सहवर्धन : रस्तेमें कोई साथी तुम्हारा मिल जाएगा!

Primary tabs

बहुगुणी's picture
बहुगुणी in दिवाळी अंक
25 Oct 2019 - 6:00 am


मिपा दिवाळी अंक  २०१९

अनुक्रमणिका
सहवर्धन : रस्तेमें कोई साथी तुम्हारा मिल जाएगा!
भारतात १२ वर्षं आणि अमेरिकेत दोन दशकांहून अधिक काळ वैद्यकीय संशोधनात व्यतीत केल्यानंतर मी स्वेच्छानिवृत्ती घेतली. त्याआधी दोन वर्षं मायदेशी परतण्याची तयारी सुरू झाली होती. कौटुंबिक आघाडीवर, आमच्या घरातील चार पिढ्यांतील सदस्यांना सोयीचं होईल असं घर शोधून काढणं, नातीसाठी शाळेत अॅडमिशन घेणं वगैरे कामांचा चार्ज पत्नीने, मुलाने आणि सुनेने घेतला. मी कर्करोगाचा पुन:प्रादुर्भाव (recurrence) रक्तपरीक्षेने लवकर ओळखता येण्याविषयी कॅलटेक सहकार्‍यांसह USC विश्वविद्यालयात केलेल्या संशोधनाचे ८ पेटंट्स कॅलटेक या संस्थेला assign झालेले आहेत. त्यानंतर पुढील काळात मी फ्लोरिडाच्या युनिव्हर्सिटी ऑफ मायामीमध्ये बरीच वर्षं संशोधन करून या परीक्षेत अधिक सुधारणा करून शोधनिबंध प्रसिद्ध केले. निवृत्तीचा निर्णय झाल्यावर ते पेटंट्स आणि शोधनिबंधांमधील माहिती वापरून निवृत्तीच्या वर्षभर आधी एक लहान start up कंपनी स्थापन झाली. निवृत्तीनंतर मी CEO म्हणून कार्यभार स्वीकारायचा हे निश्चित झालं आणि वर्षभरातच आमच्या कंपनीची स्वयंचलित यंत्रं अमेरिकेतील सात आणि युरोपियन दोन कर्करोग केंद्रांमध्ये कार्यरत करण्यात आम्ही यशस्वी झालो. अल्पावधीतील या सुरुवातीच्या यशामागे एक महत्त्वाचा भाग हा आहे की अनेक कर्करोगतज्ज्ञांनी आमचं तंत्रज्ञान स्वत: वापरून गेल्या दशकभरात शोधनिबंध सादर केले होते. So our track record was our supporting evidence. हा मुद्दा मांडण्याचं कारण पुढे कळेल. तर या संशोधनाच्या पार्श्वभूमीवर मी मायदेशी परतलो.

परदेशी असताना शनिवारी-रविवारी आवडीने फार्मर्स मार्केटमध्ये जायचो, तसाच पुण्यात आल्यावर भाजी आणण्याचं काम स्वेच्छेने माझ्याकडे घेतलं. दर वेळी अगदी मंडईत किंवा मार्केटयार्डातच जायचं असं नाही, तर घाईच्या वेळी रस्त्याच्या कोपऱ्यावर बसलेल्या भाजीवाल्यांकडूनही भाजी घेतली. कळत-नकळत रासायनिक खतं आणि कीटकनाशकं वापरलेली सत्त्वहीन भाजी लक्षात यायला लागली, आणि चांगला भाजीपाला आणायला चार अधिक ठिकाणी फिरायला लागलो.

घरी शक्य तितका वेळ प्रामुख्याने दोन नातींचा आजोबा असण्याला द्यायचा, हे ठरवलं होतंच. ती जबाबदारी, कंपनीची जबाबदारी यांबरोबरच राहून गेलेल्या अनेक छंदाची bucket list मनात पिंगा घालत असायची. आयुष्यात बाकी काहीही अनिश्चितता असेल, पण सर्वांप्रमाणेच एक गोष्ट नक्की पक्की आहे - आपलं रिटर्न तिकीट कन्फर्म आहे! करियरपाठी धावताना मागे पडलेल्या वाचन, प्रवास, व्यायाम, बागकाम आणि इतर बऱ्याच गोष्टींची लांब यादी होती. त्यांपैकी वाचन सुरू केल्यावर लक्षात आलं की हातात पुस्तक घेऊन वाचण्याचा पेशन्स संपलाय! एकेकाळी पाच-पाचशे पानांची पुस्तकं दिवसाला फस्त करणारा मी, पण आता जेमतेम दोन पानं वाचून कंटाळायचो. याउलट गेल्या पंचवीस वर्षांत screenवर वेगाने वाचण्याच्या सवयीने digital readingची आवड वाढली होती. यात मिपाकर असण्याचाही खूपच मोठा वाटा होता, हेही नमूद केलंच पाहिजे! लिखाणाचंही तसंच झालं होतं. फोनवर बोटं फिरवून वेगात लिहिणं (आणि आता speech-to-text typing वापरून बो-लिहिणं ) यांची सवय लागली. इतकी की हस्ताक्षराचा बट्ट्याबोळ झाला! आता माझी सहीदेखील मला प्रयत्नपूर्वक करावी लागते! या सगळ्याचा अनपेक्षित परिणाम असा झाला की की पूर्वी मी जे स्वत: निवडून वाचायचो, त्याऐवजी आता आंतर्जालावर वाचताना search engineने सुचवलेलं suggested reading वाचायला लागलो.

असेच कधीतरी organic farming - सेंद्रिय शेतीविषयीचे लेख वाचनात आले आणि आवडले. मग ओघात compostingविषयी वाचायला लागलो. अक्षरशः शेकडो लेख आणि शोधनिबंध पालथे घातले आणि नोंदी ठेवू लागलो. एकीकडे बागेत लुडबुड चालू होतीच. मग वर्ष-दीड वर्ष प्रयोग करून self composting vertical garden विकसित केलं. एक सहा महिन्यांचा परसबागेचा सर्टिफिकेट कोर्सही केला. हे सगळं करत असताना आधी फूलबागेवर लक्ष केंद्रित केलं होतं, पण हळूच भाजी वाढवण्याचा प्रयत्न केला आणि बरेचदा अयशस्वी झालो. मग सुरू झाला गुरूचा शोध. एक-दोन करता करता चांगले दहा-पंधरा बाप (आणि आई) लोक भेटले! त्यांच्या अप्रतिम, कष्टपूर्वक उभारलेल्या कमी मातीच्या आणि मातीविरहित (कंपोस्ट व कोकोपिट मिश्रणावर) परसबागा आणि छतबागा पाहिल्या. त्या पाहतांना माझ्यासारखेच भाजी-वेडे अनेक प्रेक्षक भेटले, जे एकेकटे, आपापल्या घरी प्रयोग करत असायचे, कधी एखादी भाजी consistently विकसित करणं जमलं की हसायचे, कधी फसायचे. या सर्वांनाच आस आहे ती आपल्या कुटुंबापुरती विषमुक्त भाजीपाला विकसित करण्याची. पण हे सर्व पाहताना एक गोष्ट लक्षात आली - या बऱ्याचशा गुरूंची अतिमर्यादित गुरुकुलं आहेत, जी १०-२० शिष्यांच्या पलीकडे जात नाहीत आणि बरेचसे एकेकटे प्रयोग करणारे, 'किंचित शेतकरी' होऊ इच्छिणारे शिकाऊ उमेदवार motivationच्या अभावी नाउमेद होऊन लवकरच प्रयोग बंद करतात. संशोधन क्षेत्रात तीन दशकं काम असताना लक्षात आलं होतं की otherwise एकेकटी तोलामोलाची असलेली संशोधक मंडळी multiple investigator grantsच्या माध्यमातून एकत्र काम करायला लागली की त्यांच्या सामुहिक कामाचा, आणि म्हणून यशाचा, वेग वाढतो. ते सगळे एकत्र येऊन interactive चर्चेतून एकमेकांना motivate करत राहतात. ती म्हण आहे ना - If you want to go fast, go alone; but if you want to go far, go together, तसंच काहीसं. सुरुवातीच्या अपयशाने नाउमेद होणाऱ्यांना कोणी तरी हे सांगणारे भेटायला हवेत: 'तुम हो एक अकेले तो, रुक मत जाओ, चलो निकलो, रस्तेमें कोई साथी तुम्हारा मिल जाएगा!'

मग विचार सुरू झाला या 'किंचित शेतकऱ्यां'ना एकत्र आणण्याचा. २०१९च्या जुलै महिन्यातल्या पहिल्या शनिवारी मी एक १२ हौशी 'किंचित शेतकऱ्यां'चा WhatsApp group स्थापन केला. तेव्हापासून तीन महिन्यांत उभ्या राहिलेल्या nascent चळवळीच्या माहितीसाठी हा लेख.


Photo-Collage-20191012-112819613


तर सध्यातरी सहवर्धन हा एक WhatsApp group आहे, ज्यात असे - प्रामुख्याने शहरी - सभासद आहेत, ज्यांना बागकामात रस आहे, आणि ज्यांना सेंद्रिय पद्धतीने स्वत:च्या कुटुंबापुरता भाजीपाला पिकवायला आवडेल, पण ज्यांच्याकडे शेतजमीन नाही, आणि वेळही मर्यादित आहे. थोडक्यात, बहुतेकांची 'किंचित शेतकरी' होण्याची इच्छा आहे! असे आज जवळजवळ १५० सभासद आहेत, आणि ही संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे.

या सभासदांनी एकत्र यावं, आणि एकतर बंगले वा सोसायटी बिल्डिंगच्या terracesवर, किंवा ज्यांच्याकडे शहरापासून तासभराच्या अंतरावर अतिरिक्त/वापरात नसलेली शेतजमीन पडून आहे अशा शेतजमीनींवर, तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली सेंद्रिय पद्धतीने भाज्या वाढवाव्यात, अशी साधारण कल्पना आहे. सर्वांनी एकत्र येऊन, सहकार्याने भाज्यांची रोपं वाढवावी ही मूळ संकल्पना, म्हणून या गृपचं नाव 'सहवर्धन'!

मी अशी सामूहिक सेंद्रिय भाजीशेती अमेरिकेत यशस्वीरीत्या अंमलात आणलेली पाहिली आहे. भारतातही बंगळुरू, दिल्ली, मुंबई या शहरांमध्ये व्यावसायिक तत्त्वावर सुरू झाली आहे. सहवर्धनचं वेगळेपण म्हणजे यात व्यावसायिक दृष्टीकोन नाही, यातील सभासद स्वत: किंचित शेतकरी होता होता इतरांनाही मदत करताहेत. सहवर्धनचा motto आहे 'Alone, I cannot; together, we can!'

यासाठी शहरात घरच्या घरी यशस्वीपणे भाजी शेती करणाऱ्या तज्ज्ञांची यादी तयार केली आहे. तसंच अगदी थेट शेतजमिनीत भाज्या वाढवणारे तज्ज्ञही या ग्रूपमध्ये सल्लागार म्हणून सहभागी आहेत. या ग्रूपचे दहाहून अधिक सदस्य आपल्याकडील अतिरिक्त शेतजमीन या प्रकल्पासाठी देऊ करायला तयार आहेत. ही संकल्पना पसरेल, तशी ही संख्याही वाढणं शक्य आहे.

सहवर्धन सभासद आपल्याला आवश्यक ते बियाणे व रोपं, कीडनाशकं यांचा व जाण्या-येण्याचा खर्च व व्यवस्था एकत्रितरीत्या करतील, जमल्यास सहकुटुंब नियमितपणे काम करतील म्हणजे तण नियंत्रणात राहील आणि आपल्यामुळे इतर सभासदांना व रोपांना त्रास होणार नाही याची दक्षता घेतील. आज पुण्यात राहण्याच्या जागेनुसार ८ घटकगट आहेत. प्रत्येक घटकगट लवकरच जवळपास असलेल्या शेतजमिनीवर किंवा सोसायटीच्या टेरेसवर सेंद्रिय पद्धतीने भाजीपाला विकसित करण्यासाठी काम सुरू करणार आहे.


IMG-20191013-WA0016'स्वच्छ भारत' या राष्ट्रीय कार्यक्रमाचा भाग म्हणून पुणे महानगरपालिकेने वर्षभर अनेक उपक्रम राबवले. त्यांपैकी एका बैठकीत ३० जुलै रोजी सहवर्धनतर्फे पाचच मिनिटांत महानगरपालिकेच्या इमारतीच्या टेरेसवर भाजीपाला उद्यान विकसित करण्याची संकल्पना मांडली. सह-आयुक्त श्री. माधव जगताप यांनी आणि नंतर अतिरिक्त आयुक्त ज्ञानेश्वर मोळक यांनी तिला मान्यता दिली. ७ सप्टेंबर रोजी सुरुवात केल्यानंतर सहवर्धन सभासदांनी पुढील तीन आठवड्यांत महानगरपालिकेच्या घोले रस्त्यावरील क्षेत्रीय कार्यालयाच्या टेरेसवर 'स्वावलंबन' हे दहा प्रकारच्या भाज्यांचं ८०० रोपाचं छत-भाजी-उद्यान विकसित केलं. 'टाकाऊतून टिकाऊ' हे तत्त्व वापरत यासाठी महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या कारवाईतून महानगरपालिकेकडे जमा झालेले क्रेट्स, घनकचरा व्यवस्थापन विभागाने उपलब्ध करून दिलेले कंपोस्ट व उसाचं पाचट आणि सहवर्धन सभासदांनी आणलेले ६० पोती एकदा वापरलेले कोकोपिट यांचा वापर करण्यात आला. सहवर्धन सभासद आणि महानगरपालिकेच्या अॅपेक्स समितीच्या अध्यक्षा श्रीमती श्यामला देसाई यांनी याकामी मनपा अधिकार्‍यांचा आणि कर्मचाऱ्यांचा पाठपुरावा केला. या प्रकल्पात अखंड काम करणाऱ्या २१ सहवर्धन स्वयंसेवकांनी स्वखर्चाने बियाणे आणि रोपं आणून लावली, आणि २१ दिवसांत भाजीपाला उद्यान विकसित करण्याचं काम स्वत: अविरत कष्ट करणाऱ्या श्री. अनिल झोडगे यांच्या नेतृत्वाखाली पूर्णत्वास नेलं. या शिलेदारांना भेटायचं असेल तर या उद्यानाला भेट द्या.


Photo-Collage-20191012-113132866


महानगरपालिकेच्या उपायुक्तांच्या हस्ते २ ऑक्टोबर रोजी या छतभाजी-उद्यानाचं उदघाटन झालं. येथून पुढील या भाजीपाला उद्यानाचं व्यवस्थापन सहवर्धन सभासदच विनामूल्य सांभाळतील. अर्थातच, या उद्यानात उत्पादित भाजीपाल्याची मालकी इथे कष्ट करणाऱ्या सहवर्धन सभासदांची असेल, पण हे उद्यान भेटीसाठी सर्व पुणे नागरिकांना विनामूल्य उपलब्ध असेल. इतकंच नव्हे, तर शहरातील ज्या सहकारी गृहनिर्माण संस्थांना अशी छत-भाजी-उद्यानं विकसित करण्याची इच्छा असेल, अशा सर्वांना सहवर्धन संघटना साह्य करेल. सहवर्धनतर्फे या टेरेसवर आणि इतरत्रही दरमहा मानवनिर्मित-रसायन-मुक्त भाजीपाला विकसित करण्यासंबंधी विविध कार्यशाळा विनामूल्य आयोजित करण्याचा विचार आहे.

पुणे महानगरपालिकेच्या घोले रस्त्यावरील क्षेत्रीय कार्यालयाच्या छतावर तीनच आठवड्यात यशस्वीरीत्या पूर्ण केलेलं भाजीपाला उद्यान पाहिल्यावर पुण्याचे आयुक्त श्री. सौरभ राव आणि महापौर सौ. मुक्ता टिळक यांनी, सहवर्धन सभासदांनी महानगरपालिकेच्या इतर इमारतींच्या छतांवरही अशी उद्यानं उभारून हरित आच्छादन करावं, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. So our track record was our supporting evidence!

शहरी शेती (urban farming) हा तसा नुकताच पडत असलेला पायंडा आहे. लोकांचं लक्ष शहरी शेतीकडे वळण्याचं कारण म्हणजे त्यापासून होऊ शकणारे सामाजिक, शारीरिक, आर्थिक आणि पर्यावरणीय फायदे. काही गोष्टींचं केवळ अस्तित्व म्हणजे धोका असतो, तर काहींचं अस्तित्व म्हणजे फायदा. उदाहरणांनी स्पष्ट करण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही स्त्री म्हणून जन्माला येणं यातच अंतर्भूत एक risk किंवा धोका आहे, स्तनांच्या कर्करोगाचा आणि गर्भाशयाच्या कर्करोगाचा. तसंच तुम्ही पुरुष म्हणून जन्माला येणं यात अंतर्भूत धोका आहे प्रोस्टेट कर्करोगाचा किंवा वृषणाच्या कर्करोगाचा. आता अस्तित्वाच्या फायद्याची उदाहरण पाहू : एखादं चांगलं पुस्तक सहज दिसेल अशा ठिकाणी उघडून ठेवलं, तर कुणीतरी ते उचलून वाचेल ही शक्यता बळावते. तद्वतच एखादा छान हिरवागार भाजीपाल्याचा वाफा आसपास दिसला, तर पाहणाऱ्यांना आपणही भाजीपाला वाढवावा असं वाटतं. त्यांच्या मनात ताज्या, हातासरशी मिळणाऱ्या भाजीपाल्याची ओढ बळावते.


Photo-Collage-20191012-112411312


आपल्या घरातील बागेत आपण वाढवलेला लालचुटुक टोमॅटो बाजारातून आणलेल्या टोमॅटोपेक्षा चवदार का लागतो? हे कळण्यासाठी आपला भाजीपाला आपणच का पिकवावा यामागचं एक प्रमुख *शास्त्रीय* कारण जाणून घ्यायला हवं. रोपावरून भाजीपाला आणि फळे तोडली की थोड्याच वेळात त्यांत रासायनिक बदल घडायला लागतात. उदाहरणार्थ, रोपापासून वेगळ्या केलेल्या पानकोबीत, पालकात, मेथीमध्ये आणि अशा अनेक भाज्यांमध्ये photosynthesisची प्रक्रिया थांबते. या भाज्या सूर्यप्रकाशापासून दूर अंधाऱ्या शीतपेटीत किंवा बंद पेट्यांमध्ये ठेवल्या जातात. परिणामी, त्यांतलं अन्नसत्त्व झपाट्याने कमी होत जातं. पेन स्टेट विश्वविद्यालयातील संशोधनानुसार, ताज्या तोडलेल्या पालकापेक्षा संग्रहित पालकात ५०% कमी folate द्रव्य असतं. संग्रहित ब्रॉकोली, टोमॅटो, पपई आणि पीच यामधील व्हिटॅमिन सीदेखील प्रकर्षाने कमी झालेलं असतं. म्हणून भाजीपाला झाडापासून तोडल्यावर ४८ तासांच्या आत वापरणं उत्तम. आणि हे सहज शक्य होतं आपण तो स्वत:च वाढवतो तेव्हा.

तुमचा स्वतःचा भाजीपाला तुम्हीच वाढवलात, तर त्यावर घातक रासायनिक कीटकनाशकांचा फवारा न करणं यावर तुमचं नियंत्रण राहतं. आणि तुमचा भाजीपाला शेकडो मैलांवरून येत नाही, तर तो तुमच्या नजरेखाली, तुमच्याच टेरेसवर, बाल्कनीत किंवा परसबागेत वाढतो. तुम्हाला नेमकं माहीत असतं की त्या भाजीपाल्याची निर्मिती कोणी केलीय, तुम्हीच! आणि तुम्ही तो जेव्हा तुमच्या मित्रपरिवाराबरोबर वाढवता, तेव्हा आणखी एक फायदा होतो - तुम्ही लोकांशी गप्पा मारता, त्यांच्याकडून नवनवीन गोष्टी शिकता, तुम्हाला असलेली माहिती इतरांना देता. संभाषणचातुर्य हा काही कमी महत्त्वाचा फायदा नाही. बरेचदा, असं गप्पा मारत एकत्र काम करताना तुम्ही दुःख, दुखणी विसरता.. हा therapeutic फायदाही महत्त्वाचा आहे.

टेरेसवर भाजीपाला विकसित करण्याचा मुद्दा थोडासा सोलर पॅनेलसारखा आहे. तुम्हाला थोडे पैसे गुंतवावे लागतात, पण परिणाम म्हणून वीज वापरायला मिळते. तसंच बियाणांसाठी, खतासाठी, वाफे तयार करण्यासाठी थोडा खर्च करायला लागतो, पण शुद्ध, स्वच्छ अन्न स्वतः मिळवता येतं.

"टेरेसवर बाग केल्यापासून आमचं छप्पर थंड राहतं, पंखे आणि एसी यांवरचा खर्च कमी झालाय" असं सांगणारे खूप जण मला भेटले आहेत. तेव्हा तुम्ही वैश्विक वातावरणात एकटे बदल घडवून आणू शकणार नाही कदाचित, but every bit helps, हळूहळू अशा खूप बागा जागोजागी तयार झाल्या तर वातावरणात नक्कीच बदल घडेल.

अशा चळवळींमध्ये कधीच सर्व काही सुरळीत, एकमार्गी घडत नाही. समूह म्हटलं की 'व्यक्ती तितक्या प्रवृत्ती' हे लक्षात ठेवावं लागेल. अगदी established विषयांमध्येही बरेचदा तज्ज्ञांमध्ये मतभेद, दुमत असतं. सेंद्रिय शेती तर तशी तुलनेने नवीन कल्पना (याला फॅड म्हणणारेही बरेच सापडतील.) तेव्हा मतमतांतरं असतील हे गृहीत धरूनच मार्गक्रमण करावं लागेल. तज्ज्ञ सल्लागार तर हवेत, पण वादविवाद कमीत कमी असावेत अशी काळजी घ्यावी लागेल. त्यासाठी वादापेक्षा संवादावर भर द्यावा लागेल. काही व्यक्तींचे ego कुरवाळत बसण्यापेक्षा सर्वाधिक तज्ज्ञांना बरोबर घेऊन चालावं लागेल, एकविचाराने, एकजुटीने पुढे जावं लागेल. काही ठिकाणी फाटे फुटतील, काही प्रयत्न अयशस्वी ठरतील, याची तयारी ठेवावी लागेल आणि पुन्हा मार्गावर येण्याची जिद्द चिकाटीने जिवंत ठेवावी लागेल याची कल्पना आहे. पण समविचारी मित्र इतके मिळताहेत की हे आव्हान पेलण्याची मानसिक तयारी आहे. अनेक अनुभवी मंडळी दिवसागणिक येऊन जुळताहेत. त्यांच्या परसबागेत, छतबागेत रसरशीत, nice and healthy भाज्या पाहिल्या की सभासदांचा हुरूप वाढतो. नवनवे सभासद आपल्या टेरेसेस आणि अतिरिक्त जमिनींचे तुकडे अशा प्रकल्पांसाठी देऊ करताहेत. सुभाषचंद्र बोस बाबूंची क्षमा मागून म्हणावंसं वाटतं, "आप हमें जगह दे दो, हम आपको अच्छी सब्ज़ी देंगे!"

सहवर्धन सभासदांमध्ये आज प्रामुख्याने पुणेकर असले, तरी ठाणे, कल्याण, वापी येथीलही सभासद आहेत. नुकत्याच सकाळ वृत्तपत्र, Facebook या आणि इतर माध्यमांद्वारे झालेल्या प्रसिद्धीमुळे नासिक, रत्नागिरीच नव्हे, तर अगदी बेंगळुरू आणि हैदराबाद येथूनही सहभागी होण्याविषयी विचारणा झाली आहे.

जितक्या अधिक ठिकाणी ही संकल्पना राबवू शकू, तितक्या अधिक ठिकाणी ओल्या कचऱ्याचे निर्मूलन होईल, सेंद्रिय पद्धतीने भाजीपाला पिकेल आणि तितक्याच प्रमाणात उत्पादन खर्च कमी होऊ शकेल. स्वकष्टार्जित शुद्ध अन्न आपल्या कुटुंबासाठी पिकवतानाच देशाची भूमीही हिरवी ठेवण्यात मिळणारं समाधान अतुलनीय असेल! या सामूहिक प्रयत्नांत हातभार लावणाऱ्या सर्वांचेच या लेखाच्या माध्यमातून मनापासून आभार!

***

सहवर्धन ग्रूपचं Facebook page आणि YouTube channel करण्याचं काम चालू आहे. काही कंपन्यांनी CSR fundsद्वारे मदत करण्यात रस दाखवल्याने, NGO म्हणून सहवर्धनची नोंदणी करण्याविषयीही विचार चालू आहे. हा लेख वाचून आपल्यापैकीही बरेचसे 'किंचित शेतकरी' प्रोत्साहित होतील अशी अपेक्षा आहे. अशा सर्वांना विनंती आहे की त्यांनी sahavardhanindia@gmail.com या पत्त्यावर ई-मेल पाठवावेत. त्यात आपलं नाव, राहण्याचं शहर आणि Whats App क्रमांक ही माहिती द्यावी.

जाता जाता, WhatsApp या सामाजिक माध्यमातून ही चळवळ उभी राहिली खरी, पण माझ्या वैयक्तिक जीवनात एक बदल घडला आहे, तो चांगलाच आहे की नाही याची खातरी नाही! "आबा सारखेच Whats Appवर असतात!" ही नातींची नेहमीच तक्रार ऐकून गेल्या रविवारी, सॉफ्टवेअर इंजीनिअर असलेल्या माझ्या मुलाने माझ्या महिन्याभराच्या mobile phone वापराचा आढावा घेतला. मी म्हणे सरासरीने ५ तास झोपलो आणि जागृतीच्या १९ तासांपैकी ९ तास Whats App आणि ६ तास बातम्या, ई-मेल वगैरे गोष्टींसाठी screen चालू ठेवला - म्हणजे दिवसातले फक्त पाच तास कुटुंबासाठी, मित्रांसाठी, नातेवाइकांसाठी आणि स्वत:साठी दिले. That doesn't sound nice and healthy!

प्रकाशचित्रे श्रेयनिर्देश : निर्मला थोरमोटे, माधुरी चव्हाण, श्यामला देसाई, वृषाली ठाकूरदेसाई, अर्चना गोगटे, मेधा टेंगशे, विवेक बापट.


20191016-122815

अनुक्रमणिका

प्रतिक्रिया

चौकटराजा's picture

26 Oct 2019 - 9:39 am | चौकटराजा

माझी एक पुतणी न्यू जर्सी मध्ये राहाते . आता तुमचा लेख वाचून मला असे वाटते की सेन्द्रिय फळभाजा व पालेभाज्या बद्दल अमेरिकेत अवेअरनेस फार असावा .कारण भारत देशात ती असताना घरच्या कुंड्याना देखील पाणी कधी घालत नव्हती. आता तिथे ती भेंडी , वांगी ,टॉमोटो चे पीक बागेत लावते ! मला बागकामाची आवड आहे पण ती ग्रीनरी पुरती . आपल्या या उपक्रमात मात्र मी शुभेछा देतोय !

कुमार१'s picture

26 Oct 2019 - 10:30 am | कुमार१

उपक्रम आवडला
शुभेछा !

सुरेख! हा उपक्रम आवडला. लवकरच सगळी माहिती घ्यायला आणि ही बाग बघायला संपर्क करते.

गुल्लू दादा's picture

2 Nov 2019 - 12:29 am | गुल्लू दादा

खूप छान उपक्रम

प्रशंसनीय उपक्रम. पुण्यास येणे होईल तेव्हा 'स्वावलंबन' ह्या छत-भाजी-उद्यानास अवश्य भेट देईन.
धन्यवाद.

"टेरेसवर बाग केल्यापासून आमचं छप्पर थंड राहतं, पंखे आणि एसी यांवरचा खर्च कमी झालाय" असं सांगणारे खूप जण मला भेटले आहेत. तेव्हा तुम्ही वैश्विक वातावरणात एकटे बदल घडवून आणू शकणार नाही कदाचित, but every bit helps, हळूहळू अशा खूप बागा जागोजागी तयार झाल्या तर वातावरणात नक्कीच बदल घडेल.

वैश्विक सोडा खोलीच्या तापमानात जरी बदल होत असेल तर मोठी गोष्ट आहे.

श्वेता२४'s picture

6 Nov 2019 - 11:28 am | श्वेता२४

शुभेच्छा

संजय पाटिल's picture

6 Nov 2019 - 1:46 pm | संजय पाटिल

छान! मला पण असे बागकाम करायला आवडेल! मेल केला आहे...

पद्मावति's picture

6 Nov 2019 - 2:29 pm | पद्मावति

उत्तम उपक्रम.

अनिंद्य's picture

6 Nov 2019 - 4:19 pm | अनिंद्य

@ बहुगुणी,

आवडीच्या विषयावरचा सविस्तर लेख.

बागकामाची आवड आहेच, शहरी शेतकरी बनायचा प्रयत्न आहे. ह्यावर्षी छोट्या कुंड्यातून सुमारे एक किलो हिरव्या मिरच्यांचे भरघोस उत्पादन घेतले आहे.

उपक्रमास शुभेच्छा.

प्रथम मला हा वेगळ्याच विषयावर लेख लिहायला उद्युक्त करणाऱ्या यशोधरा यांचे आभार!

हा लेख लिहून झाल्यानंतरचा update; सहवर्धन गृप तर्फे आणखी एका नावीन्यपूर्ण उपक्रमाला १ डिसेंबर पासून सुरूवात होते आहे. पुण्यातील एका शिक्षण समूहाच्या २०००हून अधिक विद्यार्थी व शिक्षकांना सहभागी करून घेऊन संस्थेच्या इमारतींवरील अंदाजे १५००० SF टेरेसवर विद्यार्थ्यांसाठी सेंद्रिय पद्धतीने भाजीपाला विकसित केला जाणार आहे.

सर्व शुभेच्छांबद्दल धन्यवाद!

यशोधरा's picture

7 Nov 2019 - 9:22 am | यशोधरा

बहुगुणीजी, _/\_

पैलवान's picture

7 Nov 2019 - 10:50 am | पैलवान

इतके लोक एकत्र येऊन काहीतरी constructive काम करतायेत खरोखर कौतुकास्पद आहे.
आणि किमान स्वतःचा, स्वतःच्या कुटुंबाचा जरी यातून फायदा होत असेल तर ती ही चांगलीच गोष्ट आहे.

सुमो's picture

7 Nov 2019 - 12:50 pm | सुमो

आणि स्पृहणीय उपक्रम.. बहुगुणी तुम्हाला आणि या उपक्रमात सहभागी असलेल्या सर्वांना शुभेच्छा.

"आबा सारखेच Whats Appवर असतात!"
ही नातींची तक्रार खूप गोड .

इथे quality time द्यावा ही विनंती :)

बहुगुणी's picture

7 Nov 2019 - 4:50 pm | बहुगुणी

नातींना अधिक वेळ देता यावा यासाठीच मुळात मुदतपूर्व निवृत्ती घेतली आहे याची जाणीव ठेवून WhatsApp चा वेळ आणि आंतरजालावर वावर कटाक्षाने कमी करण्याचा प्रयत्न करतो, तरीही कधीतरी विसरतोच. 'टोचल्याबद्दल' मनापासून आभार!☺️

मुक्त विहारि's picture

21 Nov 2019 - 9:45 pm | मुक्त विहारि

दोन वर्षां पुर्वी मी नैसर्गिक पद्धतीने मिरची लागवड केली होती.

ह्या वर्षी नैसर्गिक पद्धतीने हळदीचा प्रयोग करत आहे.