स्पष्टीकरण मिळावे.

उपयोजक's picture
उपयोजक in काथ्याकूट
28 Apr 2019 - 6:55 pm
गाभा: 

मी एका समूहात (मला जमेल तितकी) मराठी अन्य भाषिकांना शिकवत असतो.ती शिकवताना काही उद्भवलेले प्रश्न.

१.'काढ' या शब्दासाठी नेमका असा एकच इंग्रजी शब्द आहे का?
२.पहा की पाहा?
३.पहातोस,पाहतोस,पाहातोस यातलं अचूक कोणतं?
४. बघणे आणि पाहणे या दोन्हीत फरक काय?
५. लाव या शब्दासाठी कोणतातरी एकच इंग्रजी शब्द वापरता येईल का? कारण आपण रोपही लावतो आणि टिव्हीही लावतो आणि मलमही लावतो. या तिन्ही कृती भिन्न आहेत.
६.असाच प्रकार 'घाल' बाबत कारण आपण कपडे घालतो,सॉकेटमधे पीन घालतो,कव्हर घालतो.
७.धर आणि पकड या दोन्हींत फरक काय?
८.चालवणे म्हणजे Ride,Drive,Conduct यातलं नेमकं कोणतं?
९. सांग आणि बोल या दोन्हींत फरक काय?
१०. अोढणे आणि खेचणे या दोन्हीत फरक काय?
११.भोगणे आणि उपभोगणे या दोन्हींत फरक काय?

नेमके अर्थ स्पष्ट करुन चुका होण्याची शक्यता कमी करण्याचा उद्देश आहे. _/\_

प्रतिक्रिया

तुषार काळभोर's picture

28 Apr 2019 - 7:44 pm | तुषार काळभोर

१.'काढ' या शब्दासाठी नेमका असा एकच इंग्रजी शब्द आहे का?
संदर्भानुसार बदलेल, पण take out चालावा. विहिरीतून पाणी काढणे, पायातून चप्पल काढणे यासाठी चालेल.
२.पहा की पाहा?
दोन्ही वापरले जातात, पण पाहा जास्त योग्य असावा.
३.पहातोस,पाहतोस,पाहातोस यातलं अचूक कोणतं?
पाहतोस
४. बघणे आणि पाहणे या दोन्हीत फरक काय?
Almost सारखेच. पिच्चर बघतो, पिच्चर पाहतो. डोंगर बघतो, डोंगर पाहतो. तरी पाहतो मध्ये एक ठरवून केलेली कृती येते.
५. लाव या शब्दासाठी कोणतातरी एकच इंग्रजी शब्द वापरता येईल का? कारण आपण रोपही लावतो आणि टिव्हीही लावतो आणि मलमही लावतो. या तिन्ही कृती भिन्न आहेत.
नाही. वाटही लावतो, पण त्यासाठीणपन इंग्रजी शब्द नाही. :)
६.असाच प्रकार 'घाल' बाबत कारण आपण कपडे घालतो,सॉकेटमधे पीन घालतो,कव्हर घालतो.
वरच्याप्रमाणे
७.धर आणि पकड या दोन्हींत फरक काय?
बहुतेक नाही.
८.चालवणे म्हणजे Ride,Drive,Conduct यातलं नेमकं कोणतं?
कार ड्राईव्ह करतो, सायकल आणि मोटारसायकल राईड करतो. Steering असलेली गाडी ड्राईव्ह करायची. ज्याच्यावर (घोड्यासारखं) बसून चालवतो, ती गाडी राईड करायची.
९. सांग आणि बोल या दोन्हींत फरक काय?
जेव्हा कुणीतरी ऐकत असतो, तेव्हा मी सांगत असतो. आणि कुणी ऐकत असो नसो, जेव्हा माझ्या तोंडून शब्द बाहेर पडत असतात, तेव्ह मी बोलत असतो.
१०. अोढणे आणि खेचणे या दोन्हीत फरक काय?
अंदाज - फरक नसावा. पण बैल गाडी ओढतो, खेचत नाही, एव्हढं नक्की.
११.भोगणे आणि उपभोगणे या दोन्हींत फरक काय?
योजक आणि उपयोजक यात आहे तसाच! :)

टीप १. सगळी उत्तरे बरोबर असतीलच याची गॅरंटी वारंटी नाही.
उपटीप १.१ मी दिलेल्या उत्तरातून प्रश्नकर्त्याचं कसलंही शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, शारीरिक, मानसिक, इ नुकसान झाल्यास उत्तरकर्ता जबाबदार नाही.
तळटीप १.२ उत्तरदायित्वास नकार लागू.
टीप २. इतर उत्तरातून जास्त योग्य वाटणारी उत्तरे मिळाल्यास माझी उत्तरे बदलण्याचा अधिकार राखून ठेवण्यात येत आहे.

सौन्दर्य's picture

28 Apr 2019 - 8:21 pm | सौन्दर्य

१.'काढ' या शब्दासाठी नेमका असा एकच इंग्रजी शब्द आहे का ?
'रिमुव्ह' चालेल का ?

२.पहा की पाहा?
मला वाटतं पाहा जास्त बरोबर आहे.

३.पहातोस,पाहतोस,पाहातोस यातलं अचूक कोणतं?
पाहतोस.

४. बघणे आणि पाहणे या दोन्हीत फरक काय?
अर्थ एकच आहे.

५. लाव या शब्दासाठी कोणतातरी एकच इंग्रजी शब्द वापरता येईल का? कारण आपण रोपही लावतो आणि टिव्हीही लावतो आणि मलमही लावतो. या तिन्ही कृती भिन्न आहेत.
इंग्रजीत क्रियापद नामानुसार बदलत जाते. जसं - sapling is PLANTED, TV is SWITCHED ON, Oinment is APPLIED. मराठीत तुम्ही म्हंटल्याप्रमाणे प्रमाणे 'लाव' चे विभिन्न अर्थ आहेत त्यामुळे एकच शब्द आपण वापरू शकत नाही.

६.असाच प्रकार 'घाल' बाबत कारण आपण कपडे घालतो,सॉकेटमधे पीन घालतो,कव्हर घालतो.
वरील प्रमाणेच

७.धर आणि पकड या दोन्हींत फरक काय?
'पकड' मध्ये घट्ट धर असा अर्थ अपेक्षित असावा.

८.चालवणे म्हणजे Ride,Drive,Conduct यातलं नेमकं कोणतं?
उत्तर पाच प्रमाणे.

९. सांग आणि बोल या दोन्हींत फरक काय?
जेव्हा काहीतरी माहिती समोरच्या व्यक्तीकडून हवी असते त्यावेळी आपण 'सांग' हे क्रियापद वाप्पारतो. इतर वेळी 'बोल' वापरतो.

१०. अोढणे आणि खेचणे या दोन्हीत फरक काय?
बहुतेक समानार्थी.

११.भोगणे आणि उपभोगणे या दोन्हींत फरक काय?
प्रश्न कठीणच आहे. तरी देखील ज्या गोष्टीं इच्छा असो वा नसो शरीराला सहन (आपल्या किंवा समोरच्याला) कराव्या लागतात त्या 'भोगणे' ह्या सदरात येऊ शकतात. ज्या गोष्टीत आपण स्व:खुशीने आनंद मानतो त्याला 'उपभोगणे' म्हणू शकतो.

भाषा हा माझा आवडीचा विषय आहे त्यामुळे उत्तरे देण्याचा प्रयत्न केला आहे, ही माझी अल्पमती आहे.

Rajesh188's picture

28 Apr 2019 - 8:27 pm | Rajesh188

He योग्य असेल

कंजूस's picture

28 Apr 2019 - 9:25 pm | कंजूस

चांगला उपक्रम.
-------
भाषा शिकताना दुसऱ्या भाषेतून शिकू नये, तुम्ही आणखी तिसरी आणू नका.
थेट दृष्य पाहायचं आणि वाक्य लक्षात ठेवायचं हाच मार्ग उत्तम. फार चिरफाड, व्याकरण, हे बरोबर का ते असे प्रश्न न करता जे बरोबर आहे तेच ध्यानात ठेवायचं. कोणत्याही भाषेला हेच लागू. आपल्याकडे शिक्षक नसतो म्हणून पुस्तके लागतात.
------
पैलवान, सौंदर्य यांनी उत्तरे दिलीच आहेत. शब्दांत सूक्ष्म फरक असतो तेव्हा वाक्यातील उपयोग फार महत्त्वाचा ठरतो.
४) आई,बघना,दादा मला कसा छळतोय.
* पाहू रे किती वाट?
* वाट पाहुनी थकले रे नंदलाला.
*एवढ्या कमी वयात जग बघितले. ( चार शहरं/देश नव्हे तर लोक कसे वागतात वगैरे सामान्य माहिती.

उपयोजक's picture

28 Apr 2019 - 9:35 pm | उपयोजक

धन्स!

हो! पाहा हाच योग्य आहे.अजून एका तज्ञाला विचारलं.

पाहा ची मूळ उत्पत्ती ही तमिळ 'पार'= पाहणे यातून आहे.मराठीत र चा ह झालाय.

अशुद्ध पोस्ट

उपयोजक's picture

29 Apr 2019 - 8:49 pm | उपयोजक

आहे.मी नाकारलेलं नाही.

अभ्या..'s picture

28 Apr 2019 - 10:29 pm | अभ्या..

दादा कोंडक्यांचे पिक्चर ट्युटोरेल म्हणून ठेवायची आयडिया कशीय?

तुषार काळभोर's picture

28 Apr 2019 - 10:39 pm | तुषार काळभोर

यांची उत्तरं मिळतील नक्की!

बोली भाषा दादा बोलायचे .
त्या मध्ये चुका kadu शकत नाही .
भाषा लेखन हा वेगळा विषय आहे

चौकटराजा's picture

30 Apr 2019 - 6:32 pm | चौकटराजा

आम्ही गोसावडी माणसं आमच्या कडे कुठंलं आले आहे सामान .... ? यातला सामान या शब्दाचा अर्थ शांता शेळकेंना अश्लील वाटला ,दादा म्हणाले " सामान म्हणजे दुसरा कोणता शब्द वापरावा " शेळके म्हणाल्या " ऐवज असा काहीतरी ! " दादा म्हणाले " आमच्या दृष्टी ने ऐवज या शब्दच " महा अश्लील आहे !

भाषांतर करताना एका भाषेतला वाक्याचा आशय दुसऱ्या भाषेत पोहोचवायचा असतो. एकेका शब्दाचा नव्हे. उदा
पाणी म्हणजे वॅाटर, काढणे म्हणजे ड्रॅा तर विहिरीतून पाणी काढणे -ड्रॅा वॅाटर फ्रॅाम अ वेल हे ठीक झालं पण प्रत्येकवेळी शब्दश: शक्य होईलच असं नाही.

तंबोरा वाजवणे ? तंबोरा लावणे?
प्ले आणि ट्यून हे माहीत आहे.

------
फक्त मराठी - इंग्रजी नसून इतर तमिळ, कन्नड धरल्यास आणखीनच घोळ वाढेल.
ननगे एरडवन्नु तिकिटगळन्नु कोडू
( मला दोन तिकटांना द्या.)
गिव मी टु टिकेट्स
मला दोन तिकिटे द्या.
------
थोडक्यात सोपे ठेवा.

मुळात ही तुलनाच अस्थानी आहे असे माझे मत आहे.

विनोद. D's picture

29 Apr 2019 - 11:25 am | विनोद. D

मराठी भाषा .लय भारी

बोलीभाषेमुळे भाषा बदलत असते आणि सदैव बदलत राहील .. प्रत्येक भाषेत कालानुपरत्वे अनेक बदल होत जातील , आणि मला वाटत त्याला मायमराठीही अपवाद नाही .. भविष्यात आंतरजाल प्रत्येक भाषा काहीप्रमाणात टिकवण्यासाठी मोलाची मदत करेल .. कुठलीही भाषा टिकवायची तर tila व्यवहारात आणणे क्रमप्राप्त आहे आणि तेच इथे होताना दिसत नाही . यासंदर्भात आपण दाक्षिणात्य भाषांचे उदाहरण आदर्श म्हणून डोळ्यासमोर ठेवू शकतो .. राहता रहिला प्रश्न लेखातल्या प्रश्नाचा तर मी पैलवान यांच्याशी सहमत आहे ... बाकी हे वर मांडले आहे ते माझे वैयक्तिक मत आहे . मला त्यावर चर्चा अपेक्षित नाही ...

उपयोजक's picture

29 Apr 2019 - 8:51 pm | उपयोजक

नुकतंच आंजावर मराठीने तेलुगूला मागे टाकले आहे.

शब्दानुज's picture

29 Apr 2019 - 2:36 pm | शब्दानुज

आमचे मराठी अगदी हुच्च आहे यु नो.
त्यामूळे हा प्रतिसाद किती सिरीअसली घ्यायचा हे त्याचे त्याने ठरवावे.

यात आधीच्या प्रतिसादांनी दिलेली उत्तरे एकत्रित करण्यात आली आहेत

आपण तुमच्या प्रश्नाचे गट पाडू. उत्तर द्यायला सोईचे होईल.

गट १ - एक मराठी शब्दसाठी समानअर्थी इंग्रजी शब्द ( प्रश्न १, ५, ६, ८ )

असे करण्याचा प्रयत्न टाळा. पूर्ण वाक्याचा अर्थ लक्षात घेणे महत्वाचे वाटते

पैलवान यांनी दिलेले उदाहरण -

कार ड्राईव्ह करतो, सायकल आणि मोटारसायकल राईड करतो. Steering असलेली गाडी ड्राईव्ह करायची. ज्याच्यावर(घोड्यासारखं) बसून चालवतो, ती गाडी राईड करायची.

गट क्रमांक २ व्याकरण (प्रश्न २ , ३)
माझ्यामते पहा बरोबर असावे. नक्की माहिती नाही
(उदा तो पहा विटेवरी..विठ्ठल विठ्ठल जय हरी..)

पाहणे बरोबर
(उदा - तुला पाहते रे.. )

गट क्रमांक ३ शब्दांचा नेमका अर्थ आणि त्यातील फरक (४, ७ ,९ १०, ११)

४ बघणे आणि पाहणे
हे दोन वेगळे शब्द आहेत अर्थ समानअर्थी असले तरी वापरायच्या जागा वेगळ्या आहेत

बघणे = see
पाहणे = watch

पाहणे ही ठरवून केलेली गोष्ट आहे. बघणे हे अजाणपणे केलेली गोष्ट आहे.

(उदा शुन्यात बघणे, पिक्चर पाहणे )

७ धर आणि पकड

हलणा-या वस्तूसाठी कदाचित पकड असावे (जिथल्या क्रियेत गती आहे असे)
( कॅच पकडणे , चोराला पकडले)

गतीहिन वस्तूंचे आदानप्रदानला धर वापरतात
(पेन धर , कागद धर असे )

९ सांग आणि बोल

प्रश्नार्थी वाक्याला दिलेला प्रतिसादासाठी सांग वापरतात
(मला उत्तर सांग , तुझे नाव सांग )

इतरवेळी बोल

१० अोढणे आणि खेचणे

जेव्हा वस्तू घेताना अवरोध अपेक्षित आहे , जोर जबरदस्ती आहे , अोढण्याची क्रिया सामान्य नाही तिथे खेचणे आहे

( रस्सीखेच , चेन खेचणे इ)

११ भोगणे आणि उपभोगणे

भोगणे हा शब्दास नकारात्मक छटा आहे
उपभोगणे हा सकारात्मक शब्द आहे.

( दुःख्ख भोगणे , पैसा उपभोगणे )

आनन्दा's picture

29 Apr 2019 - 6:23 pm | आनन्दा

मला खरे तर हा चर्चा विषयच आवडला नाही, पण

मराठीमध्ये शब्दांना अर्थछटा असल्याच पाहीजेट असा नियम आहे का?

उपयोजक's picture

29 Apr 2019 - 8:52 pm | उपयोजक

विभेदन जितके जास्त तितका नेमकेपणा जास्त नाही का?

आनन्दा's picture

30 Apr 2019 - 7:19 am | आनन्दा

असे अजिबात नाही..
बघणे आणि पाहणे यात फरक असलाच पाहिजे असा अट्टाहास का?

मुळात भाषा आधी की व्याकरण आधी या प्रश्नाचे उत्तर शोधले तर इतर सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील.

उपेक्षित's picture

30 Apr 2019 - 3:08 pm | उपेक्षित

आनंद यांच्याशी १००% सहमत,
काही काही वेळी आपण विनाकारण शुध्द भाषेचा आग्रह धरतो त्यातून नेमकी शुध्द भाषा हि कोणती ? सदाशिव पेठी ? (बायको सदाशिव पेठी आहे माझी हा प्रतिसाद पाहिला तर आहे बोंब आमची :) )

तसेच मूळ पोस्ट मध्ये अनेक समानार्थी शब्द आहेत त्यामुळे हे? का ते ? असा प्रश्न अडणे अस्थानी आहे.

शब्दानुज's picture

30 Apr 2019 - 5:29 pm | शब्दानुज

भाषा ही मला शरीरावर घातलेल्या कपड्यांसारखी वाटते. आपण एकाच प्रकारचे कपडे आयुष्यभर घालत नाही. सभोवतालचा , त्यांच्या कपडांच्या शैलींचा प्रभाव पडतोच. आपली आवडनिवड त्याप्रमाणे बदलत जाते. म्हणून माझ्यासाठी तरी प्रमाण भाषा , शुद्ध भाषा नावाचा प्रकार अस्तित्वात नाही.

ब-याच ठिकाणाचा ड्रेस कोड हा ठरलेला असतो. स्मशानात आपण भडक कपडे घालणे अपेक्षित नाही , पार्टीला मठ्ठ रंगाचे कपडे घालणे अपेक्षित नाही असे.

अशी काही मोजकी ठिकाणे सोडली तर कुठे कुठले कपडे घालायचे ही आपापली मर्जी. त्याचबरोबर त्यावर कुठले दागिने घालायचे वा घालायचे नाहीत ही सुद्धा आपली मर्जी.

त्याचप्रकारे बोलीभाषेत तुम्ही पाहिले म्हणा वा बघितले म्हणा काहीच फरक पडणार नाही. मात्र ज्याप्रमाणे लग्नात दागिने घालून मिरवले जाते त्याचप्रमाणे कवितेत , कथेत एक विशिष्ट अर्थ , ताल ध्वनित व्हावा असे लेखकास , कवीस अपेक्षित असते. यावेळेस तुम्हाला ह्या छटा माहिती असल्या तर त्यातील गंमत वाढते. नुसता दागिना आहे असे सांगून भागत नाही तर तो कुठला हेही सांगावे लागते. प्रत्येक दागिन्याचे आपले एक स्थान आहे. तसेच वेगवेगळ्या अर्थछटा हे भाषासौदर्य आहे.

एक अोळ गुणगूणून पहा - "पाहिले न मी तूला.."
आता तिथे "बघितले न मी तूला... "असे म्हणा. तुम्हाला जरासे चुकल्यासारखे वाटेल.

फक्त याकरता केवळ शब्दछटाच समजून नाही घ्यायच्या तर कपड्यांप्रमाणे त्याच्या वापरायच्या जागाही लक्षात ठेवायच्या. दोन्ही जमवून मग काव्यशास्त्राचा आनंद घ्यायचा.

मात्र याला जर तुम्ही ढोबळ व्याकरणाचे नियम
लावत बसलात तर त्यातील गंमत निघून जाईल हेही खरेच.

टीप - अशुद्धलेखनास हासु नये !

तुमचे मत बरोबर आहे, ग्राह्य देखेडल आहे.
फक्त उदाहरण चुकलंय

मुळात पाहणे आणि बघणे हे समानार्थी शब्दच आहेत, छंदाच्या दृष्टीने जे योग्य दिसेल ते वापरायचे इतकेच.
दिसणे हे क्रियापद वेगळे आहे.

आता भाषाशास्त्रीय बाजूने विचार केला तर
पाहणे हा संस्कृत पश्य या धातुपासून झालेले तद्भव क्रियापद आहे..

बघणे या शब्दाचे मूळ मला माहीत नाही, पण तो बहुधा देशी शब्द असावा..

मुळात एखाद्या शब्दाला अनेक समानार्थी शब्द असणे हे भाषावैभव आहे.. आता जल आणि पाणी यात अर्थ दृष्ट्या काय फरक आहे? एक तद्भव आहे आणि एक देशी, हे सोडल्यास काही फरक नाही, पण हाच जल पाजणे आणि पाणी पाजणे म्हटले की लगेच अर्थ बदलतो.
अशी सौंदर्यस्थळे सगळ्याच भाषांमध्ये असतात, पण अश्या सौंदर्यस्थळांचा आस्वाद घेण्याऐवजी त्याचा अभिमान करणे आणि त्याच्या जोरावर इतर भाषांना तुच्छ लेखणे याला काही अर्थ नाही.
बहुतेक मराठी प्रेमी असेच करताना दिसतात, त्यामुळे मला हल्ली मराठीवर चर्चा आवडत नाही.
भाषेकडे भाषा म्हणून बघा, हवे तर अस्मिता म्हणून बघा, वारसा म्हणून बघा, पण माझी भाषा तेव्हढीच श्रेष्ठ असा वृथा अभिमान बाळगू नका.

नमकिन's picture

29 Apr 2019 - 4:01 pm | नमकिन

दादा कोंडके ल‌‌‍‍ई आठवले!
Eject, delete/erase, withdrawn, काढता पाय घेतला- माघार घेतली, retract....

पहा जरा! आदराने.
बोली व लेखी स्वरूपात फरक आहे भाऊ.

घातला का कोलदांडा?

इच्छा आहे ऐकण्याची तेव्हा- सांग ना रे दादा, आवर्जून, आर्जव.
अनिच्छेने- बरं बोल चल पटपट

आनन्दा's picture

1 May 2019 - 8:19 am | आनन्दा

माझ्यामते

काढ' या शब्दासाठी नेमका असा एकच इंग्रजी शब्द आहे का?
२.पहा की पाहा?
बोलीभाषेत दोन्ही ग्राह्य आहेत, प्रमाणभाषेत बहुधा पहा.
३.पहातोस,पाहतोस,पाहातोस यातलं अचूक कोणतं?
सांगणे कठीण आहे, तीनही रूपे वापरलेली मी पाहिलेत.. पण पहा ला प्रत्यय लागताना त्याचे पाह होते, जसे, पाहिले, पाहून, त्यामुळे तुम्हीच ठरवा
४. बघणे आणि पाहणे या दोन्हीत फरक काय?
काहीही नाही
५. लाव या शब्दासाठी कोणतातरी एकच इंग्रजी शब्द वापरता येईल का? कारण आपण रोपही लावतो आणि टिव्हीही लावतो आणि मलमही लावतो. या तिन्ही कृती भिन्न आहेत.
एखादी गोष्ट दुसऱ्या गोष्टीला नेऊन टेकवणे, हा लाव चा मूळ अर्थ आहे.. आता टीव्हीच म्हणाल तर ते अपभ्रष्ट रूप आहे, पूर्वी दिवा लाव होते, दिव्याने दिवा लावणे वगैरे, पण इलेक्ट्रिक चे दिवे आले, ते पण 'लावतच' होते लोक. मग टीवी आले, फॅन आले, ते पण लावायला लागले. असे काहीसे असणार ते.
६.असाच प्रकार 'घाल' बाबत कारण आपण कपडे घालतो,सॉकेटमधे पीन घालतो,कव्हर घालतो.
घालणे पण तसेच. मूळ क्रिया कश्याच्या आत काहीतरी घालणे.. ग्राम्य भाषेत 'घालणे' म्हणजे काय हे आता मी सांगायची गरज नाही.
७.धर आणि पकड या दोन्हींत फरक काय?
काहीही नाही. एक शब्द संस्कृतोद्भव आहे, तर एक देशी/उर्दू (नेमके माहीत नाही) इतकाच..
८.चालवणे म्हणजे Ride,Drive,Conduct यातलं नेमकं कोणतं?
एखादी गोष्ट सुसूत्रपणे, अबी कौशल्यपूर्वक हलवणे म्हणजे चालवणे, सायकल, तलवार अगदी क्रियापद देखील चालवतात
९. सांग आणि बोल या दोन्हींत फरक काय?
काहीही नाही
१०. अोढणे आणि खेचणे या दोन्हीत फरक काय?
खेचणे हा हिंदी/उर्दू मधून आयात झालेला आहे. ओढणे कुठून आला माहीत नाही पण तो देखील आयातच आहे, बहुधा हिंदी मधून.. पण तरी देखील ओढ हा शब्द देशी वाटतो
११.भोगणे आणि उपभोगणे या दोन्हींत फरक काय?
भाग्य या शब्दाशी संबंधित हे दोन्ही शब्द आहेत.. भोगणे म्हणजे भाग्यवशात जे वाट्याला येईल ते.. सुख दुःख वगैरे.. उपभोगणे म्हणजे एखादी गोष्ट जवळ करून भोगणे.. स्पष्टच आहे की माणूस दुःख काय जवळ करून भोगणारे नाही. म्हणजेच ते सुख असणार..

असो. माझ्या क्षमतेप्रमाणे उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे.

आनन्दा's picture

1 May 2019 - 8:21 am | आनन्दा

हे राहिले

काढ' या शब्दासाठी नेमका असा एकच इंग्रजी शब्द आहे का?

काढ याचा शब्दशः अर्थ separate असा होऊ शकेल.. जिथे जिथे काढणे असते, तिथे separation असतेच असते.