मुंबई धडे - २
मागच्या लेखात मी चुकून २००५ साली मुंबई ला आल्याचा उल्लेख केला आहे . मी २००६ साली कोकणातून मुंबई मध्ये आले .
जूनच्या मध्यावर साधारण क्लास सुरु झाला. मुंबई लोकलची, गर्दीची नि पावसाची हळूहळू ओळख आणि सवय व्हायला लागली. आधी कितीतरी वेळा लोकल मधून होणाऱ्या चोऱ्यांविषयी ऐकलं होत त्यामुळे जाता येता ओढणी गळ्याभोवती गोल फिरवून घ्यायचे. म्हणजे कुणी गळ्यातली चेन ओढायला नको कि ओढणी कुठे अडकायला नको. लहानपणापासून एकटीने प्रवास केला असल्याने स्वतःची नि स्वतःच्या सामानाची काळजी घेण्यास मी समर्थ होते. पण लोकल माहितीची नाही त्यामुळे एक अजाणता भीती मनात होती. कदाचित इतरांनी आधीच सवधगिरीच्या इतक्या सूचना दिल्या होत्या म्हणूनंही असेल कि मी जरा जास्तच काळजी घेत होते.
पाऊस आणि लोकल बंद पडणे हे नित्याचे असते. एक दिवस खूपच पाऊस होता. पाणी तुंबल्याच्या टीव्हीवर सारख्या बातम्या येत होत्या. म्हणून मग सरांना फोन करून क्लास आहे कि नाही विचारलं. सरांनी एक दिवस सुट्टी दिली. दुसऱ्या दवशी परत तीच स्थिती. थोडा वेळ थांबून पाऊस परत सुरु. परत सरांना फोन, क्लास आहे कि नाही. आमच्याप्रमाणे इतरही जणांनी फोन करून सरांना त्रास दिला होता. सरांनी शांत शब्दात सगळ्यांना एकच उत्तर दिलं कि क्लास होणार आहे तुम्ही या अथवा येऊ नका. पाऊस रोजच येणार आहे त्यासाठी क्लास या सुट्टी नाही. सुदैवाने ठाण्याला पाणी भरलं नव्हतं. मी नि केतकी क्लासला गेलो. विद्याविहार स्टेशनच्या परिसरात देखील पाणी नव्हतं. काही लोकलच्या ट्रॅकवर मात्र पाणी होत. क्लासच्या रस्त्यावर एखाद्या भागात पाणी साचलं होत. आम्हाला जीन्सची सवय नसल्याने क्लासला पोहोचेपर्यंत आमच्या दोघींचे ड्रेस बरेचसे भिजले होते. क्लास मध्ये बरेच जण आले होते. अगदीच लांब राहणार कुणी आलं नव्हतं. बाकी सगळे सरांचं उत्तर ऐकून निमूट आले होते. सरांनी एकदाच बजावलं. या एवढ्याश्या पावसात रोज रोज क्लासला सुट्टी देता येणार नाही. जीन्स फोल्ड करा चालायला लागा. एवढ्याश्या पाण्याने ट्रेन बंद पडत नाहीत कि रस्ते चुकत नाहीत. रोज मला फोन करायचा नाही. मी दादरहुन येऊ शकतो तुम्हालाही यायला काही प्रश्न नाही. सगळे चिडीचूप. नेहमीप्रमाणे क्लास झाला. पाऊस पण थांबला सुखरूप घरी पोहोचलो.
मी लक्षात ठेवलेली गोष्ट, कि एवढासा पाऊस नि एवढास पाणी बरेच वेळा भरत त्याचा बाऊ करायचा नाही. मिलन सबवे पाण्याखाली या बातमीने अजिबात पॅनिक व्हायचं नाही. पावसाळ्यात तो रुटीन चा भाग आहे.
याच वर्षात लोकल चा आणखी एक मोठा अनुभव मला आला. बातम्यांमध्ये बघत असलेली पण प्रत्यक्षात काय हालत होते तो अनुभव मला आला अर्थात थोड्या दुरूनच . काका काकू फिरायला गेल्याने एक महिनाभर बाबा माझ्यासोबत येऊन राहिले होते. आम्ही नेहमीप्रमाणे क्लासला गेलो. क्लास सुरु झाला. आणि ७ वाजायच्या सुमारास सरांना फोन आला कि ट्रेन मध्ये बॉम्बब्लास्ट झालाय. सरांनी आम्हाला शांतपणे परिस्थितीची कल्पना दिली. कुठे ब्लास्ट झालाय, नक्की काय परिस्थिती आहे काहीच माहित नव्हते. सरांनी लगेच क्लास सोडून दिला. आम्ही प्रचंड टेन्शनमध्ये स्टेशन पर्यंत आलो. घरी फोन लावायचा प्रयत्न केला पण सगळ्या फोन लाईन्स बंद पडल्या होत्या. आम्ही स्टेशनला आलो. आमचा पास सेकंड क्लासचा होता. पण इतकी प्रचंड गर्दी सगळ्या गाडयांना होती कि चढायची सोय नव्हती. २/३लोकल अशाच सोडल्या. त्यातल्या त्यात फर्स्ट क्लासला निदान शिरता आलं असतं असं लक्षात आलं. पण सेकण्ड क्लासचा पास असताना फर्स्ट मध्ये कसं चढणार? टीसीने पकडलं तर ? हेच डोक्यात. आमच्या दुसऱ्या मुंबईकर मैत्रिणीने खेचत फर्स्ट क्लासचा डबा थांबतो तिथे आणून उभी केलन. आमची तरीही हीच चर्चा कि पास नसताना कसं चढायचं ? मैत्रीण म्हणाली असं काही नाही. आता या अशा वेळी कोणी तुमचा पास नि तिकीट विचारत नाही. शेजारची एक बाई आमचं बोलणं ऐकत होती. वयस्कर होती. म्हणाली काळजी करू नका. या अशा वेळी तुम्ही जनरल डब्यात जरी चढलात तर तुम्हाला कोणीही काहीही करणार उलट लागली तर मदतच करेल. अगदी बिनधास्त कुणाचीही मदत मागा. आणि टीसी देखील अश्या वेळी कुणाला काही विचारत नाही. लोकलमध्ये चढल्यावर नवीन नवीन बातम्या येत होत्या. मोबाईल नेटवर्क जॅम झाल्याने कुणाचेही फोन लागत नव्हते. वेस्टर्न लाईनवर ब्लास्ट झाल्याचं कन्फर्म सांगत होते. कोणी ७ ब्लास्ट कोणी १० ब्लास्ट झाल्याचं सांगत होते. प्रत्येकाला घरी जायची घाई होती. ट्रेनमध्ये सगळ्यांच्या तोंडी हा एकच विषय. शिवाय आपणही ट्रेन मधूनच प्रवास करतोय, तिकडे झाले इकडे होणार नाहीत कशावरून,उलट आता तर आणखीन गर्दी असे एक ना अनेक विषय चालू होते. धीर देणे आणि आपली भीती दुसऱ्याबरोबर शेअर करणे चालू होते. थोड्याच वेळात ठाणे आलं. स्टेशनवर इतके दिवसात न पाहिलेली अलोट गर्दी बघितली. रोजची असणारी गर्दी नि हि गर्दी यात बराच फरक जाणवला. आम्ही ठाण्याला पोचल्यावर जरा दम घेतला. तरीही स्टेशन सोडून कधी एकदा घर गाठतोय अस झालेलं. घरी बाबा काळजी करतच होते. मला दारात बघितल्यावर त्यांना हायसं वाटलं.
यावेळी शिकलेली गोष्ट म्हणजे आणीबाणीच्या वेळी अफवांवर विश्वास ठेवू नये. अशा वेळी मदतीला तयार असणारी खूप जण असतात. याच वेळी माणुसकी जास्त महत्वाची असते आणि सर्वसाधारणपणे सगळे जण एकमेकाला मदत करायला तयार असतात. या दिवशी बातम्यांमध्ये ऐकलेल्या नि वाचलेल्या मुंबई स्पिरिट अनुभवता आलं.
प्रतिक्रिया
22 Dec 2018 - 9:59 am | गवि
तरीच.
२००५ ला आला असतात तर पहिला लेख (धडा) बहुधा आत्तापेक्षा वेगळाच असता. नशिबाने त्या वर्षी आला नाहीत.
हाही लेख चांगला.
22 Dec 2018 - 10:31 am | जेडी
वाचतेय , मुबईकरांना नाहीपण आमच्या सारख्या लोकांना हे तुमचे मुंबईचे धडे उपयोगी पडतील
22 Dec 2018 - 10:32 am | कंजूस
आता या लेखांमुळे इतरांनाही घडलेले प्रसंग सांगायला हुरुप येईल.
खरं सांगायचं म्हणजे काय फजिती झाली,अडचणी आल्या हे मांडणे हेच "किती छान प्रवास झाला मज्जा केली" वगैरे कुणाला नकोच असतं. कारण त्यातून काही शिकायला मिळत नाही. इतरांना सावध करता येतं.
लिहीत राहा.
बाहेरगावच्या रेल्वेमध्येही कसे सावध राहावे लागते, फसवतात,चोऱ्या हे माहीत असणे गरजेचे आहे.
22 Dec 2018 - 10:38 am | जेडी
आमच्या एका कलिगच्या सासू-सासरे ठाण्याला राहतात . ते कोठून तरी गावावरून आले होते कि ट्रिप वरून . यायच्या शेवटच्या दिवशी उतरताना चोराने त्याच्या सासूबाईंच्या गळ्यातले मंगळसूत्र मागच्या मागे खेचायचा प्रयत्न केला . बहुदा त्या सर्वात मागे होत्या. त्या तशाच मागे पडल्या . फोनही पडला . तो चोर फोन घेऊन गेला पण सासूबाई हार्ट अट्याक ने जागेवर गेल्या . दवाखान्यात वैगेरे नेताना चोराने पहिले असणार . त्याचा चार पाच दिवसांनी फोन आला होता त्या ट्रेन मध्ये पडलेल्या कशा आहेत म्हणून ?
त्याचा मेव्हणा दुबईला असतो आता सासरे बिचारे एकटेच ठाण्यात राहतात . आयुष्यभर शहरात राहूनही हि वेळ येऊ शकते
22 Dec 2018 - 4:18 pm | बबन ताम्बे
https://www.misalpav.com/node/38930
☺