धन वर्षा...

दिनेश५७'s picture
दिनेश५७ in जनातलं, मनातलं
14 Sep 2019 - 11:41 am

एका मऊशार दुपट्यात लपेटलेला तो एवढासा जीव निगुतीने सांभाळत ती गाडीतून उतरली आणि थेट डॉक्टरसमोर जाऊन तिने दुपटं अलगद उघडलं. आतला जीव मलूल पडला होता. तळव्यावर जेमतेम मावेल एवढं लहानसं, तपकिरी रंगाचं कोणतीच हालचाल न करणारं आणि जिवंतपणाचं कोणतच लक्षण दिसत नसलेलं कासव टेबलावर डॉक्टरांच्या समोर पडलं होतं, आणि चिंतातुर नजरेनं ती डॉक्टरांकडे पाहात उभीच होती. डॉक्टरांनी तो जीव उचलून हातात घेतला, उलटा केल्याबरोबर त्याची बाहेर आलेली मान उलट्या दिशेने कलंडली. मग त्यांनी त्याच्या पायाला स्पर्श केला. निर्जीवपणे तो लोंबकळत होता.
डॉक्टरांनी निराशेने नकारार्थी मान हलविली.
ते कासव मेलं होतं.
'काहीच उपयोग नाही... तुम्ही उशीर केलात...' डॉक्टर म्हणाले, आणि त्या महिलेच्या चेहऱ्यावर काळजी, भीती, चिंता असे सारे संमिश्र भाव स्पष्टपणे उमटले.
'कुठून घेतलं हे कासव?'... डॉक्टरांनी विचारलं
‘कहींसे मंगवाया था'... ती म्हणाली आणि हताशपणे मागे फिरू लागली.
डॉक्टरांनी निर्विकारपणे तिला खुणेनंच ते मेलेलं कासव उचलण्यास सांगितले, आणि तपासणी फीची रक्कमही सांगितली.
त्या महिलेचा चेहरा आणखीनच चिंताक्रांत झाला.
मेलेल्या कासवाच्या तपासणीसाठी पैसे द्यावे लागणार हाच त्या चेहऱ्यावरील भावाचा अर्थ असावा, हे लक्षात येत होतं. तिने पर्स उघडली. पैसे डॉक्टरांच्या टेबलवर ठेवले, आणि कसानुसा चेहरा करत तो गतप्राण देह पुन्हा कापडात गुंडाळून लांब धरत ती बाहेर पडली...
----
आजकाल अनेक घरांमध्ये कासव पाळण्याची प्रथा पडली आहे.
जनावरांच्या दवाखान्यात अधूनमधून अशी, तळव्याहूनही लहान कासवं उपचारासाठी आलेली दिसतात.
कुत्रीमांजरं पाळणारे प्राणीप्रेमी आपल्या पाळीव प्राण्यांना कुटुंबाचा घटक म्हणून सांभाळतात. त्यांच्यावर जिवापाड प्रेम करतात, आणि ते प्राणीही निर्व्याजपणे त्या प्रेमाची परतफेड करतात. अशा घरांमधील या सौहार्दामुळे त्या घरांत एक सकारात्मक वातावरण आपोआपच तयार झालेलं असतं. कुठलंही वास्तुशास्त्र घरातील पॉझिटिव्ह एनर्जीसाठी कुत्रं-मांजर पाळा असा सल्ला देत नसतानाही हजारो कुटुंबे या प्राण्यांचा कुटुंबातील घटकाच्या मायेनं सांभाळ करतात, आणि त्याच पॉझिटिव्ह एनर्जीचा अनुभव घरात घेतात...
पण वास्तुशास्त्र मात्र, पॉझिटिव्ह एनर्जीसाठी कासवं पाळायचा सल्ला देते.
-------
परवाचा जनावरांच्या दवाखान्यातील तो प्रसंग मला आज अचानक आठवला.
कारण, माझ्या मेलबॉक्समध्ये येऊन पडलेला एक ई-मेल.
'तीन पीढियोवाला कछुआ देता है अपार धन.. इतना धन, की आप संभाल नही पाओगे... घरमे कछुआ रखने को बहुत शुभ माना जाता है... अपने घर कछुआ ऑनलाईन मंगवाने के लिए, यहा क्लिक करे.. इससे घर और ऑफिसमे सकारात्मक उर्जा का प्रवाह बना रहता है!;... '
'धन वर्षा कछुआ' अशा मथळ्याखाली कासवाची ती जाहिरात मेलवर येऊन पडली होती. ती वाचली, आणि मला त्या दिवशीचा तो प्रसंग आठवला.
ते मेल्याचं तिला वाईट वाटल्याचं तिच्या चेहऱ्यावर त्या दिवशी स्पष्ट दिसत होतं.
आता मला त्याचं वेगळंच कारण असावं, असं वाटू लागलं.
ते ‘धनवर्षा करणाऱ्या’ त्या कासवांपैकीच एक तर नसेल?ते कासव असं अचानक मेलं, तर धनाचा वर्षाव कमी होणार या भयाने तर तिचा चेहरा दुःखी झाला नसावा?
धनवर्षा करणाऱ्या कासवांच्या धंद्यामुळे कुठे तरी धन वर्षा सुरू आहे, हे स्पष्ट आहे. बिचारी मांडुळं तर आता नष्ट व्हायला लागली आहेत.
----
शिक्षणाचा अभाव आणि समजुतींचा पगडा यांमुळे अंधश्रद्धा फोफावतात, असे म्हणतात. पण तळव्यावर मावणारी कासवं दिवाणखान्याच्या दर्शनी भागात ठेवून शोभेची वस्तू म्हणून त्यांना मिरवणारा समाज अशिक्षित आडाणी नसतो. धनवर्षावाची हाव हेच त्याचे कारण असेल, तर त्या मुक्या जिवांच्या भविष्यात काय वाढून ठेवले असेल ते स्पष्टच आहे....

मुक्तकप्रकटन

प्रतिक्रिया

ज्योति अळवणी's picture

14 Sep 2019 - 12:29 pm | ज्योति अळवणी

अगदी खरं! प्रेमाने अशा वेगळ्या प्राण्यांचा सांभाळ करणारे कमीच

सतिश गावडे's picture

14 Sep 2019 - 12:37 pm | सतिश गावडे

छान लेख. आवडला.

सुबोध खरे's picture

14 Sep 2019 - 8:12 pm | सुबोध खरे

माझ्या मुलीने हौस म्हणून पाच वर्षांपूर्वी एक कासव आणले. आणले तेंव्हा ते जुन्या रुपयाचा नाण्या एवढे( एक इंच व्यास) होते.त्याला आणल्यानंतर तिने जालावर इतकी माहिती मिळवली कि ती कॉमर्स ची विद्यार्थिनी असून तिला सरीसृप (REPTILES) बद्दल माझ्यापेक्षा जास्त माहिती आहे. आता ते एका लिज्जत पापडापेक्षा मोठे झाले आहे. माझी मुलगी तिची जितकी व्यवस्थित काळजी घेते तितकी काळजी घेणारे पूर्व उपनगरात फारच कमी लोक आहेत असे प्राणीरोग तज्ज्ञाकडून समजले. बरेच लोक कासव आणतात त्याच्या कडे दुर्लक्ष करतात त्यात ते दगावले तर दुसरे विकत आणतात.

मुलीच्या एका मैत्रिणीने सुटीवर जाणार म्हणून आपले कासव आमच्याकडे आणून ठेवले तर त्याच्या एका फुफ्फुसात पाणी भरले होते( न्यूमोनिया मुळे) त्यामुळे ते पाण्यात तरंगत असताना एका बाजूला झुकत होते. त्याला प्राणीरोग तज्ज्ञाकडे जाऊन उपचार करावे लागले. अर्थात एका जीवाची किंमत काय असते हे आम्हाला चांगले माहिती असल्यामुळे खर्च हा प्रश्नच नव्हता परंतु त्या मुलीकडे अगोदर दोन कासवे होती ती "कशामुळे तरी" दगावली म्हणून तिने हे तिसरे कासव आणले होते. चार रुपड्या फेकल्या कि काहीही मिळू शकते असा विचार असणारी माणसे जगात कमी नाहीत.

रच्याकने -- कासव ठेवल्यामुळे धनवर्षा होते / भरभराट होते. हे आजच समजले.

कासव ठेवल्यामुळे धनवर्षा होते / भरभराट होते. हे आजच समजले

ही फक्त आपली न्हवे तर फार मोठ्या समूहाची प्रातिनिधिक प्रतिक्रिया आहे. म्हणूनच चिंता वाटते

सिरुसेरि's picture

14 Sep 2019 - 8:53 pm | सिरुसेरि

विषण्ण करणारा लेख .