माझे गुरुजन

Primary tabs

अनंतफंदी's picture
अनंतफंदी in दिवाळी अंक
25 Oct 2019 - 6:00 am


मिपा दिवाळी अंक  २०१९

अनुक्रमणिका
माझे गुरुजनदत्तात्रेयांनी २१ की २४ गुरू केले असे म्हणतात. पण आपल्याही जीवनात असे कितीतरी गुरू आपल्याला भेटत असतातच. त्यापैकी काही लक्षात राहतात तर काही नाही. काही आपल्या जीवनावर दूरगामी परिणाम करतात, तर काही अल्पकाळ. काहींशी आपला बराच वेळ संपर्क राहतो, तर काहींशी थोडा वेळ आलेला संबंधही आपल्याला खूप काही शिकवून जातो. अशाच माझ्या काही गुरुजनांविषयी मी आज आपल्याला सांगणार आहे.

आपल्यापैकी बहुतेक जणांचा पहिला गुरू म्हणजे आई. आई आपल्या आयुष्याच्या सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत काही ना काही शिकवतच असते. मला आईने शिकवलेल्या काही विशेष गोष्टींपैकी एक आठवणारी गोष्ट म्हणजे लोकलचा प्रवास. पुण्यात जसे दुचाकीवर बसणे हे आईच्या पोटातूनच शिकून यावे लागते, तसेच मुंबईत लोकलचा प्रवास करणे. तर गर्दीच्या वेळी लोकल ट्रेन कशी पकडायची - म्हणजे ट्रेनमध्ये कसे चढायचे, कुठल्या डब्यात गर्दी कमी असू शकते, दारातून आत शिरताना दांड्याच्या मागील बाजूने शिरायचे (कारण पुढील बाजू बहुतेक वेळा लोकांनी अडवलेली असते), कसारा कर्जत बदलापूर लोकल शक्यतो टाळाव्या कारण गर्दी जास्त, कल्याण अंबरनाथ टिटवाळा लोकल त्यापेक्षा बऱ्या. तिकीट काढणे, आणि महत्त्वाचे म्हणजे बसायला जागा मिळवणे, अर्धा प्रवास झाल्यावर म्हणजे शक्यतो घाटकोपर/ कुर्ला आले की आपण उठून दुसऱ्याला बसायला देणे, दोन रांगांमध्ये उभे असताना येणाऱ्या-जाणाऱ्यांचे सामान ठेवायला किंवा काढायला मदत करणे, बायका किंवा लहान मुले असल्यास प्राधान्य देणे वगैरे बऱ्याच बेसिक गोष्टी मला तिनेच शिकवल्या, ज्या पुढे कॉलेजजीवनात आणि एकूणच लोकलप्रवासात मला बऱ्याच उपयोगी पडल्या. जाताजाता मुंबईचे लोकलप्रवासी आणि त्यांचा रोजचा प्रवास हा एक स्वतंत्र लेखाचा विषय आहे, हे नमूद करू इच्छितो.

पुढे शाळेची धकाधकी वाढत गेली आणि दहावीत असताना मला इतिहास, भूगोल शिकवणारे शिक्षक म्हणून पी.डी.पी. सर भेटले. त्यांचे आडनाव पुराणिक होते, पण सगळे त्यांना पी.डी.पी म्हणूनच ओळखत. शाळेत शिकवलेला इतिहास व भूगोल मला कधीच आवडला नाही, पण पी.डी.पी. सरांनी शिकवलेले दोन्ही विषय मला केवळ समजलेच नाहीत, तर आवडूही लागले. (माझे असेच आहे, नको ते विषय मला नेहमी आवडतात.) मुद्देसूद उत्तरे, तहाची कलमे, पहिल्या/दुसऱ्या महायुद्धाची कारणे, गांधीजींच्या ११ मागण्या, तसेच भूगोलातले घटना/घटक वगैरे वगैरे कंटाळवाणे टॉपिक खुलवून समजावण्याचे एक वेगळेच कसब त्यांना होते. शिवाय ते एस.एस.सी. बोर्डात परीक्षक म्हणून काम करत असल्याने तपासणाऱ्याला नेमके काय हवे असते ह्याचा त्यांना नेमका अंदाज होता. त्यांचा तास मलातरी कधी कंटाळवाणा वाटला नाही आणि त्याचा परिणाम म्हणजे मला दहावीत इतिहासात ६०पैकी ५९ मार्क मिळाले. पुस्तके, गाइड, २१ अपेक्षित या सर्वांपेक्षा एक चांगला शिक्षक असा चमत्कार घडवू शकतो, हे मला मनोमन पटले.

पुढे कॉलेज लाइफ सुरू झाले. साधारण ९५-९६ चा काळ. मोबाइल आणि इंटरनेट बोकाळले नव्हते. पण घरोघरी टेलिफोन आले होते. केबलवर परदेशी वाहिन्या दिसू लागल्या होत्या आणि भटकंतीची माहिती मिळू लागली होती. सायन्स इंजीनिअरिंग या धबडग्यात कधीतरी ट्रेकिंगचा चस्का लागला. म्हणजे आधी पोहणे, सायकलिंग वगैरे चालूच होते. पण ट्रेकिंगला जाऊ या असे बराच काळ माझ्या डोक्यात घोळत होते. नक्की काय करावे, कुठे जायचे, काय तयारी लागते, जंगलात हरवले तर काय, खायची सोय काय वगैरे बरेच प्रश्न होते. अशातच काही मित्रांच्या ओळखीतून एक गुरू - संजय - भेटला आणि आमच्या ट्रेकिंगच्या गप्पा चालू झाल्या. त्यातून मला समजले की तो एका ट्रेकिंग ग्रूपचा सदस्य आहे आणि दर महिन्याला त्या ग्रूपचे ट्रेक चालू असतात. शिवाय वर्षाच्या शेवटी एक जम्बो ट्रेक असतो, ज्यात अलंग कुलंग मदन किंवा अजिंठा सातमाळा, रतन-हरिश्चंद्र, सिंहगड राजगड तोरणा अशी एक रेंज केली जाते, त्यामुळे मोठा ट्रेक केल्याचा आनंदही मिळतो. मग काय? मी त्या ग्रूपचा सदस्य झालो आणि संजयच्या नादाने हळूहळू सॅक, ट्रेकिंग शूज, रोप, केरॅबिनर, स्लीपिंग बॅग अशा चित्रविचित्र गोष्टी आमच्या घरात जमा होऊ लागल्या. प्रत्येक ट्रेकला जाताना किंवा अध्येमध्ये कधी भेट झाली की मागच्या ट्रेकला काय काय मजा आली आणि पुढचा ट्रेक कोणता हेच विषय निघायचे. कोणी नेहरू माउंटेनियरिंगचा बेसिक कोर्स केला, कोण हिमालय मोहिमेला जाणार आहे, कोणी कुठला सुळका सर केला याची उत्सुकता वाढीस लागली. ट्रॅव्हर्स, पिनॅकल, रिज, रॉक पॅच, ओव्हर हँग, क्लायम्बिंग रॅपलिंग असे तोवर आयुष्यात न आलेले शब्द बोलण्यात येऊ लागले.

मात्र डेली रुटीनमधील तो आणि ट्रेकमधला तो हे मात्र वेगळेच असायचे. तिथे त्याचा धडाकेबाज स्वभाव, धोका पत्करण्याची वृत्ती, सर्वांना मदत करायची आस्था, चुकलेल्या टीमला मार्ग दाखवणे, पाणी भरून आणणे, लाकडे गोळा करणे, स्वयंपाकाला मदत करणे एक ना अनेक गुण दिसून यायचे. अर्थातच त्या सर्व गुणांमुळे ट्रेकला आलेल्या मुली त्याच्यावर फिदा असायच्या. पण प्रत्यक्ष ट्रेकमध्ये जेव्हा त्याच्याबरोबर चालायचे असे, तेव्हा सगळ्यांचा कस लागे. कारण त्याचे सरळ गणित होते. सुरुवात आणि गंतव्य स्थान यामध्ये एक सरळ रेष मारायची आणि चालत सुटायचे. मग मध्ये चढ, उतार, खड्डे, झाडे, रॉक पॅच काहीही येवो. मागे हटायचे नाही. आणि इथेच बहुतेक जण गळपटून जात. ट्रेकिंगमधल्या अनेक मूलभूत गोष्टी मी त्याच्याकडून शिकलो आणि त्या कायमच्या लक्षात राहिल्या. अजूनही कधी कधी आमचे बोलणे झाले तर विषय लगेच ट्रेकिंगकडे वळतो आणि नव्याजुन्या ट्रेकच्या आठवणी काढण्यात आम्ही रमून जातो.

कॉलेज लाइफ चालू असतानाच माझ्या आयुष्यात आलेला एक टर्निंग पॉइंट म्हणजे मी इंजीनिअरिंगच्या पहिल्या वर्षाला नापास झालो आणि एक वर्ष घरी बसलो तो. आतापर्यंत एकही विषयात के.टी.सुद्धा न लागलेला मी नापास होणे ही गोष्ट मला आणि घरच्यांना फार जड गेली. शेवटच्या क्षणापर्यंत अभ्यासाचे टेन्शन असणे, मूड नसणे, परीक्षेत आठवेल का अशी भीती वाटणे वगैरे ठीक आहे, पण असेही होऊ शकते हे मात्र पहिल्यांदाच समजले आणि मी जाम हादरलो.


20191017-200240


आणि त्याच सुमाराला (पण रिझल्ट यायच्या आधी) माझ्या मावशीच्या यजमानांनी मला आध्यात्मिक क्षेत्रातील एका अधिकारी व्यक्तीकडे नेले. ही व्यक्ती ज्योतिषी नव्हती, पण मार्गदर्शक होती. श्री दत्तगुरूंचा साक्षात्कार म्हणा, आशीर्वाद म्हणा किंवा आणखी काही त्यांना लाभलेला होता. त्यांच्याकडे जाऊन मी त्या वेळी काय विचारले हे नीट आठवत नाही, पण त्यांनी मला माझ्या कुवतीप्रमाणे आणि एकूणच परिस्थितीप्रमाणे काही उपासना करायला सांगितली. मी यथाशक्ती ती करत गेलो. पुढे पुढे जेव्हा जेव्हा मला काही अडचणी किंवा शंका येत गेल्या, त्या त्या वेळी मी त्यांची भेट घेऊन त्याची उत्तरे विचारत गेलो आणि त्या प्रमाणे वागायचा प्रयत्न केला. काही वेळी माझ्या डोक्यानेही वागलो आणि त्याचे नुकसानही सोसले. शिक्षण, लग्न, नोकरी, परदेशगमन, घर घेणे, गुंतवणूक या आणि अशा अनेक गोष्टी बरोबर जमल्या तर माणूस फार प्रगती करू शकतो आणि त्याच जर बिघडल्या तर त्या सुधारण्यात आणि कोर्टकचेऱ्या करण्यात त्याचे मोलाचे तारुण्य आणि आयुष्य निघून जाऊ शकते. पण माझ्या बाबतीत यातील अनेक गोष्टी माझ्या या गुरूमुळे योग्य वेळी योग्य तऱ्हेने घडल्या आणि त्यामुळे मी इथवर निर्विघ्न पोहोचू शकलो, यात काहीच शन्का नाही.

पुढे प्रत्येक नोकरीतील बॉसकडून मी काही ना काही शिकलो. कसे वागावे, कसे वागू नये, काय शिकावे, कसे बोलावे या आणि अशा अनेक गोष्टी. पण त्याबद्दल त्यांना गुरू म्हणणे चूक ठरेल.

पुढे वय वाढत गेले, अनेक गोष्टी पूर्ण झाल्या आणि अनेक राहून गेल्याची खंत लागून राहिली. त्यातीलच एक म्हणजे तबला शिकणे. नोकरीत आणि आयुष्यात थोडे स्थिरस्थावर झाल्यावर लहानपणीच्या या आवडीने उचल खाल्ली आणि जातायेता तबल्याच्या किंवा वाद्य शिकवणाऱ्या क्लासेसच्या पाट्या बघत असताना आणि चौकशी करत असताना एक नाव सापडले. नंबर मिळवला आणि भीडभाड बाजूला ठेवून एक दिवस फोन केला आणि सरांना भेटायला गेलो. गेल्यावर सरळ माझे तबल्याविषयी अज्ञान सांगून टाकले आणि शिकण्याची फार इच्छा आहे हेसुद्धा सांगितले. तसेच नोकरीच्या धबडग्यामध्ये फक्त रविवारीच क्लासला यायला जमेल हेही सांगितले. पण नशीब म्हणा किंवा आणखी काही ,सगळ्या गोष्टी जमत गेल्या आणि उशिरा का होईना मी तबला शिकायला सुरुवात केली. हळूहळू एक एक करता करता तालाचे थोडे थोडे ज्ञान येऊ लागले आणि तबला वाजवण्यात प्रगती होऊ लागली. अजून खूप पल्ला गाठायचा आहे, पण योग्य दिशेने वाटचाल तरी नक्की सुरू आहे.

आणि सरतेशेवटी माझे मोक्षगुरू श्री समर्थ रामदास आणि गोंदवलेकर महाराज यांना कसे विसरू? कॉलेजमध्ये असताना आम्ही काही मित्र सज्जनगडावर राहायला गेलो होतो, तेव्हा समाधीजवळच्या पुजाऱ्याने आम्हाला विचारले होते, "अनुग्रह घेणार का?" ती सुवर्णसंधी होती, पण तेव्हा हे सगळे कळायचे वय नव्हते. मात्र अनुग्रह घेतल्याशिवाय पुढे जाता येणार नाही असे आयुष्याच्या एका टप्प्यावर वाटू लागले आणि पावले गोंदवल्याकडे वळली. माळ हातात होतीच, पण आता तिची जबाबदारी माझ्यावर राहिली नाही. सध्या तिथेही मी शेवटच्या बाकावरचा विद्यार्थीच आहे, पण अधिक प्रयत्न चालू आहेत.

असो. या मुख्य गुरूंशिवाय इतरही काही गुरुस्थानांविषयी लिहायचे मनात आहे, पण विस्तारभयास्तव सध्यापुरते इतकेच लिहून हा लेख पूर्ण करतो.


श्रेयनिर्देश: चित्र आंतरजालावरून साभार.


20191016-122815

अनुक्रमणिका

प्रतिक्रिया

पाषाणभेद's picture

26 Oct 2019 - 12:43 pm | पाषाणभेद

जय गुरूदेव ( आमचे आम्हीच - हे विनोदाने हं)
मला माझे भुगोलाचे शिक्षक सोनवणे सर आठवले.
बाकी आयुष्यात बर्‍याच छोट्या छोट्या गोष्टी शिकवणारे (लघू) गुरू असतातच.

यशोधरा's picture

26 Oct 2019 - 4:06 pm | यशोधरा

मनापासून आलेलं लेखन. खूप आवडला लेख.

एकलव्य होऊन जीवन जण्यात खुप आनन्द असतो!

- (एकलव्य) सोकाजी

"आयुष्यात प्रत्येक चांगली-वाईट गोष्ट आपल्याला शिकवणारा हा गुरूच! मग तो सिगरेट ओढायला शिकवणारा असो, गाडी चालवायला शिकवणारा असो कि अभ्यासात मार्गदर्शन करणारा" - ही गोष्ट मला सांगणाऱ्या व्यक्तीलाही मी त्वरित गुरु मानले होते, अर्थात त्याचा मला पुढील आयुष्यात बराच फायदाही झालाच.

छान लिहिलंय, लेख आवडला!

ऋतु हिरवा's picture

29 Oct 2019 - 10:52 pm | ऋतु हिरवा

चांगला आहे. गुरुविण नाही दुजा आधार ..हेच खरे ....तबला शिकवणाऱ्या गुरूंचे नाव नाही सांगितले

मार्गदर्शक आणि शिक्षक या अर्थाने जर म्हणायचे तर एक दोन "गुरु" भेटले पण त्यामागे जो अध्यात्मिक गुरु या sanye मागे जो "भक्ती भाव" पूर्ण श्रद्धा वैगरे असते तश्या अर्थाने अजिबात नाही.
- शाळेत असताना मराठी ची गोडी लावणारे आठवले मास्तर + सुट्टीत वाचनालयात पुस्तक वाचायला मदत करणारे ग्रंथपाल
- तर्क वापरून विचार करायला शिकवणारे वडील
- १० वि नंतर लवकर पैसे मिळवण्यासाठी ( त्याकाळी) परदेशी जायचे हे वेड असताना त्यासाठी "जरा आधी नीट इंग्रजी बोल आणि वाच " असा सल्ला देणारे वडिलांचे मित्र
वेळ मिळाला तर पुढे अध्यात्म वैगरे वाचीन पण कोणा गुरु चा शिष्य वैगरे होण्याची सुतराम शक्यता नाही . आणि तशी गरज हि भासत नाही,, अर्थात कोणी म्हणेल हा झाला उदद्दम पणा ( विचारांचा) आणि अडचणीत आलात कि आठवेल गुरु वैगरे... तसे काही वाटत नाही शेवटी मरायचे आहेच कि! यातना कमी करण्यासाठी काय करावे लागेल ते मात्र परीक्षा घेणार असते ,, त्यावेळी जरी कोणी मार्गदर्शक भेटला / भेटली तरी त्या व्यक्तीला मी "गुरु" हि उपाधी कधीच देणार नाही

जेम्स वांड's picture

5 Nov 2019 - 10:55 am | जेम्स वांड

सद्गुरू विना सापडेना सोय कुठं शोधावे ते पाय... पटल्याशिवाय राहत नाही. माझं माझ्यापुरता विचार करता माझा सगळ्यात मोठा गुरू होता अपयश. खेडेगावात प्राथमिक, तालुक्याला माध्यमिक आणि उच्च-माध्यमिक आणि पुण्यात अभियांत्रिकी करताना अपयश आले, इंजिनीयर होताना दोन वर्षे वायडी झालो, त्या दोनवर्षात कॉम्पुटरचे हार्डवेअर विकणे ते निरुद्देश्य भटकणे सगळे केले, चार नवी माणसे (शैक्षणिक परिघातली सोडून) भेटली, 'कस्टमर' 'पटवायचा' असेल तर भिडस्तपणा उपयोगी नाही हे शिकलो, डोक्यात अभियांत्रिकी असूनही फक्त इंग्रजी कच्चे असणे पदवीवर बेतणे झाले होते त्यामुळे जिद्दीने रेन अँड मार्टिन आणून इंग्रजी शिकलो, घरी बसून शेती केली, सगळ्या शिक्षणाचा अनुभव आज कामी येतोय. अपयश मुख्य काही करत असेल तर जगाच्या विद्यापीठात ऍडमिशन मिळवून देते, माणसे ओळखणे, लकबी पकडणे शिकवते शिते पाहून जमलेली भुते आणि सच्चे मित्र ह्यातला फरक समजवते, माझे गुरू माझे अपयश म्हणूनच मला खूप काही शिकवून गेले इतकेच म्हणून आता थांबतो

(स्मरणरंजित भावविभोर) वांडो

श्वेता२४'s picture

5 Nov 2019 - 12:06 pm | श्वेता२४

आयुष्यात कोण काय शिकवून जाईल सांगता येत नाही. प्रामाणिक लेख. आवडला.

पद्मावति's picture

5 Nov 2019 - 12:21 pm | पद्मावति

लेख आवडला.

मुक्त विहारि's picture

19 Nov 2019 - 5:33 pm | मुक्त विहारि

गुरु हा फक्त मार्ग दाखवतो.

पण गुरूच्या फार आहारी गेलात तर ती व्यक्ती पूजाच होते.

आणि कुठल्याही प्रकारची व्यक्ती पुजा ही घातकच ठरते.

गोंदवलेकर महाराजांचे शिष्य किती त्रास देतात हे अनुभवलं आहे.

सोपं उदा घ्या, आईने तुम्हाला सांगितले आगी पासून दूर रहा रे तर तुम्ही ते ऐकता काय ? उत्तर नाही असेच आहे, आपण जन्मदात्रीवरही विश्वास ठेवत नाही मग ती आपल्या भल्यासाठी का बोलत असेना. कारण आपल्या मनाची रचना ऐकीव ज्ञान वा बोलबच्चनगिरी न्हवे तर अनुभवातून उत्क्रांत व्हायला झाली आहे.

म्हणूनच आगीपासून दूर रहा म्हटल्यावर ते जास्त जोमाने आगीस स्पर्श करू पाहते, आणी एकदा चटका बसला की आपसुक हात मागे येतो आणि पुढील वेळेस आईने आपल्याला सूचना द्यायची गरजच उरलेली नसते कारण आता आपण शिकलेले असतो.

अर्थात हा चटका बसतानाचा अनुभव ट्रॉमा किती मोठा/तीव्र यावर आपले मन आईची गुलामी स्वीकारावी की नाही याचा निर्णय घेते. आणी जर तिला गुरूपद बहाल केले तर मागील ट्रॉमाचा अनुभव पाठीशी असल्याने तिच्या सर्व आज्ञा निमूटपणे पाळणे सुरू करते यात अंधविश्वास निर्माण होऊन आपले नुकसानच होण्याचा फार मोठा धोका असतो. म्हणून आपले नैसर्गिक गुरुपद दुसऱ्याला बहाल करणे सर्वात धोकादायक बाब होय. जशी प्रत्येकाने आपली झोप स्वतः घ्यायची असते तसेच आपले गुरू आपणच असू शकतो हे वास्तवही निर्भयपणे स्वीकारायचे असते भित्रे लोक तसेही इतराना गुरू करूनही मातीच खातात, सफल आयुष्य म्हणजे चुका न करणे न्हवे तर आशा चुका करणे ज्या फक्त आणी फक्त आपल्या असतील व कोणत्याही पूर्व तत्वज्ञानाशी, संस्कारांशी बांधील नसतील.

ही बाब सर्वच गोष्टीत व आई सोडून इतर सर्व व्यक्ती व नात्यांनाही लागू होते. तेव्हां गुरू बाबत सावध व्हा. जे तुम्ही आहात ते इतर कोणी आहेत ह्या भ्रमात जगू नका.

तुम्ही गुलामी स्वीकारू शकता शिष्यत्व नाही, ती रचनाच मानवात अस्तित्वात नाही.

गौरीबाई गोवेकर नवीन's picture

21 Nov 2019 - 6:14 pm | गौरीबाई गोवेकर नवीन

या प्रांजळ, सुरेख लेखाबद्दल धन्यवाद.