ओला कचरा निर्मूलन- इच्छा आणि त्रास

Primary tabs

जेडी's picture
जेडी in जनातलं, मनातलं
8 Jun 2020 - 1:15 am

भारतात सद्या महत्वाची समस्या म्हणजे घनकचरा आहे . अर्थातच कचरा निर्मूलन जिकिरीचे होऊन बसले आहे. आजकाल साफसफाई कामगारांना सोसायटीत वरच्या मजल्यावर प्रवेश नाही . रोज कचरा खाली नेवून टाकावा लागत आहे. बरेच लोक आता हे सर्व स्वतःच करत असले तरी प्लॅस्टीकच्या पिशव्यात भरून तशीच पिशवी टाकत आहेत . ती ओल्या कचऱ्याच्या डब्यात जरी ओतली तरी निम्मा अर्धा ओला कचरा त्या पिशवीला चिकटून सुक्या कचरायच्या डब्यात जात आहे. खरे पाहता प्रत्येक घराने आपला ओला कचरा घरातच जिरवला पाहिजे, असे महापालिका सांगत आहे .

अनेक ठिकाणी काही दिवस महापालिका कचरा उचलत नाही आणि घाणीचे साम्राज्य पसरते. कचरा डंप करण्यासाठी जागा उपलब्ध करणे हे सुद्धा अवघड काम झाले आहे. तो जिथे डंप होतो तिथल्या गावांमध्ये सद्या रोगराईचा प्रश्न उभा राहिलाय. दुर्गंध, माशा यांनी ती गावे हैराण आहेत . आमच्या इथे हे डंपिंग ग्राउंड नको म्हणून तिथले लोक आंदोलन करीत आहेत . शहरातील मोठ्या लोकसंख्येसाठी हा कचऱ्याचा प्रश्न सोडवणे अवघड होत आहे . तो किती किलो किंवा त्याच्या आकड्यांच्या खेळाविषयी मी बोलणार नाही पण ओला कचरा जिरवण्यासाठीच्या प्रयत्नाबद्दल किंवा त्यात येणाऱ्या अडचणींवर येथे चर्चा व्हावी असे मला वाटतेय .

वरील सर्व लिहिण्याचे कारण, आपल्या पुढच्या पिढयांसाठी थोडेतरी सुसह्य जग असावे असे मला वाटते आणि त्यासाठी माझा खारीचा वाटा मी करत असते पण त्यासाठी अडथळ्याची शर्यंत आहे . मी जवळपास ७-८ वर्षांपासून घरी कचरा जिरवायचा प्रयत्न करतेय पण हे अतिशय चिकाटीचं काम आहे .सुरवातीला खूप माहिती घेवून गांडूळ वापरून खत करायचे मी ठरवले. त्यासाठी प्लॅस्टिकचा नवा कोरा ड्रम आणला . ४५० रुपये घालून कचऱ्यासाठी नवीन ड्रम काय आणतेय आणि कशाला ती घाण घरात? अशा शिव्या खाऊन झाल्या होत्या. युट्युब वर पाहून त्याला भोके पाडणे वैगेरे हे सर्व पाहत होते . त्यात तुमच्याकडे ड्रिल मशीन नसेल तर चाकू तापवून भोके पाडा असे सांगत होते. घरच्यांची कोणाचीच साथ नव्हती त्यामुळे अर्थातच ड्रिल ने भोके पाडणाऱ्या माणसाला बोलवून ती पाडून घेणे म्हणजे ते निव्वळ अशक्य होते . कारण हेच कशाला असले उद्योग पैसे घालवून करायचे. मग मी चाकू तापवून भोके पाडणे वैगेरे उद्योग करू पाहत होते पण हाय रे कर्मा नव्या कोऱ्या ड्रमला अशी भोके पडणे म्हणजे दिव्य आहे . म्हणून तसाच ड्रम ठेवायचा ठरवलं. त्यात कचरा साठवत राहिले. स्वयंपाक वाल्या मावशींना भाजीचा कचरा ड्रमात टाकायला सांगितला. मग मी अगदी शेतकी कॉलेज मध्ये जाऊन गांडूळ आणली आणि त्या ड्रमात टाकली . ड्रम वरून बंद करून ठेवला उन्हाळा असल्याने सर्व गांडूळे अक्षरशः ड्रमच्या झाकणातून बाहेर पडली होती आणि अख्या गॅलरीभर पसरली होती. शिव्यांचा पाऊस तेंव्हा पडला होता हे वेगळे सांगायला नकोच . त्याची उस्तवार करणे आणि शिव्या ऐकत ते सर्व करणे किती असह्य झाले होते.

तरीही मी माझे प्रयत्न चालू ठेवले . शेवटी बऱ्याच कुंड्या आणून तो साठवलेला कचरा एकदा जिरवून टाकला . पुन्हा साठवला त्यात शेवग्याचे झाड लावले. बऱ्यापैकी मोठा होऊन तो शेवगा एका पावसात मोडला. परत तो नाद सोडून दिला .

पुन्हा कधीतरी माझ्या मनाने उचल खाल्ली आणि परत मी कचरा करायचे ठरवले. आता मी घर बदलले असल्याने गॅलरी छोटी होती . पूर्वीची गॅलरी खूपच मोठी १० X १५ होती, आता छोटी ५ X ११ होती . मग मी गांडूळ न आणता कल्चर घालून कचरा जिरवनार होते. परत मी नवीन ड्रम आणला . पुन्हा शिव्या . त्याला भोके आता मी चाकूने पडणार नव्हते. इलेकट्रीकचे काम करायला आल्यावर त्या माणसाला म्हणाले मला ड्रम ला पण भोके पाडून दे . तो तयार होत नव्हता पण मी तुला पैसे देते बाबा म्हंटल्यावर तो तयार झाला . पहिले भोक तळाला पाड म्हणाले . त्याने सुरवात केली आणि ड्रमचा तळ वेडावाकडा चिरला . मग त्याने पुढे करणार नाही म्हणाला . मग पुन्हा त्या ड्रमात खत बनवण्यासाठी लढाई चालू . कसेतरी कोकोपीट , विरजण आणून आणि काय काय करून कचरा त्यात टाकणे आणि जिरवणे चालू झाले . त्यात अळ्या, किडे झाले कि घरातल्यांची चालू होई - हे सर्व फेकून दे म्हणून. त्यातून किडे बाहेर येऊ नयेत म्हणून मी कचरा बास्केट्स आणली . दोन आणल्या . तिच्यात खरकटे टाकले आणि उंदीर मामाने ती कुरतडली . कुंड्याना ऊन पाहिजे म्हणून मी गॅलरीला छत टाकले नाही. मग होणारा सर्व कचरा , कुंड्या (ज्या अतिशय अवाढव्य झाडे वाढल्याने ), पाने यांचा कचरा वाढत गेला आणि एकट्यानेच साफ करावं लागत असल्याने माझ्याकडून त्याचे नीट व्यवस्थापन होईना . पावसाळ्यात हे अतिशय बिकट व्हायचे, होते आणि पाऊस वाढेल तसा शिव्या वाढतात.

आता मी जुन्या माठात कचरा साठवायला सुरवात केली , त्याला भोके वैगेरे पाडत नाही बसले, सरळ माठ उघडा ठेवून त्यात कचरा टाकते . तो सर्व कचरा बारीक वैगेरे करण्याइतका वेळपण माझ्याकडे नाही. मग तो लवकर कुजत नाही पण असुदे जेवढे होईल तेवढे म्हणून प्रयत्न चालूच. पण किडे आळ्या होतात . आता एकदा पाऊस पडला आणि त्यात पाणी साठले मग वास यायला लागला . ड्रमातला कचरा कुजला तरी तो चाळण्यासाठी पत्र्याचा चाळा मी सर्व हार्डवेअर दुकानात शोधला , भांड्याच्या दुकानात शोधला पण मिळाला नाही. कामवाल्या मावशींना आणायला सांगितला त्या बाजारात बघते म्हणाल्या . दर बाजारदिवशी मी त्यांना आठवण करून द्यायचे पण त्या विसरायच्या . कंटाळून एकदा ड्रम खाली ओतला . काळे खत बघून मावशी हरकून गेल्या आणि मी तुम्हाला चाळा आणून देतेच म्हणाल्या पण विसरल्याचं. अजून मिळाला नाही. वाळू चाळण्यासाठीचा मला नको होता कारणतो ठेवणार कोठे?
आता ड्रम पण उन्हाने फुटला . आतापर्यंत सर्व खत कुंड्यात जिरवले . काय झाडे येतील ती येतील . पण हा सर्व उपदव्याप नको म्हणून कचरा जिरविण्याचे आयता ड्रम , मशीन मिळते का पहिले पण त्याच्या किमती जास्त वाटल्या आणि त्यासाठी खर्च करायचा तर घरून परवानगी घ्यायची तर अजून तुझे हे नवीन फ्याड का म्हणून गप्प बसावे लागतेय . आता कचऱ्याचा ड्रम फुटलाय तर ते हे सर्व कचऱ्याची घाण फेकून दे आणि गॅलरीला कव्हर करू दे म्हणून घरचे मागे लागलेत. मी विरुद्ध घरातले सर्व , पण माझे गप्प बसून चालूच आहे.
वर्षभर मिरच्या घ्याव्या लागल्या नाहीत, कडीपत्ता मिळतो , गवती चहा आहेच जोडीला . बाकी कधी दोडके , कारली , सीताफळे पण लागलीत पण तो वेल कोण चढवणार?त्यासाठी दोर्या कोण बांधणार? फुलणारी सोन चाफ्याची , मोगरीची फुलं घेऊन घरच्यांनी टेचात सुगंध घेऊन फोटो व्हाटसपला डकवलेत, पण ते असोच .

मी भरपूर शोध घेतला पण गॅलरीत बसेल, खरकटे पासून सर्व ओला कचरा जसा च्या तस टाकता येईल, मेंटेन करायला सोपा जाईल असले काहीच मिळत नाही आणि मिळाले तर त्याच्या किमती सामान्य लोकांना परवडणाऱ्या नाहीत . मी विवम ह्या कंपनीला मेल लिहून किमती विचारल्या होत्या तर त्यानी मेलला उत्तर देण्याची तसदी घेतली नाही.

महापालिका कचरा जिरवा म्हणते , त्यासाठी ओला आणि सुका कचऱ्याचे डबे देते पण तो घरात जिरवण्यासाठी लागणाऱ्या उपकरणावर सबसिडी देईल किंवा तो कसा जिरवायचा ह्यावर प्रशिक्षण देत नाही तोवर हि समस्या असेल. कचरा घरात जिरवा नाही तर जितका कचरा जास्त तितका सोसायटीला जास्त कर लागेल असले उपाय केल्याशिवाय हि समस्या सुटणार नाही आणि माझ्यासारख्या अशा एखादीला शिव्या खावया लागणार नाहीत .

माझ्या प्रयत्नांनी आलेली झाडे, फुले, फळे इथे डकवत आहे... इमेज उपलोड करता येत नाही.

समाजजीवनमानआरोग्य

प्रतिक्रिया

इच्छा असेल तर मार्ग शोधला जातो. हे खरंय.

सोसायटीत फक्त एक दोघांनी कचरा निर्मूलन करून काही साधणार नाही. आणि सर्वांनाच जमणार नाही.

दुटप्पीपणा भरला आहे. एकीकडे म्हणायचं ओला सुका कचरा वेगळा करा, ओला कचरा टाकायला प्लास्टीक वापरू नका. तर दुसरीकडे बाजारात गार्बिज ब्यागच्या थप्पी विकायला ठेवलेल्या दिसतात. अमुक इतकी पातळ पिशवी वापरायला बंदी पण या पिशव्या पातळण असतात. कारण वजनांत अधिक पिशव्या मिळाव्यात म्हणून. कचरा गोळा करणाऱ्यांना नंतर या पिशव्या फोडून त्यातला कचरा वेगळा करावा लागतो. आता हे करायला कुणी नाही.

पूर्वी कामावर निघतांना लोक या कचरा भरलेल्या पिशव्या नेत आणि रस्त्यात दिसणाऱ्या कोपऱ्यावर टू विलर, ओटोतून भिरकावून पुढे जात. आता कचरा टाकून डबा परत घेऊन येणे यासाठी वेगळा वेळ शहरातल्या सोसायट्यांत राहाणाऱ्यांना
काढावा लागेल. लिफ्टवाल्या ऊंच इमारतींत एवढी ये जा होईल. कचरा लिफ्टमध्ये सांडल्यास भांडणे होतील.

कचऱ्याचे ढीग जिथे टाकतात तिथे माश्या होतात. त्या होऊ नये म्हणून त्यावर रासायनिक फवारे मारतात. त्याने माश्या होण्याचे बंद झाले पण कचरा कुजवणारे प्राणी आणी जंतूही मेले. कचरा कुजून खत होऊन दुर्गंध जाऊन माती होत नाही.
समस्या कठीण आहे.

मी भरपूर शोध घेतला पण गॅलरीत बसेल, खरकटे पासून सर्व ओला कचरा जसा च्या तस टाकता येईल, मेंटेन करायला सोपा जाईल असले काहीच मिळत

यावर जे उपाय सांगितले जातात ते बहुतेक शेतात किंवा ज्यांच्याकडे स्वत:चे घर आणि गच्ची आहे त्यांनांच साध्य आहेत. एका कोपर्यात तो ड्रम किंवा जाळीचे कुंड ठेवायचे आणि शेवटचा कचरा टाकल्यानंतर कमीतकमी तीन महिन्यांनी ते खत म्हणून वापरता येते. म्हणजे तुमच्याकडे तीन ड्रमस हवेत. बऱ्याच जणांनी पावसाळ्यात गळते म्हणून गच्चीला छप्पर टाकले आहे. म्हणजे झाडे वाढवता येणार नाहीत आणि कचरा खताचे करायचे काय?

बाल्कनी असेल तर वेगळे सोपे उपाय आहेत. ते लिहितो नंतर. अर्थात दहा बाई चारच्या बाल्कनीत किती कचरा जिरेल यास मर्यादा आहेतच. काहींनी जागा कमी पडते म्हणून बाल्कनी बंद केली आहे ते फक्त बाहेरच्या बाजूस साताठ कुंड्यांत झाडे ठेवू शकतात.

चौकस२१२'s picture

8 Jun 2020 - 9:34 am | चौकस२१२

उन्हामुळे प्लास्टिक चा ड्रम फाटला हि समस्या असेल तर कदाचित तो ड्रम अल्ट्रा व्हायोलेट (सूर्य कीर्णनांपासून बचाव ) दर्जा चा नसेल.. पाण्यासाठी ज्या टाक्या असतात त्या बहुतेक त्या दर्जाच्या असतात .. तर अशी एखादी वापरून बघा
माती भांड्यांचे असे कंपोस्टर भारतात मिळतात ! असा दिसतंय
https://www.youtube.com/watch?v=i0lN-FGfWWE

त्यांची किंमत जास्त आहे. १५०० च्या वर. त्यात खरकटे टाकुन चालत नाही.कचरा बारीक करुन टाकणे, तो हलवणे हे सर्व व्याप आहे. मी त्यावर पण माहिती घेतलीय. शिवाय त्याचे विरजण, सुकं कोकोपीट विकत घ्या हे सर्व आलेच. शिवाय हे पाॉट सहजी मिळतही नाहीत. त्यांचे एक डिलर औंधला आहे, मी त्यांच्याकडे चौकशी केली होती, शिवाय ते घरापर्यंत आणायला खर्च करावा लागेल.

झाडं ,कुंड्या सुंदर दिसणे हा आग्रह सोडला तर कचरा कुजवणे स्वस्तात आणि सक्षज शक्य आहे.

कसे? त्यात खरकटे टाकता यायला हवे ही माझी इच्छा आहे. त्याची उस्तवार फार करावी लागु नये ही अपेक्षा आहे

ओल्या कचऱ्यात खरकटेही टाकता यायला हवे ही माझी इच्छा आहे. त्याची उस्तवार फार करावी लागु नये ही अपेक्षा आहे
उत्तर म्हणून लेख लिहिला आहे.

जेडी's picture

9 Jun 2020 - 6:35 am | जेडी

उत्तर म्हणून लेख लिहिला आहे.
समजले नाही काय म्हणायचे आहे ते.

कंजूस's picture

9 Jun 2020 - 7:38 am | कंजूस

नवीन लेख

//बाल्कनीत ओला कचरा कुजवणे //
https://misalpav.com/node/46974

जेडी's picture

9 Jun 2020 - 11:41 am | जेडी

धन्यवाद, करुन पाहते.

पिंगू's picture

8 Jun 2020 - 9:00 pm | पिंगू

तुम्ही दोन ड्रम वापरून कंपोस्टिंग अतिशय उत्तमरित्या करू शकता आणि ते सुद्धा विनासायास. पूर्ण कृतीसाठी हा व्हिडीओ पहावा.

ओल्या कचर्‍यापैकी मुंग्या न लागतील असा भाजीपाला चाकूने पटकन जमेल तसे तुकडे करून पाण्यात भिजत घाला. जितके बारीक तितके चांगले. पण वेळाच्या अभावी जमेल तसेही चालून जाते. काठीने ढवळून झाडांना पाणी घालताना हेच खताचं पाणी चाळणीतून गाळून घाला. चाळणी बागेतच ठेवा. गाळल्यावर भाजीपाला परत पाण्यात बुडवून ठेवा. हे रिपीट करा. साताठ दिवसानी राहिलेला भाग कुंड्यांमधे मिसळा. यामुळे तूमचा प्रश्न बर्‍यापैकी सुटेल. यात फार वेळ जात नाही हा स्वानुभव आहे. अशा खतावर वाढवलेल्या बागेतले काही फोटो व माहिती या पानावर 26मार्च 2015 रोजीच्या प्रतिक्रियांमध्ये आहे. http://misalpav.com/node/30818
उरलेला मुंग्या लागण्यासारखा ओला कचरा कमी असल्याने त्याचे कंपोस्ट करणे सोपं जाईल असं वाटतं.

कुमार१'s picture

12 Jun 2020 - 11:52 am | कुमार१

चांगली माहीती

तुषार काळभोर's picture

13 Jun 2020 - 2:15 pm | तुषार काळभोर

पण तुमच्या चिकाटीबद्दल प्रचंड आदर आणि कौतूक वाटलं.