आमचं प्रेम सेम नसतं!

Primary tabs

राघव's picture
राघव in दिवाळी अंक
25 Oct 2019 - 6:00 am


मिपा दिवाळी अंक  २०१९

अनुक्रमणिका
आमचं प्रेम सेम नसतं!लोक म्हणतात, प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, सगळ्यांचं जवळपास सेम असतं! आम्ही म्हणतो, प्रेम म्हणजे च्यायला नक्की काय असतं? ते कशाशी खातात??

हातात हात घेऊन लोक रस्त्याच्या कडेने चालतात. आम्ही? नाही! आमच्या हातात तेव्हा किराण्याच्या पिशव्या असतात! अरे, डोक्यावरती तापलेलं ऊन असताना यांना दुसरं काही लोभसवाणं सुचतंच कसं??? मागे एकदा, बाहेर फिरायला गेल्यावर बायकोकडे बघून एक-दोनदा हसलो.. अहो, तिचं जाऊं देत, माझं मलाच चुकल्या-चुकल्यासारखं वाटलं!

लोक वेण्या घेतात.. त्या बायकोला(च) देतात.. आवडत नसलं तरीही दोघं मिळून एकत्र एखादा पिक्चर टाकतात. आमच्याकडे 'कोणता पिक्चर' यावर सहज आठवडाभर वाद होतो! आणि मुळात 'बॉबकटवर वेणी कोण घालतं..' हा सनातन प्रश्न आ वासून उभा असतोच!!

अरे??? च्यायला! आम्ही काय कधी रोमँटिक क्षण अनुभवायचेच नाहीत की काय??

मित्राने डायलॉग टाकला,"रोमान्स ही एक मनाची अवस्था आहे!"

मी म्हटलं, "आधी लग्न कर, मग बघतो किती दिवस हा चावलेला 'रागा' चालतो तुझा.." म्हणे मनाची अवस्था.. फुकटचे सल्ले!

नाही, काय होतं एखादवेळेस आपल्या मनात नसलं, तरी दुसर्‍याला आवडेल असं (जरा वेळ का होईना) वागायला?? त्याच्या मनाखातर?? इथं डायरेक्ट स्टेटमेंट असतं.. "तुला कसलं आलंय मन? हृदयात आणि डोक्यात, दगड-माती घेऊन जन्माला आला आहेस.."

अरे???!!

एकदा तर हद्द झाली. आमच्या बाजूचे आज्जी-आजोबासुद्धा मस्तपैकी फिरून आले... चांगले ८-१० दिवस!

"अरे, लग्नाचा पन्नासावा वाढदिवस.. म्हटलं जरा थाटात साजरा करू या! बाकी दार्जिलिंग मस्त आहे रे!!"

यावर मात्र मी पेटलोच. अरे, लोक जग बदलतात.. आपण आपलं लाइफ तरी जरा बदलायला पाहिजे!

फोनाफोनी सुरू केली.
मित्राला कामाला लावलं.
परवडणारं पॅकेज डील शोधून काढलं.
पोरीची जरा आठवडाभर आजोळी सोय केली!


20191018-155907


कुठे जायचं? हा प्रश्न मागच्या अनुभवावरून विचारलाच नाही. "औदुंबराला जाऊन येऊ. मग वाडी.. आणि येतांना सज्जनगड वगैरेसुद्धा करता येईल की!" मला तेव्हा साक्षात दत्तगुरू डोक्याला हात लावून आमच्याकडे करुण दॄष्टीने बघताहेत, असा भास झालेला.

हिमाचलाची टूर करायची तर तयारी बरीच करावी लागणार. म्हंजे मी कॅमेरा, बॅटरी, कार्डं, चार्जर, थर्मल्स, शूज, खास कपडे, एखाद-दोन पुस्तकं यांचा विचार करत होतो.. आणि ती काय काय खायला घ्यायचं अन् सर्दी झाली/घाट लागला तर औषधं जवळ असूं देत याचा विचार करत होती!

"आपण पहाडगंजपर्यंत ट्रेनने जाणारे ना रे.. मग १५-२० धपाटे घेते बरोबर. उगाच बाहेरचं खायला नको." असं वाक्य टपकलं. हटलं नशीब! येताना प्लेनने येणार, नाही तर आलू पराठे आणि राजम्याची उसळ बांधून घेतली असती हिने.

विचार केला, बाकी आवर-सावर जाऊ दे, आधी या प्रकारालाच सावरावं जरा. नाहीतर पूर्ण टूरचं भजं व्हायचं! मग नीट समोर बसवून चांगली तास-दोन तास शाळा घेतली.

"कधी तर दुसरा विचार करून बघ की.. थोडे दिवस घर-पोट-पोरगी-तब्बेत यांचा विचार जरा बाजूला ठेव. तिथे जाऊन काय काय करू शकणार याचा विचार करून बघ! भाजी-किराणा कुणालाच सुटलेले नाहीयेत. पण हॉटेलात जेवताना आपण किराणा संपलाय आणि आणावा लागणार याचा विचार करत बसलो ना, तर स्वीट डिशसुद्धा आंबट लागेल!".. वगैरे..!

शेवटी एकदाचं पटलं. मग काय.. भरपूर पिंगा घालून चांगली टूर प्लॅन केली आणि जाऊन आलो! बाकी टूरवर काय-काय झालं ते सांगत बसत नाही! खरं सांगू का.. बायकोला घराव्यतिरिक्त दुसरा कोणता विचार करणं शक्य झालं, याचाच मला जास्त आनंद झाला होता!

परत आल्यावर आजोबांनी डोळे मिचकावत विचारलं, "काय रे? कशी झाली टूर??"

आता या वेळी मात्र माझ्याकडे चांगलं तोंडभर हसू होतं.. छान झाली, म्हणून सांगायला!!


श्रेयनिर्देश: चित्र आंतरजालावरून साभार.


20191016-122815

अनुक्रमणिका

कथा

प्रतिक्रिया

जुइ's picture

26 Oct 2019 - 7:13 pm | जुइ

लेखन आवडले!

यशोधरा's picture

26 Oct 2019 - 7:14 pm | यशोधरा

खूप मस्त, रंगवून लिहिलंय!

जॉनविक्क's picture

27 Oct 2019 - 12:08 pm | जॉनविक्क

मित्राने डायलॉग टाकला,"रोमान्स ही एक मनाची अवस्था आहे!"

मी म्हटलं, "आधी लग्न कर, मग बघतो किती दिवस हा चावलेला 'रागा' चालतो तुझा.." म्हणे मनाची अवस्था.. फुकटचे सल्ले!

एकीच मारा पर सॉलिड मारा

जेम्स वांड's picture

27 Oct 2019 - 12:18 pm | जेम्स वांड

बरेच पॉईंटर मिळाले, गाईड करता धन्यवाद :)

किल्लेदार's picture

29 Oct 2019 - 5:33 pm | किल्लेदार

बर्रर्रर्र .......

असं असतंय व्हय ????

पद्मावति's picture

29 Oct 2019 - 9:33 pm | पद्मावति

छान लिहलंय :)

मित्रहो's picture

31 Oct 2019 - 5:34 pm | मित्रहो

तरीही अधूनमधून असेही करायला हवे

मला तेव्हा साक्षात दत्तगुरू डोक्याला हात लावून आमच्याकडे करुण दॄष्टीने बघताहेत, असा भास झालेला.

हहपुवा!!! भारी लिहिलंय.... :-)

श्वेता२४'s picture

31 Oct 2019 - 9:45 pm | श्वेता२४

भारी लिहीलंय

आता या वेळी मात्र माझ्याकडे चांगलं तोंडभर हसू होतं.. छान झाली, म्हणून सांगायला!!

तुमची यात्रा सुफळ संपूर्ण झाली हे छान झालं!
खुसखुशीत लेख आवडला.

सोत्रि's picture

4 Nov 2019 - 11:22 am | सोत्रि

झक्कास!

ऑल इज वेल दॅट एन्ड्स वेल :)

- (रोमॅन्टीक) सोकाजी

तुम्हा सगळ्यांचे प्रतिसाद वाचून खूप आनंद झाला. धन्यवाद! :-)

मुक्त विहारि's picture

21 Nov 2019 - 7:29 pm | मुक्त विहारि

आवडलं

पद्मश्री चित्रे's picture

24 Nov 2019 - 9:49 pm | पद्मश्री चित्रे

माझं पण असंच होतं.. मुलं.. जेवण.. घरदार ..नोकरी यातून बाहेर पडणं कठीणच जातं..