रत्नाकर मतकरी : अ‍ॅडम - नव्या आवृत्तीच्या निमित्ताने

Primary tabs

चौथा कोनाडा's picture
चौथा कोनाडा in जनातलं, मनातलं
20 May 2020 - 1:45 pm

रत्नाकर मतकरी : अ‍ॅडम - नव्या आवृत्तीच्या निमित्ताने

नुकतंच ज्येष्ठ साहित्यिक, नाटककार, रंगकर्मी आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट दिग्दर्शक रत्नाकर मतकरी यांचं निधन झालं.
त्यांना श्रद्धांजली अर्पण करणारा धागा निघालेला आहे, आणि मिपाकरांनी त्यावर भावना व्यक्त केल्या आहेत !

मतकरींच्या कथा वाचताना अचानकपणे अक्षर दिवाळी अंकात त्यांच्या अ‍ॅडम या कादंबरीची भेट झाली !
त्यातील शृंगारिक वर्णने वाचून चळायला झालं. सुरुवातीच्या काही पानांनंतर कादंबरीचे मनाचा ताबाच घेतला.
दक्षिण भारताच्या पार्श्वभूमीवरील पात्रांनी मनात घर केले. कथानायकाच्या आयुष्यात आलेल्या स्त्रिया आणि त्यांच्या नातेसंबंधाची, लैंगिक प्रवासाच्या दीर्घपटाने व्यापून टाकले. कादंबरी वादग्रस्त ठरली. नंतर कादंबरी २००५ आसपास पुन्हा वाचली. लॉकडाऊनच्या काळात इतर साहित्या बरोबर अ‍ॅडम आणखी एकदा वाचली गेली

या पार्श्वभूमीवर रत्नाकर मतकरींनी व्यक्त केलेलं मनोगत इथं द्यायचा मोह आवरला नाही:

*************************************************************************************

नव्या आवृत्तीच्या निमित्ताने

‘अ‍ॅडम ’ ही माझी, आता पर्यंत सर्वात धाकटी कादंबरी. थोरली ‘जौळ’ - ती नावाजली गेली, तिच्यावर आधारलेलं ‘माझं काय चुकलं?’ हे नाटक जोरात चाललं, तिच्यावर चित्रपटही झाला. थोडक्यात, ती सुस्थळी पडली. मधली ‘पानगळीचं झाड’, तिच्यावर नाटक झालं. ते बऱ्यापैकी चाललं, ती ब्रेल लिपीतही आली. तिसरी ‘अ‍ॅडम ’ तिच्यावर ना नाटक झालं, चित्रपट. रसिकांनी ती आवडल्याचं एकमेकांना सांगितलं तरी कुजबुजून. पण धाकटी आणि धड मार्गाला ना लागलेली मुलगी बापाला अधिक आपलीशी वाटते म्हणून माझं ‘अ‍ॅडम ’वर प्रेम आहे, असं नाही. अगदी त्रयस्थपणे, तटस्थपणे पहिले. तरी या कादंबरीचे गुण पण दिसतात. मलाच नाही, तर मुद्दाम डोळे झाकून न घेण्यास कुणालाही.

RMAT456

१९८८ मध्ये ‘अक्षर या दिवाळी अंकासाठी मी ती लिहिली. ती लिहून होण्याआधीच संपादक निखिल वागळे याने ती स्वीकारली होती. (माझ्या लिखाणावर असा विश्वास ‘जौळ’ च्यावेळी ‘माणूस’च्या श्री. .ग. माजगावकरांनीही दाखवला होता.) मात्र त्यांची एक अट होती. नुकत्याच सुरु होणार असलेल्या अक्षर प्रकाशनला मी ती पुस्तक रूपाने काढू द्यावी. नकार देण्यासाठी मात्र कारण, म्हटले तर एवढेच होते की , अक्षर प्रकाशन अजून प्रस्थापित व्हायचे होते. पण असे व्यवहारी विचार मी कधीच करीत नसल्यामुळे मी निखिलला होकार दिला. दिवाळी अंकात छापून येताच त्या कादंबरीचा बोलबाला झाला. ज्येष्ठ संपादक (वीणा) आणि साहित्यनिरीक्षक उमाकांत ठोमरे यांनी ती विलक्षण वाटल्याचा निरोप पाठवला. ‘माहेर’मधे चारू सारंग आणि अनिल बळेल यांनी दोन दीर्घ लेख लिहिले . मॅजेस्टिक गप्पांमध्ये मधे या कादंबरीच्या निमित्ताने ‘मराठी साहित्य आणि अश्लीलता ’ या विषयांवर परिसंवादही झाला. कादंबरी ‘बोल्ड आहे पण चांगली आहे.’ असे अनेकांनी कळवले. ती आवडल्याचे अनंत सामंत यांनी प्रत्यक्ष भेटून स सांगितले . (तीच माझी त्यांची पहिली पिहली भेट!) विल्सन कॉलेजमध्ये प्रा. मंगल आठलेकरांनी माझी मुलाखत ठेवली होती. तिच्यात त्यांच्या एकाविद्यार्थिनीने ‘अ‍ॅडम’ची सविस्तर प्रशस्ती केली. काही प्रकाशकांनी ती प्रकाशनासाठी मागितली. मी ‘अक्षर’ला नाइलाजाने वचनबद्ध असल्यामुळे नकार दिला.

ADMCV

आणि अचानक कळ फिरावी, तसे सारे काही एकदम थांबले. कोणीही ‘अ‍ॅडम' विषयी बोलेनासे झाले. बोललेच तर फक्त ती किती अश्लील आहे, या विषयी बोलत. एका ज्येष्ठ समंजस लेखिकेकडे एकजण, तिने प्रतिकूल परीक्षण लिहावे अशी विनंती करण्यासाठी गेल्याचे कळले. तिने अर्थातच, मला कादंबरी आवडली, मग मी प्रतिकूल अभिप्राय का लिहू ? अशी भूमिका घेतली. मात्र दुसऱ्या एका विदुषीने एका प्रमुख दैनिकात बिचकत बिचकत एक प्रतिकूल अभिप्राय लिहिला. बिचकत म्हणण्याचे कारण, त्यातले मुद्दे ओढूनताणून वाईट म्हणायचे असावे, तसे होते. उदाहरणार्थ , ‘यातली नावे तरी किती ढोबळ आहेत पाहा ! खलस्त्रीचे नाव श्यामला आणि सुस्त्रीचे नाव निर्मला !) बाईंना ठाऊक नाही, दक्षिणेत ‘श्यामला ’ या नावात काही वाईट समजत नाहीत... शिवाय त्यांनी एवढा तरी विचार करायला हवा होता की नाटके, कथा यांमधून आजवर शेकड्यांनी पात्रांना नावे देणारा लेखक या विषयी इतका अप्रगल्भ असेल का?)

असो. तर एखादा कट केल्यासारखे एकदम ‘अ‍ॅडम ’ला अश्लील ठरवून बहिष्कृत करण्यात आले. मात्र अनेक वाचक स्वतंत्रपणे मला ‘अ‍ॅडम’ च्या गुणवत्ते विषयी मोकळेपणाने सांगतच होते. कादंबरी अश्लील असल्याचा दावा खोडून काढतच होते. (साहित्यिकांमध्ये, माझ्यावर अश्लीलतेचा खटला भरण्याची भाषाही सुरू झाल्याचे कळले. पण त्यामुळे कादंबरीला महत्व येईल, या भीतीने ती हळूहळू बंद झाली.) कादंबरीत खरोखरच अश्लील काही नव्हते. शरीरसंबंधाचे तपशील होते, पण ते विषयाशी प्रामाणिकपणे संबंधित होते, जसे ‘पानगळीचं झाड’ मध्ये कुष्ठरोगाच्या उपचाराचे तपशील होते, तसे. तिथे जर ते घृणास्पद वाटत नव्हते, तर इथे हे अश्लील वाटण्याचे कारण काय होते? विषयाशी प्रामाणिकपणे राहून लिहिणे, हेच लेखकाकडून अपेक्षित असते; आणि कुठलाही विषय मुळात वाईट नसतोच. हाताळणीतला अप्रामाणिकपणा मात्र कलाकृतीला हिणकस बनवतो.

‘अ‍ॅडम’चा नायक वरदराज ऊर्फ वरदा याचा जीवनप्रवास थोड्याफार फरकाने बऱ्याच पुरूषांचा असतो, तसाच आहे. लहानपणी स्त्री देहविषयीचे कुतूहल, ते नीटसे न भागणे. पुढे असमाधानी स्त्रीयांकडून वापरले जाणे, नंतर खरेखुरे प्रेमात पडणे. त्याच्या विषयी पप्रेम नसतानाही श्यामलेने सोयीसाठी किंवा स्वतःच्या भावना नक्की माहीत नसण्यामुळे त्याच्याशी लग्न करणे व कालांतराने आपलय पहिल्या प्रियकरांशी संबंध ठेवून वरदाचे जिणे उद्धवस्त करणे, जिला तिच्या मुलांसह विनाअट आधार दिला त्या "प्रेमा"ने पुढे घरामध्ये वाटा मागणे, आणि ज्या निर्मलेकडून किंचितकाळ प्रेम मिळाले तिलाही अखेर दुरावणे, असा वरदाच्या प्रेमाचा आलेख आहे. तिसऱ्या पुरुषार्थात पदोपदी अपयश पदरी पडत असताना दुसरा पुरुषार्थात ही वरदाला समाधान देत नाही. सचोटीने वागून, किंबहुना त्यामुळेच नोकऱ्या सुटत जातात, त्या कधी चांगुलचालनाचा कंटाळा म्हणून तर कधी भ्रष्टाचारात वाटेकरी होऊ नये, म्हणून कधी (श्यामला प्रकरणातल्या ) नाचक्कीला घाबरून, तर कधी आणखी कशाने एगझिक्युटीव्ह पासून टायर कंपनीच्या सेल्समन पर्यंत सारी कामे वरदा करतो, पण कधीही सुस्थितीत राहत नाही. एका परीने सुखाचे जीवन जगण्यासाठी पुरुषाला कराव्या लागणाऱ्या धडपडीबद्दल स्त्रीच्या असमाधानाबद्दल (कारण वरदाइतक्याच प्रेमा, श्यामला, निर्मला चल्लाची बायको, या साऱ्याच आपापल्या परीने दुःखी आहेत) एकूण मानवी जगण्यातल्या दु:खावरच ही कादंबरी भाष्य करते.

‘अ‍ॅडम ’मधल्या वरदाच्या आयुष्यात अनेक स्त्रिया आल्या असल्या, तरी तो स्त्रीलंपट नाही. कुठेही परिपूर्ण नातेसंबंध तयार न झाल्यामुळे तो आज ना उद्या आपल्या मनातली प्रेमिका आपल्याला भेटेल, या आशेवर राहतो आणि तरीही कुठेच पुढाकार घेत नाही. शरीरसुखावर झडप घालत नाही. प्रेमाशिवाय शरीरसंबंध ठेवणे त्याला नकोसे वाटते. म्हणूनच तो वेश्यागमन करु शकत नाही. अगदी बॉस च्या सांगण्यावरून संबंधित अधिकाऱ्यांना खाण्यापिण्याबरोबर पोरी पुरवतानाही तो स्वतः निरिच्छ राहतो. मात्र कामभावना ही जगण्या साठी आवश्यक आहे, ही त्याची (कुठल्या ही समतोल व्यक्तीप्रमाणेच ) धारणा आहे. माझ्या मते, तो एक ‘नॉर्मल पुरूष आहे. नॉर्मल पुरुषांच्या गरजांविषयी आपलय साहित्यात फार थोडे आल्यामुळे (एकापेक्षा अधिक स्त्रियांशी संबंध आला की , ती व्यक्तिरेखा एकदम चैनी, विलासी, स्त्रीलंपट या वर्गातच टाकून दिली जाते.) वरदाच्या गरजेच्या उल्लेखांनी एकदम बिचकल्यासारखे वाटते एवढेच.

‘अ‍ॅडम ’मध्ये सुमारे चाळीस वर्षांचा कालखंड येतो. त्या बरोबरच दक्षिण भारतातील नानाविध स्थळे अनेक व्यक्तिरेखा . कितीतरी पत्रे या कादंबरीत भेटतात; त्यांच्या आयुष्यातल्या विविधरंगी रंगानी ‘अ‍ॅडम ’ भरगच्च आणि नाट्यपूर्ण झाली आहे.

पुरुषांचे आपल्या शरीराशी असलेले नाते ही गोष्ट ही आपल्या वाङ्मयात अजून फारशी आली नसली; तरीही यापुढे यायला हवी, कारण ती प्रत्येक पुरुषाच्या अनुभवाची बाब आहे. वरदा आणि त्याचे इंद्रिय यांच्यात कधी कधी जो संवाद चालतो तो अतिशय नैसर्गिक आहे. कादंबरीतील शरीरवर्णने फार उघड आहेत असे वरवर वाटेल, पण वरदाने स्वतःच्या शरीराच्या संदर्भात वयानुसार ओलांडलेल्या कुतूहल,थ्रिल, आनंद, तृप्ती, गरज, वाढती गरज, मैत्री , असमाधान, समाधान, विफलता अशा ज्या पायऱ्या येतात, त्याप्रमाणे ही वर्णने कमी कमी उघड होत गेली आहेत, हे लक्षात घ्यायला हवे. स्वतःच्याच शरीराविषयी काहीसा तात्विक विचार करणे या आलेखाप्रमाणे प्रत्यक्ष शारीरिक तपशील कमी कमी होत गेलेला आहे. ही सूचकता कादंबरीवर अश्लीलतेचा शिक्का मारण्यापूर्वी ध्यानात घ्यायला हवी.

BAHCN23456

समीक्षेमागचे पारंपरिक दृष्टीकोनही आता थोडेफार बदलायला हवेत. समाजाच्या निम्नस्तरातले जीवन, बहुजन समाजाचे जीवन, आजचे ग्रामीण जीवन यांचे चित्रण सहजपणे वास्तववादी म्हणून स्वीकारले जाते... पण मध्यमवर्गीय किंवा निम्नवर्गीय ब्राम्हणाचे चित्रण (‘बालकांड’चा सुखद अपवाद वगळता) दुर्लक्षिले जाते. त्याचप्रमाणे स्त्रियांवर होणाऱ्या अन्याया अत्याचारांचे चित्रण हा सखोल साहित्याचा हेतू समजला जातो. पण पुरुषवर्गावरही –स्त्रियांइतक्या प्रमाणात नसला तरी – अन्याय होतोच. त्याचे चित्रण होते का? आजवर पुरुष घरातला कर्ता मानला गेला, म्हणून तो सारे काही आपल्या मनासारखे करु शकतो, असे गृहीत धरले गेले. त्याच्यावर अनेक अपेक्षांचा भार सहजपणे टाकला गेला. जो या अपेक्षा पुऱ्या करु शकत नाही त्याला, आजच्या जबाबदाऱ्या काढून घेण्याच्या काळातही कितीशी सहानुभूती मिळते? केवळ वैवाहिक हक्क म्हणून स्त्रीवर मनाविरुद्ध शरीरसंबंध लादणारा पत्नीवर बलात्कार करीत असतो आणि तिला तो नाकारण्याचा पूर्ण हक्क आहे असे आपण आता मानतो, आणि ते योग्यच आहे.

.......... परंतु पुरुषाला आपल्या पत्नीकडून शरीरसुख न मिळाल्यास आणि ते बलात्काराने स्वतःच्या शारीरिक समाधानासाठी मिळवायचे नसल्यास नैतिकतेच्या चौकटीत बसणारा कुठला मार्ग उपलब्ध आहे? पुरुष काय, कसेही सुख मिळवतो, बाईचे कठीण, असे सहजपणे म्हणताना आपण, निदान काही पुरुषांना तरी वेश्यागमन हा पर्याय वाटू शकत नाही हे लक्षात घ्यायला नको का? वैवािहक बलात्काराच्या बाबतीत पुरुषांच्या गरजेचाही विचार केला जायला हवा. श्यामला वरदाला कसलेच सुख देत नाही, उलट तो क्षुधित असण्यामुळेच त्याची नजर आपल्या घरात राहणाऱ्या दोन शिष्यांवर आहे, असा खोटा प्रचार करते. समाजाला तो खराही वाटतो. का? तसा संकेत आहे म्हणून? ‘अ‍ॅडम’ असे अनेक प्रश्न वाचकाला, समाजाला विचारते. आज त्यांची उत्तरे समाजाकडे नसतील, पण मूळ प्रश्नांकडे दुर्लक्ष , हा त्यावरचा उपाय नाही.

‘अ‍ॅडम ’ अधिक वाचकांपर्यंत पोहोचायला हवी होती, याचे शल्य माझ्यापेक्षा माझ्या वाचकांना अधिक बोचत असावे. कारण, माझ्या प्रत्येक जाहीर मुलाखतीत प्रेक्षकांमधून ‘अ‍ॅडम ’ विषयक प्रश्न येतात. कदाचित साहित्य दिशादर्शकांनी शिफारस न करता या कादंबरीचा शोध आपला आपल्यालाच लागला, याचे त्यांना अधिक अप्रूप वाटत असावे. नुकताच एका जाहीर मुलाखतीत मला मुलाखतकाराने प्रश्न केला – ‘अ‍ॅडम ’ विसरली गेली, याची खंत तुम्हाला वाटते का? मी म्हटले - अजिबात नाही. कारण आज, तिच्या प्रकाशनानंतर दोन दशकांनीदेखील हा प्रश्न विचारला जातोय, तर ती विसरली गेली, असं कसं म्हणायचं? मला खात्री आहे – ती नव्यानं वाचली जाणाऱ्यांची संख्या वाढतेय, ती इंग्रजीत रूपांतरित व्हावी, अशाही सूचना अनेकांकडून येताहेत. कधी ना कधी नव्या काळाप्रमाणे समीक्षेचे पारंपरिक संकेत मोडीत काढून तिचे नव्याने मूल्यमापन केलं जाईल, या विषयी मला बिलकूल शंका नाही!

- रत्नाकर मतकरी

------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

कादंबरीचे पहिले काही परिच्छेद :

कुण्डीमेल मच्चम ऊळणवन निरैय्य आसनंगळील उत्कारूवान अदेमादिरी सुन्निमेल मच्च्म उळ्ळ आण वेवेर पणूगेळे उपभोगुवान्..
आमच्याकडे एक म्हण आहे. तिचा अर्थ असा; की ज्याच्या ढुंगणावर तीळ असतो, तो पुरूष अनेक आसनांवर बसतो, आणि ज्याच्या लिंगावर तीळ असतो, तो अनेक स्त्रियांचा उपभोग घेऊ शकतो.

माझ्या ढुंगणावर तीळ आहे की नाही, हे पाठीमागे आरसा धरुन पाहण्याचा खटाटोप मी कधी केलेला नाही. मला नग्न पाहिलेल्यापैकी ही कोणी आजवर याचा उल्लेख केलेला नाही. अगदी लहानपणीसुद्धा अम्माला किंवा मोठ्या बहिणींना मी तसं काही म्हणताना ऐकलेलं नाही. पण ती म्हण खरी असेल; तर तो तिथे असायलाच हवा, इतक्या खुर्च्या म्हणजे इतक्या नोकऱ्या मी बदलल्या आहेत.
आणि ती म्हण खरी असणारच असं वाटतं. कारण तिचा उत्तरार्ध माझ्या बाबतीत शब्दश: खरा ठरलेला आहे.
पण अनेक स्त्रीयांशी संबंध येऊनही मला अजून कळलेलं नाहीये की, स्त्री आणि पुरुष यांचा संबंध नेमका असतो तरी काय?

खरं म्हणजे दोघांनाही निसर्गानं एकेक सुंदर शरीर दिलेलं आहे. एकमेकांच्यासाठीच त्याचा नीट उपयोग करुन स्वतः आनंदी व्हावं, आणि दुसऱ्यालाही आनंद द्यावा, यासाठी.
शरीर जन्मभरासाठी असतं - तेव्हा त्यापासून मिळणारा आनंदही जन्मभर मिळत राहायला हरकत नसावी... पण नाही. तो क्षणिक ठरतो जन्मभर टिकणारा ठरतो तो मात्र हक्क, अधिकार, अपमान, राग, कंटाळा, मनस्ताप किंवा शुद्ध आक्रोश !
याचं कारण काय असेल?

त्या शरीरातून आनंद घेणारं मन - ते तर शारीरिक सुखाच्या उत्कट आनंदाच्या क्षणानंतर बदलत नसेल ?

कला

प्रतिक्रिया

कानडाऊ योगेशु's picture

20 May 2020 - 1:56 pm | कानडाऊ योगेशु

अ‍ॅडम अजुन वाचली नाही पण जेव्हा प्रकाशित झाली होती तेव्हा काही मित्रांनी वाचली होती व ते गॉसिपिंग टोन मध्ये एकदा वाचुन पहा असे सांगत असत. पण ते वय तसे असल्याने असेल, त्याकाळच्या तरुण वर्गाने फक्त त्या कादंबरीत फ्कत हवे तेच पाहिले असेल. आता प्रौढावस्थेत आल्यानंतर वाचल्यानंतर काय वाटते ते पहावे लागेल.
परंतु वर मतकरींनी उल्लेख केल्याप्रमाणे अ‍ॅडम अचानक बहिष्कृत होण्यामागे काय कारण होते? काही तत्कालिक कारण होते का?

अर्धवटराव's picture

22 May 2020 - 12:48 am | अर्धवटराव

विजय तेंडुलकरांनी काहि किल्ली फिरवली असेल ???

चौथा कोनाडा's picture

22 May 2020 - 12:18 pm | चौथा कोनाडा

असू शकू शकते ! असं असलं तर डेंजरच म्हणायचं !
त्या वेळचे साहित्यिल क्षेत्रातले लोकच सांगू शकतील !
( काही वर्षांपुर्वी घरदार या मसिकाचे प्रकाशक्/मालक मिलिंद रत्नपारखी हे एका घरगुती समारंभात भेटले होते [ आता ते हयात नाही ] घवघवीत व्यावसायिक यश आणि लोकप्रियतेचे उच्चांक गाठणार्‍या घरदारच्या वाटचालीत कसे अडथळे निर्माण करण्यात आले, त्याची आर्थिक रसद कशी तोडण्यात आली परिणामी ते टप्प्याटप्प्यानं कसं बंद पडलं याची रसभरीत कहाणी सांगितली होती ! साहित्य-व्यवहाराशी फारसा संबध नसल्यामुळं मला बरीचशी नावं अनभिज्ञ होती. पण ती कहाणी ऐकून मी चक्राऊन गेलो होतो) हे आठवलं

कानडाऊ योगेशु's picture

23 May 2020 - 4:11 pm | कानडाऊ योगेशु

विजय तेंडुलकरांनी काहि किल्ली फिरवली असेल ???

सखाराम बाईंडर,घाशीराम कोतवाल, गिधाडे वगैरेंसारख्या नाटकातुन धाडशी विषय हाताळणार्या विजय तेंडुलकरांनी इथे काही केले असेल तर तो मोठी अपेक्षाभंग ठरेल तेंडुलकरांबाबत. पण हे ही खरे आहे कि अ‍ॅड्म्स बाबतची चर्चा त्यावेळी एकदम थांबली.(हे आता हा लेख वाचल्यावर लक्षात आले.)

कुमार१'s picture

20 May 2020 - 2:19 pm | कुमार१

समयोचित छान परिचय.

अ‍ॅडम संग्रही आहेच. कादंबरी तशी धाडसी आहे मात्र कदाचित तेव्हाच्या काळात ह्या कादंबरीत अशी वर्णने असल्यामुळे मतकरींनी कदाचित महाराष्ट्रीय पार्श्वभूमी वगळून दक्षिण भारतीय पार्श्वभूमीवर ही कादंबरी रंगवली असावी. अर्थात हा केवळ अंदाज. अर्थात त्याकाळी धाडसी कादंबऱ्या येतच नव्हत्या असंही नाही. हमोंची काळेशार पाणी हे सर्वात मोठं उदाहरण.

अनिंद्य's picture

20 May 2020 - 8:32 pm | अनिंद्य

ही कादंबरी वाचली नाहीये, पण वाचायला हवी. मतकरींची मुलाखत सटीप दिल्याबद्दल आभार.

मराठीतले काही साहित्य खरेच अन्य भाषांमधे विशेषत: इंग्रजीत यावे, असे हटके कथाविषय मोठ्या वाचकवर्गापर्यंत पोहचावेत असे वाटते.

वेबसिरीजच्या जमान्यात / दृकश्राव्य माध्यमात गाजेल.

चौथा कोनाडा's picture

26 May 2020 - 6:41 pm | चौथा कोनाडा

अश्या साहित्यकृती इंग्लिश मध्ये येणे काळाची गरज आहे. या संबंधी एखादी एकात्मिक संस्था / शासकीय यंत्रणा कार्यरत आहे की नाही माहीत नाही.

मंत्री, शासकीय संस्था यांचे मराठी भाषा, साहित्य याला खिजगणतीत न धरणे, योग्य ती आर्थिक तरतूद न करणे इ. हे चीड आणणारे आहे.

भाषांतर अधिकाधिक साहित्याचे व्हावे याबद्दल सहमती.

एखाद्या भाषेसाठी ‘शासन’ काय करू शकते याचा वस्तुपाठ तमिलनाडुने घालून दिला आहे. तिकडे मराठीच्या धोरणनियंत्यांचे लक्ष जावे ही प्रार्थना !

अर्धवटराव's picture

22 May 2020 - 12:47 am | अर्धवटराव

- ते तर शारीरिक सुखाच्या उत्कट आनंदाच्या क्षणानंतर बदलत नसेल ?

हा माणुस असलच काहितरी भन्नाट लिहायचा आणि एका वाक्यात बरच काहि सांगुन जायचा.