✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

पैशांवर डल्ला आणि स्टॉकहोम सिंड्रोम !

ह
हेमंतकुमार यांनी
Wed, 01/16/2019 - 14:50  ·  लेख
लेख
रविवारचा दिवस होता आणि सवयीप्रमाणे इंग्लिश पेपरातले मेगॅ-क्रॉसवर्ड सोडवत बसलो होतो. हे सोडवणे म्हणजे डोक्याचा भुगा होतो. सगळे कोडे कधी सुटत नाही पण निम्मे सुटले तरी मी आनंद मानतो. या कोडयातले एक शोधसूत्र लक्षवेधी होते. ते असे: ‘ओलीस व्यक्तीस तिच्या अपहरणकर्त्याबद्दल वाटणारे प्रेम’ ओळखायचा शब्दसमूह तब्बल १७ अक्षरी (९+८) होता. अन्य उभ्या-आडव्या शब्दांच्या मदतीने त्यातला दुसरा शब्द Syndrome असा सुटला. पण पहिल्यातले फक्त पहिलेच अक्षर S एवढेच कळत होते. खूप वेळ जाम डोके खाजवले पण शेवटी थकलो. पण डोक्यात किडा वळवळत होता आणि जाम अवस्थ होतो. मग गेलो गुगलराजाला शरण. त्यावर S ने सुरु होणारे सिंड्रोम माझ्या पुढ्यात दाखल झाले. आता उत्तर सापडले होते - स्टॉकहोम सिंड्रोम ! अगदी कुतूहल वाटले या शब्दाचे. स्टॉकहोम ही तर स्वीडनची राजधानी. मग तिचे नाव या ‘अवस्थेला’ का बरे दिले असावे? मग झपाटल्यासारखे त्याबद्दल वाचून काढले. प्रकरण एकदम रंजक वाटले. मानसशास्त्रातील या अनोख्या प्रकाराची ओळख झाली आणि स्वतःवर खूष झालो. एव्हाना या वाचनाने थकवा आला होता. जरा आळोखेपिळोखे देत होतो. तेवढ्यात कन्या जवळ आली. म्हणाली काय चहा हवाय वाटतंय. मी अर्थातच हो म्हणालो. मग चहा पिता पिता तिला या सिंड्रोमबद्दल उत्साहाने सांगू लागलो. तिच्या चेहऱ्यावर मला अधीरतेचे भाव दिसत होते. माझे बोलणे संपते ना संपते तोच ती म्हणाली, “अरे बाबा, मग तू नेटफ्लिक्स वरची Money Heist ही मालिका पहिलीच पाहिजेस, अगदी मस्ट- वॉच. या सिंड्रोमवरच आधारित आहे”. आता माझे कुतूहल अधिकच चाळवले गेले. मग पुढचे दोन आठवडे ही मालिका अगदी अधाशीपणे पाहत होतो. एकदम गुंगवून ठेवणारी. खूप आवडली हे सांगायला नकोच. माझ्या मुलीने त्या मालिकेचा ३ दिवसात फडशा पाडला होता हे ऐकून तिचा हेवा वाटला. नंतर कधीतरी जालशोध घेत असता अचानक ‘मदारी’ हा हिंदी चित्रपट गवसला. गमतीचा भाग म्हणजे यातही या सिंड्रोमची संकल्पना घेतली आहे. म्हणजे चित्रनिर्मात्यांना भुरळ पडावी असा हा विषय दिसतोय. इथल्या वाचकांना तो रंजक वाटेल या आशेने मी तो लेखनास निवडला आहे. आता या लेखात आधी स्टॉकहोम सिंड्रोमचा परिचय आणि नंतर ती मालिका आणि त्या चित्रपटाची थोडक्यात माहिती देतो. स्टॉकहोम सिंड्रोम समजा काही गुंडांनी काही निरपराध माणसांचे अपहरण करून त्यांना ओलीस ठेवले आहे. मुळात या गुंडांचे त्या ओलीसांशी काहीच वाकडे नसते. स्वतःच्या काही मागण्या अन्य कोणाकडून तरी मान्य होण्यासाठी त्यांनी हे कृत्य केलेले असते. यात सुरवातीस ओलीस खूप घाबरतात. त्यांच्या मनात या गुंडांबद्दल घृणा निर्माण होते. पण जसा ओलीसपणाचा कालावधी वाढत जातो तसे त्यांची मानसिक प्रक्रिया बदलते. एव्हाना त्यांना कळले असते की हे गुंड त्यांना कुठलीच इजा करत नाहीयेत आणि खाऊपिऊ पण घालताहेत. पण आपण जर त्यांच्या तावडीतून पळायचा प्रयत्न केला तर मात्र ते आपला जीव घेतील, हे स्पष्ट असते. त्यामुळे ओलीस शांत बसणे पसंत करतो. पुढे जसा हा कालावधी वाढत जातो तसे ओलीस आणि ते गुंड यांच्यात एक भावनिक बंध निर्माण होऊ लागतो. यामागे काही कारणे असतात. एकतर हे दोन्हीही गट बाहेरच्या समाजापासून दूर असे कोठडीत बंदिस्त असतात. या अति निकट संपर्कातून ओलीसाच्या मनात त्या गुंडांबद्दल काहीशी कणव उत्पन्न होते. काही व्यक्तींच्या अपहरण प्रसंगी जेव्हा अशी परिस्थिती निर्माण होते त्याला स्टॉकहोम सिंड्रोम असे म्हणतात. आता या मानसिक प्रक्रियेला स्टॉकहोमचे नाव का दिले गेले हे समजण्यासाठी १९७३ मधील एक घटना जाणून घेऊ. pict तेव्हा स्वीडनच्या तुरुंगातील एक कैदी पॅरोलवर सुटला होता. त्याचा अन्य एक साथीदार तुरुंगात होता. त्याच्या सुटकेच्या मागणीसाठी याने स्टॉकहोममधील एका मोठ्या बँकेवर दरोडा घालून तिथल्या ४ कर्मचाऱ्यांना पकडून ओलीस ठेवले. एकूण ६ दिवस हे लोक ओलीस होते. नंतर त्यांची सुखरूप सुटका झाली. पुढे त्या अपहरणकर्त्याच्या विरोधात न्यायालयात खटला उभा राहिला. आता पोलिसांनी त्या ४ लोकांना साक्षीदार म्हणून तयार केले. पण आता त्या चौघांनी त्या गुंडाच्या विरोधात साक्ष द्यायला चक्क नकार दिला. उलट त्याच्या बचावासाठी ते पैसे जमवू लागले ! त्यांच्या अशा विचित्र वर्तनाने पोलीस चक्रावून गेले. त्यांनी त्या कर्मचाऱ्यांचे मन वळवायचा हर तऱ्हेने प्रयत्न केला, पण व्यर्थ. शेवटी पोलिसांनी Nils Bejerot या मनोविकारतज्ञाला पाचारण केले आणि त्याची मदत मागितली. त्याने या प्रकरणाचा सखोल अभ्यास करून त्या व्यक्तींच्या अवस्थेला स्टॉकहोम सिंड्रोम हे नाव दिले. या घटनेनंतर अपहरणाच्या अन्य काही घटनांचाही अभ्यास करण्यात आला आणि त्यापैकी काहींत अशाच स्वरूपाचा अनुभव आलेला दिसला. त्यातून मानसशास्त्रज्ञांना अशा अवस्थेचा सखोल अभ्यास करण्याची प्रेरणा मिळाली. अनेकांच्या अभ्यासातून ‘स्टॉकहोम सिंड्रोम’ या संकल्पनेवर शिक्कामोर्तब झाले. या मनोवस्थेची काही वैशिष्ट्ये अशी आहेत: १. या अवस्थेचे मूळ माणसाच्या जिवंत राहण्याच्या अंतःप्रेरणेत दडले आहे. २. जेव्हा अपहरणकर्ता ओलीसास ठार मारणार नाही याची ग्वाही देतो तेव्हा ओलीसाच्या मनात त्याच्याबद्दल नकळत कृतज्ञता दाटून येते. ३. काही झाले तरी आपण मरणार नाही अशी ओलीसाची खात्री झाली की त्याच्या मनातला अपहरणकर्त्याबद्दलचा द्वेष मावळू लागतो. ४. काही वेळेस अपहरणकर्त्याच्या ज्या मागण्या असतात त्या योग्य आहेत असे ओलीसासही तात्त्विकदृष्ट्या पटते. त्यातून त्या दोघांत एक भावबंध निर्माण होतो. त्यातून ओलीसाचा पोलीस अथवा सरकारबद्दल नकारात्मक दृष्टीकोन तयार होतो. विशेषतः जेव्हा अपहरणकर्ता आणि ओलिसांचे कुठलेच वैयक्तिक शत्रुत्व नसते तेव्हा ही भावना अधिक बळावते. ५. ही अवस्था स्त्रियांमध्ये तुलनेने अधिक दिसून येते. ६. काही प्रसंगात तर अपहरणकर्त्याच्या मनात देखील त्याच्या ओलिसाबद्दल प्रेमभावना निर्माण होते. अशा या वैशिष्ट्यपूर्ण सिंड्रोमचा मानसशात्रात सतत अभ्यास चालू आहे. आता ही संकल्पना फक्त अपहरणासंदर्भातील गुन्ह्यापुरतीच मर्यादित नाही. अन्य काही प्रकारच्या गुन्ह्यांतही तिची नोंद झाली आहे. हे गुन्हे खालील प्रकारचे आहेत: १. घरगुती हिंसाचार २. धार्मिक अथवा पंथीय विद्वेष ३. युद्धकैद्यांचे अत्याचार ४. बलात्कार आणि सक्तीचा वेश्याव्यवसाय ५. बाल-लैंगिक अत्याचार. ६. रॅगिंगचे गुन्हे अशा गुन्ह्यांतील पिडीत व्यक्तीस काही वेळेस संबंधित गुन्हेगाराबद्दल सहानुभूती वाटल्याची अनेक उदाहरणे समोर आली आहेत. अर्थात त्यामुळे गुन्हेगारास शासन मिळण्याबाबत अडचणी निर्माण होतात हा यातून उद्भवलेला एक मोठा सामाजिक तोटा आहे. कित्येकदा बलात्काराच्या प्रकरणात पिडीत स्त्रीला आपला जीव वाचल्याचे समाधान इतके असते की त्यापुढे ती तो अत्याचार मुकाटपणे सहन करते. अपहरणाच्या प्रकरणांत जेव्हा ओलिसांची सुखरूप सुटका होते त्यानंतर मात्र त्यांना जबरदस्त मानसिक धक्का बसलेला जाणवतो. अर्थातच त्याची तीव्रता ओलीसपणाच्या कालावधीवर अवलंबून असते. त्यातून बाहेर पडण्यासाठी बरेचदा मानसिक समुपदेशनाची गरज भासते. आता कित्येकदा त्यांना अपराधी वाटू लागते. तेव्हा “केवळ जीव वाचवण्यासाठीच तुम्ही त्या गुंडाबद्दल प्रेम व सहानुभूती दाखवलीत”, असे त्यांना पटवून द्यावे लागते. ... ... स्टॉकहोम सिंड्रोमच्या संकल्पनेची अनेक चित्रनिर्मात्यांना भुरळ पडली आहे. त्यावर आधारित काही चित्रपट व जालमालिका लोकप्रिय झाल्या आहेत. त्यापैकी ज्या दोन कलाकृती मी पाहिल्यात त्यांचा आता परिचय करून देतो. Money Heist (हाइस्ट) ही मुळातली स्पॅनिश टीव्हीमालिका. त्याचे इंग्लिश रुपांतर नेटफ्लिक्सवर पाहण्यास उपलब्ध आहे. ही बऱ्यापैकी स्टॉकहोममधील बँक दरोड्यावर आधारित वाटते. ‘हाइस्ट’ म्हणजे दरोडा. यात स्पेनच्या राजधानीतील चलनछपाईच्या छापखान्यावर धाडसी सशस्त्र दरोडा टाकला जातो. या गुन्ह्याचा सूत्रधार एक बुद्धिमान पुरुष असून तो स्वतःला ‘प्रोफेसर’ म्हणवतो. तो निरनिराळ्या ठिकाणांहून ८ ‘हटके’ जणांना गाठून आणतो आणि त्यांची एक टोळी बनवतो. तो त्यांना सांगतो की दरोड्यादरम्यान आपली २ मूलभूत तत्वे असतील: १. आपण कुठल्याही ‘व्यक्ती’चा पैसा लुबाडणार नाही आहोत. आपण त्या छापखान्यावर दरोडा टाकून तिथे पूर्णपणे नव्या युरोच्या नोटा छापणार आहोत, आणि २. आपल्याला कोणत्याही परिस्थितीत खूनखराबा करायचा नाही. एकाही ओलीसास थोडी सुद्धा इजा होता कामा नये. दरोड्याचा कार्यक्रम अत्यंत विचारपूर्वक ठरवला जातो. या टोळीचे नियोजन वाखाणण्याजोगे आहे. ते दरोडा टाकतात आणि तिथल्या ६७ कर्मचाऱ्यांना अकरा दिवस ओलीस ठेवतात. या कालावधीत ही टोळी आणि ओलीस यांच्या दरम्यान जी दोन प्रेमप्रकरणे निर्माण होतात त्यांचा पाया या सिंड्रोमवर उभारला आहे. त्यापैकी एकात ओलीसांतील एक स्त्री त्या टोळीतील एकाच्या प्रेमात पडते आणि चक्क टोळीला सामील होते. तर दुसऱ्यात या प्रकरणाचा तपास लावणारी पोलीस स्त्री नकळत खुद्द त्या ‘प्रोफेसर’च्याच प्रेमात पडते. या उत्कंठावर्धक सुंदर मालिकेबद्दल अधिक लिहून रहस्यभेद करीत नाही. इच्छुकांनी जरूर पहावी. ............. ‘मदारी’ हा निशिकांत कामत दिग्दर्शित आणि इरफानची प्रमुख भूमिका असलेला हिंदी चित्रपट. यात इरफानने ‘निर्मल’ची भूमिका केली आहे. त्याचा मुलगा एक पूल कोसळून झालेल्या अपघातात मरण पावला आहे. तो पूल निकृष्ट दर्जाच्या बांधकामामुळेच कोसळला होता. त्या बांधकामास राज्याच्या गृहमंत्र्यांसकट अनेक सरकारी मंडळी जबाबदार होती. उद्विग्न झालेला निर्मल याचा सूड घेण्यासाठी गृहमंत्र्यांच्या मुलाचे अपहरण करतो. खूप काळ तो लपून राहतो. त्या दरम्यान रोहन व त्याच्यात एक मैत्रीपूर्ण नाते तयार होते. pict पुढे निर्मल रोहनच्या सुटकेच्या बदल्यात त्याची ‘मागणी’ जाहीर करतो. ती म्हणजे गृहमंत्र्यांसह त्या सर्व भ्रष्ट अधिकाऱ्यांनी जाहीरपणे त्यांच्या ‘खाबूगिरीची’ कबुली द्यायची आणि त्याचे थेट टीव्ही प्रक्षेपण होईल. अखेर ती मागणी मान्य होते आणि तो रोहनला सोडून देतो. त्या प्रसंगी रोहन त्याच्या वडिलांकडे जाण्यापूर्वी निर्मलला प्रेमाने घट्ट मिठी मारतो. हा प्रसंग या सिंड्रोमचेच निदर्शक म्हणता येईल. निर्मलने रोहनचे अपहरण करण्याचे कारण रोहनला मनापासून पटलेले आहे आणि भ्रष्टाचाराबद्दल त्याच्या मनात तिडीक उठलेली आहे. ......... ...... तर असा हा कुतूहल वाटावा असा स्टॉकहोम सिंड्रोम. दोन चित्रकृतींच्या निमित्ताने मला त्याची ओळख तुम्हास करून द्यावी वाटली. प्रतिसादांचे स्वागत ! *************************************
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
समाज
लेखनप्रकार (Writing Type)
आस्वाद

प्रतिक्रिया द्या
65598 वाचन

💬 प्रतिसाद (91)

प्रतिक्रिया

वाह!

स्मिता.
Fri, 06/07/2019 - 18:29 नवीन
पुढचा भाग येणार हे माहित होतंच. आता 19 जुलैपासून बघू पुढे काय होतंय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार

वाह!

स्मिता.
Fri, 06/07/2019 - 18:29 नवीन
पुढचा भाग येणार हे माहित होतंच. आता 19 जुलैपासून बघू पुढे काय होतंय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार

खूप छान लिहिलं आहे

nishapari
Sat, 06/08/2019 - 22:58 नवीन
खूप छान लिहिलं आहे
  • Log in or register to post comments

सुभाष घई यांचा हिरो चित्रपट

जॉनविक्क
Mon, 06/10/2019 - 16:20 नवीन
सुभाष घई यांचा हिरो चित्रपट देखिल याच पठडीतला आपण म्हणू शकतो.
  • Log in or register to post comments

ला कासा द पापेल!!

स्मिता.
Sun, 07/21/2019 - 18:54 नवीन
ला कासा द पापेल म्हणजेच मनी हाईस्टचा पुढचा भाग आलाय!!
  • Log in or register to post comments

धन्यवाद !

हेमंतकुमार
Sun, 07/21/2019 - 19:00 नवीन
नाव मस्त आहे. बघणे आठवडाभरानेच शक्य होईल. कशी वाटतेय प्रोफेसरची गँग ? ☺️
  • Log in or register to post comments

बघा आणि ठरवा! ;)

स्मिता.
Sun, 07/21/2019 - 19:37 नवीन
आताच काही बोलणं स्पाॅयलर होईल :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार

बर्लिन आवडते पात्र होते

जॉनविक्क
Sun, 07/21/2019 - 22:15 नवीन
बघूया यावेळी कोण चांगले वाटते ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्मिता.

यस्स!

स्मिता.
गुरुवार, 07/25/2019 - 17:40 नवीन
बर्लिन आणि त्यानंतर प्रोफेसर ही पात्रं माझी आवडती. टोकिओचे पात्रंही छान रंगवले आहे, तिचा भावनिक चढउतार व्यवस्थित टिपला आहे. कालच तिसरा भाग संपवला, कदाचित आणखी एक भाग येईल. Bella ciao गाण्याचा इतिहास बघता ही मालिका बनवण्यामागे फक्त व्यावसायीक हेतू असावा असं वाटत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जॉनविक्क

...

हेमंतकुमार
गुरुवार, 07/25/2019 - 18:19 नवीन
स्मिता, सहमत. टोकियोची भूमिका अगदी बिनधास्त अन बेधडक आहे. तुमच्या प्रतिसादाने माझी उत्सुकता चाळवली आहे पण अजून थोडा दम धरावा लागतोय. तिसऱ्या भागात किती उपविभाग आहेत ? रच्याकने…. The Wife पाहिलात की नाही ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्मिता.

मानवी मनाची अस्थिर वृत्ती

Rajesh188
Sun, 07/21/2019 - 22:58 नवीन
तुमची ही पोस्ट मानवी मनाची अस्थिर वृत्ती दर्शवते,( जीव वाचवणे हा मूळ हेतू असतो .ती सहज वृत्ती आहे सर्व मध्ये,) पण तुम्ही जे काही विविध प्रसंगाचे वर्णन केले आहे आणि त्यात मानवी स्वभाव उलगडून दाखवला आहे त्याला दुर्मिळ मध्ये दुर्मिळ म्हणता येईल . सर्रास असे घडत नाही .
  • Log in or register to post comments

...

हेमंतकुमार
Mon, 07/22/2019 - 05:47 नवीन
जॉन, सहमत. 'बर्लिन' ची भूमिका Pedro Alonso ने जबरदस्त केली आहे. त्याचा तो थंड खुनशीपणा त्याच्या देहबोलीतून व्यवस्थित उतरला आहे. दिसायलाही तो राजबिंडा आहे.
  • Log in or register to post comments

हुश्श !

हेमंतकुमार
Sat, 08/03/2019 - 13:03 नवीन
MH चा तिसरा मोसम बघून संपविला. छान. पण मोसम-१ व २ इतकी उत्कंठा यावेळेस नाही वाटली. त्यांची दरोड्याची ठराविक पद्धत आता अंगवळणी पडली आहे ! कथा अर्धवटच ठेवल्याने चौथा मोसम येणार असे दिसतेय.....
  • Log in or register to post comments

होय

जॉनविक्क
Sat, 08/03/2019 - 13:33 नवीन
त्यांची मोड्सऑप ठरलेलीच आहे पण यावेळी गोष्टी 100% बिघड़णार आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार

बरोबर,

हेमंतकुमार
Sat, 08/03/2019 - 14:11 नवीन
आता लढाईला सुरुवात तर झाली !
  • Log in or register to post comments

मजेदार बातमी...

हेमंतकुमार
Tue, 04/14/2020 - 12:39 नवीन
“मुंबई पोलिसांनी घेतली ‘मनी हाईस्ट’च्या प्रोफसरची मदत” मजेदार बातमी इथे: https://www.loksatta.com/manoranjan-news/mumbai-police-took-help-of-money-heist-professor-netizens-applauded-efforts-ssv-92-2130889/
  • Log in or register to post comments

चौथा सिजन

स्मिता.
Tue, 04/14/2020 - 17:59 नवीन
चौथा सिजन आलाय... माझं मत एवढ्यात सांगत नाही.
  • Log in or register to post comments

मनी हाईस्ट जबरदस्त आहे...

सतिश गावडे
Tue, 04/14/2020 - 19:15 नवीन
पहीला आणि दुसरा सिझन झपाटून गेल्यासारखे पाहीले. प्रोफेसर आणि पोलीस यांच्यातील बौद्धिक लपंडाव, चोरांमधील आपापसातील भावनिक गुंतागुंत, प्रोफेसरने प्लान ठरवलेला असतानाही काही प्रसंगांमध्ये चोरांचे ताण तणावांना शरण जाऊन ठरवलेल्या प्लानच्या विपरीत वागणं, प्रसंगी परस्परांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करणे सारं काही अफलातून लिहीलं आहे आणि कलाकारांनी जीव ओतून काम केलं आहे. या सिरिजचे विकी पेज वाचल्यानंतर त्या टीमने किती मेहनत घेतली असेल याची कल्पना येते. हेच पेज वाचताना एक मजेशीर गोष्ट कळली ती म्हणजे ही सिरिज स्पॅनिश भाषेतील असली तरी तिचे शिर्षकगीत इंग्रजीत आहे. कारण या शिर्षकगीताच्या गीतकाराला ते इंग्रजीतच सुचले.
  • Log in or register to post comments

धन्यवाद ,

हेमंतकुमार
Tue, 04/14/2020 - 19:34 नवीन
चौथा सिजन आलाय.
>>> आता नेफ्ली बंद केल्याने नाही बघू शकत. तुमच्याकडून जाणून घेईन सावकाश ! .........
तरी तिचे शिर्षकगीत इंग्रजीत आहे.
>>> रोचक. मस्त मालिका.
  • Log in or register to post comments

हा मला आवडलाय तुम्हीही पहा ..

चौकटराजा
Wed, 04/15/2020 - 09:16 नवीन
मला आता जे खूप गंभीर अर्थ असेल तरच फॅन्टसी चित्रपट पाहायला आवडतात जसे " चार्लीज चॉकलेट फॅक्टरी " बाकी सुपरमेन बॅटमॅन , स्पायडरमेन ड्रॅक्युला असले चित्रपटना मी कधीच गुडबाय केला आहे . काल मला एक चित्रपट आवडला " टीनएज बँक हेस्ट " व त्याच बरोबर " हॅकर " दोन्ही चे कथानक , अभिनय ,प्रिंट ऑडिओ चांगले आहेत . दोन्ही यु ट्यूब वर आहेत . १ हॅकर " https://www.youtube.com/watch?v=rf3-L5Pzh9s&t=130s २. टीनएज बँक हेस्ट https://www.youtube.com/watch?v=41KimZRIMCI
  • Log in or register to post comments

तुम्ही लॉर्ड ऑफ द रिंग्स

प्रचेतस
गुरुवार, 04/30/2020 - 17:39 नवीन
तुम्ही लॉर्ड ऑफ द रिंग्स एक्सटेंडेड अवश्य बघा. बॅटमॅन फक्त ख्रिस्तोफर नोलनचे बघा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

चौरा,

हेमंतकुमार
Wed, 04/15/2020 - 09:42 नवीन
सुचवणीसाठी धन्यवाद. सवडीने बघतो.
  • Log in or register to post comments

आदरांजली .....

हेमंतकुमार
गुरुवार, 04/30/2020 - 17:33 नवीन
इरफान यांच्या निधनाने या लेखातील 'मदारी' ची तीव्रतेने आठवण झाली. निर्मलची भूमिका छानच ! तो पुन्हा बघणार हे नक्की. .... आदरांजली .
  • Log in or register to post comments

खूपच छान लेख

बिपीन सुरेश सांगळे
Sat, 05/02/2020 - 22:10 नवीन
खूपच छान लेख तुमचे लेख नेहमीच छान असतात एक डायलॉग आठवला सैय्यादको बुलबुलसे प्यार हो गया
  • Log in or register to post comments

आदरांजली !

हेमंतकुमार
Mon, 08/17/2020 - 17:38 नवीन
‘मदारी’चे दोन्ही शिल्पकार आता काळाच्या पडद्याआड. आधी इरफान आणि आज निशिकांत कामत. आदरांजली !
  • Log in or register to post comments

१९८२ सालचा शक्ती सिनेमा लीमा

सोत्रि
Tue, 08/18/2020 - 05:52 नवीन
१९८२ सालचा शक्ती सिनेमा लीमा आणि स्टाॅकहोम ह्या दोन्ही सिंड्रोमवर आधारित आहे. नारंगला ओलीस बाल विजयची कणव येऊन त्याला सुटकेची संधी देणं, लीमा सिंड्रोम आणि युवा विजयने नारंगसाठी काम करणं, स्टाॅकहोम सिंड्रोम! - (बाॅलीवुडी सिंड्रोमची लागण झालेला) सोकाजी
  • Log in or register to post comments

जुना धागा वर आलाय तेव्हा हे

माहितगार
Tue, 08/18/2020 - 09:37 नवीन
जुना धागा वर आलाय तेव्हा हे जुने स्टॉ़कहोम गाणे जरा एंजॉय करून बघा
  • Log in or register to post comments

+१

हेमंतकुमार
Tue, 08/18/2020 - 09:47 नवीन
सोत्रि व मागा, माहितीसाठी धन्यवाद ! छान गाणे
  • Log in or register to post comments

याझीदी स्त्रींचे शोषण, गुलामी, सक्तीची धर्मांतरे आणि पाकीस्तान

माहितगार
Tue, 08/18/2020 - 18:01 नवीन
अनेक आभार, या निमीत्ताने पुन्हा एकदा नकोश्या वाटणार्‍या विषयावर चर्चा करतोय असे वाटण्याचा संभव आहे, पण अगदी गेल्या सहा वर्षांपुर्वी इराकात अपहृत केल्या गेलेल्या ३००० याझिदी स्त्रीयांचा थांगपत्ता अजूनही लागलेला नाही (अलिकडील संदर्भ वृत्त). एकवेळ अपहारकर्त्या मध्ययुगिनांच्या कागदोपत्री स्त्रीगुलामांच्या व्यापाराचे लैंगिक छळवणूकीचे, जबरदस्तीच्या लग्न आणि धर्मांतराचे दाखले मिळतील पण स्त्रीयांचा स्वतःचा ब्र ही निघताना दिसत नाही. एकाही पळवल्या गेलेल्या अथवा लैंगिक शोषण झालेल्या स्त्रीचा मुलगा साक्षर झाला नसेल का ? आणि त्यापैकी एकाही स्त्रीने आपली छळ गाथा नोंदवून घेऊ नये ? लैंगिक छळा विरुद्ध उठाव होणे दूरच नंतरच्या पिढ्या प्रश्नांकीत धर्मग्रंथांतील प्रश्नांकीत मांडणीचे समर्थन करताना दिसतात. पाकीस्तान सारख्य तथाकथित स्वतंत्र देशात लोक आक्रमकांचीचे समर्थन करताना दिसतात असो.
  • Log in or register to post comments

कथा इराणची

माहितगार
Tue, 08/18/2020 - 18:06 नवीन
गंमतीची गोष्ट म्हणजे अख्ख्या इराणचे ईस्लामीकरण जायदादींवर अंकुश आणून सक्तीने केले गेले, सुन्नी ते शिया असे अतंर्गत धर्मांतरणही बर्‍यापैकी क्रौर्‍याने राबवले गेले हे सगळे रेकॉर्डवर असूनही त्यांना त्याचे काहीही न वाटता ते त्याचे समर्थनच करताना दिसतात. (अर्थात नवीन पिढ्यात इस्लामचा त्याग करणार्‍यांची सर्वाधिक संख्याही इराणमध्येच असल्याचे बोलले जाते, हे वास्तव आहे की पाश्चिमात्य प्रचारतंत्र ह्याची कल्पना नसली तरी त्यात तथ्य असावे असे वाटते.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार

हा अंकल टॉम सिंड्रोम

निनाद
गुरुवार, 01/13/2022 - 07:27 नवीन
पहिली पीढी अंकल टॉम सिंड्रोम मध्ये असते. अंकल टॉम सिंड्रोम मध्ये धोक्याचा सामना करताना निष्क्रीयता आणि अधीनता वापरतात , ज्यामुळे त्यांचे खरे विचार आणि भावना लपवून ठेवतात. पुढे त्याचीच सवय होत जाते. पुढील पीढीला याची काहीच माहिती नसल्याने ते वरवरच्या वर्तनाला पाहतात आणि तेच घेऊन पुढे जातात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार

यावरून ..

हेमंतकुमार
Tue, 08/18/2020 - 18:18 नवीन
लेखातील सिंड्रोमचे विविध अविष्कार दिसून येतात !
  • Log in or register to post comments

रोचक माहिती आहे...

गॉडजिला
Fri, 09/03/2021 - 19:42 नवीन
M H मध्ये स्टॉकहोम सिंड्रोम दाखवलेला तर आहेच पण सर्वात वेगळ्या प्रकारे... त्यासाठी तुम्हाला कथानकातील स्टॉकहोम उर्फ मोनिका व आर्तुरो रोमन यांची केमिस्ट्री बघावी लागेल :) मदारी देखील छान होता
  • Log in or register to post comments

+१ १

हेमंतकुमार
Fri, 09/03/2021 - 19:52 नवीन
अगदी सहमत !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॉडजिला

मनी हाइस्ट : ५

हेमंतकुमार
Sat, 09/04/2021 - 12:37 नवीन
मनी हाइस्ट : ५ काय आहे ‘बेला चाओ’ या गाण्याचा अर्थ ? संपूर्ण देशाला पडलाय प्रश्न, पाहा Google ची आकडेवारी. https://www.loksatta.com/manoranjan-news/what-is-meaning-of-bella-ciao-song-from-popular-netflix-s-series-money-heist-aad-97-2585189/
  • Log in or register to post comments

आठवलं…

गॉडजिला
Sun, 09/05/2021 - 00:56 नवीन
गोरे गोरे ओ बांके छोरे कभी मेरे गली आया करो… बेला चाओ चि चाल ढापलि आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार

हा घ्या

हेमंतकुमार
Wed, 09/08/2021 - 19:05 नवीन
गाण्याचा मराठी अवतार ! https://youtu.be/oQoz8OgkQoc
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॉडजिला

Real money heist is done by

गॉडजिला
Sat, 09/04/2021 - 20:47 नवीन
Real money heist is done by those who have watched it without subscription ;)
  • Log in or register to post comments

अ ग दी च !

हेमंतकुमार
Sat, 09/04/2021 - 20:52 नवीन
हा हा हा !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॉडजिला

बँक दरोड्याचा 'मसाला'

हेमंतकुमार
Wed, 01/12/2022 - 11:12 नवीन
नुकताच प्राईम वरील The heist of the century (हिंदी रुपांतर) हा चित्रपट पाहिला. यापूर्वी बँक दरोड्याचे असे काही पाश्चिमात्य चित्रपट बघून झालेले आहेत. अशा बहुतेक दरोड्यांमध्ये मला काही समान वैशिष्ट्ये आढळळी. त्याची ही जंत्री : १. बहुतेक सर्व दरोडेखोर बुद्धिमान आणि उत्तम नियोजक असतात. २. त्यांचा स्थापत्यशास्त्र, वास्तुरचना आणि मानसशास्त्र यांचा दांडगा अभ्यास असतो ! ३. दरोडा घालण्यासाठी ते ड्रील व जी अत्याधुनिक साधने वापरतात त्यापुढे जगातील कुठलीही भिंत अभेद्य असते ! ४. सुट्टीच्या दिवशी बँकेत दरोडा घालण्यासाठी बहुतेकदा ते बाजूच्या गटारात उतरून मग वरच्या दिशेने भगदाड पाडून आत शिरतात. ५. गुन्हयात पकडले गेल्यावर शिक्षेचे स्वरूप काय असते याचाही त्यांचा अभ्यास असतो. त्यानुसार ते गुन्ह्याची तीव्रता ठरवतात. ६. प्रत्यक्ष तिजोरी उघडल्यानंतर त्यांना नोटांच्या बरोबरीने सोन्याच्या चिपांमध्येही चांगलाच रस असतो. ... अशाप्रकारे या चित्रपटांचा एक ठराविक ‘मसाला’ तयार झालेला दिसतो. 😍
  • Log in or register to post comments

सुधारणा ..

हेमंतकुमार
Wed, 01/12/2022 - 11:18 नवीन
अभेद्य असते >>>> नसते असे वाचावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा