युगांतर - आरंभ अंताचा भाग २१

मृणालिनी's picture
मृणालिनी in जनातलं, मनातलं
5 Aug 2019 - 12:58 pm

पंडु वनवासाला कंटाळून परतेल अशी अपेक्षा करत भीष्म आणि विदुर त्याची वाट पाहत होते. पंडुची नाजूक तब्येत वैद्यांच्या देखरेखीशिवाय कशी नीट राहिल, हा प्रश्नही त्यांना सतावत होता. दासाने दिलेल्या वार्ता ऐकून पंडु परतण्याची शक्यता आता धुसर झाली होती. शेती करत पंडु वनातच रमल्याचे चित्र ही घोर निराशा होती.

'हा सोन्याने मढलेला राजमहाल, दास-दासी, सोयी-सुविधा, मान-सन्मान, अधिकार..... सगळं निर्जीव आहे! आधीही असतील... पण आता त्यांच निर्जीव असणं जाणवतयं! काय बदललं हस्तिनापुरात इतकं देवव्रता की तुझं मन लागत नाही इथे? एका क्षणात हे सुख सोडून गेलेला पंडुपरिवार! खरचं वाटलं तुला, की तुझा शिष्य पंडु परत येईल? तुझ्याच कडून शब्दांचं मोल शिकलाय तो, भीष्माचार्य!' भीष्मांच्या दु:खी चेहऱ्यावर एक हलकं स्मित आलं.
'राज्यकारभाराची जवाबदारी आता धृतराष्ट्राला देण्यावाचून गत्यंतर नाही पण त्याचा राज्याभिषेक करणार कसा? एक अंध व्यक्ती....राजा? युद्ध तर सोडाच पण न्यायदान तरी कसे करणार तो? आणि राजगादी रिक्त ठेवायची तर असंख्य प्रश्न आपल्या पुढे 'आ' वासून उभे राहतील. त्याची उत्तरे ना या दासाकडे असतील ना त्या धर्मात्म्या कडे.....'
"महामहीम, धृतराष्ट्रांना आपण राजगादीवर नक्कीच बसवू शकतो."
"ते कसे?"
"प्रतिनिधी म्हणून, महामहीम."
"प्रतिनिधी म्हणून?"
"होय महामहीम!"
"पणं विदुर, नियमांचे काय?"
"नियमानुसार आपण अंध व्यक्तीचा राज्याभिषेक करु शकत नाही. म्हणूनच प्रतिनिधी म्हणून त्यांना बसवावे राजगादीवर. नियमही पाळला जाईल आणि राजगादीही बेवारस राहणार नाही."
"हं....योग्य आहे तु म्हणतोस ते विदुर. तुर्तास दुसरा काही मार्गही नाही."
"एक प्रश्न विचारु आपणास?'
"विदुरा, तुला परवानगीची गरज पडावी? तेही या भीष्माला प्रश्न विचारायला?"
"राजनिती बद्दल नाहीये महामहीम.... तुमच्या बद्दल आहे."
"विचार...."
"तुम्ही अजूनही चिंतेत दिसता महामहीम. पंडुला आज्ञा देवून परत बोलावून का नाही घेत आपण? ते आपली आज्ञा कधीच नाकारणार नाहीत."
"मनाविरुद्ध प्यायला लावलेले अमृतही माणसाला कडवे लागते विदूर!" पावसाची आस लावून बसलेल्या चातकाला दुरूनच काळे मेघ दिसावेत आणि न बरसता निघून जावेत.... त्या चातकाप्रमाणे असंतुष्ट विदुर भीष्मांची आज्ञा घेत तिथून निघून गेला.
'मला माहिती आहे विदुर, मी आवाज वाढवून शब्द जरी टाकला तरी जन्मभर पंडु आतून कुढत, जळत महालात येऊन राजाचे कर्तव्य बजावेल. पण एक गोष्ट तुला कधी कळणार नाही विदुर! आणि कळूही नये! विवशता! ज्याच्या नशिबी येते, त्याचं आयुष्य पराधीन होतं. मनाविरूध्द आज्ञेचे पालन करावे लागणे शापाहून भिन्न नसते. हे माझ्या पेक्षा अधिक कोणाला माहित असेल?'
भीष्मांना अंबाचा अवतार आठवला. 'राजकुमारी अंबाने प्रचंड अग्नि पेटवून त्यात आत्मदहन केल्याचे वृत्त.... सत्य की असत्य?' भीष्माचार्य आठवणींनी कोसळले. 'तिने मृत्यू आधी भीष्मांच्या पराभवाची.... मृत्यूची अपेक्षा केली होती. पण म्हणून आत्मदहन? माता गंगेची रुष्टता कमी वेदनादायक होती देवी अंबा? गुरुदेवांवर उचललेल्या शस्त्राचा भार कमी होता? की आता एक स्त्रीच्या अश्या भयावह आत्मघातक मृत्यूचे कारण बनवलेत तुम्ही मला? पश्चात्तापाच्या होमकुंडात तर मी जळतोय, देवी. आणि त्यात होरपळून निघणाऱ्या या भीष्माच्या अदृश्य जखमांना अंतही नाही. या पंडुला अश्या ज्वाळांमध्ये कसा ढकलेन मी विदुरा?'

धृतराष्ट्र राजगादीवर बसला. त्याच्या नावाने सर्वत्र जयघोष झाला खरं, पण त्यात पंडु विषयी असणारा आदर नव्हता असं भीष्म, विदुर आणि धृतराष्ट्रासोबत शकुनीलाही जाणवलं. गांधारीला महाराणी पद मिळालं. अजून काय हवं होतं?
"ये धृतराष्ट्र. हे मिष्टान्न घे"
"धन्यवाद राजमाता. पण निमित्त कोणते आहे?"
"गांधारी आता माझं पद घ्यायचे म्हणतेय." अंबिकेनी हसून सांगितले.
"काय? गांधारी?"
"तिला काय विचारतोयस? लाजून नुसती लाल कळी झाली आहे तिची. आता काही मासांमध्येच तुझ्या पदाचा उत्तराधिकारी येणार आहे."
धृतराष्ट्राला आनंद झाला होता. शंभर पुत्र! आपले पुत्र तो मान मिळवणार जो आपल्याला मिळू शकला नाही. राज्याभिषेक! हस्तिनापुराचे महाराज बनणार. फक्त प्रतिनिधी नाही.... सर्वाधिकारी महाराज!
शकुनी आनंदाच्या परमशिखरावर होता. भीष्माचार्यांनी सर्वत्र नगरीला अन्न-वस्त्र दान करत होणाऱ्या बाळासाठी सदिच्छा जमवल्या. वार्ता घेऊन त्यांनी दासाला पंडुकडे रवाना केले.

©मधुरा

संस्कृतीधर्मलेख

प्रतिक्रिया

तूर्तास इतकेच सांगता येईल.