जस्ट 'ड्यु' इट : माझ्या पहिल्या डयुअ‍ॅथलॉनची गोष्ट

Primary tabs

आरती's picture
आरती in दिवाळी अंक
25 Oct 2019 - 6:00 am


मिपा दिवाळी अंक  २०१९

अनुक्रमणिका
जस्ट 'ड्यु' इट : माझ्या पहिल्या डयुअ‍ॅथलॉनची गोष्टमार्च महिन्यात, पोर्टलंड वॉटरफ्रंटला मी 'शॅमरॉक हाफ मॅरॅथॉन'ची फिनिश लाइन ओलांडली. लोक टाळ्या वाजवत होते, एकीकडे अनाउन्समेंट्स चालल्या होत्या, म्युझिक वाजत होतं. समोर 'रन टाइम मोजणारं घड्याळ' दिसत होतं. पण माझं या कशाकडेच लक्ष नव्हतं. 'फिनिश' असं लिहिलेल्या त्या भल्यामोठ्या कमानी खालून जात असताना माझ्या मनात मात्र वेगळेच विचार चालले होते…. 'ही हाफ मॅरॅथॉन झाली. आता ड्युअ‍ॅथलॉन करायची'.

झालं... मनात विचार आला आणि मला ड्युअ‍ॅथलॉन करण्याचे वेध लागले. त्यानंतर पुढचे काही दिवस पोर्टलंड भागात कधी, कोणत्या ड्युअ‍ॅथलॉन आहेत त्याची माहिती काढण्यात गेलं आणि २४ एप्रिलला 'होम डेपो स्प्रिंग क्लासिक ड्युअ‍ॅथलॉन' असल्याचं समजलं. स्पर्धेविषयी जुजबी माहिती गोळा केली. ही ड्युअ‍ॅथलॉन ५ कि.मी. रनिंग, मग १५ मैल सायकलिंग आणि मग परत ५ कि.मी. रनिंग या स्वरूपाची होती. मागच्या दोन वर्षात सायकलिंग आणि मुख्य म्हणजे हायकिंग करत असल्याने रनिंग तसं मागे पडलं होतं. म्हणजे जितकं धावायला हवं, तितकं नियमित माझं अजिबातच धावणं होत नव्हतं. शिवाय रस्त्यावर धावण्याचा सराव हा बर्‍याचदा इथल्या हवामानाच्या मर्जीवर अवलंबून असलेला. चार-पाच महिन्यांच्या हिवाळ्यानंतर अजून शरीर आणि मन दोन्ही 'हायबरनेशन'मधून बाहेर पडलं नव्हतं. त्यामुळे ड्युअ‍ॅथलॉन करायचा प्रयत्न करावा असा मनात विचार येत असला, तरी रनिंग, सायकलिंग आणि मग परत रनिंग असं एकानंतर एक जमेल का? याची मला खातरी नव्हती.images


रेसची माहिती वाचताना कळलं की टीम तयार करून ‘रीले’ म्हणूनसुद्धा ही ड्युअ‍ॅथलॉन करता येते. शॅमरॉक हाफ मॅरॅथॉननंतर पायाच्या दुखापतीमुळे मुकुलचं रनिंग बंद असल्यामुळे माझा नेहमीचा ‘पार्टनर इन क्राइम’ ड्युअ‍ॅथलॉनमधे माझ्या बरोबर भाग घेऊ शकत नव्हता. मग सायकलिंग, रनिंग करणार्‍या एक दोन मित्रांना ‘रीले टीम’साठी विचारलं. पण नियम वाचल्यावर समजलं की पार्टनरपैकी एकानं पळायचं आणि एकानं सायकलायचं. आता मात्र मी पेचात पडले. कारण मुळात माझा ड्युअ‍ॅथलॉन करण्याचा उद्देशच हा होता की, मला पळणं आणि सायकलिंग अशा दोन अ‍ॅक्टिव्हिटीज एकाच रेसचा भाग म्हणून एकानंतर एक करायचं चॅलेंज घ्यायचं होतं. आता पार्टनरबरोबर रीले केली तर हा मूळ हेतूच बाजूला राहत होता. अखेरीस मी एकटीनेच ड्युअ‍ॅथलॉन करायचं ठरवलं. पण 'मला जमेल का? कोणीच नाहीये बरोबर, तर एकटीने भाग घ्यावा का?' अशा विविध शंका मनात यायला लागल्या. त्यामुळे ड्युअ‍ॅथलॉन करायची इच्छा असली, तरी ठोस निर्णय होत नव्हता. माझ्याच 'होय - नाही... तळ्यात-मळ्यात'ला कंटाळून शेवटी मी या विषयावर बोलणंच बंद केलं. जणू ड्युअ‍ॅथलॉन हा विषय मी माझ्यापुरता संपवूनच टाकला.

महिना-दीड महिना असाच उलटून गेला. नेहेमीचंच रुटीन आयुष्य चालू राहिलं. करता करता २२ एप्रिल उजाडला आणि मनात दडवून ठेवलेल्या ड्युअ‍ॅथलॉनच्या विचाराने अचानक उसळी मारली. 'जेव्हा केव्हा ड्युअ‍ॅथलॉन करणार, त्या वेळी फर्स्ट टाइम, पहिली वेळ असणारच. मग याच वेळी का नाही? कितीही काळजी वगैरे घेतली तरी हे पळणं, सायकलिंग, हायकिंग, व्यायाम करताना, खेळताना शारीरिक दुखापतीचा, इजा होण्याचा धोका तर कायम असतोच. आज निदान काही शारीरिक दुखापत नाहीये, शरीर तंदुरुस्त आहे तेव्हाच संधी आहे. त्यामुळे प्रयत्नच जर करायचा आहे तर आत्ताच करू या' असं स्वतःला सांगितलं. निर्णय पक्का केला आणि कोणत्याही कारणस्तव विचार परत बदलायच्या आत लगेच रेससाठी रजिस्ट्रर करायला म्हणून रेसच्या वेबसाइटवर गेले.images-1


पोर्टलंडमधे नायकी (Nike) कंपनीचं ग्लोबल हेडक्वार्टर आहे, त्यामुळे पोर्टलंड परिसरात एकूणच नाइकीचा लोगो आणि त्यांची 'जस्ट डु इट' ही सुप्रसिद्ध टॅगलाइन जागोजागी दिसतात. यावरूनच बनवलेली ड्युअ‍ॅथलॉनची 'जस्ट ड्यु-इट' ही टॅगलाइन वेबसाइटवर मोठ्या अक्षरात झळकत होती. मी मोठ्या आवेशात वेबसाइटवर नावनोंदणी करायला गेले खरी, पण ऑनलाइन रजिस्ट्रेशनची डेडलाइन नेमकी आदल्या रात्री १२ वाजताच संपलेली. मी थोडी खट्टू झाले. पण अजूनही नावनोंदणी करायचा एक मार्ग शिल्लक होता. त्यामुळे अजून एक दिवस निर्णयावर ठाम राहून,२३ एप्रिलला, ‘पॅकेट पिक अप’साठी जे ठिकाण असतं, तिथे बूथवर जाऊन रजिस्टर केलं.

तिथे लोक त्यांच्या ५ कि.मी., १० कि.मी., हाफ मॅरॅथॉन आणि ड्युअ‍ॅथलॉन अशा विविध रेसेसची पाकिटं, टीशर्टवर लावायचे 'बिब नंबर', टीशर्ट्स घ्यायला आले होते. या अशा ‘पॅकेट पिक अप’ इव्हेंटचा माहोल एकदम मस्त, उत्साही असतो. तिथले स्वयंसेवक खूप मनापासून माहिती देतात, मदत करतात. एकूणच खूप 'एन्करेजिंग' आणि हुरूप वाढवणारं वातावरण. मी ड्युअ‍ॅथलॉनसाठी नावनोंदणी केल्यावर तिथल्या स्वयंसेवक मुलीने, टीशर्टपासून ते प्रोटीन स्नॅक बार, पॅक केलेला मिल्कशेक, पुढच्या अनेक रेसेसची माहितीपत्रकं अशा विविध गोष्टींनी भरलेली पिशवी आणि त्याच्या बरोबरीने एक ५-६ पानी 'सूचना पत्रक' - ड्युअ‍ॅथलॉन इनस्ट्रक्शन मॅन्युअल माझ्या हातात ठेवलं. ह्या पत्रकामध्ये ड्युअ‍ॅथलॉनची तयारी, वेळापत्रक, पाळायचे नियम, पळायचा आणि सायकलायचा रस्ता ह्याबद्दल सविस्तर माहिती होती. तुमचा स्पर्धक क्रमांक म्हणजेच बिब नंबर टीशर्टवर कसा लावायचा, सायकलवर - हेल्मेटवर कुठे कुठे नंबर चिकटवायचे इथपासून ते सायकल घेऊन सकाळी किती वाजता रिपोर्ट करायचं, ह्या सगळ्या सूचना होत्या. शिवाय ही रेस असल्याने, वेळ मोजण्यासाठी 'टाइमिंग चिप' होती, जिच्यामधून तुमच्या बुटाच्या लेसेस ओवून ती बुटाला लावायची होती.

हे पत्रक वाचताना आणि सायकलमध्ये हवा भरणं, पाण्याच्या बाटल्या भरून ठेवणं ही रेस-डेच्या आदल्या संध्याकाळची सगळी तयारी करत असताना थोडं थोडं दडपणही यायला लागलं. एक ब्रेड आणि चीजचा स्लाईस असं रेससाठी आवश्यक असलेलं कार्बोहायड्रेट्स असलेलं खाणं म्हणजेच कार्बो लोड करून घेतलं. अनुभवातून शिकलेल्या महत्त्वाच्या गोष्टीची - म्हणजे रेसच्या आदल्या दिवशी लवकर झोपून पूर्ण झोप घेणं आणि शरीराला विश्रांती देणं - आठवण ठेवून काहीशी नर्व्हस, पण तरीही एक्सायटेड अवस्थेत लवकर झोपले.

२४ एप्रिल. 'द- डे'! माझ्या पहिल्या ड्युअ‍ॅथलॉनचा दिवस. पहाटे लवकर उठून, गाडीला सायकल लावून सर्व तयारीसकट आम्ही ठरलेल्या वेळी रेसच्या ठिकाणी पोहोचलो. मुकुल रेसमध्ये भाग घेत नसल्याने, 'रेस डे सपोर्ट'ची अतिशय महत्त्वाची बाजू त्याने सांभाळली. आज सपोर्टला तो असल्याने, बोचरी थंडी वाजू नये म्हणून घातलेलं नेहेमीचं विंटर जॅकेट आयत्या वेळी कुठे काढून ठेवायचं, किंवा ऊब मिळावी म्हणून पीत असलेल्या हातातल्या कॉफीच्या कपचं शेवटी काय करायचं असले बारीकबारीक प्लॅन आणि विचार करायची गरज नव्हती. त्या बाबतीत मी निर्धास्त होते आणि पूर्णत: रेसवर लक्ष केंद्रित करू शकत होते. जसा नाटकाचा उत्तम प्रयोग होण्यामधे बॅकस्टेज सपोर्ट अतिशय महत्त्वाचा असतो, अगदी तसंच, खासकरून थंडी, पाऊस, वारा असताना किंवा एकूणच रनिंग किंवा सायकलिंग करताना 'रेस डे सपोर्ट' किती महत्त्वाचा असतो, हे याही वेळी परत एकदा जाणवलं.

नेमून दिलेल्या जागी गाडी पार्क करून, गाडीतून सायकल आणि सगळं सामान घेऊन आम्ही 'सायकल स्टेजिंग एरिया'पाशी पोहोचलो. तिथे गेल्यावर आम्हाला, मोठ्या मेहनतीनं बुटांच्या लेसेसमध्ये ओवलेल्या 'टायमिंग चिप' परत करा असं सांगण्यात आलं. कारण काय, तर सायकलिंगचे जे स्पेशल शूज असतात (त्यांना क्लीट्स म्हणतात) त्यांना बहुतांश वेळा लेसेस नसतात. त्यामुळे तसे शूज वापरणार्‍या लोकांना त्या शूजला टायमिंग चिप लावता येणार नाही, हे संयोजकांच्या लक्षात आल्याने त्यांनी आधी दिलेल्या सगळ्या चिप्स परत घेऊन त्याऐवजी टायमिंग चिप असलेला घोट्याला किंवा पायाला बांधायचा टायमिंग बेल्ट दिला. आजकाल टीव्ही सिरियलवरच्या बहुतेक कलाकारांच्या पायात एक काळा दोरा, गंडा बांधलेला दिसतो. पायाच्या घोट्याला काळ्या रंगाचा टायमिंग बेल्ट बांधता बांधता त्या काळ्या दोर्‍याची आठवण आलीच. ही चिप बांधून होईपर्यंतच मग तिथल्या एका स्वयंसेवकाने माझ्या डाव्या हातावर स्पर्धक क्रमांक, उजव्या हातावर इमर्जन्सी फोन नंबर, डाव्या पायाच्या पोटरीवर ड्युअ‍ॅथलॉनचा मोठ्ठा 'D' आणि उजव्या पायाच्या पोटरीवर वय, असं काळ्या मार्कर पेनाने ‘बॉडी मार्किंग’ केलं. ड्युअ‍ॅथलॉन, ट्राअ‍ॅथलॉन असोसिएअशनच्या नियमाप्रमाणे इमर्जन्सी परिस्थिती आलीच तर लगेच माहिती मिळावी, म्हणून हे बॉडी मार्किंग आवश्यक असतं. ह्या सगळ्या सोपस्कारांनंतरच आम्हाला स्टेजिंग एरियात प्रवेश मिळाला. तिथे स्पर्धक क्रमांकाप्रमाणे सायकली लावून ठेवण्यासाठी रॅक्स ठेवले होते. आमच्या सूचनापत्रकात एक विशेष कोकणस्थी वाटावी अशी एक सूचना होती, जी वाचून मी मनसोक्त हसून घेतलं होतं. ती सूचना म्हणजे - 'येताना स्वयंपाकघरात वापरायचा एक लहानसाच किचन टॉवेल तुमच्याबरोबर घेऊन या. तो सायकलशेजारी अंथरून त्यावर सायकलींचं हेल्मेट, गॉगल, शूज आणि सायकलिंगसाठी लागणारं इतर साहित्य व्यवस्थित मांडून ठेवा.' त्या सूचनेप्रमाणे सायकल रॅकवर अडकवून त्या शेजारी जमिनीवर छोट्या टॉवेलवर सगळ्या वस्तू व्यवस्थितपणे मांडून ठेवल्या. पाऊस पडत असल्याने त्यावर एक प्लॅस्टीकची पिशवी अंथरली. आता सगळी आवश्यक तयारी झाली होती. एव्हाना पोटात नर्व्हसनेसच्या बटरफ्लाइजनी, रंगीबेरंगी फूलपाखरांनी चांगलाच धुमाकूळ घालायला सुरुवात केली होती. थंडी बोचत होती, पाऊस पडत होता आणि गरम गरम चहा पीत ‘अब जो होगा देखा जायेगा’ असा विचार करत मी स्टार्ट लाइनच्या दिशेने चालायला सुरुवात केली होती.

***

'होम डेपो स्प्रिंग क्लासिक ड्युअ‍ॅथलॉन’मध्ये भाग घेतलेले आम्ही सगळे लोक दाटीवाटीने स्टार्ट लाइनपाशी उभे आहोत. त्यातही कोणी स्ट्रेचिंग करतंय, कोणी गप्पा मारतंय, कोणी कानातले हेडफोन्स नीट करतंय, कोणी फोनवरच्या अ‍ॅप्समध्ये आजच्या ड्युअ‍ॅथलॉनसाठी टायमर सेट करतंय, कोणी आजूबाजूच्या लोकांचे फोटो काढतंय, तर कोणी स्टार्ट लाइनला मित्रमंडळींसोबत सेल्फी काढतंय, असा सगळा माहोल. अशा वेळी मी सोडून सगळ्यांच्या चेहर्‍यावर, बॉडी लँग्वेजमध्ये प्रचंड आत्मविश्वास आहे असं मला वाटतं. या सगळ्यात मी फारच नवशिकी, काहीशी हरवलेली वाटते. रेस सुरू होण्याच्या जेमतेम २ मिनिटं आधी मला अचानक माझ्या उजव्या पायातल्या बुटामध्ये खडा असल्याचा भास होतो. पुढचं अर्ध मिनिट तो भास आहे, नर्व्हसनेसमुळे आपल्याला तसं उगाचच वाटतंय की खडा खरंच टोचतोय हे ठरवण्यात जातं. मग अवघं एक मिनिट बाकी असताना अखेरीस खाली वाकून मी शूज आणि त्यातला खडा काढते. हे करताना पाय स्ट्रेच करणार्‍या लोकांच्या लाथा चुकवण्याची एक वेगळीच कसरत. बुटातला खडा निघाल्याचं समाधान वाटेपर्यंतच डोक्यावरच्या टोपीचं काय करावं हा पुढचा प्रश्न मनात. पाउस पडतोय, थांबतोय, मग परत जोरात पडतोय. मला अचानक माझ्या ‘लकी टोपी’ची आठवण येते - 'मस्त फिट्ट बसायची ती डोक्यावर आणि वर्षानुवर्षं भटकताना, पळताना तीच टोपी वापरात असल्याने जणू माझ्या डोक्याचाच भाग वाटण्याइतकी कंफर्टेबल असायचे मी ती टोपी घातल्यावर. पण माझी लकी टोपी मी किलिमांजारो हायकिंगमध्ये आमच्या गाइडला भेट म्हणून देऊन टाकली. मग आत्ता डोक्यावर असलेल्या या टोपीचं काय करायचं? ही टोपी पळताना घसरून डोळ्यावर येईल असं वाटतंय, नकोच ती.' एवढा सगळा विचार मनात होईपर्यत स्पीकरवरून वाजणारं म्युझिक बंद होऊन आता रेसचा १० सेकंदाचा काउंटडाउन सुरू झालेला असतो. सगळे लोक उत्साहात १०...९....८...७... असं एकत्रितपणे म्हणताहेत. आणि इकडे माझा टोपी न घालण्याचा निर्णय पक्का होतो. मी साइडलाइनला थांबलेल्या मुकुलला जोरात टिपेच्या आवाजात हाक मारते आणि डोक्यावरून टोपी काढून त्याच्याकडे भिरकावते. तितक्यात २...१.... आणि जोरदार हॉर्न वाजतो. रेस सुरू झालेली असते. म्युझिक, चियरिंग सुरू होतं. सगळ्यांबरोबर मीदेखील मोठ्या उत्साहात स्टार्ट लाइन ओलांडते. धावणारी प्रत्येक व्यक्ती स्टार्ट लाइनला अंथरलेल्या निळ्या रंगाच्या मॅट वरून जाताना टायमिंग चिपचा अखंडपणे होणारा 'बीप बीप' आवाज पावलांच्या आवाजात मिसळतो, स्पीकरवरून आणि स्टार्ट लाइनशेजारी उभं राहून चियरिंग करणार्‍या माणसांच्या आवाजात मिसळतो. “आता परतीचे दोर कापले गेले आहेत, नो कमिंग बॅक. लढ बाप्पू” असं म्हणत मीही पळायला सुरुवात करते. इतका वेळ आजूबाजूला गर्दीत, अनेक माणसांमध्ये उभी असल्याने न जाणवलेला वारा, थंडगार हवा मी जरा मोकळ्यावर आल्यावर अतिशय अनपेक्षितपणे भसकन माझ्या नाकातोंडात शिरल्याचं जाणवतं.

ह्या भसकन शिरलेल्या वार्‍याबरोबर माझ्या पहिल्यावहिल्या डयुअ‍ॅथलॉनमधली लांबलेली, कधीच संपणार नाहीत असं वाटणारी, आणि सगळ्यात अवघड अशी ती 'दोन मिनिटं' माझ्या समोर येतात. अजून रेस चालू होऊन अवघं मिनिटही झालेलं नसतं आणि मी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या पूर्णत: हडबडलीये, हे माझ्या लक्षात येतं. मला श्वास घेता येत नाही. वरचा श्वास वर आणि खालचा श्वास खाली अशी अवस्था. कानातल्या हेडफोन्समुळे दडा बसतोय अशी स्थिती. कान-नाक-घसा एक बंद प्रेशर कुकर असल्यासारखं वाटतं. त्याहीपेक्षा वाईट म्हणजे मी मेंटली, मानसिकरीत्या घुसमटलेली असते. 'काय गरज होती सुखासुखी असलं काहीतरी ओढवून घ्यायची? हा पहिला विचार. त्याच्या पाठोपाठ 'तुझी फारशी तयारी नसताना कशाच्या भरवशावर ड्युअ‍ॅथलॉन वगैरेची खुळं भरवून घेतलीयेस डोक्यात?' हा दुसरा विचार.

मला लहानपणापासून परीक्षेच्या पेपरच्या आधी वर्गाबाहेर उभं राहून नोटस वाचणार्‍या, नवीन संकल्पनांवर चर्चा करणार्‍या लोकांची कायम भीती वाटत आलीये. त्यांच्याकडे पाहिलं की ‘आपण काहीच अभ्यास केला नाहीये' किंवा 'आपल्याला काहीच येत नाहीये' असं वाटत राहायचं. रेस चालू होण्याच्या आधी काही लोक ज्या प्रकारची तयारी करत होते, ते पाहून मी वरवर जरी शांत वाटत असले, तरी मनात कुठेतरी दडपण होतंच. रेस चालू झाल्यावर पहिल्या मिनिटातच त्या भीतीने माझा कब्जा घेतलाय.. प्रचंड ओव्हरव्हेल्मिंग फीलिंग, दडपण.

'माझी लायकीच नाही'पासून 'जमत नाहीत त्या गोष्टी हट्टाने करण्याची गरज काय?' इथपर्यंत अनेक विचार मनात एकामागून एक उसळताहेत. दुसर्‍यांच्या आणि आपल्याच अपेक्षांचं दडपण, 'सो कॉल्ड इमेज' वगैरे या सगळ्याचं जाणवणारं, थकवणारं आणि दमवणारं ओझं.
आयुष्यात कधी कधी तुम्ही कमालीच्या 'लो-कॉन्फिडन्स' पातळीला पोहोचता, त्यातलीच ही एक अवस्था. त्या काही क्षणात 'लोकांनी आजवर आपली केलेली चेष्टा, आपल्या कुवतीवर इतरांनी आणि आपण स्वतःही घेतलेल्या शंका' इथपासून कधीतरी, कुठेतरी झालेल्या लहानशा अपमानापर्यंत वाट्टेल त्या, म्हणजे वाट्टेल त्या, नकारात्मक गोष्टी आठवताहेत, जाणवताहेत, झटका देताहेत.

'स्टार्ट लाइन' इथून अवघ्या ५०० पावलाच्या अंतरावर आहे. आत्ताच मागं फिरावं, आपल्याला हे जमणार नाही, कारण हे करण्याची आपली कुवतच नाही' हा मनात उमटलेला सगळ्यात धोकादायक, बेक्कार विचार. खरं तर माझ्या वृत्तीला न पटणारा, माझ्या पिंडाला न मानवणारा, माझ्या जगण्या-वागण्याच्या पद्धतीच्या अगदी विरुद्ध विचार. पण तरीही मन परत परत कर्कशपणे ओरडून सांगत होतं 'परत फीर, तुझी तयारी नाहीये, इथूनच परत फीर.'

तो एक सगळ्यात कमकुवत क्षण. पळण्याचा वेग कमी होतोय, किंबहुना पाय आपोआप थांबायला लागलेत असं वाटायला लागलंय. मी जवळजवळ थांबते, आणि मागे फिरायचा विचार पक्का करते. आणि नेमकं त्याच क्षणी कुठून काय वाटतं, कुठून काय बळ येतं माहीत नाही. मीच स्वत:ला चक्क समजावते - 'थांबायचं नाही, वेग कमी करायचा नाही. अजून थोडा वेळ पळून बघ. निदान प्रयत्न तरी कर. इतक्या लगेच, पटकन आणि मुख्य म्हणजे प्रयत्नही न करता सोडून देणं, गिव्ह अप करणं तुझ्या स्वभावात नाही…. आत्ता पळत राहिलीस तर कदाचित थोडा जास्त शारीरिक त्रास होईल. मागे फिरलीस तर शारीरिक त्रासातून वाचशील, पण मानसिक त्रास होईल. ….आधीच लो-कॉन्फिडन्स फेजमध्ये आहेस, आता मागे फिरलीस तर आहे तोही आत्मविश्वास गमावून बसशील. मग पुढच्या प्रत्येक रन, सायकलिंग, हायकिंग सगळ्याच वेळी तुला हा क्षण त्रास देईल.

…. चित्त एकाग्र कर. जस्ट फोकस. क्रिकेटमध्ये जसं कधीकधी मोठ्ठा स्कोअर पाहून दडपण येतं, तेव्हा त्याकडे न पाहता एका वेळी एक ओव्हर विचार करणं योग्य ठरतं तसं. किंवा अमेरिकन फूटबॉलसारखं प्रतिकूल परिस्थितीत एका वेळी फक्त १० यार्ड्सचा विचार करतात तसं…. त्यामुळे आत्ता या क्षणी कॉन्संट्रेट कर. फोकस…. आख्खी ड्युअ‍ॅथलॉन पूर्ण करण्याची तयारी नसेल कदाचित तुझी. पण निदान ५ कि.मी. अंतर पळून पार करणं तुला नक्की जमण्यासारखं आहे. तितकी तुझी तयारी नक्कीच आहे. त्यामुळे सध्या फक्त पहिले ५ कि.मी. पळण्याच्या टप्प्यावर लक्ष केंद्रित कर. जितका वेळ लागेल तितका लागेल, पहिले ५ कि.मी. अंतर पळून पार कर. मग पुढचं काय ते त्या वेळी ठरव.'

पळता पळता मी चक्क माझ्याशीच बोलतीये. संवादायचा प्रयत्न करतीये. हळूहळू मन आणि शरीरही या संवादाला साथ द्यायला लागलंय असं जाणवतं. पावलांचा पळण्याचा वेळ आपोआपच वाढतो. ती दोन भयानक लांबलेली मिनिटंही संपतात आणि मनातले नकारात्मक विचारही सरतात.

अवघ्या २ मिनिटांचं हे नाट्य. पायात बळ नाही म्हणून रेस सोडून परत फिरण्याच्या क्षणापर्यंत पोहोचलेली मी नव्या उमेदीनं धावण्याचा प्रयत्न करते… नव्हे, अगदी व्यवस्थित धावूदेखील शकते. आता नाकातोंडातून भसाभसा आत शिरणार्‍या वार्‍याचंही काही वाटेनासं होतं. कोणत्याही प्रकारचा त्रास न होता, बघता बघता, मी पहिला धावण्याचा टप्पा संपवून पुढचा सायकलिंगचा टप्पा चालू करण्यासाठी, तीच स्टार्ट लाइन परत एकदा ओलांडते.

काही काही मजेशीर गोष्टी माझ्या बाबतीत का घडतात याचं मला कायम आश्चर्य वाटत आलंय. अशीच एक गोष्ट या रेसच्या दरम्यानदेखील घडते. सकाळी रेस सुरू होण्याआधी स्टार्ट लाइन कुठे आहे ते पाहून यावं, म्हणून एका स्वयंसेविकेला त्याबद्दल विचारलं असता ती मला मस्तपैकी "तुला उशीर झाला आहे असं नाही का वाटत? ५ कि.मी. रन केव्हाच चालू झाला, रनर्स आता फिनिश लाइन ओलांडत असतील" असं उत्तर उत्तर देते. मी इथे ५ कि.मी. पळण्यासाठी नाही, तर ड्युअ‍ॅथलॉनसाठी आलीये हे तिला सांगितल्यावर, ती अभावितपणे 'ओह' असं म्हणत माझ्याकडे पाहते. इथे अमेरिकेत मोटरसायकलचं लायसन्स काढायला क्लासरूम कोर्स पूर्ण करावा लागतो. त्यासाठी मी गेले असतानादेखील तिथल्या माणसानं माझ्याकडे अगदी अस्संच पाहून "शिवणाचे वर्ग शेजारच्या क्लासरूममध्ये आहेत" असं सांगितलं होतं, त्याची आठवण झाल्याशिवाय राहावत नाही. हे असं घडलं की 'आपण फारच न झेपणारं काही करायला आलो आहोत का?' असा मला प्रश्न पडतो. या रेसच्या आधीदेखील त्या बाईच्या 'ओह' मुळे क्षणभरासाठी का होईना, पण मनाची चलबिचल झालेलीच असते. गंमत म्हणजे, पहिला ५ कि.मी. पळण्याचा टप्पा संपवून मी सायकल स्टेजिंग एरियामध्ये जाताना ती स्वयंसेवक बाई मला ओळखते, टाळ्या वाजवते आणि थंब्स अप दाखवून 'गुड गोईंग' असं म्हणून मला प्रोत्साहनही देते.

यानंतरचा दुसरा १५ मैल सायकलिंगचा टप्पा. सायकलिंग करताना कानात हेडफोन्स वापरायला, म्युझिक ऐकायला बंदी. त्यामुळे स्टेजिंग एरियात सायकलकडे पळतानाच मी हेडफोन्स काढून ठेवलेले असतात. पटकन फक्त हेल्मेट, गॉगल, सायकलिंगचे ग्लोव्हज घालते. मी साध्याच शूजवर सायकल चालवत असल्याने शूज बदलण्याचा प्रश्नच नसतो. सायकल रॅकवरून काढते आणि हातात सायकल घेऊन पळत पळत टायमिंग मॅट परत एकदा ओलांडते. बीप बीप आवाजाच्या साक्षीने सायकलिंगचा टप्पा चालू होतो. सुरक्षिततेसाठी स्पर्धक वगळता कोणालाही स्टेजिंग एरियामध्ये प्रवेश नसतो, तसंच एका रेषेच्या पलीकडे गेल्याशिवाय सायकलवर बसायलाही बंदी. सायकल माउंटिंग झोनमधली ती लाइन पळत पळत ओलांडते आणि सायकलवर टांग टाकून सायकलायला सुरुवात करते.

एका बाजूला नदी आणि एका बाजूला एअरपोर्ट असल्याने ती बाजू पूर्ण रिकामी, मोकळी. त्यामुळे भणाणून वारा, त्यात पाऊस पडतोय. हेल्मेटवरून पाणी गळतंय, ग्लोव्हज ओले आणि गार पडलेत, गॉगल्सवर पाणी जमतंय आणि माझ्या श्वासामुळे त्यावर बाष्प जमा होतंय. मी पूर्ण आत्मविश्वासाने, नव्या जोमाने सायकल मारतीये. वारा इतका जास्त आहे की सपाट रस्त्यावरसुद्धा रेझिस्टन्समुळे सायकल चालवायला बराच जोर लावावा लागतोय. नेहमीपेक्षा २ खालचे गियर्स वापरावे लागताहेत. मुख्य म्हणजे वार्‍यामुळे सायकल एका बाजूला कलतीये, हलतीये. सगळेच लोक एकमेकांच्या शेजारून जाताना 'इट्स सो विंडी, बी सेफ, जस्ट कीप गोइंग' असं म्हणत प्रोत्साहन देताहेत. माझ्या मनातले मघाचचे नकारात्मक, स्वतःबद्दल शंका व्यक्त करणारे विचार कुठच्या कुठे पळालेत. किंबहुना असा काही क्षण आला होता काही काळापूर्वी, याचा मागमूसही नाही. शरीरावर नाही आणि मनावरही नाही.

सायकलवर बसलं की त्या चाकांच्या गतीबरोबर नेहमीच विचारांनाही गती येतेच आपसूकच. सायकल चालवताना जाणवतंय - की रेसच्या आधी मला मी सगळ्यात शेवटची, कमी तयारीची असेन असं वाटत होतं. त्यामुळे ‘आपल्याला जमेल की नाही’ या शंकेपासून ते ‘ही पहिलीच अशी ड्यूअ‍ॅथलॉन तू करतीयेस. त्यामुळे जमेल तशी रेस पूर्ण करायची इतकंच ध्येय ठेवायचं’ असा विविध पातळ्यांवर विचार मनात आला होता. पण रेसच्या ह्या टप्प्यावर येईपर्यंत मला समजतं की इथे सगळ्या प्रकारच्या तयारीचे लोक आहेत. काही फारच उत्तम तयारीचे - त्यांच्याकडून शिकण्यासारखं आहेच, पण काही त्यानंतरचे, काही नवशिके, स्लो पण जिद्दीने भाग घेऊन आपापल्या परीने मनापासून प्रयत्न करणारे. त्यांच्याकडूनदेखील शिकण्यासारखं, प्रेरणा घेण्यासारखं आहे. मी मनातल्या मनात 'कर्व्ह प्लॉट' करतीये. 'इथेखील आपण सालं आपलं टिपिकल उच्च मध्यमवर्गीयपण काही सोडलं नाहीये’ असा स्वतःवरच एक जोक मारून मी हळूच हसूनही घेतलंय.

मी माझ्या विचारात सायकल मारत असताना मला दोन -तीन वेळा शेजारून जाताना कोणाचंतरी मोठ्या आवाजातलं बोलणं ऐकू येतंय. लाइव्ह कॉमेंटरीच जणू काही. ज्या सायकलवर एका वेळी दोन लोक बसून चालवू शकतात अशा एका टँडम सायकलवरचा पुढे बसलेला सायकलस्वार ही धावती कॉमेंटरी करतोय - “डाव्या बाजूला नदी आहे, उजव्या बाजूच्या एयरपोर्टच्या धावपट्टीवर आता साउथवेस्टचं विमान लँड होणार आहे, आता आपल्या शेजारून जो सायकलस्वार चालला आहे, त्याची स्पेशलाईझ्ड कंपनीची सायकल आहे, त्याने डार्क केशरी जॅकेट घातलं आहे."

मी शेजारून पुढे जाताना कुतूहलाने पाहिल्यावर माझ्या लक्षात आलं की मागे बसलेला दुसरा सायकलस्वार अंध आहे आणि पुढचा सायकलस्वार 'संजय उवाच' ह्या उक्तीप्रमाणे ह्या धृतराष्ट्राला आजूबाजूला जे जे दिसतंय, किंबहुना ज्या गोष्टी आपण सायकल चालवताना आपल्या नकळत पहात असतो, त्याबद्दल न थकता, न कंटाळता सांगतोय. जणू त्या अंध माणसाला नुसता सायकल चालवण्यातच नाही, तर आजूबा़जूच्या भवतालासकट, त्या स्पेसला पाहात, अनुभवत सायकलिंग करण्यात मदत करतोय. वॉव! कमाल आहे ह्या दोघांची. नकळत उस्फूर्तपणे माझ्याकडून दाद दिली जाते. त्या दोघा सायकलस्वारांना 'ग्रेट गोइंग' असं चियर करत, ही गोष्ट, हा क्षण कायमचा माझ्या आठवणीत साठवत मी सायकल चालवत राहतीये.

बघता बघता, म्हणजे खरं तर सायकल मारता मारता, आता सायकलिंगचा टप्पादेखील पूर्ण व्हायला आलाय. गेली ५ वर्षं, २०० मैलाच्या सायकल राइड्स करत असल्याने, १५ मैल अंतर अजिबातच जास्त नाहीये. त्यामुळे १५ मैल सायकलिंग जमेल का हे टेन्शन नसलं, तरी नेमकी ह्या अंतरात सायकल पंक्चर तर होणार नाही ना? ही एक शंका मनात असतेच. ड्युअ‍ॅथलॉनच्या दरम्यान दोन रायडर्सची सायकल पंक्चर झाल्याने ते पंक्चर काढत किंवा सपोर्ट येण्यासाठी रस्त्याच्या कडेला थांबलेले पाहिल्यावर हळहळायला होतं. त्यामुळे असं काही विघ्न न येता सायकलिंगचा टप्पा पार पडतोय हे खूप रीलॅक्सिंग फीलिंग आहे. हा टप्पा संपवताना पुढच्या ५ कि.मी. पळण्याच्या टप्प्यासाठी काय काय तयारी करायची, ह्याचा प्लॅन, उजळणी मनात आपसूकच चालू झालीये. त्याप्रमाणे सायकल चालवतानाच पाणी पिऊन घेतलंय, एनर्जी आणि शुगर मिळावी म्हणून एक प्रोटीन बार खाऊन घेतलाय.

स्टेजिंग एरियात गेल्यावर हातातले ग्लोव्हज, गॉगल, हेल्मेट काढून, सायकल रॅकला लावून आता शेवटचे ५ कि.मी. अंतर पळायला सुरुवात केलीये आणि काहीतरी गमतीशीर जाणवतंय. टोटल फनी फीलिंग आहे. म्हणजे कार्टूनमध्ये दाखवतात, तसं शरीराचा वरचा भाग पुढे पळतोय आणि पाय मागून पळताहेत असं काहीसं होतंय. किंवा सैराटच्या 'येडं लागलं' गाण्यात परश्या जसा स्लो मोशनमुळे, पाय मागे एका प्रतलात आणि कमरेपासून वरचा भाग पुढे दुसर्‍या प्रतलात असा दोन प्रतलांत पळतोय असं वाटतं, तशी काहीशी अवस्था माझीही झालीये. सायकलवर बसल्याने गारठ्याने पाय पटकन हलत नाहीयेत, आणि सायकलिंग केल्यानंतर त्या तुलनेत आता पळण्याचा स्पीड अचानक खूपच कमी असल्याने, शरीर गोंधळलंय. म्हणजे कमरेतून वरचं शरीर पळतंय, पण त्या वेगात पाय हलत नाहीयेत. एक वेगळंच मजेशीर फीलिंग. थोडं अंतर चालत जावं शरीर स्थिरावे आणि सरावेपर्यंत असा फार फार मोह होतोय खरा, पण तो कटाक्षाने टाळायला हवाय हेही कळतंय. पहिल्या रनिंगपेक्षा सायकलिंगनंतरचा दुसरा रनिंगचा टप्पा थोडा कमी वेगाने झाला तरी हरकत नाहीये. किंबहुना मी तशी मनाची तयारी ठेवलीये. पण तरी कमी वेगानं का होईना पळत राहायचं, चालायचं नाही, हे मनाशी पक्कं ठरवलं. हा रस्ता अगदी नदीशेजारून जातोय. हाफ मॅरेथॉनमध्ये भाग घेतलेले लोक आता थकलेले असले, तरी पण निर्धाराने शेवटचं २ मैलाचं अंतर पळताना दिसताहेत रस्त्याच्या खालच्या लेव्हलला. तर ड्युअ‍ॅथलॉनचा सायकलिंगचा टप्पा पार करणारे लोक रस्त्याच्या वरच्या लेव्हलला सायकल चालवताना दिसताहेत. आणि मी समोर नजर ठेवून, वार्‍यापावसामुळे सतत गळणारं नाक हातातल्या रुमालाने पुसत, माझ्या खास 'अ‍ॅड्रेनॅलिन रश रनिंग स्पेशल प्ले लीस्ट'मधल्या गाण्यांवर पळतीये. बघता बघता दोन मैल अंतर पारही पडलंय. आता शेवटचं एक मैल.

हे लास्ट माइल फार ट्रिकी, क्रिटिकल, फसवं वाटतं मला. म्हणजे एकीकडे तुम्ही दमलेले असता, त्याच वेळी कितीही नाही म्हटलं तरी फिनिश लाइन ओलांडायची, हे ध्येय पूर्ण करायची वेळ जवळ आलीये ही अँक्झायटी, हुरहुर वाटायला लागलेली असते. पण 'वक्तसे पहले खुशी मत मनाओ' ह्या हिंदी सिनेमातल्या संवादाप्रमाणे फिनिश लाइन ओलांडेपर्यंत फोकस जाऊ द्यायचा नाही, हाही विचार मनात चालू असतो. इथवर सगळं व्यवस्थित झालंय, आता ह्या शेवटच्या एका मैलाच्या अंतरात थोडक्याकरता काही धडपडाट, पाय मुरगळणे वगैरे व्हायला नको असं एक विचित्र टेन्शनही असतं. शिवाय आता 'ठरवल्याप्रमाणे हे लक्ष्य पूर्ण होईल लवकरच. पुढे काय?' अशी एक अचानक निर्माण होणारी पोकळी आणि एक डीटॅच्ड, त्या लक्ष्यापासून स्वतःला बाजूला करण्याची भावनादेखील असते.

ह्या अशा सगळ्या मिश्र विचारांना बरोबर घेऊन पळत असताना शेवटचं मैलभर अंतरही पार पडतं आणि मी फिनिश लाइन ओलांडते. 'फीनिश' असं लिहिलेल्या त्या कमानीखालून जाताना आजूबाजूच्या आवाजाकडे, टाळ्यांकडे, टायमिंग घडाळ्याकडे, गळ्यात घातल्या गेलेल्या जड मेडलकडे माझं लक्षच नाहीये. माझ्या मनात त्या वेळी एक वेगळाच विचार चमकून गेलाय. एक नवीन खूळ डोक्यात आलंय.

***

पळणं, सायकलिंग करणं, हायकिंग करणं, प्रवास करणं, एकुणच अनुभव घेणं ही एक बाब आणि त्या अनुभवाबद्दल लिहून काढणं, किंवा लिहिता येणं ही दुसरी आणि पूर्णतः वेगळी बाब. या दोन्हीसाठी लागणारे स्किलसेट्स, शरीराच्या, मेंदूच्या फॅकल्टीज, गुण पूर्णतः निराळे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी जमल्या तरी त्याबद्दल लिहायला जमेलच असं नाही, असं मला कायम वाटत आलं आहे. म्हणूनच आजवर यातल्या बर्‍याच अ‍ॅक्टिव्हिटीज केल्या, तरी त्याबद्दल नीटपणे असं कधी लिहिणं झालं नाही माझ्याकडून. अनेकदा मनात असूनही 'आपल्याला जमेल का लिहायला?' हा प्रश्न पडल्याने लिहिणं जमलं नाही. किंबहुना प्रामाणिकपणे सांगायचं तर लिहायची हिम्मत झाली नाही. मग याच वेळी हा लिखाणाचा प्रपंच का? असा प्रश्न साहजिकच मीच मलाच अनेकदा विचारतीये.

अगदी ह्या ड्युअ‍ॅथलॉनच्या आधीदेखील 'जमेल का?' हा प्रश्न होताच की 'स्वप्न सोडून देणं' हा कमी कष्टाचा कदाचित सोपा, पण मला न पटणारा मार्ग. तो मार्ग स्वीकारणं शक्य नाही, म्हटल्यावर उरतो एकच उपाय, तो म्हणजे प्रयत्न करणं, मेहनत घेणं आणि कधीतरी 'नीट जमणार्‍या गोष्टीच करण्याच्या कंफर्ट झोनच्या बाहेर जाऊन 'आजवर न केलेल्या गोष्टी' करण्याचा निदान प्रयत्न तरी करणं. आपलं लिखाण वाचल्यावर कोण काय म्हणेल, आपल्याबद्दल काय मतं बनवेल, कोणी आपली चेष्टा करेल का याचा विचार न करता प्रामाणिकपणे, जे वाटतंय ते मोकळेपणानं लिहायची गेल्या काही वर्षात मला भीती वाटायला लागलीये. स्वतःला जे मांडायचं आहे ते प्रामाणिकपणे लिहूच शकत नसू, तर लिहायचं तरी कशाला? असा विचार करून करून, माझ्या मनात आता लिखाणाबद्दल खूप मोठा ‘रायटिंग ब्लॉक’ किंवा खरं तर ‘फोबिया’च तयार झालाय. ही ड्युअ‍ॅथलॉन जसं मला माझ्या कंफर्ट झोनच्या बाहेरचं काही चॅलेंज म्हणून करायची होती, तसंच हे लिखाणही मी ‘मला लिहायला जमत नाही’ हा माझा लिखाणाचा बागुलबुवा मनातून दूर करायला करतीये.

दुसरं थोडंस वेगळं, पण तितकंच महत्त्वाचं कारण म्हणजे सध्या मला एकूणच असं जाणवतं की ह्या फेसबुक, व्हॉटसॅपी, इन्स्टाग्रामी युगात वावरताना आपल्याला आपले मित्र, नातेवाईक कसे दिसतात, काय कपडे घालतात, कुठे व्हेकेशनला जातात, काय खातात, काय पितात ह्या सगळ्याबद्दल इत्थंभूत माहिती असते. पण ते काय विचार करतात, काय अनुभव घेतात, त्या अनुभवातून काय मिळवतात, काय गमावतात याबद्दल आपल्याला काहीच माहीत नसतं.

वैयक्तिक अनुभवातून सांगायचं, तर मला गेल्या चार-पाच वर्षांपासून मला असं जाणवतंय की अतिशय जवळचे मित्रंडळी, नातेवाईक, अगदी माझे आई-वडिल यांनादेखील, मी हाफ मॅरॅथॉन केली, २०० मैल सायकल चालवली, किलिमांजारो शिखर सर केलं, टीम करून २०० मैल रनिंग रीले पूर्ण केली या घटनांबद्दल 'हो का? अरे वा! अभिनंदन… ' असं म्हणण्यापलीकडे काहीही माहीत नाहीये. म्हणजे मी नक्की काय केलं, ते करताना काय तयारी केली, शरीराची-मनाची-विचारांची काय अवस्था अनुभवली, यातून काय शिकले याबद्दल कोणालाही काहीही माहीत नाहीये. आयुष्यात ह्या लहानमोठ्या गोष्टी करताना मी काय अनुभवते, त्यामुळे माझ्या विचारात, दृष्टीकोनात, वागण्यात काय बदल घडलाय हेच जर कोणाला माहीत नसेल, तर ही सगळी माणसं मला 'खरोखरच ओळखतात का?आणि ओळखतात म्हणजे तरी नक्की काय?' असा प्रश्न मला हल्ली पडतो. म्हणूनच 'मी अमुक एक गोष्ट केली' असं नुसतं एका ओळीत अनेकदा १५०पेक्षाही कमी शब्दांत सांगण्याच्या, एक फोटो पोस्ट करण्याच्या, लाइक्स आणि अभिनंदनाला धन्यवाद म्हणण्याच्या पलीकडे जाऊन अनुभवकथनातून संवाद साधण्याचा हा एक प्रयत्न करावा, असं मला खूप मनापासून वाटलं.

रनिंग, सायकलिंगच्या बाबतीत खूप लोक असे आहे, ज्यांच्याकडे बघून मी कायमच स्फूर्ती घेत आलीये. त्यांच्यासाठी हे लिखाण म्हणजे मी प्रयत्न करतीये आणि करत राहीन असं सांगणारी कदाचित एक 'थॅक्यू नोट'. जगभरातल्या अनेक मित्रमंडळींशी, काहींच्या आई-वडिलांशीही मी 'रनिंग किंवा सायकलिंग' ह्या समान आवडीच्या धाग्यांनी जोडली गेले आहे. माझ्या त्या सर्व लहानमोठ्या मित्रमंडळींशी ह्या कदाचित अनुभव शेयर करत मारलेल्या सिंपल गप्पा. कोणी ह्या अनुभवांशी रिलेट करतील, काहींना 'ही फारच नको इतका विचार करते' असंही वाटेल कदाचित. काहीना 'हिला जमतंय तर आपल्याला जमेल' असं वाटून काही प्रयत्न करून बघावासा वाटेल. कोणाला आणखी काही.

पण माझ्यासाठी मात्र हा सगळा लेखनप्रपंच म्हणजे 'त्या फिनिश लाइनला मेडल घेतलेल्या २-डी फोटोमधल्या मलाच आणखी एक तिसरी डायमेन्शन देण्याचा एक लहानसा प्रयत्न'. ही ड्युअ‍ॅथलॉन पूर्ण करताना फिनिश लाइनच्या कमानीखालची निळी मॅट ओलांडताना त्या 'बीप बीप' आवाजाच्या साक्षीने 'आजच्या ह्या अनुभवाची गोष्ट लिहायचीच' हे डोक्यात घेतलेलं खूळ पूर्ण करण्याचा क्षण!श्रेयनिर्देश : चित्रं आंतरजालावरून साभार.


20191016-122815

अनुक्रमणिका

खेळजगत

प्रतिक्रिया

यशोधरा's picture

26 Oct 2019 - 4:12 pm | यशोधरा

भन्नाट!! लैच भारी बायो!

गुल्लू दादा's picture

28 Oct 2019 - 12:30 am | गुल्लू दादा

खूप प्रामाणिकपणा आहे लेखनात...खूप आवडला...आपला अनुभव आमच्यात वाटलात म्हणून खूप धन्यवाद.

सोत्रि's picture

29 Oct 2019 - 8:38 am | सोत्रि

कुडोज, हॅट्स ऑफ, ब्राव्हो, थ्री चीयर्स, हिप हिप हुर्रे....

_/\_ _/\_ _/\_

अतिशय भन्नाट लेखन, २ मिनितान्ची घालमेल अतिशय प्रवाही आणि तन्तोतन्त आहे!

- (हाफ मॅरेथॉनची तयारी करणारा) सोकाजी

सुधीर कांदळकर's picture

29 Oct 2019 - 6:41 pm | सुधीर कांदळकर

धावते समालोचन. सुरुवातीची घालमेल आणि सायकलीनंतर धावतांनाची शरीर - मेंदूतला गोंधळ छान उलगडला आहे. हा अनुभव जवळजवळ प्रत्येकाला नवा असावा.

तरी शर्यत पूर्ण झाल्यानंतरचा मजकूर अनावश्यक, कंटाळवाणा वाटला. पदक मिळाले की नाही तेही नीट स्पष्ट होत नाही.

तरीही नीटनेटका मांडलेला वेगवान ओघवत्या भाषेतला लेख आवडला. धन्यवाद.

पद्मावति's picture

29 Oct 2019 - 7:10 pm | पद्मावति

भन्नाट!

मार्गी's picture

30 Oct 2019 - 11:56 am | मार्गी

अभिनंदन!! छान लिहिलंय!

बांवरे's picture

5 Nov 2019 - 1:31 am | बांवरे

अभिनंदन !!!

इट वॉज लाँग टाईम ड्यू !!!

रुपी's picture

5 Nov 2019 - 3:01 am | रुपी

मस्तच!

कालच माझा नवरा हाफ मॅरेथॉन करुन आला.. आधी कधी 5K सुद्धा त्याने केली नव्हती.. एवढंच काय आम्ही कधी नियमित चालायलासुद्धा जात नाही. पण शेवटचा एक मैल मात्र त्याचाही लेखात लिहिलंय तसाच होता.

लेख छान, रंजक झालाय. मध्येमध्ये काही वाक्ये छानच. मात्र मलाही स्पर्धेनंतरचा भाग जरा कमी जास्त लांबीचा वाटला.

खरंच या अशा स्पर्धांमध्ये भाग घेत असताना होणारा शारीरीक व मानसिक संघर्ष या लेखाच्या निमित्ताने कळून आला. अन्यथा हे क्षेत्र ओळखीचे नसल्याने त्याबाबत काही माहित नसते. पण तुमच्या लेखाच्या निमित्ताने या संघर्षाची जाणीव तरी झाली. धन्यवाद.

शा वि कु's picture

5 Nov 2019 - 4:26 pm | शा वि कु

फार स्फूर्ती वगैरे आली वाचून !!!

मुक्त विहारि's picture

20 Nov 2019 - 10:08 pm | मुक्त विहारि

मस्तच