मटार ,बटाटा, टोमॅटो

Primary tabs

नूतन's picture
नूतन in जनातलं, मनातलं
10 Jan 2020 - 12:59 pm

सालाबादप्रमाणे थंडीचा मोसम आला. मुंबईची थंडी म्हणजे औट घटकेचं राज्य ! तेवढीच मजा लुटावी म्हणून बासनातले स्वेटर ,शाली बाहेर काढल्या आणि सकाळी सकाळीच कुठलीही सबब न ऐकता , जरा हट्टानेच , स-पति फेरफटका मारायला बाहेर पडले. मस्त फिरून प्रसन्न मनाने घरी निघालो. एव्हाना ताज्या तजेलदार, नानाविध प्रकारच्या भाज्या हातगाड्यांवर लादून जाणारे विक्रेते ठायी ठायी दिसू लागले होते. आज अंगात जरा जास्तच ऊत्साह संचारला होता. पावलं आपोआपच हिरव्यागार मटारच्या शेंगांच्या ढीगांनी भरलेल्या गाडीसमोर येऊन थांबली. आणि सोसासोसाने मटारची खरेदी झाली.

मटार घेत असताना निर्विकार चेह-याने ,हाताची घडी घालून बाजूला ऊभ्या असलेल्या नवरोबाने घरात शिरल्यावर मात्र मौन सोडलं.' आता हे सोला बिलायचं आपल्याला जमणार नाही हं! ' मस्त थंडी आहे. आपल्यासाठी गरमागरम आल्याचा चहा टाक. आपण तर बुवा रजई पांघरून मस्त लोळणार आता!

झालं का? मगाशी संचारलेल्या ऊत्साहाचा पारा एकदम खाली आला. 'अद्रककी चाय' पिऊन गुपचुप शेंगा सोलायला घेतल्या. अधूनमधून नवरोबांची शेरेबाजी चालूच होती. काय तर म्हणे, आणखी थोडे घेतले असतेस तर गावजेवण तरी घातलं असतं! ...त्यापेक्षा असं करतेस का? कुणाचं डोहाळे जेवण करायचं आहे का बघ. मटारनी वाडी भरूया तिची आपण!

हं!वाडी भरूया म्हणे! एवढं काही टोचून बोलायला नको .असं मनात म्हटलं खरं, पण ती कल्पनाच मला इतकी आवडली की पुन्हा एकदा सकाळचा ऊत्साह माझ्या अंगात संचारला. सोलणं बाजूला टाकून माझं 'ज्वेलरी डिझायनिंग ' सुरू झालं.

m

मन त्यात गुंतलं असलं तरी खरंच एवढ्या मटारांचं काय करायचं यावर विचार चालूच होता. मटार ऊसळ,मटार पोहे, मटार भात,मटार करंजी...कितीतरी पदार्थ आठवले. पण इन मीन दोन माणसं खाणार तरी किती?आणि 'फ्रोजन मटार 'तरी किती करून ठेवायचे? पण आता पर्याय नव्हता. निदान काहीतरी वेगळं करावं म्हणून 'तू नळी'ला शरण गेले. बघता बघता ' विविधता मे एकता और एकता मे विविधता 'चा प्रत्यय येऊ लागला. ' मटारची भाजी ' या एका शोधात पाहिलेल्या असंख्य पाकृंमध्ये तीन मुख्य घटक होते------मटार, बटाटा, टोमॅटो. पण मध्य भारत आणि चतुर्दिशांमध्ये बनणा-या पाकृंमध्ये फरक होता तो करण्याच्या पद्धतीचा,वापरलेल्या मसाल्यांचा ,स्थानिक हवा,पाणी आणि ताज्या भाज्यांचा!
वानगीदाखल सांगायचं तर बंगालमध्ये मटार आणि बटाट्याच्या चौकोनी फोडी उकळत्या पाण्यात ७५%शिजवून घेतात. मग --टोमॅटो, आलं,लसूण, धने,जिरं, हिरवी वेलची,लवंग, दालचिनी, हिरवी मिरची--या वाटणात घालून शिजवतात.

तर इकडे कर्नाटकात बटाटा उकडून कुस्करून घेतात. दाक्षिणात्य पद्धतीप्रमाणे कढीलिंबाची फोडणी आणि ---नारळ,टोमॅटो, कांदा, हिरवी मिरची, लवंग, दालचिनी, कोथिंबीर---या वाटणात मटार,बटाटे शिजवतात.

खाण्यापिण्याच्या बाबतीत मध्य प्रदेशाची प्रकृती तशी शाहीच. त्यामुळे इथे, वाफवलेले मटार आणि साजुक तूपात तळलेले बटाटे मुरतात ते टोमॅटो प्युरी सोबत येणा-या काजू,बेदाणे, मावा,मलई,खडे मसाले,धनेपूड,आमचूर आणि लाल तिखटाच्या चविष्ट मसाल्यात!
या सर्व प्रकारात मटारचे दाणे आख्खे वापरले जातात. पण उत्तर प्रदेशाची खासियत असलेला 'मटार का निमोना' मात्र जरासा वेगळ्या प्रकारे बनतो. मूळ चवीसाठी यात 'सरसों का तेल' च हवं. निमोनाचेही मुख्य घटक असतात ---मटार,बटाटा, टोमॅटो. टोमॅटो व बटाट्याच्या अर्धवर्तुळाकार चकत्या कापतात. बटाट्याच्या चकत्या मोहरीच्या तेलात खमंग तळून घेतल्या जातात. मटार मात्र वाटून घेतले जातात आणि वाटलेले मटारही तेलावर खरपूस भाजून घेतात. निमोनासाठी फारसे मसाले वापरले जात नाहीत. वाटणासाठी आलं,लसूण, हिरवी मिरची या सोबत खरा स्वाद देणारा घटक म्हणजे खास गावरान 'धनिया फल'
अर्थात कोथिंबीरीचं बी/ओले धने. आणि मग हिंग,लाल मिरचीच्या फोडणीवर या मसाल्यात,वाटलेले मटार,तळलेले बटाटे आणि टोमॅटो घालून रसदार नीमोना बनतो. (मुंबईत कुठून मिळणार 'धनिया फल'?पण कोथिंबिरीच्या काड्या तर आहेत!तुका म्हणे त्यातल्या त्यात. )

x

असो. तर मंडळी, इतका वेळ विचारमग्न असल्यामुळे तोंड बंद होतं. पण आता विचार पक्का झाल्यावर मी शेर होते. शेवटची शेंग सोलता सोलता, डुलकी घेणा-या नवरोबाला हलवून जागं करत म्हटलं---अरे,बघ बघ,कशा झटपट शेंगा सोलून झाल्या. आता आपला मटार महोत्सव चालू! यंदाच्या भोगीला "मटर का नीमोना "!

मांडणीजीवनमानआस्वादमाहिती

प्रतिक्रिया

नूतन's picture

10 Jan 2020 - 5:50 pm | नूतन

नेहमीप्रमाणे फोटोंची गडबड झाली आहे.

नूतन's picture

11 Jan 2020 - 9:13 am | नूतन

ज्वेलरीचा फोटो प्रतिसादात दिसत आहे

ज्ञानोबाचे पैजार's picture

10 Jan 2020 - 5:59 pm | ज्ञानोबाचे पैजार

फोटोंना निमोना झाला आहे
पैजारबुवा,

अनिंद्य's picture

10 Jan 2020 - 6:58 pm | अनिंद्य

अहाहा!

मटार दागिन्यात शोभत आहेत. थंडीच्या दिवसातला दागिनाच तो. म्हणून तर गरीब शायर म्हणतो :-

हमारी मुफ़्लिसी भी इश्क़िया है
कि आलू है मटर का मसअला है
मुजदम खान

.....खाण्यापिण्याच्या बाबतीत मध्य प्रदेशाची प्रकृती शाही......... हे अगदी वृषभनेत्रगामी निरीक्षण !

बाकी धनियाफल घरी कु्ंडीत वर्षभर प्राप्त करता येते.

मुक्त विहारि's picture

10 Jan 2020 - 7:11 pm | मुक्त विहारि

माझा गणेशा झाला.

नूतन's picture

11 Jan 2020 - 8:49 am | नूतन

J

नूतन's picture

11 Jan 2020 - 9:12 am | नूतन

ज्वेलरीचा फोटो प्रतिसादात दिसत आहे

कुमार१'s picture

11 Jan 2020 - 11:06 am | कुमार१

आवडले !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

19 Jan 2020 - 12:52 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

फोटो घोळ दिसतोय. लेखन वाचायला पुन्हा येईन.

-दिलीप बिरुटे