भाग ५ प्रतापगडाची उलटवलेली बाजी - सुस्त अजगरनीती

Primary tabs

शशिकांत ओक's picture
शशिकांत ओक in काथ्याकूट
17 Mar 2020 - 1:33 pm
गाभा: 

सुस्त अजगरनीती

भाग ५

शान आणि वैभवाचे प्रतीक, वेळोवेळी बोजड सामान घेऊन जाणार्‍या हत्तींनी पावसाळ्याचा मौसम, नदीच्या पाण्यात डुंबायचा मस्तीचा शौख़ पुरा करून घेत होते. हत्तिणींशी संग करायला हत्ती चेकाळत होते. त्यांना लांब ठेवायला माहूतांची तारांबळ होत होती. उंटांचे तांडे, गाई - बैल पावसाळ्यात आडोशाने रवंथ करत संथ होते. जंगली जनावरे फेकलेले उष्टे अन्न खायच्या नादाने तळाजवळ सारखे भिरभिरत असत. त्यांना मारून पुलाव्यात त्यांचे शिजलेले तुकडे घालून खायला अनेकांची मेजवानी होई.
नालबंद कारागीर घोड्याच्या खुरांना नवे नाल मारून आपली कमाई करत होते. लोहारांच्या भट्ट्यात भर पावसात पेटवल्या जाऊन नवे नाल, खिळे बनत राहिले. मुस्लिम सरदारांच्या दाढ्यांना आकर्षण रंगीत करून मिशा साफ करणे यावर नाई लोकांना उसंत मिळेना! तलवारींच्या ढिल्या मुठी, बाजूबंद दुरुस्त करून घेणे, आपापल्या शस्त्रांना धार लावायला नोकर वर्गांना जारीने कामाला लावले गेले. मराठ्यांच्या चपळ आणि जंगलातून साहसी कारवाया करणाऱ्या सैनिकांना शह देण्यासाठी सुस्त, बेशिस्त, घनदाट अरण्यात गांगरुन जाणाऱ्या कुचकामी नोकरांना, सरदारांच्या जनान्याला वाईच्या तळावर मागे ठेवून दिले गेले.
कृष्णाजी भास्कर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी वाटाघाटीत सिवाला गुंतवून डोंगराळ जंगलातून कुठवर बाहेर काढता येईल यावर वरचे वर खल होत राहिले.
सरदारांच्या मते यापुढे तीव्र खडे चढ - उतार, जंगलातून, जायला लागेल. ते जाता येईल पण तिथे लढाईची वेळ आली तर आपल्या सैनिकांना एकत्र ठेवणे शक्य होणार नाही. घनदाट जंगलात बिना वाट्ड्यांच्या, वाट चुकलेल्या सैन्याला आपल्या सरदारांच्या पुढच्या आज्ञा काय आहेत हे कळले नाही तर ते आपला जीव वाचवायला पळापळ करतील. एवढा केलेला आाटापिटा वाया जाईल. म्हणून खानाने कुठल्याही परिस्थितीत जंगलात शिरायची अट मानली नाही पाहिजे. सिवाकडून आलेल्या वकिलाची लाचारी खानाच्या शरीरयष्टीकडे पाहून वाढली. 'कुठे धिप्पाड तुम्ही! कुठे ते सिवा! असे सारखे म्हटलेले ऐकून ते वरवर खानाला खूष करत आहेत हे बाकीच्या सरदारांना कळत होते. अशाने भरीला पडून खान आपण ठरवलेल्या अटीत का माघार घेतो याचे आश्चर्य व चीड वाटत होती.

अफ़झलखानाला अशा सरदारांना नाराज होताना पाहून त्यांची काळजी वाटत होती. भयंकर जंगलातील ओळखायला न येणारे रस्ते, वाटा, उंच उभ्या चढणीचे सुळके आपल्याकडील सराव नसलेल्या सैनिकांना चढायला फार कष्ट पडतील हे तो जाणून होता. पण त्याच्या मनात दुसरे आडाखे होते. आता सिवा तर काय आपल्या तावडीतून सुटणार नाही. त्यानंतर या कोकण वाटेने त्याला आपल्या सेनेला बरोबर घेऊन समुद्रकिनाऱ्यावरील भागात जायचे आहेच.
सरदार पण नाराज होणार नाहीत आणि पुढील नियोजनासाठी उपयोगी पडतील असे जंगलात फिरणारे, वाटाडे म्हणून कामाला येणारे, कुठल्याही अवघड वाटेतून लीलया पार करणारे प्रवीण काटक स्थानिक तरुणांना त्याने धडाधड भरती करायला सुरवात केली. जंगलात शिकारीला वापरायचे आपले तिरकमठे, भाले, गोफणी, दोरशिड्या, आदि साधने घेऊन आसपासच्या खेड्यातील तरूण नव्या नोकरीत संधी शोधत होते. अवजड सामान उचलायची कामे करायला अनेक लहान मोठे लोक लगेच तयार झाले. जावळीतील खडानखडा माहिती असलेले वाटाडे, चपळाईने चढउतार करायला सरावलेले तरूण भरती केलेले पाहून नाराज सरदारांना खानाच्या सेनापती पदाचा विश्वास वाढला.

सिवाच्या विरूद्ध लढायला आपल्या बाजूने सध्या तयार असलेल्या सरदारांची ते आपल्या बाजूने लढतील अशी शाश्वती नव्हती! मंबाजी भोसला सहाजीचा चुलत काका आपल्याकडे तर चुलत भाई बाबा भोसला सिवा कडे! गुंजण मावळचा शिळीमकर अर्धा आपल्याकडून तर त्याचे काही किल्लेदार सिवाकडे! म्हसवडचा रतनजी माने, मलवडीचा मालजी पांढरे, ढोणे, जाधवराव दौलताबादकर वगैरे मंडळी राग रंग पाहून केंव्हाही आपली पगडी फिरवून आपल्याला पेचात पाडतील अशी त्याला शंका होती! वाटाघाटींच्या बातम्या यांच्या मार्फत सिवाकडे जायची शक्यता जाणून वाटाघाटींच्या सभेच्या जागी त्यांना यायची बंदी केली. यावर आणखी उपाय म्हणून त्याने सिवाच्या मुलुखातील सुप्यावर कल्याणजी जाधवाला, शिरवळकडे नाईक पांढरे याला, सासवडवर नाईकजी खराडे या मुख्य सरदारांना आपल्या पठाण सरदारांच्या अखत्यारीत पावसाळ्याचा जोर कमी झाल्यावर सप्टेंबरमधे मोहिमेवर धाडले. सिद्दी हिलाल हा मराठ्यांच्या घरी गुलाम म्हणून वाढलेला असल्याने त्यालाही खानाने हवेली पुणे मावळात धाडले. जंजिऱ्याच्या सिद्दी सैफखानाला कळवून तळकोकणात किल्ल्यावर शिबंदी वाढवायच्या कामगिरीवर पाठवले. अशा तऱ्हेने खानाने नको त्या सरदारांना बाजूला केले आणि हव्या त्या सरदारांचा विश्वास संपादन केला. खानाच्या युद्ध पूर्व आखणीची, चातुर्यपूर्ण चालींची माहिती आपल्या सरदारांमार्फत पूर्ण तळभर पसरवून त्याने आपला दबदबा वाढवला. अलि आदिलशहाच्या दरबारी आपल्या कामगिरीची माहिती सोबतच्या सरदारांकरवी पत्रातून कळवत राहून कोण आपल्या अपरोक्ष विजापुरात संपर्कात आहे यावर बारीक लक्ष आहे याची जाणीव काहींना करून दिली.

पावसाळ्याच्या काळात वरकरणी अजगराच्या सुस्तीसमान असल्याचे दाखवून खानाने एका मागे एक चाली रचून आपले नियोजन पक्के केले. सिवाच्या हेजिबास काय अटी पुढे ठेवायच्या यावर विचार केला गेला त्यातून कच्चा मसूदा बनला.

“ निजामशाही विलयाला गेल्यावर मुगलांनी आदिलशाहीला मिळालेल्या परगण्यातील मुलूख सिवाने हस्तगत केला आहे. जंजीरा किल्ला व दंडा राजापुरीच्या सिद्धी जोहरास सिवाने कोंडीत पकडले आहे. कल्याण भिवंडी मुकासे आपल्याशी जोडून घेतले आहे. जावलीच्या मोरेचा जंगलातील भाग सिवाच्या ताब्यात गेला आहे.
वरील सर्व उद्धट प्रकार सिवाकडून झाले आहेत. सिवाच्या वडिलांच्या सेवेचा मान राखून विजापूरच्या तख्तावरील बादशाह अलि आदिलशाह यांनी दखल घेऊन अफ़झलखान मुहम्मदशाही यांना नियुक्त केले आहे. त्यांचे बरोबर सामोपचाराने तह करून त्यांना वरील मुलूख परत करून द्यायच्या तहनाम्यावर सही शिक्कामोर्तब करायला सिवाला वाई येथे यायचे आहे."
“ सामोपचाराचा मार्ग नाही मानल्यास अफ़झलखान सिवा विरुद्ध लष्करी कारवाई करायला मोकळीक राहील.
आदिलशाहीच्या मार्फत (मराठीत) बोलणी करायला वाईतील हवालदार कृष्णाजी भास्कर यांची नेमणूक केली आहे."

अफ़झलखानाच्या डेऱ्यात आलेल्या गोपीनाथ बोकील या वकिलास मसूदापत्र दिले गेले. तो वकील या पुढे डेऱ्याच्या आत दाखल होता कामा नये. जे बोलणे करायचे ते चौकीच्या बाहेर करायचे हुकूम दिले गेले. पुन्हा भेटीत गोपीनाथ बोकिल हकीकत घेऊन आले,
'सिवाची अतिशय केविलवाणी अवस्था आहे. ते आपल्यासमोर सादर व्हायला घाबरतात. मोठ्या मनाने माफ करून त्यांनी आपल्या जाहगिरीत सामिल प्रदेश परत करायला जावलीच्या मोरेच्या किल्ल्यावर यावे. तिथले सृष्टी सौंदर्य पहात तहनाम्यावर दस्तखत करून द्यायला ते तयार आहेत.'

“ मुळीच नाही, सृष्टी सौंदर्य पहायला नंतर दौरा करता येईल." असे कृष्णाजी भास्कर कुलकर्णींतर्फे गोपीनाथ पंतला सांगायला आज्ञा केली गेली. गोपीनाथ पंतांनी तहनाम्यावर सही शिक्का मोर्तब करायला शिवाजी अगदी तयार आहेत हे वारंवार बिंबवले!
“ आपल्या जावळीतील गढीत भेट करायला काय हरकत आहे? ती गढी सिवाच्या ताब्यात नाही. आपल्या पठाण तुकड्यांना सुरक्षारक्षक करायला शक्य आहे. निवडक पाच हजार सैनिक नेता आले तर? " अशी मसलत केली गेली. "सिवाने फक्त काही निवडक शिपायांसह यावे, अशी अट टाकली तर जावळीत त्याला नंतर गिरफ्तार करायला सोपे आहे. एकदा तहनाम्यावर शिक्कामोर्तब झाल्यावर तो पळून जाईल कुठे? कोकणात?"
आता वाटाघाटीत आणखी वेळ घालवला तर रोजचा वाढता खर्च चिंतेचा विषय आहे, शिवाय सेनेतील लढाई करायचा जोश ठंडा पडेल. अलि आदिलशाह पावसाळा सुरू आहे म्हणून गप्प आहे. आता वेळ आणखी काढला तो ही तगादा लावेल. म्हणून चेंगटपणा करायच्या ऐवजी जावळीतील गढीवर तहनाम्यावर सही शिक्का करायला मानले गेले. आपणहून जंगलात जायची काय गरज आहे असे कुरकुरणाऱ्या सरदारांची समजून काढली.

तिकडे गोपीनाथ पंत लगबगीने परतले. आणि खानाने तातडीने तायघाटातील रस्ता दुरुस्तीचे कामावर स्थानिक कामगार खानाच्या लोकांच्या देखरेखीत कामे करू लागले. सकाळच्या वेळी गडद धुक्यातून जाताना भिलार, गुरेघर, लिंगमळा, करत महाबळेश्वर पठार कुठून पार करता येईल ते वाटाड्यांना बरोबर घेऊन सराव केला गेला.
जावळीला जायच्या २, ३ वाटा पक्क्या केल्या. तिथे रस्ता दुरुस्तीचे काम सुरू झाले. काही जनावरांवर बोजड सामान लादून घाटातील जीवघेण्या वळणावर सराव करायला पाठवले गेले. जळवांवर नव्याने मातीचा थर टाकला. कारवीसारख्या झुडुपांची तोडणी करवून घेतली.

सर्व तयारी होत असताना ऑक्टोबर महिना संपला. पाठवलेले मराठा सरदार परत आले. (सध्याच्या एल्फिन्स्टन) एका टोकावरून खाली उतरून थेट जावळीच्या मागील मेटावर जाता येते, त्यासाठी दोर शिड्यांच्या गुंडाळ्या, खुंट्या, मेखा, जादाचे दोर तिकडे पाठवले गेले. आपल्या सरदारांना डोंगरांच्या रांगाचे, रस्त्याचे कच्चे नकाशे काढून आपापल्या सैनिकांना कुठून, कुठे जायचे आहे, वेळ किती लागेल, खायची व्यवस्था कुठे आहे, वगैरे तपशील रोज दिले जात राहिले.

पारशी पाँईंटवरून धोम धरणाच्या बाजूचे रम्य प्रातिनिधिक चित्र


पुढे चालू...

प्रतिक्रिया

योगविवेक's picture

17 Mar 2020 - 3:09 pm | योगविवेक

माझ्यासारखे काही ओक सरांच्या माहितीपूर्ण लेखमालेच्या पुढील भागाच्या प्रतिक्षेत चकरा मारू लागले तर नवल नाही.
मला त्यांच्या बरोबर प्रवास करायचा अनुभव आहे.
नेपाळमधील भृगू संहितेच्या शोधात आम्ही एकत्र होतो.
तर एकदा तंजावुरच्या तमिळ विश्वविद्यालयात कूट तमिळ भाषेतील शब्द रचनेची व्हिडिओ क्लिप दाखवायला मला संधी मिळाली.
कांचीपुरमच्या मठात जयेंद्र सरस्वतींच्या आशीर्वाद घेऊन बाहेर पडणाऱ्या मॅड्रास हायकोर्टातील जस्टिस व्ही कनगराज यांच्या परिचयावेळी मला हजर राहायला मिळाले.
कधी तिथल्या तिथे तोंडावर समोरच्याला गप्प करताना मला ते आठवतात. तर असीर गडावरील चढण, कांचनबारीतील घाटातून तरुणांना लाजवेल अशा उत्साहात फेरफटका मारताना त्या त्या भागात समर कसे घडले असेल यावर त्यांचे भाष्य मिलिटरी कमांडरच्या अनुभवाची साक्ष देते.
अफजल खानाकडून मोहिमेची तयारी कशी केली गेली असावी याची कल्पना या भागातून समजून येते.

शशिकांत ओक's picture

18 Mar 2020 - 10:24 pm | शशिकांत ओक

तुझ्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
आपल्या एकत्रित प्रवासाच्या आठवणी काढून खूप छान वाटले. तुझा उत्साही सहभाग, इतिहास, शिल्प कला, त्याशी निगडित कथा तुला मुखोद्गत आहेत. मुंग्यापासून ते भुकेले जीव प्राण्यांना जीवदया करायला अन्नदानासाठी साखरेची पोती डोक्यावर नेताना तू आठवतोस. असो.
सध्याच्या धाग्यावर तुझे विचार समजून घ्यायला आवडेल.

योगविवेक's picture

18 Mar 2020 - 10:33 pm | योगविवेक

नालबंद कारागीर घोड्याच्या खुरांना नवे नाल मारून आपली कमाई करत होते. लोहारांच्या भट्ट्यात भर पावसात पेटवल्या जाऊन नवे नाल, खिळे बनत राहिले. मुस्लिम सरदारांच्या दाढ्यांना आकर्षण रंगीत करून मिशा साफ करणे यावर नाई लोकांना उसंत मिळेना!

सैनिकांची, सरदारांची मनोवृत्ती, ते वातावरण इतक्या कमी शब्दात वर्णन केले आहे... मस्त वाटले वाचताना.

दुर्गविहारी's picture

19 Mar 2020 - 7:40 pm | दुर्गविहारी

वाचायला मजा येते आहे. पुढील भागाच्या प्रतिक्षेत.

शशिकांत ओक's picture

20 Mar 2020 - 5:43 pm | शशिकांत ओक

या लढ्यातील महत्वाचे सरदारांच्या नावात बाजी प्रभू यांच्या नाव घेतले जात नाही. पण एकदम पावनखिंडीच्या संदर्भात ते उपस्थित होते. मनो यांनी ते प्रताप मोरे यांच्याकडून असावेत असे मेहेंदळे यांच्या
ग्रंथात वाचल्याचे स्मरते असे म्हटले आहे.
यावर इतराना प्रकाश टाकायला विनंती करतो.