जरी आंधळी मी तुला पाहते

मी-दिपाली's picture
मी-दिपाली in जनातलं, मनातलं
5 Jun 2020 - 5:02 pm

एव्हाना मन की बात सगळ्यांच्याच परिचयाची झाली आहे. पण हे गाणं ऐकलं ..जरी आंधळी मी तुला पाहते ...आणि वाटलं अरेच्चा ! हे तर मन की आँख! दिव्यदृष्टीच म्हणा ना!

महाभारतात महर्षी व्यास संजयास दिव्यदृष्टी बहाल करुन जातात; कुरुक्षेत्रावरील वृत्तांत धृतराष्ट्रास कथन करण्यासाठी. गांधारीची दिव्यदृष्टी मात्र तशी बक्षीसपात्र नाही. अंध धृतराष्ट्राशी लग्न होणार समजताच आजन्म डोळ्यावर पट्टी बांधुन घेण्याच्या कठोर प्रतिज्ञेत स्वतःला बद्ध केलं तिने. त्या साधनेतुन, तपश्चर्येतून ती कमावलेली. म्हणुनच पुत्र दुर्योधनाच्या शरीराच्या ज्या अनावृत भागावर तिची दृष्टी पडते, तेवढा भाग वज्रासमान बनतो, आणि डोळ्यावरची पट्टी अनवधानामुळे किंचित सरकताच झालेल्या एका चोरट्या पण संतप्त नेत्रकटाक्षानेसुद्धा युधिष्ठीराच्या पायाच्या अंगठ्याचे नख काळेठिक्कर पडते.
जे न देखे रवि, ते देखे कवी , हीसुद्धा दिव्यदृष्टीच म्हणायची. कवी ग्रेस एकदा एका मुलाखतीत म्हणाले होते.. गंगेचं वर्णन करायला मला गंगेच्या तीरावर जायची आवश्यकता नाही, नुसते डोळे मिटायचा अवकाश.. परकर घातलेल्या अवखळ मुलीसारखी गंगाच समोर अवतीर्ण होते.
आजच्या काळात मात्र दूरदृष्टी अधिक महत्त्वाची. उत्कृष्ट व्यवस्थापन मग ते घराचे असो किंवा देशाचे, द्रष्टेपण हे हवेच. द्रष्टा म्हटलं की एक नाव लगेच आठवतं ते म्हणजे र.धों.कर्वे. गणिताचे प्राध्यापक असलेल्या रघुनाथरावांनी प्रचंड लोकसंख्यावाढ ही भविष्यात देशापुढील भीषण समस्या असेल हे ओळखून कुटुंबनियोजनाच्या प्रसाराचे कार्य हाती घेतले, तेही शतकभरापूर्वी, जेव्हा या विषयावरील केवळ चर्चादेखील निषिद्ध मानली जात होती.
सामान्य माणुस मात्र दृष्टीआड सृष्टी म्हणत राहणंच बऱ्याचदा पसंत करतो. मग कुणी प्रेमिका प्रियकर दूर जाताना विसरशील खास मला दृष्टीआड होता या शंकेने धास्तावते, तर कुणी आदिशक्तीच्या आवेशात या डोळ्यांची दोन पाखरे फिरतील तुमच्याभोवती सांगुन खुशाल धमकी देते. कुणी भगवंताला कृपादृष्टी राहो म्हणुन विनवते, तर एखादी आई दूरदेशी असलेल्या लेकराला इथुनी दृष्ट काढते निमिष एक थांब तू सांगते. कुणी सासूच्या, बाॅसच्या काकदृष्टीच्या धाकात उबगलेले तर कुणी शनि, राहूच्या वक्रदृष्टीच्या फेऱ्यात अडकलेले. कुणाला जन्माने, वयोमानपरत्त्वे, किंवा पोषणाअभावी आलेला दृष्टिदोष तर कुणाला जडणघडणीमुळे रुजलेला, ज्ञानाअभावी पोसलेला विचारातील दृष्टिदोष. दृष्ट, देजा वू, टेलिपथी हे दृष्टीचे अनाकलनीय, गूढ पदर.
या दृष्टीला एक दुखरा कोपरा असतो, तो दृष्टिकोनाचा, दुखरा अशासाठी कारण तो बऱ्याचदा एकाचा दुसऱ्याला खुपतो. मग सरळसरळ दोन गट, जहाल-मवाळ,आस्तिक -नास्तिक. पुराणमतवादी-पुरोगामी...यादी न संपणारी. मात्र दृष्टिकोन बदलला की दृश्य बदलते आणि अर्धा रिकामा असलेला ग्लास अर्धा भरलेला दिसू लागतो.

मुक्तकप्रकटनविचार

प्रतिक्रिया

गणेशा's picture

5 Jun 2020 - 5:13 pm | गणेशा

छान लिहिले आहे.. आवडले...
लॉकडाऊन धाग्याचा पुढचाच भाग वाटतो हा धागा..

मस्त..

मन्या ऽ's picture

5 Jun 2020 - 6:09 pm | मन्या ऽ

छान लिहिलंय..

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

5 Jun 2020 - 6:34 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सुरेख लेखन. दृष्टीचं दृष्टेपण आवडलं.
लिहिते राहा.

''विसरशील खास मला दृष्टीआड होता'' इथे दीर्घ पॉज. एक तर आभाळ भरुन आलेलं. काही आठवणी टपटप पडून गेल्या. काहीही करुन बोलत जा, भेटत जा. आपण बोललो नाही, भेटलो नाही तर आपण एकमेकांना विसरुन जाऊ, असे हळवे क्षण आठवून गेले.

-दिलीप बिरुटे

प्रचेतस's picture

5 Jun 2020 - 6:54 pm | प्रचेतस

लेख आवडला.
पौराणिक काळाच्या परिप्रेक्ष्यातून आजच्या काळातही सकारात्मक दृष्टिकोन देणारा लेख.

वीणा३'s picture

5 Jun 2020 - 9:42 pm | वीणा३

छान लिहिलंय.