अनाम वीरा...

Primary tabs

पद्मावति's picture
पद्मावति in दिवाळी अंक
25 Oct 2019 - 6:00 am


मिपा दिवाळी अंक  २०१९

अनुक्रमणिका
अनाम वीरा...दक्षिण समुद्रकिनारी वसलेल्या असंख्य लहान लहान गावांपैकी एक गाव ब्रायटन! साधेसुधे आणि निवांत. मासेमारी हा तेथील लोकांचा प्रमुख व्यवसाय. साधारण अठराव्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत हळूहळू लंडनमधील श्रीमंत उमराव आणि सरदार इथे सुट्टी घालवायला येऊ लागले आणि या साध्याशा गावाचे रंगरूप पालटायला सुरुवात झाली. लंडनमधील धावपळीपासून दूर शांत हे गाव हळूहळू लोकप्रिय होऊ लागले. नवनवीन बांधकाम सुरू झाले. खानावळी, पब्स, घरे, बंगले अशा अनेक इमारती गावात उठू लागल्या. मेजवान्या, मैफली, खेळ, सहलींनी ब्रायटन गजबजू लागले. इंग्लंडचा तत्कालीन राजकुमार चौथा जॉर्ज यानेसुद्धा या गावात एक बंगला खरेदी केला. खर्चीक स्वभावाच्या, परंतु अत्यंत कलासक्त असलेल्या जॉर्जने त्या बंगल्याचा कायापालट करण्याचे ठरविले. जॉर्जना भारतीय आणि चिनी वास्तुशास्त्राचे अतिशय आकर्षण होते. जेव्हा बंगल्याचे पुनर्निर्माण करावे, तेव्हा त्याचे स्थापत्य भारतीय आणि चिनी बनावटीचे असावे असे जॉर्जच्या मनाने घेतले. पुढील काही वर्षांत राजकुमार जॉर्ज इंग्लंडच्या राजगादीवर विराजमान झाले आणि त्यांनी या साधारणशा घराचे एका आलिशान राजवाड्यात रूपांतर केले. आलिशान दालने, भव्य घुमट, दुर्मीळ चित्रे, लखलखती झुंबरे आणि उंची तलम गालिचे यांनी राजवाडा सजला. या राजवाड्याचे नाव पडले 'मरीन पॅव्हिलिअन'!

किंग जॉर्जच्या मृत्यूनंतर त्याचे लाडके मरीन पॅव्हिलियन साहजिकच त्यांचे उत्तराधिकारी चौथा विलियम आणि नंतर मग राणी व्हिक्टोरिया यांच्या ताब्यात आले. राणी व्हिक्टोरियाला मात्र हा राजवाडा अजिबात रुचला नाही. तिने येथील अनेक उंची फर्निचर, गालिचे, पेंटिंग्स आपल्या बकिंगहॅम राजवाड्यात हलविली. काही वर्षांनी ब्रायटनच्या महापौरांनी पुढाकार घेऊन हे मरीन पॅव्हिलिअन किंवा रॉयल पॅव्हिलिअन राणीकडून चक्क विकत घेतले आणि ब्रायटन गावाच्या आखत्यारीमधे आणले. एक शाही राजवाडा अशा रितीने लोकार्पण झाला. या ठिकाणी अनेक लोकोपयोगी उपक्रम राबविण्यात येऊ लागले. इथे संग्रहालय, वाचनालयसुद्धा उघडण्यात आले. सभा, समारंभ, स्पर्धा, व्याख्याने रॉयल पॅव्हिलिअनमध्ये रंगू लागली.

.

.

.

दिवसांमागून दिवस आणि वर्षांमागून वर्षे गेली. एव्हाना एकोणिसावे शतक संपून विसावे शतक सुरू झाले होते. इंग्लंडमध्ये आणि एकूणच युरोपात, खासकरून पश्चिम युरोपात आर्थिक, राजकीय आणि लष्करी सर्वच आघाड्यांवर भरभराट होत होती. इंग्रजी साम्राज्याला तर जणू अमरत्वाचे वरदान लाभले होते. जगात वरवर पाहता सगळे सुरळीत चालू होते, पण कुठेतरी अस्वस्थता जाणवत होती. अंतर्गत कलह, दुही आणि वर्चस्वाचा दंभ फणा वर काढू लागला होता. इंग्लंड, फ्रान्स, रशिया, जर्मनी आणि त्यांची दोस्त राष्ट्रे असे युरोपात निरनिराळे कळप निर्माण झाले. अशातच २८ जून १९१४ रोजी ऑस्ट्रियन-हंगेरियन साम्राज्याचा उत्तराधिकारी आर्चड्यूक फर्डिनंड आणि त्याची गरोदर पत्नी सोफी यांची दिवसाढवळ्या हत्या केली गेली. दारूगोळ्याच्या कोठारावर जणू ठिणगी पडली होती. ही ठिणगी भयानक आग बनून पुढील चार वर्षांत लक्षावधी लोकांचा बळी घेणार होती.

आर्चड्यूकचा वध झाल्यावर युरोपातले राजकारण अंतर्बाह्य ढवळून निघाले. राजकीय घडामोडी प्रचंड वेगाने घडू लागल्या. ऑस्ट्रियाने सर्बियाविरुद्ध दंड ठोकले. जर्मनीने ऑस्ट्रियाची कड घेतली, तर रशिया सर्बियाच्या बाजूने रणांगणात उतरला. एव्हाना फ्रान्सने रशियाला आपला पाठिंबा जाहीर केला आणि लष्करी हालचाली मोठ्या वेगाने सुरू केल्या. जर्मन फौजा बेल्जियममार्गे फ्रान्सपर्यंत येऊन धडकल्या आणि मग फ्रान्सचे दोस्त राष्ट्र इंग्लंडसुद्धा या युद्धात सामील झाले. या सर्व घडामोडी आर्चड्यूकच्या हत्येनंतर केवळ महिना-दीड महिन्यात घडल्या आणि महारक्तरंजित अशा प्रथम जागतिक महायुद्धाचे बिगुल वाजले.

इंग्रज युद्धात उतरले खरे, पण त्यांच्याकडे अजूनपर्यंत पुरेसे सैन्य नव्हते. सैन्याची जुळवाजुळव आणि प्रशिक्षण देण्यास फारसा वेळही नव्हता. अशातच जर्मन गरुड संपूर्ण ताकदीनिशी बेल्जियम आणि फ्रान्समध्ये दोस्त राष्ट्रांना धडका देउ लागला. या पश्चिम आघाडीवर तातडीने सैन्याची कुमक हवी होती. ब्रिटिश साम्राज्याचा कोहिनूर समजल्या जाणाऱ्या हिंदुस्थानवर इंग्रजांची सारी भिस्त होती. थोडक्या अवधीत इतक्या मोठ्या प्रमाणात सैनिक बळ मिळविण्यासाठी इंग्रजानी एक धूर्त खेळी खेळली. त्यांनी भारतीयांना ''युद्धात आम्हाला पाठिंबा द्या आणि युद्ध संपल्यावर आम्ही तुम्हाला स्वायत्तता देऊ'' असे सोनेरी स्वप्न दाखविले. स्वायत्तता मिळेल या आशेवर भारतातून इंग्रजांना प्रचंड प्रमाणावर आर्थिक आणि मनुष्यबळ पुरविण्यात आले.

सप्टेंबर ३०, १९१४ला भारतीय सैनिकांची पहिली कुमक फ्रान्सच्या किनाऱ्यावर येऊन पोहोचली. त्यानंतर अनेक तुकड्या फ्रान्सच्या आणि बेल्जियमच्या अघाड्यांवर जर्मनांशी दोन हात करू लागल्या. अनोळखी प्रदेश, मरणाची थंडी, अंगावर धड गरम कपडे नाहीत, हातात अद्ययावत शस्त्रे नाहीत अशा परिस्थितीत आपले सैनिक प्राणपणाने लढत होते आणि मृत्युमुखी पडत होते. जायबंदी तर किती झाले त्याची गणतीच नको करायला.

जखमी सैनिकांचे प्रमाण प्रचंड होते. त्यांच्यावर उपचार करून त्यांना पुन्हा युद्धासाठी उभे करणे फार गरजेचे होते. फ्रान्समध्ये वैद्यकीय सोयी फारशा उपलब्ध नव्हत्या. लढाई हातघाईवर आली असताना जखमी सैनिकांसाठी चांगल्या वैद्यकीय सोयी पुरविणे फ्रेंचांना शक्यही नव्हते. सरतेशेवटी उपचारासाठी सैनिकांना युद्धभूमीपासून जरा लांब, एखाद्या शांत ठिकाणी न्यावे असे ठरले. इंग्लंडच्या दक्षिण तटावर असलेले ब्रायटन हे गाव दळणवळणासाठी सोपे आणि तरीही लढाईच्या धामधुमीपासून सुरक्षित अंतरावर होते. पश्चिम आघाडीवर जायबंदी झालेल्या भारतीय तुकड्यांना उपचारासाठी ब्रायटनमध्ये पाठवायचे, हे निश्चित झाले.

पण ब्रायटनसारख्या लहानशा गावात सैनिकांच्या उपचारासाठी सोय करणे अजिबात सोपे नव्हते. त्यासाठी प्रचंड मोठ्या जागेची आवश्यकता होती. अशा वेळेस रॉयल पॅव्हिलिअन पुढे सरसावले. अवजड फर्निचर, शोभेच्या गोष्टी, ऐशआरामाच्या सर्व गोष्टी राजवाड्याबाहेर निघाल्या आणि रुग्णांच्या खाटांसाठी जागा मोकळी केली गेली. शाही किचन हिंदुस्तानी सैनिकांसाठी जेवण बनविण्याच्या दृष्टीने सज्ज झाले. इतक्या लोकांच्या भाजीपाल्याची आणि दुधाची सोय आसपासच्या परिसरात करण्यात आली. डॉक्टर्स, परिचारक, साहाय्यक डॉक्टर्सना पाचारण करण्यात आले. रॉयल पॅव्हिलिअनच्या भव्य दालनांत सुमारे सहाशे रुग्णशय्या लावण्यात आल्या. वाड्याच्या आतच शस्त्रक्रिया करण्यासाठी लहानसे पण मूलभूत सोयी असलेले ऑपरेशन थिएटरही उभारण्यात आले. रॉयल पॅव्हिलिअन फ्रान्सच्या रणभूमीवर जखमी झालेल्या भारतीय सैनिकांच्या सेवेसाठी सज्ज झाले. जवळपास दोन वर्षे हा राजवाडा भारतीय सैनिकांचे उपचारकेंद्र म्हणून कार्यरत होता. या काळात येथे सुमारे दोन हजार भारतीय सैनिकांवर उपचार झाले. इथून बरे झाल्यावर सैनिकांना भारतात किंवा मग पुढील लढाईसाठी इजिप्तमध्ये पाठविण्यात आले.

रॉयल पॅव्हिलिअन या दोन वर्षांच्या काळात संपूर्ण भारतीय रंगात रंगून गेले. येथे येणारे सैनिक मुख्यतः शीख, जाट, गुरखा आणि पठाण रेजिमेंटचे होते. प्रत्येक सैनिकाच्या प्रादेशिक आणि धार्मिक रितीरिवाजाप्रमाणे जेवण बनविले जात असे. मुसलमान सैनिकांसाठीचे हलाल मांस असो किंवा ब्राह्मण सैनिकांचे शाकाहारी जेवण.. सगळी व्यवस्था त्यांच्या त्यांच्या जातिधर्माला अनुसरून होती. शीख लोकांसाठी लहानसे गुरुद्वारा बनविले गेले, तसेच पठाणांसाठी नमाज पढण्याची खास जागा नेमून दिली गेली. राजवाड्याच्या आवारातच दूधदुभत्याच्या रतिबासाठी खास गोठा बनविण्यात आला होता, तसेच हलाल आणि झटका मांसासाठी खास खाटीकखाना. भारतीय आचारीवर्गांने सुसज्ज असे स्वयंपाकघर, सैनिकांच्या मनोरंजनासाठी क्रिकेट, फुटबॉल खेळण्याची सोय, खानपानाची उत्तम व्यवस्था आणि त्या काळातील उत्तम वैद्यकीय सोयींनी हे रुग्णालय सुसज्ज होते.

.

वरील फोटोचा स्रोत - https://en.wikipedia.org/wiki/Royal_Pavilion.

वरील फोटोचा स्रोत


आता हे सगळे वाचून आपल्या मनात साहजिकच असा विचार येतो की मग इंग्रज सरकारचा तो 'डॉग्स अँड इंडियन्स नॉट अलाऊड'वाला उद्दामपणा जादूची कांडी फिरवावी तसा गायब झाला का काय? भारतावर बेदरकारपणे अधिराज्य गाजवणारे ब्रिटिश लोक इथे इंग्लंडमध्ये मात्र भारतीय सैनिकांशी इतक्या आत्मीयतेने कसे वागत होते? हा चमत्कार कसा झाला असावा? तर याचे उत्तर साधे सरळ होते. त्या वेळेस त्यांना भारतीय सैन्यबळाची नितांत गरज होती. ब्रिटिशांसाठी भारत हा इतक्या प्रचंड मोठ्या प्रमाणावर पैसा, साधने आणि मनुष्यबळ पुरवणारा एकमेव स्रोत होता. हिंदुस्थान त्यांच्यासाठी मुबलक दूध देणारी दुभती गाय होती. आपल्या दुभत्या गायीला धष्टपुष्ट आणि संतुष्ट राखायला हवे, हे धूर्त इंग्रजी राजसत्ता पुरेपूर जाणून होती.

महायुद्धाच्या सुरुवातीपासूनच जर्मनांनी भारतीय स्वातंत्र्यचळवळीला प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे पाठिंबा द्यायला सुरुवात केलीच होती. सहाजिकच भारतीयांच्या मनात कुठेतरी जर्मनांसाठी आपुलकीची निर्माण होत होती. त्यात ते आता तुर्कीच्या ओटोमान सैन्याशी हातमिळवणी करून बसले होते. जर्मन्स स्वतःची प्रतिमा ओटोमान साम्राज्याचा म्हणजेच पर्यायाने इस्लामचा तारणहार अशी करण्याच्या प्रयत्नात होते. त्यामुळे भारतीय सैनिकांमधले पठाण, मुसलमान सैनिकांच्या मनात जर्मनीविषयी ममत्व निर्माण होऊ शकत होते. या सर्व गोष्टींच्या पार्श्वभूमीवर ब्रिटिशांना आता आपली छबी घासूनपुसून लख्ख करण्यावाचून इलाज नव्हता.

युद्धात जोपर्यंत आपली बाजू कमजोर आहे, तोपर्यंत तरी भारतीय सैन्याला मानाने वागविणे, त्यांची देखभाल करणे या ना त्या प्रकारे भारतीयांची मने सांभाळणे हे धोरण ब्रिटिशांनी ठेवले होते. रॉयल पॅव्हिलिअनचे मिलिटरी हॉस्पिटल या धोरणाचे उत्तम उदाहरण होते. इथून बरे होऊन परतलेले भारतीय लोक तिथे आपल्या उदारतेचे कौतुक करतील आणि आपल्याविषयी जनमत थोडे तरी मवाळ होईल असा इंग्रजांचा हेतू होता. हेतू काहीही असू दे, पण या शाही राजवाड्यात भारतीय सैन्याची उत्तम बडदास्त ठेवली गेली होती, हे मात्र खरे.

इंग्रज सरकारने आणखी एक अतिशय कौतुकाची गोष्ट केली, ती अशी की ब्रायटनमधे मृत्यमुखी पडलेल्या सैनिकांचा अत्यंत सन्मानाने आणि धार्मिक रितीरिवाजाने अंतिम संस्कार करण्यात यायचा. हिंदू आणि शीख जवानांचा अग्निदहन संस्कार आणि मुसलमान सैनिकांचे रीतसर दफन असे दोन्ही काटेकोरपणे केले गेले. सुदैवाने इथे आलेल्या सैनिकांच्या मृत्यूचे प्रमाण अत्यल्प ठरले. दोन वर्षांमध्ये ब्रायटनमधे उपचारास ठेवलेल्या दोनेक हजार सैनिकांमधे केवळ ५७ लोक मृत्यमुखी पडले. ज्या ठिकाणी त्यांचा अंतिम दाहसंस्कार करण्यात आला, ते ठिकाण ब्रायटनच्या एका टेकडीवर आजही उभे आहे. 'ब्रायटन छत्री' या नावाने हे ठिकाण ओळखले जाते. खेदाची गोष्ट अशी की हे स्मारक ज्या जागेवर आहे, तिथवर पोहोचणे फारसे सोपे नाही. इंग्लंडमधल्या बाकी ऐतिहासिक स्मारकांप्रमाणे या छत्रीची व्यवस्था फारशी नीट राखली गेली नाही, याचे वाईट वाटते. म्हणजे स्मारक सुस्थितीतच आहे आणि ते ठिकाणसुद्धा अतिशय रमणीय आहे. पण तिथे जायला पक्का रस्ता नाही, पार्किंगची व्यवस्था नाही, अशी गोची आहे.

ब्रायटन हे गाव आज इंग्लंडमधील एक अतिशय लोकप्रिय बीच रिसॉर्ट आहे. लंडनहून ब्रायटनला जायला अतिशय सोयीच्या ट्रेन्स आहेत. फारसा वेळ नसेल, तरीही लंडनहून ब्रायटन हे एका दिवसात जाऊन येण्यासारखे आहे. रॉयल पॅव्हिलिअन हा राजवाडा ब्रायटनच्या समुद्रकिनार्‍यापासून अगदी जवळ आजही मोठ्या दिमाखात उभा आहे. एकूण ब्रिटिश किंवा युरोपिअन स्थापत्यशास्त्राच्या अगदी विसंगत मुघल जडघडणीची ही अत्यंत देखणी इमारत अपल्या भव्य विस्ताराने आणि डौलदार घुमट, मनोर्‍यांनी लक्ष वेधून घेते. फारच सुरेख राजवाडा आहे अगदी आवर्जून बघण्यासारखा. बाहेरून भारतीय बांधणीची आणि आतून संपूर्णपणे चिनी सजावट असलेली ही वास्तू काही औरच आहे.

.

.

अप्रतिम कोरीवकाम, दिमाखदार झुंबरे, उत्तुंग छत, आलिशान गालिचे, उंची डिनर सेट्स.... सगळा राजेशाही मामला. आत फोटो काढण्यास मात्र सक्त मनाई आहे, त्यामुळे नाही म्हटले तरी हिरमोड होतोच. आज या राजवाड्यात भारतीय सैन्य रुग्णालयाचा अर्थातच मागमूस नसला, तरीही या रुग्णालयाची माहिती देणारी ऑडिओ टूर मात्र उपलब्ध आहे. त्यावर छान माहिती मिळते.

कोणी पंजाब, कोणी हरयाणा तर कोणी अफगाणिस्तान. कोणी कुठून तर कोण कुठून... भारताच्या कानाकोपर्‍यातून आमचे बहादुर, निधड्या छातीचे जवान सातासमुद्रापार गेले. युद्धानंतर आपल्याला स्वायत्तता मिळेल, सन्मानाने जगता येईल हे स्वप्न बघत ते वीरपुत्र त्या परक्या प्रदेशात एका शत्रूची कड घेऊन दुसऱ्या शत्रूशी लढत होते. आपले लाखो सोन्यासारखे शूर सैनिक हाती शीर घेऊन लढले, तर कित्येक हजार या युद्धाच्या होमात स्वाहा झाले. त्यामधलेच काही वीर, माझे देशबांधव इथे या वास्तूत, या जमिनीवर, याच छताखाली काही काळ वास्तव्य करून गेले, या गावात, या इमारतीत आपल्या पाऊलखुणा सोडून गेले, तिथेच मी आत्ता या क्षणी उभी आहे या जाणिवेनेसुद्धा अंगावर शहारा आला, गहिवरल्यासारखे झाले.

.

वरील फोटोचा स्रोत


ब्रायटन छत्री स्मारकाच्या पायथ्याशी जाऊनसुद्धा काही कारणास्तव आम्हाला वर मात्र जाणे शक्य झाले नाही, याचे आम्हाला फार वाईट वाटले. सुदूर पसरलेल्या हिरव्यागार टेकडीवर, निळ्या करड्या आकाशाला पाठीशी घेऊन उभे असलेले ते सुबक कोरीव स्मारक आम्ही दूरवरूनच पाहत होतो. घरापासून, आपल्या देशापासून दूर कोण्या एका ब्रायटन गावात त्या टेकडीवर चिरनिद्रा घेणाऱ्या आपल्या वीरांना आम्ही मनातल्या मनात मानवंदना दिली आणि भरल्या मनाने परतीच्या वाटेला लागलो...


20191016-122815

अनुक्रमणिका

प्रतिक्रिया

यशोधरा's picture

26 Oct 2019 - 4:45 pm | यशोधरा

वेगळ्या ठिकाणाची ओळख. आधी माहिती असते तर नक्की भेट दिली असती..

कुमार१'s picture

26 Oct 2019 - 8:33 pm | कुमार१

छान ओघवते वर्णन. आवडले.
दिवाळी शुभेच्छा !

जेम्स वांड's picture

26 Oct 2019 - 9:58 pm | जेम्स वांड

इतिहास, त्याचा कार्यकारण भाव अन त्यातलेही भावनिक कंगोरे एकाच लेखात उलगडून दाखवणे फार कमी लोकांस जमते, तुम्ही ते लीलया केलेत, इतका समृद्ध अनुभव आम्हाला दिलेबद्दल आपले आभार मानावे तितके कमी.

रच्याकने, पहिल्या महायुध्दात भारतीयांनी प्रचंड कर्तृत्व गाजवले होते अन युरोप, मेसोपोटेमिया, उत्तर आफ्रिका वगैरे परिसरात खूप नाव कमावले होते असे ऐकून (वाचून) आहे मी. हैफा (इस्राएल) शहर जिंकून घेण्यात लान्सर्स म्हणून नाव असलेले आपले सैनिक असामान्य कर्तृत्व गाजवून गेले होते म्हणतात, दिल्लीत तीनमूर्ती चौक हा त्यांना स्मृतीत ठेवायला बांधला गेला होता म्हणतात (म्हणजे असे हिस्टरी का डिस्कव्हरी चॅनल वर एका डॉक्युमेंटरी मध्ये दाखवले होते)

सुधीर कांदळकर's picture

30 Oct 2019 - 11:40 am | सुधीर कांदळकर

वर्णन ओघवते, प्रचि सुंदर. एक आगळेवेगळे पर्यटनस्थळ. नीटनेटका मस्त लेख आवडला. त्या ५७ सैनिकांना मानवंदना, इतर सैनिकांना नम्र सलाम आणि तुम्हांला धन्यवाद.

जुइ's picture

30 Oct 2019 - 6:43 pm | जुइ

या सैन्य रूग्णालयाबद्दल प्रथमच ऐकले. तू केलेल्या वर्णनावरून आणि सोबत जोडलेल्या फोटोंवरून त्या काळाच्या परिस्थितीची कल्पना येते आहे. सगळे विलक्षण तरी मनाला बोच लावून जाते. या अनाम वीरांना मानाची वंदना! त्याबरोबरच तू इंग्लंड मधील अशी वेगवेगळी रत्ने आम्हाला तुझ्या लेखनाच्या साह्याने फिरवून आणत असतेस त्याबद्दल अनेक आभार!

ओघवते वर्णन खूप आवडले! युरोप ट्रीप घडलीच तर आवर्जून जाईन...

सन २००० ते २००८ ह्या काळात अनेकवेळा ब्रायटनला जाण्याचा आणि राहण्याचा योग आला. सदर राजवाडादेखिल आतून पाहिला होता आणि इस्पितळाबद्दही वरवर ठऊक होते. पण इतकी व्यवस्थित कथा आताच समजली.

आणि हो, सावरकरांची 'ने मजसी ने' ही सुप्रसिद्ध कवितादेखिल ब्रायटनच्याच किनार्‍यावर लिहिली गेली, असे समजले जाते.

* ब्रायटनला समुद्रकिनारा असला तरी तो वाळूच्या रेतीचा नाही तर वाळूच्या दगडांचा (पेबल) आहे.

ओघवते वर्णन खूप आवडले. अत्यन्त अभ्यासपुर्ण लेख. आवडला.

"आपल्या देशापासून दूर कोण्या एका ब्रायटन गावात त्या टेकडीवर चिरनिद्रा घेणाऱ्या आपल्या वीरांना मानवंदना"

🙏
वर्णन आणि फोटो दोन्ही सुरेख!

श्वेता२४'s picture

3 Nov 2019 - 10:09 am | श्वेता२४

एखाद्या ठिकाणाच्या मागची ऐतिहासिक पार्श्वभूमी कळली तर ती जागा केवळ पाहणे नाही तर अनुभवणे होते. अतीशय वेगळी व तपशीलवार माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

सर्व प्रतिसादकांचे मन:पूर्वक आभार.

दिल्लीत तीनमूर्ती चौक हा त्यांना स्मृतीत ठेवायला बांधला गेला होता म्हणतात

अरे वाह हे मला माहित नव्हते. इंडिया गेट विषयी माहिती आहे.

आणि हो, सावरकरांची 'ने मजसी ने' ही सुप्रसिद्ध कवितादेखिल ब्रायटनच्याच किनार्‍यावर लिहिली गेली, असे समजले जाते.

__/\__हो मी ही हे ऐकून आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

14 Nov 2019 - 8:35 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आपली लेखनशैली सुरेख आहे. ओघवतं, एका लयीत शांतपणे वाचता येतं. लेखन नेहमीप्रमाणे माहितीपूर्ण आहे.
छायाचित्रही पुरक. उगाच फोटोंचे रतीब नाहीत. गलेमाच्या वेळीही दाद द्यायची राहून गेली होती.
असेच लिहिते राहा. आभार. आता ब्रायटनला जाणं आलं. कोणी पुरस्कृत केलं तर. बाकी तिकडे खायप्यायची सोय.
एखादा फोटो ? मिसळपाव. पुलाव वगैरे...?

बाकी, मला ते राजकुमार चौथा जॉर्ज, दुसरा, तिसरा... हे समजायला कठीण जातं.
इकडचा इतिहासही आमचा असाच उच्च. ;)

-दिलीप बिरुटे
(इतिहास भूगोल वाचक)

गवि's picture

14 Nov 2019 - 9:12 pm | गवि

अगदी असेच लिहीणार होतो. टंकनश्रम वाचवल्याबद्दल धन्यवाद.

प्रचेतस's picture

14 Nov 2019 - 9:20 pm | प्रचेतस

ब्रायटन छत्रीचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीच्या रचनेशी असलेले साम्य रोचक आहे. खूप काही इतिहास पाहिलाय ब्रायटनने.
गोनीदांच्या त्या तिथे रूखातळीतल्या महारुखाची आठवण झाली वाचताना.

Raje
(छायाचित्र जालावरुन)

-दिलीप बिरुटे

किसन शिंदे's picture

14 Nov 2019 - 9:48 pm | किसन शिंदे

अतिशय आवडला हा लेख. ब्रायटन छत्रीचा फोटो सर्वात पहिल्यांदा पाह्यला तेव्हा महाराजांच्या स्मारकाची आठवण झाली. पहिल्या महायुद्धावर अनेक चित्रपट निघाले आहेत, त्यात कुठे ना कुठे तरी या शाही हाॅस्पीटलचा उल्लेख नक्की असावा. तुम्ही भेट दिलीत आणि तो अनुभव आवर्जून इथे दिलात त्याबद्दल आभार.!

लेख आवडला. माहीत नसलेल्या ठिकाणची ओळख करून दिली.
फोटोही मस्त.

पुलेशु

मुक्त विहारि's picture

21 Nov 2019 - 9:32 pm | मुक्त विहारि

माहिती बद्दल धन्यवाद.

स्मिताके's picture

21 Nov 2019 - 11:38 pm | स्मिताके

माहितीपूर्ण आणि रंजक. इतिहास किती वाचनीय केलात, आभारी आहे.