सफर स्पिती व्हॅलीची

Primary tabs

जातीवंत भटका's picture
जातीवंत भटका in दिवाळी अंक
25 Oct 2019 - 6:00 am


मिपा दिवाळी अंक  २०१९

अनुक्रमणिका
सफर स्पिती व्हॅलीची
"अरे, झूमकारवर ५०% डिस्काउंट मिळतोय, काय करू या?" जयेशने हे वाक्य फोनवर बोलताच माझ्या डोळ्यासमोर स्पिती व्हॅलीतली घाटदार वळणं तरळून गेली. अनेक दिवस मनात पिंगा घालणाऱ्या स्पिती व्हॅलीला जायचं, या विचारानेच अंगावर शहरे आले. त्याला होकार कळवून लागलीच विमानाची तिकिटं मिळवायच्या मागे लागलो. जयेश, शीतल आणि त्यांचा मुलगा भार्गव, मनीष, समीर आणि मेघराज असे सहा भिडू तयार होते. सोबत घ्यावयाच्या सामानाची यादी, औषधं, कोरडा खाऊ यांच्या याद्या बनू लागल्या. मी आणि जयेश एकूण प्रवासाचा आराखडा, मुक्कामाची ठिकाणं, हॉटेल, दोन ठिकाणांमधली अंतरं यांचा अभ्यास करत होतो. जेव्हा तुम्ही एखादी रोडट्रिप करता, तेव्हा त्यामध्ये आणि साध्या ट्रिपमध्ये खूप फरक असतो. तुमच्या ठरलेल्या वेळापत्रकात तुम्हाला हातचे एक-दोन दिवस ठेवावे लागतात, कारण रोडट्रिपमध्ये सगळ्याच गोष्टी आपण आधी ठरवतो त्याप्रमाणे होत नाहीत आणि त्या तशा झाल्या, तर रोडट्रिपची मजा काय? वर त्यात स्पितीसारखं ठिकाण असेल, जिथे बऱ्याच गोष्टी निसर्गाच्या लहरीवर विसंबून असतात, तिथे तर अगदी बेरजेइतकी सोपी वाटणारी गणितंही चुकतात. आणि आम्हाला त्याची चांगलीच प्रचिती आली, त्याबद्दल पुढे येईलच!

1

स्पिती व्हॅलीमध्ये भटकंतीसाठी साधारण जून ते सप्टेंबर हा योग्य कालावधी मानला जातो. मे महिन्याच्या सुरुवातीला या भागामध्ये साठलेलं बर्फ वितळायला सुरुवात होते आणि साधारण जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत सगळे रस्ते वाहतुकीसाठी खुले होतात. स्पिती व्हॅलीला मनालीशी जोडणारा कुंजूम ला (ला म्हणजे घाट) खूप बर्फ, अवघड वळणं आणि अतिदुर्गम म्हणून प्रसिद्ध आहे. अतिशय उंच आणि अतिबर्फवृष्टीमुळे हा घाट बाकीच्या रस्त्यांपेक्षा थोडा उशिरा खुला होतो. पुढे याच वाटेवर प्रसिद्ध असा चंद्रताल आहे (इथे मोठ्या सरोवराला किंवा तलावाला 'ताल' म्हणतात). आम्हाला या भागातील बर्फ आणि थंडी अनुभवायची होती, म्हणून आम्ही मे महिन्याच्या सुरुवातीला जायचा घाट घातला होता. पण याची किंमत म्हणून आम्ही चंद्रतालला मुकणार होतो. खरं तर बर्फ आणि 'व्हाइट स्पिती' अनुभवायचं असेल, तर डिसेंबर ते मार्च हा अगदी योग्य कालावधी आहे. पण तेव्हा जाणं झालं नाही. असो, परत केव्हातरी!

IMG-20191014-WA0006 आमचा रोडमॅप

पुणे-दिल्ली-चंदीगड असा विमानप्रवास होता आणि चंदीगडमध्ये आम्ही आमची झूमकार ताब्यात घेणार होतो. जयेशने आम्हा चौघांची तिकिटं आधीच काढून ठेवली होती आणि त्यातलं दिल्ली-चंदीगड तिकीट जेट एअरवेज असल्याकारणामुळे कॅन्सल करावं लागलं, कारण जेट कायमचं लँड झालं होतं. मग दिल्ली- चंदीगड एक टॅक्सी ठरवली. दिल्ली सोडून चंदीगडच्या वाटेला लागलो, तेव्हा पहाटेचे ४.३० झाले होते. वाटेत मुरथल नावाच्या गावात मुख्य हमरस्त्यावरच २४ तास सुरू असणारे बरेचसे ढाबे आहेत. त्यापैकी आपल्या वीरूच्या (धर्मेंद्र) 'गरम धरम' नावाच्या ढाब्यासमोर आमच्या सारथ्याने गाडी थांबवली. पार्किगमध्येच आम्हाला शोले सिनेमातली प्रसिद्ध पाण्याची टाकी बघायला मिळाली. एखाद्या राजवाड्यासारख्या प्रशस्त असलेल्या त्या हॉटेलमध्ये पहाटे ५.३०लासुद्धा बरीच गर्दी होती. हॉटेल मधल्या भिंतींवर आणि खांबांवर धर्मेंद्रच्या सिनेमांची पोस्टर्स लावलेली होती. आणि शोलेमधलीच फटफटीसुद्धा ठेवलेली दिसली. मग त्या फटफटीवर बसून सगळ्यांनी फोटो काढून घेतले. आपण आपलं चहा घेऊन निघू या सुरात आत गेलो आणि इतर टेबलवर दिसणारे पराठे पाहून आम्हीही आमची पराठ्यांची ऑर्डर दिली. पाचव्या मिनिटाला गरमगरम पराठे आणि त्यात मोठ्या वाट्या भरून अफालतून लोण्याचे गोळे आले. मी तर गेल्या वर्षभरातील लोणी त्या गरमागरम पराठ्यांसोबत उडवलं असेल. अहाहा! सुख होतं.

6
शोलेमधील फटफटी

साधारण ठरलेल्या वेळेत आम्ही चंदीगड विमानतळावर पोहोचलो. दहाव्या मिनिटाला आमची झूमकार महिंद्रा मराझो गाडी दाखल झाली. तिचं सगळ्या बाजूंनी नीट निरीक्षण करून ती ताब्यात घेतली आणि सिमल्याकडे प्रवास सुरू केला. ऊन-पावसाचा खेळ चालू होता. जसं जसं शिमला जवळ येत होतं, तसा तसा हवेतला गारवा वाढत होता आणि हवा जास्त बोचरी होत होती. सिमल्याच्या अलीकडे एका दरीच्या कड्याला 'अंदाज' नावाचं एक सुंदर हॉटेल पाहून जेवायला थांबलो. अफलातून नजारा होता त्या हॉटेलमधून. जेवणही मस्त होतं. थोडे फोटो काढून सिमला आणि तिथून पुढे ६० किलोमीटरवर असलेल्या आजच्या मुकामाच्या ठिकाणाकडे, म्हणजे नारकंडकडे निघालो. नेहमीप्रमाणे सिमल्याला ट्रॅफिकमध्ये अडकणं, मजबूत पाऊस आणि बर्फवृष्टी असल्या दिव्यांमधून वाट काढत काढत संध्याकाळी ७.३०ला नारकंड गावाच्या अलीकडेच एका दरीच्या टोकावर असलेलया स्नोफ्लेक्स हॉटेलला पोहोचते झालो. हाडं गोठवणारी थंडी आणि ती थंडी हाडांपर्यंत पोहोचेल ह्याची खातरी करण्यासाठीच जणू नेमलंय या आविर्भावात वाहणारा वारा. दातावर दात वाजवीत जेवणाला बसलो. गरमगरम जेवण पोटात गेल्यावर आमच्या कुडकुडणाऱ्या गात्रांना जरा स्वस्थता लाभली. दुसऱ्या दिवशी पहाटे लवकर निघून सूर्यास्ताच्या आत कल्पा गाठायचं होतं, म्हणून लागलीच झोपेची तयारी झाली. आदल्या दिवशी रात्री ११ला घरं सोडलेली, त्यात जवळपास ४२५ किलोमीटरचा प्रवास. अंथरुणात पडल्या पडल्या डोळा लागला.

8 सिमल्यातल्या डोंगर उतारावरील रंगीत इमारती

9 सिमला-नारकंड रस्त्यावर कुफ्री गावात झालेला बर्फवर्षाव

10 नारकंडच्या अलीकडे पाहिलेला सूर्यास्त

दुसऱ्या दिवशी पहाटे लवकर उठून आवरलं आणि रेकाँग पिओचा रस्ता धरला. निघताना बाजारातून ताज्या आणि नुकत्याच खुडलेल्या चेरी घेतल्या आणि रस्त्याच्या कडेने चेरीची झाडं लावत आमची गाडी पुढे निघाली. हा रस्ता फार सुंदर आहे. आजूबाजूला खोल दऱ्या आणि त्यातमधून जाणारा सुंदर नागमोडी रस्ता. एका ठिकाणी तर कातळ फोडून रस्ता काढलाय. हा बोगदा फोटोसाठी खूप प्रसिद्ध आहे. आम्ही मे महिन्याच्या सुरुवातीला निघालो असल्याने वाटेत बऱ्याच ठिकाणी धोकादायक दरडी फोडून काढायचं काम बी.आर.ओ.चे (बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनचे) जवान करत होते. एका छोट्या गावाच्या अलीकडे वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. जेवायला काही मिळतंय का बघायला गावात आलो. आणि एका टपरीवजा हॉटेलात मॅगीची ऑर्डर दिली. त्या गार हवेत बसून गरमागरम मॅगी खायला मजा आली. रस्ता मोकळा झाला आणि आम्ही पुढे निघालो. थोड्या वेळाने आमच्या डाव्या हाताला सतलज नदीचं पात्र लागलं. रेकाँग पिओच्या अलीकडेपर्यंत आता आम्हाला सतलजची साथ असणार होती. अनेक पूल आणि अनेक अरुंद रस्ते पार करत संध्याकाळी चारच्या सुमारास रेकाँग पिओमध्ये पोहोचलो. आधी गाडीचा डिझेल टँक भरून घेतला आणि पिओपासून १२ किलोमीटर असलेल्या कल्पाकडे गाडी दामटली. कल्पा गावातून किनौर कैलास पर्वताचं खूप जवळून दर्शन होतं. आमच्या 'अ‍ॅपल पाय' हॉटेलच्या गॅलरीमधून समोरच किनौर कैलासची रेंज पसरलेली दिसत होती. रात्री चांदण्यांचा स्टार ट्रेल काढायचाच, हे मनाशी पक्कं ठरवून आम्ही 'सुसाइड पॉइंट'कडे निघालो. रस्ता खूपच अरुंद होता आणि डावीकडे चार ते पाच हजार फूट खोल दरी. आयुष्यात पहिल्यांदा गाडी चालवताना थोडी भीती वाटत होती. एका ठिकाणी गाडी पार्क केली. मी आणि जयेश चालत त्या रस्त्यावर निघालो. अफलातून रस्ता होता आणि समोर पसरलेली किनौर कैलाशची पर्वतरांग. फोटो काढून परत हॉटेलमध्ये आलो.

15 नारकंड-रिकाँग पिओ रस्ता

18

बर्फाच्छादित किनौर कैलास शिखर आणि कड्यावर वसलेलं कल्पा गाव

22
कल्पाजवळचा सुसाइड पॉइंट

23

तिथे जाणारा रस्ता आणि मागे कैलास पर्वतराजी

जेवण उरकून मी, जयेश आणि मेघराज कॅमेरे आणि ट्रायपॉड सेट करायच्या मागे लागलो. पाच-सहा सॅम्पल फोटो काढल्यावर फ्रेम आणि बाकी सेटिंग्ज जुळून आली. मग पुढला दीड तास ३० सेकंदाचा एक या हिशोबात एका पाठोपाठ एक फोटो कॅमेरा काढत होता आणि आम्ही एका पाठोपाठ एक जुनी गाणी नाट्यगीतं, किशोर, लता ऐकत कुडकुडत होतो. मनासारखे फोटो मिळाल्यावर गाशा गुंडाळला. मी आणि जयेशने दुसऱ्या दिवसाच्या प्रवासाची उजळणी केली आणि पांघरुणात शिरलो. सूर्योदयासाठी पहाटे लवकर उठून तयार झालो. जयेश जॉगिंगसाठी बाहेर पडला आणि मी कॅमेरा सरसावून सूर्याची वाट बघत होतो. समोरच्या किन्नौर कैलास रांगेमागे सूर्योदय झाला आणि ती बर्फाच्छादित शिखरं सोनेरी रंगाने न्हाऊन निघाली. शीतल, भार्गव आणि मी आम्ही तिघेही तो नजारा बराचसा आमच्या डोळ्यात आणि काहीसा कॅमेऱ्यात टिपून घेत होतो. खाली कल्पा गावावर तिरकी पडणारी सूर्याची किरणं फारच अफलातून दिसत होती.

25

कल्पामधून काढलेला स्टारट्रेल, मागे किन्नर कैलास पर्वत

26

कल्पामधला सूर्योदय

आजचा आमचा तिसरा दिवस होता. आज आम्हाला आमच्या रोडट्रिपमधला सगळ्यात लांबचा पल्ला गाठायचा होता - कल्पा ते काझा. साधारण २१० किलोमीटरचं हे अंतर कापायला आम्हाला सहा-सात तास लागणार होते. शिवाय वाटेत खाब, नाको, ताबो आणि ग्यू मॉनेस्ट्री अशी ठिकाणंही पाहायची होती. हिमाचल आणि लडाखच्या या डोंगराळ प्रदेशात ताशी ३० किलोमीटरपेक्षा जास्त अंतर कापणं अवघड होतं ते इथले आडवळणाचे रस्ते, दरडी, आर्मीचे कॉन्व्हॉय आणि बीआरओची कामं यामुळे. लवकर कल्पा सोडलं आणि नाश्ता उरकून मुख्य रस्त्याला लागलो. बीआरओची कामं सकाळी नऊपासून सुरू होतात, म्हणून त्याआधी दरडी असलेला रस्ता सोडून पुढे खाबकडे निघालो. तरी वाटेत एक-दोन ठिकाणी कामं चालू असल्यामुळे थांबावं लागलंच. खाबजवळ पोहोचलो, तेव्हा ११.३० झाले होते. मुख्य रस्त्यापासून खाब गाव थोडं वरच्या अंगाला आहे. खाब प्रसिद्ध आहे ते स्पिती आणि सतलज नद्यांच्या संगमासाठी. या संगमावर असलेल्या पुलावर गाडी उभी केली आणि पुलाच्या सुरुवातीला असलेल्या संगम हॉटेलमध्ये आलो. इथे कितीही दुर्गम भागात तुम्ही गेलात, तरी तुम्हाला चहा आणि मॅगी नक्की मिळते. मॅगीची ऑर्डर देऊन संगमावर थोडे फोटो काढून घेतले. पुढचा थांबा होता नाको.

28

सतलज नदीवरील लाकडी फळ्यांचा पूल

30

खाब पुलावर आमची झूमकार

34
संगमावर असलेले प्रार्थनेचे दगड

भारत-चीन सीमेजवळ वसलेलं नाको गाव समुद्रसपाटीपासून साधारण ११९०० फूट उंचीवर आहे. गावात पाहण्यासारखं म्हणजे तिथली अकराव्या शतकातील मॉनेस्ट्री आणि नाको तलाव. १९७५मध्ये झालेल्या भूकंपात या मॉनेस्ट्रीची बरीच पडझड झाली. तरीही आत्ता जे काही शिल्लक आहे, ते खूपच अप्रतिम आहे. मूळच्या मॉनेस्ट्रीच्या आजूबाजूला नव्या शैलीतील (तिबेटी) काही वास्तूदेखील आहेत. मॉनेस्ट्रीपासून थोड्या वरच्या बाजूला प्रसिद्ध असा नाको तलाव आहे. आजूबाजूला विलोची आणि पॉप्लरची बरीच झाडं आहेत. समोरच्या ट्रान्स हिमालयन डोंगररांगांचं प्रतिबिंब त्या तलावात पाहायला मिळतं. हिवाळ्यात गोठलेल्या नाको तलावावर आइस स्केटिंग चालतं, असं म्हणतात, पण 'सेक्रेड लेक' म्हणजे पवित्र अशी पाटी लावलेली पाहिली आणि ही विसंगती काही डोक्यात शिरली नाही. असेल पवित्र स्केटिंग, काय सांगावं? असो! नाको सोडलं, तेव्हा दोन वाजले होते.

36

नाको गावाकडे जाणारा रस्ता

39

नाको तलाव

41

चहूबाजूंनी डोंगरांनी वेढलेलं नाको गाव

43

नाको मॉनेस्ट्री

नाकोवरून निघाल्यावर वाटेत चंद्राच्या पृष्ठभागासारखे दिसणारे काही जमिनीचे तुकडे दिसतात. काझापासून अलीकडे साधारण ७५ किलोमीटरवर सुमडो नावाचं गाव आहे. त्या गावाबाहेरील नदीवरचा पूल ओलांडला की एक फाटा मुख्य रस्ता सोडून उजवीकडे वळतो तो ग्यू गावाकडे. फाट्यापासून साधारण १२ किलोमीटरवर ग्यू गाव आणि मॉनेस्ट्री आहेत. साधारण तीन ते चार किलोमीटर गेलो, तोच गाडीने एक गचका दिला. बंद नाही पडली पण डॅशबोर्डवर इंजिनाचा लाल दिवा लागला. गाडी वेग घेत नव्हती. मी आणि जयेश थोडं घाबरलो. गाडी बाजूला घेतली आणि बॉनेट उघडून चेक केलं. सगळं ठीक वाटलं. या भागात ऑक्सिजनची कमतरता असेल, म्हणून गाडी पिकअप घेत नसेल असं वाटून गाडी अगदी पहिल्या गियरवर गावापर्यंत घेऊन घेलो. इथून मॉनेस्ट्री थोडी चढावर असल्यामुळे खालीच गाडी पार्क केली. इंजीन गरम झाल्यामुळे असं होत असेल, असं वाटल्याने वाऱ्याच्या दिशेला तोंड करून बॉनेट उघडून ठेवलं आणि मॉनेस्ट्रीकडे चालत निघालो.
ग्यू मॉनेस्ट्री प्रकाशझोतात आहे ती तिथल्या प्रसिद्ध अशा ५०० वर्षं जुन्या अशा सांगा तेन्झिनच्या नैसर्गिकरीत्या जतन असलेल्या ममीसाठी. १९७५च्या भूकंपात या सांगा तेन्झिनचं थडगं उघडकीस आलं. २००४ साली त्यातली ममी बाहेर काढण्यात आली. सांगा तेन्झिन जिवंत असतानाच त्याने स्वतःला या समाधीअवस्थेत लोटून घेतलं होतं, असं म्हणतात. या नैसर्गिक ममीवर त्वचा, दात आणि केस दिसून येतात. बाजूलाच नव्याने बांधलेली सुंदर मॉनेस्ट्री आहे. आवारातील एकमेव टपरीवर चहा घेऊन परत गाडीपाशी आलो. गाडीची स्थिती 'जैसे थे' - तशीच होती. इतक्या वेळच्या सलग प्रवासामुळे गाडी अजूनही गरम असेल या शंकेने जयेशने कूलंट टँकमध्ये गार पाण्याची बाटली रिकामी केली, तेव्हा कुठे गाडीच्या जिवात जीव आला आणि आमच्याही.

44

चांद्रभूमीसारखे दिसणारे जमिनीचे तुकडे

IMG-20191014-WA0010

ग्यू गावातून दिसणारी ग्यू मॉनेस्ट्री

50

ग्यू मॉनेस्ट्री

51
सांगा तेंझिनची नैसर्गिकरीत्या जतन झालेली ममी

ग्यू सोडून काझाच्या रस्त्याला लागलो, तेव्हा ६.३० झाले होते. सूर्यास्तानंतर वातावरण एकदम बदललं. अध्येमध्ये पावसाचे शिडकावे आणि जोरदार वारे वाहू लागले. आम्हाला पोहोचायला थोडा उशीर होणार होता, म्हणून काझामधल्या आमच्या हॉटेलशी संपर्क साधायचा प्रयत्न करत होतो, पण फोन लागत नव्हते. तसेच पुढे आलो. थोडं पुढे गेल्यावर सगळ्यांच्या मोबाईलचं नेटवर्क गेलं, अगदी बीएसएनएलसुद्धा. माहे पुलाजवळ दोन-तीन स्थानिक उभे दिसले. गाडी बाजूला घेतली आणि चौकशी केली, तेव्हा कळलं की गेले चार दिवस काझामधलं बी.एस.एन.एल.चं नेटवर्क बंद पडलंय. इथून पुढे आम्हाला कोणालाच संपर्क साधता येणार नव्हता. परत थोडं मागे जाऊन जिथे शेवटचं कव्हरेज मिळालं होतं तिथे आलो. काझामधल्या हॉटेलचा मालक 'जमैका' (हे त्याचं नाव) गोव्यातही एक हॉटेल चालवतो. तो गोव्यात होता, म्हणून त्याला फोन केला. आमचं वेळापत्रकाचं गणित त्याला सांगितलं. सगळ्यांनी घरी फोन करून खुशाली कळवली आणि पुढचे तीन दिवस फोन करता येणार नाही हेसुद्धा कळवलं. काझामध्ये पोहोचलो, तेव्हा तापमान चार डिग्रीवर आलं होतं. हॉटेलमध्ये पोहोचल्यावर गरमगरम जेवण तयार होतं. आजच्या दिवसातल्या नाट्यमय घडामोडींमुळे प्रचंड थकलो होतो. अंथरुणावर पडताच डोळा लागला.

पहाटे जाग आली ती हाडं गोठवणाऱ्या थंडीमुळे. आन्हिकं उरकून हॊटेलच्या छतावर असलेल्या उपाहारगृहात नाश्त्यासाठी गेलो. रात्री बराच बर्फही पडला होता. काल संध्याकाळी पाहिलेल्या उघड्याबोडक्या डोंगरांगानी बर्फाची दाट चादर लपेटून घेतलेली दिसत होती. बारीक पाऊस चालू होता आणि काझा गावावर कुंद आणि धुरकट ढगांचं आच्छादन होतं. मनीषला सकाळी उठल्यापासून थोडी कणकण होती आणि डोकंही दुखत होतं. त्यामुळे त्याने हॉटेलवर आराम करायचं ठरवलं आणि आम्ही तयार होऊन लोसर आणि कुंजूम पासकडे जाण्यास निघालो. आमची पोटं भरल्यावर गाडीचं पोटही डिझेलने भरलं आणि काझा सोडलं. स्पिती नदीच्या डाव्या काठावरून वातावरण जास्तच खराब होत होतं. पावसाने जोर धरला होता आणि मध्ये मध्ये बर्फही पडत होता. मी तशातच गाडी पुढे दामटत होतो. वाटेत एक छोटी ग्लेशियर पार रस्त्याला येऊन टेकली होती. तिथे पहिला थांबा घेतला. थोडे फोटो काढून आणि बर्फात खेळून झाल्यावर पुढे निघालो. पावसाचा जोर आणखी वाढला आणि बाजूच्या डोंगरांवरून छोटेमोठे दगड खाली येऊ लागले होते. थोडी धाकधूक वाटली, पण तरी गाडी पुढे रेटली. पुढे एका पुलावरून स्पिती नदी ओलांडली आणि बीआरओचे दोन कामगार एका दरडीखाली पावसापासून आडोसा घेऊन बसलेले दिसले त्यांनी हातानी काही खुणा केल्यासारखे वाटलं, म्हणून गाडी थांबवली आणि थोडे मागे आलो. "पुढे जाऊ नका" असं सांगायचा प्रयत्न ते करत होते. रात्री पडलेल्या पावसामुळे आणि साठलेल्या बर्फामुळे पुढे अनेक दरडी कोसळून रस्ता बंद झाला आहे असं कळलं. मग आम्ही थोडं पुढे जाऊन चिचम गावाकडे वळून किब्बर आणि की गावाकडे जाणं शक्य होईल का, याची चौकशी केली. पण त्या फाट्यापर्यंतदेखील पोहोचता येणार नाही, हे कळल्यावर परत फिरायचं ठरवलं. या भागातील अतिउंचावरील रस्ते, लहरी हवामान या सगळ्यामुळे बऱ्याचदा अशी परिस्थिती उद्भवते आणि त्या परिस्थितीमध्ये अनावश्यक धाडस न करता वेळीच माघार घेणं आपल्या हिताचं ठरतं. आमचा परत फिरण्याचा निर्णय योग्य होता, हे नंतर आम्हाला चांगलंच समजलं.

53

काझाकडे जाणारा रस्ता

56

काझामधली सकाळ

IMG-20191014-WA0014

काझा-बातल रस्त्यावर लागणारं काझा गावाबाहेरील मंदिर

62

रांग्रीकमधील गवताळ कुरणं आणि चरणारे याक

65

एका छोट्या ग्लेशियरवर आम्ही

66

स्पिती नदीच्या पुलावर - इथूनच मागे फिरावं लागलं.

68

अर्धवट गोठलेलं स्पिती नदीचं विस्तीर्ण पात्र

काझामध्ये हॉटेलवर आलो. मनीष झोपलेलाच होता. लवकर परतल्यामुळे बराच मोकळा वेळ मिळाला होता. काझाच्या बाजारात फेरफटका मारावयास निघालो. अरुंद गल्ल्यांतून आणि भेटवस्तूंनी सजलेल्या दुकानांमधून भटकलो. थोडी खरेदी झाली. इथल्या मुख्य चौकात एक हिमालयन कॅफे नावाचं रेस्टॉरंट आहे. त्याची सजावट आणि तिथे मिळणाऱ्या सगळ्यांच पदार्थांची चव भन्नाट आहे. शनिवार-रविवार तिकडे काही स्थानिक कलाकारांच्या गाण्याच्या मैफलीही जमतात. या हॉटेलची मालकीण मूळची मुंबईकर, पण साधारण ५-६ वर्षांपूर्वी स्पितीला आली आणि तिला स्पिती इतकं आवडलं की तिने तिथेच राहून हे हॉटेल सुरू केलं. इथे राहण्याचीसुद्धा व्यवस्था होते. तिथे मोमोज आणि तिबेटी थुपका (उकडलेल्या भाज्या घातलेलं नूडल्स सूप) उडवून आम्ही हॉटेलवर परत आलो. मनीषची तब्येत जास्तच खराब झाली होती. डोकेदुखीबरोबर उलट्या आणि मळमळही होत होती. त्याचा सुजलेला चेहरा पाहून मला कळून चुकलं की त्याला अ‍ॅक्यूट माउंटन सिकनेस (ए.एम.एस.)चा त्रास सुरू झालाय. अतिउंचीवरील ठिकाणांवर हवेतील विरळ ऑक्सिजनमुळे शरीराला ऑक्सिजनची कमतरता जाणवते आणि मग त्याची लक्षणं म्हणजे मळमळ, डोकेदुखी, उलट्या इत्यादी दिसू लागतात. वेळेत उपचार नाही मिळाले, तर फुफुसात किंवा मेंदूमध्ये पाणी साचून पल्मनरी एडिमा किंवा सेरिब्रल एडिमा यासारखे जीवघेणे आजार होऊ शकतात. आम्ही ताबडतोब मनीषाला काझाच्या सरकारी इस्पितळात घेऊन गेलो. तिथे त्याला तपासून काही इंजेक्शन दिली आणि त्याच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी ६० टक्क्यांवर आली होती, म्हणून त्याला कृत्रिम ऑक्सिजन लावला. अर्धा तास कृत्रिम प्राणवायू घेतल्यावर त्याची ऑक्सिजनची पातळी ९५ टक्क्यांवर आली. थोडा वेळ थांबून शरीर ऑक्सिजनची ही पातळी कायम राखू शकते का हे पाहावं लागतं. आम्ही बाहेर वाट पाहात असताना काही बायकर्स अशाच त्रासामुळे उपचारासाठी आलेले दिसले. ते लोक काझापासून वर असलेल्या लान्गझा गावाकडे गेले होते आणि सकाळपासून सुरू असलेल्या जोरदार बर्फवर्षावामुळे त्यांच्या गाड्या बर्फात आणि चिखलात अडकल्या होत्या. त्या बाहेर काढताना बरेच श्रम पडले आणि त्याच पर्यवसान ए.एम.एस.च्या लक्षणांमध्ये झाला होतं. सकाळी आमचा परत फिरण्याचा निर्णय योग्य होता ह्याची पावती मिळाली. अर्ध्या तासाने मनीषची ऑक्सिजन पातळी ९०च्या घरात असल्याने त्याला घेऊन जायला सांगितलं. पण परत काही लक्षणं दिसली तर ताबडतोब कमी उंचीवर जाण्याचा सल्ला दिला. काझामधलं हे सरकारी इस्पितळ बारा महिने चोवीस तास उघडे असतं आणि इथे सगळ्या अत्यावश्यक सेवा मोफत दिल्या जातात. सगळे डॉक्टर आणि परिचारक इथे येणाऱ्या रुग्णांची अतिशय आत्मीयतेने सेवा करतात आणि तेही कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न ठेवता. इथे एक चॅरिटी बॉक्स ठेवलेला आहे. आम्ही स्वेच्छेने देऊ केलेले पैसे त्या बॉक्समध्ये टाकण्यास सांगितलं गेलं. हॉटेलवर परत आलो आणि उद्याचा लान्गझा, कॉमिक ही आणखी उंचावरील गावं पाहण्याचा बेत रद्द केला. बर्फवृष्टीमुळे तिकडे जाण्याचे रस्तेही बंद होते. मनीषची तब्येत, खराब हवामान हे सगळं पहाता सकाळी उठून की मॉनेस्ट्री पाहून काझा सोडायचा निर्णय घेतला.

69

काझा मार्केट

70

मार्केटमधील चौकात असलेलं प्रार्थना चक्र

71
या पिल्लाने आम्हां सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं होतं

मनीष, शीतल आणि भार्गव अजून साखरझोपेतच होते. मी, जयेश, मेघराज आणि समीर आम्ही पहाटे लवकर उठून की मॉनेस्ट्रीकडे निघालो. आज सकाळी वातावरण जरा बरं होतं. कोवळं उन्ह आणि अधूनमधून ढगांचे पुंजके दिसत होते. की मॉनेस्ट्री या भागातील सगळ्यात मोठी मॉनेस्ट्री आहे. इथे तिबेटी बौद्ध भिक्षूंच्या अनेक निवासी शाळादेखील आहेत. आम्ही पोहोचलो तेव्हा सकाळच्या प्रार्थनेसाठी लहान मुलांची गडबड चाललेली दिसली. थोडे फोटो काढून जवळच्याच एका छोट्या पहाडावर चढू लागलो. या पहाडावरून की मॉनेस्ट्रीचा आणि स्पिती नदीच्या व्हॅलीचा सुंदर नजारा पाहायला मिळतो. ट्रायपॉड सेट केला आणि मनसोक्त फोटो काढून घेतले. खाली उतरलो आणि परत काझाची वाट धरली. आमचा पुढचा मुक्काम चिटकूल गावात असणार होता. पण काझामध्ये खराब हवामानामुळे आम्हाला इथून एक दिवस आधी निघावं लागणार होतं आणि पर्यायाने एक मुक्काम चिटकूलच्या अलीकडे करावा लागणार होता. बुकिंग केलं नव्हतं, त्यामुळे वाटेत स्पेल्लो किंवा पांगी गावात एखादा होम स्टे पाहू, म्हणून तिथे मुक्काम करायचा असं ठरवलं. गाडीत डिझेल भरून घेतलं, कारण रेकाँग पिओपर्यंत परत चांगला पेट्रोल पंप नाही. लांगझा, कॉमिक आणि हिक्कीम या गावांना जाता न आल्याची बोचरी हुरहुर तिथेच सोडून जड मनाने काझाचा निरोप घेतला.

74

की मॉनेस्ट्रीचं प्रवेशद्वार

76

मुख्य गोम्पा

IMG-20191014-WA0012

छोट्या लामांची न्याहारीची तयारी

79

मागल्या डोंगरांवरून दिसणारं की मॉनेस्ट्री आणि स्पिती व्हॅलीचं विहंगम दृश्य

IMG-20191014-WA0011

आमचं नाश्त्याचं टेबल

परतीचा प्रवास सुरू झाला होता. वाटेत फोटो काढत थांबत संध्याकाळी साडेचारच्या सुमारास स्पेल्लोला पोहोचलो. तिथली हॉटेल्स अजून सुरू झाली नव्हती आणि काही होम स्टे होते ते अगदीच राहण्यालायक नव्हते. सगळ्यात भरवशाचा पर्याय रेकाँग पिओ उरला होता. मग कल्पामध्ये आमच्या आधीच्या अ‍ॅपल पाय नावाच्या हॉटेलाचा मालकाला अमनला फोन लावला. सुदैवाने त्याच्याकडे जागा होती. मग गाडी कल्पाकडे हाकली. दमलो असल्यामुळे जेवणानंतर लागलीच अंथरुणात पडलो.

83

कल्पाकडे जाणारा रस्ता

सकाळी लवकर उठून पिओमध्ये आलू पराठ्यांचा दमदार नाश्ता करून चिटकूलची वाट धरली. रेकाँग पिओपासून चिटकूल साधारण ६५ किलोमीटरवर आहे. तरी गूगल मॅप हे अंतर कापण्यासाठी तीन तास दाखवत होता. त्यावरून रस्ता कसा असेल याची कल्पना आलीच होती. वाटेत करचम गावाजवळ सतलज आणि बस्पा नद्यांच्या संगमावर 'करचम-वांगटु' नावाचं धरण बांधलेलं आहे. धरण्याच्या भिंतीपासून काही अंतरावरच मुख्य रस्ता सोडून डावीकडे चिटकूलकडे जाण्याकरिता असलेला करचम पूल लागतो. या पुलापासून चिटकूल साधारण ४२ किलोमीटर आहे. रस्ता अतिशय चिंचोळा आणि घाटाचा आहे. दोन तास त्या अरुंद रस्त्यावर आणि अंगावर येणाऱ्या चढावर गाडी चालवत आम्ही चिटकूलला पोहोचते झालो. समुद्रसपाटीपासून अंदाजे ११५०० फूट उंचीवर वसलेलं चिटकूल हे भारत-चीन सीमेवरचे एक छोटंसं पण नितांतसुंदर गाव आहे. या गावाबाहेर भारतीय सेनेचं एक चेकपोस्ट आहे. तिथून पुढे जाता येत नाही. त्यामुळे हे सीमेवरचं शेवटचं गाव म्हणूनदेखील प्रसिद्ध आहे. बस्पा नदीच्या काठावर असल्याने पिण्याच्या पाण्याचा मुख्य स्रोत बस्पा नदीच आहे. इथे असलेल्या गर्द हिरवाईमुळे इथल्या हवेत ऑक्सिजनची कमतरता जाणवत नाही. उलट आय.आय.टी. दिल्लीच्या वातावरणीय विज्ञान केंद्राच्या अलीकडील अभ्यासात, चिटकूल हे भारतातील सर्वात शुद्ध हवेचं ठिकाण असल्याचं पुढे आलं आहे. इथल्या सामा रिसॉर्टमध्ये आमची राहण्याची सोय होती. स्वागत केलं ते तीन गलेलठ्ठ हिमाचली श्वानांनी. नंतर मालकाशी बोलून आम्ही रूम्स ताब्यात घेतल्या आणि गावात फेरफटका मारायला बाहेर पडलो. आधी उदरभरणाची व्यवस्था केली. एका जुनाट हॉटेलच्या गच्चीवर बसून जेवणाची ऑर्डर दिली. अपेक्षेपेक्षा खूपच छान जेवण मिळालं आणि त्या नंतरचा चहा तर स्वर्गीय होता. गावातून एक रस्ता खाली बस्पा नदीच्या खळखळणाऱ्या पात्राकडे जातो. नदीच्या काठावर मनसोक्त फोटो काढून झाल्यावर गावातील जुन्या मंदिरात गेलो. पौराणिक संदर्भामध्ये चिटकूल ही किन्नर भूमी होती, असं म्हणतात. आजही किनौर-कैलास पर्वत परिक्रमेतला एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे या गावातील देवीचं मंदिर आहे. तिथे कसलीतरी पूजा आणि आपल्या पालखीसारखा सोहळा सुरू होता. तो पाहिला आणि हॉटेलवर परतलो. गरमगरम जेवण पोटात ढकललं, तेव्हा जरा बरं वाटलं. मी, जयेश आणि मेघराज फोटो काढायला बाहेर मोकळ्यावर आलो. स्टार ट्रेलसाठी फ्रेम सेट केली आणि थंडीत कुडकुडत बसलो. मागे मोबाइलवर लतादीदींचं 'ये रातें, ये मौसम...' चालू होतं आणि बस्पा नदीच्या किनाऱ्याला बसून हे गाणं ऐकताना त्या गाण्याचं ध्रुवपद आम्ही शब्दशः अनुभवत होतो. .

88

बास्पा नदी

92

चितकूल गावातील देवीचं मंदिर

100

चितकूलमधील रम्य संध्याकाळ

101

चितकूलमधील स्टार ट्रेल

आजचा मुक्काम नारकंडला होता. जाताना वाटेत सरहनचं भीमाकाली मंदिर पाहणार होतो. सकाळी चहा घेऊन लवकर चिटकूल सोडलं. नारकंड, सिमल्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर जेओरी गावातून डावीकडे सरहनचा फाटा फुटतो. साधारण १५ किलोमीटरवर असलेल्या भीमाकाली मंदिरात पोहोयचायला ४० मिनिटं लागली. रस्ता अरुंद आणि चढ असलेला पण सुस्थितीत होता. भारतातील ५१ शक्तिपीठांपैकी एक असलेल्या या भीमाकाली देवीच्या मंदिराचं मुख्य गर्भगृह संपूर्ण लाकडाचं आहे. मंदिराच्या आत फोटो काढता येत नाहीत. पण प्रांगणामध्ये सुंदर फुलझाडं आणि एक छोटेखानी संग्रहालय आहे. गर्दी फार नसल्याने व्यवस्थित दर्शन झालं. वाटेत जेवायचा थांबा घेऊन आम्ही नारकंडच्या अलीकडे असलेल्या हातू पीक (शिखर) कडे निघालो.

102

चितकूल-करचम रस्ता

103

भीमाकाली मंदिर - सरहन

हातू पीक हे हिमालच प्रदेशमधील दुसऱ्या क्रमांकाचं शिखर आहे. समुद्रसपाटीपासून साधारण ११२०० फूट उंचीवर असलेया या शिखरावर हातू देवीचं लाकडी मंदिर बांधलेलं दिसतं. शिखराच्या चहूबाजूंना ओक आणि मॅपलच्या झाडांचं दाट जंगल आहे. मुख्य रस्त्यापासून नारकंडच्या अलीकडे डाव्या हाताला हातू कडे जाण्याचा फाटा फुटतो. शेवटचे ५ किलोमीटर रस्ता हा एक गाडी जेमतेम जाऊ शकेल इतका अरुंद आहे. मध्ये मध्ये समोरून आलेल्या वाहनाला रस्ता देण्यास काही जागा आहेत. पट्टीचा चालक नसेल तर गाडी वर नेऊ नये. फाट्यापासून वर नेण्यासाठी स्थानिक गाड्यांचीही सोय आहे. वर पोहोचल्यावर जो काही सुंदर नजारा डोळ्यात भरतो, तो शब्दांत सांगणं अवघड आहे.

IMG-20191014-WA0013

हातू शिखरावरचं मंदिर

पुढल्या दिवशीचा शिमल्यातला मुक्काम आमचा या प्रवासातला शेवटचा मुक्काम होता. सकाळी नारकंड सोडून सिमल्याच्या हॉटेलकडे निघालो. सामान हॉटेलवर टाकून सिमला भटकायला बाहेर पडलो. मॉल रोडवर जणूकाही प्रथा असल्यासारखं शॉपिंग झालं, बाजारात फिरणं झालं, तिथल्या प्रसिद्ध चाट भांडारात खादाडी झाली आणि शेवटचा दिवस सार्थकी लागला. पावसाची शक्यता होती, तेव्हा चारच्या सुमारास हॉटेलवर परत आलो. संध्याकाळी हॉटेलच्या रूममधून सूर्यास्ताचे खास फोटो मिळाले. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर निघून चंदीगड एअरपोर्ट गाठायचं होतं. जेवणं आवरून पांघरुणात शिरलो.

IMG-20191015-WA0004

सिमल्यात असलेलं, १९४६ साली सुरू झालेलं पुस्तकांचं दुकान

114
सिमल्यातलं चर्च

पहाटे लवकर हॉटेल सोडलं आणि चंदीगडचा रस्ता धरला. मन मात्र स्पितीमध्येच रमलं होतं. गेले नऊ दिवस डोळ्यासमोर तरळत होते. तिथली माती, तिथले डोंगर, तिथले लोक... सगळंच आगळं होतं. मनाला एक प्रकारची शांतता होती. फोनला रेंज नसल्यामुळे जगाशी संपर्क नव्हता. देवभूमी हिमाचलमध्ये हिमालयाच्या कुशीत घालवलेला क्षण न क्षण डोळ्यांसमोरून सरकत होता. एकीकडे अनेक वर्षांपासून मनात असलेली रोडट्रिप करायाला मिळाली याचा आनंद होता, तर दुसरीकडे हवामानाच्या लहरीपणामुळे यादीमध्ये असलेली काही ठिकाणं पाहता न आल्याची खंत वाटत होती. पुढल्या वर्षी थोडं उशिरा या भागात येऊन ती राहिलेली ठिकाणं पाहायची, अशी स्वतःशीच खूणगाठ बांधली आणि आठवणींची पोतडी खांद्यावर मारून घराची वाट धरली.

भटकंतीत सामील असलेले साथीदार

14

डावीकडून - जयेश, शीतल, अमोल, भार्गव, मेघराज आणि समीर. (फोटो एका फळवाल्याकडून काढून घेतलाय.)


20191016-122815

अनुक्रमणिका

प्रवासवर्णन

प्रतिक्रिया

भन्नाट सफर करवलीस आम्हांला स्पितीची!

जातीवंत भटका's picture

7 Nov 2019 - 3:45 pm | जातीवंत भटका

धन्यवाद !

किल्लेदार's picture

29 Oct 2019 - 2:12 pm | किल्लेदार

गेली कित्येक वर्ष स्पिती ला जायचं ठरवतोय पण राहून जातंय.

व्हर्चुअल सफर घडवल्याबद्दल मनापासून आभार...

जातीवंत भटका's picture

7 Nov 2019 - 3:45 pm | जातीवंत भटका

धन्यवाद !

पद्मावति's picture

29 Oct 2019 - 2:24 pm | पद्मावति

मस्तंच.

जातीवंत भटका's picture

7 Nov 2019 - 3:47 pm | जातीवंत भटका

धन्यवाद !

गुल्लू दादा's picture

31 Oct 2019 - 11:34 pm | गुल्लू दादा

खूप छान लिहिलंय..सफर घडवून आणल्याबद्दल धन्यवाद...!

जातीवंत भटका's picture

7 Nov 2019 - 3:45 pm | जातीवंत भटका

धन्यवाद !

जुइ's picture

1 Nov 2019 - 9:24 pm | जुइ

अतिशय सुंदर फोटो आणि वर्णन.

जातीवंत भटका's picture

7 Nov 2019 - 3:46 pm | जातीवंत भटका

धन्यवाद !

जातीवंत भटका's picture

7 Nov 2019 - 3:47 pm | जातीवंत भटका

धन्यवाद !

बरखा's picture

1 Nov 2019 - 9:33 pm | बरखा

सुरेख सफर घडली लेख वाचून.

जातीवंत भटका's picture

7 Nov 2019 - 3:47 pm | जातीवंत भटका

धन्यवाद !

पैलवान's picture

1 Nov 2019 - 9:48 pm | पैलवान

हेवा वाटावा अशी सफर!!

जातीवंत भटका's picture

7 Nov 2019 - 3:46 pm | जातीवंत भटका

धन्यवाद !

उत्तम लेखनाला सुंदर सुंदर चित्रांची जोड! लेख खूप आवडला.
धन्यवाद.

जातीवंत भटका's picture

7 Nov 2019 - 3:48 pm | जातीवंत भटका

मनापासुन धन्यवाद !

कंजूस's picture

1 Nov 2019 - 10:13 pm | कंजूस

सफर आवडली.
झुमकार म्हणजे भाड्याने कार घ्यायची?
काझातले रहिवासी थंडीत कुठे खालच्या गावात राहायला जातात?

जातीवंत भटका's picture

7 Nov 2019 - 3:57 pm | जातीवंत भटका

होय, झुमकार भाड्याने मिळते चन्डिगड मधे.
काझामधले लोक तिथेच रहातात. सिमल्याहुन रस्ता १२ महिने काझा पर्यन्त जातो. अति बर्फ झाला तर १-२ दिवस वाहतुक ठप्प असते.

अनन्त अवधुत's picture

1 Nov 2019 - 11:22 pm | अनन्त अवधुत

फोटोज मस्त आलेत. प्रवासवर्णन आवडले.

जातीवंत भटका's picture

7 Nov 2019 - 3:58 pm | जातीवंत भटका

धन्यवाद !

सुधीर कांदळकर's picture

4 Nov 2019 - 8:26 am | सुधीर कांदळकर

सुंदर प्रचि आणि छान वर्णन. आवडले धन्यवाद.

जातीवंत भटका's picture

7 Nov 2019 - 3:58 pm | जातीवंत भटका

धन्यवाद !

नरेश माने's picture

4 Nov 2019 - 5:25 pm | नरेश माने

खुपच सुंदर प्रचि आणि वर्णन! मजा आली तुम्ही घडवलेली स्पिती व्हॅलीची सफर बघायला.

जातीवंत भटका's picture

7 Nov 2019 - 3:58 pm | जातीवंत भटका

धन्यवाद !

श्वेता२४'s picture

4 Nov 2019 - 6:01 pm | श्वेता२४

माझ्या बकेटलिस्टमध्ये भर पडली. खूप आवडलं प्रवासवर्णन. फोटो तर लाजवाब

जातीवंत भटका's picture

7 Nov 2019 - 3:59 pm | जातीवंत भटका

नक्की जाऊन या, खुप सुन्दर आहे !

मुक्त विहारि's picture

21 Nov 2019 - 8:20 pm | मुक्त विहारि

सुंदर प्रवास वर्णन. ..

स्पिती बद्दल माहिती नव्हती. ..

धन्यवाद. ...