बंध

Primary tabs

आजी's picture
आजी in दिवाळी अंक
25 Oct 2019 - 6:00 am


मिपा दिवाळी अंक  २०१९

अनुक्रमणिका
बंध
जे लिहायला घेतलंय, ते विस्कळीत होणार याची कल्पना आहे, पण जुन्या आठवणींच्या वाटेला फाटेच खूप असतात आणि कुठे वाहावत जाऊ सांगता येत नाही.

माझी सगळ्यांत पहिली शाळा म्हणजे सांगलीच्या नगरवाचनालयासमोरची म्युनिसिपालटीची शाळा नं १. त्या वेळी म्युनिसिपालटीच्या शाळेत मुलांना सररास घालत. खाजगी शाळा फारशा नव्हत्या. ही शाळा नं १ छान होती. मला आवडायची. शाळेत पोहोचवायला आणि आणायला घरचं कुणी येण्याची पद्धतच नव्हती.

आम्ही त्या वेळी छत्रेवाड्यात सांगली रेल्वे स्टेशनजवळ राहत असू. आसपास शाळा नं१मध्ये जाणारी दोन-तीन मुलं होती. माझ्यापेक्षा थोडीशी मोठी. त्यांच्याबरोबरच मी शाळेत जात-येत असे. वाचनालयासमोरचा रस्ता क्रॉस करून शाळेत जावं लागत असे. आम्ही सहज रस्ता क्रॉस करत असू. त्या वेळी वाहनांची वर्दळ नव्हती. किमान वाहन अपघात या दृष्टीने सगळं सेफ होतं. किंवा तसं वाटायचं असं म्हणू.

त्या शाळेतल्या बाई मला आवडायच्या. आमचा पहिलीचा वर्ग. त्याच सर्व विषय शिकवायच्या. एकदा त्यांनी एक लहानशी नाटिका बसवली. त्यात 'राजा मला भ्यायला, माझी टोपी दिली' म्हणणाऱ्या उंदराचं काम करायला वर्गातलं कुणीच तयार होईना. मी पटकन म्हटलं, "मी करते उंदराचं काम" आणि उंदरासारखं चार पायांवर तुरुतुरु चालून दाखवलं. बाईंनी मला जवळ घेतलं आणि कौतुकभरल्या नजरेने मला शाबासकी दिली. त्यांची ती नजर आणि शाबासकी माझ्या अजूनही लक्षात आहे. लहानपणी अशी प्रेरणा मिळणं खूप आवश्यक आहे. ती आयुष्यभर पुरते. मागे पाहताना तिचं महत्त्व आता दिसतं.

माझे वडील सरकारी सेवेत डॉक्टर होते. त्यांच्या महाराष्ट्रात आणि कर्नाटकात बदल्या होत असत. मी सांगलीत शिकत असताना थेट धुळ्याला त्यांची बदली झाली. नव्या गावी पुन्हा नवा डाव नवे गडी. धुळ्याची शाळा मला स्पष्ट आठवते. शाळा म्युनिसिपालिटीचीच होती.

त्या शाळेची फक्त एकच विचित्र आठवण आहे, ती म्हणजे माझ्या वर्गात एक अतिशय अस्वच्छ मुलगी होती. इतकी अस्वच्छ की तिच्या अंगाला घाण वास येत असे. ती नेमकी माझ्याच शेजारी बसायची. त्या वासाने मला नको जीव व्हायचा. नव्यानेच गावात आल्याने काही बोलायचं धाडसही नव्हतं. तो वास माझ्या अजून लक्षात आहे. जे रोज अंघोळ करत नाहीत, कपडे बदलत नाहीत आणि ज्यांच्या अंंगाला घाण वास येतो त्यांचा मला आजही तिरस्कार वाटतो.

धुळ्यानंतर आमच्या वडिलांची बदली कर्नाटकात होन्नावर इथे झाली. तिथे कानडी भाषा बोलली जायची. शाळेतही कानडीतून शिकवत. शाळा म्युनिसिपालिटीचीच होती. तिथल्या बाई प्रेमळ होत्या. त्यांना आम्ही सर्व मुलं 'नातलक्का' म्हणायचो. त्या शाळेतली एक गंमत सांगते. नातलक्कांनी १ ते १० आकडे वर्गात कानडीतून शिकवले. मला १ ते १०० आकडे मराठीतून येत होतेच. मी १ ते १० कानडी आकडे पाहून तर्काने कानडीतून १ ते १०० आकडे पाटीवर काढून दाखवले, तर त्यांनी माझं इतकं कौतुक केलं की बास! तेव्हा मला खूप फुशारल्यासारखं झालं. मोठं झाल्यावर कळलं.. त्यात काय अवघड होतं?

धुळ्याला आम्हाला राहायला स्वतंत्र बंगला होता. होन्नावरलाही होता. बाजूला स्टाफ क्वार्टर्स होते. तिथे पंढरीबाई नावाच्या नर्स होत्या. त्यांच्या बेबी नावाच्या मुलीशी मी खेळायची. नागप्पा नावाचा एक गडी होता. त्याची आणि माझी घनदाट दोस्ती होती. मला अजूनही नागप्पाची कधीकधी आठवण येते.

होन्नावरहून पुढे मला आणि भावंडांना सांगलीला आजीकडे राहायला पाठवलं गेलं. आईवडील मागे होन्नावरलाच राहिले. आजी, आजोबा, लग्नाच्या वयाला आलेल्या दोन मावश्या (त्या वेळी कुटुंबनियोजनाचं महत्त्व लोकांना एवढं कळलेलं नव्हतं) असे आम्ही गणपती मंदिराच्या आवारात आजोबांच्या बिऱ्हाडी राहायला आलो. आता मी तिसरीत गेले होते. माझं नाव सांगलीच्या बापट बालशिक्षण मंदिर ह्या शाळेत घातलं. बापटबाल असाच त्या शाळेचा उल्लेख व्हायचा. शाळा मोठी होती. बसायला बाकं होती. इतकी वर्षें आम्ही शाळेत खाली जमिनीवरच बसायचो. शाळेला पटांगण होतं. चक्क सी-सॉ, झोपाळा, घसरगुंडी होती. मी तिथं तिसरी, चौथी या दोन यत्ता शिकले. माझ्या अनुभवावरून सांगते की म्युनिसिपालिटीच्या शिक्षणाचा दर्जाही चांगलाच होता. तिथले शिक्षक-शिक्षिकाही मनापासून शिकवायच्या.

शाळेत वही ही चैनीची महागडी गोष्ट. एखाददुसरीच वही असायची. पाटी-पेन्सिलवर काम भागायचं. त्या शाळेतली एक आठवण आहे. मी एकदा झोपाळ्यावर झोका घेत होते. कुठूनतरी एक दगड आला आणि माझ्या कपाळावर जोरात लागला. मी झोपाळ्यावरून उंचावरून खाली पडले. कपाळाला खोक पडली. बाई धावत आल्या. आयोडीनच्या जांभळ्या द्रवात बुडवलेला कापूस म्हणजेच प्रथमोपचार. तो करून मला घरी पाठवलं. एकीला घरी सोडायला आणखी दोघी. दगड कुणी मुद्दाम मारला की चुकून लागला, कळलं नाही. पण ही एक सणसणीत आठवण अजून जिवंत आहे.

त्याच शाळेत मी चौथीत गेले. आता पाटी-पेन्सिलच्या जोडीला वही आणि दौत-टाक आले. दौतीची एक मजाच. एक हिंगाची पत्र्याची रिकामी डबी घ्यायची. तिला दोन भोकं समान अंतरावर पाडायची. त्यात माती व पाणी घालून दौत घट्ट रोवायची. माती वाळू द्यायची. दुकानातून शाईच्या पुड्या आणायच्या. त्या आण्याला चार मिळायच्या. अजून दशमान पद्धत सुरू झाली नव्हती. काळी शाई किंवा निळी शाई. त्या पुड्यांतल्या पावडरीत पाणी घालून शाई तयार करायची. ती दौतीत घालायची. डबीच्या भोकातून ओवून एक सुतळी बांधायची. एक टाक विकत घ्यायचा. तो टाक शाईत बुडवून कागदावर लिहायचं. तो दर दीड-दोन वाक्यांनी फिका व्हायला लागायचा की परत दौतीत बुचकळी मारून लिखाण सुरू.

बॉलपेनचा शोध लागलेला नव्हता, किंवा आमच्या आसपास तो पोहोचला नव्हता म्हणा. शाईपेन वापरायची परवानगी नव्हती. बोरूने किंवा जाड निफाने अक्षर घटवून घ्यायचं. आमचं अक्षर घटवून घेतलं ते कडवेकर सरांनी. आज माझं अक्षर चांगलं आहे ते कडवेकर सरांमुळे. खूप मोठी झाल्यावर कडवेकर सरांना मी भेटायला गेले, तेव्हा मला त्यांनी अर्थातच ओळखलं नाही. पण मला वाईट वाटलं. अर्थात याउलट लक्षात ठेवणारे शिक्षकही भेटले, ते पुढे येईलच.

शाळेत न्यायला दप्तर म्हणून वेगळी, ऐटदार बॅग नसायची. घरातल्याच भाजी आणण्याच्या पिशव्यांपैकी एखादी पिशवी मिळायची. तीत पाटी, पेन्सिल, पुस्तकं, टाक, एखादी वही टाकायची. एका हातात हिंगाच्या डबीतली शाईची दौत, पायांत चपला असं माझं बावळट ध्यान गणपती मंदिर ते बापटबाल असा शाळेचा रस्ता तुडवायचं. रिक्षा, स्कूल बस असं काही स्वप्नातही नसायचं. अंतर खूप दूर होतं, पण ते चालतच जायचं. चप्पल वर्षातून एकदाच मिळायची. ती हरवली, तर त्या वर्षी शिक्षा म्हणून दुसरी चप्पल नाही.

घरातलं कुणीतरी बाईमाणूस वेणी घालून द्यायचं. वेणीला रिबिनी नव्हत्या. केळीचं सोपट वेणीला बांधायचं, नाहीतर आगवळ बांधायचा. 'रेमी' नावाची पावडर असायची. अफगाण स्नो. पण ते मला वापरायची परवानगी नव्हती. दरबार गंधाची बाटली. आरसा खूप उंचीवर. घरच्या कर्त्या पुरुषाच्या उंचीला अ‍ॅडजस्ट केलेला.

आम्ही आईवडिलांपासून दूर होतो. आजी स्वभावाने कडक होती. तिची शिस्त महाभयंकर. मला आईची आठवण येऊन खूप रडू यायचं. फक्त तिसरीत होते मी!

मग चौथीला आई आमच्याजवळ राहायला आली. वडील मात्र होन्नावरलाच राहिले. आई आल्यावर आम्ही सराफकट्टयाला एका वाड्यात राहायला आलो. मला बळेच स्कॉलरशिपला बसवलं होतं. पण मला त्या एक्स्ट्रॉ अभ्यासाचा कंटाळा यायचा.

त्या वेळी शाळेत घडलेली एक घटना माझ्या अजूनही लक्षात आहे. एकदा आमच्या वर्गात दोन-तीन बायका आणि पुरुष आले. त्यांना लहान मुलांच्या मासिकाच्या मुखपृष्ठावर छापायला एक परीराणीचा, म्हणजे परीचा वेष घालून, फोटो हवा होता. त्यांनी वर्गातल्या मुलांचं निरीक्षण केलं. मला बाजूला बोलावून ते म्हणाले, "आम्ही तुझा एक परीराणीचा फोटो काढणार आहे. आम्ही एक चिठ्ठी देतो. तुझ्या आईवडिलांची लेखी परवानगी आण." मी घरी जाऊन आईला चिठ्ठी दाखवली. आईने परवानगी दिली. मग आम्ही फोटोग्राफरकडे गेलो. शाळेतल्या बाईंनी मला परीराणीसारखं सजवलं आणि माझा फोटो घेतला.

मला फोटोची एक प्रत मिळाली. तो फोटो अजूनही माझ्याकडे आहे. मासिक मात्र नाही. मासिकाचं नावही आठवत नाही. काळाबरोबर खूप गोष्टी आपल्याच आत खोल गाडल्या जातात.

चौथीत असताना मी शाळेच्या गॅदरिंगमधे काम केलं होतं. त्याचा फोटो अजूनही माझ्याकडे आहे. त्या नाटुकल्यात माझी साडी नीट बसत नव्हती. ती तशीच वर खोचून मी कसंतरी काम केलं, हे स्पष्ट आठवतं. फोटोतही साडी वर खोचलेली दिसते.

त्यानंतर आम्ही नदीकाठी एका वाड्यात राहायला गेलो. पाचवी ते अकरावी (मॅट्रिक) मी दुसऱ्याच हायस्कूलला शिकले. इथेही माझंं घर ते शाळा खूप अंतर होतं. मी चालतच जायची. एवढंच नव्हे, तर महत्त्वाचं काही घरी विसरलं तर घरी परत येऊन परत शाळेत जायची ते चालतच. एक-दोन वर्षांत आम्ही गावाबाहेर विश्रामबागला साधं पण प्रशस्त चारपाच खोल्यांचं स्वतःचं घर बांधलं आणि तिथे राहायला गेलो. ते घर फक्त तेव्हा १४ हजार रुपयांत झालं. आता ही रक्कम घर बांधण्यासाठी हास्यास्पदरित्या कमी वाटेल, पण त्या वेळी ती रक्कम माझ्या आईवडिलांना फार मोठी वाटली होती. त्याच घरात वडिलांनी एका खोलीत त्यांचा दवाखाना सुरू केला. आता ते रिटायर झाले होते. व्हिजिटला वगैरे ते सायकलने जात. बहुतांश पेशंट गरीब असायचे आणि फी बुडवायचे. वडिलांची विचारसरणी व्यावसायिक धंदेवाईक नसल्याने लोक त्यांना सहज घोळात घेत असत. या कनवाळूपणामुळे डॉक्टर असूनही आर्थिक प्राप्ती जेमतेमच व्हायची.

त्या वेळी, म्हणजे पन्नासच्या दशकात आम्ही शाळेतल्या मुली हरीपूरच्या जत्रेला जात असू. रुपये, आणे, पैसे असा व्यवहार होता. चार पैसे म्हणजे एक आणा. जत्रेसाठी घरून एक आणा मिळायचा. जत्रेला चालत जायचो, यायचो. एका पैशाचे बत्तासे घ्यायचे, एक पैसा देवापुढे ठेवायचा, एका पैशाच्या चिंचा घ्यायच्या. चिंचा खूप लहान असत आणि लाल असत. उरलेला एक पैसा परत आणून आईला द्यायचा. बचत केल्याबद्दल शाबासकी घ्यायची.

मिरज आणि सांगलीच्या मध्ये लाकडी डबे असलेली वेगळ्या गेजची छोटी रेल्वे होती. तिची छोटी छोटी स्टेशन्सही होती. विश्रामबागहून सांगलीला त्या रेल्वेने जायचं आणि स्टेशनवरुन पटवर्धन हायस्कूलला चालत जायचं. नंतर ती रेल्वे बंद झाली. मग मी बसने शाळेत जायला लागले. बसचं तिकीट २० पैसे होतं. त्यातही एक स्टॉप अलीकडे उतरलं की १५ पैसेच पडायचे. मग तिथे उतरून पाच पैसे वाचवायचे आणि आईला द्यायचे.

एकदा माझ्या काकांनी काही सामान आणण्यासाठी दिलेल्या पैशातले उरलेले चार आणे माझ्या हातून रस्त्यात कुठेतरी पडले. घराजवळ आल्यावर ते लक्षात आलं आणि मी खूपच घाबरले. तो तीनेक किलोमीटरचा रस्ता मी अक्षरशः ४-५ वेळा पुन्हा पुन्हा तुडवला ते चार आणे शोधायला! ऊन होतं. मी घामाने निथळत होते. घशाला कोरड पडली होती. नाणं सापडलं नाही. शेवटी घरी गेले. काकांना रडत रडत पैसे पडल्याचं सांगितलं. त्यांनी जवळ घेतलं, समजूत काढली.

या शाळेतल्या अनेक आठवणी आहेत. त्यांतली एक सांगते. मराठीला आम्हाला एक फाळकेसर शिकवायला होते. त्यांनी कौतुकाने एकदा माझा निबंध वर्गात वाचून दाखवला. मला ते म्हणाले, "चांगलं लिहितेस. लिहीत राहा." बस, इतकंच, पण मला इतकी प्रेरणा मिळाली. लहानपणी मिळालेलं प्रोत्साहन फार फार महत्वाचं असतं. ते आयुष्यभर लक्षात राहतं. उभ्या आयुष्यावर परिणाम करतं हे पुन्हा एकदा जाणवलं.

त्या वेळी टीव्ही नव्हताच. रेडिओ हे करमणुकीचं एकच साधन. माझी ताई रेडिओ सिलोन ऐकायची. लता, रफीची गाणी ऐकतच मी मोठी झाले. त्या वेळचे सिनेमे ब्लॅक अँड व्हाइट असत. नंतर सिनेमा रंगीत झाला. आईला, ताईला सिनेमे बघायला आवडत. मीही त्यांच्याबरोबर जायची. त्या वेळी सदासुख टॉकीजला बायकांची वेगळी आसनव्यवस्था असे. तिकीट फक्त चार आणे. दिलीपकुमार, राज कपूर , देवानंद, नर्गिस, वैजयंतीमाला ही तेव्हाची नटमंडळी. मराठीत जयश्री गडकर, सूर्यकांत वगैरे. मला देवानंद आवडायचा. (नंतर दिलीपकुमार आवडायला लागला.) देवानंदचे फोटो चिकटवलेली आणि त्याच्या सिनेमातली गाणी लिहिलेली एक वही माझ्याकडे होती. ती एकदा शाळेच्या दप्तरात बाईंना चुकून सापडली. त्या वेळी तास संपेपर्यंत वर्गाबाहेर उभं राहायची शिक्षा भोगलेली आठवते...

हा सगळा भूतकाळ झाला. आज मी सत्तरीला पोहोचलेय. साठच्या दशकाच्या मध्यात मी मॅट्रिक होऊन त्या हायस्कूलमधून बाहेर पडले. काही काळापूर्वी आमच्या त्याच शाळेचा हीरकमहोत्सव झाला. गेट-टु-गेदर झालं. त्या वेळी आम्ही वर्गातली उरलीसुरली मुलंमुली ५२ वर्षांनी पहिल्यांदा एकमेकांना भेटलो. तरीही थोड्या प्रयत्नांनी आम्ही एकमेकांना ओळखलं. शाळेत असताना आम्ही मुलंमुली एकमेकांशी बोलणं तर सोडाच, एकमेकांकडे बघतही नसू.

आमचे हिंदीचे सर तिथे आले होते. आमच्या शाळेच्या वयात ते अठरा-वीस वर्षांचे, अगदी नवीन आलेले सर होते. मी त्यांना ओळखलं. ते आता नव्वदीला आले आहेत. आश्चर्य म्हणजे मी माझं नाव सांगितल्यावर त्यांनीही मला ओळखलं. मी त्यांना वाकून नमस्कार केला. त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला. आमच्या दोघांच्याही डोळ्यांत पाणी आलं. नकळत आम्ही एकमेकांना मिठी मारली.

तिथेच आणखी एक हृद्य प्रसंग घडला. आमच्या मराठीच्या बाई. वय ९३. बंगलोरला मुलांकडे असतात. घरातून बाहेर पडू शकत नाहीत. एका वर्गमित्राने खूप खटपटी करून त्यांच्या मुलाचा नंबर मिळवला होता. त्यांना आम्ही फोन लावला. फोन स्पीकरवर टाकला. बाई म्हणाल्या, "फुलराणी कविता आठवते का?"आम्ही कोरसमध्ये म्हणालो, "हो, अजूनही पाठ आहे". त्या म्हणाल्या, "चला, म्हणू या." मग त्या बंगलोरहून आणि आम्ही आमच्या शाळेतून मोबाइलवर कविता म्हणू लागलो.

"हिरवे हिरवेगार गालिचे, हरित तृणांच्या मखमालीचे"

आमच्या त्या मन:स्थितीचं वर्णन न करता तुमच्या कल्पनाशक्तीवर विश्वास ठेवतेय. पण त्या क्षणी तिथे बावन वर्षांनी एकत्र आलेल्या आम्हा सर्वांमध्ये कोणता सामाईक बंध आहे, ते आम्हाला कळलं होतं.


20191016-122815

अनुक्रमणिका

प्रतिक्रिया

सुंदर. फार लोभस लिहिलंय. किती हृद्य आठवणी.

सुंदर लेख. जुन्या काळातल्या सांगलीत वाचकांना नेऊन आणलंत. छानच लिहिता आहात. "फुलराणी" च्या बंधाने केलेला शेवट अप्रतिम असाच आहे.
काही साधनसामुग्रींची कमतरता असली तरी कविता वर्गात सगळ्यांनी एकत्र चालीत म्हणणे ही त्यावेळच्या शाळांमधली आयुष्यभर पुरून उरणारी भारी, उंची गोष्ट होती. केवळ मराठीच नव्हेत तर माखनलाल चतुर्वेदी यांची पुष्प की अभिलाषा सारखी हिंदी कवितापण या मजेत केलेल्या पाठांतरामुळे आजही आठवते, आनंद देते. :)

गुल्लू दादा's picture

28 Oct 2019 - 12:49 am | गुल्लू दादा

फुलराणी चा किस्सा डोळे पाणावून गेला...

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

28 Oct 2019 - 11:58 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आपल्या सर्व आठवणी पुन्हा पुन्हा वाचाव्याशा अशा वाटल्या, आवडल्या. आपला काळ, आपली शाळा, आपले शिक्षक, लिहिण्यासाठी दौत-टाक हे मी अजूनही पाहिलेलं नाही, कसं असतं ते. पण, तुमच्या सर्व आठवणी आवडल्या."हिरवे हिरवेगार गालिचे, हरित तृणांच्या मखमालीचे" हे वाचतांना अक्षरं धुसर झाली.

मिपावर लिहिते राहा. आपणास उत्तम आयुरारोग्य लाभो, खुप आयुष्य लाभो अशी देवाकडे प्रार्थना. दीपावलीच्या आपणास मनःपूर्वक शुभेच्छा...!

-दिलीप बिरुटे

सुधीर कांदळकर's picture

29 Oct 2019 - 12:36 pm | सुधीर कांदळकर

वरील प्रतिसादातून उचललेला हा शब्द वापरायचे कधी सुचले नव्हते.

शालेय जीवनातल्या अनेक मधुर आठवणी जागवल्यात. गोळ्या किंवा पूड पाण्यात विरघळवून केलेली शाई, बोरू किंवा टाकाने गिरवलेले कित्तेलेखन. आठवले. काळी, निळी, लाल आणि हिरवी अशा चार रंगांची शाई अम्ही बनवीत असू. वेगवेगळ्या रंगांच्या शाईंच्या मिश्रणातून सुंदर वेगवेगळ्या रंगातली शाई आम्ही बनवीत असू. दिवाळीच्या अभ्यासाच्या वहीतली हेडिन्ग्ज, सब-हेडिन्ग्ज वेगवेगळ्या काळसर लाल, काळसर हिरव्या अशा गडद रंगात लिहीत असू. मुख्य मजकूर मात्र निळा किंवा काळाच लिहावा लागे. लक्ष्मी छाप बांधानी हिंगाची कागदी लेबलवाली गोलचपट पत्र्याची डबी आठवली. पण आमच्या शाळेत फाउंटन पेन चालत असे. बोरू/टाक फक्त कित्त्यासाठी. बॉलपेन कागदावरून घरून अक्षर बिघडे म्हणून चालत नसे.

ओळख न देणारे मास्तर बहुधा नाइलाजाने मास्तर झाले असावेत. चित्रविचित्र प्रकारची माणसे जगात असतातच. ९०व्या वर्षीही ओळखणारे मास्तर आवडले. ती फुलराणी वाल्या बाई छानच.

मस्त लेख. अनेक, अनेक धन्यवाद.

ऋतु हिरवा's picture

29 Oct 2019 - 10:46 pm | ऋतु हिरवा

बालपणच्या आणि विशेष करून शाळेच्या खूप रम्य आठवणी.

टर्मीनेटर's picture

29 Oct 2019 - 11:00 pm | टर्मीनेटर

वाह आजीबाई, खूप छान लिहिलंय.
तो परीराणीच्या वेशातला आणि शाळेच्या गॅदरिंगमधला फोटो लेखात पाहायला न मिळाल्याची चुटपूट लागून राहिली आहे.
अतिशय आवडला लेख. इतक्या छान हृद्य आठवणी आमच्याबरोबर शेअर केल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.

पद्मावति's picture

29 Oct 2019 - 11:52 pm | पद्मावति

फारच सुंदर. खुप आवडला लेख.

सुरेख लेख! एकेक आठवण अगदी मनाला स्पर्शून गेली.. खरंच शेवटची फुलराणीच्या कवितेचा प्रसंग अगदी डोळ्यांत पाणी आणून गेला.

नूतन सावंत's picture

7 Nov 2019 - 2:14 pm | नूतन सावंत

हृद्य लेखन.कोणत्याही वयात परीक्षा घ्यायला
शिक्षक तयार असतात ,हे मीही अनुभवलं आहे.लेख आवडला हे वेगळे सांगावे लागू नये. शेवट वाचताना डोळ्यात आलेल्या पाण्याच्या पडद्यावर तुम्ही न् तुमच्या बाई दिसल्या.एव्हढं मात्र खरं.

श्वेता२४'s picture

7 Nov 2019 - 2:40 pm | श्वेता२४

अगदी ह्रुद्य आठवणी

शा वि कु's picture

7 Nov 2019 - 10:59 pm | शा वि कु

आता सांगलीत इकडेतिकडे फिरताना तुमच्या आठवणी आठवणार :))

मुक्त विहारि's picture

20 Nov 2019 - 8:03 pm | मुक्त विहारि

छान लिहिलंय.

नावातकायआहे's picture

20 Nov 2019 - 9:47 pm | नावातकायआहे

खुप आवडला लेख.

विनिता००२'s picture

21 Nov 2019 - 10:49 am | विनिता००२

खूप छान लिहीलत, शेवटी डोळ्यात पाणी आलं.

जॉनविक्क's picture

21 Nov 2019 - 2:12 pm | जॉनविक्क

बालपणापासून ते 52 वर्षांनंतरच्या भेटीपर्यंतचा प्रवास अतिशय सुरेख टिपला आहे सुरुवातिचा आणी शेवटचा प्रसंग अक्षरशः जीवन्त केलात. एखाद्या प्रसिद्ध क्लासिकचा अनुवाद वाचावा असा फील येत होता...

मीअपर्णा's picture

23 Nov 2019 - 12:01 pm | मीअपर्णा

खूप आवडलं.

स्वधर्म's picture

28 Nov 2019 - 12:42 pm | स्वधर्म

तुंम्ही सांगलीच्या इतक्या जुन्या आठवणी जागवल्यात आणि थोडक्यात पण सुंदर स्मरणरंजन केलंत. मला तुंम्हाला एका गोष्टीसाठी सलाम करावासा वाटतो. दौत आणि टाकाने लिहून मोठ्या झालेल्या तुंम्ही, आज एका आनलाईन साईटवर, कॉंम्युटरवर टाईप करून लिहीत आहात! खूप मोठी गोष्ट आहे ही!!
आणि हो, सांगलीचा अभिमान वाटला.

स्वधर्म-मी अजून दौत टाक जमान्यातलीच आहे. थोडीशी काकूबाई, गावंढळ. पण आता नवीन शिकण्याचा प्रयत्न करतेय. माझे कुटुंबीय मला पोस्ट प्रसिद्ध करताना मदत करतात. थोड्याच दिवसात मी सर्व शिकेन असा विश्वास तुमच्यासारख्या सुह्यदांकडून मिळतो.

जॉनविक्क's picture

3 Dec 2019 - 8:49 am | जॉनविक्क

त्या शाळेतल्या बाई मला आवडायच्या. आमचा पहिलीचा वर्ग. त्याच सर्व विषय शिकवायच्या. एकदा त्यांनी एक लहानशी नाटिका बसवली. त्यात 'राजा मला भ्यायला, माझी टोपी दिली' म्हणणाऱ्या उंदराचं काम करायला वर्गातलं कुणीच तयार होईना. मी पटकन म्हटलं, "मी करते उंदराचं काम" आणि उंदरासारखं चार पायांवर तुरुतुरु चालून दाखवलं. बाईंनी मला जवळ घेतलं आणि कौतुकभरल्या नजरेने मला शाबासकी दिली. त्यांची ती नजर आणि शाबासकी माझ्या अजूनही लक्षात आहे. लहानपणी अशी प्रेरणा मिळणं खूप आवश्यक आहे. ती आयुष्यभर पुरते. मागे पाहताना तिचं महत्त्व आता दिसतं.

हया पराग्राफसाठी हा लेख मी अधून मधून वाचतो, मिश्किल आहे पण आपले आताचे वय त्यात बालपणीच्या तुम्ही यांची सांगड घालता कधी मनातल्या मनात हसून जातो मलाही कळत नाही, तसेही जो मार्ग कमी लोक अवलंबितात त्यावर चालायच धारिष्ट्य दाखवणारे मला विशेष प्रिय आहेत.

तुम्ही एक गोष्ट नकळत अत्यन्त अलगद स्पष्ट केलीत ते म्हणजे बेगडी अहंभावापेक्षा जे करायला आपल्याला आंनद वाटतो ते करणे मग ते इतरांच्या नजरेत कोणत्याही प्रतीचे असो खऱ्या आत्मिक समाधानाचा उगम आहे. आणी जिथे आपणच खुश तिथे आपण कुठे आहोत याने फरकही पडत नाही.

आत्ताही लग्नाचा वगैरे काही विचार मनात असेल तर मला "पहायला" येणार का ?

बंध वरच्या प्रतिक्रियांना उत्तरं द्यायला उशीर झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करते.

यशोधरा-धन्यवाद यशोधरा.

पलाश-खरं आहे पलाश,शाळेत एकत्र कविता म्हणायला मजा यायची.त्या कविता अजूनही पाठ आहेत.

गुल्लूदादा-मलाही लिहिताना रडू फुटलं होतं.

दिलीप बिरुटे-खूप बरं वाटलं तुमचा अभिप्राय वाचून.ह्या काळात दौत आणि टाक मी तुम्हांला कुठून दाखवू?चित्र मिळवायचा प्रयत्न करते.

सुधीर कांदळकर-तुमचा अभिप्राय वाचून एक आपल्यासारखाच दौत टाक वापरणारा भेटला म्हणून आनंद झाला.माझ्या सरांनी मला ओळखलं नाही कारण शेकडो मुलं त्यांच्या हाताखालून गेली असतील ,ते कुणाकुणाला लक्षात ठेवणार?शिवाय आमच्यात बदल केवढा झाला होता!त्यांचं वयही झालं होतं.त्यांना अल्झायमरची सुरुवात होती. त्यांचा काही दोष नाही. ते मला वंदनीयच आहेत.

ऋतु हिरवा, टर्मिनेटर, पद्मावती- धन्यवाद.

रुपी-बरं वाटलं अभिप्राय वाचून.

नूतन सावंत-लिहिताना माझेही डोळे पाणावले होते.

नावात काय आहे, श्वेता२४, मुक्तविहारी, मी अपर्णा - थँक्स

शाविकु-हा,हा.किती छान.

जॉनविकक- प्रतिसाद छान, धन्यवाद

विनिता००२-बरं वाटलं ,अभिप्राय वाचून.

सर्वच वाचक आणि प्रतिसादकर्त्यांचे आभार.