मतदान केलं काय ?

धर्मराजमुटके's picture
धर्मराजमुटके in काथ्याकूट
30 Apr 2019 - 8:48 pm
गाभा: 

नमस्कार !
काल मुंबई, ठाणे येथील मतदान पार पडले. मी ठाणे येथे राहतो मात्र मतदार कार्ड चांदिवली (उत्तर मध्य मुंबई ) मतदान क्षेत्रात असल्यामुळे त्या विभागात जाऊन मतदान करावे लागते.
गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा त्रास फारच वाढल्यामुळे सकाळी लवकर उठून उन्हाला चकवून मतदान पार पाडायचे असा निश्चय केला मात्र नेहमीप्रमाणे उशीरच झाला. केंद्रावर पोहोचलो तर वेगवेगळ्या पक्षांचे बुथ लागले होते. निवडणूक याद्या तपासून मतदान करण्यासाठीची चिट्ठी बनवायला गेलो तर तिथले कार्यकर्ते ऑनलाईन यादी चेक करुन तुमचे नाव यादीत नाही असे सांगू लागले. एकंदरीत सगळ्याच बुथ वर अनुभवी कार्यकर्त्यांची वानवा जाणवत होती. शेवटी स्वतःच छापील मतदार यादीतून नाव शोधून काढले.

यावेळी मोबाईल जवळ बाळगण्यास बंदी असल्यामुळे बायको, मुलगा आणि माझी चुकामुक झाली. एकमेकांना शोधण्यात अर्धा तास गेला. मोबाईल नव्हता तेव्हा माणसे एकमेकांना कशी शोधत होती ते आठवून हसू आले.

आमच्या विभागात प्रिया दत्त आणि पुनम महाजन हे दोन तुल्यबळ आणि बाकी १४-१६ लहान मोठे उमेदवार उभे होते.

यावेळेस व्हीव्हीपॅट चा प्रथमच उपयोग केला. मतदान यंत्रावर बटन दाबून बीप आवाज येणे आणी व्हीव्हीपॅट मधे आपण मतदान केलेल्या उमेदवाराचे नाव, निशाणी दिसेपर्यंत साधारण १०-१५ सेकंदाचा कालावधी लागत होता. त्यामुळे यावेळी मतदान करण्यास लागणारा कालावधी वाढला होता. मात्र आपले मत आपल्या आवडीच्या उमेदवारालाच गेले आहे याची खात्री आणि त्याचा पुरावा पाहणे हा एक आनंददायक अनुभव होता. मात्र तरीही काही लोक यावर ही शंका घेतीलच म्हणा !

आजचे वर्तमानपत्र वाचल्यावर मुंबईत सगळ्याच ठिकाणी २०१४ पेक्षा २-३ टक्के जास्त मतदान झाल्याचे समजले. एकंदरीत निवडणूक प्रक्रिया चालवणार्‍या यंत्रणेने, विविध पक्षांनी केलेल्या आवाहनाचा चांगला परीणाम जाणवला. मात्र कल्याण आणी पुणे इथे कमी मतदान झाल्याच्या बातम्यांनी थोडासा भ्रमनिरास झाला.
ठाण्यात प्रशांत कॉर्नर ने मतदानाचा पुरावा दाखविल्यास १ ग्लास मोफत कैरी पन्हे आणि ५० रु. ची पाणीपुरी ३० रु. मधे मिळेल अशी आकर्षक सवलत दिली होती पण दुर्दैवाने त्याचा लाभ घेता आला नाही.

योगायोगानेच मतदानाच्या दिवशी आमच्या विवाहाचा वर्धापन दिन होता. त्यामुळे पत्नीने सहकुटूंब सेल्फी घेऊन व्हाटसअप वर प्रकाशित करुन अभिनंदन आणि आशिर्वादपर शुभेच्छांचा आनंद लुटला ! एकंदरीत कालचा दिवस उत्साहाने साजरा झाला.

आम्ही मतदान करुन आपले कर्तव्य बजावले ! आपणही मतदान केलेच असणार ! मतदान केल्याबद्दल आपले अभिनंदन ! नसेल केले तर पुढच्या वेळी नक्की करा !

धन्यवाद !

प्रतिक्रिया

आणि विवाहवर्षपूर्तीच्या अनेकोत्तम शुभेच्छा!