दिगंतराचे प्रवासी

Primary tabs

हरिहर's picture
हरिहर in दिवाळी अंक
25 Oct 2019 - 6:00 am


मिपा दिवाळी अंक  २०१९

अनुक्रमणिका
दिगंतराचे प्रवासी
असे म्हणतात की काही विशिष्ट झाडांखालून गेल्यावर, ठरावीक जागा ओलांडल्यावर भूतबाधा होते. आता यात खरे-खोटे काय आहे ते माहीत नाही, पण आमच्या सोसायटीची भिंत ओलांडून एक दिवस मी प्रचंड पसारा असलेल्या लिंबाच्या झाडाखालून गेलो आणि कदाचित त्याच दिवशी हे पक्षिनिरिक्षणाचे भूत माझ्या मानेवर बसले. बरे, इतर भुतांसारखे या भुताला ना कोणता उतारा आहे, ना कोणत्या मांत्रिकाचे मंत्र त्याच्यावर परिणाम करतात. ते एकदा तुमच्या मानेवर बसले की मग काही केल्या ते उतरत नाही. मग तुम्ही फक्त त्याच्याच सत्तेखाली असता. ते तुम्हाला हवे तसे फिरवते. जी ठिकाणे तुम्ही कधी पाहिलीही नाहीत, अशा ठिकाणी ते तुम्हाला तासनतास बसायला लावते. दहा मिनिटांपेक्षा जास्त भूक सहन न करणाऱ्याला दिवसदिवसभर भुकेची जाणीव होऊ देत नाही. आणि गम्मत म्हणजे हळूहळू या भुताच्या संगतीशिवाय मन रमतही नाही. असो.

आमच्या सोसायटीच्या आवारामध्ये एक देवराई राखलेली आहे. तेथील झाडे कुणी तोडत नाहीत किंवा तेथे कसल्याही प्रकारचे बांधकामही केले जात नाही. देवराईमधून पलीकडे जायला अगदी लहानशी पायवाट आहे. त्यामुळे तेथे बाइक, कार वगैरेंचा अजिबात प्रवेश होत नाही. देवराईच्या मधोमध एक जुनी व भरपूर पाणी असलेली विहीर आहे. एकूण पक्ष्यांना आवश्यक असलेले वातावरण सगळ्या देवराईत आहे. या सगळ्या वातावरणामुळे येथे अनेक लहान-मोठ्या पक्ष्यांची खूप वर्दळ असते. एक दिवस विरंगुळा म्हणून मी या देवराईतील मोठ्या व जुन्या लिंबाच्या झाडाखाली बसलो होतो. थोड्या वेळातच माझ्यापासुन काही फुटांवर दोन अतिशय लहान पक्षी उतरले. एकमेकांशी खेळायच्या नादात कदाचित त्यांचे माझ्याकडे लक्ष नसावे. सुरुवातीला गम्मत म्हणून आणि नंतर उत्सुकता म्हणून मी त्यांचे निरीक्षण करायला लागलो. हीच माझ्या पक्षिनिरिक्षणाची सुरुवात होती. गमतीत सुरू झालेले हे वेड पुढील महिनाभरात बरेच वाढले. या महिनाभरात मी जवळजवळ साठ पक्ष्यांची नोंद केली. फोटो काढले. टिपणे काढली. पण या छंदाचा खरा त्रास पुढेच होता. आता माझ्या लक्षात आले की मी रोज सकाळी एक तास व संध्याकाळी एक तास देवराईत घालवूनही आता तेच तेच पक्षी दिसायला लागले आहेत. चाळीस ते पन्नास पक्षी मी सोसायटीच्या गेटच्या आतमध्येच पाहिले होते. पण आता मला नवीन काहीतरी दिसायला हवे होते. त्यासाठी बाहेर पडणे गरजेचे होते. थंडीलाही नुकतीच सुरुवात होत होती. थंडीच्या मोसमातील पक्षी कुठे कुठे यायला सुरुवात झाली होती. या छंदामुळे महिनाभरात अनेक पक्षिप्रेमींबरोबर मैत्री झाली होती. त्यांचे कुठले कुठले फोटो आता टेलेग्राम-व्हॉट्स अ‍ॅपवर यायला लागले होते. शेवटी मित्रांचे सल्ले, आंतरजालावरील माहिती यांच्या आधारे मी एके दिवशी भल्या पहाटे गाडी सोसायटीबाहेर काढली. मी प्रथमच बाहेरचे पक्षी पाहाणार होतो. उत्सुकता होती. जेथे चाललो होतो, तेथे नक्की काय पाहायला मिळेल याची माहिती मी दोन दिवस अगोदर नेटवरून काढली होती. आता फक्त भाग्य, सूर्य आणि पक्षी कशी साथ देतात यावर सगळे काही अवलंबून होते. कारण या वर्षी परतीचा पाऊस लांबला होता व ढग कधीही भरून येत होते.

सर्वात प्रथम एक उत्तम दुर्बीण, स्थानिक पक्ष्यांचे फील्ड गाइड आणि सरावाचा असलेला कॅमेरा तुमच्याजवळ असायला हवे. फील्ड गाईडबरोबर तुम्ही मोबाइल अ‍ॅपदेखील वापरू शकता. (मी India Birds आणि eBird ही iOS अ‍ॅप्स वापरतो.)

महत्त्वाचे आहे ती बर्डिंगसाठी जाण्याची वेळ. शक्यतो सूर्योदयाच्या अगोदर बर्ड वॉचिंगसाठी उत्तम वेळ असते. त्यानंतर संध्याकाळी सूर्यास्ताच्या अगोदर. या दोन्ही वेळेस पक्षी जास्त अ‍ॅक्टिव्ह असतात. तसेच सूर्यप्रकाश योग्य कोनात असल्याने पक्षी दिसतातही व्यवस्थित आणि ही किरणे फोटो काढण्यासाठी उत्तम असतात. हा झाला दिवसाचा वेळ. पण वर्षातील कोणता काळ या पक्ष्यांचा विणीचा असतो, घरटी बांधण्याचा असतो, याची माहितीही पक्षिनिरीक्षणासाठी महत्त्वाची ठरते.

पक्षिनिरीक्षण करताना होणारी पहिली चूक म्हणजे अतिउत्साह. या उत्साहामुळे मी आणि माझी बायको आपापसात फार गोंधळ करायचो. हातवारे करून “अरे, हा बघ” “अरे, कित्ती गोड आहे तो” “तू वेळेवर का नाही पाहिले?” वगैरे आरडाओरडा सुरू असायचा. (त्यात नवरा-बायको म्हटल्यावर तर जास्तच गोंधळ. “मी सांगितलेले तू कधी ऐकलय का आजवर?” यासारखी वाक्ये तर विचारू नका.) नजर तर कुठेही स्थिर नसायची. दिसलेल्या एखाद्या पक्ष्यावरच लक्ष ठेवावे, हे लक्षात घेतलेच नव्हते आम्ही. समोरून काहीही उडाले की नजर त्याच्याच मागे. त्यामुळे सरुवातीला अनेक पक्षी दिसूनही आम्हाला एकही पक्षी व्यवस्थित पाहता आला नाही. पक्षी आवाजाला आणि हालचालीला फार लवकर घाबरतात. त्यामुळे शक्यतो जितके शांत राहता येईल तेवढे राहावे. हालचाली अगदी सावकाश आणि सहज असाव्यात. आणि तुमचे लक्ष शक्यतो एकाच प्रकारच्या पक्ष्याकडे असावे. (सशाची शिकार करायला बाहेर पडलो व समोरून रानडुक्कर जरी आडवे गेले, तरी तुमचे लक्ष सशाकडेच हवे. नाहीतर रानडुक्करही मिळत नाही आणि ससाही.) बरेचदा वेडा राघू, खंड्या यासारखे पक्षी त्याच ठरलेल्या जागेवर सातत्याने येवून बसतात. हालचाली - मग त्या कोणत्याही असो, खूप सावकाश व सहज असाव्यात. अगदी हातातली दुर्बीण डोळ्याला लावतानाही एखादा पक्षी घाबरून उडून जातो. मला सुरुवातीला वाटायचे की आपल्या नशिबाचा दोष आहे हा. इतका वेळ हा पक्षी येथे बसला होता आणि नेमकी क्लिक करायच्या वेळीच उडाला. दोष नशिबाचा नाही, तुमच्या हालचालींचा आहे. बोलताना हळू बोलावेच, पण कॅमेऱ्याचे जे काही आवाज असतील - बीप, शटर वगैरे, ते आठवणीने म्यूट करावेत.

बरेचदा काय होते की वातावरण छान असते. सूर्यप्रकाश योग्य असतो. सूर्य तुमच्या पाठीमागील दिशेला असतो. पक्षीही शांत असतात, पण नेमकी तुम्ही आणि पक्षी यामध्ये एखादी फांदी असते. किंवा पक्षी जरा आतील बाजूला असतो व त्याचा काहीच भाग तुम्हाला दिसतो. अशा वेळी हालचालही करता येत नाही. या परिस्थितीमध्ये वापरायची एक युक्ती माझ्या पक्षिनिरीक्षक मित्राने मला सांगितली. हाताची मूठ करून तिच्या पाठीमागील भागावर हलकेच ओठ ठेवावेत. (होळीला बोंब मारताना जशी मूठ धरतो तशी, पण बोंब नाही मारायची हां!) आणि हळूहळू मुठीचे मुके (चुंबन) घेत नाजूक आवाज काढावेत. (लहान मुलांचे मुके घेतो तसे नाही, तरी पक्षिनिरीक्षण बाजूला राहायचे.) या आवाजाची लय कशी असावी याचा तुम्हाला पक्ष्यांच्या सान्निध्यात राहून अंदाज येतो सरावाने. किंवा ओठ आणि टाळूचा वापर करून नुसते चुकचुकल्यासारखे करावे. अनेक पक्ष्यांचा स्वभाव चिकित्सक असल्याने ते उत्सुकतेने बाहेर येऊन पहाणी करतात व तुम्हाला त्याचे दर्शन होते. ही युक्ती मी जरा शंकेनेच वापरली, पण ती नक्की काम करते. पण आवाज साधारण किलबिलणाऱ्या पक्ष्याच्या लयीत असावा, शिकारी पक्ष्यासारखा नको. या युक्तीला Pishing Trick म्हणतात. कारण हा आवाज काढताना दातावर दात घट्ट दाबून शीळ घालताना करतो तसे ओठ करायचे व नाजूक आवाजात pish हा शब्द उच्चारत राहायचा. हे नक्की करून पाहा.

याला शास्त्रीय आधार आहे की नाही माहीत नाही, पण तु्म्ही काही पक्ष्यांचा विश्वास संपादन करू शकता. देवराईमध्ये असलेल्या झाडाखाली एक चिरकची (Indian Robin) जोडी राहते. मी जेव्हा जेव्हा तेथे माझी गाडी पार्क करून झाडाखाली बसतो, तेव्हा हा चिरक अगदी हक्काने माझ्या गाडीच्या छतावर येऊन रुबाबात बसतो. तेथेच राहणारा सातभाईचा कळप सुरुवातीला गाडीच्या आरशात दिसणाऱ्या त्यांच्या प्रतिबिंबावर एकत्र हल्ला करायचे. आता ते आपापसात भांडायला माझ्या गाडीच्या छताचा उपयोग करतात. गांधारी (Long tailed Shrike)देखील मला चांगले ओळखतो आता, कारण मी जेव्हा त्याच्या हद्दीत जाऊन बसतो, तेव्हा तो माझी फारशी दखल घेत नाही. तो त्याची शिकार करत असतो व मी इतर काही दिसले तर फोटो काढत असतो. आम्ही आपापली कामे करत राहतो. असो. विषयांतर झाले.

सुरुवात आपल्या आजूबाजूच्या पक्ष्यांपासून करावी. गाइडचा उपयोग करून किंवा नेटवरुन त्या पक्ष्यांची अगोदर माहिती घ्यावी. त्यांचे आवडते खाद्य, झाडे, फुले यांची माहिती झाली की मग कोणत्या पक्ष्याला कुठे शोधायचे किंवा कुठे कोण दिसेल याचा अंदाज यायला लागतो. आणि हा अंदाज शक्यतो चुकत नाही. त्या त्या पक्ष्यांचा स्वभाव कसा आहे हे अगोदर जाणून घ्यावे. त्याचाही फार उपयोग होतो. अर्थात एकदा तुम्ही पक्षिनिरीक्षण सुरू केले की काही काळातच तुम्हाला त्या पक्ष्याचा स्वभाव लक्षात यायला सुरुवात होते. माझ्या ओळखीच्या झालेल्या सातभाईंच्या (लार्ज ग्रे बॅबलर) थव्यातील कोण जास्त भांडकुदळ आहे, कोण शांत असतो हे आता मला समजायला लागले आहे. काही पक्ष्यांना मी वैयक्तिक ओळखू शकतो. म्हणजे कोणताही रॉबिन दिसला तर बायकोसाठी तो फक्त रॉबिन असतो, मात्र मी सांगू शकतो की हा आमच्या बांबूच्या बनातला रॉबिन आहे किंवा हा विहिरीकाठी राहणारा रॉबिन आहे. आणि अशी ओळख झाली की खूप छानही वाटते. काहींना मंत्री-आमदारांबरोबर किंवा मोठ्या लोकांबरोबर असलेल्या ओळखीचा जेवढा अभिमान किंवा कौतुक वाटते, त्यापेक्षा हजारपटींनी मला हा ‘अमुक रॉबिन’ आहे किंवा ही वेगळीच टिबुकली आहे, माझी नाही असे म्हणताना वाटते.

एकदा आजूबाजूचे पक्षी पाहायची सवय झाली, हवा तो संयम बाळगता यायला लागला की मग आजूबाजूला एखादे पार्क किंवा टेकडी आहे का ते शोधावे. शहरातली निगा राखलेली बागही चालेल किंवा जवळपास एखादे तळे असेल तर अगदी उत्तमच. पहाटे अशा ठिकाणी एखादी जागा शोधून पक्ष्यांची वाट पाहावी. एव्हाना साधारण अंदाज आला असतो की मस्त फुललेला शंकासुर असेल तर सूर्यपक्षी (Sunbird) हमखास दिसणार. जवळपास शेत असेल किंवा गवताळ प्रदेश असेल तर मुनियांचे प्रकार दिसणार. आजूबाजूला असलेल्या विजेच्या तारांवर कोतवाल (Black Drongo) दिसणारच. तळे किंवा नाला असेल तर खंड्याचे (Kingfisher) दर्शन होणारच. या पक्षिनिरीक्षणाची गम्मत अशी आहे की आजवर कधी तुम्हाला चिमणी-कावळा सोडून पक्षी दिसलेला नसतो, पण एकदा हे वेड लागले एकेक पक्षी अगदी खास तुमच्या भेटीला यावा तसे दर्शन द्यायला लागतो. खरे तर शहर असो वा शेत, पक्षी प्रत्येक ठिकाणी असतातच, फक्त आजवर आपले दुर्लक्ष झालेले असते. अगदी बाहेर न जाताही टेरेसमध्ये धान्य ठेवायची व पक्ष्यांना बसता येईल अशी एखादी रचना करून ठेवली, तर काही दिवसांतच पक्ष्यांची वर्दळ सुरू होते आणि घरबसल्या तुम्हाला पक्षिनिरीक्षणाचा आनंद घेता येतो. टेरेसमध्ये किंवा खिडकीत विचारपूर्वक फूलझाडे लावली, तर सूर्यपक्षी हमखास चक्कर टाकून जाणारच.

पक्षी रंगांना फसतात का, हे मला सांगता येणार नाही. पण बर्डिंगच्या वेळी आकाशी रंगाचे टीशर्ट आणि खाकी पँट हा माझा ड्रेस असतो. मला वाटते पक्षी रंगांना घाबरत नसले, तर ब्राइट कलरमुळे नक्की घाबरत असावेत. उदा. पांढरा शुभ्र किंवा भडक पिवळा वगैरे. अर्थात मला नक्की सांगता येणार नाही. तुम्ही तुमच्या अनुभवाप्रमाणे कपडे घाला. पण शक्यतो फुल पँट, पायात बूट आणि डोक्यावर समरकॅप असावीच. मोबाइल सायलेंट मोडवर असावा. मला उन्हाचा, तहानेचा आणि भुकेचा सर्वात जास्त त्रास झाला. त्यामुळे बर्डिंगला जाताना सोबत पाण्याची बाटली (जी संपल्यावर पुन्हा घरी आणायची आहे) आणि एखाद-दोन फळे नक्की असावीत. हे सामान शक्यतो पाठीवर अडकवता येईल अशा बॅगमध्ये असले, तर दोन्ही हात मोकळे राहतात. या पक्ष्यांच्या मागे भटकताना भान राहत नाही, त्यामुळे सर्वप्रथम स्वतःची काळजी आणि मग निसर्गाची काळजी घेणे खूप गरजेचे आहे.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही जेव्हा पक्षिनिरीक्षणाला जाता, तेव्हा दिवसभरात काय पाहिले याची बारीकसारीक नोंद करावी. यात प्रथम पक्ष्याचा आकार, रंग, त्याचे तुम्हाला जाणवलेले वैशिष्ट्य, माहीत असेल तर नर का मादी हे टिपून ठेवावे. कुठे दिसला, किती वाजता दिसला, काय करताना दिसला, एकटा होता, जोडी होती की थवा होता याची नोंद करावी. जर त्या पक्ष्याचा आवाज तुम्ही ऐकला असेल तर तो शब्दात लिहायचा प्रयत्न करावा. घरटे पाहिले असेल तर ते बांधण्यासाठी कोणत्या वस्तू वापरल्यात याची बारकाईने नोंद करावी. आजकाल डायरी अ‍ॅप भरपूर मिळत असल्याने शक्यतो एखादा फोटो डकवून त्याखाली वरील सर्व माहिती एका चार्टमध्ये भरावी. मी Day One व Dyrii ही macOS अ‍ॅप्स वापरतो. नंतर या नोंदी पाहून तुम्हाला बरेच अंदाज यायला सुरुवात होते.

जाता जाता काही गोष्टी - पक्षी पाहाताना खूप गोंधळ व्हायची शक्यता असते. म्हणजे एकाच जातीच्या पक्ष्यांच्या अनेक उपजाती असतात, ज्या अगदी सारख्या दिसतात. Long tailed Shrike व Bay backed Shrike समोरुन पाहिले, तर अगदी सारखे दिसतात. काही पक्ष्यांचे नर व मादी खूप वेगळे दिसतात. कोकीळ अगदी काळाकुट्ट असून कोकिळा मात्र अंगावर पांढरे ठिपके असलेली असते. तिचा रंग पाहून ससाणा आहे की काय असे वाटते. तसेच काही पक्षी विणीच्या हंगामात आपले रंग (Plumage) बदलतात, तर काहींच्या रंगात ठरावीकच बदल होतो. सूर्यपक्ष्याच्या छातीवर काळी रेषा उमटू शकते. असा सूर्यपक्षी पाहिला की असे वाटते की आपण वेगळाच कोणतातरी पक्षी पाहिला आहे. तसेच अनेक पक्षी आपली पिसे साफ (Preening) करताना अगदी मजेशीर दिसतात. अशा वेळी त्यांचा आकार आहे त्यापेक्षा दीडपट मोठा दिसू शकतो. अर्थात एकदा तुम्हाला सगळ्यांची ओळख झाली की या गोष्टी चटकन लक्षात यायला लागतात.

टीप : कधी एखादे पक्ष्याचे घरटे दिसले, पिल्ले दिसली तर निकडीची गरज असल्याशिवाय त्यांना हात लावू नका. फोटो मिळवण्याच्या नादात पक्ष्यांना विचलित करू नका. कारण एक-दोनदा असा प्रकार झाला तर पक्षी घरटे सोडून निघून जातात. जर भाग्याने एखाद्या पक्ष्याला शिकार करताना तुम्हाला पाहायला मिळाले, तर फक्त त्या घटनेचे साक्षीदार व्हा. ज्या पक्ष्याची किंवा लहान प्राण्याची शिकार होत आहे, त्याला वाचवायचा प्रयत्न चुकूनही करू नका. ते त्यांचे जग आहे. पक्षिनिरीक्षण करताना नेहमी निसर्गाची काळजी घ्या.

(या लेखातली पक्ष्यांची मराठी नावे आणि इतर गोष्टींसाठी मला माझ्या पक्षितज्ज्ञ मित्राची, तसेच पक्षिप्रेमी मित्रांची खूप मदत झाली आहे. अनेक गोष्टी मी स्वतःच्या निरीक्षणातून, तर काही गोष्टी आंतरजालावरून मिळवल्या आहेत. यातील प्रत्येक फोटो मात्र मी स्वतः काढलेले आहेत.)

सुगरण (Baya Weaver, Male)
.


.


सुगरण (Baya Weaver, Female)
.

ठिपकेवाली मनोली (Scaly breasted Munia)
.


पांढऱ्या कंठाची मनोली (Indian Silverbill)
.

>
काळ्या डोक्याची मनोली (Tricoloured Munia)
.


पिवळा धोबी (Yellow Wagtail)
.


थोरला धोबी (White browed Wagtail)
.


वेडा राघू (Green Bee eater)
.


चिरक, काळोखी (Indian Robin, Male)
.


चिरक (Female)
.


खाटीक, गांधारी (Long tailed Shrike)
.


गांधारी आणि तिचे पिल्लू (Long tailed Shrike, Adult & Juvenile)
.


या गांधारीला खाटीक हेही एक नाव आहे. मिळालेली शिकार ही खाटकासारखी काट्याला टोचून (टांगून) ठेवते, म्हणून हे नाव. खाटीक काट्याला आपले खाद्य टोचून ठेवताना.

.


तारवाली भिंगरी (Wire tailed Swallow)
.


माळ भिंगरी (Red rumped Swallow)
.


गप्पीदास (Pied Bushchat)
.


गोजा (Stonechat)
.


शिपाई बुलबुल (Red whiskered Bulbul)
.


लालबुड्या बुलबुल (Red vented Bulbul)
.


काळी शराटी (Red napped Ibis)
.


काळी शराटी (Male Female)
.


शिक्रा (Shikra)
.


होला (Laughing Dove)
.


साळुंकी (Common Myna)
.


Common Myna with kill.
.


भारतात आढळणारा आकाराने सर्वात लहान पक्षी - फुलटोच्या (Thick Billed Flowerpecker)
.


चंडोल (Ashy Crowned Swallow, Male)
.


भारद्वाज (Greater Coucal)
.


कवड्या धिवर (Pied Kingfisher)
.

सातभाई, बैरागी (Large grey babbler)
.


सुगरण (Baya weaver, Female)
.


किती फोटो देणार येथे! माझ्याकडे आजपर्यंत जवळजवळ सत्तर पक्ष्यांची नोंद व फोटो जमा झाले आहेत. पुन्हा कधीतरी काही फोटो देईन. तूर्तास एवढेच.


20191016-122815

अनुक्रमणिका

प्रतिक्रिया

हरिहर's picture

25 Oct 2019 - 2:25 pm | हरिहर

यातील Red jumped swallow चे मराठी नाव मी चुकून 'माळ भिंगरी' असे दिले आहे. या भिंगरीचे मराठी नाव लालबुडी भिंगरी किंवा मंदिर कन्हाई असे आहे.

मस्त फोटो आहेत! हा छंद जोपासा, खूप आनंददायक छंद आहे.

पद्मावति's picture

28 Oct 2019 - 11:14 pm | पद्मावति

देखणे फोटो आणि लेख.

मीअपर्णा's picture

29 Oct 2019 - 6:21 am | मीअपर्णा

माझ्या आवडत्या छंदाविषयी लिहिल्याबद्दल आभार. फोटो एक सो एक आले आहेत.

जेम्स वांड's picture

29 Oct 2019 - 10:06 am | जेम्स वांड

फोटोग्राफ्स अस्सल आहेत अन तुमच्या अट्टल पक्षीप्रेमाची पावतीच आहेत जणू!

एक प्रश्न, सातभाई पक्ष्यांनाच ग्रामीण भाषेत "भोरडे" म्हणतात का?? आमच्या रानात मावळतीच्या वेळी विजेच्या तारांवर ह्यांची अख्खी शाळा कलकलाट करत बसे अन पूर्ण रान उठवत असे. गडी म्हणाला ह्यांना भोरडे म्हणतात, पण जवळ दुर्बीण, उत्तम कॅमेरा नसल्यामुळे जवळ जाऊन पाहता आले नाही कधीच.

हरिहर's picture

29 Oct 2019 - 10:22 am | हरिहर

सातभाई आणि भोरडी वेगवेगळे पक्षी आहेत. भोरडीला पळस मैना असेही नाव आहे. इंग्रजीत भोरडीला Rosy Starling म्हणतात.

हरीदा खुप छान लेख. पक्ष्यांचा छंद म्हणजे खरच वेड लावतो. मला पक्षांचा आवाज आला की कोण आहे ते पहाल्याशिवाय चैन पडत नाही. आणि पक्षांनाही आपली सवय होते हे खर आहे. मी फोटो काढते तेव्हा पक्षी माझ्याकडे बघत बसतात.
बरीच माहिती मिळाली तुमच्या लेखातून धन्यवाद.

हरिहर's picture

23 Nov 2019 - 10:11 am | हरिहर

जागूताई तुच मला यात गुंतवले आहेस. :)
आता सुटका नाही या छंदातून.

गुल्लू दादा's picture

31 Oct 2019 - 11:56 pm | गुल्लू दादा

अप्रतिम फोटो आणि लेखन. धन्यवाद

सुधीर कांदळकर's picture

1 Nov 2019 - 11:43 am | सुधीर कांदळकर

झकास वर्णन आणि सुंदर प्रचि.

बायकोबरोबरचा गोंधळ मस्त जमला आहे आणि पिशिन्ग ट्रिक एकदम झकास.


सशाची शिकार करायला बाहेर पडलो व समोरून रानडुक्कर जरी आडवे गेले, तरी तुमचे लक्ष सशाकडेच हवे.

आवडले.

प्रचि सुंदर आणि लेख तितकाच सुंदर. एका मस्त लेखाबद्दल धन्यवाद.

रच्याकने आमचे घर जंगलाबाजूला असल्यामुळे आमच्या खिडकीत बर्‍याच उडणार्‍या पाहुण्यांचा राबता असतो. केकावली पहाट झाल्याची जाणीव करून देते. लालबुड्या बुलबुल, ब्लॅक हूडेड ओरिओल आणि बफ ब्रेस्टेड बॅब्लर खिडकीतून कूजन करून आम्हांला झोपेतून उठवण्याचे काम करतात.भारद्वाज, मलबार हॉर्नबिल ऊर्फ धनेश, दिसतात. कधी कोकिळ तर कधी खंड्या पण खिडकीत येऊन बसतो. श्राईक, छोटे छोटे आणखी चारपाच प्रकारचे चिमणीएवढे छोटे छोटे पाहुणे पण दिसतात. स्पॉटेड पिजन पण खिडकीच्या परावर्तक काचेला मादी समजून घुमतो पण. दयाळ आणि शेपूट हलवत राहणारा तेवढाच एक काळा पक्षी पण इकडे झाडांवरून तिकडे गात गात फिरतात. चिमणीएवढे काही पक्षी वासरू गायीला लुचते तसे जास्वंतीला लुचतात. सकाळी बुलबुल, दयाळ वगैरे दारातल्या मांडवातल्या जाळ्यांवर रात्रभर जमलेल्या कीटकांचा फन्ना उडवतात. आणखी एक सुंदर घारीसारख्या बांकदार चोचीचा पण थोडा छोटा, लांब शेपटीचा पक्षी कधी कर्कश ओरडतो तर कधी मंजुळ आवाजात शीळ वाजवतो आणि ध्यानात येते की मोबाईलमधले सगळे ध्वनी पक्ष्यांचे आवाज आहेत. एक हिरवा पक्षी पोपटासारखा आवाज काढत सर्व झाडांवर कसरती करतो.

हरिहर's picture

23 Nov 2019 - 10:09 am | हरिहर

तुमच्याकडे बरेच पक्षी दिसतात.

जॉनविक्क's picture

1 Dec 2019 - 1:59 pm | जॉनविक्क

आठवला

विशि's picture

2 Nov 2019 - 7:02 pm | विशि

हा छंद जीवाला लावी पिसे....
सुंदर आणि माहितीपूर्ण लेख
द्विजगणांचे फोटो तर नेहमीप्रमाणे जबऱ्या.....
लिहीत रहा

टर्मीनेटर's picture

4 Nov 2019 - 12:27 pm | टर्मीनेटर

लेखन आणि फोटो खूप आवडले.
Pishing Trick इंटरेस्टिंग वाटली, कधीतरी वापरून बघण्यात येईल...

अतिशय देखणी छायाचित्र आणि लेख. ही देवराई असलेली सोसायटी कुठली ते कळू शकेल का?

हरिहर's picture

23 Nov 2019 - 10:07 am | हरिहर

ही सोसायटी नगर रोडला आहे.

मुक्त विहारि's picture

22 Nov 2019 - 12:01 am | मुक्त विहारि

सुंदर फोटो. ..

आमच्या घरा जवळ विविध पक्षी येतात.

पण मला फोटो काढता येत नाहीत.

त्यामुळे नुसतेच निरीक्षण करतो.

अभिदेश's picture

22 Nov 2019 - 4:36 pm | अभिदेश

आपण कोणता कॅमेरा आणि लेन्स वापरलिये ते ही सान्गा..

हरिहर's picture

23 Nov 2019 - 10:06 am | हरिहर

फोटोंसाठी दोन कॅमेराज वापरलेत.
Nikon Coolpix P900
Canon 80D+Canon 70-300mm

अनिंद्य's picture

29 Nov 2019 - 12:01 pm | अनिंद्य

@ हरिहर,

ही अशी भूतबाधा अनेकांना व्हावी :-)

सुंदर लेखन. एकसोएक फोटो. बैराग्यांना आरश्याचा मोह बघून गंमत वाटली.

श्वेता२४'s picture

29 Nov 2019 - 4:10 pm | श्वेता२४

खूपच आवडली. या निमित्ताने नवीन पक्षी पाहायला मिळाले. नाहीतर या विषयात मी यथातथाच आहे. धन्यवाद.

हरिहर's picture

30 Nov 2019 - 11:31 am | हरिहर

धन्यवाद अनिंद्य, श्वेता!

स्वधर्म's picture

2 Dec 2019 - 2:43 pm | स्वधर्म

आणि सुंदर लेख. मुलाला नक्की दाखवतो, कारण त्यालाही पक्षांचे वेड आहे.

गोंधळी's picture

2 Dec 2019 - 3:58 pm | गोंधळी

सगळेच फोटो अप्रतिम आहेत.