चना जोर गरम - पाकृ - जागु

Primary tabs

जागु's picture
जागु in दिवाळी अंक
25 Oct 2019 - 6:00 am


मिपा दिवाळी अंक  २०१९

अनुक्रमणिका
चना जोर गरम
रोजच्या रोज काय वेगळं बनवायचं? हा स्वयंपाक करणाऱ्या समस्त महिलांच्या मनात सतत घोळत असणारा आवडता म्हणा किंवा कधीही न संपणारा विचार. माझ्याही मनात असेच विचार चालू असतात, जे मला आवडतात, कारण त्यामुळेच नावीन्यांची निर्मिती होते. म्हणजे जड काही नाही ओ, नवीन पदार्थांची म्हणायचंय. पूर्वी पुस्तकं, मासिकं अशीच माध्यमं होती नवीन पदार्थ जाणून घेण्याची. आता सोशल मीडियामुळे - खासकरून यूट्यूबमुळे इतक्या पदार्थांचा खजिना सापडला आहे की काय करू आणि काय नको, हे पाहता पाहता कधीकधी पदार्थ काय बनवायचा हेच निश्चित होत नाही. मग जरा डोकं शांत ठेवावं लागतं आणि ह्या गोंधळातून बाहेर पडून नक्की सध्या काय करायला हवंय ते ठरवलं की प्रश्न सुटायला लागतो.

आज ठरवलं, काहीतरी असं करायचं जे कधीही मधूनच पटकन उपयोगात आणता येईल एखादा सपोर्टिंग घटक किंवा खाऊ. मग पुन्हा यू ट्यूबला चाळवणं सुरू केलं आणि डोळ्यासमोर चना जोर गरमची रेसिपी आली. मला पारंपरिक पदार्थ सोडले तर इतर कोणत्याही पदार्थांत थोडा फेरफार करायला नेहमी आवडत. तर मूळ रेसिपीच्या पद्धतीत थोडा फेरफार करून मी ही चना जोर गरमची रेसिपी खालीलप्रमाणे केली -

साहित्य :

पाव किलो चणे (हिरवे किंवा लाल कोणतेही)
२ चमचे मीठ
१ चमचा सैंधव मीठ
१ ते २ चमचे मिरची पूड
२ चमचे आमचूर पावडर
१ चमचा जिरे पूड
१ चमचा धणे पूड

कृती :

रात्री चणे भिजत घालायचे आणि सकाळी उकडायचे. कुकरची एक शिटी घ्या. असेच भांड्यात उकडायचे असतील तर दाबता येतील इथपर्यंत शिजवायचे. (हे थोडे थंड झाले की त्यातलं पाणी टाकून न देता बाजूला काढून ठेवायचं. नुसतं आवडत असेल तर मीठ टाकून, नाहीतर कांदा, दालचिनी, मिरी तुपावर फोडणी देऊन सूप म्हणून प्यायचं. कारण ह्या उकडीच्या पाण्यात चण्याचं सत्त्व उतरलेलं असतं.) चणे पूर्ण कोरडे करण्यासाठी चणे चाळणीत काढून घ्या. आता मोठ्या ताटात किंवा थाळ्यांत चणे अंगठ्याने किंवा पेल्याचा आधार घेऊन दाबायचे. साधारण दोन-तीन ताटं भरतील. हे ठेचलेले चणे उन्हात वाळवायचे. जर ऊन नसेल तर पंख्याखाली एक दिवस ठेवायचे.

आता आपण ह्या चपट्या चण्यांसाठी लागणारा मसाला तयार करून घेऊ या. वरचे चणे सोडून सगळे जिन्नस एकत्र करून घ्यायचे. आपल्या आवडीनुसार प्रमाण कमी-अधिक करू शकता.

Photo-Collage-20191015-155816881


आता हे चपटे वाळलेले चणे तेलात तळायचे किंवा बेक करायचे. पण तेल टाळण्यासाठी मी बेक करणंच पसंत केलं. मी एका मोठ्या भांड्यात मीठ ठेवून त्यावर ढोकळ्याच्या स्टँडमध्ये हे चपटे चणे रचून भांड्यावर झाकण ठेवून गॅसवर ३० मिनिटं बेक केलं. छान कुडकुडीत बेक झाले. आता हे गार झाले की एका भांड्यात घेऊन त्यावर गरजेनुसार मसाला भुरभुरला. हे असेच ठेवले तरी महिनाभर टिकतात. मग ह्या चपट्यांची कुरमुरे घालून भेळ किंवा पोह्यांच्या चिवड्यात, कधीतरी कांदा, टोमॅटो, कोथिंबीर घालून ह्यांची चटपटीत भेळ करता येते. तुमच्या युक्ती वापरून तुम्ही ह्याचा वापर पदार्थांमध्ये करू शकता.

IMG-20191008-WA0065टीप : बेकपेक्षा तळलेल्या चपट्यांना जास्त चव येते आणि मसालाही तेलामुळे चांगला मिसळून येतो.


20191016-122815

अनुक्रमणिका

पाककृती

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

26 Oct 2019 - 12:11 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पाककृती आवडली. फोटो एकदम क्लास.

-दिलीप बिरुटे

मस्त पाकृ. चिवड्यात घालून पण चवदार लागेल.

नूतन सावंत's picture

27 Oct 2019 - 9:36 pm | नूतन सावंत

मस्त,मस्त,करून पाहीनच.फोटो झकास.

मस्तच आहे पाकृ. फोटोही झकास.

जुइ's picture

29 Oct 2019 - 2:03 am | जुइ

पौष्टिक चना जोर गरमची पाककृती आवडली.

मस्त रेसिपी, फक्त आमचूर पावडर आवडत नसल्याने त्या ऐवजी लिंबू आणि सैंधव मिठाच्या ऐवजी चाट मसाला असा फेरफार करून ट्राय करण्यात येईल.

पद्मावति's picture

5 Nov 2019 - 12:28 am | पद्मावति

मस्तंच.

श्वेता२४'s picture

5 Nov 2019 - 11:10 am | श्वेता२४

मला उत्सुकता होतीच हे चपटे चणे कसे करत असतील. आवडली पाकृ. फोटो मस्तच.

मुक्त विहारि's picture

23 Nov 2019 - 9:42 am | मुक्त विहारि

धन्यवाद

गामा पैलवान's picture

25 Nov 2019 - 1:36 am | गामा पैलवान

जागूताई,

चप्पटचणा पाकृ वाचून तोंडाला जाम पाणी सुटलं. लिंबू पिळून काय अप्रतिम लागेल हा प्रकार!

धन्यवाद!

आ.न.,
-गा.पै.