का न व्हावे मी स्वतःच सूर्य !!!

अमोल_००३'s picture
अमोल_००३ in जे न देखे रवी...
29 May 2020 - 7:15 pm

का न धरावे मी मनी धैर्य |
का न व्हावे मी स्वतःच सूर्य || धृ ||

अंधकार दाटला भोवती घोर अज्ञानाचा,
काय करावे, काही न समजे मार्ग प्रकाशाचा,
प्रज्ञाही ती कुंठित झाली या संग्रामात,
काळालाही अखेर केला साष्टांग प्रणिपात,
अशा समयी मनीमानसी बाळगावे स्थैर्य,
का न मी बाळगावे स्थैर्य || १ ||

वाट पाहिली अनेक दिन मी, अनंत अन् रात्री,
कितीदा तरी अन् संपून गेलो केवळ क्षणमात्री,
हरवूनि बसलो कधी मी मला गूढ विचारात,
आणि कधीतरी शोधित बसलो अपार निराशेत,
अशा समयी अंतर्यामी जागवावे शौर्य,
का न मी जागवावे शौर्य || २ ||

दिसता कधीतरी एक शलाका प्रकाश किरणाची,
होते नकळत जागृत जाणीव, जगण्या अन् मरण्याची,
चेतविते ती सुप्त चेतना कर्तृत्वही करण्याची,
स्फुरते मग ती दिव्य भावना आकाशही धरण्याची,
अशा समयी माझ्यामधूनि घडू द्यावे कार्य,
का न मी घडू द्यावे कार्य || ३ ||

कविता

प्रतिक्रिया

भावना आकाशाला धरण्याची... व्हावे बनुनी सूर्य..

वा काय मस्त...

मन्या ऽ's picture

31 May 2020 - 1:04 am | मन्या ऽ

मस्तच! कविता आवडली!