जीवनाचे धडे

Primary tabs

मिलिंद जोशी's picture
मिलिंद जोशी in जनातलं, मनातलं
1 Sep 2019 - 7:27 pm

काल बऱ्याच दिवसांनी माझ्या वर्गमित्राचा फोन आला होता. भरपूर गप्पा झाल्या. अनेक जुन्या आठवणींना उजाळा मिळाला तशा अनेक खपल्याही निघाल्या.

“काय म्हणताहेत तुझी मुलंबाळं?” मी नेहमीचा प्रश्न विचारला आणि तो एकाएकी गंभीर झाला.

“यार... बरं झालं तू लग्न केलं नाहीस...” त्याने म्हटले आणि मी चाट पडलो. खरंय ना... जो माणूस ‘मिल्या... तूही उरकून टाक आता... किती दिवस संट्या राहणार?’ असं म्हणायचा त्याच्याकडून असे वाक्य अपेक्षितच नव्हते.

“कारे? काय झालं?” मी थोडं गंभीर होत विचारलं.

“यार... माझा मुलगा मागील वर्षी दहावीला होता. खूप हुशार आहे तो. पण त्याला आमच्या अपेक्षेप्रमाणे मार्क्स मिळाले नाहीत म्हणून त्याची आई त्याला थोडं जास्तच बोलली, तर तो एकदम गप्पंच झाला रे...” त्याने सांगितले.

“म्हणजे?”

“अरे आता तो ना कुणाशी फारसा बोलतो, ना हसतो, ना कोणत्या गोष्टीत समरस होतो. इतकेच काय पण त्याचे कॉलेज अॅडमिशन घ्यायलाही त्याची आई गेली होती. पहिले चार सहा दिवस आम्हाला फारसे काही वाटले नाही. म्हटलं राग आला असेल आईचा तर होईल ४ दिवसात गायब. पण आता दीड दोन महिने होत आले रे... पण त्याच्यात फरकच नाही. आम्ही समजावून बघितले, रागवून बघितले. इतकेच काय पण त्याच्या आईने त्याच्यापुढे हात जोडून माफीही मागितली. पण त्याच्यात काहीच फरक नाही.” मित्राने सांगितले आणि लक्षात आले की प्रकरण खरंच गंभीर आहे.

“तुलाही मी यासाठीच फोन केला. म्हटलं किमान तेवढा वेळ तरी ही गोष्ट मनातून जाईल आणि थोडं हलकं वाटेल.” त्याने म्हटले.

“मन्या... एक सांगू का? राग येणार नसेल तर?”

“काय ते बोल यार... आता राग लोभ या गोष्टींपेक्षा मला माझा मुलगा जास्त महत्वाचा आहे.” त्याने म्हटले.

“तू यासाठी एखाद्या मानसोपचारतज्ञाची मदत घे. त्यांना अशा गोष्टी चांगल्याप्रकारे हाताळता येतात. आणि लक्षात ठेव... मानसोपचारतज्ञाची मदत घेणे म्हणजे तो वेडा झालाय असे समजू नको.” मी सांगितले.

“हं... आता तोच एक पर्याय माझ्या समोर दिसतोय...”

“आणि हो... तुम्ही दोघेही टेंशन घेऊ नका. अजून तरी ही गोष्ट मला खूप गंभीर वाटत नाहीये. पण त्याकडे लक्ष दिले नाही तर मात्र गंभीर होऊ शकते...” मी म्हटले आणि फोन ठेवला.

मनात विचार आला... यार... दहावी तर आपलीही झाली. आईचे बोलणे आणि वडिलांचा मार आपणही खाल्ला, पण कधी आपल्या बाबतीत अशा गोष्टी का झाल्या नसाव्यात? बराच विचार केल्यानंतर लक्षात आले की याचे सगळ्यात मोठे कारण होते ते आपल्या पालकांनी आपल्याशी केलेले वर्तन. कोणती गोष्ट कशी हाताळायची हे त्यांना चांगलेच समजत होते. आजचा किस्सा त्याबद्दलच.

मी दहावीला असताना खूपच व्रात्य होतो. वर्षभर अभ्यासाकडे दुर्लक्ष आणि परीक्षेच्या महिनाभर आधी घोकंपट्टी ही माझी अभ्यासाची पद्धत. त्याचा कितपत उपयोग होणार? त्यामुळेच मी दहावी उद्धरेल असे इतरांनाच काय पण मलाही वाटत नव्हते. पण दहावीचा निकाल लागला आणि मी पास झालो.

संध्याकाळी माझे वडील घरी आले, त्यावेळी मी घराबाहेरच मित्रांशी गप्पा मारत होतो.

“काय रे... आज तुझा निकाल होता ना?” गाडी स्टँडवर लावतानाच त्यांनी प्रश्न केला.

“हो...”

“मग? काय झाले?”

“पास झालो...” मी काहीशा आनंदाने उत्तर दिले.

“छान... किती टक्के?”

“४७.१३%”

“इतके कमी?”

“हो...” माझ्या चेहऱ्यावर थोडी नाराजी आली.

मग बाकी काही न बोलता ते घरात गेले. १० मिनिटांनी आईने मला आवाज दिला. मी घरात गेलो तसे तिने माझ्या हातावर ५० रुपये ठेवले आणि सांगितले... ‘जा... पेढे घेऊन ये...’ मीही हुकुमाची अंमलबजावणी केली. पेढे आणल्यावर आधी देवापुढे ठेवले. नंतर देवाला तसेच आईवडिलांना नमस्कार केला, त्यांच्या हातात पेढा ठेवला आणि एक पेढा तोंडात टाकला.

“जा आता... बाकी पेढे कॉलेनीत वाटून ये...” आईने सांगितले. मी हातात पेढ्यांचा बॉक्स घेतला आणि वाटायला बाहेर पडलो.

“हे घ्या पेढे?” मी पहिल्याच घरात जाऊन म्हटले.

“अरे वा... पास झाला वाटतं?” त्या घरातील मावशींनी प्रश्न केला.

“हो... झालो ना...” मीही आनंदाने सांगितले.

“छान... किती टक्के?” पुढचा प्रश्न.

“४७.१३%” मी उत्तर दिले.

“फक्त? आणि तरीही पेढे वाटतोस?” त्यांनी म्हटले आणि मला अपमान झाल्यासारखे वाटले. मी तिथून काहीही न बोलता बाहेर पडलो. पुढील ३/४ घरातही मला असाच काहीसा अनुभव आला. शेवटी इतर ठिकाणी न जाता मी घरी आलो.

“इतक्या लवकर झाले पेढे वाटून?” आईने विचारले पण मी काहीच उत्तर दिले नाही, फक्त पेढ्यांचा बॉक्स आईच्या हातात दिला.

“अरे... यात तर पेढे आहेत अजून?” तिने बॉक्स उघडत म्हटले.

“हो... फक्त चार ठिकाणीच गेलो होतो...” मी काहीसे नाराजीने उत्तर दिले.

“का?” तिने विचारले आणि मी कोण काय म्हणाले हे सगळे सांगितले.

“अस्सं... ठीक आहे... पण आता बाकीच्या ठिकाणीही जाऊन ये. कुणी जर कमी मार्कांबद्दल काही म्हटले तर त्यांना सांगायचे... ‘यावेळी अभ्यास कमी पडला पण पुढील वेळी अजून प्रयत्न करेन...’ आणि हो... कुणालाही चिडून काही बोलू नको...” तिने सांगितले आणि मी त्याप्रमाणे उरलेल्या ठिकाणीही पेढे वाटून आलो.

घरी आलो त्यावेळी शेजारच्या आक्का घरी आलेल्या होत्या.

“काय रे... आला का सगळ्यांना पेढे वाटून?” आईने विचारले.

“हो... आलो...” मी म्हटले.

“मीरा... मिलिंदला इतके कमी मार्क मिळाले तरी तू त्याला पेढे वाटायला का पाठवलेस?” माझ्या देखतच आक्कांनी आईला विचारले.

“त्याला जीवनाचे धडे मिळावेत म्हणून...” आईने उत्तर दिले आणि मी विचार करू लागलो... यार... पेढे वाटणे यात कसला आलाय जीवनाचा धडा?

“म्हणजे?” माझ्याप्रमाणेच आक्काही विचारात पडलेल्या मला दिसल्या.

“अहो... तो पास झाला म्हणजेच त्याला यश मिळाले आहे. आणि जीवनात आनंदी राहायचे असेल तर अगदी शुल्लक यश देखील साजरे करता आले पाहिजे, म्हणून आम्ही पेढे आणले. त्यानंतर त्याला ते घेऊन लोकांकडे पाठवले. तिथे अनेकांनी त्याला विचारले ‘इतके कमी मार्क का?’ यातून त्याला हे समजेल की लोकांना यशापेक्षा जास्त अपयश दिसते आणि त्यालाच लोक अधोरेखित करतात. ज्यावेळी तो अशा गोष्टीने उदास होऊन घरी आला, मी त्याला अशा लोकांना काय उत्तर द्यायचे हे सांगून परत पाठवले. यातून तो हे शिकू शकेल की ज्यावेळी लोक आपला अपमान करतात किंवा आपल्याला कमी लेखतात त्यावेळी चिडून किंवा दुःखी होऊन समस्येपासून पळण्याऐवजी शांत राहून त्याचा सामना केला पाहिजे. बरे त्याला एकट्यालाच यासाठी पाठवले कारण त्याला हे माहित व्हावे की त्याने केलेल्या चुकांसाठी त्यालाच उत्तर द्यावे लागणार. पण त्याच बरोबर ‘काय उत्तर द्यायचे’ हे सांगून हेही दाखवले की ‘तो एकटा नाही, आम्ही कायम त्याच्या पाठीशी उभे आहोत.’ आणि सगळ्यात महत्वाचे... परीक्षा होऊन गेली आहे. निकालही हाती आला आहे. तो बदलणे कदापि शक्य नाही. मग चिडून किंवा दुःख करून काही उपयोग आहे का? नाहीच ना... त्यापेक्षा आहे त्या परिस्थितीचा स्वीकार करून पुढे जाणेच जास्त योग्य... पुढील वेळी तो नक्कीच जास्त मेहनत घेईल.” आईने सांगितले.

“मीरा... आता मात्र तू शिक्षिका होतीस या गोष्टीवर माझा पूर्ण विश्वास बसला...” आक्कांनी हसत म्हटले आणि आई देखील त्यांच्या हसण्यात सामील झाली.

खरे तर प्रसंग एकदम साधा होता. पण तो कायमसाठी माझ्या मनावर कोरला गेला. त्यानंतर अनेकदा अपयश आले, अनेकांनी दुषणे देऊन तर कधी अपमान करून माझे मानसिक खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला. पण अजूनपर्यंत तरी माझे मानसिक स्वास्थ्य बिघडल्याचे मला स्मरत नाही... आणि यापुढेही ते असेच टिकून राहील अशी अपेक्षा आहे.

--- मिलिंद जोशी, नाशिक...

समाजविरंगुळा