सुटकेस

जव्हेरगंज's picture
जव्हेरगंज in जनातलं, मनातलं
28 Apr 2020 - 4:21 pm

टपरीवर सिगारेट घेतली तेव्हा बॉसचे शब्द कानात घुमत होतो. आपण फक्त गाढवासारखे काम करतो. असे तो म्हणाला. 'आपण' म्हणजे त्यात तो ही आलाच की. सिगारेटचा कश घेत मी तो विचारच डोक्यातून काढून टाकला. विक्या म्हणतो खरं आहे. आपल्याला फक्त शिव्या खाण्याचे पैसे भेटतात. जो नम्रपणे ऐकून घेईल त्याची पगारवाढ नक्की.

सिगारेट संपवून मी गाडीला किक मारली. तेवढ्यात विक्याचा फोन आला.
"अरे ऐकना जगदीश, बॉसला घेतला होता मगाशी केबिनमध्ये"
"पुन्हा एकदा?"
"हो, बेकार ठासलीय त्याची... तिन्ही डायरेक्टरनी.."
"काय ग्रेट न्यूज आहे यार.. हाहा.."
"पण बॉस जाम भडलकलाय, ऊद्या आपल्या टीमचं काही खरं नाही.. जरा जपून.."
"ठिक आहे. बॉस गेला आता बाराच्या भावात.. आपण त्याला हाकलायचा प्लॅन करू... बाय.." म्हणत मी फोन ठेवला.

खरंतर खूप ऊशीर झाला होता आणि मी अजून ऑफिसच्याच पार्किंगमध्ये होतो. घरी जायला नऊ तरी वाजणार. बॅग अडकवली अन वेगात निघालो. हायवेला ट्रक परवडले पण कार नको. फार वेगाने ओव्हरटेक करतात. त्यात त्या SUV कार. बघताच भिती वाटते त्यांची. फडफडणाऱ्या वाऱ्यात आल्हाददायक वाटत होते. चमचमणारे दिवे नेत्रदीपक होते. बॉसला हाकलणे खूप सोपे आहे. त्याच्या मंथली रिपोर्ट मध्ये छोटीशीच पण महत्त्वाची गडबड करायची. मग एमडी त्याची ईमेलमध्येच जोरदार ठासतो. सीसीमध्ये आख्खं ऑफिस. हाहाहा . मला राक्षसी हसू फुटले. तेवढ्यात एक भलीमोठी टोयोटा SUV कार बाईकला येवढी खेटून गेली की धडकीच भरली.
"अबे च्युत्या.." वाटलं त्याला धरून बडवावं. ब्रेक मारून गाडी साईडला उभी केली. छाती धडधडत होती. साले माजलेत फार.
रात्री किर्रर अंधारात गाड्या ये जा करत होत्या. तश्या फारश्या नव्हत्या. पण वेगात असल्याने जास्त वाटत होत्या. आता थांबल्यावर असे वाटत होते जसं काय रस्ता ओस पडलाय.
मी पुन्हा गाडीला किक मारली आणि कडेकडेने हळूहळू निघालो. मध्येच एक उतार आहे आणि तीक्ष्ण वळण आहे. इथून जाताना मी नेहमी वेग कमी करतो. झुडपात मला अचानक काहितरी चमकल्यासारखे दिसले एकदम क्लिक झाले. ती मघाची SUV कार. हो तीच. टोयोटा. लाल रंगाची.

मी गाडी पटकन साईडला घेतली. आणि धावतच झुडुपाकडे गेलो. त्या वळणावर एक ओढा होता. आणि प्रचंड झाडी. काहिही दिसेना. मोबाईलचा टॉर्च लावून कसाबसा खाली उतरलो. बरेच निसरडे गवत जागोजागी होते. पाय घसरायची भिती. पाण्याचा खळखळ आवाज यायला लागला तसा मी पुढे सरसावलो. गाडी पुलाचे कठडे तोडून खाली तोंडावर आदळली होती. पुढच्या काचेचा पुर्ण भुगा झाला होता. समोरचे उजवे चाक जवळजवळ बाहेर निखळून पडले होते. आतमध्ये एकजण कपाळावर भलीमोठी खोक घेऊन ड्रायव्हर सीटवर निपचीत पडला होता. बहुतेक स्टेअरींग वर तो जोरदार आपटला असणार.
"हेल्लो... तुम्हाला हालचाल करता येतेय का..?" त्याच्या तोंडावर टॉर्च मारत मी म्हणालो. पण काहीच उत्तर नाही. त्याच्या कपाळावरची खोक भयावह दिसत होती. आणि त्यातून भडक रक्ताचे ओखळ खाली निथळत होते. त्याच्या डाव्या हातात मोबाईल होता. साला यामुळेच गाडीवरचे त्याचे नियंत्रण सुटले असावे. मघाशी माझ्या बाईकला याने छोटाशी जरी धडक दिली असती तर मी ही असाच कुठेतरी बाराच्या भावात गेलो असलो. अशावेळीही त्याला एक सणसणीत शिवी हासडावीशी वाटली. हरामी साला. विचारात असताना बाजूच्या शिटवर एक सुटकेस दिसली. आणि एक लालची मन जागे झाले. तसाही हा आता मेलाच आहे. सुटकेस मध्ये काहीना काही असणारंच. बोनेटवर चढून मी चुरा झालेल्या काचेच्या आत हात घातला आणि बऱ्याच महतप्रयासाने सुकटेस कशीबशी बाहेर काढली. आणि अचानक कोणीतरी खोकण्याचा आवाज आला आणि नाही म्हटलं तरी टरकलोच. हा साला अजून जिवंत होता. घश्यातल्या घशात पुटपुटत त्याने एक हात पुढे केला. त्याला जागचे हलताही येईना. आतमध्ये त्याचं बरंच काही तुटलं असावं. क्षणभर मी नुसता अवाक होऊन बघतंच राहिलो.
"सॉरी मित्रा..." कदाचित मी गोंधळलो होतो. पुढे काहीच न बोलता शांत उभा राहिलो. मग उगाचच एक हलकं स्मित करत सुकटेस हातात घेऊन सावकाश वरती आलो. हायवेला वाहनांची ये जा सुरूच होती. पण ओढ्यात पडलेली ही कार दिसण्याची शक्यता कमीच. मी गाडीला किक मारली आणि सुटकेस दोन्ही मांड्यांच्या मध्ये घेऊन भरधाव निघालो. बाईकच्या मिरर मध्ये कोणी आपला पाठलाग तर करत नाहीयेना हे पाहिलं.
रात्रीच्या नऊ वाजता सोटायटीच्या आवारात वर्दळ तशी फारशी नव्हती. बाईक पार्किंगला लावली आणि जिन्यापाशी नेहमी बसत असलेल्या मोठाल्या कुत्र्याला चुचकारले. हे कुत्रे कोणी ओळखीचे दिसले की जोराजोरात भुंकते. तेही आनंदाने. आणि अनोळखी माणसाला साधं हुंगतही नाही. हे विचित्रच आहे. पण आजपर्यंत कुणाला चावल्याचं अजिबात ऐकिवात नाही. मी त्याच्या गळ्यात हात फिरवला पण त्याने रस दाखवला नाही. तशी माझी त्याची अजून चांगली ओळख व्हायची बाकी आहे.

जिन्याने चढत तिसऱ्या मजल्यावर माझ्या फ्लॅटमध्ये आलो. बायकोने सुटकेसकडे बोट दाखवत पहिला प्रश्न विचारला, "हे काय आणले?"
"ऑफिसचे साहित्य आहे. हात लावू नको.." तशी ती माझ्या कामात कधी लुडबूड करत नाही. पण सांगितलेले बरे. सुटकेस कपाटात ठेवून लॉक केले. आणि मस्त फ्रेश झालो. चिऊ झोपली होती. नेहमीच झोपते. मी यायच्या आधीच. मग जरावेळ टिव्ही बघितली.
"कुठे चिखलात गेलतास? सगळ्या घरात चिखल.." बायको शूजकडे पाहात म्हणाली. मी थोडा भांबावलोच.
"ते ऑफिस जवळ एक डबकं आहे. चुकून तिथे पाय पडला.." एरव्ही मी अजिबात काही उत्तर दिले नसते. पण यावेळी दिले. बायकोनेही एवढं स्पष्ट उत्तर ऐकून चेहरा आश्चर्यचकीत केला. मला विनाकारण हसू आले.
"खरंच, खोटं बोलतोय मी?"
मग तिने तो विषयंच सोडून दिला. मला खोटं पाडणं फार अवघड आहे हे तिला कधीचंच कळून चुकलंय.

मग जेवणे झाली. मी बिछान्यावर आडवा पडलो. पण झोपंच येईना. बराच वेळ मोबाईलमध्ये निरर्थक टाईमपास करत बसलो. विक्याने एक व्हाटसआप पाठवले. त्यात बॉस कसा नालायक असतो. आणि जितका बॉस नालायक तितका तो आपल्यासाठी चांगला असा त्याच्या मतितार्थ होता. नालायक बॉसचा फायदा घेणे फार सोपे असते असे त्याचे एकंदरीत मत. जे आता सरावाने मी ही शिकायचे ठरवले होते.
रात्री एक वाजता उठलो. बायको गाढ झोपली होती. मग हळूच कपाटातली सुटकेस बाहेर काढली. आणि हॉलमध्ये येऊन बसलो. पण ती सुटकेस काही केल्या उघडेचना. अर्धातास निरर्थक धडपड. मग एक खिळा घेतला. आणि चावीच्या भागात ठोकत राहिलो. नाही म्हटलं तरी आवाज व्हायला लागला. मग उठून एकदोनदा बायको उठलीतर नाही ना चेक केले.
शेवटी खिळा पार आरपार घुसला आणि कट्ट असा आवाज आला. सुटकेस उघडली होती. पैसे असतील असे जरूर वाटले होते. पण इतके? खचाखच भरलेली नोटांची बंडले पाहून मला सिनेमातल्या कित्येक प्रसंगांची आठवण झाली. दोन हजारांच्या करकरीत नोटा. मोजताही येणार नाहीत इतक्या तुफान.

इतकं मोठ्ठं घबाड हाती लागेल याचा कधी आयुष्यात विचारच केला नव्हता. आता प्रचंड थंड डोक्याने पुढचे प्लॅनिंग करावे लागणार. सुटकेस बंद करून कपाटात लॉक केली. आणि गॅलरीत जाऊन ऊभा राहिलो. इक्साईटमेंट एवढी होती मला काय करावे ते सुचेना. मग बेडरूममध्ये येऊन झोपलो. फुल बासमध्ये हेडफोन लावून गाणी ऐकली. पण डोक्यातून तो टोयोटोवाला जायला तयार नव्हता. समजा तो मेलाच नाही तर? आणि अजूनही तिथे जिवंतंच तडफडत असेल तर?

मध्यानरात्र ऊलटून गेली होती.
मी हळूच बेडरूममधून उठलो. कपडे घालून दरवाजा ऊघडला. आवाज न करता जिन्याने खाली आलो. आणि बाईकला किक मारून वळणावरच्या त्या ओढ्याकडे निघालो.

क्रमशः

कथाप्रतिभा

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

28 Apr 2020 - 4:39 pm | प्रचेतस

क ड क

पुढचा भाग लवकर येऊ द्यात, सुरुवातच जबरदस्त आहे.

झक्कास सुरवात झालीये!!!

चांदणे संदीप's picture

28 Apr 2020 - 5:04 pm | चांदणे संदीप

जबरा.

पुभाप्र!

सं - दी - प

तुषार काळभोर's picture

28 Apr 2020 - 5:24 pm | तुषार काळभोर

लॉक डाऊन ची डेली वेबसीरिज होऊ द्या... रोज एक...

योगी९००'s picture

28 Apr 2020 - 7:56 pm | योगी९००

मस्त सुरूवात आहे...

ह्याच विषयावर धनंजय का नवल मध्ये एक गोष्ट वाचलेली आठवते. काही दिवसांपुर्वी छप्पर फाड के नावाचा चित्रपट बघितला होता. तो पण असाच होता. एका फॅमिलीला रस्त्यातील अ‍ॅक्सिडेंट नंतर सुटकेस मिळते वगैरे...

राजाभाउ's picture

30 Apr 2020 - 5:24 pm | राजाभाउ

no country for old men ???

चौथा कोनाडा's picture

8 May 2020 - 12:01 pm | चौथा कोनाडा

बाबौ, कसलं खतरनाक, जव्हेर भाऊ ! थरारक लिहिलंय !
शेवट वाचून उत्सुकता ज्याम चाळवलीय !

छान उत्कंठावर्धक सुरुवात!