श्रीगणेश लेखमाला २०२० - Maroon Color

गणेशा's picture
गणेशा in लेखमाला
31 Aug 2020 - 8:50 am

1

तू हसलीस की, फुले उमलू लागतात,
आणि त्याचे रंग तुझ्या ओठांवर दिसू लागतात.
तू अशीच हसत रहा, सर्वांचे मन मोहत रहा
माझी नसताना पुन्हा, माझीच होत रहा..

मेघा, तुझ्या डायरीतील ह्या ओळी माझ्या अजूनही लक्षात आहेत. हातात घेतलेल्या फूलपाखराचे रंग जसे उडून जातात, तशा आठवणी थोड्याच त्या रंगांसारख्या असतात? काही आठवणी असतात त्या फूलपाखरासारख्या, नाजूक.. सुंदर.. नितळ..
ह्या ओळी मनावर कोरल्या गेल्या त्या कायमच्या. त्या काळी मी लिहीत नव्हतो, तरीही मीही एक डायरी घेतली होती तेव्हा. त्याच्या शेवटच्या पानावर तू लिहिलेले 'आते जाते, हसते गाते, सोचा था मैने मनमे कई बार' हे गाणे अजूनही तसेच आहे, तुझ्या नावासहित. आणि मग डायरीच्या शेवटच्या पानावर तू लिहिलेल्या गाण्याच्या मागे मी लिहिले...

* * *

तर, हा काळ आहे २०००-०२चा. तेव्हा आजकालच्यासारखे मोबाइल, व्हॉट्स अ‍ॅप स्टेटस, फेसबुक असले social life नव्हते. तुमच्या भावना ह्याच उत्कट होत्या. तेव्हा वाटणार्‍या गोष्टींमध्ये एक अनामिक हुरहुर दाटलेली असायाची.. एक ओढ असायची.. वाट पाहणे असायचे. बरेच काही..

मेघा खूप शालीन मुलगी, रेखीव. तिच्या दोन्ही गालांवर खळ्या पडायच्या. मला आवडायच्या त्या. तेव्हा कविता लिहीत नव्हतो मी. लिहीत असतो, तर त्या चंद्रखळ्यांवर असंख्य कविता लिहिल्या गेल्या असत्या, इतक्या त्या आवडायच्या मला. मेघा शांत, सुशील, कमी मित्र असलेली मुलगी. मी त्याउलट, खूप बोलका, टुकार, कँटीनला पडीक असलेला, मुक्त.. स्वैर.. स्वच्छंद.

मेघाला मात्र फक्त दोन मित्र - एक मी आणि दुसरी मनाली. मनाली ही अतिशय सालस मुलगी. मेघामुळे माझी तिच्याशीही खूप छान मैत्री झाली होती. नंतर आमच्या तिघांचा असा ग्रूप तयार झाला होता. मला मात्र खुप जास्त मित्र-मैत्रिणी होत्या. आपला स्वभाव बोलका. त्यामुळे माझे ग्रूपही जास्त. मी तेव्हा खूप भांडायचो खरे. आता हसू येते, पण तेव्हा मी नक्कीच वेगळा होतो. पटकन रिअ‍ॅक्शन, पटकन प्रेम, पटकन भांडण..

मेघाची आणि माझी मैत्री झालीच कशी? असा प्रश्न मला पडायचा कधी कधी. ती इतकी नाजूक, सुंदर, गोरीपान, शालीन.. मी इतका बेडर, सावळा, उंच, धिप्पाड, भीडभाड न बाळगता कसेही बोलणारा, माहीत नाही. पण मी तेव्हा ही खूप respect करायचो तिचा. तेव्हा त्या सर्व गोष्टींना respect म्हणतात हे माहीत नव्हते, इतकेच.

खरे तर ती होतीच तशी, जीव लावावी अशी. प्रेमात अखंड बुडून राहावे अशी. तिने maroon colorचा, बुट्ट्या असलेला ड्रेस घातल्यावर तर ती खूप सुंदर दिसायची. मला खरे तर मुली आवडायच्या त्या ब्लॅक ड्रेसमध्ये, पण ह्या maroon colorच्या ड्रेसमुळे मात्र मला ह्या याही कलरचे खूप आकर्षण झाले होते.
मेघाचा बॉब कट असायचा. कधीकधी तिचे सिल्की केस डोळ्यांपुढे यायचे. मला तिच्या केसाला हात लावून ते मागे सारण्याचा मोह व्हायचा. कधीकधी तिने डोळे वटारले तरी तो मोह मी पूर्ण करायचो.

त्या काळी आपल्याला आवडणार्‍या माणसाबद्दलच्या भावना अशाच असायच्या मर्यादेत. मेघा मर्यादेचा अतीव पुतळा होती. ती खडूसही होती. सुरुवातीला तिला माझ्या भावनांचे जास्त काही पडले आहे की नाही, असे मला नेहमी वाटायचे.
मी पहिल्यांदा तिला माझ्या प्रेमाबद्दल सांगितल्यावर तर ती किती भडकली होती. टुकार हा तिने तेव्हा मला म्हटलेला शब्द अजून आठवतो. नंतर काही काळ असाच गेला. नेमके शनिवारीच हे सगळे घडायला हवे होते का? सोमवारपर्यंत वाट पाहणे म्हणजे काय, हे आता त्या खडूस मुलीला कोणी सांगावे असेच वाटत होते मला.
सोमवार आला, गुपचूप पुन्हा आम्ही प्रॅक्टिकलला बसलो, न बोलता. प्रॅक्टिकललाही आमचा एकच कॉम्प्युटर होता, कोपर्‍यातला. दोघे एकत्रच तासन तास c and data structuresचे प्रोग्रॅम करत बसायचो. इतके की मी त्या विषयात पहिला आलो. नंतर कंपनीतही त्याचा जास्तच उपयोग झाला :-))
तर गुपचुप बसणे हे आपल्या स्वभावात नव्हते. पुन्हा बोलणे, पुन्हा आर्जवे.. "फक्त मैत्रीण म्हणून आपल्याला जमणार नाही तुझ्याकडे बघायला" असली असंख्य वाक्ये माझ्याकडे होती. मी माझे नेहमीच खरे करत आलो आहे. तेव्हाही मी आतासारखाच होतो या बाबतीत.

***

मेघा माझ्याबरोबर कँटीनला येत नव्हती जास्त. खूप कमी वेळा आम्ही कँटीनला गेलो असू. एकदा ती माझ्याबरोबर भटाच्या कँटीनला आली होती. तुषारच्या कँटीनपलीकडे गुलाबाचे झाड होते, त्याचा गुलाब तोडून मी तिच्यासाठी आणला होता. हाय, तो गुलाब चक्क पांढरट पिवळट होता. लाल नव्हता. ती हसत होती. मी देताना म्हणालो, "देणार्‍याच्या भावना महत्त्वाच्या, कलरचे काय एवढे.."

मी खूप वाया गेलेलो आहे असे कोणाचेही म्हणणे असेल, पण तरीही मी पहिला आलो सेकंड इअरला. आपले असेच असते. जे करायचे ते मनापासून, मग तो अभ्यास असो वा प्रेम वा मैत्री. गणित आणि c and data structuresमध्ये संपूर्ण पुणे युनिव्हर्सिटीमध्ये मी पहिल्या काही जणांत होतो, असे सरांनी सांगितले मला.
मी हुशार होतो. पण टिपिकल वरणभात, सोज्ज्वळ हुशारपण आपल्यात नव्हते. आपल्याला जे यायचे ते असेच यायचे नॅचरली.

मग आम्ही एकत्र अभ्यास करू लागलो. एकत्र अभ्यास हा कॉलेज सोडून भेटण्याचाही एक मार्ग होता आमचा. मला आवडायचे शिकवायला. किती किती अभ्यास करायचा म्हटले, तरी एक एक टॉपिक मी चुटक्लीसरशी संपवून टाकायचो. मग उगाच असंख्य गप्पांत आमचे तासन तास जायचे.
ते तास, त्या गप्पा पुन्हा मिळतील का मला पुन्हा? असा प्रश्न माझे मन कायम मला विचारत राहते. तेव्हा आमचे एक सूत्ही होते - 'more study - more confusion - less marks, less study - less confusion - more marks."

तिला तिच्या डायरीतल्या कविता, लेख वाचायला आवडायचे.
'बस होती चिंचवडची' ही कविता तर मी तिला कितीदा म्हणायला लावायचो. ती कविता ती खूप छान म्हणायची. तेव्हा मी स्वत: कधी आयुष्यात कविता लिहीन असे वाटले नव्हते. कदाचित मी कविता लिहिण्याला हे सारे प्रसंगच कारणीभुत आहेत. असो.

***

मेघा माझ्यापेक्षा मोठी होती. वागण्यानेसुद्धा. मेघाचे डोळे खूप काळेभोर, मस्त होते. मी नंतर तिला बर्‍याचदा चश्मा काढायला लावायचो. बर्‍याचदा तिच्या डोळ्यात बघायचा हट्ट करायचो मी.. मी ऐकत नव्हतोच :-))

मी खूप हळवा होतो तेव्हा. मेघा हसायची माझ्या हळवेपणावर कायम. मेघा होतीच तशी, ती कुठल्याही गोष्टीवर मनमुराद हसू शकत असे. एखादी गोष्ट मिळाली नाही, तरी त्या गोष्टीकडेही ती हसत पाहू शकत असे. मला असले वागणे कधी जमत नसे.
'धडकन' रिलीज होण्याआधीच माझे 'तुम दिल की धडकन मे.. रहते हो,. तुम रहते हो' हे गाणे पाठ होते. माझा आवाज चांगला नव्हता. पण सर्व वर्गात मी हे गाणे तिच्यासाठी गायले होते, तेही पूर्ण. ते गाणे तेंव्हा मला इतके यायचे की त्याचे म्यूझिकसुद्धा मी तसेच गायचो. हे गाणे मी मेघाला dedicate केले होते. नंतर तो पिक्चर रिलिज झाला आणि त्या देवसारखाच मी आहे असे तिचे म्हणणे होते :-)) आणि असे म्हणून ती हसत असे.

पुढे नंतर तिने वर्गात 'आते जाते, हसते गाते | सोचा था मैंने मन में कई बार | वो पहली नज़र, हलका सा असर |करता है क्यों दिल को बेक़रार' हे गाणे गायले होते.
मला खूप आवडले हे. तिला लता मंगेशकरने गायलेले 'होठों की कली कुछ और खिली' ह्या ओळीपासून हे गाणे जास्त आवडायचे. मला एस.पी, बालासुब्रह्मण्यमचे कडवे आवडायचे.
एस.पी. माझा आवडता गायक. अजूनही मी त्याची कित्येक गाणी ऐकतो. विशेष म्हणजे आराध्यालाही नेमके 'आते जाते, हसते गाते' हेच गाणे आवडते. आराध्या आणि मी गाडीवर जाताना नेहमी 'मेरे रंग मे' हे गाणे म्हणतो, पण तिला 'आते जाते' हे गाणे आपोआप कसे आवडायला लागले, माहीत नाही. कधीकधी तर ती चक्क "पप्पा, आते जाते लावा ना" असे म्हणते. आराध्याचा जन्मही जानेवारीमधलाच.

आम्ही रूमवर आते जाते गाणे म्हणायचो. मी एस.पी.चे कडवे म्हटल्यावर ती लताचे कडवे म्हणत असे. ती जेव्हा तिच्या गावी जाणार असे, तेव्हा मला उगाच 'आँख हे भरी भरी, और तुम मुस्कुराने की बात करते हो' हे गाणे म्हणून चिडवायची.. मी चिडलो की मात्र ती पुन्हा एस.पी.चे आणि लताचे गाणे म्हणायची - 'तुमसे जुदा होकर मुझे दूर जाना है , पलभर की जुदाई फिर लोट आना है?'

तेव्हा मला ऐश्वर्या राय आवडायची खूप. मेघालासुद्धा ऐश्वर्या रायच आवडायची. माझ्या एका वहीवर ऐश्वर्याचे चित्र होते. ती वही मला खूप प्रिय होती. मेघा मात्र प्रीती झिंटासारखी दिसायची. अगदी तसीच अवखळ वाटायची कधीकधी. मेघाला टीव्ही सिरिअल्स आवडायच्या बहुतेक. मला तसल्यात काही रस नव्हता. तिला 'कसोटी जिंदगी की' आवडायची, मी त्याचा एकही भाग बघू शकत नव्हतो.

***

साडी डेला मेघा खूप सुंदर दिसत होती.. मला हिरवी साडी आवडते, हे मी नव्हते सांगितले तिला कधी. तिने Maroon redच साडी घातलेली. तिला मी पाहतच बसलो होतो. मेघा जवळ आल्यावर "मेघा, तू आता मोठी झालीस" असे तन्वीर म्हणाला होता. तो फोटो तिने तिच्या वडलांना दाखवला होता, तेव्हा तेसुद्धा तिला "मेघा, आता तू मोठी झाली" असे म्हणाले होते. हिने आम्हाला मारलेलाच डायलॉग तेथे मारला - "मी आहेच मोठी." तिने काढलेला तो फोटो मी माझ्याकडे ठेवून घेतला नंतर, तिच्या आठवणीसाठी.
आम्ही कॉलेजनंतर पुन्हा भेटणार नाहीच असे तिला कदाचित म्हणायचे होते. मी माझ्या स्वप्नातही असे विचार करू शकलो नव्हतो. पण मी कितीही बेधडक असलो, तरी मात्र मी कधी माझ्या मर्यादा तोडून तिला त्रास होइल असे वागलो नाही. ते चूक की बरोबर हे तीच सांगू शकेल, मी नाही. तिच्या त्या फोटोचे मी खूप छान स्केच बनवले होते. आहे अजून माझ्याकडे ते.

आम्ही कॉलेज संपल्यावर काय काय करायचे, कुठे कुठे अ‍ॅडमिशन घ्यायची, कसे पुढे जायचे असे बोलत असू. मी आयुष्यात तुझ्यासोबत असेन असे मी नेहमी म्हणत असे. मी MCS करणार होतो. मेघाला वाटायचे MCA करावे, ते जास्त चांगले. मेघा पुढे बहुतेक शिकणार नव्हती आणि मी तिला पुण्याला अ‍ॅडमिशन घे म्हणायचो. मी कितीही माझ्या म्हणण्यासारखे झाले पाहिजे म्हणालो, तरी ती तिच्याच म्हणण्याने वागायची. आम्ही खरेच वेगळे होतो.. खुप वेगळे.. तरी एकत्र.

मी नंतर, तिचे तेव्हा म्हणणे होते ते म्हणुन MCAला अ‍ॅडमिशन घेतली. मात्र मी कॉलेजला कधी नीट गेलोच नाही. मी दुसर्‍या वर्षाला असतानाच मॉड्युलर या कंपनीत सिलेक्ट झालो आणि कॉलेजने मला दुसर्‍या वर्षापासून तिकडे काम करण्याची परमिशन दिली (मोड्युलरचे चार भाग मी आधी लिहिले आहेतच).
मास्टर डिग्रीला कॉलेजला मी कधीच रमलो नाही. कारण तिथे तू नव्हतीस मेघा. मी अभ्यासही केला नाही. मला मास्टर डिग्रीला अमोल सोडला तर कोणी मित्रही नव्हते. नशीब, तेथेही मी असाच अभ्यास न करताही पेपरच्या आदल्या दिवशी काही वाचून फर्स्ट क्लास मिळवला.

***

आमच्या लास्ट इअरच्या परीक्षा झाल्या, तरी ३-४ दिवस मी माझ्या घरी निघून आलो नाही. तेथेच रूमवर राहिलो. रोज उद्या जातो म्हणायचो आणि सकाळी लँडलाइनवर फोन करून मेघाला बोलावून घ्यायचो. शेवटी तो दिवस आला तो कसा विसरेन मी.. आणि मी घरी जाण्याचा निर्णय घेतला. मनालीसुद्धा रूमवर आली होती काही वेळाने, मेघापाठोपाठ. मेघानेच बोलावले होते तिला, असे मला वाटते. नंतर त्या दोघींना सोडायला मी हडको कॉलनीतून सैनिक कॉलनीत जाईपर्यंत बरोबर गेलो. मेघाचा त्या दिवसी Maroon कलरचाच ड्रेस होता. माझ्या आवडीच्या कलरचा. तिला तेव्हा मी सोडायला जाताना मनात किती स्वप्ने घेऊन चाललो होतो.. तिला शेवटचे पाहताना हेच शेवटचे असे वाटले नव्हते.

निरोपाची वेळ आल्यावर नेमके मला खूप खूप बोलावेसे वाटत होते. कॉलेजच्या सर्व आठवणींना ओंजळीत पुन्हा घ्यावे वाटत होते. पण ती रस्त्याच्या त्या कडेला जाईपर्यंत माझे शब्द ओठांआडच अडकले. नेहमी रस्त्याने चालताना मी रस्त्याच्या बाजूला चालायचो आणि ती आतल्या बाजूला, आता आराध्याला घेऊन चालतो तसे. आता मात्र आमचे रस्तेच वेगळे होणार होते. हलकेच तिने मागे वळून पाहिले, माझे संयमाचे बांध हळूच सुटले आणि रिकामे हात हलत राहिले...

***

नंतर अनेक दिवस गेले. लँडलाइनवर कधीतरी बोलणे व्हायचे. मेघाने पुढे कॉलेजला अ‍ॅडमिशन घेतली नाही. तिच्या लग्नाचे काही चालले आहे, कधी ती बोलली नाही. एका १० जूनला तिचा फोन आला नाही, म्हणून मी १२ जूनला रागावून फोन केला होता - २१०६६. तेव्हा असलेच नंबर असायचे. आतासारखे मोठे नंबर तेव्हा कधी नव्हते.
तेव्हा तिने मला सांगितले की तिचे लग्न झाले आणि मी ख्कूपच हळवा आहे म्हणून मला तिने मुद्दाम बोलावले नाही. मी म्हणालो तिला, "आलो असतो मेघा मी तुझ्या लग्नाला, बोलवायचे तरी." ती तेव्हा खूप खूश वाटत होती.. मी अभिनंदन केले का.. मला आठवत नाही. तिने मला त्यांचे गाव आणि नाव सांगितले. भेटू म्हणाली बहुतेक तिकडे.
ती हसत बोलत होती. मीसुद्धा खोटे हसू आणले होते ओठांवर. नंतर मी 'आते जाते हसते गाते', 'तुम दिल की धडकन मे', 'तुमसे जुदा होकर' ही सगळी गाणी माझ्या mp3 playerला ऐकली.. काही वर्षांनी मी माझ्या भावना शब्दातून लिहिण्याचा प्रयत्न केला आणि मला नवी दुनिया सापडली - कवितेची. मी इतका भारी लिहीत नव्हतो तेव्हा, पण माझी पहिली कविता क्खूप हिट झाली. तिचे नाव होते - 'माझी तू.. त्याची होताना..' या कवितेची असंख्य विडंबने झाली. स्टेजवर असंख्य once more या कवितेला मिळाले आणि 'शब्दमेघ' हा माझाच मी नवीन पुन्हा जन्मला आलो.

नंतर १४ वर्षे मी तिचे नाव कधीच कोठे सर्च केले नाही. तिला कसलाच भेटण्याचा प्रयत्न माझ्या मनात आला नाही. मी कोणालाच तिच्याबद्दल कधी विचारले नाही. शब्दमेघ होऊन मी असाच फिरत राहिलो.. मुक्त.. स्वैर..स्वछंद.. एक शापित मेघ जणू. कवितेतुन गझलकडे येण्याचा असफल प्रयत्न केला, तेव्हा 'सार्‍या उदास वाटा कापित चाललो मी, होउन मेघ काळा शपित चाललो मी' हा पहिल्या गझलेचा पहिला मतला मी लिहिला.
नंतर मला चुकून काही संगीतकारांबरोबर काम करण्याचा योग आला, मी एका अल्बमला प्रेमिकेने सजणाला बोलवायचे गाणे लिहिले, ते खरे तर माझे मन होते का? माहीत नाही.

एकदा मात्र मी आपल्या कॉलेजला गेस्ट लेक्चर द्यायला गेलो होतो, नेमके मेघा आपण ज्या वर्गात बसायचो तोच वर्ग होता. नंतर सगळे विद्यार्थी गेल्यावर मी तू बसायची, त्या तिसर्‍या नंबरच्या बाकावर शेजारी जाऊन बसलो होतो.

***

दिवस असेच बदलत गेले... माणसाचे आयुष्य पुढे पुढे जात राहते.
त्या क्षणांच्या असंख्य रांगोळ्या मनात मात्र उमटत राहिल्या. तुळशीहूनही पवित्र असणारे आपले नाते माझ्या मनात मी आठवत असे. मग माझे मलाच वाटे - आपण पुन्हा भेटू का कधी? भेटलोच तर काय बोलू?

आणि मग डायरीच्या शेवटच्या पानावर तू लिहिलेल्या गाण्याच्या मागे मी लिहिले - 'दिवस सरत जातात, तशी आपल्या आठवणींची फुलं बनत जातात.'

***

आता अलीकडे इतक्या वर्षांनी मात्र मला पुन्हा वाटत होते, आपण पुन्हा भेटावे, तेव्हाचे सगळे सोडून द्यावे आणि मैत्रीच्या निखळ नात्याला पुन्हा अनुभवावे. जे तेव्हा फक्त मैत्रीचे निखळ नाते निभवायचे राहून गेले, ते पुन्हा निभवावे.. काय हरकत आहे? थोडा वेळ काढायला हरकत नक्कीच नाही. एवढा विश्वास आपल्यात नक्कीच आहे.
आता तर हसू येईल, पण मला वाटते पार तुझे पांढरे केस झाल्यावर आणि माझ्या डोक्यावरचे केसच निघून गेल्यावरही भेटत राहावे.. भांडत राहावे.. बोलत राहावे. ..
गोड-कडू आठवणींचे विणून अस्तर, पुन्हा त्या ढगांच्या पलीकडच्या निळ्या आकाशाकडे पाहत बसावे. काय हरकत आहे?
वेळेची गणिते जमणार नाहीत, पण वयाला या वळणावर आणणार्‍या रस्त्यावर पुन्हा भेटुन, मावळतीच्या त्या Maroon red कलरने पुन्हा मैत्रीचे नाव हातावर गोंदवून घ्यायला काय हरकत आहे? अनेक संध्याकाळी विरघळून गेल्यात त्या नदीच्या प्रवाहात, एखाद्या संध्याकाळचे मैत्रीचे रंग पुन्हा झेलावेत आपण आपल्या तळहातावर, काय हरकत आहे?

उद्या मी असेन-नसेन, तेंव्हा माझ्या नावाने मैत्रीचे तोरण तू बांधण्यापेक्षा, मैत्रीचा हात हातात घेऊन पुन्हा जगावे.. आपल्यासाठी.
मी असाच आहे, वेगळा. माझा आवाज, त्याचा टोनही असाच वेगळा. पण त्यात आपुलकी आहे, विश्वास आहे, नितळ भावनेचा एक ओलावा आहे त्यात. म्हणुन म्हणतो, काय हरकत आहे?

आणि मेघा, मला आनंद वाटला आपण पुन्हा भेटलो १८ वर्षांनी.. निखळ ..नितळ.. तू अजूनही तितकीच शालीन. मला खूप अभिमान वाटला आपला, आपल्या विश्वासाचा.
2

श्रीगणेश लेखमाला २०२०

प्रतिक्रिया

रातराणी's picture

31 Aug 2020 - 10:53 am | रातराणी

फार मनापासून लिहिलंय! असं नितळ, उत्कट जगणारे आणि व्यक्त होणारे विरळाच! _/\_

टर्मीनेटर's picture

31 Aug 2020 - 11:46 am | टर्मीनेटर

दास्तान-ए-गणेशा आवडली.
होता है... चलतां है...दुनीया है!
विशेष म्हणजे ह्या लेखात तुम्ही जास्तीत जास्त वेळा स्वत:ला मी, मला, माझा असे संबोधित केल्याचे बघुन/वाचून बरे वाटले :)
लेखनात आपण, आपला, आपल्याला असा स्वत:चा उल्लेख करण्याची तुमची शैली असली तरी मनापासून सांगतो तसे लेखन वाचताना थोडा रसभंग होतो...अर्थात हे माझे व्यक्तीगत मत आहे.

धन्यवाद आणि पुढील लेखनास शुभेच्छा!

गणेशा's picture

31 Aug 2020 - 5:11 pm | गणेशा

दास्तान-ए-गणेशा :-)
--
टर्मीनेटर जी, खरा प्रतिसाद हाच लिहिणाऱ्याचा प्राण आहे..
धन्यवाद त्याबद्दल.. मी, माझे, मला हे वापरण्याचाच प्रयत्न करेल पुढे.
--

आपण, आपल्याला, आपला अश्या आधीच्या लिखाणातील उल्लेखाबद्दल एक सांगण्याचा प्रयत्न करतो

खरे तर आपण, आपल्याला हे कोणी तरी मोठे बोलत असेल असे वाटत असेल पण तसे नाहीये.
म्हणजे 'आपल्याला पावसात, रानावनात फिरायला आवडते '
या वाक्यात 'मला पावसात.. ' हे लिहिले कि ते माझ्यापुरते मर्यादित होते, पण 'आपल्याला' असे लिहिले कि तुमच्या माझ्या सारख्या लोकांना ते जर आवडत असेल तर आपल्याला ला पण असेच आवडते, यात ज्यांना ज्यांना ते आवडते त्यांना सामावून घेतल्या सारखे मला वाटायचे. कदाचीत बोलीभाषे चा प्रभाव असेल माझ्यावर.

म्हणजे मला पावसात भिजायला आवडते म्हणल्यावर, वाचणाऱ्या ला वाटेल त्यात काय मला पण आवडते. म्हणुन , 'आपल्याला पावसात भिजायला आवडते' यात, ज्यांना ज्यांना आवडते त्यातील मी एक असा अर्थ मला अभिप्रेत होता..

असो योग्य त्या वेळी बदल करेन आता लिखाणात.

येथे आपल्याला असे लिहिता आलेच नसते, येथे इतरांना सामावून घेता आलेच नसते :-)

धन्यवाद.

कुमार१'s picture

31 Aug 2020 - 12:11 pm | कुमार१

छान आहे ..

एकदम गोडाच्या शिऱ्यानंतर ही गोष्ट! जबरी लेखक आणि व्यक्तिमत्त्व!

रातराणी, टर्मीनेटर, कुमार सर आणि कंजूस काका मनापासुन धन्यवाद.

नूतन's picture

31 Aug 2020 - 5:00 pm | नूतन

निखळ मैत्रीची छान कहाणी

शा वि कु's picture

31 Aug 2020 - 6:59 pm | शा वि कु

फार सुंदर लिहिलंय.
!

दुर्गविहारी's picture

31 Aug 2020 - 8:09 pm | दुर्गविहारी

फारच सुंदर आणि नितळ लिखाण ! एकच शंक,, हे लिखाण मेघाताईनी वाचले क??

गणेशा's picture

31 Aug 2020 - 9:46 pm | गणेशा

धन्यवाद,

नाव येथे पुन्हा बदलले आहे, मेघा हे खरे नाव नाही.
येथे प्रकाशित करताना संपादक मंडळाने ती ओळ चुकून हटवली आहे.

Yes, तिनेच पहिले वाचले आहे.

स्मिताके's picture

31 Aug 2020 - 8:55 pm | स्मिताके

सुरेख, प्रांजळ लेख.

खूपच सुंदर प्रांजळ, नितळ लेखन. अतिशय आवडले.
वाचून सुमारे ४५-५० वर्षांपूर्वीच्या " उघड्या पुन्हा जहाल्या, जखमा उरातल्या..."
... असे होऊन आता पुढे लिहवले जात नाहिये राव.

सुमो's picture

1 Sep 2020 - 4:50 am | सुमो

लिहिलंय.

खूप आवडलं.

कोणीतरी उघड्या पुन्हा जहाल्या, जखमा उरातल्या..." गाणं डकवा इकडे
लैच भारी लेख ऑलराउंडर मास्तर

सुमो's picture

2 Sep 2020 - 6:00 am | सुमो

Shobha

तुषार काळभोर's picture

1 Sep 2020 - 3:07 pm | तुषार काळभोर

प्रत्येकाच्या मनात अशा व्यक्त - अव्यक्त आठवणी असतात.

किसन शिंदे's picture

1 Sep 2020 - 8:45 pm | किसन शिंदे

जबऱ्या रे गणा. हे इतकं उत्कट आणि तरल लिखाण तुच करू शकतोस. हॅट्स आॅफ!!

श्वेता२४'s picture

2 Sep 2020 - 12:01 pm | श्वेता२४

तुमचं लिखाण अतीशय तरल आहे. वाचायला सुरुवात केली आणि कधी शेवटी पोचले कळलंच नाही. अप्रतिम.

MipaPremiYogesh's picture

2 Sep 2020 - 3:38 pm | MipaPremiYogesh

हा हा.. गणेशा काय लिहिले आहे एकदम मनातून. खूपच सुंदर आठवणी. चित्र डोळ्यासमोर उभे राहिले तुम्हा दोघांचे. प्रत्येकाच्या मनात अशी जखम असते जी कविता/गजल मधून बाहेर पडते. तुमच्या मॉड्युलर मधल्या लेखाची लिंक असल्यास पाठवा.

गणेशा's picture

2 Sep 2020 - 8:57 pm | गणेशा

धन्यवाद योगेश जी,

कंपनी आणि मित्र -1, 2, 3, 4
( 4 नंबर सर्वात आवडता भाग आहे माझा या धाग्यातील )

https://misalpav.com/comment/1068603#comment-1068603

प्रचेतस's picture

2 Sep 2020 - 4:01 pm | प्रचेतस

क्या बात है गणेशा...!
खूपच सुरेख लिहिले आहेस.

एसपी माझाही आवडता गायक.

आजा मेरी जान मधलं हे गाण तर भयंकर आवडतं, अफाट म्हटलंय

गणेशा's picture

2 Sep 2020 - 9:21 pm | गणेशा

मित्रा धन्यवाद..

एस पी चा आवाज मनाचा वेध घेतात एकदम, तो गातो तेंव्हा तो सुरांचा राजा असतो.. त्याच्या आवाजातील चढउतार हृदयात तरंग उठवून जातात..

एस. पी. आणि कविता कृष्णमूर्ती वा काय मज्जा गाणी ऐकण्याची..
मी तर एस. पी ची तमिळ कळत नसलेली गाणी पण ऐकलेली आहेत..

रोजा आला आणि एस.पी, चित्रा आणि A.R.
काय गाणे होते.. लाजवाब.
एक दुजे के लिये ने, हम आपके है कोण ने तर पुन्हा चार चांद लावले एस.पी च्या तुऱ्यात.

तू दिलेले गाणे तर भारीच... किती वर्षांनी ऐकतोय मी हे गाणे..

नूतन, शाविकु, दुर्गविहारी
स्मिता, चित्रगुप्त, सुमो, महासंग्राम,
पैलवान, किसना, श्वेता ताई, योगेश
आणि वल्ली मनापासुन धन्यवाद..

तुमचे प्रोत्साहन असेच राहूद्या..

गोड-कडू आठवणींचे विणून अस्तर, पुन्हा त्या ढगांच्या पलीकडच्या निळ्या आकाशाकडे पाहत बसावे. काय हरकत आहे?
वेळेची गणिते जमणार नाहीत, पण वयाला या वळणावर आणणार्‍या रस्त्यावर पुन्हा भेटुन, मावळतीच्या त्या Maroon red कलरने पुन्हा मैत्रीचे नाव हातावर गोंदवून घ्यायला काय हरकत आहे? अनेक संध्याकाळी विरघळून गेल्यात त्या नदीच्या प्रवाहात, एखाद्या संध्याकाळचे मैत्रीचे रंग पुन्हा झेलावेत आपण आपल्या तळहातावर, काय हरकत आहे?

काय सुंदर.,

गणेशा, maroon color हे नाव खुप आवडले.

संगीतकाराबरोबर अल्बम ला कोणते गाणे दिले होते?
देता का येथे?

हो रे गणेशा,ते गाणं दे ना इथे..

गणेशा's picture

5 Sep 2020 - 1:16 pm | गणेशा

भक्ती आणी मोगरा,

गाणे येथे देण्यापेक्षा, स्वतंत्र धाग्यात दिले आहे. तेथे तुम्ही ऐकु शकता.

https://www.misalpav.com/node/47463

सुधीर कांदळकर's picture

8 Sep 2020 - 6:22 am | सुधीर कांदळकर

स्मरणचित्रातल्या पुसट होणार्‍या बाह्यरेषा आणि गडद होणारे भावरंग कवितेतून आणि लेखनातून छान टिपले आहेत.

सुधीर कांदळकर's picture

8 Sep 2020 - 6:22 am | सुधीर कांदळकर

धन्यवाद.

चौथा कोनाडा's picture

13 Sep 2020 - 5:58 pm | चौथा कोनाडा

वाह, गणेशा किती उत्कट लिहिलंस ... ह्रुदयाच्या अगदी तळातून आलेलं !
वाचता वाचता मी देखिल वहात आलो, माझ्या काही आठवणींसोबत !
+ १ _ खुप आवडलं !

दिवाळी अंक २०२० मध्ये ( 'प्रेम - शृंगार - रोमान्स विशेषांकामध्ये) कोणालाही न विचारता छापावं असा सुंदर अनुभव, पुन्हा पुन्हा वाचण्यासारखा !

मोगरा, भक्ती, सुधीर आणि चौथा कोनाडा अभिप्राया बद्दल मनपूर्वक आभार..

@ चौथा कोनाडा जी

हा धागा सर्वात जास्त वाचलेला एकच माणुस आहे, आणि तो मी :-))
दिवाळी अंकाबद्दल पूर्व प्रकाशित नको असे असेल.
आणि आता त्यात मी बहुतेक काही लेखन नाही देत आहे,
आणखिन या विषयावर काय लिहावे असे सुचणार नाहीच.

बळेच आपल्या आवडीवर प्रेम करतो असे धरून लिहिलेले मला नाही आवडणार..
आपोआप विषय सुचला तर ठीक.. नाही तर वाचक होणे या सारखा आनंद दूसरा नाही..

तुमच्या ऑडिओ कथा येऊद्या ना अजुन.. खुपच अप्रतिम आहे ते