हरतालिका

महासंग्राम's picture
महासंग्राम in जनातलं, मनातलं
21 Aug 2020 - 11:57 am

हिमाचल प्रदेशातील हिमवान राजाची पार्वती  ही कन्या. तेव्हा तिचे ऐश्वर्य काय वर्णन करायचे ? सर्वगुणसंपन्न अशी ही कन्या राजाची अत्यंत लाडकी होती.
कन्या वर्षाची, दोन वर्षाची, तीन वर्षाची, चार वर्षांची झाली. अशा त-हेने ती वाढत असता राजाला आता तिच्या लग्नाची काळजी वाटू लागली. आपल्या बाळ मैत्रिणींसह खेळताना-हिंडताना-नटताना-मुरडताना तिला पाहून त्याला धन्य वाटायचे आणि हे रत्न दुसऱ्याला द्यायचे याबद्दल दुःखही व्हायचे! अशा परिस्थितीत असतानाच नारदाची स्वारी झाली. राजसिंहासना जवळच हे कन्यारत्न होते. नारदांनी लगेच भविष्य सांगितले, “ही तुझी कन्या एका तपस्व्याचा पती म्हणून स्वीकार करील ! ही कन्या आदिशक्तीचे रूप आहे.” राजाला ही गोष्ट तितकीशी पसंत पडली नाही. तो म्हणाला, “मुनिवर्य, हिला एखाद्या रूपवान, धनवान, सर्वगुणसंपन्न असा पती मिळावा अशीमाझी इच्छा आहे. " हे ऐकून मुनीवर म्हणाले " तर मग राजा, त्या भगवान विष्णूशिवाय दुसरा हिच्या योग्य असा वर माझ्या तरी पाहण्यात नाही. अशा तऱ्हेची  चाललेली आपल्या लग्नाविषयीची बोलणी पार्वती ऐकत होती. आदल्या जन्मीच्या संस्कारामुळे तिची शंकरावर भक्ती होती. विष्णूंना आपल्याला देण्याचा आपल्या आईवडिलांचा निश्चय तिने ऐकला. पण याला काय उपाय करायचा हे तिला समजेना. तिला अशी उदास पाहून तिच्या सख्या तिला त्याचे कारण विचारायच्या, “ काय ग पार्वती, तू अशी "उदास का दिसतेस ? मनातलं सांगायला संकोच करू नकोस. मी त्याला उपाय सांगेन". पार्वतीने मग सर्व हकीकत तिला सांगून 'शंकराशिवाय मी कुणाचाही पती म्हणून स्वीकार न करण्याचा आपला निश्चय असल्याचे सांगितले. आणि तूच माझी या संकटातून मुक्तता कर' अशी तिची विनवणी केली.

पार्वतीचा हा निश्चय ऐकन सखी म्हणाली, "चल, आपण वनात जाऊ. तू  तप करून शंकरांना प्रसन्न करून घे  अशा तऱ्हेने  त्या दोघी त्या राजवाड्या-
नाहीत की निश्चयापासून ढळल्या नाहीत. पार्वतीने तर शंकराचे लिंग स्थापन करून त्याची पूजा केली आणि उपोषणाला सुरवात केली लाडकी लेक घरातून नाहीशी झालेली पाहन राजा व सर्वजण चिताक्रांत झाले. जिकडे तिकडे शोधाशोध सुरू झाली. कुणालाच अन्नपाणी सुचेना. इकडे पार्वती तर तपश्चर्येत मग्न होती. श्रीशंकराशिवाय तिला कोणी दिसेना. तिने कंदमुळे, झाडाची पाने, पाणी व शेवटी तर वारा भक्षण करून तप केले. तर थंडीत थंड पाण्याने तर उन्हाळयात अग्नी पेटवून अशी तपश्चर्या केली. हे तप इतके प्रखर झाले की, तिच्या तेजाने पृथ्वी तप्त झाली ! सर्व ऋषी- मुनी, देवगण, शंकराला विनवू लागले की, आता तुम्ही पार्वतीचे पाणिग्रहण करा. तिचा पक्का निश्चय आहे. इकडे राजा अगदी हवालदिल झाला असता एका अरण्यात तपश्चर्येला बसलेली आपली कन्या त्याने पाहिली. ती कृश परंतु तेजस्वी दिसत होती. राजाने कन्येला तर मिठीच मारली. पार्वतीने पण वडिलांच्या पायांवर डोके ठेवले. शंकरांना तिला देण्याचे वचन दिल्यावर मोठ्या आनंदाने तो पार्वतीसह घरी आला आणि थाटामाटात शंकर पार्वतीचे लग्न झाले. या वृत्तांतावरून असे दिसून येते की, कुठल्याही गोष्टीत निश्चय, एकनिष्ठा, त्याग या गोष्टी असल्या तर नक्कीच आपले इप्सित आपल्याला मिळते.पार्वतीला तिच्या या व्रतामुळे जसे इच्छित फळ प्राप्त झाले तसे आपल्याला मिळावे व तिची स्मृति रहावी यासाठी या व्रताचे पुढे रूढीत रूपांतर झाले.

या व्रताचा पूजाविधी असा आहे की, सखीसह पार्वतीच्या दोन मूर्ती व एक शिवलिंग यांची ब्राह्मणाकडून प्राणप्रतिष्ठा करून त्या चौरंगावर
ठेवाव्यात. केळीचे खांब लावून ते स्थान शोभिवंत करावे. शोडशोपचारे त्याची पूजा करावी. सुवासिक फुले, दुर्वा, बेल, तुळस वाहावी. बांगड्या,
गळेसर ही सौभाग्य चिन्हे वाहावीत. सुवासिनींच्या ओटया भराव्यात. आरती करावी, ध्यानस्थ बसून गौरीमहेश्वराचे ध्यान करावे. पूर्वीच्या काळी या दिवशी चुलीला लावलेले काही खात नसत. त्यातला हेतू फळफळावळ खाऊन दूध पिऊन नैसर्गिक जीवन जगावे. अशाने तिखटमीठ आपोआपच वर्ज्य  होते. मुख्य म्हणजे तिचे गुण आपल्यात आणण्याचा प्रयत्न करावा. रात्री जागरण करावे. नाना तऱ्हेचे  खेळ खेळावे. गाणी म्हणावी. अशा तऱ्हेने एक दिवस तरी एकत्र येवून सर्वांनी जीवनाचा आनंद लुटावा व आरती करून व्रताची सांगता करावी. आपल्या सर्व शक्तीमान अशा महादेवाची प्राप्ती व्हावी म्हणून पार्वतीने जे व्रत केले त्या व्रताला 'हरतालिका' असे म्हणतात.

पूर्वीच्या काळी या प्रसंगी सुपनृत्य, फेराची गाणी , फुगडी यांसारखे खेळ चालत, त्यामुळे घरातल्या गृहिणींना थोडा विरंगुळा मिळे. आता हे फक्त चित्रपटातच पहायला मिळते.
नमुन्यादाखल यातले काही गीतं खाली देतो आहे

फेराची गाणी
१.
देवाचा तो देव शंकर
भिल्लिणीला ग भुलला
ऐशी धुरंधर माया
तिनं ठकवीलं देवाला
देव पार्वतीव रुसला
निघून आरण्याशी गेला
हिमाचल पर्वतावरी
जाऊन तपाशी बैसला
इकडं पार्वती विचार करी
विचार आपल्या मनाला
आता समजावूनी येते
शिवशंकराला आणीते
अशा रूपानी जाऊ मी कशी
शाप देईल देव मला
मोरपंकीचा ग घागरा
नेसली टिकली कपाळाला
चोळी लावीली अंगाला
उपराटा बुचडा बांधीला
नाकी मोरणी घालुनी
शिणगार बहुत केला
भिल्लीणी गेली वनाला
पुसत बसली ज्येला त्येला
लोकं सांगती ग तिला
न्हाई सदाशीव दिष्टी पडला
देवाचा देव तो शंकर
भिल्लीणीशी वो भुलला
शंकराचं राज दीन तुला
शंकर बोलला पार्वतीला
माळ घाल गे मजला
राज दीन माजं तुला
पैलीचा लावावा शेवट
मग दुसरीची करा वाट
तुझी बायकू देवा नावानं
मोडीत असंल बोटं
पायी पैंजण वाजू लागलं
नाद लागला घुमाया
देवानं उघडिले डोळे
पाहिले असे चहुकडे
भिल्लीणीच्या रूपानं ग
देव मोहितच झाला
म्हणे कोण कुणाची तूं
नार सांगशी मजला
आसन सोडुनी उठला
देव भिल्लीणीजवळ आला
तिनं शंभूला झिडकारीलं
नको झोंबुसा बोलली
ऐशी धुरंधर माया
तिनं ठकविलं देवाला


शंकरपाळी टीकेट काढी
बीसकीट कोणी खाल्ली
हां हां बीसकीट कोणी खाल्ली
सुजाता सारखा नवरा मिळाला
फोंड्याच्या देशाशी आली
फोंड्याचे वाले बेलबोटम वाले
हवे गे आई मला
हां हां हवे गे आई मला

 सुपनृत्य
नाच ग घुमा
कशी मी नाचू ?
नाचून नाचून दमली ग बाई
दुधानं घागर भरली ग न्हाई
कशी मी नाचू ?
नाच ग घुमा
कशी मी नाचू ?
नाचत नाचत मी गेली हुती
कुणाच्या आळी?
सोनार आळी
सोनार आळीनं जेवाय काय केलं ?
अधाच पोळी
गोदीचं लिंबू
भैनीनं वाढलं
कोयनानं काढलं
कशी मी नाचू ?

हे गीत प्रश्नोत्तरांनी असेच रंगत जाते. यावेळी दोघी जणी सूप घेऊन नाचतात. बाकीच्या दहापंधराजणी त्यांच्या भोवती गोल करून टाळ्या वाजवीत नाचतात व प्रश्न विचारतात. याच रीतीने हे गीत मग निरनिराळ्या पदार्थांची आणि वेगवेगळ्या मुलींची नावे गुंफत असेच लांबते. सरतेशेवटी नाचाचा वेग वाढत पिंगा घुमतो आणि हा नाच संपतो.

वाङ्मयकथाउखाणेप्रकटनमाहितीसंदर्भ

प्रतिक्रिया

चौथा कोनाडा's picture

21 Aug 2020 - 12:09 pm | चौथा कोनाडा

छान, मस्त !
हरतालिका संस्कृतीचा सुंदर फेरफटका !

वामन देशमुख's picture

21 Aug 2020 - 6:25 pm | वामन देशमुख

हरतालिका व्रत कथा आणि आख्यान आवडले.
लेख लिहील्याबद्धल धन्यवाद.

प्रचेतस's picture

21 Aug 2020 - 6:58 pm | प्रचेतस

पार्वतीने पंचाग्नीसाधन तप केले ह्याचे उत्कृष्ट शिल्प वेरूळच्या रामेश्वर लेणीत आहे.

महासंग्राम's picture

22 Aug 2020 - 12:22 pm | महासंग्राम

गुर्जी तुमच्या सोबत एकदा वेरूळ चा फेरफटका मारला पाहिजे

श्वेता२४'s picture

22 Aug 2020 - 12:26 am | श्वेता२४

पारंपारिक गोष्टी कळल्या. लेख आवडला

गणेशा's picture

22 Aug 2020 - 10:11 am | गणेशा

लेख आवडला