रुपेरी छाया

Primary tabs

सर्वसाक्षी's picture
सर्वसाक्षी in दिवाळी अंक
25 Oct 2019 - 6:00 am


मिपा दिवाळी अंक  २०१९

अनुक्रमणिका
रुपेरी छायाopg

प्रकाशाशिवाय छाया नाही आणि छाया नसेल तर प्रकाशातही काही मजा नाही. उरेल तो भगभगीत उजाड प्रकाश, वाळवंटातल्या रखरखाटासारखा. म्हणूनच छाया आणि प्रकाश यांचं नातं अतूट आहे. या छाया-प्रकाशाच्या खेळातूनच चित्रणकला जन्मास आली. आधी स्थिरचित्रण, मग चलचित्रण. बघता बघता तंत्रज्ञान विकसित होत गेलं आणि श्वेतश्यामल चित्रणाचा प्रवास सप्तरंगाकडे सुरू झाला आणि रुजला. निसर्गाने उधळलेले लाखो रंग पटलावर बंदिस्त झाले, रंगांची उधळण झाली. निरनिराळी निर्मितीगृहं, देश-परदेशातली चित्रणस्थळं, उद्यानं, बगिचे, तलाव, समुद्र, आकाश, झगमगते कपडे सगळं कसं जबरदस्त आकर्षक, स्वप्नवत. मात्र व्यक्तिशः मला तरी असं वाटतं की जी जादू श्वेतश्यामल चित्रिकरणात आहे, ती रंगीत दुनियेपेक्षा भारी आहे, श्यामलतेच्या असंख्य छटा लाखो रंगांहून सरस आहेत. विशेषतः व्यक्तिचित्रण पाहावं ते श्वेतश्यामलच.

चित्रपट जरी रंगीत झाले, तरी रुपेरी पडदा हे नाव कायम झालं. रुपेरी म्हटलं तरी चित्रपटाचा सुवर्णकाळ होता तो. साठ वर्षांनंतरही ते चित्रपट रसिकांच्या मनात घर करून आहेत. अनेक दिग्गज निर्माते, दिग्दर्शक, अभिनेते-अभिनेत्री, संगीतकार, छायालेखक यांनी तो काळ गाजवला. या रुपेरी दुनियेत एक से एक महान दिग्गज दिग्दर्शक होऊन गेले. सोहराब मोदी, के असीफ, मेहबूब खान, राज कपूर, चेतन आनंद, विजय आनंद, सत्येन बोस, बिमल रॉय, शक्ती सामंता, राज खोसला, गुरुदत्त...

श्वेतश्यामल चित्रपटयुगाचं नाव घेताच मला आठवतो तो गुरुदत्त. एक निर्माता, एक दिग्दर्शक, एक अभिनेता, एक नृत्य दिग्दर्शक आणि एक कलाकार - नायकही. गुरुदत्तचे चित्रपट म्हणजे रसिकांच्या डोळ्यांना अगदी पर्वणीच. अनेकदा कितीतरी उत्तम गाणी ऐकायला जितकी बरी वाटतात, तितकी पाहायला सुखकर वाटतातच असं नाही. मात्र गुरुदत्तची गाणी त्यांच्या संगीताइतकीच पाहायला उत्तम. अत्यंत प्रवाही चित्रण. गुरुदत्तच्या फ्रेम्स, संकल्पना, पात्रयोजना, उत्तम चित्रण, लयबद्धता, कथेचा ओघ... लिहावं तितकं थोडंच आहे. मला बापड्याला तरी या सगळ्याला गवसणी घालणं अशक्य आहे. आज मी लिहीत आहे ते गुरुदत्तच्या 'छाये'बद्दल.

सावली किंवा छाया आणि छायाकृतीचा वापर गुरुदत्तने अप्रतिम केला आहे. अर्थात त्याच्या अफलातून कल्पना आणि त्याने मनात धरलेले अवघड शॉट प्रत्यक्षात उतरवायला त्याच्याकडे जादूई चिराग होता - व्ही.के. मूर्ती. या अवलियाने गुरुदत्तचे चित्रपट आणि विशेषत: त्यातली काही अप्रतिम दृश्यं अजरामर केली. छाया किंवा सावल्या एक वेगळाच परिणाम देतात - मग तो चेहरा असो की एखादा गंभीर प्रसंग. गुरुदत्तने या छायेचा वापर फार सुंदर केला. मुळात गुरुदत्तच्या पात्रांचा संपूर्ण चेहरा एकसलग वा सपाट प्रकाशात कधीच नसतो, तर बहुतेक वेळा एकाच दिशेतून आल्याचा आभास निर्माण करणारी प्रकाशयोजना अर्धाअधिक चेहरा त्याच्याच छायेत झाकणारी, चेहर्‍याचा पोत, प्रत्येक उठाव आणि खळगा छायेने सुस्पष्ट करत त्याचे सौंदर्य वाढवणारी. सुंदर चेहरा कुणीही सुंदर दाखवू शकेल, पण रशीद खान किंवा जॉनी वॉकर यांच्या ओबडधोबड चेहर्‍यांना गुरुदत्तने एक स्वतंत्र ओळख दिली.

सावली वा छाया हा जणू गुरुदत्तचा आत्मा होता. हा मनुष्य प्रचंड संवेदनाशील आणि तितकाच कल्पक होता. त्याची प्रकाश हाताळण्याची आणि पात्रांचे चेहरे आच्छादित ठेवण्याची शैली केवळ अप्रतिम. अगदी म्हणतात ना, अनावृत्त सौंदर्यापेक्षा अर्धावृत्त सौंदर्याचे अधिक आकर्षण वाटते. कदाचित त्यामुळेच त्या चेहर्‍यांना एक वेगळं रूप लाभतं. गुरुदत्तइतका प्रकाश आणि इतका सावल्यांचा खेळ कुणी खेळलं नसेल. कधी थेट प्रखर प्रकाशाची सावली, कधी पुसट सावली तर कधी तलम छाया कधी पूर्ण छायाकृती. प्रत्येक सावलीचा अर्थ निराळा, प्रयोजन वेगळं. कधी वरकरणी दोन सावल्या सारख्या दिसतात, पण संदर्भ वेगळा असतो. आता या विषयावर केवळ शब्द पसरणं बरोबर नाही. चला, आपण प्रत्यक्ष काही सावल्या, काही छायाकृती आणि काही छायांचा आस्वाद घेऊ या.

2
आपल्या चित्रपटसृष्टीतल्या करकिर्दीतल्या अनपेक्षित सुरुवात असणार्‍या पहिल्यावहिल्या प्रवेशासाठी निर्मनुष्य, अंधारलेल्या स्टुडिओत दरवाजात उभी असलेली नायिका. दरवाजातून तिच्या मागून येणारा प्रकाश तिला छायाकृतीचं रूप देतो. मागून प्रकाशाकडून स्टुडिओतल्या अप्रकाशित जमिनीवर तिची लांब व सशक्त छाया पसरतो. तिच्या डाव्या बाजूला संपूर्ण अंधाराला चिरत छतामधून तिरका प्रखर प्रकाश जमिनीचा एक भाग उजळून टाकतो. तिच्या अप्रकाशित व्यक्तिमत्त्वाकडून उज्ज्वल भवितव्याकडे होणार्‍या वाटचालीची ही नांदी असते.

3

काम सुरू होण्याआधी निवांत, शांत स्टुडिओ, उपकरणांच्या सावल्या, सर्वत्र अगदी अल्प प्रकाश फक्त मुख्य दरवाजा उघडा आणि प्रकाशमान. दारात नायक आणि त्याची विशाल सावली, जणू त्याची भव्य प्रतिमा

4

स्टुडिओच्या आवारात आतमध्ये काही पावलं चालताच नायक डावीकडच्या उंच पुतळ्याकडे पाहताना थबकतो, आणि उंचावरून म्हणजे पुतळ्याच्या वरुन खाली त्याच्याकडे रोखलेल्या कॅमेर्‍यात कैद होते ती त्याची दीर्घ सावली, लांब व तिरकी पसरलेली. त्याच्या जीवनप्रवासासारखी.

5

आपल्या पाठीवर आपल्या भूतकळासारखीच छिन्नविच्छिन्न सावली घेउन आपल्या कर्मभूमीत शिरणारा नायक.

6

एकेकाळी स्टुडिओवर राज्य करणार्‍या अनभिषिक्त सम्राटाची बाजूच्या भिंतीवर पडलेली कृश व वाकलेली सावली त्याची सद्य:स्थिती दर्शवते.

7

अंधार्‍या निर्मनुष्य स्टुडिओत जिना चढून जाणार्‍या नायकाची सावली जणू त्याच्या पाठुंगळीला बसलेल्या पिशाच्चासारखी त्याला चिकटलेली दिसते.

8

सर्वस्व गमावलेल्या, थकलेल्या आणि पराजित झालेल्या नायकाच्या चेहर्‍यावरच्या औदासीन्य आणि नैराश्य सूचक गडद सावल्या, स्टुडिओ हेच जग समजणार्‍या दिग्दर्शकाला वेढणार्‍या उपकरणांच्या सावल्या. आपली मुलगी समोर आलेली असतानाही तिच्यासमोर न जाणार्‍या पित्याच्या मनाची गुंतागुंत दाखवणार्‍या सावल्या....

पण याचा अर्थ असा नाही की सावल्या म्हणजे नैराश्य, नकारात्मता, पराभव. काळं आणि पांढरं यामध्ये अथांग पसरलेल्या सावल्या आणि छाया बहुरंगी असतात.

9

हे चित्र मूड्स, कंपोझिशन या दृष्टीने तर चांगलं आहेच, तसंच छोट्याशा सावलीने सगळ्या फ्रेमचा उत्कर्षबिंदू बदलला आहे. या तीन मुलींपैकी पहिली व शेवटची यांच्या चेहर्‍याचा पुढचा भाग प्रकाशित आहे, मात्र मधल्या मुलीच्या चेहर्‍यावर नाजूकशी सावली आहे, जी लक्ष वेधून घेते आणि संपूर्ण चेहरा छायेत असतानाही तीच सर्वात सुंदर दिसते. त्या सावलीला सजीव करतात खुबीने पेरलेले प्रकाशाचे तुकडे. पहिल्या मुलीवर पडलेल्या कठड्याच्या सावल्याही चौकटीत रंग भरतात

गुरुदत्त हा स्वतः नृत्यदिग्दर्शक. साहजिकच त्याच्या सावल्या तालावर नाचतात. त्यात पडद्यावर साक्षात मधुबाला!

10

11

थोडं विषयांतर होतय, पण तरीही सांगतो. या सावल्या पाहिल्यावर रसिकांना अशाच लयबद्ध सावल्यांची आठवण नाही झाली तरच नवल. कोणत्या त्या सावल्या? अगदी अचूक ओळखलंत!

13

मी विषयांतर अशासाठी म्हणालो की हे गीत आहे सी.आय.डी.मध्ये. गुरुदत्त या चित्रपटाचा निर्माता होता, पण दिग्दर्शक नव्हता, दिग्दशक होता राज खोसला! अर्थात या चित्रपटातील काही प्रसंगांवर मिस्टर अँड मिसेस ५५चा प्रभाव जाणवल्याशिवाय राहत नाही. एक हे गाणं, अगदी गुरुदत्तच्या पद्धतीने अल्लड तरुणी आणि त्यांच्या लयबद्ध सावल्या साकारणारं, फरक फक्त 'प्रॉप्स'चा - एका गाण्यात छ्त्र्या आहेत तर दुसर्‍यात हंडे. दुसरा प्रसंग गुरुदत्त मधुबालाच्या ड्रायवरच्या जागी स्वतः बसून तिला फसवून घेऊन जातो आणि गाडी बंद पाडतो, तसाच सी.आय.डी.मध्ये शकिला व देव गाडीत असल्याचा प्रसंग. कदाचित सी.आय.डी.चे छायालेखक व्ही.के. मूर्ती होते व त्यांनी गुरुदत्तबरोबर अनेकानेक अप्रतिम दृश्यं साकारली होती, त्यामुळे त्यांच्यावर प्रभाव असणं स्वाभाविक आहे. शिवाय प्रत्यक्ष राज खोसला यांनीही गुरुदत्तबरोबर साहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं होतं.

14

गुरुदत्त आणि लयबद्ध सावल्यांचा नाच - जगदीप आणि दोन बालकलाकार आरपारमध्ये साकार करतात.

गूढ सावल्या, गंभीर सावल्या, उदास सावल्या, प्रभावी सावल्या, वास्तू जिवंत करणार्‍या सावल्या, कारस्थानी सावल्या अशा अनेक सावल्या गुरुदत्तकडे पाहायला मिळतात.

15

अखेरच्या दृश्यात खलनायकाला अटक करण्याच्या प्रसंगात पोलिसांच्या चतुरस्र व शिस्तबद्ध सावल्या जणू खलनायकाला सांगतात की आता पळायचे सर्व मार्ग संपले आहेत, शरण ये.

16

गाडीच्या डिकीत गोळ्या सापडल्यावर आपण त्या गाडीतून आणलेल्या खोक्यांमध्ये काय आहे ही उत्सुकता नायकाला त्या खोक्यांकडे खेचून नेते. तो खोक्याजवळ जाताच काटकोनातील भिंतींवर पडलेल्या त्याच्या अनेक सावल्या आणि डावीकडे जमिनीवर पडलेल्या चौकटीच्या सावल्या दृश्याला वेगळाच रंग भरतात.

17

खलनायकाच्या डोक्याच्या सावलीत रस्त्याच्या नकाशाच्या रेघा आणि हातातील पेनाच्या सावल्या साकारत असलेला बँक लुटीचा प्लॅन

18

वास्तूचे सौंदर्य वाढवणार्‍या आकृतिबद्ध सावल्या, झपाझप पावलं टाक्णार्‍या त्या माणसाची सावली एक एक स्थिर सावली ओलांडताना.

19

प्रसंगाला अनुरूप अशी ही सावली. आपलं सर्वस्व देऊन नायकाचा कवितासंग्रह प्रकाशित करणारी नायिका ते प्रकाशित झालेलं पुस्तक हातात धरून वाचणारी नायिका - हाताची सावली पुस्तकावर आहे, जणू विश्व तिच्या हाती आलं आहे. नायिकेची दाट सावली पलीकडे भिंतीवर पडली आहे, त्या सावलीत ते पुस्तक उठून दिसत आहे. मला वाटतं ही संकल्पना प्रशंसनीय आहे

20

अंधारातून प्रकाशाकडे वाटचाल दाखवणारी अप्रतिम छायाकृती. देवदासचे संवाद समजावताना प्रथितयश दिग्दर्शक आणि नवोदित नायिका. पूर्णप्रकाशित जमीन, अप्रकाशित भिंती आणि वरून तिरका खाली आलेला अंधाराला भेदून जाणारा प्रकाशझोत अत्यंत परिणामकारक.

21

आपलं घररदार लिलावात गेलेला कफल्लक आणि उद्ध्वस्त झालेला नायक छायाकृती स्वरूपात, समुद्राला ओहोटी आहे आणि आकाश मेघाच्छादित आहे. नायक समुद्रकिनार्‍यावर चालत आहे, ज्याच्या जवळपास कुणीही सजीव वा वास्तू नाही.

22

आपल्या कर्मभूमीमध्ये - म्हणजे स्टुडिओमध्ये 'डायरेक्टर' च्या खुर्चीत बसलेल्या अवस्थेत मरण पावलेला नायक पाठमोरा छायारूपात, त्याच्या पायाशी पडणारा वरून तिरपा आलेला प्रकाशझोत. थिजलेल्या निस्तब्ध वातावरणात समोर दोन पुतळे आणि त्यांच्या भिंतीवर पडलेल्या सावल्या, नायकाच्या आजूबाजूला यंत्रसामग्री, दिवे वगैरे साहित्य छायारूपात

z

रात्री अंधारात पावसात आडोसा शोधायला निघालेला नायक छायाकृती रूपात, झाडसुद्धा छायारूपात आणि पलीकडे आजूबाजूच्या दिव्यांचा प्रकाश असं एक प्रभावी छाया चित्र

24

झगझगीत प्रकाश असलेला रस्ता सोडून पोलीस पाठलाग चुकवण्यासाठी अंधार्‍या बोळात शिरणारी मागे वळून पाहत पळणारी नायिका

25

स्वार्थी दुष्ट दुनिया सोडून दूर निघालेला नायक आणि इंजीनवर पडलेली त्याची छाया - एक सुंदर दृश्य.
26

छायाकृतीचा अप्रतिम वापर. 'बॉस' अंधारात बसलेला आहे, फक्त डाव्या गालावर किंचित प्रकाशाची कड, तो बाहेरच्या दिशेने पाहत आहे, बाहेरची बाजू उजळ आहे आणि मांडणीवरच्या बाटल्या छायाकृती रूपात.

मात्र चेहर्‍यावरच्या ग्रासून टाकणार्‍या बदलत्या छाया, बदलणार्‍या प्रकाशयोजनेबरहुकूम चेहर्‍यावरच्या बदलत्या छाया आणि बदलतं रूप असा छाया-प्रकाशाचा जबरदस्त खेळ म्हणजे 'वक्त ने किया क्या हसीं सितम'चं चित्रण. एकाच नायक-नायिकांचे बदलते चेहरे आणि बदलते भाव या गाण्यात प्रकर्षाने जाणवतात. लांबच्या शॉट्सम्ध्ये सेटवरचा छाया-प्रकाशाचा सुंदर खेळ. केवळ अप्रतिम चित्रीकरण आणि छाया-प्रकाशाच्या त्या खेळाच्या आकर्षणाने मी हे गीत अनेकदा पाहतो.

waqt

waqt2

गुरुदत्तला बहुधा फारशी लोकेशन्स वगैरे लागायची नाहीत. प्रभावी कथानक, उत्तम अभिनेते-अभिनेत्री, मधुर संगीत (एस.डी. किंवा ओ.पी.) आणि कॅमेर्‍यावर व्ही.के. मूर्ती हे पुरेसं होतं. हा लेख लिहायच्या निमित्ताने मी गुरुदत्तचे अनेक चित्रपट पुन्हा पुन्हा सावकाश पाहिले आणि मला त्याच्या रुपेरी छायेने संपन्न झालेले अनेक चेहरे आणि एकाच चेहर्‍याची अनेक रूपं दिसत गेली. अनेक प्रसंग दिसले. एकेक चित्रपट आणि आवडलेले सगळे चेहरे वा प्रसंग देणं विस्तारभयास्तव शक्य नाही

गुरुदत्तने दिग्दर्शित केलेल्या आणि व्ही.के. मूर्तींनी चित्रित केलेल्या चित्रपटातले हे मला विशेष आवडलेले काही चेहरे.

c

श्रेयनिर्देश : चित्रे यूट्यूबवरून, साभार.20191016-122815

अनुक्रमणिका

प्रतिक्रिया

कृष्णधवल जग फार सुंदर आहे! फोटोग्राफी असो वा सिनेमॅटोग्राफी.
रसग्रहण आवडले. अनोखा विषय, उत्तम मांडणी.

गुरूदत्त व त्यांचे चित्रपट पूर्वीपासून आवडतात. पण त्यांचं काम या कोनातून पहायला फार विलक्षण वाटलं. सुंदर लेख!!

सुधीर कांदळकर's picture

26 Oct 2019 - 7:47 pm | सुधीर कांदळकर

तुमचे बोट धरून केलेली छायाप्रकाशाची मस्त सफर. मला कुठल्या तरी चित्रपटातली नादमय हालचाली करणारी गीताबाली देखील आठवते आहे. मला माधव आचवल यांच्या किमया या पुस्तकाची आठवण करून दिलीत. एका मस्त जगाची नव्याने ओळख करून दिलीत. मजा आली. अनेक अनेक धन्यवाद.

सर्वसाक्षी's picture

26 Oct 2019 - 11:27 pm | सर्वसाक्षी

कांदळकर साहेब
आपल्याला बहुतेक बाजी मधली गीता बाली आठवली असावी,
' तदबीर से बिगडी हुई तकदीर बनावे
अपने पे भरोसा है तो ..'

कुमार१'s picture

27 Oct 2019 - 11:13 am | कुमार१

रसग्रहण आवडले.

पद्मावति's picture

27 Oct 2019 - 1:13 pm | पद्मावति

सुंदर लेख.

सोत्रि's picture

28 Oct 2019 - 4:51 pm | सोत्रि

अप्रतिम, झक्कास, कल्पक, सुन्दर ....

- (स्पीचलेस झालेला) सोकाजी

विजुभाऊ's picture

28 Oct 2019 - 5:09 pm | विजुभाऊ

"वक्त ने काय किया " गाण्यातील तो छतावरून उजेडाचा कवडसा पडण्याचा प्रसंग हा तर भारतीय चित्रपट इतिहासातील सर्वात मोठा हायलाईट असेल.
गम्मत म्हणजे प्रकाशाची ती तीरीप येत असताना गिटार आणि व्हायोलीन चे स्वर त्यात अधीक रंगत आणतात.

व्यक्तिशः मला रंगीत चित्रपट पाहणेच आवडत असले तरी, सुबक मांडणी आणि उत्तम लेखनशैली द्वारे तुम्ही उलगडून दाखवलेला 'हा खेळ सावल्यांचा' खूप आवडला.
रसिकतेने चित्रपट बघण्याची एक नवीन मिती दाखवणारे हे रसग्रहण छानच जमून आलंय!
धन्यवाद.

लेखविषयाची निवड, लेखन विचार, विस्तार... सगळे फार आवडले.
All the beauty of life is made up of light and shadow ह्या लिओ टॉलस्टोयच्या विधानाला पदोपदी दुजोरा देणारे लेखन.
फोटो निवडही उत्तम.

मुक्त विहारि's picture

19 Nov 2019 - 5:09 pm | मुक्त विहारि

वक्त ने किया. ...हे माझे अत्यंत आवडते गाणे. ..

स्मिताके's picture

21 Nov 2019 - 11:31 pm | स्मिताके

फार सुरेख. आवडले.

नूतन सावंत's picture

23 Nov 2019 - 6:18 pm | नूतन सावंत

गुरूदत्त व त्यांचे चित्रपट पूर्वीपासून आवडतात. पण त्यांचं कामाचे हे पैलू पहताना फार सुंदत वाटलं. माहितीपूर्ण सौंदर्य दाखवणारा लेख!

जुइ's picture

24 Nov 2019 - 8:53 pm | जुइ

अप्रतिम लेख. प्रकाश आणि सावल्यांच्या खेळातील आणि तितकाच गूढ आणि रम्य गीता दत्तच्या आवाजातील "वक्त ने किया क्या हँसी सितम" हे विशेष आवडते गाणे आहे.