तदेव लग्नम् ..

Primary tabs

आजी's picture
आजी in जनातलं, मनातलं
16 Mar 2020 - 3:57 pm

परवा एका मेंदीच्या कार्यक्रमाला गेले होते.हल्ली लग्नात हळद,मेंदी,संगीत,लग्न,खाना,रिसेप्शन,बारात (काही राहिलेले असल्यास चूभूदेघे) अशी 'इव्हेंटस् ची लांबलचक मालिका असते. लग्नाला 'इव्हेंट'म्हणायचे हे लक्षात ठेवावे लागते. त्याची एक इव्हेंट मँनेजमेंट असते. आणि ती करायला एक मॅनेजर असतो. ह्या सगळ्याचा एक बिझनेस असतो.

तर मगाशी म्हटलेल्या मेंदीच्या कार्यक्रमालाही गर्दी होती.
सगळ्याजणी खूप नटून आल्या होत्या. मुलगी जिथं बसली होती ती जागा 'डेकोरेट' केली होती. त्यासाठी खास एक बाई आली होती. तिच्या भोवती दोन मुली मेंदी काढत होत्या.
हाताच्या बोटापासून ते कोपरापर्यंत. नंतर पायाच्या बोटापासून ते पिंढरीपर्यंत! हातापायांना मेनीक्युअर ,पेडीक्युअर झालेले होतेच. ते मेंदी काढणं सकाळी अकरापासून चाललं होतं म्हणे!आत्ता चार वाजायला आले होते. मग दोन्ही हात जायबंदी झालेल्या त्या मुलीला कुणी चहा पाजत होतं, कुणी पाणी पाजत होतं, कुणी खाणं भरवत होतं. त्या मुलीची पार्लरभेट आज संध्याकाळीच व्हायची होती. ती फेमस पार्लरवाली तेव्हाच उपलब्ध होती. तिनं केलेली हेयरस्टाईल मोडू नये म्हणून ती नवरी रात्रभर अवघडत पालथीच झोपणार होती म्हणे,असं तिथं आलेल्या एका बाईनं मला सांगितलं. त्याचवेळी संगीत गाणाऱ्या बायका नटूनथटून आल्या. त्यांनी सिनेमातली लग्नगीतं गायला सुरुवात केली. सगळेच इतके नटले होते आणि सगळं घरच विद्युत् रोषणाईनं लखलखलं होतं की मला आपण'हम आपके है कौन' सिनेमा बघायला आलो आहोत असे वाटले.

एखादा सिनेमा किंवा नाटक बोअर झालं की मी आणि माझी मैत्रीण थिएटरमधून उठून येतो. त्या मेहेंदी आणि संगीत कार्यक्रमातूनही मी यजमानीणबाईंना "महत्त्वाचं काम आहे"असं सांगून सटकले.

मला आमच्यावेळची लग्नं आठवली. वैवाहिक आयुष्याबद्दल निसंदिग्ध माहिती नसायचीच,उलट थोडी धास्तीच असायची.
त्यामुळे चेहऱ्यावर चिंताच असायची. माझ्या लग्नात पहाटे तेल लावून मला नहायला घातलेलं होतं. ब्यूटी पार्लर त्यावेळी नव्हतंच(असं मला वाटतं) त्यामुळे मेकपचा प्रश्नच नव्हता. चेहरा आणि केस तेलकट झालेले. आईवडिलांना सोडून जायचं म्हणून तोंड रडवेलं झालेलं. साड्या, शालू फारसे चमकदार,मुख्य म्हणजे 'डिझायनर' वगैरे नाहीत.

एकूणच त्यावेळी वधूच्या अंगावर दागिने मोजकेच. जनरली हुंडा, मानपान ऐपतीप्रमाणे केलेलं. (कॉलेजात वादविवाद स्पर्धेत हुंड्याविरुद्ध दिलेली त्यांची भाषणं फुकट गेलेली असायची.) रिसेप्शन वगैरे नाही. जेवणाचा मेनू ठरलेला. मसालेभात, जिलेबी, मठ्ठा, उकडलेल्या बटाट्याची भाजी, मटकी उसळ वगैरे.आग्रह व्हायचा. पैजा लावून जेवणं व्हायची.
उखाणे,नाव घेणं, "ऐकू आलं नाही, पुन्हा घे" इत्यादि ठराविक 'चेष्टा'व्हायच्या. सर्वसाधारणपणे लग्नं अशीच व्हायची.

आता नवरानवरी लग्नात एकमेकांशी गप्पा मारतात.
हास्यविनोद करतात. आमच्यावेळी म्हणजे,स्वतःच्या लग्नाला बसलेलो नसून,मुलाच्या मुंजीला बसल्यासारखे चेहऱ्यावर प्रौढ भाव असायचे.

माझ्या मागच्या पिढीत तर वडीलच मुलगा किंवा मुलगी पसंत करायचे. एकदम लग्नातच मुलगामुलगी एकमेकांना पाहायचे.

भावी काळातली लग्नं कशी असतील? मुलगामुलगी लग्न करुनच आईवडिलांना भेटायला येण्याची प्रथा हळुहळू सुरु होईल का? फक्त लग्न, पण मुलं नकोत ही संकल्पना येतेय, आलीय... ती पुढं सर्रास रुढीच होईल का? मूल दत्तक घेण्याची पद्धत वाढेल का? गर्भाशयाबाहेर मूल वाढवण्याची(आय व्ही एफच्या पुढे जाऊन पूर्णकाळ गर्भ प्रयोगशाळेतच वाढवण्याच्या तंत्राच्या शोधाची वाट स्त्रिया पाहतील का?) आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाहांची संख्या झपाटयाने वाढेल का? की फॉर्मल लग्नच होणार नाहीत?
'लिव्ह इन'ची संख्या बेसुमार वाढेल? दोन मुलगे किंवा दोन मुलीच लग्न करतील? किंवा तसेच राहतील? वात्सल्य ही सहजप्रेरणाच मरुन जाईल का?मुलं म्हणजे जबाबदारी, स्वातंत्र्यावर मर्यादा असं वाटेल? लोकसंख्या आपोआप नियंत्रित होईल?

काय होईल, कुणास ठाऊक! समाज बदलत असतो. परिस्थिती बदलत असते. आपण फक्त सामोरं जायचं. स्वीकार करायचा. कारण बुद्धिमान तोच असतो जो बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेतो. कुठल्याही परिस्थितीत तग धरतो. "जगून" दाखवितो. म्हणूनच माणूस जगावर राज्य करतोय ना!

जीवनमानलेख

प्रतिक्रिया

श्वेता२४'s picture

16 Mar 2020 - 5:47 pm | श्वेता२४

काय होईल, कुणास ठाऊक! समाज बदलत असतो. परिस्थिती बदलत असते. आपण फक्त सामोरं जायचं. स्वीकार करायचा.

हे महत्वाचं

कंजूस's picture

16 Mar 2020 - 7:33 pm | कंजूस

परिस्थिती

>>बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेतो. >>

हो ना. नियंत्रण आलं की मेनू विचारून घेतो.

भावी काळातील लग्न कशी असतील .... केवळ येणारा काळच याचं उत्तर देऊ शकेल. लिव्ह इन रिलेशनशिप्स काही प्रमाणात वाढतील, समलिंगी विवाह तुरळक होऊ लागलेत, समाजाची त्यांच्याकडे बघण्याची दृष्टी बदलेल... या पेक्षा भयंकर स्थित्यंतरे नजीकच्या भविष्यकाळात तरी अपेक्षित नाहीत. प्रत्येक सोहळ्याचा इव्हेंट करण्याचं वेड मात्र कमी होईलसं वाटत नाही.

शेवटचा परिच्छेद छानच आहे.
पण बाकीच्या त्यावेळच्या आणि सध्याच्या परिस्थितीतल्या फरकांविषयीच्या चटपटीत निरिक्षणांचा खास उल्लेख करावासा वाटतो आहे. तो काळ पाहिला आहे आणि नुकतंच मुलीचं लग्न झालं. मराठी पद्धतीचंच होतं. संगीत वगैरे नव्हतं. पण त्यातला मेंदीचा अनुभव ताजा आहे. भरवणं वगैरे अगदीअगदी अस्सच! :)
एकूणच त्यावेळी वधूच्या अंगावर दागिने मोजकेच. जनरली हुंडा, मानपान ऐपतीप्रमाणे केलेलं. (कॉलेजात वादविवाद स्पर्धेत हुंड्याविरुद्ध दिलेली त्यांची भाषणं फुकट गेलेली असायची.) :D
आमच्यावेळी म्हणजे,स्वतःच्या लग्नाला बसलेलो नसून,मुलाच्या मुंजीला बसल्यासारखे चेहऱ्यावर प्रौढ भाव असायचे. :|

हे वाचलं आणि लग्गेच प्रतिसाद लिहावासाच वाटला. छान लिहिता तुम्ही. अशाच लिहीत रहा. _/\_

चौकस२१२'s picture

17 Mar 2020 - 8:16 am | चौकस२१२

वैदिक पद्धतीने लग्न नको म्हणून रजिस्टर करतात .. ठीक आहे त्यात काही वावगे नाही नाहीतरी सर्व लग्ने हि सरकार दरबारी नोंदवावी लागतातच ... पण कधी कधी कारण असं ऐकलंय कि वैदिक पद्धतीत खर्च उगाच वाढतो.... आणि तेच पुरगोगामी जोडपे रजिस्टर लग्न झाल्या नंतर पार्टी वर जवळ जवळ तेवढाच पैसा खर्च करतात ! मग मध्यलामध्यें चालीरीतींना / संस्कृती ला आणि अनुषंगाने धर्माला कशाला दोष देऊन जातात कोण जाणे?
खर्च तो खर्च. उधळणे ते उधळणे .. उगाच धर्माला का टपली मारतात मढलायमध्ये कोण जाणे .. कुठे लिहिलंय हिंदू धर्मात कि खर्चिक लग्नसमारंभ करा म्हणून...
माणसाने जरूर पुरोगामी असावे पण उगाच दाखवण्यासाठी नसावे..
दुसरे काही चालीरीती नवरी नवऱ्याला उचलून धरणे? हे मराठी लग्न पद्धतीत होते का ( सर्व जातींच्या ) नवहते बहुतेक...मग उगाच हिंदी भाषिकांची कारण नसताना अनुकरण का ? येड्यांची जत्रा सगळी ...

मराठी_माणूस's picture

18 Mar 2020 - 3:26 pm | मराठी_माणूस

मग उगाच हिंदी भाषिकांची कारण नसताना अनुकरण का ?

ह्याच विषयावरचा हा एक मस्त लेख.
https://www.loksatta.com/chaturang-news/article-on-hides-marathi-vvaa-he...

सुबोध खरे's picture

17 Mar 2020 - 10:50 am | सुबोध खरे

आजकाल लग्नात खर्च करण्याला कोणताही विचार दिसत नाही.

माझ्या मुलीच्या साखरपुड्यासाठी ब्युटी पार्लरच्या बाईंना मेक अप साठी विचारले तर त्यांनी ३५ हजार रुपये सांगितले. माझ्या पत्नीने त्यांना सांगितले कि अहो मी साखरपुड्यासाठी विचारते आहे लग्नासाठी नाही. त्यावर त्या म्हणाल्या हे दर साखरपुड्याचेच आहेत, लग्नाचे आमचे दर सत्तर हजार आहेत.

मी चाटच पडलो. माझ्या मुलीचा चष्म्याच्या नंबर जाण्यासाठी मी जगातील अद्ययावत यंत्रावर डोळ्याला हात सुद्धा न लावता अत्यंत सूक्ष्म अशा "फेमटो लेसर" ने ब्लेडलेस लॅसिक शल्यक्रिया करून घेतली त्या डॉक्टरांचा MBBS आणि MS नंतर अनुभव ३० वर्षे आहे त्याचे शुल्क ६८ हजार भरले. आयुष्यभरासाठी मुलीचा चष्मा गेला आणि दृष्टी एकदम तीक्ष्ण झाली आहे.चष्म्याच्या काचे मुळे होणारे SPHERICAL/CHROMATIC ABBERATION शून्य झाले आहे.

आणि इथे एक संध्याकाळी चेहऱ्यावर रंग रोगण लावण्यासाठी ७० हजार? ते सुद्धा पात्रता काय आहे हेही माहिती नाही.
मला फेफरं यायचा बाकी होतं.

त्या बाई सांगत होत्या "आम्ही तुमचा चेहरा पूर्ण बदलून टाकतो आणि त्यात फोटो फार छान येतो".

यावर माझी मुलगी म्हणाली मी जशी आहे तशीच माझ्या नवऱ्याला आवडले आहे( तिचा प्रेम विवाह आहे) तेंव्हा मला चेहरा बदलण्याची मुळीच गरज नाही आणि फोटो चांगले येतील म्हणून ७० हजार देण्यापेक्षा १५०० रुपये देऊन मी फोटोशॉप करून घेतले तर फोटो अजूनच चांगले येतील.

आता फेफरं येण्याची पाळी त्या ब्युटी पार्लर वालीची होती.

मी मुलीला म्हणालो कि मेकअप करायच्या कोर्सची ३० हजार फी भरलेली परवडेल आयुष्यभर कसा मेक अप करायचा तेही समजेल आणि खर्च पण शून्य होईल.
बरं ७० हजार रुपये घेऊन त्या ब्युटीपार्लर वाल्या बायका ब्रश रंग वगैरे वापरलेलेच वापरतात तुमच्यासाठी काही नवीन साहित्य घेत नाहीत. मग एकीचे जंतू दुसरीकडे गेले तर काय? काय भुललासी वरलिया सोंगा

बाकी इतर ठिकाणी गप्पा मारताना सुरस आणि चमत्कारिक कथा ऐकतो आहे. कशिदाकारी केलेल्या ब्लाउजची शिलाई १० हजार रुपये साडीची किंमत साडे सात हजार होती.नाकापेक्षा मोती जड. हॉलच्या डेकोरेशनचे शुल्क ५ लाख रुपये पर्यंत आहे. त्यात ताज्या फुलांची आणि ट्यूलिप कि ऑर्किडची सजावट येते.
एका नातेवाईकांच्या मुलीच्या लग्नात त्यांनी ब्युटी पार्लर वालीला दीड लाख रुपये दिले.

सुदैवाने माझ्या मुलीचे विचार माझ्यासारखे आहेत.

आमचे लग्न अजिबात भपका न करता केवळ जवळच्या नातेवाइकात आनंदाने कमीत कमी खर्चात झालं आहे.
http://www.misalpav.com/node/30934

प्रकाश घाटपांडे's picture

17 Mar 2020 - 11:05 am | प्रकाश घाटपांडे

आमचे लग्न अजिबात भपका न करता केवळ जवळच्या नातेवाइकात आनंदाने कमीत कमी खर्चात झालं आहे.

आमच रजिस्टर्ड साध्या पद्धतीने झाल. पण मुलीचे लग्न मात्र साग्रसंगीत वैदिक पद्धातीने व भव्यदिव्य झाले. नातेवाईक म्हणतात आमच्या लग्नातील कसर मुलीने भरुन काढली. त्यावेळी राहिलेली हौसमौज आत्ता व्याजासकट भरुन काढली. :)

योगी९००'s picture

17 Mar 2020 - 11:17 am | योगी९००

छान विषय.. मुळ लेख व सर्व प्रतिसाद छान. डॉ. खरेंचा प्रतिसाद आवडला.

लग्न, मुंज, साखरपुडा हे समारंभ म्हणजे लोकं पैसा खर्च करायला तयार आहेत म्हणून लोकं काहीच्या काही दर लावतात. पण यामुळे काहींचे संसार उभे राहतात हे ही नसे थोडके.

पण बाकीचे जे इतके पैसे खर्च करू शकत नाहीत त्यांना आपण मुलाचे/मुलीचे लग्न व्यवस्थित करून दिले नाही याची खंत कायम रहाते. त्यांची मुलं ही नंतर त्यांना बोलतात.

असाच एक आणखी फालतू प्रकार म्हणजे लग्नाआधीचे केलेले फोटो (Pre-Wedding Photoshoot). कॅमेरामन ड्रोन वगैरे लावून काहीच्या काही फोटो लावतो. होणारे नवरा-बायको या कार्यक्रमासाठी पण कपडे खरेदी, मेकअप वगैरे खर्च करून अल्बम बनवून घेते. जवळचे चार नातेवाईक व मित्र-मैत्रिण सोडून कोणीही हे फोटो बघत असतील की नाही हे माहित नाही. जवळचे लोकं पण दोन-चार वेळा हे फोटो बघत असतील. नंतर नंतर नवरा-बायको तरी हे फोटो पहातात की नाही ही शंका. पण हे शुट आउट करण्यासाठी निदान ५०००० तरी खर्च येत असावा.

फुटूवाला's picture

24 Mar 2020 - 2:56 am | फुटूवाला

पण हे शुट आउट करण्यासाठी निदान ५०००० तरी खर्च येत असावा.
ते तुम्ही कोणत्या लोकेशनला, किती दिवसांचे करताय त्यावर अवलंबून आहे. आता आम्ही Pre Wedding साठी कधी लवासा कधी अलिबाग जातो. या मार्चमध्ये उदयपूर जायचे होते पण कोरोना आड आला. असो.
शिस्तबद्ध वेळ मिळाला तर त्या आठवणी अनमोल असतात.
अल्बम मध्ये बऱ्याच व्हरायटी आहेत आता. जसे मॅट, मेटॅलिक, ग्लॉसी, वेल्व्हेट असे अजून बरेच प्रकार आहेत.

आजी लेख छान झालाय. मराठी लग्न सुद्धा हिंदी सिनेमा टाईप होतायत. पण एक गोष्ट खटकते काही लग्नात. पार्लर ला वेळ लावतात, मिरवणुकीला वेळ लावतात. नियोजनाच्या वेळेपेक्षा तास-दीड तास लग्न उशिरा लागते. हे सगळं चालवतात. पण गुरुजींचा विधी चालू झाला कि आटपा लवकर म्हणतात.

आपल्याला काय, वेळेनुसार बदलत राहायचं.

सुबोध खरे's picture

17 Mar 2020 - 11:51 am | सुबोध खरे

एखाद्या नको असताना घरी आलेल्या माणसाला कंटाळा येऊन फुटवायचे असले तर असे लग्नाचे दोन भरभक्कम अल्बम देऊन बाहेरच्या खोलीत बसवायचे आणिआपण आपली कामे आत उरकत राहायचे.

Nitin Palkar's picture

17 Mar 2020 - 1:25 pm | Nitin Palkar

चांगली आयड्या...
_/\_

Sanjay Uwach's picture

18 Mar 2020 - 8:41 pm | Sanjay Uwach

लग्न
पूर्वी लग्न झाल्यावर ,मुलगी सासरी जाताना बायकांचे रडणे हा एक गंभीर असणारा कार्याक्रम आता पूर्ण पणे बंद झाला आहे, नाहीतर शेजारी जरी मुलीचे सासर असले तरी गोतावळ्यातल्या बायकांना थोडे तरी रडावे लागायचे .कधी कधी या भावना प्रधान नाट्यात नवरा मुलगा व त्याच्या आईचा म्हणजे होणाऱ्या सासूचा देखील त्यात सहभाग असायचा . "काळजी करू नका ,आम्ही तिला मुली प्रमाणे सांभाळू वगैरे वगैरे सांत्वनस्पद भाग त्यात येत असे . माझे एक आजोबा शंकरराव यांचा किस्सा सांगतो , परगावी ते नोकरीला होते अन त्यांच्या मामाचे एक कार्ड त्यांना आले त्यात फक्त लिहले होते "शंकर ताबडतोप गावा कडे निघून येणे " घाबरून ते गावाकडे दुपारच्या वेळी येऊन पोहचले ,पाहतो तर काय घरच्या बाहेर भली मोठी जेवणाची पंगत बसली होती . शंकरला पाहिल्यावर मामा पुढे आला व मोठ्या तत्परतेने शंकर कांही बोलण्याच्या आधीच मामाने शंकराला जेवायला बसवले .प्रवासाने भुकेल्या शंकराने देखील जेवणावर चांगलाच ताव मारला . जेवण झाल्यावर शंकरने मामा हा सगळा काय प्रकार आहे असे विचारता
"कांही नाही रे ,मी आणि अक्काने तुझे लग्न माझ्या मुली बरोबर ठरवले आहे ,एवढेच "
खर, सांगू का आजी लग्न हा प्रकार संपूर्ण पणे बदलून गेला हे तुम्हालाही माहीत असणारच . सकाळी मोजक्याच लोकांना बोलवून विधी आटपून घ्यायचा आणि रात्री "स्वागत समारंभ " . स्टेजवरील दांपत्याला व त्यांच्या भेटी साठी हातात पुष्पगुछ घेऊन भल्या मोठ्या पाळीत उभा राहावे . एकदा का पुष्पगुछ आपल्या बोलवणाऱ्या पाहुण्याच्या हातात दिला कि मग लगबघिने जाऊ लागतो तसे ,थांबा थांबा मग फोटोसेशन . हुss श्य करून स्टेजच्या खाली .खाली उतरल्यावर आपल्या आपल्या आवडीच्या लोकांना बरोबर घेऊन ,परत हातात थाळी घेऊन प्रत्येक निरनिराळ्या खाद्य पदार्थांच्या स्टॉल वर भटकंती . हे चांगले कि वाईट किंव्हा या वर होणार प्रचंड खर्च , यावर मतमतांतर असू शकते .पण "कालाय तस्मेन नमः"

चौथा कोनाडा's picture

23 Mar 2020 - 1:30 pm | चौथा कोनाडा

आजीबाई, गेले ते दिवस, राहिल्या त्या आठवणी !

आता सगळ्याचाच इव्हेंट झालाय, जो खर्चीक प्रकार झालाय ! सगळं चकचकीत, पॉलिशड. ठराविक वर्गाला ( विशेषतः युवा वर्ग / धनिक लोक) याचा आनंद घेता येतो, आपण नुसते बघे, हतबल. कार्यातली आपुलकी हरवलीय, साधेपणा हरवलाय ! कालाय तस्मै नमः _/\_ दुसरं काय !
आपण आपले अनौपचारिक मिपा कट्टे करायचे, टीटीएमएम, मस्त मजा येते !
आजीबाई कधी कटटा करायला घेताय ?

आजी's picture

2 Apr 2020 - 11:09 am | आजी

श्वेता २४-आपण फक्त समोरं जायचं.स्वीकार करायचा.हे माझं मत तुम्हांला पटलं.वाचून बरं वाटलं.

कंजूस-मेनू विचारून घेता?हाःहाः. वल्ली आहात.

नितीन पालकर-खरंय तुमचं.पटलं.

पलाश-माझं लिखाण तुम्हांला आवडतं,हे वाचून समाधान वाटलं.

चौकस-हिंदी भाषिकांचे अनुकरण नको ,म्हणता.पण हळुहळू सगळे समाज असे मिक्स होणारच आहेत.आपण रोखू शकत नाही.आणि त्यात वाईट काय?

सुबोध खरे-तुमची सविस्तर प्रतिक्रिया आवडली. परवडेल तितकाच खर्च करावा.

प्रकाश घाटपांडे-माझ्याही लग्नात झगमगाट नव्हता.

योगी-प्री वेडिंग फोटोशूट हे एक नवे खूळ आहे.हौसेला मोल नाही,हेच खरे.

फुटूवाला-गुरुजींच्या विधींकडे तरी कुणाचे लक्ष असते?कोण गांभीर्याने घेते? माझ्या घरच्या एका समारंभात मी गुरुजींचे मंत्र सर्वांना शांतपणे ऐकायला लावले.आणि गुरुजींना मंत्रांचा अर्थ समजावून द्यायला सांगितला.

सुबोध खरे-हाः हाः. तुमचा उपाय जालिम आहे.नितीन पालकरांनांही तसंच वाटतं.

संजय उवाच-कालाय तस्मै नमः हे तुमचं मत पटलं.

चौथा कोनाडा-मिपा कट्टा ना?करुया की!