दृष्टीच्या विधा - एका बहुआयामी कलाप्रदर्शनाचे स्पर्शग्रहण

Primary tabs

धनंजय's picture
धनंजय in दिवाळी अंक
25 Oct 2019 - 6:00 am


मिपा दिवाळी अंक  २०१९

अनुक्रमणिका
दृष्टीच्या विधा - एका बहुआयामी कलाप्रदर्शनाचे स्पर्शग्रहणरसिकाने कानाने आस्वाद घ्यावे असे संगीत असते, जिभेकरिता पक्वान्ने, नाकाकरिता अत्तरे, नेत्रसुखाकरिता चित्रे असतात -- सगळ्या ज्ञानेंद्रियांचे चोचले पुरवणारे कलांचे प्रकार असतात, पण बिचाऱ्या स्पर्शाला कलाविश्वात एरवी काही भाव मिळत नाही. कधीकधी म्यूझियममधल्या एखाद्या चित्राचा पोत आणखी आर्तपणे अनुभवायला मला त्याच्या जवळात जवळ जायचा मोह होतो, पण "चित्रापासून लांब व्हा!" रखवालदारांची ताकीद ऐकून ओशाळून परत चार पावले मागे सरकावे लागते. वस्तुसंग्रहालयात बहुतेक शिल्पे तर काचेच्या पेटीत बंदिस्त असतात. या 'अस्पृश्य' धोरणाचे मी एकदा पाहिलेले हसावे-की-रडावेसे उदाहरण सांगतो : वॉशिंग्टनमधील हर्शहॉर्न म्यूझियममध्ये २०१० साली ईव क्लाइन (Yves Klein १९२८ - १९६२) याच्या कलाकृतींचे प्रदर्शन भरले होते, त्यात त्याचे 'Wooden box, various objects inside' हे शिल्प ठेवलेले होते.


YvesKleinWoodenBox


(ईव क्लाईनच्या कलाकृती, मूळ संकेतस्थळाचा दुवा)

चित्रात दिसत असलेल्या लाकडी खोक्यातल्या भोकांमधून हात आत घालून आतील वस्तू हाताळून अनुभवाव्यात, हा शिल्पकाराचा मूळ हेतू माहितीपत्रकावर लिहिला होता, पण शिल्पाच्या भोवती दोरीचे कुंपण करून सूचना होती की शिल्पाची नासधूस होऊ नये म्हणून स्पर्श करू नका!

एकुणात कलाकृती ही डोळ्यांनी दुरून साजरी करण्यासाठी असते, स्पर्श वर्ज्य असतो, अशी धारणा आपल्यावर बिंबवली जाते, आणि ही एक संवेदना अतृप्त राहते. दृश्य-एके-दृश्य आस्वादाच्या एकाधिकारशाहीमुळे म्या डोळसाची तरसलेली बोटे शिवशिवतात, तर अंध लोकांची किती कुचंबणा होत असेल, त्याची कल्पनाच करवत नाही. म्हणूनच एका अंध मैत्रिणीने मला माहिती दिली की आपल्या शहरातच दृश्य-स्पृश्य कलाकृतींचे एक प्रदर्शन भरणार आहे, तेव्हा तिथे जाण्याबद्दल माझा उत्साह आणि कुतूहल उचंबळून आले. माझ्या मैत्रिणीला आमच्याच बॉल्टिमोर शहरात असलेल्या यू.एस.च्या राष्ट्रीय अंध संघाच्या (National Federation of the Blindच्या) मुख्यालयातून नियमित बातमी मिळते, त्यांनी या प्रदर्शनाला साहाय्य करायचे ठरवले होते. काही अंध आणि काही सनेत्र कलाकार मिळून प्रदर्शनातल्या कलाकृती सादर करणार होते.

मी आवर्जून या 'दृष्टीच्या विधा' (Ways of Seeing) प्रदर्शनाच्या उद्घाटनाच्या दिवशी गेलो. समारंभासाठी उपस्थित कलाकार आणि अंध संघाचे एक अधिकारी मार्क ए. रिकोबोनो यांचा मिळून एक परिसंवाद झाला, तो ऐकून मला त्यांची भूमिका अधिक समजली. अंध संघाचे एक उद्दिष्ट आहे की समाजात अंध लोकांना अधिकाधिक सहभाग घेता यावा. मात्र आज बहुतेक कलासंग्रहालयांत 'अंध लोकांकरिता सुरक्षित' असा विभागही नसतो, अंध लोकांनी आस्वादायच्या कलांचे प्रदर्शन तर मग दूरची गोष्ट. 'अंध लोकांकरिता सुरक्षित' असा मुद्दाही पुढे करायला अंध संघाच्या मुत्सद्द्यांना धोक्याचे वाटते, कारण संवाद मैत्रिपूर्ण होण्याऐवजी कलासंस्थांमधले लोक या भीतीने मागे होतात, की अंध संघ 'असुरक्षित ठिकाण' म्हणून आपल्यावर खटला चालवायला बघतो आहे की काय? खरे तर अंध संघाला शत्रू नव्हे, तर सहयोगी होऊन कलासंग्रहालयांशी हातमिळवणी करायची आहे, की एखादे दालन तरी अंध लोकांच्या आस्वादाकरिता योजना करून उपलब्ध असावे. परंतु सध्या तरी त्यांना फारसे यश मिळत नाही. म्हणूनच अंध-सनेत्र कलाकारांच्या सहयोगाने मुद्दाम स्पर्शायला केलेल्या कलाकृतींच्या प्रदर्शनाला त्यांनी लगेच पाठिंबा दिला, जेणेकरून या विषयावर बातचीत तरी सुरू व्हावी.

तिथल्या कलाकारांनी सांगितले, "आम्ही खोटेखोटे सांगत नाही, खरोखर प्रत्येक वस्तूला हात लावा! फक्त दूरून पाहून आमचे प्रयोजन विफल करू नका!" त्यांनी दिलेल्या आज्ञेची अंमलबजावणी करत-करत मी हात लावलेल्या काही कलाकृतींची उदाहरणे देतो.

हे पुढील चित्र आहे जॉर्ज वुर्त्झेल या अंध कलाकाराने केलेल्या टेबलावर ठेवायच्या दिव्याचे. यात लाकडाचा ठोकळा उकलून आतल्या गाठींची ओबडधोबड गोळेगोळाई मुलायम पॉलिश केलेली होती. माझ्या फोटोच्या आधाराने कल्पना करा, की बोटांनी गोंजारताना लाकूड कसे जाणवत असेल. दिव्यात गोळा बसवलेला होता, साखळी ओढून नेहमीसारखा लावता-विझवता येत होता. ही कलाकृती रोजच्या उपयोगाची म्हणून वापरता यावी हा कलाकाराचा हेतू होता.


Wurtzel Lamp

(जॉर्ज वुर्त्झेलच्या कलाकृती, मूळ संकेतस्थळाचा दुवा)

या दिव्याला हात लावताना मला पुन्हा जाणवले की आजवर माझ्या स्पर्शास्वादाकरिता अभावितपणे साहित्य पुरवणारे कारागीर म्हणजे उपयुक्ततावादी सुतार आणि इमारतींचे पाथरवट हे लोक होत. जड शिसवाच्या लाकडाने बनवलेली कमानदार टेबलखुर्ची हात लावून लोण्यासारखी मुलायम लागते. एखाद्या दोनशे वर्षे जुन्या सरकारी इमारतीचा जिना उतरताना मी नेहमी नक्षीदार संगमरवरी कठड्यावरून हात घसरत आणतो. बांधकामाचे कारागीरच नव्हे, तर त्या जिन्यावरून गेलेल्या हजारो-लाखो लोकांची बोटे त्या दगडातून अलगद शिवतात.


रोजच्या वस्तूंमधून मिळणाऱ्या स्पर्शसुखापासून चित्रविचित्र बहुआयामी अनुभव देणाऱ्या जुगाड-शिल्पापर्यंत प्रवास करणार्‍या अशा सिंडी छंग यांच्या कलाकृती होत्या (कलाकाराच्या संकेतस्थळाचा दुवा). सकृद्दर्शनी दिसणारा सांगाडा एका कपडे टांगलेल्या कपाटाचा होता.

ChengCloset


या टांगलेल्या नेहमीच्या कपड्यांना हात लावून आपल्याला जाणवावे, की रोज सकाळी अंधारात आपण चाचपडून आपल्याला आवडणाऱ्या वेगवेगळ्या पोताचे कपडे गोळा करतो, किंवा दिवा लावून आपल्या आवडीने जमवलेले वेगवेगळे रंग बघतो, हा दररोजचा सौंदर्यानुभव असतो. जरा अधिक लक्ष देऊन शोध घेता आपल्याला जाणवतात छंग यांनी आजूबाजूला घडवलेल्या विरळा, मग असामान्य वस्तू - गंगावन, ते अडकवलेल्या कडीवर चेहऱ्याचे शिल्प, मग लाल निखारे असलेल्या दिव्यांचे तंदूरासारखे काहीतरी...

छंग यांचे आणखी एक शिल्प स्पृश्य-दृश्य-श्राव्य असे त्रिविध होते.

ChengMaze


एका टेबलावर लाकडाच्या नाल्यांचा विविधरंगी भूलभुलैया बनवला होता, हे दृश्य शिल्प. त्यात स्टीलचे गोळे खेळवता येत होते, हे स्पृश्य असे चलत-शिल्प. टेबलावरची एखादी कांडी हलता त्याला जोडलेला टेबलाखालील घंटांचा नाद होत होता. टेबलावरचे ट्यूनिंग फोर्क मुद्दामून वाजवून टेबल विविध नादांनी आंदोलित करता येत होते, हे श्राव्य.

CrackedEye


या दोन्ही कलाकारांनी उद्घाटनाच्या परिसंवादात भाग घेतला. शिल्पाचा दृश्य भाग काय असणार आहे, स्पृश्य भाग काय असणार याबाबत त्यांच्या चर्चा, वादविवाद, समेट, यांच्याबाबत दोघींनी खुमासदार वर्णन केले.

परिसंवादानंतरच्या प्रश्नोत्तरात मी चर्चामंडळाला एक पसरट शंका विचारली. "स्पर्शज्ञान हे दृष्टीपेक्षा खरे असते, कारण आस्वादकाचा कलाकृतीशी प्रत्यक्ष संपर्क होतो. पण हाच संपर्क कलाकृतीला बदलतो. कितीही काळजी घेतली, तरी आपण धसमुसळे असतो. ज्ञानार्जनाच्या सर्व विधांपैकी स्पर्श हा सर्वाधिक विनाशकारक आहे. आस्वादक म्हणून आमच्याकडून तुम्हा कलाकारांची काय अपेक्षा आहे? आणि आपल्या कलाकृती स्पर्शास्पर्शानी झिजत आहेत, नष्ट होत आहेत त्याचे तुम्हाला दु:ख होते का?"

वुड्स् मिश्कीलपणे म्हणाल्या की "अंध लोक आयुष्यभर स्पर्शाचा जोर कमीअधिक करून काहीही तोडफोड न करता आजूबाजूच्या जगाला जाणतात. तुम्हा सनेत्र आस्वादकांनीही तसेच स्पर्शायला शिकावे." नंतर जेन्किन्स यांनी गंभीर मुद्द्याचा खुलासा केला. जगातल्या यच्चयावत वस्तू नाशिवंत आहेत, तशीच आपली कलाकृती नाशिवंत आहे. आस्वादकांच्या स्पर्शाने झिजणे, आणि बदलत बदलत नाहीसे होणे हीच कलाकृतीची सद्गती होय.

---

Ways of Seeing प्रदर्शन बॉल्टिमोर, मेरीलँड, यू. एस., येथील Gallery CA येथे जून ७ ते जुलै २०, २०१९ दरम्यान घडले. http://www.sarahbmccann.com/ways-of-seeing.php


20191016-122815

अनुक्रमणिका

रसग्रहण

प्रतिक्रिया

सुरेख!!! असे काही अनवट, भारी आमच्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल मनापासून आभार धनंजय :-)

जगातल्या यच्चयावत वस्तू नाशिवंत आहेत, तशीच आपली कलाकृती नाशिवंत आहे. आस्वादकांच्या स्पर्शाने झिजणे, आणि बदलत बदलत नाहीसे होणे हीच कलाकृतीची सद्गती होय.

है रंगे-तगय्युरसे जब नमूद इसकी
वही हसीन है हक़ीकत ज़वाल है इसकी।

~ अल्लामा इक़बाल

One that perishes is beautiful!

जेम्स वांड's picture

26 Oct 2019 - 7:10 am | जेम्स वांड

स्पर्श संग्रहालय म्हणजे फारच थोर, अतिशय जबरदस्त ओळख/रसग्रहण केलेत तुम्ही.

एकदम अनवट प्रदर्शनाचे उत्तम वर्णन. असे काही आजवर कुठे बघायला मिळाले नाही. एकदम अनोखी कल्पना आणि त्यामागचा विचार हृद्य आहे.

पाषाणभेद's picture

26 Oct 2019 - 3:00 pm | पाषाणभेद

कलेचा आस्वाद घेण्याचे अनेक प्रकार आहेत. त्यात स्पर्षज्ञान देखील समाविष्ट होते हे आता समजले आणि कलेविषयी, जीवनाविषयी जाणीवा प्रगल्भ होण्यास मदत झाली.
आता कलेचा आस्वाद घेण्यास नवीन आयाम मिळाला आहे.

आगळ्यावेगळ्या कलादर्शनाची सुन्दर माहिती.

- (आस्वादक) सोकाजी

टर्मीनेटर's picture

26 Oct 2019 - 8:08 pm | टर्मीनेटर

अप्रतिम! असे काही असू शकते ह्याची काही कल्पनाच नव्हती आणि त्या दृष्टीने कधी विचारही केला नव्हता.

वुड्स् मिश्कीलपणे म्हणाल्या की "अंध लोक आयुष्यभर स्पर्शाचा जोर कमीअधिक करून काहीही तोडफोड न करता आजूबाजूच्या जगाला जाणतात. तुम्हा सनेत्र आस्वादकांनीही तसेच स्पर्शायला शिकावे." नंतर जेन्किन्स यांनी गंभीर मुद्द्याचा खुलासा केला. जगातल्या यच्चयावत वस्तू नाशिवंत आहेत, तशीच आपली कलाकृती नाशिवंत आहे. आस्वादकांच्या स्पर्शाने झिजणे, आणि बदलत बदलत नाहीसे होणे हीच कलाकृतीची सद्गती होय.

वुड्स् आणि जेन्किन्स ह्यांच्या खुलाशाने तर डोळ्यात झणझणीत अंजन घातल्या सारखे वाटले.
एकदम हटके अशा ह्या रसग्रहणात्मक लेखासाठी खूप खूप धन्यवाद!

सुधीर कांदळकर's picture

26 Oct 2019 - 9:23 pm | सुधीर कांदळकर

एका अनोख्या जगाची ओळख करून दिलीत. धन्यवाद.

अनुप ढेरे's picture

30 Oct 2019 - 11:14 am | अनुप ढेरे

लेख खूप आवडला!

धनंजय's picture

31 Oct 2019 - 3:36 am | धनंजय

वाचकांना धन्यवाद आणि दिवाळीनिमित्त शुभचिंतन.

जॉनविक्क's picture

31 Oct 2019 - 6:47 am | जॉनविक्क

सगळ्या ज्ञानेंद्रियांचे चोचले पुरवणारे कलांचे प्रकार असतात, पण बिचाऱ्या स्पर्शाला कलाविश्वात एरवी काही भाव मिळत नाही.
इतके अंध विधान तुम्ही या धाग्यावर कराल असे वाटले न्हवते. हातात धरलेल्या मोबाईल पासून, कॉम्पुटर च्या स्क्रीन, कीबोर्ड पर्यंत, गाडीच्या स्टीअरिंग पासून, स्वयंपाक घरातील भांडीकुंडी पर्यंत, लिफ्ट च्या बटणा पासून दारांच्या हँडल कडी कोयंड्यापर्यंत सर्व ठिकाणी बहुतेकांनी कलेतील स्पर्शाचा रोज अनुभव घेतला आहे ही वस्तुस्थिती असताना इतके आंधळे विधान तुम्ही करूच कसे धजलात ?

धनंजय's picture

11 Nov 2019 - 8:32 pm | धनंजय

तुम्ही सांगितलेल्या उदाहरणांत सुखद स्पर्शानुभव आहे, याबाबत आपले एकमत आहे. त्यामुळे तुमच्या टीकेचा मुद्दा मला नीट समजलेला नाही. लेखात असेही एक वाक्य आहे :

मला पुन्हा जाणवले की आजवर माझ्या स्पर्शास्वादाकरिता अभावितपणे साहित्य पुरवणारे कारागीर म्हणजे उपयुक्ततावादी सुतार आणि इमारतींचे पाथरवट हे लोक होत

तुम्ही दिलेली उदाहरणे सुद्धा उपयुक्ततावादी वस्तूंच्या स्पर्शाच्या आस्वादाचीच आहेत ना -- मोबाईल, संगणकाचा पटल, कळफलक, बटने, वगैरे? हा सर्व स्पर्शानुभव देणार्‍या वस्तूंना बनवणार्‍या कारागीरांचा मी आभारी आहे.

या लेखाकरिता फरक असा की अस्वादाचा अनुभव प्राथमिक होता. उपयुक्ततावाद समोर न ठेवल्यामुळे स्पर्शानुभवाचा आस्वाद अधिक गडदपणे घेता आला. उपयुक्ततावादाची अट न ठेवता निखळ आस्वाद घेता येईल हे अनुभूतीचे लाड किंवा चोचले आहेत -- तसे चोचले बाकीच्या ज्ञानेंद्रियांचे पुष्कळ पुरवले जातात, स्पर्शेंद्रियाचे क्वचितच.

जॉनविक्क's picture

11 Nov 2019 - 9:18 pm | जॉनविक्क

माफ करा पण एक वैयक्तिक विचार मांडतो आपण गुगल ट्रान्सलेटर वापरून तर प्रतिसाद दिला नाही ना ? की आपणच "माहितगार" आहात ? बाकी सविस्तर प्रतिसाद देतोच...

धनंजय's picture

12 Nov 2019 - 10:56 pm | धनंजय

उत्तरे :

गुगल ट्रान्सलेटर वापरून तर प्रतिसाद दिला नाही ना?

गुगल ट्रान्सलेटर वापरून तर प्रतिसाद दिला नाही.

आपणच "माहितगार" आहात ?

"माहितगार" नाही.

जॉनविक्क मोहोदय - इतर धाग्यांवरील आपले प्रतिसाद कोणाला खोडसाळ वाटत असतील किंवा थिल्लर. पण प्रामाणिकपणे सांगायचे झाले तर मला तरी ते टेक्निकली करेक्ट वाटतात! जे सहजासहजी खोडून काढता येणे शक्य नसते, त्यात बुद्धिमत्तेची चुणूक नक्कीच जाणवते!
व्यक्तिगत काहीच नाही पण प्रस्तुत धाग्याचा एकूण आशय आणि विषय लक्षात घेता आपला हा प्रतिसाद नक्कीच अप्रस्तुत वाटला त्याबद्दल क्षमस्व!!!

जॉनविक्क's picture

12 Nov 2019 - 11:09 pm | जॉनविक्क

भावना दुखावल्या जातील इतक्या तीव्रतेने अप्रस्तुत वाटला याबद्दल मी आपली आणी सबंधितांचीही माफी मागतो कारण प्रतिसादाचा उद्देश तो नाही. क्षमस्व. पण मी माझ्या प्रतिसादावर ठाम आहे.

जॉनविक्क मोहोदय - इतर धाग्यांवरील आपले प्रतिसाद कोणाला खोडसाळ वाटत असतील किंवा थिल्लर. पण प्रामाणिकपणे सांगायचे झाले तर मला तरी ते टेक्निकली करेक्ट वाटतात! जे सहजासहजी खोडून काढता येणे शक्य नसते, त्यात बुद्धिमत्तेची चुणूक नक्कीच जाणवते!

धन्यवाद, पण मी शक्यतो बुध्दी टाळून अनुभवावरच लिखाण करायचा प्रयत्न करतो कारण बुद्धी स्पर्धात्मक असते, तर तुलनेत अनुभव व्यापक वा जास्त सर्वांगिण असतात व ते जेंव्हा खोडले जातात तेंव्हा ज्ञानाचे नवे मार्ग तयार होतात. म्हणून मी बुद्धीचा वापर मत व्यक्त करताना शक्य तितका कमी ठेवतो.

गड्डा झब्बू's picture

19 Nov 2019 - 8:59 pm | गड्डा झब्बू

जॉनविक्क साहेब भावना वगैरे दुखावल्या नाहीत पण समहाऊ तुमचा प्रतिसाद अप्रस्तुत वाटला होता एवढंच. अनुभवावरच लिखाण करायचा तुमचा प्रयत्न नक्कीच स्तुत्य आहे, ऐकीव/वाचीव माहिती,वर आधारित काही वाचण्यापेक्षा प्रत्यक्ष अनुभवावर आधारित असेच वाचायला जास्ती आवडते.
लगे रहो जॉनविक्क भाई!

जॉनविक साहेब मला वाटते कि दोन गोष्टींची गफलत होते आहे ( तुमचे विधान चुकीचे आहे असे मी म्हणत नाही.. तेवहा कृपया पुढे वाचा)
लेखक जेव्हा म्हणाला कि "पण बिचाऱ्या स्पर्शाला कलाविश्वात एरवी काही भाव मिळत नाही. " तेव्हा तू शुद्ध कला ( इंग्रजीत प्युअर आर्ट ) या दृष्टीने म्हणजे चित्र , शिल्प इत्यादी कि ज्यात अनुभवयाला आलेल्याला स्पर्श या माध्यमातून त्या कलाकृतीचा आनंद घेता येत नाही ( बहुतेकदा) ... आणि असे मुख्यत्वे करून स्पर्श या अनुभवाला वाहिलेलं प्रदर्शन क्वचित आढळते.

आपण जी उदाहरण दिली ती निश्चितच स्पर्श या अनुभवाशी निगडित आहेत आणि त्यात हि कला आहे पण ती कला म्हणजे "रचनेची कला" येथे मी इंडस्ट्रियल प्रोडक्ट डिझाईन किंवा "युसर डिझाईन" या अर्थाने म्हणत आहे, कि जिथे कला , तंत्रन्यान आणि शास्त्र याचा संबंध असतो प्युअर आर्ट चा संबंध तसा कमी...
कीबोर्ड , गाडीच्या स्टीअरिंग अश्या वस्तूंचा चांगला अनुभव स्पर्शून वापरणार्यला घेता आला तर अर्थातच त्यामागील कला , तंत्रांच्या आणि शास्त्र याचा तो यशस्वी पण समजावा
तेवहा तुम्ही दोघे बरोबर आहेत असे वाटते फक्त संदर्भ वेगळा आहे प्रत्येकाचा

जॉनविक्क's picture

20 Nov 2019 - 11:34 am | जॉनविक्क

स्पर्शाचे चोचले मानवी शरीर प्रणय आणी नित्यकर्म सोडून फार पुरवत नाही. अगदी मूर्तिकार, शिल्पकारही स्पर्श चोचला म्हणून नाही तर कलेची गरज म्हणून वापरतो. परिणामी आपण म्हणता तसे मी आणी धंनजय जी एकाच नाण्याच्या दोन वेगळ्या बाजूने बोलत आहोत.

माझ्या विधानाला अपवाद बहुतेक लहान मुलांचा असेल ते अनेक वस्तुंना स्पर्श कारणाशिवायही करत असतात पण पुन्हा त्यातून माहितीची निर्मिती हा हेतू विशेष असतो

श्वेता२४'s picture

4 Nov 2019 - 7:54 pm | श्वेता२४

आस्वादकांच्या स्पर्शाने झिजणे, आणि बदलत बदलत नाहीसे होणे हीच कलाकृतीची सद्गती होय.

आहाहा!

अलकनंदा's picture

11 Nov 2019 - 10:30 pm | अलकनंदा

अनवट प्रदर्शनाची माहिती. आवडले.

जॉनविक्क's picture

12 Nov 2019 - 11:41 pm | जॉनविक्क

या लेखाकरिता फरक असा की अस्वादाचा अनुभव प्राथमिक होता. उपयुक्ततावाद समोर न ठेवल्यामुळे स्पर्शानुभवाचा आस्वाद अधिक गडदपणे घेता आला. उपयुक्ततावादाची अट न ठेवता निखळ आस्वाद घेता येईल हे अनुभूतीचे लाड किंवा चोचले आहेत -- तसे चोचले बाकीच्या ज्ञानेंद्रियांचे पुष्कळ पुरवले जातात, स्पर्शेंद्रियाचे क्वचितच.

- इतकं दर्जेदार मराठी समजून घ्यायला मला गुगलची थोडी मदत घ्यावी लागली त्यामुळे प्रतिसाद देण्यास वेळ झाला. असो, मी आपल्या विचाराशी आता सहमत आहे व माझे विधान "सर्व ठिकाणी बहुतेकांनी कलेतील स्पर्शाचा रोज अनुभव घेतला आहे ही वस्तुस्थिती असताना इतके आंधळे विधान तुम्ही करूच कसे धजलात ?" हे मी मागे घेतो व बिनकामाच्या गोष्टीतला कलात्मक स्पर्षानुभव हा एकमेव उद्देश ठेऊन डोळस लोकांनी तो चोचला उपभोगुन घ्यायचा अनुभव देणारे अनोखे प्रदर्शन होते हे मी मान्य करतो.

तसेच तुमचे विधान आंधळे नसून डोळे माझ्या बुद्धीने मिटले होते हे ही मान्य करतो.

विषय आणी आशय समजू घ्यायला मला सोपे पडले असते.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

14 Nov 2019 - 7:34 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

धनंजयचं लेखन नेहमीच नवं आणि माहितीपूर्ण असते. आवडलं. आभार.

-दिलीप बिरुटे

अजून एक अनवट अनुभव कला प्रदर्शनाचा ( दुर्दैवाने त्याचे छायचितर नाही त्यामुळे वर्णन फक्त)
एक लांबट आकाराची खोली तिला एक किंवा दोन बंद खिडक्या
खोलीत तिरप्या दिशेने ठेवलेले एक पियानो ( पियानो जमिनीत घट्ट रोवलेले जेणेकरून बघायला येणार तो हलवू शकणार नाही , आणि पियानो जरी झाकण उगघडलेल्या अवस्थेत असला तरी सर्व कळ्या पक्क्या बसवलेल्या )
खोलीला आणि पियानो ना सफेद रंग
प्रत्येकाला आत येताना तांबडया रंगाचे गोल आकाराचे स्टिकर दिलेले , विविध आकाराचे साधारण २/३ इंचच पर्यंत परीघ असलेले जास्तीत जास्त
प्रत्येकाने पाहिजे तसे हातातील स्टिकर खोलीत चिकटवणे

दर काही तासांनी किंवा दिवसांनी खोलीचे च्याचीत्र घेतले जायचे आणि दुसऱ्या दालनात ती छायाचित्रे ठेवली होती

धनंजय's picture

7 Dec 2019 - 9:41 pm | धनंजय

तांबड्या ठिपक्यांनी आस्वादकांच्या स्पर्शाच्या वाढत्या नोंदी हीसुद्धा कला!
चित्रदर्शी वर्णन केले आहे तुम्ही.

जॉनविक्क's picture

20 Nov 2019 - 11:37 am | जॉनविक्क

प्रदर्शनात कशा कशाने स्पर्श करायला लोकांना मुभा दिली होती जेणे करून कलाकृती लवकर मोक्ष पावेल ;)

अथांग आकाश's picture

20 Nov 2019 - 11:45 pm | अथांग आकाश

सही......! वाचावे ते नवलच!
blind

राघव's picture

16 Dec 2019 - 1:16 pm | राघव

वेगळाच अनुभव असणार हा! :-)
अर्थात् प्रत्यक्ष बघीतल्याशिवाय आणिक काही बोलणं उचित नाही.

अवांतर:
खूप दिवसांनी मिपावर आपले लेखन दिसले. आनंद झाला. आणिक येण्याची प्रतिक्षा. :-)