शांती आवेदना सदन

Primary tabs

नूतन सावंत's picture
नूतन सावंत in दिवाळी अंक
25 Oct 2019 - 6:00 am


मिपा दिवाळी अंक  २०१९

अनुक्रमणिका
शांती आवेदना सदन
.

तुमचा योगायोगांवर विश्वास आहे का? माझा आहे. कारण ज्या लोकांना सामान्य लोक भेटू शकत नाहीत, अशा खूप मोठमोठया व्यक्तींना - ज्यांना आपण महत्त्वाच्या व्यक्ती किंवा अतिमहत्त्वाच्या व्यक्ती म्हणतो- जवळून पाहण्याची, भेटण्याची संधी मला मिळाली आहे. त्यातलेच एक म्हणजे संत पोप जॉन पॉल (दुसरे).


IMG-20191007-WA0005


यांनी १ ते १० फेब्रुवारी १९८६ला भारताला भेट दिली होती. संतपदाला पोहोचलेली ही व्यक्ती. त्या वेळी त्यांच्या मुंबईभेटीत त्यांच्या दर्शनाचा योग आला होता. माझ्यासारख्या साधारण व्यक्तीला त्यांचे दर्शन आणि आशीर्वाद मिळणे हाच एक चमत्कार होता. त्या भेटीच्या वेळी मुंबई विमानतळावर व्ही.आय.पी. लाउंजमध्ये मी त्यांचे चरणस्पर्श करून त्यांना नमस्कार केला होता आणि माझ्या मस्तकाला हस्तस्पर्श करून त्यांनी मला आशीर्वाद दिला होता.

आणि *शांती आवेदना सदन*मध्ये त्यांच्या देणगीतून बांधलेल्या, शेवटचा श्वास घेणार्‍या लोकांसाठी बांधलेल्या खोलीमध्ये माझ्या पपांनी शांतपणे शेवटचा श्वास घेतला. एका क्षणी ते होते आणि दुसऱ्या क्षणी नव्हते. वांद्रे पश्चिम येथे माउंट मेरी चर्चच्या उजवीकडच्या दरवाजासमोरच्या बाजूला रस्ता ओलांडला की शांती आवेदना ट्रस्टचे हे हॉस्पिटल आहे.

हे हॉस्पिटल कॅन्सरच्या तिसऱ्या स्टेजमधल्या लोकांसाठी आहे. ज्यांची सेवाशुश्रुषा घरी करणे अशक्य आहे, अशा रुग्णांना इथे प्रवेश दिला जातो. टाटा आणि इतर कॅन्सरसंबंधित हॉस्पिटल्स इतर इलाज थकले की या शुश्रुुषालयाची शिफारस करून तिथे दाखल होण्याचा सल्ला देतात. तिसऱ्या अवस्थेतील रुग्णाचे कागदपत्र पाहून हॉस्पिटलमध्ये दाखल करून घेतले जाते, स्वतः रुग्णही दाखल होऊ शकतो.

मी स्वतः मुंबईत जन्मले आणि वाढले, तरी आणि कितीतरी वेळा माउंट मेरीला गेले, तरी शांती आवेदना सदन हे एक हॉस्पिटल आहे असे कधी वाटलेच नाही. टुमदार दुमजली पांढरीशुभ्र, शांत इमारत झाडापेडांमध्ये लपलेली दिसायची - आता एक्स्टेन्शनही झाले आहे - बाहेरच्या वर्दळीशी कसलाही संबंध नसल्यासारखी. कारण तिथल्या भेटीच्या वेळा ठरलेल्या होत्या. पण अर्थातच हेही नंतरच समजले.

हे एक हॉस्पिटल आहे, इतकेच कधीतरी समजले होते. पण कसले? कोणते? याचा काहीच पत्ता नव्हता. तो पत्ता कसा लागला, हे सांगण्याआधी थोडा इतिहास सांगणे गरजेचे आहे.

सुपारीच्या खांडाचेही व्यसन नसलेल्या माझ्या वडिलांना सिऱ्हॉसिससारखा आजार झाला, तोही केवळ अतिरिक्त चहापानामुळे. त्याचे असे झाले - माझ्या पपांचा वर्तमानपत्र विकण्याचा व्यवसाय होता. ते पहाटे साडेचारला घर सोडत आणि दुपारी अडीचला घरी येत. आल्यावर जेवण व्हायचे.

सकाळी एकदा आई नाश्ता पाठवीत असे आणि नंतर ते तासातासाने चहा मागवीत आणि घेत, तोही अर्धा कपच. अर्धा कप जो कोणी हजर असेल त्याच्यासह घेत असत. पण नुसताच चहा, त्याच्याबरोबर काही नाही. त्यामुळे वारंवार अ‍ॅसिडिटीचा त्रास होऊ लागला, मळमळ सुटू लागली, मळमळ सुटली की ते लिंबाचा रस पाण्यातून मीठ, मिरपूड घालून घेत. पुन्हा येरे माझ्या मागल्या.

त्यातून नंतर कावीळ झाली. डॉक्टरांचे औषध चालू झाले की पथ्यपाणी काटेकोर सांभाळून बरेही वाटायचे. अशी तीनदा कावीळ झाली आणि एक दिवस दोन्ही मार्गांनी रक्त पडायला लागले.

डॉ. बचा नर्सिंग होममध्ये वहिनी ओ.टी. नर्स होती. तिने लागलीच तिथे दाखल केले. डॉ. एस.एम. बंदूकवाला, फिजिशियन आणि डॉ. हितेश मेहता, एंडॉलॉजिस्ट यांचे उपचार चालू झाले. दोघांशीही घरगुती संबंध असल्याने हा माणूस दारू पीत नाही याची त्यांनाही कल्पना होती. पण तरीही त्यांनी चौकशी केली की चोरून वगैरे पितात का?

पण जेव्हा आम्ही सगळेच सांगतोय की, या माणसाला सुपारीच्या खांडाचेही व्यसन नाही, तेव्हा त्यांनी दुसरा विचार करायला सुरुवात केली. मग असे का झाले असावे? दिनचर्या काय? तिथे काय खाणेपिणे असते? असे प्रश्न आले. त्यांच्या उत्तरातून जागरण आणि चहाचे दुष्परिणाम दिसायला लागले.

डिस्चार्ज देताना डॉक्टरांनी त्यांचे मत दिले, "हा पेशंट जास्तीत जास्त सहा महिने जगेल, तोही कडक पथ्य करूनच." आम्ही कोलडलोच. पण पपा निश्चयी होते, त्यामुळे ते ठाम होते. त्यांनतर औषधे आणि पथ्य चालू झाले.

पथ्य काय? तर सेरेलॅक कोमट पाण्यात कालवून, मऊ उकडलेला बटाटा आणि वरणाचे गाळलेले अळणी पाणी असा नवजात बाळाचा आहार बहात्तर वर्षांच्या माणसाला चालू झाला. चहा तर नुसता प्यायचा नाही, इतर काही खायला बंदी. त्यामुळे चहाही बंद. गाईचे दूध देता येईल, पण जर गाईच्या दुधात काविळीचे जंतू असतील, तर ते दूध कितीही उकळले तरी ते मरत नाहीत, त्यामुळे तेही देणे धोकादायकच होते. म्हशीचे दूधही पचू शकणार नव्हते, त्यामुळे तेही नाही.

डॉ. हितेश मेहता म्हणाले, "हे फार कठीण आहे. औषधेही सांभाळून द्यावी लागतील. बाहेर काही खाऊ देऊ नका. आमच्यासाठीही ही अशी केस पहिल्यांदाच समोर आली आहे. आमच्यासाठी आणि तुमच्यासाठीसुद्धा चॅलेंज आहे हे." पण माझे पपा किती निश्चयी आहेत याची कल्पना असल्याने आम्ही थोडे सावरलो.

सहा महिन्यांत दर महिन्याला डॉक्टर सोनोग्राफी करून त्यावर औषधयोजना ठरवत. एंडोग्राफी करणे टाळत होते, कारण पपा अशक्त झाल्यामुळे त्यात धोका होता. डॉ़. हितेश मेहता हे अतिशय काळजीपूर्वक, डॉ. बंदूकवाला यांच्याशी चर्चा करून औषधे ठरवत असत. आहार मात्र तोच होता.

सहा महिने उलटले. नंतरच्या सोनोग्राफीवेळी ते म्हणाले, "पपा, तुमच्यासारखा, इतकं कडक पथ्य पाळणारा पेशंट मी पाहिला नाही. तुम्ही माझं निदान खोटं ठरवलंत, याचा मला फार आनंद आहे. पण अजूनही दिल्ली बहुत दूर हैं।"

मग हाच आहार आणि हेच पथ्य चालू ठेवले. असे वर्ष उलटले. सेरेलॅक, उकडलेला बटाटा आणि वरणाचे अळणी पाणी असा लहान बाळाचा आहार मोठ्या माणसाला किती त्रासदायक होत असेल? याचे कारण म्हणजे, लहान बाळाला फक्त भुकेची भावना असते, त्याला चवी कळत नसतात. पण बहात्तर वर्षाच्या माझ्या पपांना आईसारखी सुगरण बायको आणि माझ्यासारखी सुगरण मुलगी असल्यावर त्यांचे टेस्टबड्स चवीला किती सोकावलेले असतील, याची निव्वळ कल्पनाच केलेली बरी.

रात्रीतरी सगळ्यांनी एकत्र जेवायचे या त्यांच्या नियमानुसार ते रात्री सगळ्यांबरोबरच जेवायचे. पण हूं की चूं न करता आपला आहार घ्यायचे. आम्हाला कितीही वाईट वाटले तर तेच आम्हाला समजवायचे. म्हणायचे, "पपा हवाय ना तुम्हाला? मग माझ्या मुलांसाठी मला हे केलं पाहिजे. तुम्ही तुम्हाला करता येण्यासारखं करताच आहात की माझ्यासाठी.''

एक वर्षाने त्यांना भरडी शिजवून द्यायला परवानगी मिळाली, त्यात फक्त एक थेंब तुपाचा घालून. बाकी उकडलेला बटाटा, वरणाचे पाणी याच्या जोडीला प्रत्येकी दोन चमचे नारळपाणी आणि मोसंबीचा गाळलेला रस आले.

अशी सहा वर्षे गेली. नंतर त्यांचे पोटॅशियम कमी होऊ लागले, त्यामुळे अर्ध्या ग्लासपर्यंत वाढलेले नारळपाणी आणि मोसंबीचा रसही बंद झाला. वेगळी औषधे सोसेनात. पोटॅशियम वाढले की फक्त डोळ्यांची हालचाल सुरू असायची, बाकी काहीच समजायचे नाही. नुसते टकाटका पाहत राहायचे, हालचाल तर करताच येत नसे. मग हॉस्पिटलमध्ये न्यायला लागायचे. दोनतीन दिवस तिथला पाहुणचार - म्हणजे फक्त सलाइनवाटे औषधे घेऊन परत यायचे.

शेवटी डॉक्टरांनी सगळी औषधे बंद केली. म्हणाले, "आता त्यांना काय हवं ते खायला द्या. आता जास्त दिवस नाहीत. त्यांचं शरीर थकलं आहे, जितके दिवस जातील तितके जातील."

हबकलेली मी, त्या दिवशी घरी जाताना संदेशची जिलबी घेऊन गेले. बाकीच्यांना देताना पपांना सहजगत्या विचारतेय असे भासवत विचारले, "पपा, खाणार का थोडीशी?" ते समजून गेले आणि म्हणाले, "किती दिवस राहिलेत म्हणाले डॉक्टर?"

मी आतून हललेच. पण काही न दर्शवता म्हणाले, "डॉक्टर तर म्हणाले होते की तुम्ही सहाच महिने काढाल म्हणून, पण तुम्ही त्यांना खोटंच ठरवलंत. आता तुम्ही पचवू शकाल सगळं, म्हणून तर आता सगळी औषधं बंद केलीत." खूप तिखट, तेलकट नसलेलं साधं जेवण चालू झालं, तरीही चारच दिवसांत पोट फुगलं. मोशन पास होईना. डाव्या किडनीच्या वरच्या बाजूला वेदना होऊ लागल्या.

पुन्हा डॉ. मेहतांना फोन केला, ते त्या वेळी लीलावती हॉस्पिटलमध्ये होते, तिथे गेलो. कारण क्लिनिक ऑपेरा हाउसला आणि तिथली वेळ होती दुपारी साडेतीनची. आणि तेव्हा पपा धाकट्या भावाच्या घरी वांद्रे पूर्वेलाच होते. आय.सी.यू.मध्ये दाखल झाले. तिथे ए्क्सरेमध्येच दिसले की किडनीवर मोठी गाठ आहे.

डॉ. मेहता म्हणाले, "नीडल टाकण्यासारखी परिस्थिती नाही, त्यांना सहन होणार नाही. ऑपरेशन टेबलवरच काहीतरी होऊ शकेल, तर बायोप्सी करता येणार नाही. मी आता काही औषधं देतो, तुम्ही घरीच घेऊन जा. कारण आता काहीच करण्यासारखं नाही."

म्हटले, "घरी न्यायला हरकत नाही. आई, मी आणि माझे दोन्ही भाऊ त्यांची सर्व सेवा करू शकतो. मोशन झाले तर काढू शकतो, पण आतासारखीच परिस्थिती आली तर पुन्हा इथेच यावं लागेल. त्यांना मेडिकल अटेन्शनची गरज आहे, घरी नर्स ठेवली तरी डॉक्टर लागणारच. तशी वहिनी तर आहेच. तर मला काहीतरी मार्ग सुचवा, प्लीज."

मग त्यांनी शांती आवेदना सदन या हॉस्पिटलची माहिती दिली, तिथल्या डॉक्टरांसाठी एक सविस्तर पत्र लिहून दिले. कारण कोणत्याही टेस्ट्स करणे अशक्य होते. ते घेऊन मी तिथल्या डॉक्टरांना भेटले आणि एक नवेच विश्व माझ्यासाठी खुले झाले. कॅन्सरसंबंधित कोणत्याही प्रकारच्या तपासणीचे कागदपत्र - अगदी पहिल्या निदानाचेही - नसताना माझ्या पपांना तिथे दाखल करून घेण्यात आले, हाही एक चमत्कारच होता.

शांती आवेदना सदन हॉस्पिटल म्हणजे दुमजली सुंदर इमारत, सगळ्या बाजूंनी सुंदर बाग, जी रुग्णांनी आणि नर्सेसनी बनवली आहे. एका बाजूला माउंट मेरी चर्च, तर दुसऱ्या बाजूला उंचावर असल्याने खाली दिसणारा बँड स्टॅण्डचा अफाट समुद्र. मोठ्या आकाराच्या खिडक्यांतून येणारी समुद्रावरच्या ओझोनयुक्त वाऱ्याने समद्ध आणि शुद्ध हवा, कमालीची स्वच्छता. नम्र आणि हसतमुख सेवकवर्ग. रुग्णाला घरच्याप्रमाणे नावाने हाक मारणारे डॉक्टरगण. मरत्या जिवाला प्रथमदर्शनी तरी दिलासा मिळणारे वातावरण...
...


मृत्यूचा दिवस माहीत नसणे हे किती सुखावह असते. जो जन्माला आला त्याला मृत्यू तर येणारच असतो. पण ज्यांना येत्या काही दिवसातच आपण मरणार आहोत याची सतत टोचणी असते, त्यांचे काय? त्यात काही रुग्णांचे नातेवाईकही जवळ नसत. तरीही अशा वातावरणात आपल्या दुःखाचा आणि दुखण्याचा थोडा काळ तरी विसर पडत असावा.

माझे पपा तिथे चौदा दिवस होते आणि त्यांनी माझ्या समोरच शेवटचा श्वास घेतला. आम्ही सतत त्यांच्यासोबत होतो. आई, भाऊ, माझे मामा आणि दोन मामेभाऊ यापैकी कोणीतरी एक पपांजवळ आणि बाकीचे तिथल्या वेटिंग एरियात बसत होतो. तिथले आयुष्य तिथल्या रुग्णांबरोबर आणि कर्मचारी वर्गाबरोबर पाहत होतो, जगत होतो. आपण या प्रेमळ जगाबाबत किती अज्ञानी आहोत याची खंत करत होतो आणि त्यांना त्यांच्या कामात आमची मदत लागली तर करत होतो. कारण बऱ्याच रुग्णांसमवेत त्यांच्य घरचे कोणी नव्हते. तिथल्या डॉ़टर जोसेफाईन पपांना म्हणायच्या, "नारायण, तू बहुत लकी हैं। तुम्हारे पास इतने लोग अपना कामधंदा छोडके जैसे ऑफिसमें ड्युटीपर जाता हैं, वैसे इधर आके बैठता हैं। यहाँ एक आदमीभी मुश्कील से रुकता हैं किसी किसी के पास। तू बहुतही लकी हैं।"पपा मंद हसायचे, खळखळून हसण्याची शक्तीही त्या जिवाकडे नव्हती.

कॅन्सर झालेल्या रुग्णांच्या उपचारांचा खर्च नातेवाइकांना मेटाकुटीला आणणारा असतो. शिवाय मुंबईत राहण्याची सोय नसलेले नातेवाईकही जास्तच टेकीला आलेले असतात. काही बाहेरगावचे लोक तर नाइलाजाने आपले रुग्ण इथे सोडूनच जातात. त्यात त्यांचा काहीच दोष नसतो, कारण त्यांच्या घरी त्यांच्या इतर जबाबदाऱ्या पाहायला दुसरे कोणी नसतात. जेवण, कपडे, औषध हेदेखील रुग्णाला इथूनच दिले जाते. रुग्णांना आवश्यक असलेले सर्व पोषक अन्न, प्रोटीन, दूध इथे दिले जाते. ज्यांना शाकाहारी जेवण हवे असेल, त्यांना शाकाहारीच आणि ज्यांना मांसाहारी जेवण हवे असेल त्यांना मांसाहारी जेवण दिले जाते. इतकेच नव्हे, तर रुग्णाच्या आवडीचे खाद्यही त्याला दिले जाते.

पण घरचेे कोणी नसले तरी इथे अतिशय उत्तम रीतीने त्या पेशंटची काळजी घेतली जाते आणि तीही विनामूल्य. इथे करोडपती आणि रोडपती एकाच मापात असतात. ज्यांच्याकडे पैसे आहेत आणि पैसे नाहीत असे दोघेही शेजारी शेजारी बेडवर असतात. दोघांनाही कसलेही चार्जेस आकारले जात नाहीत. दोन वेळचा नाश्ता, जेवण, फळे फुकट. तुम्हाला हवे तर देणगी द्या, नाही देता आली तरी हरकत नाही. 'परदु:ख शीतळ' नसलेले काही लोक स्वतःची सेवा देण्यासाठी तिथे आठवड्यातले काही दिवस नित्यनेमाने येत असतात. रुग्णांना पुस्तके वाचून दाखवणे, बैठे खेळ खेळणे, भरवणे, नुसत्या गप्पा मारणे अशी कामे करत असतात. त्यात ज्यांच्या तोंडाच्या शस्त्रक्रिया झाल्या आहेत त्यांच्याशी गप्पा मारणे म्हणजे सगळ्यात कठीण काम. त्या रुग्णांचे बोलणे ऐकणे, त्यांचे अडखळत येणारे शब्द समजून घेऊन त्यावर प्रतिक्रिया देणे हे जरी सोपे असले, तरी त्यांची विरूपता लक्षात न घेता त्यांच्यासमोर बसणे, कारण दर चार, आठ, पंधरा दिवसांनी रुग्ण बदललेला असतो म्हणजे सवयीचा भागही त्यात येत नाही. हीच एक तपश्चर्या आहे.

त्यातून ज्या माणसाला आपला काही दिवसातच येणार मृत्यू माहीत असतो, त्याला पूर्वायुष्यात केलेल्या चुका आठवून त्रास होत असतो, कोणाकडे तरी या चुका बोलून दाखवाव्यात असे वाटते. पण कधी कधी त्या संबंधित व्यक्तीशी बोलणे शक्य नसते. अशा वेळी अशी माणसे त्रयस्थ व्यक्तीजवळ बोलून आपला गिल्टी कॉन्शस विसरायचा प्रयत्न करत असतात. त्यामुळे गप्पा मारणे हेही एक महत्त्वाचे काम इथे सेवा देणारे करू शकतात.

आम्हीही दुसऱ्या दिवसापासूनच अशी कामे करायला सुरुवत केली. तिथे अवघ्या एकवीस वर्षांचा मोहम्मद भेटला, तसाच एक्कावन वर्षांचा रमाकांतही भेटला. गुटखा खाल्ल्यामुळे मोहम्मदला तोंडाचा कॅन्सर झाला होता, त्याची तीन ऑपरेशन्स झाली होती. त्याचं लग्नही झालं होतं, पण या सगळ्याला घाबरून त्याची बायको एक वर्षातच त्याला सोडून माहेरी पळून गेली होती. आता हाच एकवीस वर्षांचा, तर बायको किती लहान असेल? त्याच्या गळ्याचे ऑपरेशन झाले होते. त्याच्या गळ्याला इतके मोठे बँडेज असायचे की त्याची हनुवटी आणि एक बाजूचा कानही त्यात बुडून जात असे. त्याला आवडते म्हणून त्याची वहिनी चिकन करून पाठवत असे. त्याचे जेवण झाले की तिथल्या नर्स येऊन म्हणत, "चलो, महंमद, बँडेज बदलेंगे।"

ते भले मोठे बँडेज दिवसातून कमीतकमी चार वेळा बदलावे लागत असे, कारण त्याचे अन्न त्या जखमेत अडकून राहत असे. त्याला जंतुसंसर्ग होऊन त्याचा त्रास वाढू नये म्हणून ही काळजी घेतली जायची. तो उत्कृष्ट शिंपी होता. तिथल्या शिवण विभागात हौसेने काम करायचा. नर्सेसचे, पेशंट्सचे युनिफॉर्म शिवायचा. मला म्हणायचा, "दीदी, मुझे सूटका कपडा ला दो। मैं एक दिनमें सिलाके दूँगा आपके लिये।"

रमाकांतला तंबाखूचे व्यसन असल्याने अन्ननलिकेचा कॅन्सर झाला होता. तो तोंडाने काहीही खाऊ शकायचा नाही. पोटात डायरेक्ट नळी घातलेली, फनेल लावून त्यातून जे द्रव पदार्थ जातील तेच. चाळीसगाव या मूळ गावाहून तो मुंबईत उपचारासाठी आला. त्याचे नातेवाईक त्याला इथे सोडून गेले होते. दोनदा तो पळून गेला, विदाऊट तिकीट घरी चाळीसगवला पोहोचला, पण एक-दोन दिवसांतच त्याच्या घरच्यांनी त्याला इथे आणून सोडला. शेवटी मेट्रन त्याला म्हणाल्या, "क्या हम तेरा सगावाला नही हैं क्या? हम तुम्हारा सबकुछ करेगा ना।" तो तोंडाने काही खाऊ शकत नसला, तरी वॉचमनकडे मागून तंबाखू खात असे. मेट्रन रागावल्या की म्हणायचा, "आता जीभ तेवढीच चव ओळखते. माझं आता अजून काय वाईट व्हायचं राहिलंय."

त्याने माझ्या धाकट्या भावाला सांगितलं होतं, "भाऊ, मला जर घरचे लोक घेऊन गेले नाहीत तर मला शेवटचा निरोप तू देशील का? हे लोक ना, करतील सगळं शेवटी, पण त्यांच्या धर्माप्रमाणे करतील." आपण मेलं जग बुडालं ही म्हण त्याच्या कानावरून गेली होती की नाही माहीत नाही. मृत्यू झाल्यावरही तो आपल्यावर होणारे संस्कार आपल्या धर्माप्रमाणे होतील याची खातरी करून घेत होता.

"अरे, तुला काय होणार आहे?" अशी त्याची खोटी समजूतही काढता आली नसती. माझ्या भावाने त्याला हवे तसे कबूल केले. रमाकांतने मेट्रनना आणि डॉक्टरना याची कल्पना दिली आणि तसे दोघांनीही लेखी लिहून दिले. पपा गेल्यावर महिनाभराने तो गेला. नशिबाने त्याच्या घरचे लोक आले होते, पण मेट्रननी माझ्या भावालाही कळवले होते. त्याचे अंत्यसंस्कार मुंबईतच झाले आणि त्याला माझा धाकटा भाऊ सुनील हजर होता. त्याच्या पुढाकारानेच हे अंत्यसंस्कार पार पडले, कारण नातेवाइकांना इथली काही माहिती नव्हती. 'आंतरकोsपि हेतु:'असेच असतील का? हा माणूस माझ्या अंत्यसंस्काराची सगळी काळजी घेईल याची अंतर्खूण रामाकांतला कशी पटली असेल?

असाच एक बेड सोडून होता, अशोक बोरकर. ३८ वर्षाचा फक्त. सुंदर बायको, दोन लहान मुले असलेला अशोकही निर्व्यसनी होता. पण त्याला ब्लड कॅन्सर झाला होता. ब्लड कॅन्सरशी लढा देऊन थकलेला. मुले, बायको, आई यांच्या काळजीने पोखरणारा आणि सदा कष्टी दिसणारा. तो माझगाव डॉकमध्ये वरच्या हुद्द्यावर काम करीत होता. पैशाची अडचण नव्हती.

अशोकची बायको अतिशय सुंदर, शांत सौंदर्यवती होती. गोरीपान, नाक चाफेकळी, दात मोत्यांसारखे असलेली वहिनी थोडी हसली की तिचा चेहरा उजळून जात असे. पण असे योग विरळाच असत. अगदी सध्या प्रिंटेड वायल नेसत असे. कसलाही मेकअप नाही. फक्त एक टिकली कपाळावर असे. गळ्यात गाठवलेले मंगळसूत्र, कानात छोटे बुंदके, हातात एक एक सोन्याची बांगडी आणि तिच्या आगेमागे दोन दोन काचेच्या हिरव्या बांगड्या. अतिशय अबोलपणे पण अत्यंत प्रेमाने ती त्याची सेवा करत असायची. तो मात्र उखडलेलाच असे. त्याची कामे करून झाली की ती त्याच्या पायथ्याशी टेबलावर बसून त्याचा चेहरा निरखीत बसे. तो बरेचदा डोळे मिटूनच पडलेला असे.

रुग्णालयात रुणांच्या नातेवाइकांमध्येही मैत्रीचा एक धागा प्रथम भेटीतच गुंफला जातो, तसा तिच्या-माझ्यात गुंफला गेला होता. त्यातून माझी आई चौकस स्वभावाची असल्याने कुठूनतरी दूरचे नातेही निघाले होते. त्यामुळे आम्ही सगळे तिला "वहिनी" अशी हाक मारत असू. तिला मोकळीक मिळावी म्हणून, माझे भाऊही त्याच्यासोबत राहत. माझे भाऊ रात्री पपांसोबत असायचे, तर त्याचीही काळजी घ्यायचे. मग ती कधीतरी एखाद्या रात्री लहान मुलांजवळ घरी जाऊ शके.

तो मात्र कष्टीच असे, काहीच बोलत नसे. एकदा वॉर्डबाहेरच्या कॉरिडॉरमध्ये मेट्रन थोड्या कठोरपणे तिला म्हणत होत्या, "क्यूँ सुनती नहीं उसका? उसकी आखिरी विश तो तूही पूरी कर सकती हैं ना?" यावर ती रडायलाच लागली. मी भांबावून थबकले, तर माझ्याकडे पाहून मेट्रन थोड्या हताशपणे म्हणाल्या, "इसको कुछ तो समझाव तुम्हारी भाषामें।"

मी तिला गप्प करून त्याची काय इच्छा आहे ते विचारले. अतिशय उदासपणे तिने मला त्याच्या इच्छेविषयी सांगितले. त्याची एकच, पण अगदी साधी इच्छा होती - 'आता मी आहे तर माझी बायको लंकेच्या पार्वतीसारखी राहतेय, मी गेल्यावर प्रश्नच नाही. पण मी आहे तोपर्यंत तरी तिने चांगले कपडे, दागिने, फुलं, गजरे ल्यावेत.' पण ती अगदी साधी राहत असे, म्हणूनच तो जास्त नाराज होता.

मीही अगदीच बावळटासारखे विचारले, "मग तू का तसं करत नाहीस? आता तर घरी जाऊ शकतेस ना? मग ये की नीट तयार होऊन."

त्यावर तिला पुन्हा हुंदका फुटला. रडत, अडखळत तिने जे सांगितले, त्याचा मथितार्थ असा होता - त्यांचा प्रेमविवाह झाल्याने आधीच सासूला नकोशी होती आणि आता त्याच्या आजारपणाचे खापर तिच्या कमनशिबावर फुटत होते. 'गोरीगोमटी न कपाळकरंटी' असे सासू सतत हिणवत असे. माहेरचा आधारही नव्हता. शेवटी ती म्हणाली, "दागिने, फुलं, गजरे तर दूरच, पण चांगली साडी नेसली तरी सासूबाई घालून पाडून बोलतात. म्हणतात, तिकडे माझा मुलगा मरतोय नि इकडे हिला नखरे सुचताहेत. मग मी काय करू गं ताई?"

"तू इथे घेऊन ये ना आणि इथे बदल." ताईचा सल्ला.
"तेसुद्धा केलं गं ताई, पण इथे लोक येतात ना भेटायला, ते चुगल्या करतात." या तिच्या बोलण्यावर मीच हतबल झाले. किती नीच मनोवृत्तीचे असतात लोक! एका विवाहितेने तिच्या नवऱ्याच्या शेवटच्या इच्छेखातरसुद्धा शृंगार करू नये? हा विचार काही केल्या पाठ सोडेना.

पपांना दाखल करून दहा दिवस झाले होते. दसरा उद्यावर आला. कधी शुद्धीत तर कधी बेशुद्धीत असे पपा असत. पण त्या दिवशी त्यांनी मला मेनू सांगितला, त्याप्रमाणे डबे करून घेतले. डोक्यात अशोक आणि वहिनी घोळत होते. अचानक एक युक्ती सुचली. त्याप्रमाणे मी माझी साडी, ब्लाउज, सुईदोरा, दागिने, मेकअपचे साहित्य आणि वाटेत गजरे घेऊन हॉस्पिटलमध्ये आले. मेट्रनना कल्पना दिली, त्याही खूश झाल्या आणि त्यांची खोली वापरायला दिली. मग आईने ब्लाउजला दोरे घातले. तोपर्यंत मी गजऱ्यांनी सजवून तिची केशरचना केली, माफक मेकअप केला. साडी बदलायला लावली. दागिने घालायला लावले. आधी ती तयारच नव्हती, पण आईनेही तिला समजावले तेव्हा ती तयार झाली.

एक बाजूने आईने आणि दुसऱ्या बाजूने मेट्रननी तिला अशोकच्या समोर आणले, तेव्हा त्याच्या डोळ्यात आलेली चमक आणि ओठावरचे हसू मी जीवनात कधीच विसरू शकणार नाही. हळूहळू त्याचे आणि आमचेही डोळे भरून आले. वॉर्डमधले सगळेच जणू मुलगी सासरी जात असल्यासारखे रडत होते. वहिनी अशोकच्या अंगावर कोसळलीच. दोघेही हुंदके देत रडत होते. मेट्रननी खूण करून अशोकच्या बेडभोवती पडदे लावायची खूण केली. नेहमीच सिरियस पेशंटच्या भोवती जड होऊन लागणारे पडदे तेव्हा आनंदाने सर्रकन लागले. काही वेळाने पडदा उघडून सलज्ज मुद्रेने वहिनी, अशोक बोलावत आहे असे सांगत आली. त्याने मला बोलावून माझा हात हातात घेतला आणि तो म्हणाला, "ताई, तू माझी इच्छा पूर्ण केलीस, माझा जीव तगमगत होता तो तू शांत केलास. आता आणखी एक कर, हिला फोटो स्टुडिओत नेऊन हिचा एक अर्जंट फोटो काढून आण. त्या फोटोवरच मी समाधानी राहीन." लगेच तसे केले आणि त्याला फोटो आणून दिला. त्यांनतर मात्र तो हसताना दिसायचा.

त्या दिवशी मेट्रनच्या परवानगीने आम्ही सगळ्यांनी पपांच्या बेडभोवती उभे राहून का होईना, त्यांच्यासह शेवटच्या दसऱ्याचे जेवण घेतले आणि दसरा साजरा केला. त्यांनतर दोनच दिवसांनी पपांना पोप जॉन पॉल याच्या देणगीतून बांधलेल्या त्या खास खोलीत हलवण्यात आले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी सात ऑक्टोबर २००३ला पपा गेले.IMG-20191007-WA0006

डावीकडचा बेड पपांचा


नंतर तीनच दिवसांनी अशोकने वहिनीचा फोटो बघत जीवनयात्रा हसतमुखाने संपवली. 'आनंद'मधल्या 'कैसी ये पहेली हाये, कभी तो हसाये, कभी ये रुलाये' या गीतातल्या.
"जिन्होंने सजाये यहाँ मेले
सुख-दुख संग-संग झेले
वही चुनकर खामोशी
यूँ चले जाएँ अकेले कहाँ
ज़िन्दगी कैसी है पहेली..". या ओळींचा अर्थ जणू नव्याने उमगला.

शांती आवेदना सदन हॉस्पिटलमध्ये रुगणांच्या शेवटच्या इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न नेहमीच केला जातो. त्यासाठी काही लोक हमखास मदत करतात. त्यांना फोन केला जातो. औषधोपचार म्हणजे फक्त तोंडाने देता येणारी वेदनाशामक औषधे दिली जातात. शस्त्रक्रिया, सुया टोचणे निषिद्ध. त्यामुळे इंजेक्शने, सलाइन नाहीत. कारण, 'रुग्णाला वेदना न देता, होणाऱ्या वेदना कमी करणे आणि त्याला देता येईल तितका आनंद देणे' हाच इथला मुख्य उद्देश आहे.

मी पपा गेल्यानंतरही काही वर्षे आठवड्यातून दोन दिवस तिथे जाऊन माझे कर्तव्य करत असे. आता तितके जमत नाही, पण जेव्हा जमेल तेव्हा आणि पपांच्या वाढदिवशी आवर्जून भेट देते.

तुम्ही 'आनंद' पाहिला असेल, त्यात 'बाबूमोशाय, जिंदगी लंबी नही, बडी होनी चाहिये।' म्हणणारे कितीतरी आनंद आणि मिली तिथे भेटतात. त्याचप्रमाणे निरलसपणे, न कंटाळता हसतमुखाने सेवा करणाऱ्या नर्सेस, आयाम्मा, वॉर्डबॉइज, तसेच इथे सेवा देणे हे कर्तव्य समजणारे, माणुसकी मानणारे काही मानवतेचे पुजारीही भेटतात.

ज्यांचे नातेवाईक रुग्णांचे मृतदेह ताब्यात घ्यायला येऊ शकणार नसतात, त्यांचा अंत्यसंस्कारही केला जातो, पण तो ख्रिश्चन पद्धतीने केला जातो. ज्यांचे नातेवाईक मृतदेह घरी नेणार असतात, त्या रुग्णाच्या मृतदेहाला आंघोळ घालून, घरचे कपडे घालून तयार केले जाते, मग मृतदेह एका खोलीत थोडावेळ ठेवला जातो, तिथे प्रार्थना केली जाते. त्याला सर्व कर्मचारी वर्ग, तसेच डॉक्टर हजर असतात. रुग्णांपैकी ज्यांची इच्छा असते तेही मृतदेहाचे दर्शन घेतात. रुग्णाच्या नातेवाइकांचे सांत्वन केले जाते आणि सगळ्यांना निरोप दिला जातो.

येत्या काहीच दिवसांत मृत्यू निश्चित आहे हे माहीत असलेल्यांच्या चेहऱ्यावरचे हास्य, आपल्यालाही आपल्या अडचणी किती छोट्या असतात आणि मुळात जीवनच किती लहान असू शकते, हे जाणवून आपल्यालाच जगायला बळ देते हे निश्चित! शांती आवेदना सदनची आणि या सदनाची ओळख करून देणाऱ्या डॉ. हितेश मेहतांची मी याबद्दल कायम कृतज्ञ राहीन..

हा लेख आपल्या बोका-ए-आझमला सादर समर्पित, ज्याने या आजाराशी लढत आपल्या सकस लेखनाने आपल्याला अमर आनंद दिला. दिवाळी अंकच नव्हे, तर एकूणच मिसळपावला त्याची अनुपस्थिती कायम जाणवत राहील.

(टीप - अशोक आणि वहिनी यांच्या अनुभवावर आधारित माझी कथा मेरी सहेली या मासिकात प्रसिद्ध झाली आहे.)


श्रेयनिर्देश: सर्व प्रकाशचित्रे आंतरजालावरून साभार.


20191016-122815

अनुक्रमणिका

मनोगत/अनुभव

प्रतिक्रिया

यशोधरा's picture

26 Oct 2019 - 4:44 pm | यशोधरा

काय लिहू?
खूप मनापासून लिहिलेस..

पलाश's picture

26 Oct 2019 - 6:42 pm | पलाश

_/\_

अनन्त्_यात्री's picture

27 Oct 2019 - 3:07 pm | अनन्त्_यात्री

__/\__

पद्मावति's picture

27 Oct 2019 - 3:52 pm | पद्मावति

नि:शब्द _/\_

आठवणी पुन्हा पुन्हा येतात.
नक्की कोणत्या व्यसनामुळे किंवा व्यसन नसणाऱ्यांनाही हा रोग का होतो अजूनही कळलेले नाही. नक्की उपायही माहीत नाहीत. शिवाय काहीजण खडखडीत बरेही होतात.

जॉनविक्क's picture

27 Oct 2019 - 8:11 pm | जॉनविक्क

हो लेखन आवडले. दुर्दैवी असूनही दुर्दैवाकडे सकारात्मकतेने सामोरे जायचा रस्ता दाखवलात म्हणून आवडले.

आपल्या वडिलांना आपल्याबद्दल प्रेम व अभिमानच वाटत असणार _/\_

गामा पैलवान's picture

29 Oct 2019 - 12:42 am | गामा पैलवान

लोकहो,

लेखिकेचं तिच्या वडिलांवर गहिरं प्रेम होतं हे पदोपदी जाणवतं. साधारण तसाच गहिरा सेवाभाव सदनाच्या कर्मचाऱ्यांत दिसून येतो. त्यांची येशुभक्ती सेवेत रुपांतरीत झालेली आहे.

मात्र या सेवेच्या बुरख्याआड चर्च दबा धरून बसलं आहे अशी शंका येते. सदन विनामूल्य सेवा देतं. हा पैसा चर्चकडनं आलाय हे उघड आहे. त्याबद्दल माझा आक्षेप नाही. पण पोप व चर्चचा नेमका आगापिछा काय? काळा पैसा पांढरा करण्यासाठी सेवाभावी संस्थांची मदत तर होत नाहीये ना? लेखिकेच्या वेदनांच्या भांडवलावर जगात इतरत्र दुष्टावा तर पोसला जात नाहीये ना? अशी आपली शंका येते.

अर्थात हा विचार लेखिकेने वा गरजवंतांनी करायचा नसून त्रयस्थाने करायचा आहे.

आ.न.,
-गा.पै.

नूतन सावंत's picture

29 Oct 2019 - 3:38 pm | नूतन सावंत

त्रयस्थानी आणि तुम्ही तरी नुसता विचार का करावा,कृती करून,चर्चाच पैसे न घेता असे सदन बांधावे.

या सदनात ज्या रुग्णांचे मृतदेह नातेवाईक बेऊ शकत नाही अशा रुग्णांणवर क्रिश्चन पद्धतीने अंत्यसंकार केले जातात आणि तेही पूर्वकल्पना घेऊन केले जातात. यावरून जी संस्था क्रिश्चन धर्म अनुसरणारी आहे हे सिद्धच होते.तिला मिळणारा पैसा हा चर्चकडून येत असला तरी सेवा करताना रुग्णांचा धर्म पाहिला जात नाही हे महत्वाचे.

तसेच कोणालाही विनामूल्य उपचार दिले तरी बरेच लोक,ज्यात आम्हीही होतो,रुग्णाचा मृत्यू झाल्यावर, आवर्जून देणगी देतात.कारण अत्यंत कमी कालावधीत निश्चित मृत्यू येणाऱ्या रुग्णांना घरी मिळणार नाही अशी सेवा आणि अटेन्शन इथे मिळते.तेही त्यांचे नातेवाईक जवळ नसले तरी,हे महत्वाचे आहे.

माझ्या वडिलांना लीलावती रुग्णालयातूनतून इथे आणले होते,त्यामुळे तिथे जो खर्च झाला असता तितके किंबहुना त्यापेक्षाही जास्त पैसे आम्ही देणगी म्हणून दिले आणि देत राहणारच.(हे मी लिहिणार नव्हते,पण तुम्ही पैसा कुठून येतो ही शनक काढलीत म्हणून हा खुलासा करतेय.) ही कृतज्ञाता सर्वच धर्माचे लोक दाखवून देताण दिसतात.

तिथे येणाऱ्या देणग्याचे स्वरूप पाहिले तर अचंबित व्हायला होते,ज्या देणग्या देण्यासाठी सर्वच धर्माचे लोक पुढे असतात.नुसत्या धनरुपानेच नाही तर वस्तुरुपानेही देणग्या येत असतात.शिवाय काही नियमित देणगीदार रुगणांच्या शेवटच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी अहमहमिकेने पुढे येतात.

ही संस्था रजिस्टर्ड असून देणगीची वैध पावती मिळते,तसेच इन्कमटॅक्ससाठी इथे देण्यात येणारी देणगी पात्र आहे, असा अनुभव आहे.

तेव्हा या अशा सेवाभावी संस्थेच्या कार्यात धर्म आणून नाहक वाद करू नयेत.तुम्ही अशा प्रकारची सेवाभावी संस्था,चर्चकडून पैसे न घेता उभरलीत, तर त्याला शुभेच्छा असतील.कारण माझे वडील 2003 मध्ये गेले,पण अजून अशी दुसरी संस्था उभी राहिलेली पाहिली नाही,उलट इथंच सदनाच्या खोल्यांमध्ये वाढ झालेली दिसते आहे.

गामा पैलवान's picture

30 Oct 2019 - 2:57 am | गामा पैलवान

नूतन सावंत,

तुम्ही माझा संदेश वैयक्तिक रीतीने घेणार हे माहित होतं. म्हणून तुम्हांस उद्देशून लिहिला नव्हता. पण काही हरकत नाही. माझं म्हणणं फक्त इतकंच आहे की पोपला डोक्यावर चढवून ठेवू नका. यामागचं कारण सांगतो. विषयबाह्य आहे.

दुसऱ्या महायुद्धात हिटलर, चर्चिल, स्टालिन आणि रूझवेल्ट ही नावं आपण ऐकतो. युजेन पासिली हे नाव कधी ऐकलंय? नाही ना? हीच तर पोपच्या बोलवत्या धन्याची ताकद आहे.

युजेन पासिली याला पोप बारावा पायस असंही म्हणतात. हा पोप झाल्यावर सहा महिन्यांत नाझींनी पोलंडवर आक्रमण केलं. हा योगायोग समजायचा का? नाझी अत्याचारांच्या वरवंट्याखाली पोलंडमधले रोमन कॅथालिक अक्षरश: भरडून निघंत होते, तेव्हा पोप फक्त तोंडदेखला निषेध करत होता. त्याने जर बोट उचललं असतं तर नाझींची काय प्राज्ञा होती कॅथालिकांवर अत्याचार करायची? यांत केवळ सामान्य माणसेच नव्हे तर रोमन कॅथालिक क्लर्जी ( = चर्चचे अधिकारी) व विचारवंत देखील ठार मारण्यात आले. कातयीनचं हत्याकांड आठवतंय?

इथे पहा पोलंडमधल्या कॅथलिकांवर नाझींनी केलेले अत्याचार : https://en.wikipedia.org/wiki/Nazi_persecution_of_the_Catholic_Church_in...

पोपच्या वादग्रस्त भूमिकेवर व्हाटिकनने घातलेला पडदा : https://www.independent.co.uk/news/world/europe/religion-rome-and-the-re...

पोलंड मधले रोमन कॅथलिक पोपचेच अनुयायी होते ना? पोपच्या हृदयाला पाझर का बरं फुटला नाही? बरं युद्ध संपल्यावर तरी निषेध नोंदवायचा होता. तर तो ही नाही. हा काय प्रकार चाललाय?

म्हणून म्हणतो की पोपला डोक्यावर चढवून ठेवू नका.

कम्युनिस्टांनी या परिस्थितीचा फायदा घेऊन कॅथलिक विरोधात चांगलाच जोरदार प्रसार केला. पोलंड सोव्हियेत युनियनचं बटीक बनलं. कुठल्याही पोपने कधीही पोलिश कम्युनिझमच्या विरोधात प्रखर भूमिका घेतली नाही.

पुढे युजेन पासिली १९५८ साली गचकला. या पोपची पापं नंतर उजेडात येऊ लागली. तसंच कम्युनिझमचा प्रभाव म्हणून म्हणा पण पोलंडमध्ये रोमन कॅथलिक स्वत:स स्वतंत्र कॅथलिक समजू लागले. व्हाटिकनची सत्ता मान्य करण्यास खळखळ करू लागले.

त्यामुळे १९७८ साली कॅरोल वतियावा हा पोलिश कार्डिनल पोपपदी बसवला गेला. तोच पोप जॉन पॉल द्वितीय. त्याच्याच तुम्ही १९८६ साली पाया पडल्या होत्या. हां पण कॅरोल वतियावा गादीवर बसायच्या अगोदरचा पोप अल्बिनो लुशियानी अवघ्या ३३ दिवसांत मरण पावला होता. हा खून आहे हे मी सांगायला हवंच का? मग पोपच्या बोलवित्या धन्यांनी कॅरोल वतियावाला पाचारण केलं.

बोलवित्या धन्याने फेकलेला तुकडा कुत्र्यासारखा तोंडात धरून शेपटी हलवायची पाळी कॅरोल वतियावावर आली. नेणते पोलिश कॅथलिक खूष झाले. आपला पोप नियुक्त झाला म्हणून. पण जाणत्यांना काय वाटलं असेल?

पुढे ३ वर्षांनी १९८१ साली कॅरोल वतियावा वर तुर्कस्थानात हल्ला झाला. पण तो वेगळा विषय आहे.

असो.

सांगायचा मुद्दा काये की पोपला डोक्यावर चढवून ठेवू नका. भले त्याला वाकून चरणस्पर्श केलात तरी चालेल ती तुमची श्रद्धा आहे. तिला मी हात घालू इच्छित नाही. त्याच्यासमोर माथा जरूर टेका, पण गुडघा आजिबात टेकू नका ( हे वाक्य माझं नसून बॉबी पिच्चरमध्ये प्रेमनाथच्या तोंडी आहे).

तर प्रश्न असाय की, पोप व येशूचा नेमका संबंध काय? काही सापडला तर जरूर सांगा. तुम्ही येशूभक्त असा वा नसा, पोपला आजिबात डोक्यावर चढवून बसवायचं नाही.

आ.न.,
-गा.पै.

नूतन सावंत's picture

30 Oct 2019 - 3:39 pm | नूतन सावंत

यात मी पोपचा उल्लेख वैयक्तीक रीतीनेच केला आहे म्हणून मी तुम्हाला उत्तर दिले आहे, मी पोपना डोक्यावर चढवण्यासारखेही काही लिहिले नाही.फक्त दोन घटनातला योगायोग ,जो माझ्याला वाटतो तोच स्पष्ट केलं आहे.
माझ्या आईवडिलांनी सर्व धर्माच्या लोकांना आणि त्यातल्या त्या त्या धर्माच्या अनुयायांना त्या त्या धर्मातील वडणीय व्यक्तींचा मान राखायला शिकवले आहे आमच्या घरात सर्व धर्म समभाव नकादंत आहे.एक वहिनीख्रिश्चन तर एक जैन आहे,आमच्याकडे हे सर्व सण साजत्रे होतात आणि वडिलांचे एक पर्यंत जवळचे मित्र मुसलमान असल्याने त्यांचे सणही आमच्याशिवाय साजरे हिट नाहीत,हेही खरे.
बाकी तुम्हाला चर्चचा पैसे न घेता आणि पोपना डोक्यावर चढवून न घेता अशी संस्था काढायला पुनःश्च शुभेच्छा.

माहितगार's picture

29 Oct 2019 - 3:54 pm | माहितगार

त्रयस्थानी आणि तुम्ही तरी नुसता विचार का करावा,कृती करून,चर्चाच पैसे न घेता असे सदन बांधावे.

सहमत

नूतन सावंत's picture

30 Oct 2019 - 3:45 pm | नूतन सावंत

"तर प्रश्न असाय की, पोप व येशूचा नेमका संबंध काय? काही सापडला तर जरूर सांगा. तुम्ही येशूभक्त असा वा नसा, पोपला आजिबात डोक्यावर चढवून बसवायचं नाही."

या वरच्य प्रश्नाचं उत्तर तुमचं तुम्ही शोधा,मला त्यात
गम्य नाही, पण मी काय करायचं हे तुम्ही कोण सांगणार?

गामा पैलवान's picture

31 Oct 2019 - 3:41 am | गामा पैलवान

नूतन सावंत,

पण मी काय करायचं हे तुम्ही कोण सांगणार?

अगदी बरोबर प्रश्न आहे.

माझा राग आला की काय? तसं असल्यास अभिनंदन. राग येणं हे जिवंत मनाचं लक्षण आहे. बघा, तुमच्या भावनांना जरा धक्का लागला तर तुम्ही लगेच प्रश्न करता की गामा पैलवान कोण लागून गेला म्हणून. तर पोलिश कॅथालिकांची काय हालत झाली असेल. असो. मुद्यावर येतो.

मी कोण सांगणारा? मी कोण? को ऽ हं? घरात साप शिरण्याची शक्यता आहे म्हणून सावध करतोय असं समजा. करायला पाहिजे ते तुम्ही करालंच.

आ.न.,
-गा.पै.

जॉनविक्क's picture

31 Oct 2019 - 6:53 am | जॉनविक्क

माझा राग आला की काय? तसं असल्यास अभिनंदन. राग येणं हे जिवंत मनाचं लक्षण आहे.

राग येणं हे जीवन्तपणाचे लक्षण आहे की तुमचा राग येणं जीवन्त पणाचं लक्षण आहे हे तर अस्पष्टच राहिले की हो :(

अशोक आणि वहिनींची कथा हेलावून गेली. तुमच्या वडिलांच्या आजारातही तुम्ही दुसर्‍यांकडे लक्ष दिले हे विशेष. तुमच्या वडिलांची जिद्द खरंच अफाट.

काही वर्षांपुर्वी एका मानसतज्ञ मित्राबरोबर वृध्दाश्रमात जायचो बर्‍याच वेळा. तिथल्या वृध्दांचे विझलेले, निराश चेहरे बघून खूप वाईट वाटायचे. इथे तर साक्षात मृत्यू समोर - विचार करुनही शहारे येतात. हे शांती आवेदना सदन अतिशय चांगले काम करत आहे हे तुमच्या लेखावरुन कळले, त्यांना शुभेच्छा.

king_of_net's picture

31 Oct 2019 - 11:21 am | king_of_net

_/\_ _/\_ _/\_

सुधीर कांदळकर's picture

31 Oct 2019 - 4:56 pm | सुधीर कांदळकर

आवडला. आपल्या आईने वहिनींना सजवले आणि अशोकला आनंदाचे काही क्षण दाखवले हे फारच आवडले. दुसर्‍याच्या आनंदात वा दु:खात सहभागी होणे हे पुण्यकर्मच. आजकाल आय अ‍ॅम फॉर मायसेल्फ, गॉड इज फॉर एव्हरीबडी असाच दृष्टीकोन आढळतो.

याच पोपने गॅलिलीओचा छळ केल्याबद्दल अखिल मानवतेची माफी मागितली होती. हे असे स्वधर्मीयांच्या कृष्णकृत्यांची कबुली देऊन त्याबद्दल माफी मागणे जगाच्या इतिहासात प्रथमच आणि एकदाच घडले.

छान लेखाबद्दल अनेक धन्यवाद.

समीरसूर's picture

31 Oct 2019 - 5:19 pm | समीरसूर

अगदी मनापासून लिहिलेला. जगात काय काय दु:ख भोगत असतात माणसं...आणि आपण आपल्या क्षुल्लक चिंता वाहत वाकून चालत असतो...

गुल्लू दादा's picture

1 Nov 2019 - 9:16 am | गुल्लू दादा

छान लिहिलंय...तुमच्या पापांना आदरपूर्वक श्रद्धांजली....!

टर्मीनेटर's picture

3 Nov 2019 - 9:29 am | टर्मीनेटर

🙏

श्वेता२४'s picture

3 Nov 2019 - 10:25 am | श्वेता२४

मन हेलावून गेले अगदी.

मुक्त विहारि's picture

21 Nov 2019 - 10:20 pm | मुक्त विहारि

धन्यवाद. ...

स्वधर्म's picture

22 Nov 2019 - 2:48 pm | स्वधर्म

खूप गहिरा अनुभव अत्यंत ताकदीने शब्दबध्द केला आहें आपण. _/\_

रुस्तम's picture

23 Nov 2019 - 12:37 am | रुस्तम

_/\_

हे वाचायचे नाही हे ठरवले होते. पण समहाऊ पूर्ण दिवाळी अंकात हाच लेख पहिला वाचला.

व्यक्तिगत जीवनातील सर्वात दुःखद आणि हताशेचे क्षण लेखामुळे परत जगलो. कॉलेजवयीन असतांना बांद्रयाला 'डॉ बोर्जेस होम' मध्ये २-३ आठवडे असेच वातावरण प्रत्यक्ष अनुभवले आहे. स्वतःचे प्रचंड दुःख आपसात वाटून थोडे सुख मिळवणारी, दुसऱ्यांनाही थोडे सुख देऊ करणारी काही माणसं भेटली आहेत, त्यामुळे फार रिलेट झाले.

'दुनिया में कितना गम है, मेरा गम कितना कम है' असं वाटायला लावलं तुमच्या लेखानी !

Nitin Palkar's picture

31 Dec 2019 - 8:34 pm | Nitin Palkar

सुंदर लेखनाबद्दल अभिनंदन.
"शांती आवेदना ट्रस्टचे हे हॉस्पिटल आहे. हे हॉस्पिटल कॅन्सरच्या तिसऱ्या स्टेजमधल्या लोकांसाठी आहे. ज्यांची सेवाशुश्रुषा घरी करणे अशक्य आहे, अशा रुग्णांना इथे प्रवेश दिला जातो". या दोन वाक्यांबद्दल थोडी माहिती. हे हॉस्पिटल नसून 'हॉस्पीस' ‘Hospice’. आहे. याचा अर्थ धर्मशाळा असा आहे. अखेरच्या प्रवासाला जाणाऱ्या प्रवाशांसाठी या धर्मशाळा काम करतात.
"ज्यांची सेवाशुश्रुषा घरी करणे अशक्य आहे, अशा रुग्णांना इथे प्रवेश दिला जातो". या वाक्याने कॅन्सरग्रस्तांचा गैरसमज होऊ शकेल, एवढ्याच साठी हे निवेदन...

Nitin Palkar's picture

31 Dec 2019 - 8:37 pm | Nitin Palkar

सुंदर लेखनाबद्दल अभिनंदन.
"शांती आवेदना ट्रस्टचे हे हॉस्पिटल आहे. हे हॉस्पिटल कॅन्सरच्या तिसऱ्या स्टेजमधल्या लोकांसाठी आहे. ज्यांची सेवाशुश्रुषा घरी करणे अशक्य आहे, अशा रुग्णांना इथे प्रवेश दिला जातो". या दोन वाक्यांबद्दल थोडी माहिती. हे हॉस्पिटल नसून 'हॉस्पीस' ‘Hospice’. आहे. याचा अर्थ धर्मशाळा असा आहे. अखेरच्या प्रवासाला जाणाऱ्या प्रवाशांसाठी या धर्मशाळा काम करतात.
"ज्यांची सेवाशुश्रुषा घरी करणे अशक्य आहे, अशा रुग्णांना इथे प्रवेश दिला जातो". या वाक्याने कॅन्सरग्रस्तांचा गैरसमज होऊ शकेल, एवढ्याच साठी हे निवेदन...