सणावारांची बाजारपेठ

Primary tabs

जागु's picture
जागु in दिवाळी अंक
25 Oct 2019 - 6:00 am


मिपा दिवाळी अंक  २०१९

अनुक्रमणिका
सणावारांची बाजारपेठ

काही दिवसांपूर्वी बाजारपेठेलगत असलेल्या हॉस्पिटलमध्ये किरकोळ आजारामुळे एक दिवस राहण्याचा योग आला. आम्ही ज्या खोलीमध्ये होतो, त्या खिडकीतून बाहेर बाजारपेठेत चाललेली वर्दळ, खरेदी-विक्री, भाज्या, फळे पाहत विरंगुळा होत होता. दुसर्‍या दिवशी पहाटे उठले आणि खिडकीजवळ गेले, तर अगदी भकास वाटू लागले. फक्त कोरडा रस्ता दिसत होता. ना फळे, फुले, ना भाज्या, ना लोकांची गर्दी. पहिल्यांदाच बाजारपेठेला अस बिनाअलंकार पाहिले आणि अस्वस्थ वाटले. पण हा अस्वस्थपणा थोड्याच वेळात दूर झाला. हळूहळू दुकानदार, रस्त्यावरचे गाडीवाले, भाजीच्या टोपल्या घेऊन बसणार्‍या बायका असे आपआपल्या जागी जमू लागले. स्वतःच्या जागेची झाडलोट चालू झाली, रस्त्यावर पाणी शिंपडणे चालू झाले. धंदा चांगला व्हावा म्हणून अगरबत्त्या लावून प्रार्थनापूर्वक पूजाही होत होत्या. त्या अगरबत्त्यांचा धूर हवेत मंद एका सुरात वाहत होता. हे सगळे दृश्य पाहून मला सकाळची भूपाळी आठवत होती. आता प्रसन्न वाटू लागले होते. एकीकडे पिवळ्या केळ्यांची गाडी, तर कुठे कांदे-बटाटे, कुठे लाल लाल टोमॅटो तर कुठे सगळ्या हिरव्या पालेभाज्या, कुठेतरी मध्येच डोकावणारी फुले, शेंदरी गाजर, मक्याची अर्धवट सोलून ठेवलेली मोत्यासारखी कणसे, डाळिंब, संत्री, पेरू, चिकू अशी विविधरंगी फळे रचत रस्त्याला रंगीबेरंगी साजशृंगार चढला. थोड्याच वेळात गिर्‍हाईकही चालू झाले. खरेदी-विक्री दरम्यानची संभाषणे चालू झाली आणि हळूहळू मार्केट नेहमीसारखे आपलेसे वाटू लागले.


Photo-Collage-20191022-200318275बाजार म्हणजे आपल्या सगळ्यांचाच आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग. आमच्या उरणमध्ये भाजी मार्केट, मच्छी मार्केट, फूल मार्केट आहेच शिवाय रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या दुकानांसमोर रोज फळे, भाज्या, फुले. ऑफिसला जाताना लागणारा मार्केटचा देखावा मला नेहमीच आवडतो. फळे, फुले, किराणा, औषधे, मासे, कपडे, करमणुकीच्या विविध वस्तू, खेळणी, भांडी अशी अनेक दुकाने मार्केटमध्ये कित्येक वर्षे आपले बस्तान बांधून नांदत असतात. गिर्‍हाईक हाच देव मानून दुकानदार व्यवहारामार्फत गिर्‍हाइकाची सेवा करत असतात.

सणासुदीच्या दिवसांत मार्केटमध्ये जाणे मला जास्त आवडते. प्रत्येक सणाची वेगवेगळी वैशिष्ट्ये बाजारात दिसत असतात. चैत्र महिन्यातील गुढीपाढव्याला साखरेच्या माळांनी मार्केटला गोडवा आलेला असतो. हल्ली छोट्या गुढ्याही दुकानांत नटून सजून बसलेल्या असतात. फूलवाल्यांकडे झेंडूच्या फुलांना विशेष महत्त्व आलेले असते.

ज्येष्ठातली वटपौर्णिमा सुवाशिणींचा सण. ह्या सणाला बाजारपेठेत फणसाच्या राशी लागतात. फणस कापून गरे विकणाऱ्याभोवती तर बायकांचा गराडाच असतो. नवीन नवऱ्यांसाठी लागणाऱ्या परड्या बुरूड बायका विकत असतात. नवीन नवऱ्यांच्या आया आपल्या मुलीची ओवश्याची परडी तिच्या आयुष्यात सुखाचे दान मिळावे म्हणून मनोभावे खरेदी करताना दिसतात. ओवशात लागणारी फळे ही त्या हंगामाचीच असतात - म्हणजे फणस, जांभूळ, करवंदे, आंबा, अळू ह्या फळांना बाजारात मान असतो आणि ह्या मानाला साजेसे त्यांचे भावही चढलेले असतात. जोडीला केळी, चिकू अशा फळांच्याही कॉलर टाईट असतात. खण-नारळांच्या सामानालाही उधाण आलेले असते. आजकाल वडाच्या फांद्यांनी तर बाजार भरलेला दिसतो. पण त्याऐवजी वडाच्या झाडाची रोपे विकायला येऊन ती दारोदारी लावली जावीत व ज्यांना शक्य नाही त्यांनी वडाच्या चित्राची पूजा करावी, जशी देवतांच्या प्रतिमेची केली जाते, अशी ईश्वरचरणी प्रार्थना आहे जेणेकरून वडाच्या झाडांना हानी पोहोचणार नाही.

आषाढातल्या एकादशीला बाजारात साक्षात जणू पांडुरंगच प्रसन्न असतो. जास्त गडबड गोंधळ नसतो, पण जागोजागी भुईमुगाच्या शेंगा, अळूच्या मुळ्या, कोनफळ, रताळी अशी मातीतली कंद वारीत आल्याप्रमाणे विठोबाच्या रंगात मिसळलेली दिसतात.

श्रावण महिन्यात बाजारपेठेतही 'श्रावणमासी हर्ष मानसी' वातावरण असते. जागोजागी रानभाज्यांची हिरवळ पसरलेली असते. नागपंचमीला नागाच्या सुबक मूर्ती फणा काढून दर्शन देत असतात. नागोबाला वाहण्यासाठी लागणाऱ्या वेली जुड्यांमध्ये जणू पदर खोचूनच बसलेल्या असतात. राखीबंधनाच्या राख्यांची हंगामी दुकाने रंगीबेरंगी, विविध आकारातील राख्यांनी सुशोभित झालेली असतात. थोड्याच दिवसांत येणाऱ्या गोकुळाष्टमीसाठी सजलेल्या हंड्या नटखट कान्हा दही चोरताना डोळ्यासमोर आणतात.

भाद्रपद महिना म्हणजे गणेशोत्सवाचा जल्लोश! या दिवसांत बाजारपेठांतील गल्ली अन गल्ली मंगलमय रूप धारण करते. जिकडे तिकडे अत्तरांचा व उदबत्त्यांचा सुगंध, फळांच्या गाड्यांवर फळांच्या सुबक राशी, फूलमार्केटमध्ये सजावटीची फुले, कंठ्या नि दूर्वा, सुगंधी फुलांनी मार्केट इतके मंगलमय झालेले असते की तिथून पाय पुढे निघत नाहीत. काही सजावटीची दुकाने तोरणांनी, माळांनी घराघरांतील गणेशाचे स्वागत करायला सज्ज झालेली असतात. हलवायांच्या दुकानांत मोदकांच्या सुबक राशी रचल्या जातात. सीडीची दुकाने गणेशभक्तीच्या गीतांनी सुरेल झालेली असतात. गणपतीच्या आगमनापूर्वीचे दोन दिवस तर बाजारपेठ तुडुंब भरलेली असते. गणेशमूर्तीही बाजारातील दुकानांमध्ये आपापल्या मेकअपवर फायनल टच मारून मखरात विराजमान होण्यासाठी तयार होत असतात.

आश्विन महिन्यातली नवरात्र बाजारपेठ झगमगीत करते. जागोजागी देवीसाठी लागणारे पूजेचे सामान, रंगीबेरंगी दांडिया आणि गरब्याचे चमकदार आणि उठावदार असे रंगीत घागरे यांनी बाजारपेठेत फेर धरलेला असतो. ह्या दिवसांत उपवासासाठी मोठमोठाले भोपळे ठिय्या मांडून बसलेले असतात. अगदी आजीबाईच्या भोपळ्याच्या गोष्टीची आठवण आल्याशिवाय राहत नाही.

कोजागरी पौर्णिमेचा चंद्रही बाजारपेठेत आपल्यासाठी आज काय गंमत आहे हे डोकावून नक्की पाहत असेल. प्रत्येक घरात किंवा सोसायटीत कोजागरीनिमित्त होणाऱ्या पार्टीसाठी खास मेनू आखले जातात. त्यात मसाला दूध हे तर नैवेद्य म्हणून चंद्राचे प्रतिबिंब आपल्यात सामावून घेण्यासाठी आतुर असते. ह्या दिवशी सकाळीच दूध आणून ठेवावे लागते. संध्याकाळपर्यंत बाजारात दुधाचा तुटवडा झालेला असतो. किराण्याच्या व खाऊच्या दुकानांमध्ये मसाला दुधाच्या मसाल्याच्या लहान-मोठ्या डब्यांना ह्या दिवशी खास मान देऊन पुढे आणलेले असते. भाजी मार्केटमध्ये उकडीच्या शेंगा, रताळी असे सामान भरपूर आलेले असते.

आपल्या घरात जसा दिवाळीचा उत्साह असतो, तसाच उत्साह बाजारपेठेत असतो. काही ठिकाणी उटण्याचा सुगंध दरवळत असतो. जागोजागी विक्रीसाठी ठेवलेल्या रंगीबेरंगी कंदिलांमुळे बाजारपेठ सजून जाते, तर रात्री तारका अवतरल्यागत बाजारपेठ झगमगून जाते. ठिकठिकाणी फटाक्यांची दुकाने व त्याभोवती बालगोपाल आपल्या पाल्यांसह फटाके घेताना त्यांच्या चेहर्‍यावर फुलबाजे फुललेले दिसतात. पद्धतशीर लावलेल्या रांगोळ्यांच्या ढिगांनी बाजारपेठेला रंगांनी न्हाऊन टाकलेले असते. लक्ष्मीपूजनाच्या, पाडव्याच्या आगमनासाठी झेंडूच्या फुलांचे डोंगर रचलेले असतात. तोरणे, माळा बाजारपेठ अधिक सुशोभित करत असतात. लक्ष्मीपूजन म्हणजे खरा दुकानाचा सण. प्रत्येक दुकानाभोवती रांगोळ्या वेगवेगळ्या नक्षीकामात मिरवताना दिसतात. झेंडूच्या आणि आंब्याच्या पानांची तोरणे चैतन्यमय वातावरण निर्माण करतात. ह्या दिवशी दुकानात पूजेचा थाट असतो. हिशेबाच्या वह्यांसकट दुकानाची पूजा होते. रात्री फटाक्यांची आतशबाजीने बाजारपेठ दुमदुमून जाते.


Photo-Collage-20191022-202823223कार्तिक महिन्यातील बलीप्रतिपदेसाठी नवीन झाडू बाजारपेठेत आपले स्थान उंचावतात. भाऊबीजेसाठी भांड्यांची, कपड्यांची आणि भेटवस्तूची दुकाने सामानाने आणि माणसांनी तुडुंब भरलेली दिसतात. सगळ्या भावाबहिणींची माया त्या भेटवस्तू रूपात ओथंबून भरलेली दिसते.

कार्तिकी एकादशी हा कार्तिक महिन्यातील विठोबाच्या भक्तीने भरलेला सण म्हणजे आषाढ महिन्याच्या बाजारपेठेचेच प्रतिबिंब.

पौष महिन्यात येणारी मकरसंक्रांत पुन्हा बाजारपेठ भरगच्च करते. ओवसा देण्यासाठी अनेक प्रकारच्या वस्तू घेऊन विक्रेते जागोजागी बसतात, बऱ्याच ठिकाणी तीळगूळ, साखरफुटाणे, हळद, कुंकू असे सामान मिरवत असते. ह्या दिवसांतली मातीची छोटी सुगडी लहान मुलांसाठी खास आकर्षण असते. अ‍ॅष्टर, शेवंती, गुलाब अशा फुलांनी फूलमार्केट बहरलेले असते. खायची पाने, गाजर, ऊस, हरभरा, बोरे यांनी मार्केटमध्ये राज्य मिळवलेले असते आणि हे सगळे खरेदी करण्यासाठी आलेल्या महिलांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद, उत्साह ओसंडलेला दिसतो.

फाल्गुनातली होळी म्हणजे रंगांचा सण. होळीच्या दहा दिवसांपूर्वीपासूनच दुकानांत लहान मुलांसाठी पिचकाऱ्या लटकवलेल्या दिसतात. रंगांच्या राशींनी पूर्णं बाजारपेठेला रंगीबेरंगी स्वरूप आलेले दिसते.

जीवनावश्यक सगळ्या वस्तूंचा पुरवठा मार्केटमध्येच तर असतो. विचार करा, आठ दिवस मार्केट बंद राहिले तर आपली काय अवस्था होईल? किती घट्ट नाते असते आपले ह्या मार्केटशी.

रोजच्या दैनंदिन जीवनासाठी आपल्याला मार्केटचा भक्कम आधार असतो. मला कुठल्याही बाजारपेठेत गेले की नेहमी ताजेतवाने वाटते, कितीही मरगळ आली असेल तरी बाजारपेठेतील एक चक्कर ती मरगळ घालवून एक उत्साही वातावरण निर्माण करते. मग त्यासाठी पैसेच खर्च करावे लागतात असे काही नाही. एखाद्या प्रेक्षणीय स्थळाप्रमाणे ह्या बाजारपेठेला मारलेली चक्करही मन प्रसन्न करते.


श्रेयनिर्देश: कोलाज १: प्रकाशचित्रे आंतरजालावरून साभार.
कोलाज २: प्रकाशचित्रे जागुकडून.


20191016-122815

अनुक्रमणिका

प्रतिक्रिया

हरिहर's picture

25 Oct 2019 - 7:48 am | हरिहर

छान फोटो आणि सुरेख लेख. बाजाराचे शब्दचित्र मस्त रेखले आहे.
आवडले.

यशोधरा's picture

26 Oct 2019 - 4:26 pm | यशोधरा

छान लिहिलं आहेस जागु.
कोलाज पण आवडली. रसरशीत भाज्या, फळं!
सणाचं वातावरण फोटोंमधून अधोरेखित होतं आहे.

धन्यवाद हरीदा आणि यशोधरा.

सुधीर कांदळकर's picture

30 Oct 2019 - 6:21 pm | सुधीर कांदळकर

रसरशीत, टवटवीत, मन प्रफुल्लित करणारे लेखन. साध्या साध्या विषयावर देखील कसे छान लिहिले जाऊ शकते याचा उत्तम नमुना. अनेक अनेक धन्यवाद.

जालिम लोशन's picture

30 Oct 2019 - 6:44 pm | जालिम लोशन

छान

जुइ's picture

31 Oct 2019 - 7:57 am | जुइ

सण आणि त्याबरोबर फुलणारी बाजारपेठ यांचे फार छान वर्णन केले आहे लेखात.

परिंदा's picture

31 Oct 2019 - 8:32 am | परिंदा

मार्गशिर्ष महिन्यातल्या गुरुवारच्या व्रतासाठी पाच पानांचे डहाळे, पाच फळे यांनी बाजारपेठा भरलेल्या असतात. हल्ली तर लक्ष्मीसाठी मुखवटे, नथ, डोळे वगैरे देवीच्या शृंगाराचे साहित्य, उद्यापनात वाटायला पोथ्या यांची पण बरीच रेलचेल असते.

दादरचे फॅमिली स्टोर या दुकानात प्रत्येक सणानुसार वस्तु विकायला ठेवलेल्या असतात.

सुधिर, जालिम, जुई, परींदा धन्यवाद.

पद्मावति's picture

1 Nov 2019 - 1:24 pm | पद्मावति

सुंदर लेख.

बरखा's picture

1 Nov 2019 - 9:16 pm | बरखा

सणवार आणि त्या अनुषंगाने नटलेली बाजरपेठ स्वताचं अस एक वेगळेपण घेऊन येते. खुप छान वर्णन केले आहे त्याचे. अशा बाजरपेठेत काही खरेदी करायचे नसले तरी सहजच एक चक्कर मारून यायलासुद्धा खुप छान वाटते.

वरकरणी साध्या पण प्रत्येकाच्या आयुष्याशी निगडीत असणाऱ्या विषयावरचा लेख आवडला!
धन्यवाद.

श्वेता२४'s picture

6 Nov 2019 - 1:12 pm | श्वेता२४

बाजारात जाणं ऑनलाईन खरेदीमुळे भरंच कमी झालंय. पण लहानपणीचे दिवस आठवले. त्यावेळी आठवडी बाजार असायचा आणि त्या गर्दीतून फिरायला खूप भारी वाटायचं. आता मात्र गर्दी जायलाच नको वाटतं. मग तो बाजार असेल किंवा देवदर्शन.

मुक्त विहारि's picture

21 Nov 2019 - 7:53 pm | मुक्त विहारि

पण आठवडी बाजार जास्त आवडतो.

विशेषतः खेर्डी आणि सावर्डे येथील....

गामा पैलवान's picture

21 Nov 2019 - 8:13 pm | गामा पैलवान

जागुताई,

वर्णन छाने. स्मृती व जिह्वा चाळवल्या गेल्या.

आ.न.,
-गा.पै.