पुणे ते कन्याकुमारी (सायकल सायकल) - पुणे ते कराड
पुणे ते कन्याकुमारी (सायकल सायकल) - २: कराड ते निपाणी
17 डिसेंबर 2018 सोमवार
मला असे कधी वाटले नव्हते की आपण खरेच पुणे कन्याकुमारी सायकल प्रवास करू, बरेच महिने, दिवस चर्चा चालली होती आणि आम्ही चौघे खरोखरच प्रवासाला निघालो होतो, प्रवासाचा तिसरा दिवस सुरू झाला होता.
काल रात्री पूजा हॉटेलला मस्त आणि चविष्ठ जेवण झाले आणि हॉटेल सूर्याला छान झोप झाली . रात्री हॉटेल मुक्कामाचे पैसे द्यायला गेलो होतो, तर तिथला मॅनेजर म्हणाला मालकांनी सांगितले आहे, कोल्हापूरचे सायकलवाले आले आहेत, त्यांच्याकडून पैसे घेऊ नको. आम्ही त्यांना पैसे घ्यायचा आग्रह केला, पण तो नाही म्हणत होता, कारण विचारले तर म्हणाला तुम्हांला मालकांच्या मित्रांनी पाठवले आहेत म्हणून पैसे नको. मग माझ्या लक्षात आले की कोल्हापूरचे माझे मित्र doctor प्रदीप पाटील यांनी हॉटेल मालकाला फोन करून आमची व्यवस्था करायला सांगितली आहे. शेवटी आम्ही पण ठीक आहे म्हणून रूमवर जाऊन झोपलो.
सकाळी उठून पहिल्यांदा हॉटेल मालकांना फोन केला आणि त्यांना धन्यवाद दिले. त्यांनी सुद्धा अगदी प्रेमाने विचारले सर्व व्यवस्था कशी काय झाली , जेवण खान राहण्याची सोय व्यवस्था आवडली का ? वगैरे अजून काही मदत लागली तर सांगा, वाटेत कुठे काही हवे तर कळवा अशा पद्धतीने त्यांनी आम्हाला निरोप दिला.
त्यानंतर डॉक्टर प्रदीप यांना फोन केला आणि काल रात्रीच्या वृत्तान्त सांगितला. त्यांनीसुद्धा सर्व चौकशी केली आणि पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.
(डावी कडुन : पीटर - शैलेश, गुरुजी - किरण, सरपंच - प्रशांत, आबा - संग्राम)
प्रथेप्रमाणे हॉटेलच्या बाहेर फोटोसेशन झाले.
आमचे फोटोसेशन सुरु असताना सकाळी शाळेला जाणारी मुले दिसत होती. काहीजण सायकलवर तर काहीजण पायी चालत निघाले होते.
सर्वजण थांबून चौकशी करत होते, कुठून आला ? कुठे जाणार ? आणि सायकली बद्दल एकूणच त्यांच्या चेहर्यावर उस्तुकता जाणवत होती.
मुलांकडे कावेरी हॉटेल ची चौकशी केली, त्यापैकी एक दोघांनी सांगितले तीन किलोमीटरवर आहे. माझ्या अंदाजानुसार सुद्धा तीन-चार किलोमीटर वरच असावे असे सांगितले. कावेरीला नाश्ता करू आणि तवंदी घाट चढू असे ठरले.
तवंदी घाटा बद्दल बरेच ऐकले होते, आधी एक-दोन वेळी तिथून प्रवास केला होता, पण तो रात्री आणि गाडीतुन केल्यामुळे काही अंदाज नव्हता, किती चढ आहे? किती लांब आहे? आणि इतर बरेच प्रश्न जे की गाडीतून जाताना कधीच पडत नाहीत. पण सायकल वर जाताना या सर्व गोष्टी आपोआप सुचतात.
तवंदी बद्दल आधी सायकल प्रवास केलेल्या कार्यकर्त्यांकडून बरंच काही ऐकलं होतं की खूप अवघड आहे. जीव निघतो, खूप जास्त त्रास होतो, या सगळ्या गोष्टी डोक्यात ठेवून , आमचा प्रवास सुरू झाला.
रात्री पुरेशी झोप आणि व्यवस्थित जेवण झाल्यामुळे आम्ही चौघेही फ्रेश होतो. लगेच नाश्त्याला थांबण्यापेक्षा कावेरीला ब्रेक घ्यायचा असं डोक्यात ठेवून प्रवास सुरू होता. सकाळची थंड हवा , आजुबाजुची घरं , मस्त चकचकीत रस्ता बघत बघत सायकल प्रवासाचा आनंद घेत चाललो होतो आणि अचानक उजव्या बाजूला कावेरी हॉटेल दिसले. आणि नंतर लक्षात आले की अरे आपण तवंदी घाट चढून आलोय. ज्याच्याबद्दल पब्लिकने लई हवा केलेली त्या प्रमाणात काहीच अवघड वाटला नाही, त्याच्या पेक्षा आपला खंबाटकी भारी आहे. खंबाटकी छोटा आहे पण ईलेवेशन खूप जास्त आहे, तवंदी त्यामानाने किरकोळ वाटला.
हॉटेल कावेरीला पोचल्यावर मस्त गरम गरम कॉफी,उपमा,डोसा असा भरपेट नाष्टा झाला आणि गप्पा गोष्टी सुरु झाल्या. मामांनी डीसी केली तेव्हा कावेरीला ब्रेक घेतला होता, त्यावेळच्या गमती-जमती आणि कुणी काय काय केलं यावर चर्चा झाली. तोवर पीटर आणि गुरुजींची फोटोग्राफी सुरू होती.
भरपूर वेळ ब्रेक झाल्या नंतर आम्ही परत सायकलीवर टांग टाकली . थोडे अंतर पुढे गेलो तर मला मागून हाक मारण्याचा आवाज आला, मी थांबून बघतोय तर एक सायकलस्वार जवळ येऊन थांबला , ते दोघेजण पिंपरी-गोवा प्रवासाला निघाले होते. इतक्यात सरपंच आमच्या जवळ पोहोचले आणि ते त्यांच्या ओळखीतले निघाले. फोटोसेशन, थोडी विचारपूस करून आम्ही परत प्रवास सुरू केला.
आमच्या चौघांचा ही स्पीड जवळपास सारखाच असल्यामुळे प्रवास एकदम सुरळीत सुरू होता. कोणीही जास्त पुढे गेलाय, एकजण मागेच थांबला असा प्रकार नव्हता. पाच मिनिटांच्या अंतरावर किंवा दोघे दोघे पुढेमागे असे मस्त लयी मध्ये सायकल चालवणे सुरू होते.
आजच्या दिवसातला दुसरा घाट,वंटमुरी घाट समोर आल्यावर, आम्ही हायड्रेशन ब्रेक घ्यायचा ठरवला. तिथेच एक नारळ पाणीवाला दिसला आणि आमचा मोर्चा तिकडे वळवला. प्रत्येकी दोन दोन नारळ, एक पाणीवाला आणि एक मलईवाला असा मस्त ब्रेक झाला. नेहमीप्रमाणे फोटोसेशन , आणि मस्त गप्पा रंगल्या.
एकंदरच कर्नाटकातले रस्ते मस्त चकचकीत आणि गाडी किंवा सायकल चालवण्याचा आनंद देण्या सारखेच आहेत. मेनरोडला लागून व्यवस्थित सर्विस रोड, गाडी बस थांबविण्यासाठी साईडला शेड, व्यवस्थित साईन बोर्ड, अपघात प्रवण क्षेत्रच्या सूचना आणि रस्ता दुभाजकामधली झाडे प्रमाणात कापलेली आहेत.
उन्हाचा तडाखा जसा वाढू लागला तसा पाण्याचा वापर वाढला. मी एका शेडमध्ये जाऊन ब्रेक घेतला होता, तोपर्यंत बाकीचे साथीदार पण येऊन पोहोचले. सर्वांनी पाणी भरपूर प्रमाणात घ्या असा ठराव झाला.
BRMच्या सवयी नुसार जरा ब्रेक मिळाला की मी लगेचच एक पॉवरनैप घ्यायचो. मी एक छोटीशी डुलकी काढली , तोपर्यंत सरपंचांची फोटोग्राफी सुरू होती.
पीटर , गुर्जी आणि सरपंच एखादा ब्रेक मिळाला की फोटो चेक कर, फोन ,व्हाट्सअप चेक कर, अपडेट्स पाठवा , मेसेजला रिप्लाय करा या गोष्टी करायचे पण मी एक पॉवरनैप घ्यायचो. व्यवस्थित एक रिफ्रेशिंग ब्रेक झाल्यावर आम्ही परत पुढे निघालो.
दुपारच्या जेवणाला बेळगावात एखादे चांगले हॉटेल बघू या हेतूने आम्ही चाललो होतो, तर तिकडे भरपूर पोलिस बंदोबस्त दिसला. नंतर समजले की कर्नाटक राज्य सरकारचे विधानसभा अधिवेशन बेळगावातील विधानसौध येथे सुरू आहे. पोलिसांच्या सोबत गप्पा आणि त्यांच्या चौकशीला उत्तर देत असतानाच आतून गाड्यांचा ताफा बाहेर पडला. आणि सर्व पोलिस फटाफट सॅल्यूट करू लागले. पाच एक मिनिटात सर्व गाड्या गेल्यावर, त्या पोलीसमामांनी सांगितले की येडियुरप्पांची गाडी होती.
राजकीयदृष्ट्या बेळगाव जरी कर्नाटकात असले तरी अजून पर्यंत लोक मराठी बोलणारीच भेटत होते. त्यांनीच जवळचे एक हॉटेल सुचवले, तिकडे जाऊन व्हेज थाळी घेतली आणि दुपारचा ब्रेक झाला.
रस्त्यावरील पोलिस बंदोबस्त आणि एकूणच सर्व जण उत्सुकतेने बघायचे. थोडावेळ विश्रांती घेऊन आम्ही परत बाहेर पडलो.
आमच्या ठरलेल्या प्लॅनप्रमाणे मुक्काम धारवाडला करायचा असा विचार होता, पण नंतर असं लक्षात आलं की धारवाडी मुक्कामाला जायचं तर जवळपास वीस किलोमीटर आत गावात जावं लागेल आणि परत सकाळी 20 किलोमीटर बाहेर मेन रोडला यायला लागतील.
त्यापेक्षा हायवेटच एखादं हॉटेल बघू आणि मुक्काम करू असा निर्णय घेण्यात आला.
प्रवासात खात्रीशीर आणि व्यवस्थित माहिती मिळवण्याचे साधन म्हणजे पोलीस, रिक्षावाले आणि स्थानिक नागरिक. आम्ही चौकशी करत चाललो होतो, तेव्हा एक रिक्षावाले मामा भेटले. त्यांच्याकडे चौकशी केली, तेव्हा त्यांनी सांगितले की कित्तुर जवळ एक नवीनच हॉटेल सुरू झाले आहे. तुमची तिकडे सोय होऊ शकते. पण त्यांच्याकडे हॉटेलचे नाव, फोन नंबर काहीच नव्हते.
काही का असेना हायवेला हॉटेल आहे ही गोष्ट पण आमच्यासाठी पुरेशी होती, रमतगमत फोटो काढत.
आम्ही कित्तूरला पोहोचलो. पराक्रमी राणी चन्नम्मा यांच्यामुळे कित्तुर प्रसिद्ध आहे. तिकडे पोहोचेपर्यंत संध्याकाळचे सहा साडेसहा झाले होते. कित्तूर गाव लहान असल्यामुळे फारशी वर्दळ नव्हती . एक चहा टपरी सुरू होती , तिकडे जाऊन चौकशी केली आणि हॉटेल बद्दल माहिती घेतली.
तिथेच थांबून हॉटेल गजराजला फोन केला. त्यांच्याकडे रूमची चौकशी केली, तिथे दोन रूम उपलब्ध होत्या. आम्ही येत आहोत हे सांगितले आणि एकेक कॉफी घेऊन दिवसभरातील गोष्टी करत बसलो.
इतक्यात डुक्कर ओरडण्याचा आवाज आणि लोकांची पळापळ दिसली. मी आणि पीटर जाऊन बघून आलो तर तिथले एका समुदायाचे लोक डुक्कर पकडायचा कार्यक्रम करत होते.
कित्तूर बद्दल अधिक माहिती वाचत असताना समजले की इथे राणी चन्नम्मा यांचा पुतळा आणि किल्ला आहे.
ते समजल्यावर पीटरचा आग्रह झाला, किल्ला बघायचाच. पण तो संध्याकाळी सात वाजता बंद झाल्यामुळे, उद्या सकाळी बघू असं ठरवून आम्ही हॉटेल गजराजला पोहोचलो. ते नवीनच सुरू झालेले असल्यामुळे सर्व सोयीसुविधा छान होत्या, बाथरूम, बेड एकदम स्वच्छ आणि फ्रेश होते.
मस्तपैकी आंघोळी करून, दोन दिवसाचे कपडे धुऊन टाकले. सर्वजण आवरून आल्यावर त्याच हॉटेलच्या डायनिंगला गेलो. छान जेवण झाले , पान खाऊन येतानाच लॉबीमध्ये दोन सायकलिस्ट भेटले ते दोघे पुणे तिरुपती प्रवासाला चालले होते. त्यांच्याशी ओळखपाळख झाल्यावर थोड्या गप्पा-टप्पा झाल्या आणि आम्ही रूमवर येऊन झोपलो. थोडी फार थंडी जाणवत होती पण दिवसभरच्या प्रवासाने कधी झोप लागली ते समजलेच नाही.
प्रतिक्रिया
17 Apr 2020 - 2:57 pm | प्रशांत
लॉकडाऊन चा फायदा घेत मस्त लिहुलयं...
सविस्तर प्रतिसाद देईल नंतर. (लॉकडाऊन संपायच्या आतच)
17 Apr 2020 - 3:16 pm | Nitin Palkar
खूपच छान, ओघवते लेखन. पु भा प्र.
17 Apr 2020 - 3:39 pm | किरण कुमार
अखेर मुहूर्त मिळाला पुढचा भाग लिहायला , छान पुन्हा आठवणी ताज्या झाल्या ...
वंटमुरी घाटाच्या आधी ब्रेक अतिशय गरजेचा होता हे घाट चढताना जाणवले , एकतर टळटळीत उन आणि सरळसरळ घाट ( वळणाच्या घाटात किती अंतर राहिले ते कळत नाही आणि आपण सायकल चालवत राहतो तसे इथे नव्हते) थोडा कंटाळवाणा वाटतो , रस्ता मोठा असल्याने सायकलसाठी सुरक्षित आहे पण आजूबाजूला अजीबात झाडे नाहीत त्यामुळे उन्हाच्या झळा तीव्र जाणवतात .
पुलेशू ....
17 Apr 2020 - 10:12 pm | प्रशांत
आबां ने परत गंडवल--
सकाळी आवरुन बाहेर पडलो, फोटो काढुन झाल्यावर नेहमीचा प्रश्न नाश्ता कुठे करायचा. यावर आबाने लगेच उत्तर दिल कि येथुन ३/४ किलो मिटर वर कावेरी हॉटेल (सर्वांना नाव माहिती होतं) आहे तिथेच नाश्ता करु इथली कॉफि मामांना फार आवडली होती.
मग काय मामाचे नाव घेतल आणि पायडलिंग सुरु केलं (मामांचे नाव घेतले कि हेडविंड चा त्रास होत नाहि आणि घाट पण छोटे चढ वाटतात)
जवळ थोडच पाणी होतं, नाश्ता केल्यावर पाणी भरुन घेऊ अस ठरलं. हवेत मस्त गारवा होता त्यामुळे सायकल चालवायचा हुरुप येत होता. अर्धा तास सायकलिंग करुन सुद्धा कावेरी हॉटेल दिसत नव्हत, चेष्टने गुरुजी ला विचारलं कि खरंच ३/४ किमि अंतर आहे का? गुरुजींनी मान हलवत हो (कदाचित) म्हटल. आरामात पायडल मारत होतो तेव्हा चिंचवड मधिल दोन सायकलस्वार भेटले ते पुणे - गोवा तिन दिवसांत करणार होते. दोगेही ओळखितले निघाले पायडलिंग करत-करत गप्पा मारत-मारत चढ चढत होतो. त्यांना सांगितल आधी नाश्ता नंतर तवंदी असा आमचा प्लन आहे, तेवढ्यात उजवीकडे कावेरी हॉटेल दिसलं त्यामुळे दोघांना शुभेच्छा देवुन निरोप घेतला.
तेवढयात गुरूजी आले. फार मस्त चढ होता मज्जा आली सायकलिंग करतांना अशा आमच्या गप्पा सुरु होत्या, चला नाश्ता करुन लवकर निघुया म्हणजे तवंदी उन्हाच्या आधि चढता येइल. तेवढ्यात आबा बोलला अरे हाच तर तवंदी आहे चला भुख लागली. गुरुजी आणि मी एकमेकाकडे बघुन हसलो. कालच्या प्रमाणे आबाने आज आबाने गंडवल होत.
पहिल्या दिवशी कात्रज आणि खंबाटकि करुन १४० किमिची राईड करुन काहि त्रास झाला नव्हता आणि के डि (हो शेफ के डी - आयोजक) यांनी सांगितले होते कि खंबटकि, तवंदि नंतर उतारच आहे. (याचा बदला गुरुजिंनी मागच्या वर्षी घेतला - लेख येइलच त्यावर). यामुळे मी आज किति चढ उतार लागतिल हे बघितलच नव्हत. ( तसहि बघुन काय फरक पडला असता :) )
रस्त्यात अजुन एक घाट (वंटमुरी) आहे हे मला माहितच नव्हत नारळपाणी ब्रेक घेतला म्हणुन बर झालं नाहितर वाट लागली असती कारण ऊन चांगलच जानवत होतं.
बाकि कर्नाटक मधले रस्त्त्यावर सायकलिंग करण्यात काहि त्रास झाला नाहि. रुंद रस्ते आणि रस्त्याची अवस्था पण चांगली होती. विशेष सागण्यासारखे म्हणजे डिव्हायडर वर लावलेले सुचना फलक.

18 Apr 2020 - 1:36 pm | चौथा कोनाडा
हा ही भाग भारी !
सायकल सफर रोचक बनत चाललीय.
आता प्रतिक्षा कित्तूरच्या किल्ल्याची !
पुभाप्र
18 Apr 2020 - 6:51 pm | प्रचेतस
दरवर्षी एक धागा-एक दिवस.
१०/१२ दिवस तरी असतील, १०/१२ वर्ष आयुष्य मिळालं तर कन्याकुमारीपर्यंत पोहोचता येईल. तितकं आयुष्य दे रे बाबा.
बाकी लेख मस्त, तपशीलवार आणि उत्तम वर्णन
18 Apr 2020 - 8:23 pm | चौथा कोनाडा
हा .... हा ..... हा ....
+१