ऐसपैस पसारा आहे.बेलाग कडे, मोठा परिसर नजरेत येतो आहे.एकंदरीत आपल्याला हि जावळीची मोहीम लाभली म्हणायची" मोरोपंत म्हणाले.
"खरे आहे मोरोपंत ! जावळी ताब्यात तर आलीच पण हि आणखी एक मोक्याची जागा ताब्यात आली आहे. भविष्यकाळात या गडाचा महत्वाचा मसलतीसाठी नक्कीच उपयोग होईल. रायरी ताब्यात आला म्हणजे उत्तर कोकणात उतरायला आपल्याला जागा झाली.आता जंजिर्‍याच्या सिद्दीकडे लक्ष देता येईल.शिवाय आमची नजर आहे कल्याण भिवंडीकडे. मुळचा हा मुलुख निजामशाहीचा.शहाजहान आणि मुहंमद आदिलशहाने स्वारी करुन आमच्या आबासाहेबांना, शहाजीराजांना माहुलीला शरण यायला भाग पाडले तेव्हा हा मुलुख आदिलशाहीला जोडला गेला आणि आबासाहेबांची रवानगी बेंगळुरला केली गेली. पण आता दिवस बदललेत. शहाजहान दिल्लीत असला तरी त्याचे लक्ष ईकडे दख्खनेत आहेच. औरंगजेबाला त्याने द्क्षिणेत पाठवले ते विजापुरचे राज्य बुडवायला. औरंगजेबाचा मनसुभा वेगळाच आहे. शहाजहानचा थोरला मुलगा दारा त्याचा लाडका आहे.शहाजहानच्या मागे तोच गादीवर बसणार असा सगळ्यांचा अंदाज आहे,जर दिल्लीची गादी मिळणार नसेल तर औरंगजेबाचा डोळा या दक्षीणेच्या मुलुखावर आहे. ईतके दिवस तो आमच्याकडे काणाडोळा करतो आहे ते हाच मनसुबा ध्यानी ठेवून.अर्थात आम्ही त्याचाही फायदा उचलणार आहोतच. आदिलशाही आणि मोंगल या दोन बोक्यांच्या भांडणात आमचा फायदा करुन घेण्याची हि नामी संधी आहे" राजे दुरवर बघत होते आणि लांबचे मनसुबे सांगत होते.सगळे थक्क होउन हि मनसब एकत होते.
तुर्त काही फौज घेउन राजे पुन्हा राजगडाकडे निघाले.
( क्रमशः)

इतिहासलेख

प्रतिक्रिया

समीर वैद्य's picture

8 Sep 2020 - 4:54 am | समीर वैद्य

अतिशय उत्तम.... ओघवती भाषा आणि प्रसंग रंगवण्याची हातोटी....
मस्त !!
पुभालटा :-)

महासंग्राम's picture

8 Sep 2020 - 10:19 am | महासंग्राम


राजा खासा जाऊन पाहता गड बहुत चखोटा. चौतर्फा गडाचे कडे तासिल्याप्रमाणे दिड गांव उंच. पर्जन्यकाळी कडियावर गवत उगवत नाही आणि धोंडा तासीव एकच आहे. दौलताबाद पृथ्वीवर चखोट गड खरा, परंतु तो उंचीने थोडका. दौलताबादचे दशगुणी गड उंच असे देखोन बहुत संतुष्ट झाले आणि बोलिले, तक्तास जागा हाच गड करावा.

तुमचे लेखन नेहमीच छान असते,

पण लेख खुप मोठे असल्याने, निवांत वाचू म्हणुन मागे ठेवतो, आणि ते मागे ठेवलेले वाचण्या अगोदर दुसरे मोठे मोठे 2-3 लेख येतात पुन्हा..

आणि मग बरेचसे लेखन असेच वाचायचे राहून जाते..

कृपया थोडे छोटे छोटे भाग दिल्यास त्या त्या वेळेत ते वाचून जास्त आनंद घेता येईल असे वाटते..

Plz

Bhakti's picture

8 Sep 2020 - 11:23 am | Bhakti

तुमच लेखन जबरदस्त आहे.
पण माझ हेच म्हणण आहे. छोटे छोटे भाग दिल्यास वाचायला सोपे जाते.किंवा फोटोंचा तरी समावेश करा.
जावळी वाचलं आहे ..लिहीत रहा .. Energetic !!

बेकार तरुण's picture

8 Sep 2020 - 12:20 pm | बेकार तरुण

नेहमीप्रमाणे उत्तम लेख... खूप छान लिहिता तुम्ही ...

प्रचेतस's picture

8 Sep 2020 - 1:34 pm | प्रचेतस

उत्कृष्ट.

लिहीत राहा, वाचत आहेच.

दुर्गविहारी's picture

8 Sep 2020 - 1:39 pm | दुर्गविहारी

सर्वंनाच मनापासून धन्यवाद ! _/\_
@गणेशा, Bhakti! बहुतेकदा एका आठवड्यात मी एकच धागा पोस्ट करतो. आता या कथेचा दुसरा भाग शनिवारी किंवा रविवारी पोस्ट करेन. पण तरीही ईतका मोठा भाग वाचणे गैरसोयीचे होत असेल तर नक्कीच छोटे भाग करण्याचा प्रयत्न करेन.

फोटोंचा तरी समावेश करा.

मुळात हे लिखाण मी दोन प्रकारे करतो आहे. सर्वसामान्य लोकांना इतिहास म्हणले कि सनावळ्या आणि कलमे यांच्यामुळे अंगावर काटा येतो.गोष्ट वाचणे/एकणे सर्वांनाच आवडत असल्यामुळे अस्सल इतिहास कथारुपात मांडतो आहे.पण ज्यांना अधिक सविस्तर वाचायचे आहे त्यांच्यासाठी "अफझलखानाचा वध- अभ्यासकाच्या नजरेतून" हा धागा हि कथा संपली कि येईलच.त्यामध्ये या व्यक्तिरेखांची अस्सल चित्रे, फोटो, नकाशे सगळे येईल.

नीलस्वप्निल's picture

8 Sep 2020 - 1:43 pm | नीलस्वप्निल

अतिशय आवडले

ज्ञानोबाचे पैजार's picture

8 Sep 2020 - 3:37 pm | ज्ञानोबाचे पैजार

जशी वाचायला सुरुवात केली तसा देहभान हरपून वाचतच राहिलो.

जितके पाहिजे तेवढे मोठे भाग टाका, असेच जबरदस्त लिहिणार असाल तर आम्ही वाचू

पैजारबुवा,

राघव's picture

8 Sep 2020 - 4:02 pm | राघव

खूप आवडले. वाचतोय.

हा भाग पुरेसा मोठा आहे आणि तेच योग्यही आहे. तुम्ही ज्या अंतरानं लेख टाकणार त्यानुसार सलगता राहण्यासाठी एवढा लेख ठीक आहे. कमी करण्याची आवश्यकता वाटत नाही.

मुरारबाजी म्हणजे माझा स्वतःचा वीक पॉईंट आहे ब्वॉ. पण त्यांची फारशी माहिती कुठे येत नाही. त्यांची माहिती जरा मिळाली तर सांगावी.

मिपाचे आधुनिक शिवचरित्रकार दुर्गविहारी ह्यांना मानाचा मुजरा!

सर्वसामान्य लोकांना इतिहास म्हणले कि सनावळ्या आणि कलमे यांच्यामुळे अंगावर काटा येतो.गोष्ट वाचणे/एकणे सर्वांनाच आवडत असल्यामुळे अस्सल इतिहास कथारुपात मांडतो आहे.

+१
जबरदस्त लिहिलंय! पुढील भाग लवकर येउद्यात.

वाचायला घेतला अन् संपवून ठेवला... मोठा नव्हे तर छोटा वाटला हा भाग...
पूर्ण गोष्ट वाचण्यास अधीर - सुखी

अर्धवटराव's picture

9 Sep 2020 - 8:40 am | अर्धवटराव

पाठ्यपुस्तकात का नाहि येत या सगळ्या मसलती... पोरांमधे स्फुल्लींग चेतवायला किती जबरी मटेरीअल आहे.