हेचि खाणे देगा बावा

Primary tabs

अनिंद्य's picture
अनिंद्य in दिवाळी अंक
25 Oct 2019 - 6:00 am


मिपा दिवाळी अंक  २०१९

अनुक्रमणिका
हेचि खाणे देगा बावा
प्रत्येक आस्तिक मनाला मोहिनी पडावी असेच कृष्णाचे 'मनमोहन' रूप आहे. कृष्णभक्तीची मोहक रूपे भारतभर दिसून येतात, पण त्यात कमालीचे वैविध्य आहे. तमिळ वेत्रवेणुधारी थिरुमल वेंकटेश्वर, ओडिशातील जगन्नाथपुरीचा कालिया कृष्ण, केरळचा गुरुवायुरप्पन, कर्नाटकाचा उडुपी श्रीकृष्ण, ब्रिजवासीयांचा युगलरूपातला राधारमण, गुर्जर-ओखामंडलाचा राजस द्वारकाधीश आणि राजस्थानातील नाथद्वाराचा गोवर्धनधारी श्रीनाथ! भारतातल्या जवळपास सर्व प्रमुख भाषांमध्ये बालरूपी, युगलरूपी, सखारूपी, प्रेमरूपी, गुरुरूपी किंवा परमात्मारूपी कृष्णाचे वर्णन करणारे साहित्य आहे. त्यातही 'बालक'रूपातल्या नटखट लीलाधर कृष्णावर भक्तांचे प्रेम काकणभर अधिकच.

वैष्णव संप्रदायामध्ये कृष्णरूप हे 'सगुण-लालित-सेवित स्वरूप' मानले जाते, म्हणजे एखाद्या खऱ्याखुऱ्या मानवासारखे. मूर्तिरूपातल्या देवाला सर्व भावभावना असतात, तो बोलतो, ऐकतो, खातो-पितो, झोपतो अशी वैष्णवजनांची श्रद्धा आहे. त्यामुळे जगभरातल्या कोणत्याही कृष्णमंदिरात देवमूर्तीची उत्तम बडदास्त राखलेली दिसून येते. पैकी राजस्थानातल्या पूर्वाश्रमीच्या मेवाड-उदयपूर संस्थानातले 'नाथद्वारा' हे 'पुष्टिमार्गीय' वैष्णवांचे अत्यंत महत्त्वाचे पीठ आहे. करंगळीवर गोवर्धन पर्वत तोललेल्या कृष्णाचे गोजिरवाणे रूप म्हणजेच नाथद्वाराचा ‘श्रीनाथ’.

इथे कृष्ण सात वर्षीय बालकाच्या रूपात पूजला जातो. त्याला 'नंदघरी' - म्हणजे पितृगृहात ठेवल्याचे मानतात. पिता नंदबाबा, आई यशोदा आणि सर्व ग्वाल-गोपाळ कृष्णाला सांभाळतात, त्याचे लाड करतात. कृष्ण इथे 'लाडोबा' आहे, त्यामुळे त्याला 'श्रीनाथ बावा' असे मित्रत्वाचे संबोधन आहे. सात वर्षाच्या मुलाप्रमाणे त्याचा दिवस कल्पिलेला आहे. सकाळी घाईघाईने न उठवता सौम्य रागातील संगीताने आणि हळू आवाजात केलेल्या मंत्रपठणाने श्रीनाथला जाग येते. आई-बाबा ‘बेड टी’ऐवजी गंगा-यमुनेचे पाणी, गाईचे धारोष्ण दूध, ताजे लोणी आणि खडीसाखर प्रेमाने भरवतात. आंघोळ घालून नवीन कपडे देतात. न्याहारीत केशरयुक्त दही, बदामाचा शिरा, ‘मठरी’ आणि 'ठोर'सारखे कोरडे पदार्थ असा आहार दिल्यानंतरच त्याच्या हाती बासरी देण्यात येते, नाहीतर छोटा श्रीनाथ बासरी वाजवण्यात गुंग होऊन खाण्याकडे दुर्लक्ष करेल, असा मातृभाव असतो. खाऊन झाले की नंदगृहातल्या गाई घेऊन गोपालक कृष्ण अरवलीच्या टेकड्यांवर जातो. गाई तिथे चरतात आणि बासरी वाजवत हा 'बावा' रानात उंडारतो. दुपारी भूक लागली की घरी येतो. भव्य प्रमाणात केलेला 'राजभोग' ओरपून थोडा वेळ झोपतो. मग त्याचे मित्र येतात, त्यांच्याशी खेळतो. गोरज मुहूर्तावर आपले गोधन परत घेऊन घरी येतो. धुळीने माखलेल्या ह्या द्वाड मुलाला माता यशोदा पटकन ऊन-ऊन पाण्याने आंघोळ घालते, त्याची दृष्ट काढून तहानलाडू-भूकलाडू देते. दिवेलागणीला परत सखा-मित्र येतात, त्यांच्याशी खेळतो, भजन-कीर्तन ऐकत रात्रीच्या जेवणाची वाट बघतो. जेवण झाले की थोडा वेळ सोंगट्या आणि अंगाई गीत ऐकत सुखशय्येवर झोप.... लाडक्या सुकुमार नंदपुत्राचा दर दिवस असाच, रमतगमत.

भागवत पुराणात बालक कृष्णाने इंद्राच्या पर्जन्यकोपापासून वृंदावनवासीयांना अभय देण्यासाठी गोवर्धन पर्वत उचलून धरल्याची कथा येते. देवराज इंद्राचे गर्वहरण करणाऱ्या गोवर्धनधारी कृष्णासाठी गर्गसंहितेतल्या गिरिराज खंडात पहिल्यांदाच 'देवदमन श्रीनाथ' असे नाव येते. हा श्रीनाथ मूळचा मथुरेजवळील गोवर्धनचा. दुर्मीळ काळ्याशार संगमरवरात घडवलेली आजची सुडौल मूर्ती साधारण १६७२ सालची असावी. प्रसिद्ध वैष्णव संत श्री वल्लभाचार्यांनी भगवतभक्तीचा शुद्धाद्वैत - 'पुष्टिमार्ग' सांगितला. त्यांचे पुत्र आचार्य विठ्ठलनाथांनी तोच मार्ग पुढे नेऊन कृष्णाच्या सगुण उपासनेची आखीव-रेखीव परंपरा घालून दिली. मथुरेत गोवर्धनधारी कृष्णाचे रूप 'देवदमन श्रीनाथ' म्हणून प्रसिद्ध होते, त्यालाच वल्लभाचार्यांनी 'गोपाल' म्हणून आळवले आणि पुढे विठ्ठलनाथांमुळे त्याला 'श्रीनाथ' हे नाव मिळाले. मूर्तिभंजकांच्या भीतीने भक्तगणांनी मूर्ती आडमार्गाने मथुरेहून दूर नेण्याचे ठरवले असता तत्कालीन मेवाड राज्याच्या 'सिंहाड' नामक गावात मूर्ती असलेला रथ रुतून बसला. हा दैवी संकेत असल्याचे गृहीत धरून त्याच जागी श्रीनाथाला 'घर' बांधून देण्याची जबाबदारी मेवाडच्या महाराणा राजसिंहने सहर्ष स्वीकारली. तेव्हापासून हा 'श्रीनाथ बावा' तिथेच नांदतोय. कधीतरी तो परत मथुरेला जाणार आहे अशी भक्तांची श्रद्धा आहे.

आज नाथद्वारात दिसते ते मंदिर १७२८ साली बांधलेले आहे. मंदिराची रचना अन्य मंदिरांपेक्षा अगदीच वेगळी आहे. या मंदिराला 'शिखर' नाही, आतील रचनाही एखाद्या राहत्या महालासारखी आहे. कदाचित त्यामुळेच ह्या स्थानाला श्रीनाथजींचे ‘मंदिर’ न म्हणता ‘श्रीनाथजी हवेली' म्हणतात. मानवनिर्मित तलावांच्या रमणीय उदयपूर शहरापासून नाथद्वारा जेमतेम ५० किलोमीटरवर आहे. अरवलीच्या खुज्या पर्वतरांगा आणि फक्त पावसाळ्यातच पुरेसे पाणी असलेली 'बनास' नदी दोन्ही श्रीनाथाचे सोबती.

वल्लभाचार्यांचे पूर्वज तेलुगुभाषी तेलंगी, पण वाराणसीत स्थायिक झालेले, त्यांचा जन्म आणि बालपण आजच्या छत्तीसगड राज्यातल्या चंपारण गावातले, त्यांनी स्थापन केलेली श्रीनाथाची हवेली राजस्थानात, बहुसंख्य सेवेकरी ब्रजवासी आणि भक्त मुख्यतः गुजराती मंडळी, असे भारतभरच्या विविध प्रांतांना भक्तिपाशात बांधणारा हा श्रीनाथ. हनुवटीत जडवलेला मोगल बादशहा अकबरने अर्पण केलेला ठसठशीत हिरा, बादशहा जहाँगीरने २०००० गाई आणि ६४ गावे श्रीनाथला अर्पण केल्याचे लेखी आज्ञापत्र, मूर्तिभंजक म्हणून कुख्यात असलेल्या औरंगजेबाच्या बेगमेने श्रीनाथ बावाला केलेले आणि फेडलेले नवस आणि बावाच्या डोळे दिपवणाऱ्या संपत्तीचा मोह पडून हवेली लुटणारे इंदूरकर होळकर अशी थोडी वेगळी कीर्ती आहे ह्या बावाची.


नाथद्वाराचा ‘श्रीनाथ बावा’


श्रीनाथाचे निवासस्थान सर्व सोईंनी युक्त वैभवशाली 'नंदघर' कल्पिलेले असून माता-पित्याच्या घरी बालकाला लागणाऱ्या कोठल्याही वस्तूची कधीच कमतरता भासणार नाही अशी व्यवस्था करण्यासाठी वैष्णवजनांचा आटापिटा असतो. हवेलीत दूधदुभत्यासाठी 'दूध घर', विडा-सुपारीसाठी 'पान घर', साखर ठेवण्यासाठी 'मिश्री घर', वेगवेगळ्या मिठाया तयार करण्यासाठी 'पेढा घर', सुवासिक फुलांच्या राशी ठेवण्यासाठी 'फूल घर', नैवैद्य तयार करण्यासाठी 'रसोई घर', बावाचे माणिकमोत्यांचे हजारो दागिने सुरक्षित ठेवण्यासाठी 'गहना घर', रथाच्या राजेशाही घोड्यांसाठी 'अश्वशाळा', सुमारे बावीस हजार गाई असलेल्या ७ मोठ्या गोशाळा, नैवैद्यासाठी लागणारे केशर-कस्तुरी दळण्यासाठी खऱ्या सोन्याचे जाते असलेले 'चक्की घर', शुद्ध तूप साठवण्यासाठी तर विहिरी शोभाव्यात अशा आकाराचे काही रांजण आणि उत्सवप्रसंगासाठीची 'महाप्रभू बैठक' असलेले सभागृह असा मोठाच जामानिमा आहे. श्रीनाथबावाच्या अष्टौप्रहर सेवेसाठी रसोईये, प्रसादिये, भीतरीये, अधिकारी, सेवावली, झपटीए, ग्वाल, नंदबालक, झारीसेवक, पंडित, फूलघरीये, पानघरीये, दर्जी, खवास, रंगरेज, शृंगारी, आरसीये, ज्योतिषी, निगरा असे शेकडो लोक दररोज तत्पर असतात. दर दिवशी प्रचंड गुंतागुंतीचे अनेक धार्मिक विधी साजरे होतात. ही रोजची वैभवशाली सेवा कमी की काय, म्हणून सरासरी एका आठवड्यात तीन असे विशेष उत्सव इथे होतात. श्रीनाथजींच्या मनोरंजनासाठी नवनवीन 'मनोरथ' सोहळे होतात, शेकडो प्रकारचे नैवैद्य आणि सेवा अर्पण करण्यात येतात.


श्रीनाथ बावाचा नित्य (दैनिक) भोग


पण दररोज रस-वैभव पुरेपूर भोगणाऱ्या श्रीनाथ बावाला खरी प्रतीक्षा असते ती दिवाळीची. तो सण मोठाच. इतर लहान मुलांसारखा चोहीकडे दिव्यांची आरास आणि उत्तमोत्तम मिठाया-फराळाचा आनंद बावालाही मिळतो, पण त्याहीपेक्षा मोठा उत्सव होतो दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी - गोवर्धन पूजा आणि अन्नकूट महोत्सव. डाव्या हाताच्या करंगळीवर गोवर्धन तोलणे हे बावाचे प्रमुख अवतारकार्य नाही का? नाथद्वाराप्रमाणेच मथुरा, वृंदावन, ब्रज, बरसाना, द्वारिका यासारख्या, कृष्णावताराच्या कथांशी संबंध असलेल्या भागात दिवाळीचा पाडवा 'अन्नकूट' महोत्सवासाठी आणि गोवर्धन पूजेसाठी राखीव आहे. सर्व मंदिरांमध्ये मोठ्या प्रमाणात अन्नकूट सेवा मोठ्या आकर्षणाचा विषय असतो.

तर दिवाळीचे दिवे मंद होत असतानाच पाडव्याच्या पहाटे बावा जागा होतो. रात्रीच त्याने गोशाळेतल्या गाईंची 'कान जगायी' केली असते, म्हणजेच उद्या आपण रोजच्या जागी चरायला न जाता गोवर्धन पूजा आणि त्यांनतर होणाऱ्या अन्नकूट प्रसंगाला जाणार आहोत हे गुपित कानात सांगितले असते. त्यामुळे त्याही नटूनथटून तयार असतात.


श्रीनाथ बावाचे गोधन


आवळा-चंदन आणि केशरयुक्त तेलाने अभ्यंगस्नान केलेल्या बावाचा आज पहाटेचा विशेष नैवेद्य म्हणजे केशर दूध, ताजे लोणी आणि उडीद डाळीच्या पिठाची शुद्ध तुपात तळलेली बुंदी, एकदम प्रोटीन-पॅक्ड ब्रेकफस्ट! भल्या पहाटेच हा 'मंगलभोग' ओरपून स्वारी सवंगड्यांच्या साथीने गोवर्धन उचलायला तयार!

तोवर मुख्य चौकात गोशाळेतल्या गाईंचे वाजतगाजत आगमन होते. तिथे गोमेयातून साकारलेल्या गोवर्धनाच्या प्रतिकृतीची श्रीनाथ बावा आणि त्याचे सवंगडी पूजा करतात. शृंगारलेल्या गाईंना ओवाळून त्यांना 'थूली' (पातळ शिरा) आणि लापशी खायला देतात. प्रतिकात्मकरीत्या गोवर्धन करंगळी आणि काठ्यांवर तोलतात. तदनंतर इंद्रावर विजयाचे प्रतीक म्हणून श्रीनाथाचे गोधन शेणाचा गोवर्धन ओलांडून आपल्या गोशाळेत परत जाते. सगळ्या समारोहात अनेक किचकट आणि प्रतीकात्मक धार्मिक विधी असतात, पण सगळ्यांवर ताण असतो तो जमलेल्या गोपालकांचा ओसंडणारा उत्साह!


गोवर्धन - एक प्रतीकात्मक चित्र


आता मात्र बावाला करकचून भूक लागते आणि सगळेच कामाला लागतात. आता अन्नकूट उत्सवाची वेळ येऊन ठेपलेली असते. अन्नकूट म्हणजे अन्नाचा डोंगर. सात दिवस करंगळीवर गोवर्धन तोलल्यामुळे बालक कृष्णाला श्रम झाले आणि खूप भूक लागली. एका दिवसात आठदा जेवणारा तो, त्याला असा सलग निर्जळी उपवास घडला. पाऊस थांबला, तसे सर्व गोपालकांनी आपापल्या घरून उत्तम पदार्थ बनवून कृष्णासाठी नैवेद्य म्हणून आणले. ७ दिवस आणि प्रत्येक दिवसाचे ८ असे एकूण ५६ पदार्थ! त्यामुळे कृष्णाला ह्या विशेष मेजवानीत 'छपन्न भोग' चाखायला मिळाले आणि तीच प्रथा पुढे सुरू राहिली.

श्रीनाथ बावाचा 'अन्नकूट' साजरा करताना देवळासमोरच्या रतनचौकात सुमारे ४००० किलो भाताचा भलामोठा डोंगरच रचण्यात येतो. त्याच्या पायथ्याशी मातीच्या घागरींमध्ये आणि वेताच्या टोपल्यांमध्ये बाजऱ्याची खिचडी, कढी, खीर, माखन मिश्री, ३३ प्रकारच्या भाज्या मिळून केलेली 'गड्ड की सब्जी', घेवर, फेणी, मालपुवा, रबडी, मनोर लाडू, मगज लाडू, मख्खनबडा, खाजा, श्रीखंड, मलाई लाडू, मलाई पुरी, केशर बासुंदी, चंद्रकला, थूली, लापशी, मेव्याचे लाडू, तळलेली मटकी, दही, गोघृत, नवनीत उर्फ ताजे लोणी, मलई, मठरी, ठोर, मोहनथाल, कर्पूर सखडी, बदाम शिरा, मूगडाळीचा शिरा, जिलबी, बदामपाक, डिंकलाडू अशा अनेक प्रकारच्या मिठाया, नानाविध फळे, ताक आणि लस्सी, तुपात तळलेला सुका मेवा इत्यादी खाद्यपदार्थ रचले जातात. गोड पदार्थांवर भर असला, तरी चव बदलण्यासाठी म्हणून खजूर, आवळा आणि आंबट द्राक्षांची लोणची, पापड असतात. शेवटी अर्थातच गोविंदविडा उर्फ गिलोरी पान.

असे शेकडो प्रकारचे उत्तम खाद्यपदार्थ एका ठरावीक क्रमाने रचण्याचे काम काही तास चालते. केशर-केवडा-कस्तुरीचा, गुलाबपाण्याचा शिडकावा सर्वत्र करून, शंखध्वनीच्या, टाळमृदंगाच्या स्वरकल्लोळात श्रीनाथला 'अन्नकूट भोग आरोगण्यासाठी' हाळी दिली जाते. सर्वत्र प्रचंड उत्साह संचारतो, बावा मनसोक्त जेवतो आणि आणि मग काही वेळाने हा भोग भाविकांमध्ये वाटला जातो.


अन्नकूट भोगणाऱ्या श्रीनाथ बावाचे एका बालिकेने काढलेले कल्पनाचित्र


भाताचा डोंगर रात्री उशिरापर्यंत सरत नाही. शेजारच्या गावातील आदिवासी भिल्ल युवक मग तो डोंगर प्रतीकात्मकरीत्या 'लुटतात' आणि सगळ्यांनी मनसोक्त खादाडी करून हा महोत्सव संपतो. तोवर उजाडायला लागते आणि मंगल वाद्यांच्या मंजुळ स्वरांनी श्रीनाथाचा पुढचा वैभवशाली दिवस सुरू होणार असतो.

थोडी दंगामस्ती, मित्रांसह थेट देवराज इंद्राशी घेतलेला पंगा, सवंगड्यांना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी केलेले श्रम, जिद्दीने-कष्टाने इंद्रावर मिळवलेला विजय, त्याचे सर्वांनी केलेले कौतुक आणि मग खाण्यापिण्याची केलेली मनसोक्त चंगळ असे एका सात वर्षीय बालकाच्या भावविश्वाचे पुरेपूर प्रतिबिंब श्रीनाथ बावाच्या दिवाळी उत्सवात पडलेले दिसते.


20191016-122815

अनुक्रमणिका

संस्कृती

प्रतिक्रिया

कुमार१'s picture

26 Oct 2019 - 10:18 am | कुमार१

छान समयोचित लेख.
रसाळ वर्णन. फोटोही छान. आवडले.
दिवाळी शुभेच्छा !

तुमचा प्रतिसाद नेहेमीच आनंद देतो.
अनेक आभार.

पाषाणभेद's picture

26 Oct 2019 - 12:37 pm | पाषाणभेद

लेखाचे नाव वाचून पारशी बावाच्या काही रेसेपी असाव्यात असे वाटले अन मग लेख वाचतांना अस्सल भारतीय मिठायांची नावे वाचून तोंपासू.
जय श्री कृष्ण.

अनिंद्य's picture

30 Oct 2019 - 1:19 pm | अनिंद्य

हा बावा वेगळा :-)

पुरातन परंपरेप्रमाणे सर्व सात्विक खाद्यपदार्थ तीन प्रहरांच्या आतच खाऊन संपले पाहिजेत. तद्नुसार मंदिरातील सेवकांना रोख पगार न देता नैवैद्याचे पदार्थ वाटून देण्यात येतात. रोज-रोज तुपामेव्याचे इतके गरिष्ठ खाणे शक्य नसल्यामुळे सेवक ते पदार्थ देवळाबाहेरच्या मिठाईविक्रेत्यांना देतात/विकतात आणि तेच भाविकांना खायला उपलब्ध होतात.

पद्मावति's picture

26 Oct 2019 - 1:08 pm | पद्मावति

अतिशय रसाळ आणि सुंदर.

अनिंद्य's picture

30 Oct 2019 - 1:20 pm | अनिंद्य

आभार !

झक्कास लिहिलेत. बावाजी फारच देखणे आहेत.लहानगीने काढलेले चित्र, गोधन वगैरे इतर फोटोही आवडले.

अनिंद्य's picture

30 Oct 2019 - 1:21 pm | अनिंद्य

प्रतिसादाबद्दल आभारी आहे.

हरिहर's picture

28 Oct 2019 - 8:10 am | हरिहर

आहा हा! अगदी सुरेख वर्णन. एकदा हा सोहळा पहायलाच हवा.

अनिंद्य's picture

29 Oct 2019 - 12:03 pm | अनिंद्य

थँकयू.

यावर्षीचा सोहळा कालच झाला :-)

सुधीर कांदळकर's picture

29 Oct 2019 - 12:01 pm | सुधीर कांदळकर

विषयात गती नाही त्यामुळे पास

अनिंद्य's picture

30 Oct 2019 - 1:23 pm | अनिंद्य

नो प्रॉब्लेम.
अंक वाचू आनंदे. :-)

अप्रतिम वर्णन केले आहे, लेख खूप आवडला ! फोटोही छान आहेत.

२०१६ साली कुंभलगढ पाहून झाल्यावर हल्दीघाटीला जात असताना जवळच असल्याने सपत्नीक नाथद्वाराला गेलो होतो, जवळपास सव्वा तास रांगेत उभं राहिल्यावर जेव्हा आता लवकरच दर्शन मिळेल अशी शक्यता आम्हाला वाटायला लागली, नेमकी तेव्हा बावांना भोग चढवण्याची वेळ झाली. भोजन आणि त्यानंतर त्यांच्या वामकुक्षीची वेळ असल्याने बराच वेळ दर्शन थांबवण्यात येणार असल्याचे समजल्यावर मात्र भाविकांना असे रांगेत तिष्ठत ठेऊन स्वतः खादाडी करून झोपा काढणाऱ्या ह्या बावाचा आणि हवेलीच्या व्यवस्थापनाचा असा काही राग आला होता म्हणून सांगू! आधी कुंभलगढला बरीच पायपीट झाली होती, पुढे हल्दीघाटी करून उदयपूरला पोहोचायचे होते. आम्ही दोघेही सश्रध्द असलो तरी उच्चकोटीचे भक्त नसल्याने आता इथे ५ मिनिटेही थांबायचे नाही असा निर्णय घेतला. आपल्या पद्धतीप्रमाणे कळसाला नमस्कार करून निघू असा विचार केला, पण हाय रे देवा... इथे तीही सोय नाही. मग हवेलीलाच नमस्कार करून हलदीघाटी साठी मार्गस्थ झालो होतो!

मलाही गर्दी आवडत नाही, रांगेत तिष्ठत राहणे तर त्याहून नाही. पण उत्सवांच्या सांस्कृतिक अंगाचे आणि त्यातल्या खादाडीचे आकर्षण आहे.

प्रतिसादाबद्दल आभार.

तेजस आठवले's picture

7 Nov 2019 - 9:53 pm | तेजस आठवले

मला नाथद्वारा बिलकुल आवडले नव्हते. एकूणच सगळीकडे उर्मटपणा आणि माज भरून राहिला होता असे वाटलेले. ढोकळा गॅंग खूप मोठ्या प्रमाणात होती आणि त्यांची सतत चावचाव नेहमीसारखी चाललेली होती. बराच वेळ वाट पाहून आम्हाला आत जायला मिळाले, जवळ जवळ ढकलुनच दिले म्हणाना. आत पोहोचताच नाथजींची खायची वेळ झाली होती म्हणून आम्हाला २ मिनटात बाहेर ढकलले. देवाचं ठिकाण म्हणून काही बोलायचं नाही पण अतिशय दळभद्री अनुभव होता. फुकटचा मनःस्ताप.

नूतन's picture

30 Oct 2019 - 12:34 pm | नूतन

माहितीपूर्ण लेख.
अन्नकूटाचे वर्णन आणि चित्र आवडलं

अनिंद्य's picture

30 Oct 2019 - 1:37 pm | अनिंद्य

आभार.
लेखातल्या एखाद्या पदार्थाची सचित्र रेसिपी टाकायचा विचार होता पण जमले नाही.

माझेही हवेली दर्शन हुकलेच. सकाळी लवकर कशाला जा या विचाराने उदयपूरमधल्या साजनबागेत गेलो. (इथे संध्याकाळी गर्दी असते म्हणून सकाळी. ) स्थानिक लोक जॉगिंगसाठी आले होते. झाडावरून पडलेले आवळे आणि पेरु खायला मिळाले. मग नाथद्वाराला साडेअकराला गेलो. दरवाजा बंद झाला. दुकानदार शटर ओढून घरी जायच्या तयारीत. भाविक बाया दुकानदारांशी मालाचा भाव जास्ती लावल्याबद्दल वितंडवाद घालत होत्या. दहा रुपयांच्या नोटांचा जाडजूड गठ्ठा मोजत चपला संभाळणारा मालक " हवेली दर्शन बंध थयू गयू छे।" हे एक तुच्छ कटाक्ष टाकून बऱ्याच वेळाने बोलला तेव्हा "बावा हवे संजे मळशे "समजले. खानावळत थाळी आणि एक कुल्फी खाऊन उदेपुरला परतलो.

अनिंद्य's picture

30 Oct 2019 - 2:14 pm | अनिंद्य

सकाळच्या वेळी 'पुदिनाच्या पानांचा चहा' आणि गरम फाफडा खात निवांत असतात मंडळी :-)

नेहमीप्रमाणेच लेख छान. पण दिवाळीची पाककृती असेल या विचाराने उघडला नव्हता.
गोपाल लोक दुपारी गायी सोडून 'घरी' जेवायला जात नाहीत. झाडाखालीच झोपतात. घरून आणलेले पोहे खातात.

सुंदर लेख, आणि माहिती. शुभ दीपावली !!!

प्रचेतस's picture

5 Nov 2019 - 9:17 am | प्रचेतस

एकदम अनवट लेख.
खूप आवडला.

जामच आवडला बघा. भूक खवळून उठली ती वेगळीच. ह्या लेखावर आणि एकंदरीत कृष्णभक्तीवर विचार करता दिव्य भक्तिरस म्हणतात तो हाच असावा इतपत मतावर पोचलो आहे.

अनिंद्य's picture

6 Nov 2019 - 11:17 am | अनिंद्य

@ जेम्स,
भुकेल्यापोटी वाचू नये अशी टीप लिहायला हवी होती का ? :-)
प्रतिसादाबद्दल आभार.

श्वेता२४'s picture

5 Nov 2019 - 11:07 am | श्वेता२४

लेख मस्त जमलाय. वेगळी माहिती.

अनिंद्य's picture

6 Nov 2019 - 11:18 am | अनिंद्य

@ वीणा३
@ प्रचेतस
@ श्वेता२४

आभार _/\_

नूतन सावंत's picture

7 Nov 2019 - 1:49 pm | नूतन सावंत

सूप सुंदर,सविस्तर,माहितीपूर्ण आणि रसभरीत लेख.अतिशय आवडला.

urenamashi's picture

7 Nov 2019 - 7:45 pm | urenamashi

खरं तर शीर्षक पाहून वाचावे की नको असं विचार करत होते पण मीपा चा दिवाळी अंक आहे म्हणजे वाचायलाच हवा म्हणून वाचायला घेतला आणि काय सांगू.... अहाहा.....अप्रतिम लेख ....खूप छान वर्णन केलं आहे...मनाला,डोळ्याला, आत्म्याला तृप्त करणारा लेख आज वाचायला मिळाला. _/\_

आणि सबरस रसना खवळणारे मिष्टान्न वर्णन.
तरीही मिठाईचा गोडवा तेथील कर्मचारी वर्ग आणि तथाकथित स्वयंसेवक यांच्या वर्तणुकीत उतरला तर बावा पण खूष आणि आम्हीपण खूष.

नवसाच्या गणपतीला सुद्धा लांबूनच घरुनच नमस्कार करणारा डोळस सश्रद्ध नाखु

अनिंद्य's picture

8 Nov 2019 - 9:57 pm | अनिंद्य

@ नाखु,

...... मिठाईचा गोडवा तेथील कर्मचारी वर्ग आणि तथाकथित स्वयंसेवक यांच्या वर्तणुकीत उतरला तर ....

हे सर्व गर्दीच्या तीर्थस्थानात झाले तर देव पावला म्हणू :-)

अनिंद्य's picture

8 Nov 2019 - 9:56 pm | अनिंद्य

@ नूतन सावंत,
@ उरेनंमाशि,
@ तेजस आठवले,

@ नाखु,

प्रतिसादांबद्दल आभारी आहे.

मुक्त विहारि's picture

19 Nov 2019 - 5:45 pm | मुक्त विहारि

एका दगडाला इतके अन्न देण्या ऐवजी अनाथ मुलांना चार घास भरवले तर उत्तम.

त्यामुळे आजकाल मी कुठल्याही देवाला दक्षिणा देत नाही.

विचार करायला लावणारा प्रतिसाद आहे.
आभार !

समीरसूर's picture

3 Dec 2019 - 4:08 pm | समीरसूर

अतिशय सुरेख लेख! वाचतांना नाथाबावा समोर बसून हे सगळे आनंद उपभोगतोय असे वाटले. छान प्रवाही लेखन!

कुणीतरी वर म्हटलंय त्याप्रमाणे...एवढे कर्मकांड, इतके अन्न, इतके ऐश्वर्य, एका दगडाच्या मूर्तीचे इतके चोचले...थोडं सिम्प्लिफाय करून समाजाला काहीतरी उपयोग होईल असं काहीतरी नाही करता येणार का? अशा ठिकाणी तिथल्या पुजार्‍यांचा, स्थानिक लोकांचा, दुकानदारांचा, पार्किंग माफियांचा, फूल-प्रसादवाल्यांचा, हॉटेलचालकांचा एक प्रकारचा माज अनुभवास येतो. श्रद्धेने येणारा भक्त चिडतो, कावतो, निराश होतो. इथे थोडं चुकतंय आपलं असं वाटतं. असो. लेख मात्र अतिशय चविष्ट होता.

अनिंद्य's picture

3 Dec 2019 - 5:25 pm | अनिंद्य

@ समीरसूर,

सहमती. गुर्मी-माज ईश्वराच्या दारी तरी नसावा. पण असतो दुर्दैवाने :-(

प्रतिसादाबद्दल आभार _/\_