३३ कोटींची मुक्ती

Primary tabs

मायमराठी's picture
मायमराठी in जे न देखे रवी...
13 Aug 2019 - 11:16 am

मित्रांबरोबर हॉटेलात मनसोक्त हादडंपट्टी करताना, रस्त्यात उभी अतिशय कृश अशी सवत्स धेनु, आमच्याकडे, आमच्या खाण्याकडे बघताना दिसली. मग पुढे ती मनात बोलली अन् मी थोडं, तो हा सगळा शब्दपसारा .

" मुक्ती "

लज्जत न्यारी, पदार्थांची जत्रा,

सुटला ताबा, विचार न करता,

सळसळे जिव्हा, भुरके मारता,

रसा रसांना, वदनी स्मरता,

हसता खेळता, ब्रह्म जाणता,

दिसले काही अगम्य कारुण,

ठसका लागला, खाता खाता,

"दोन डोळे काळेभोर,

हाडांनाही नव्हता जोर,

चार पायांच्या काटक्यांमधे,

वात्स्यल्याचे तान्हे पोर "

दोन जीवांच्या खेळामधूनी,

एक जिवंत भूक उभी ती,

विनवित होती प्राण पसरूनी,

वाचवा देव सहसष्ट कोटी.

नको ते देवपण, नको त्या मूर्ती,

श्रीकृष्णांच्या मागे, उभी एक छोटी,

भाकड धर्म व्याला, झाली देवळांची दाटी,

मूर्ती न्हाते दूधात,रस्त्यांवर गोमातांची गर्दी.

दारदारांत दिसते कायम,कामधेनू ही खोटी.

"येतां हात पुढे,खळबळ होई पोटी.

फक्त एक नमस्कार, मग पाठीत काठी,

आशीर्वाद दिला, तरीही कपाळी आठी?

एकदाच येईन दुपारची, नको दालबाटी.

शिळेही चालेल रे परवाचे, माझ्या वासरांसाठी.

नको हळदकुंकू, नको तुपरोटी,

दोन कोरड्या घासांना, का वळ उठावे पाठी?

एक दिवस गोग्रास, एरवी कचरा चाटी,

भूक आता मारेल, पुन्हा जगवण्यासाठी,

तूच आधी मार, भूक तुझी मोठी.

होतील रस्ते मोकळे, ना वाहनांची कोंडी,

कायदा ठेव बाजूला, तोड पुण्याच्या गाठी,

पाप नाही लागणार नुसती चव बघण्यासाठी,

सुकले आता देवसुध्दा, मुक्ती मिळण्यासाठी "

-अभिजीत श्रीहरी जोगळेकर

कविता

प्रतिक्रिया

जॉनविक्क's picture

13 Aug 2019 - 12:46 pm | जॉनविक्क

मन्या ऽ's picture

13 Aug 2019 - 5:27 pm | मन्या ऽ

कटु सत्य!

मायमराठी's picture

13 Aug 2019 - 10:17 pm | मायमराठी

त्या गाईच्या डोळ्यांत खरोखरच असं वाचता येत होतं की तिचं अनाहूतपणे मिळालेलं देवपण खूप जड जातंय आणि त्याने तिचं पोट रिकामं राहतंय, जे कपाळावरील कुंकवाने भरत नाही.