झिम झिम झिम्मड झिम्माड

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in जे न देखे रवी...
12 Apr 2019 - 3:21 pm

झिम झिम झिम्मड झिम्माड .खेळ खेळू रंगात
आज काय पानोळ्या पानोल्या, आल्या खेळुन करवल्या
पाने मांडीता मांडीता, साखर सांडून त्या गेल्या.
एक करवली हरवली , कोणी नाही देखीली.
तीची उरली सावली, माया सारी सम्पली.
आई बापाची पोर ती . नवर्‍याने चोरीली.
एक फुल चिमुकले. सासूरवाशीन झाले.
लगनाच्या होमात. बाळपणी करपले.
झिम झिम झिम्मड झिम्माड .खेळ खेळू रंगात....
आज काय खेळू संसारी? कवड्या टाकेन चारी.
एक कवडी उलटली, माझी पाटी फुटली.
पाटी जशी फुटली, टचकन माया आटली.
लाह्या भाकर भाजता , विस्तव चटके हाताला.
वडाला बांधते दोरा , उलटव देवा हा फेरा.
माणीक मोती झाकले , सासूबाईने टाकले.
आई म्हणे तू परकी, असून बा ;मी पोरकी.
कोणी देईना थारा, जीव हा सैरा वैरा.
झिम झिम झिम्मड झिम्माड .खेळ खेळू रंगात....
आज काय खेळू गं पोरी? गोल वर्तुळ ये भाळी.
नको नको हे वर्तुळ बाई , जगणे अवघड होई.
वर्तुळ हे तोडूया , जुनी जळमटे झाडूया.
ज्योत घरी ही उजळूया ,लेक लाडकी शिकवूया,
आता नाही थांबणे. सुरू झाले जगणे
जग बदल घालुन घाव, आता हेच आम्हाला ठाव.
चिमणी आता बदलली , आकाशी झीपावली.
द्या तीला विश्वास. जिंकेल ती आकाश.
झिम झिम झिम्मड झिम्माड . झेपवूया गगनात.

कविता

प्रतिक्रिया

बालविवाह प्रथेचा बळी ठरलेल्या एका चिमुरडीला अर्पण .
भारतात / पुरोगमी समजल्या जाणार्‍या महाराष्ट्रात काही आदिवासी गावात अजूनही ही प्र्था चालुच आहे.
रुढी च्या विरोधात त्या मुलीचे आईबापही जाऊ शकत नाहीत

पाषाणभेद's picture

12 Apr 2019 - 4:16 pm | पाषाणभेद

भोंडल्यातील गाणी आठवली.