कुणी स्पेस देता का रे स्पेस?

अबोलघेवडा's picture
अबोलघेवडा in जे न देखे रवी...
21 Jan 2020 - 9:49 am

(वैयक्तिक सुखांपुढे इतर सगळं तुच्छ वाटणाऱ्या जोडप्यांना समर्पित)

सुखांची बिलकुल कमी नाही, मस्तच चाललंय आमचं
स्पेस मात्र मिळत नाही, काय बरं आता करायचं

येता जाता सिनेमे बघून, खुशालचेंडू जिणं जगतोय
महिन्याकाठी पोशाखांवर भरमसाठ खर्च करतोय
चंगळवादी मन झालंय, आयुष्य झालाय बाजार
स्पेस मात्र मिळत नाही, दाखल करू का तक्रार?

स्मार्टफोन हाती नसला की, जीव होतोय कासावीस
विकत घ्यायला जातो तेव्हा, करत नाही घासाघीस
ऐषारामात जगतोय आम्ही, माहीत नाही माघार
स्पेस मात्र मिळत नाही, दाखल करू का तक्रार?

शब्दांचा झालाय तुटवडा, सगळंच झालंय डिजिटल
ईमोजींचं झालं आक्रमण, अन प्रेमही झालंय व्हर्चुअल
औषधाला देखील उरले नाहीत, जिवलग झाले पसार
स्पेस मात्र मिळत नाही, दाखल करू का तक्रार?

मॉल मध्ये हिंडून हिंडून, आयुष्य झालंय बोथट
एका क्लिकवर लोळतात सुखं, पायांशी आता झटपट
चारचाकी वाहनात बसून, जगतोय आम्ही बेदरकार
स्पेस मात्र मिळत नाही, दाखल करू का तक्रार?

स्वयंपाकाला हल्ली असते बाई, प्रेम गेलंय चुलीत
गरम पोळी आणि तूपाहूनही सरस, आमच्या सोईंचं गणित
स्वतःपुरताच आनंद घेतो, इतरांचा शिवत नाही विचार
स्पेस मात्र मिळत नाही, दाखल करू का तक्रार?

सुखांना घालतात मुरड, हा झाला आता इतिहास
बरोबर आता AC लागतो, त्याशिवाय जमतंच नाही प्रवास
माझा आनंद माझा आराम, मग कुठलाही असेना का वार
स्पेस मात्र मिळत नाही, दाखल करू का तक्रार?

एकत्र असलं कुटुंब जरी, मनाने झालो विभक्त
इतरांचा विचार करणं आता, वाटत नाही प्रशस्त
पार्टी करतो मित्रांसंगे, सुखाचा करूनी एल्गार
स्पेस मात्र मिळत नाही, दाखल करू का तक्रार?

हाडं मोडून कामं करणं, झाली की हो जुनाट पद्धत
सिझलर्स खाऊन जिमला जातो, बसायचं कशाला कुढत
तरी आपण किती बिच्चारे, होतो मधूनच साक्षात्कार
स्पेस मात्र मिळत नाही, दाखल करू का तक्रार?

कविताजीवनमान

प्रतिक्रिया

प्रकाश घाटपांडे's picture

21 Jan 2020 - 10:30 am | प्रकाश घाटपांडे

अविनाशकुलकर्णी याच्या मधे स्पेस दिली पाहिजे