InShort 5 – Printed Rainbow (शॉर्ट-फिल्म)

मनिष's picture
मनिष in जनातलं, मनातलं
23 Oct 2019 - 11:27 am

भारतीय अ‍ॅनिमेशन मुळातच फार प्रचलित नाही, त्यातही अ‍ॅनिमेशन बनवलेच तर ते मुलांसाठीच असते असा साधारणपणे आपल्याकडे समज आहे. त्यात प्रौढांसाठी अ‍ॅनिमेशन बनवणे, तेही २००६ च्या सुमारास किती अवघड असेल ह्याची कल्पना आपण करू शकतो. 'प्रिंटेड रेनबो' ही अशीच एक मोठ्यांसाठी बनवलेली, अगदी चुकवू नये अशी तरल अ‍ॅनिमेशन फिल्म आहे.

Printed Rainbow/प्रिंटेड रेनबो (Silent/2006 ~ १५ मिनिटे) ह्या गीतांजली राव ह्यांनी दिग्दर्शित केलेल्या शॉर्ट-फिल्मने २००६ मधे कॅन्स येथील महोत्सवात ३ पारितोषिके मिळवली आहे, त्यात सर्वोत्तम शॉर्ट-फिल्मचे पारितोषिकही आहे. त्याशिवाय विविध २२ पारितोषिके ह्या शॉर्ट-फिल्मने मिळवली आहेत. गीतांजली राव ह्यांनी पडद्यावर कलाकार म्हणून अभिनयही केला आहे. मला स्मरणात राहिलेली त्यांची भुमिका म्हणजे २०१८ च्या 'ऑक्टोबर' ह्या चित्रपटातील शिऊलीच्या आईची, प्रो. विद्या ऐय्यर ह्यांची. शॉर्ट-फिल्म प्रिंटेड रेनबोचे दिग्दर्शन, निर्मिती अणि महत्वाचे म्हणजे सगळ्या फिल्मचे अ‍ॅनिमेशन त्यांनीच केले आहे, तेंव्हा ह्या सगळ्या पारितोषिकांचे श्रेय त्यांचेच आहे.

प्रिंटेड रेनबो ही गोष्ट आहे एका वयस्कर, एकट्या आजींची आणि त्यांच्या मांजरीची. मुंबईसारख्या महानगरातील काँक्रिटच्या जंगलात दाटीवाटीने राहूनही एकटे पडणार्‍या माणसांची, काळ्या-करड्या आयुष्यातल्या विरंगुळ्याची, छंदांची आणि त्यांच्या उबदार नात्यांची. अशाच एका इमारतीतल्या एका फ्लॅटमधे आपल्या मांजरीबरोबर एकट्या रहाणार्‍या ह्या वयस्कर आजी रोजच्या, एकसुरी रुटीनमधे सरकत आहेत. रोज चहा घेऊन मांजरीला खायला देऊन मग साफ-सफाई, थोडी भांडी, कपड्यांच्या घड्या घालून बाल्कनीतून बसून राहतात. ह्यात एका सीनमधे ह्या आजी दुसर्‍या घरांतल्या बाल्कनीत, खिडकीत बघत असतात, कोणी झाडाला पाणी देतंय, कोणी शिवण करतंय, बहिण-भाऊ खेळतायत, एक व्हीलचेअरवरचा मुलगा चिमणीशी खेळतोय आणि असंच काहितरी. असाच एक सीन 'लंचबॉक्स' मधे आहे - इरफान सिगारेट ओढत आपल्या बाल्कनीतून समोरच्या घरातल्या जेवणार्‍या कुटंबाकडे असुयेने बघत असतो.त्याच्या खिन्न डोळ्यात जाणवणारा एकाकीपणा अंगावर काटा आणतो. तसाच काहिसा परिणाम राव ह्यांनी ह्या सीनमधे आणला आहे - इथे त्या आजी फ्रेममधे नसूनही त्यांचा एकटेपणा प्रभावीपणे जाणवून जातो.

गीतांजली राव ह्या जे. जे. स्कूल ऑफ आर्टस् च्या विद्यार्थीनी. त्यांची रंगांची, टेक्शरची आणि त्यांच्या संयोजनाची समज त्यांच्या प्रिंटेड रेनबो ह्या सुरुवातीच्या शॉर्ट-फिल्ममधेही जाणवते. ह्या आजी गोल-गोल आहेत, फारसे फिचर्स असे दाखवलेच नाहीत. तरीही त्यांच्या चष्म्याआड लुकलुकणार्‍या डोळ्यातला प्रेमळ, समजुतदार अनुभव जाणवतो. तसेच त्यांच्यासारखेच कुत्र्याबरोबर एकटे रहाणार्‍या आजोबांची आपुलकीही जाणवते. धुसर, करड्या फ्रेममधेही त्यांच्या दोघांच्या देहबोलीतून तो जिव्हाळा फ्रेम्स उबदार करतो. काळ्या-करड्या सीनमधले धूसर, दाणेदार टेक्शर, रंगीत फ्रेममधली रंगाची उधळण आणि संगती, त्यांचा एकत्रित होणारा परिणाम हे अतिशय विचारपुर्वक आणि सुरेखपणे घडवले आहे. शांतपणे बसून सर्जनशील राव यांनी मेहनतीने चितारलेली प्रिंटेड रेनबोची एकेक फ्रेम बघतांना भरून येते.

तर ह्या एकट्या आजींचा आवडता छंद आहे तो त्यांनी जमवलेल्या काड्यापेट्या बघणे. ह्या विरंगुळ्यात त्या अगदी रमून जातात. त्या काड्यापेट्यांवरची वेगवेगळी, रंगीबेरंगी चित्रे पाहतांना त्या मनाने त्याच कल्पनेच्या दुनियेत प्रवेश करतात. प्रवेश करतात म्हणजे अक्षरशः तिथेच जातात, आणि त्यांच्याबरोबर आपणही एखाद्या लहान मुलासारखे तिथे जातो. राव ह्यांनी काड्यापेट्यांवरील चित्रांनी एक आगळे-वेगळे विश्व उभारले आहे. मी साधारण ७-८ वर्षांपुर्वी ही शॉर्ट-फिल्म पहिल्यांदा मोठ्या पडद्यावर पाहिली होती. तेंव्हापासूनच मी ह्या फॅन्टसीवर बेहद फिदा आहे. गीतांजली राव ह्यांनी ही कल्पना फार प्रेमाने, निगुतीने फिल्ममधे चितारली आहे. आजींच्या ह्या कल्पनेच्या राज्यात हत्ती आहेत, अलिशान महाल आहेत, स्वर्गीय संगीत आहे आणि ह्या सगळ्यांचा आस्वाद घेणार्‍या स्त्रिया आहेत. त्यातले काही सीन बघुन तर डॉ. उज्ज्वला दळवी ह्यांनी 'सोन्याच्या धुराचे ठसके' मधे लिहिलेल्या स्त्रियांच्या परीकथेतील रात्रीची आठवण झाली. आपल्या ह्या आजीही निखळ आनंदाने त्या सर्व मौजमजेत सामिल होतात, अगदी शांत, सुरेल रात्रीच्या नदीच्या पाण्यात दीपदानही पाहतात. संगीत म्हणाल तर दस्तुरखुद्द बेग़म अख़्तर यांची 'न जा बलम परदेस' ही मिश्र खमाज़मधली ठुमरी आहे, ठुमरीचे थोडेसेच सूर अशी काही हुरहूर लावून जातात की विचारू नका.

आजींच्या ह्या विरंगुळ्यात सामील आहेत ते समोरच रहाणारे, त्यांच्यासारखेच आपल्या कुत्र्याच्या सोबतीने एकटे राहणारे वयोवृध्द आजोबा. ते आजोबाही हौसेने आजींना काड्यापेट्या आणून देतात. त्या दोघांचा एकटेपणा वेगवेगळा आहे तसाच एकत्रही आहे. आजी निवांत वेळी बाकी काड्यापेट्या बाजूला ठेवून, आजोबांनी आवर्जून आणलेली काड्यापेटी निरखत आरामखुर्चीत डोलत-डोलत आपल्या कल्पनेच्या रंगीत, आनंदी विश्वात हरवून जातात. ह्या आनंदी, काल्पनिक अनुभवांसाठी वापरलेल्या सुरावटीही सुरेल आणि प्रसंगाला साजेशा आहेत. ट्रक चालवतांना भुरुभुरू उडणारे त्यांचे केस, आनंदाने लुकलुकणारे डोळे, पाण्यातून मासा काढून मांजरीला देतांना, फुलांच्या झाडांवर झोका घेतांना आणि त्यांच्या त्या हिरव्यागार बागेत रममाण होतांना अगदी एखाद्या निरागस लहान मुलीसारख्या सुखी दिसतात.

सद्यकालीन माणसांच्या नात्यांत येणारा दुरावा, त्यांना वाटणारा एकाकीपणा हा धागा कित्येक चित्रपटांत पहायला मिळतो - अगदी भारतातील रुचिका ओबेरॉयच्या 'आयलंड सिटी' पासून अगदी बेहताश सनीहा (Behtash Sanaeeha) ह्यांच्या इराणी 'Risk Of Acid Rain' ह्या चित्रपटांमधे हा माणसांचा एकाकीपणा, आणि मैत्रीची, नात्यांची सार्वत्रिक गरज फार संवेदनशीलपणे दाखवली आहे. गीतांजली राव प्रिंटेड रेनबो ह्या शॉर्ट-फिल्ममधे अशा एकाकीपणाकडे सहानुभुतीने बघतात, पण एकटेपणा म्हणजे फक्त एकाकीपणा आणि दु:ख असे ठोकळेबाज समीकरण मांडत नाही. एकट्या आजी आपल्या आयुष्यात आणि कल्पनाविश्वात तशा मजेत असतात. सोबतीला प्रेमळ, लठ्ठ मांजर आणि सुहृद आजोबांच्या रुपाने एक उबदार मानवी नातेही जपतात. या सगळ्याच पात्रांबद्दल आपल्याला आपुलकी वाटते. त्यामुळेच असेल कदाचित, पण ह्या शॉर्ट-फिल्मविषयी लिहितांना 'ती वृध्द स्त्री' किंवा 'ते वयोवृध्द गृहस्थ' असे तिर्‍हाईतासारखे नाही लिहिता येत, आपल्या परिचयातले आजी, आजोबा हेच त्यांच्यासाठी श्रेयस्कर वाटते. ही शॉर्ट-फिल्म थोडीफार त्यांच्या आईवर आणि तिच्या मांजरीवर आधारीत आहे असे गीतांजली राव एका इंटरव्ह्यूमधे म्हणाल्या आहेत. त्यांची ही आत्मियता ह्या फिल्ममधे, त्या आजीच्या पात्रामधे जाणवल्यावाचून राहत नाही.

शेवटी हिरव्यागार बागेत, झाडांमधे, प्राण्यांमधे बागडणार्‍या आनंदी आजी एक पूल ओलांडतात. एका दोरीवर त्यांची आणि मांजरीची वस्त्रं वाळत असतात. 'वासांसि जीर्णानि ...' डोळ्यांसमोर उलगडते आणि काडेपेटीच्या जगातल्या एका छोट्याशा घरात आरामखुर्चीवर बसून, आरामात डुलत आजी समाधानाने बाय-बाय करतात.

Printed Rainbow

चित्रपटआस्वाद

प्रतिक्रिया

यशोधरा's picture

23 Oct 2019 - 11:41 am | यशोधरा

चित्रफीत तर पाहीनच पण तू सुरेख उलगडले आहेस कथानक.

मकरंद घोडके's picture

23 Oct 2019 - 1:30 pm | मकरंद घोडके

क मा ल आहे !

गोंधळी's picture

23 Oct 2019 - 9:30 pm | गोंधळी

क्लासिक अ‍ॅनिमेशन.

@यशोधरा - फिल्म नक्की पहा, लेख वाचला नाही तरी चालेल. :-)
मकरंद घोडके आणि गोंधळी - प्रतिक्रियांबद्दल आभार.

यशोधरा's picture

23 Oct 2019 - 10:31 pm | यशोधरा

नक्की बघणार.