रम्य ते बालपण !

मालविका's picture
मालविका in जनातलं, मनातलं
13 Jun 2020 - 6:07 pm

रम्य ते बालपण !

लॉकडाऊन शिथिल झाला नि माझा भाचा श्रीराम माझ्याकडे काही दिवसांसाठी राहायला आला. त्याला घेऊन मी नि माझा मुलगा ईशान आम्ही माझ्या आईकडे म्हणजे खेरशेत गावी २ दिवसांसाठी गेलो. तिकडे माझ्या भावाची २ मूल आहेत. त्यामुळे एकूण हि ४ जण दंगामस्ती करायला एकत्र आली. श्रीराम इयत्ता ८वी, जुई इयत्ता ६वी, ईशान इयत्ता ४थी नि निनाद मोठा शिशुगट अश्या वयाची हि मुले एकत्र आली कि एकतर मस्त रमून जाऊन खेळतात तरी नाही तर प्रचंड भांडतात तरी. पण तरीही एकेमेकांशिवाय करमत पण नाही. अगदी तुझे माझे जमेना नि तुझ्या वाचून करमेना अशी अवस्था.

एरवी इकडेतिकडे टाईमपास करणाऱ्या ह्या पोरांनी यावेळी झोपडी बांधायची ठरवली. समोरच अंगणात खड्डा खोदायला सुरवात झाली. माझे बाबा ओरडलेच. मग दादाने गिरणीच्या पाठच्या बाजूला एक जागा दाखवली. पोरांची उत्साहात सुरवात झाली. तासाभराने जाऊन बघितलं तर सामानाची जमवाजमव होऊन प्रत्यक्ष कामाला सुरवात झाली होती. जुने वापरात नसलेले बांबू इकडून तिकडून गोळा करून झाले. जुनी पोती पडलेली छप्पर म्हणून वापरायला जमा केली. मोठे दगड येऊन पडले. खुरपं घेऊन जरा वाढलेलं रान साफ करून जागा नीट करून घेतली आणि बांबू रोवण्यासाठी खड्डे खणायला सुरवात झाली होती. या चौघांच्यात ईशान जास्त माहितगार होता. कारण श्रीनिवास कितीतरी वेळा ईशानला हाताशी कामाला घेतो. त्यामुळे यावेळी ईशान लहान असूनही उरलेले दोघे त्याच ऐकत होते. जुईने कोयतीने माती उकरून खड्डा खणला. श्रीरामने माती बाहेर काढली. मग ईशानने श्रीरामला बांबू त्या खड्ड्यात धरून उभं राहायला सांगून स्वतः त्या खड्यात मध्यम आकाराचे दगड घालू लागला. मग वर काढलेली माती घालून पायाने सर्वत्र दाब देऊन परत त्या बांबूच्या कडेला २/३ मोठे दगड लावून बांबू उभा राहिला. असेच चार बांबू उभारून झाले. मग वरच्या बाजूने आडवे बांबू बांधायची सुरवात झाली. दोरीच अख्ख बंडल दादाने त्यांच्या स्वाधीन केलं होत. श्रीराम उंच असल्याने हे बांधाबांधीच काम त्याने केलं. जुई आणि इशान दोन बाजूने बांबू धरून नि श्रीराम दोरीने बांधत होता. तेही चार बाजूने झाले. मग झोपडी चारही बाजूने बंद केली तर वारा कसा यायचा म्हणून अजून एक आडवा बांबू बांधून एक खिडकी करण्यात आली. सकाळच्या उन्हात हे सगळं होतंय तोवर वारा पाऊस सुरु झाला. त्यादिवशीचा खेळ थांबला. संध्याकाळी जाऊन बघतात तर बांबू बिचारे आडवे पडलेले. झोपडी वादळग्रस्त झाली. हिरमुसली बिचारी पोरं.

पण उत्साह कमी झाला तर ती मुलं कुठली? दुसऱ्या दिवशी उठली ती याच तयारीने कि काहीही झालं तरी आज झोपडी पूर्ण करायचीच. परत कालच्यासारखी सुरवात झाली. काल काय चुका झाल्या हे लक्षात घेऊन पोरांनी आज खड्डे जरा जास्त खोल खणले. परत बांबू उभारले गेले. शेजारच्या बळवटावर नवीन प्लास्टिक टाकल्याने जुनं प्लास्टिक तसच पडून होतं. आजोबांच्या परवानगीने ते मिळवलं. बिचारं जुनं असल्याने जागोजागी फाटलं होत. पण मुलांच्या झोपडीसाठी पुरेसं होत. आज बांबू उभारून झाल्यावर त्यावर प्लास्टिक टाकून झालं. पण जरा वारा आल्यावर ते उडत होत. ईशानला आम्ही ग्रीन नेट बांधताना शिवलेलं आठवलं. घरातून दाभण आणून त्याच दोरीनं प्लास्टिक चारही बाजूने खांबाला शिवून झालं. जिथे जिथे फाटलं होत तिथे जुनी पोती सरकवली गेली. मामीची एक ओढणी कामाला आली. तेव्हढयात जुईला कडेला टाकलेले टाईल्स चे तुकडे दिसले. लगेच पोरांनी ते टाईल्सचे तुकडे जोडून लावले नि झोपडीतली लादी तयार झाली. आता पुढे काय तर इकडे तिकडे फिरून एक गाडीचा टायर मिळाला, एक जुना कपाटाचा दरवाजा मिळाला. त्या टायरवर तो दरवाजा टाकून डायनिंग टेबल बनवून झालं. मग घरातून ४ हापूस आंबे आणून त्या टेबल भोवती बसून पार्टी करून झाली. थोड्या वेळाने परत पाऊस सुरु झाला. पण पोरं झोपडीत सुरक्षित होती. खरं तर बाहेर यायला तयार नव्हती. पण त्यांना भिजून देणं आताच्या घडीला परवडणारं नसल्याने ओरडून त्यांना घरात बोलवावं लागलं. त्यातही ती मस्त पावसात भिजून घेत ओलीचिंब होऊन घरात आली.

मुलांनी यावेळी काहीतरी छान काम केल्याचं मलाच समाधान मिळालं. तुम्ही एकत्र आलात आणि न भांडता काम केलत तर किती छान काम होऊ शकत हे मी त्यांना त्यांच्याच उदाहरणे पटवून दिलं. खरं तर त्यांची झोपडी हि रस्त्याच्या बाजूला असतात त्या पेक्षाही वाईट होती. पण ती त्यांची त्यांनी केल्याने त्यांना समाधान होत. जेव्हा अर्धी अधिक झोपडी बांधून झाली, नि लाद्या जुळवायचं काम चालू होतं, तेव्हा मी विचारल कस वाटतंय ?खरं तर एवढं मोठं घर असताना पोरांना झोपडीची आस का लागावी ?असा आम्हा मोठ्याना प्रश्न पडला. पण ईशान लगेच म्हणाला आई आपण मॅन वर्सेस वाइल्ड बघतो ना, त्यात तो माणूस कसा झोपडी बांधून राहतो, आम्ही तसाच करतोय असं वाटतं. मी अवाकच झाले. श्रीनिवास कितीतरी वेळा discovery, national geography असे चॅनेल्स बघत असतो, ईशानला समजावून देत असतो. त्याचा असा परिणाम होईल असं कधीही वाटलं नव्हतं. हि मुलं गरीब समजून झोपडीत न राहता बेअर ग्रिल्सचा आदर्श घेऊन त्याच्यासारखं करत होती. मला सुखद असा धक्का बसला. खूप बरं वाटलं . गरिबी नक्कीच वाईट नसते. उलट आपल्याला बरंच काही शिकवून जाते. आज सगळं आसपास असतानाही माझी मुलं हे शिकली हि नक्कीच अभिमानाची गोष्ट आहे.

मुलं खूप छान काम करत होती. आम्हीदेखील मुलांना पूर्ण मोकळीक दिली होती. कपडे खराब होत आहेत, मातीत हात जात आहेत, हे जमणार नाही, कशाला करताय?, असं म्हणून त्यांना थांबवलं नाही. कोयती, सूरी,कात्री अशी हत्यारं मुलं वापरत होती पण कुणालाही कुठेही दुखापत झाली नाही. आम्ही बजावून पाठवलं होतंच. पण तरीही आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला तर त्यांनीही त्यांची खबरदारी घेतली ,हेही कौतुकास्पद आहे. आदल्या दिवशी झोपडी बांधत असतानाच फोटो स्टेटसला टाकला त्यावरच्या कंमेंट्स त्यांना दाखवल्या ज्यामुळे त्यांचा उत्साह वाढला आणि दुसऱ्या दिवशी ठरवल्याप्रमाणे त्यांनी काम पूर्ण केलं. छोटा निनाद देखील त्यांना जमेल तशी मदत करत होता. छोटे दगड आणून दे, छोट्या टाईल्सचे तुकडे आणून दे, पाणी आणून दे. त्याचा खारीचा वाटा उचलला. पुस्तकी ज्ञानाबरोबरच प्रॅक्टिकल ज्ञान पण महत्वाचं आहे, याबाबत माझं आणि श्रीनिवासच एकमत आहे. आणि वेळोवेळी ईशानला आम्ही आमच्या कामात सहभागी करत असतो. शाळेला सुट्टी लागल्यापासून ईशान घरात केर काढणे,मॉपच्या साहाय्याने लादी पुसणे, कपडे वाळत घालणे हि कामे करत आहे. आपले अंथरूण उचलणे, कपडे, पुस्तके आवरणे हे तर आधीपासूनच करतोय. पण तो केवळ पाट्या टाकायचं काम न करता प्रत्यक्ष त्याचा उपयोग करू शकतो हे बघून खरंच आनंद झाला.

मुक्तकप्रकटन

प्रतिक्रिया

लहान मुले क्रिएटिव्ह असतात.. छान लिहिले आहे

दादा कोंडके's picture

14 Jun 2020 - 1:32 am | दादा कोंडके

कौटुंबिक व्हॉट्सप गृपमध्ये पाठवलं का हे? ;)