देंव बरें करूं
मिपा दिवाळी अंक २०१९
अनुक्रमणिकादेंव बरें करूं

गोव्याची भूमी. उफाड्याची कांती असलेली तांबडी लाल माती. आपलं अंग हिरव्या गर्भरेशमी वस्त्रात नेटकेपणे चापून नेसून, मोठ्या अंबाड्यात मावळतीच्या रंगाचा अबोलीचा ‘वळेसर’ माळून, पायातील नूपुरांच्या निनादात निळ्याशार फेसाळणाऱ्या समिंदरात आपलं देखण रूप न्याहाळत डौलदार चालणारी रूपगर्विता म्हणजेच गोव्याची भूमी. निसर्गाने गोव्याला भरभरून दिलं. सुंदर स्वच्छ समुद्र, भरपूर हिरवीगार वनश्री, सर्वात महत्त्वाची कलेला आपल्या हृदयात स्थान दिलेली देवभोळी माणसं. हिरव्या माडांच्या गर्दीतून निळ्या आकाशाच्या दिशेने डोकावणारे गोव्यातल्या देवळांचे कळस, दीपमाळा, चर्चेसचे मनोरे हे गोव्याचं वैभव आजही दिसतं.
कुण्या एका काळी आकाशमार्गे जात असता, गोव्याच्या या सुंदर भूमीच्या प्रेमात पडून आपला पुढचा आकाशपंथ विसरून या भूमीवर उतरलेला स्वर्गस्थ रमण-रमणींचा मेळा आपल्या स्वर्गीय सुरांनी गात गात या भूमीवरून चालत जात असता, त्यांचा तो दिव्य सूर गोंयकरांच्या कानावर पडला असला पाहिजे. त्या स्वराने लुब्ध होऊन गोव्यातल्या माणसांनी मोठ्या भक्तिभावाने तो सूर आपल्या कंठात धारण केला असला पाहिजे आणि त्या अप्सरांना विनवलं असलं पाहिजे की, ‘बायांनो जाता तर जा. पण तुमच्या कंठातल्या या सुराचा मागमूस असू द्या आम्हां गोंयकरांच्या गळ्यात अन कानात’. त्या स्वर्गस्थ वाटसरूंनी हसून ‘तस्थास्तु’ म्हटलं असेल. कुणी सांगावं! सुरांबरोबर आपल्या सौंदर्याचं प्रतिबिंबसुद्धा जाता जाता गोव्यातल्या भूमीला, माणसांना बहाल केलं असेल. तेव्हापासून गोव्यातली माणसं, संगीत आणि सौंदर्य यांचं अतूट नातं निर्माण झालं असलं पाहिजे.
देवळांच्या सभामंडपांमधून त्याची स्तुती करणाऱ्या ह्या सूर-संगीताने हळूहळू सभामंडप ओलांडला, अवघं विश्व व्यापलं आणि अबोलीच्या ताटव्यांबरोबर गोव्याच्या मातीतून असंख्य गाते गळे फुलत गेले. कलावंतांची मांदियाळी निघाली. आपापल्या उपास्य दैवताच्या साक्षीने नांदली. केरीच्या सातेरीच्या उत्सवातल्या गाण्याची किर्ती मंगेशीच्या देवळात चर्चिली जाऊ लागली. शांतादुर्गेच्या पालखीचे कान मंगेशीच्या बनातल्या सुरांकडे लागायला लागले, रामनाथीच्या पालखीसमोर पडलेल्या कलावंतिणींच्या पदन्यासाने अवघ्या गोवेकरांच्या माना डोलू लागल्या आणि म्हार्दोळच्या महालसेच्या सभामंडपातल्या मंजुळ गाण्याचा आवाज दशदिशांत गेला. गोयं संगीतमय झालं.
गोव्यातली मंदिरं, त्यामधून गायिली जाणारी स्तुतिस्त्रोत्रं, त्यांचे उत्सव, देवाच्या पालख्या या साऱ्यामधून देवाच्या या गान–नर्तन सेवेला वेगळं काढताच येत नाही. ते त्यांचं अविभाज्य अंग आहे. या परंपरेला टिकवलं ते देवासमोर गाणं म्हणणाऱ्या, प्रसंगी नर्तन करणाऱ्या देवाच्या सेवेकरणींनी - म्हणजेच कलावंतिणींनी. त्यांनीच ही कला वाढवली, जोपासली, गायन-वादन-नर्तनाला शास्त्राची जोड दिली. या कलांचं शास्त्र शिकण्यासाठी त्या शिकवणाऱ्या गुरूंच्या शोधात बाहेर पडल्या, त्यांच्याकडून मोठ्या कष्टाने या कला हस्तगत केल्या. त्यात पारंगत झाल्या. अप्सरांचा आशीर्वाद फळला. यासाठी या कलावंतिणींनी जिवाचं रान केलं. फार हालअपेष्टा सहन केल्या, दारिद्र्य भोगलं, पण कला टिकवली. एकीकडे ‘देवाच्या सेवेकरणी’ म्हणून प्रसंगी अत्यंत मान, तर दुसरीकडे समाजाचा हिणकस दृष्टीकोन अशा दुटप्पी व्यवस्थेला त्यांनी धैर्याने तोंड दिलं.
उत्तरेतून वैशिष्ट्यपूर्ण गायनशैली घेऊन विविध घराण्यांचे गायक आले, त्यांच्याकडे अत्यंत कठीण अशा गुरुशिष्य परंपरेत राहून या कलावतींनी ही अमूल्य कला हस्तगत केली. ग्वाल्हेर, आग्रा, किराणा, जयपूर, पतियाळा, भेंडीबजार, रामपूर मेवात अशा अनेक घराण्यांची वैशिष्ट्यपूर्ण गायकी त्या शिकल्या आणि आपल्या गानकर्तृत्वाच्या जोरावर त्यांनी आपलं दारिद्र्य, हालअपेष्टा नाहीशा केल्या. विविध घराण्यांची गायकी टिकवली. पुढच्या पिढीपर्यंत संक्रमित केली. हे या कलावतींचं हिंदुस्तानी संगीतातलं योगदान निव्वळ अपूर्व असं आहे. माझी आई आणि मी स्वत: या परंपरेतीलच एक झालो, याचा मला अत्यंत अभिमान आहे. माझ्या आईची आई नार्व्याच्या सप्तकोटेश्वर देवाची परंपरेने सेवेकरीण होती. देवाच्या उत्सवात ती देवासमोर गायन आणि नर्तन करीत असे. प्रत्येक समाजव्यवस्थेला जशा काही जमेच्या बाजू असतात, तशा गडद बाजूही असतातच. आईची आई शास्त्रीय संगीत फार शिकलेली नव्हती, पण जन्मजात कला तिच्या अंगात होती. आईला मात्र गाण्याचं शास्त्रशुद्ध शिक्षण मिळावं अशा ध्येयाने तिने गोव्यातून दक्षिण महाराष्ट्रात स्थलांतर केलं. त्या वेळेस माझी आई अकरा वर्षांची होती. माझ्या आईलाही सुरेलपणाचा आणि सौंदर्याचा जन्मजात वारसा मिळालेला होता. गुरूंच्या शोधात असताना तिने अनेक मोठ्या मोठ्या गायकांची गाणी ऐकली. माझ्या आईच्या शिक्षणाच्या दृष्टीने त्यातील काहींकडे याचनाही केली. परंतु त्या काळी संगीतकलेत गुरू मिळणं इतकं सोपं नव्हतं. उत्तरेतून आलेले हे संगीतकार गायक, दिलदार उदार होते खरे, परंतु त्यांच्याकडे शिक्षण घेत असलेल्या शिष्य-शिष्यिणींचं त्यांच्यावर बर्याच प्रमाणात वर्चस्व चालत असे. आपल्या गुरूची विद्या आपल्यापेक्षा इतरांकडे जाऊ नये असा त्यांचा प्रयत्न असे. अशा परिस्थितीत आजीच्या वाट्याला प्रारंभी आली ती निराशाच; परंतु तिने आपली चिकाटी सोडली नाही. आईसाठी गुरूंचा शोध घेत असताना भेंडीबाजार घराण्यातील एक स्वतंत्र विचाराचा घराणेदार गायक आपली विद्या आईला देण्यासाठी तयार झाला. आणि खांसाहेबांचा रीतसर गंडा बांधून आईची तालीम सुरू झाली. त्या वेळेस आईचं वय तेरा-चौदा वर्षांचं असेल. खांसाहेबांनी गाण्याच्या निमित्ताने अवघा हिंदुस्तान पालथा घातला व ते मुंबईत स्थायिक झाले. त्यांच्याबरोबर आई आणि आजीदेखील मुंबईत येऊन स्थिरावल्या. खांसाहेबांनी हातचं राखून न ठेवता आईला गाणं शिकवलं. पुढे आईच्या वाढत्या गाण्याला आणखी विविध अंगाची तालीम हवी, हे ओळखून त्यांनीच आईच्या पुढच्या शिक्षणाची सोय केली. प्रचंड मेहनत, जिद्द, चिकाटी, गुरूंवर श्रद्धा याच्या जोरावर आईने विद्या घेतली. निरनिराळ्या घराण्यातल्या उत्तमोत्तम गोष्टी ती कष्टपूर्वक शिकली. हे शिकताना आपल्या घराण्याच्या मूळ गाण्याला कुठेही बाधा येणर नाही हे पाहिलं. लयकारी, सरगम, ताना, अतिजलद किंवा अतिधिमी लय यापैकी कुठल्याही एका अंगाचा अतिरेक टाळणारं भेंडीबजार घराण्याचं समतोल अस्सल गाणं तिने जपलं, म्हणूनच ती एक यशस्वी कारकिर्द करू शकली. आपल्या आईचं स्वप्न पूर्ण करू शकली. तिने भारतभर आणि विदेशातही आपली कला सादर केली. आईचे हे अपार कष्ट पाहताना मला नेहमी वाटायचं की आपण गाणं न करता शिक्षण घ्यावं. शिक्षणाच्या आधारावर कुठे चांगलीशी नोकरी करावी. सर्वसामान्य स्थिर जीवन आपल्या वाट्याला यावं. पण तसं व्हायचं नव्हतं. माझा सुरेल गळा आणि गायकीची पार्श्वभूमी यांना मी इतर काही होणं मंजूर नसावं. माझ्या शास्त्रीय गाण्याच्या शिक्षणासाठी आईनेही तिच्या आईप्रमाणे खूप कष्ट घेतले. मला घराणेदार उत्तम गुरूंकडे कशी तालीम मिळेल याकडे तिने लक्ष पुरवलं. सुरुवातीला तिच्याचकडे माझं शिक्षण सुरू झालं, पण त्या वेळेस ती स्वत: मैफली करत होती. त्या व्यग्रतेत मला नियमीत शिस्तीची तालीम देणं काही तिला शक्य नव्हतं. मग आपल्याच घराण्याच्या प्रसिद्ध खांसाहेबांकडे माझं शिक्षण सुरू राहील याची तिने खबरदारी घेतली. हे खांसाहेब तिचे गुरुबंधू होते. गाण्याच्या शिक्षणासाठी माझ्या आजीने जरी स्थलांतर केलं असलं, तरी आयुष्याच्या शेवटापर्यंत तिची प्रकृती साथ देत असेपर्यंत उत्सवप्रसंगी ती गोव्यातील आपल्या परंपरागत दैवताची जमेल तशी सेवा करीत राहिली.
गोव्यात असताना ‘देवाच्या सेवेकरणी’ आणि ‘कलावंताचं घराणं’ या बिरूदांपलीकडे गरिबीशिवाय दुसरं काहीच नव्हतं आमच्याकडे. बिरूदांनी पोट भरण्यासारखं नव्हतं. आई स्वतंत्र मैफली करायला लागेपर्यंत हीच परिस्थिती कायम होती. खांसाहेबांनी तालीम देण्याचं मान्य केलं नसतं आणि शेवटपर्यंत ते आपल्या शब्दाला जागले नसते, तर आमचे हाल कुत्रा खाता ना. म्हणूनच मुरादाबादचा सांगीतिक वारसा सांगणाऱ्या या घराण्याचे आमच्यावर अनंत उपकार आहेत. उस्ताद छज्जूँ खां, उस्ताद नजिर खां, अमान अली खां, झंडे खां, मम्मन खां, शब्बीर खां, अमीर खां, अंजनीबाई, मुहम्मद हुसेन खां अशी एक एक गानरत्नं या घराण्यात पैदा झाली. हे सर्व गायक घराणेदार गायक तर होतेच, त्याहीपेक्षा ती अतिशय सज्जन अशी माणसं होती. मोठे खांसाहेबसुद्धा अतिशय सज्जन होते. त्यांच्या सज्जनपणाचा वारसा अपरिहार्यपणे आईकडे गाण्याबरोबर आला. दुसऱ्याच्या परिस्थितीचा फायदा घेणं, वावगं वागणं अशा गोष्टी या मोठ्या माणसांनी कधी केल्या नाहीत.
‘कलावंतिणी’ म्हणजे लोकांची बघण्याची दृष्टी जी बदलते, त्याला कारण म्हणजे पुढे प्रसिद्धीच्या शिखरावर गेल्यावर हाती अमाप पैसा, कीर्ती, आलेल्या काही कलावंतिणी आणि त्यांचं बेछूट वागणं हेच होय. पैसा, प्रसिद्धी, मानमरातब या गोष्टी वापरू तशा वापरल्या जातात, हे सर्व मिळूनसुद्धा आपल्या कलेशी इमान राखून, आपल्या जबाबदार व एकनिष्ठ वागण्याने ज्या थोड्या राहिल्या, त्याच खऱ्या कलावंत होत. नपेक्षा काळाच्या ओघात किती जणींची माती झाली. ना धड कला, ना धड गाणं, शेवटी अत्यंत निर्धन अवस्थेत त्या मृत्यू पावल्या. माझ्या आजीने आणि आईने फार कष्टाने, मेहनत करून आपली गरिबी नाहीशी केली. गोवा सोडलं, तेव्हा त्या मायलेकींजवळ काही म्हणता काही नव्हतं. रिकामे हात. मनात मात्र कला शिकायची भरपूर इच्छा. गाण्याच्या शिक्षणासाठी त्या पै पै वाचवत राहिल्या. मोठ्या खांसाहेबांसारखा गुरू मिळाला नशिबाने. गाणं शिकायचं असेल तर इतरांकडून ते भरपूर गुरुदक्षिणा घेत. त्यांना शिकवायचं नसेल त्याला भरपूर फी सांगत. इतकी की तो ती देऊ शकणार नाही याची खातरीच असे. पण हे अंगात मुळची कला नसणाऱ्या हौशा-नवशा-गवशांसाठीच असे. तळमळ असलेला कलावान कुणी विचारील तर त्याला फी-दक्षिणेची काही अट नसे. भरभरून विद्या देत. मोठ्या खांसाहेबांचा शिष्यपरिवारही बराच मोठा आहे. आईचे कलागुण पाहून अमुक एक द्या असं न सांगता ते शिकवायला तयार झाले. अटी फक्त दोनच - एक म्हणजे कमीत कमी दहा ते बारा वर्षं तालीम घेतली पाहिजे. दुसरी म्हणजे त्यांनी सांगेपर्यंत जाहीर कार्यक्रम कुठेही करता कामा नयेत. या अटी मान्य करून आईची तालीम सुरू झाली ती थेट खांसाहेब मुंबई सोडून पुण्याला स्थायिक होईपर्यंत अखंड चालू राहिली. ते मुंबईत आले की आमच्याकडेच उतरत. त्या वेळेस मलाही त्यांची तालीम मिळाली. पुढे छोट्या खांसाहेबांकडे त्यांनीच माझ्या तालमीची तजवीज केली. माझ्या वेळेसही दक्षिणा-फीचा प्रश्न आला नाही, कारण एक म्हणजे त्यांच्या गुरूंनी - म्हणजेच मोठ्या खांसाहेबांनी त्यांच्यावर सोपवलेली मी शिष्या होते. दुसरं म्हणजे तेव्हा खांसाहेब आमच्या घरातल्या वडीलधाऱ्या व्यक्तीसारखेच होते. आमच्याचकडे राहत. खांसाहेब आणि आई गुरुबंधू-भगिनी असल्यामुळे त्यांच्यात बहीणभावाचं नातं होतं. तिसरं कारण म्हणजे त्या वेळेपर्यंत आमची सांपत्तिक स्थिती खूपच सुधारली होती. आम्ही द्यावं आणि त्यांनी मागावं असं काही नव्हतं. जे काही होतं, ते सर्व मोठ्या खांसाहेबांमुळेच असल्याची आम्हा सर्वांना जाणीव होती. जे काही देणं-घेणं होतं ते प्रेमाचं. काटेकोर, नियमबद्ध शिक्षणातून आईचं गाणं घडलं. गाण्याबरोबर आयुष्यही घडत गेलं. अमाप कष्ट करून, देशभर फिरून मैफली करून तिने दारिद्र्यावर मात केली. आपल्या आईचं स्वप्न पुरं केलं. गाणं शिकत असतानाच घराला आधार हवा म्हणून तिला विवाहाचा पर्याय स्वीकारावा लागला. गाण्याचं शिक्षण पुरं होईपर्यंत विवाह आधारभूत ठरला. पुढे माझ्या जन्मदात्याच्या मृत्यूनंतर तिला फार मानसिक यातनांतून जावं लागलं. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या घरच्या लोकांनी आमच्याशी सर्व संबंध तोडून टाकले. पण आई त्यातून सावरली. त्याच सुमारास खांसाहेबांनी तिला गाण्याच्या स्वतंत्र मैफली करण्याची आज्ञा दिली. उत्तरार्धात परिस्थिती आमूलाग्र बदलली. कलेची सेवा करून त्या काळाच्या मानाने तिने अपार धन मिळवलं. ते राखलं. त्याचे परिणाम म्हणून आम्हा सर्वांच्या आयुष्याला अतिशय स्थैर्य आलं. माझ्या आजीचा व आईचा मला अत्यंत अभिमान वाटतो. केवळ तिच्या चरणाशी नतमस्तक होणं आणि अजन्म माझ्या गुरुजनांच्या ऋणात राहणंच मी पसंत करीन. *** एकदा एके ठिकाणी माझ गाणं होतं. सायंकाळच गाणं, मी कुठेशी बाहेर गेले होते ती अगदी वेळेला घरी आले आणि निघालेच लगेच. वेळेत पोहोचायला हवं होतं. नेसलेली साडी तशी काही वाईट नव्हती. त्या वेळी फिक्या रंगाच्या साड्यांची फॅशन होती. गळ्यात नेहमीची चेन, हातात एक एक बांगडी होतीच. केस सारखे करून एक फूल तेवढं माळलं केसात आणि आईला नमस्कार करायला गेले. मला पाहताच ती चिडून म्हणाली, “तानू, तूं खय वैंता? मैफिलीक की बाजारान गो? फुड्यान असतले ते रसिक आमचे मायबाप. उठोळ नाका पण आमीं साजराँ, गोमटाँ दिसूक जाय इतलें क्ळों ना तुका!. किदें हें दळडीरपणाची लक्षणां? बेगीन वोस. चांगला तयार हो. हांव तुकां जैत मेळूं म्हण आवडता.” तिने मला साडी बदलायला लावली. कानात, गळ्यात मोजके पण चांगले दागिने घालायला लावले आणि पाहून म्हणाली, "मैफलीला जाताना प्रसन्न असावं, प्रसन्न दिसावं. आपण प्रसन्न असलो, दिसलो तर गाणं प्रसन्न होतं आपलं." ते मी आयुष्यभर लक्षात ठेवलं. हार - आईची आठवण.
श्रेयनिर्देश : प्रकाशचित्रे चारुदत्त गोवेकर ह्यांजकडून.

.png)
वाचन
16309
प्रतिक्रिया
0