नवी सायकल आणि पहिली सेंच्युरी

Primary tabs

mayu4u's picture
mayu4u in जनातलं, मनातलं
8 Nov 2018 - 3:12 pm

(मी पहिली सायकल घेतली तेव्हाचं हे लेखन... अलीकडेच नवीन सायकल घेतली आणि पहिल्यांदाच १०० किमी ची राईड मारली. या अनुभवाविषयी लिहिण्यासाठी सरपंचांनी सुचवलं, तेव्हा मिपाकरांच्या "सायकल सायकल" या कायप्पा समूहावर केलेलं लेखन)

श्री मामा प्रसन्न

आनंदरावांच्या आशीर्वादाने, सर्पंचांच्या सूचनेनुसार, सर पाध्ये सर यांच्या सल्ल्याने आणि ग्रुपातल्या सर्वांच्या प्रेरणेने आज पहिली सेंच्युरी झाली. या शतकाचं श्रेय सम्पूर्णपणे या ग्रुप चं आहे. इथून वेळोवेळी मिळालेल्या टिप्स, ट्रिक्स, सल्ले आणि प्रेरणा यामुळेच हे शक्य झालं. मनापासून आभार!

नवी सायकल घ्यायचं असं काही खरं तर मनात सुद्धा नव्हतं. मी माझ्या जुन्या बगेरघेर वर खूश होतो. उगीच एक दिवस अप्पांची नवी मॉन्ट्रा बघून डोक्यात किडा आला, आणि निनाद, मोदक्रॉ, प्रासदा, अरिंजयदादा यांनी हवा भरली. मग नव्या सायकलीचा शोध सुरू केला. नेहमी प्रमाणे ग्रुपातल्या तज्ञांचं मार्गदर्शन होतंच. मोसदातेंनी आवर्जून ट्रेक फक्स1 सजेस्ट केली. नव्हे, आग्रहच केला! मी सुमारे 20 सायकली शॉर्टलिस्ट केलेल्या. त्यातून चाळण लावून 5 निवडायला मोदकने मदत केली. या दरम्यान सिद्धू भाऊंनी फोन करून पुण्यात मिळत असलेल्या सायकलिंविषयी पण सांगितलेलं; आणि त्यांनी त्या मालकांना संपर्क पण केलेला... पण त्या मालक लोकांनाच बहुदा मला सायकल द्यायची नव्हती. :( असो.

शॉर्टलिस्ट केलेल्या 5 सायकलिंविषयी पण ग्रुपात बरीच चर्चा केली, आणि डॉक च्या सल्ल्याने ट्रेक फक्स1 फायनल केली. मग ती मुंबईत घ्यायची की बंगलोराहून मागवायची यावर मोसदातेंशी आणखी चर्चा... फार त्रास दिला त्यांना मी :D . पण शेवटी मुंबईत घ्यायचं नक्की केलं. ट्रेक च्या मुंबईतल्या डीलर्स शी बोलून कुठं स्टॉक अव्हेलेबल आहे ते पाहिलं, आणि दादर ला अंबिका मधून घ्यायचं नक्की केलं.

सायकल घ्यायला वेळ काढून प्रासदा आणि निनाद आवर्जून सोबत आले. अंबिका सायकल्स चा मालक जयेश स्वतः सायकलिस्ट असल्यानं त्याने पण अनेक गोष्टी एक्स्प्लेन केल्या. आणि जेव्हा माझी सायकल असेंम्बल करून तयार झाली तेव्हा... ती पाहताच बाला, कलीजा खलास झाला! दुकानातून बाहेर पडलो तेव्हा निनाद आणि प्रासदा काहीतरी सांगत होते; आणि मी आपला कधी एकदा बघीरा (हो, काळी कुळकुळीत आणि चित्त्यासारखी फास्ट म्हणून मी हे नाव ठेवलं तिचं) वर टांग मारतो म्हणून तडफडत होतो. माझी घालमेल त्यांच्या पण लक्षात आली, आणि दोघांनी मला लौकरच मोकळं केलं.

तिला घरी आणतानाची राईड मस्तच होती... बिटविन च्या सिंगल स्पीड पेक्षा ही सुंदरी लै भारी आहे, याचा अंदाज पहिल्या राईड लाच आला.

पण दुसऱ्या दिवशी जेव्हा तिला बाहेर काढली तेव्हा चेन चा आवाज येतो असं काहीतरी वाटू लागलं... काळजीपोटी मी प्लॅन केलेला त्याच्या निम्म्यापेक्षा कमी अंतरातून परत फिरलो. परत आल्यावर ग्रुपात विचारलं. आणि ऍज एक्स्पेक्टेड, लगेच माझं काय चुकलेलं ते सर्वांनी समजावून सांगितलं. गियर रेश्यो कसा मेंटेन करायचा त्याबाबत (पण) मी अडाणी होतो. पण इथं कळलं.

मग मात्र ट्रेक चालवणं हा एक आनंदसोहळा झाला... लै म्हणजे लैच मजा येऊ लागली.

4 नोव्हे ला ब्रह्म करायची असं आधी ठरवलेलं; पण तयारी झाली नव्हती. इन फॅक्ट, त्या आधी शंभर किमी ची राईड पण केली नव्हती. म्हणून 4 ला मिलिंद्दांना ब्रह्म ला सोबत करायची आणि 100 तरी करायचे असं ठरवून बाहेर पडलो...

पण तो दिवसच खराब होता बहुदा... आधल्या रात्री झोपायला उशीर झाला. मग बराच वेळ झोप लागली नाही. जेमतेम 3 तास झोपून उठलो, आणि बघीरा ला बाहेर काढली तर सकाळी सहा वाजता पण उकाडा. त्यात मिलिंद्दांशी चुकामुक झाली. निनाद भेटला, पण त्याची सायकल पंचतुरे झालेली. पुढे कल्लेश्राव भेटणार होते, पण त्यांना घरून लौकर बोलावल्यानं त्यांची भेट पण हुकली. आणि हे सगळं झाल्यावर 83 किमी नन्तर वसई जवळ दोन्ही पायात बेक्कार क्रॅम्प्स आले... उभं पण रहाता येईना... फ्लाय ओव्हर वरच कडेला बसकण मारली... मग मोदक्रॉ चं नाव घेतलं आणि एक टेम्पो थांबवला. त्यानं फौंटन ला सोडलं. पुढं हळूहळू आलो घरी. एकूण 92 किमी झाले. पण सेंच्युरी हुकल्यानं मी स्वतः वर फार म्हणजे फारच चिडलेलो... इतका, की स्त्रावा वरून 92 किमी ची ऍक्टिव्हिटी पण डिलिट करून टाकली!

क्रॅम्प्स कशाने आले असतील असं विचारल्यावर मोदक म्हणाला, पाणी कमी पडलं. स्वतःला हायड्रेट करत रहायला हवं. अरिंजयदादा म्हणाले, 50किमी नंतर ors पण घे. मी तसं लिंबू सरबत प्यालेलो, पण ते पुरेसं नसावं. सेंच्युरी करायला पाय आणि त्याहून जास्त मन शिवशिवत होतं...

आज सुट्टी असल्यानं दक्षिण मुंबई दिवाळी राईड करायची असं मुंबईकर मित्रांनी ठरवलं. निनाद ची सायकल पंक्चर असल्यानं तो येणार नव्हता.पण काल रात्री कॅप्टन अनिल ने निनाद कडे जाऊन पंक्चर काढून दिलं, त्यामुळे एक भिडू वाढला. मुलुंड ला भेटून शिवाजी पार्क ला जायचं, तिथं प्रासदांना भेटायचं; तिथून दक्षिण मुंबई आणि परत असं ठरलं. मी घोडबंदर ने जाऊन 100 करायचे असं ठरवलेलं. इरेलाच पडलेलो.

ठरल्याप्रमाणे आज सकाळी निघालो. घोडबंदर मार्गे मुलुंड ला पोचलो. 24 च्या स्पीड ने सव्वा तासात 30किमी झालेले. त्यामुळे खुश होतो. बघीरा अगदी स्मूथ चालत होती. तेवढ्यात अनिल चा फोन आला. पण ऐकू येत नव्हतं. त्याला कॉल बॅक करेपर्यंत तो, निनाद आणि सिद्जो येऊन पोचले पण! मग लाईव्ह लोकेशन पाहिलं तर प्रासदा पुदृमा वरच दिसत होते. ते पुढं विक्रोळी जवळ असतील असा अंदाज करेपर्यंत निनाद म्हणाला, "अरे ते आपल्या जवळ दिसतायत... समोरच्या बाजूस आहेत वाटतं!" आणि आम्ही वर पाहिलं तर खरोखर प्रासदा समोर! मग त्यांची वाट बघत आणखी 2 मिनिटं थांबलो. ते पण जॉईन झाले. मग प्रथेप्रमाणे फोटोसेक्षण झालं. केळ्यांसह क्लिकक्लिकाट केला. आणि आम्ही पुढं निघालो. तेव्हा सिद्जो ने बॉम्ब टाकला: "घरी लौकर जायचंय... शिवाजी पार्कवरून परतायचं." आणि ऊन वाढेल ही त्याची कन्सर्न पण रास्तच होती. आता पार्कावरून पदृमा ने घरी गेलो तर 100 होणार नाहीत... मी मनाशी म्हटलं, आधी पार्काला जाऊन मिसळ उडवू, मग के सेरा सेरा.

पार्काला पोचलो. प्रकाश मध्ये बसलो. एकतर सायकली बाहेर, नजरे आड. त्यात लॉक नाहीत. त्यामुळे मला धाकधूक. तेवढ्यात सरप्राईज द्यायला मिलिंद्दा नरिमन पॉईंट राईड करून येऊन पोचले. ते आले तशी माझी सायकल ची चिंता मिटली. कारण त्यांची फूजी असताना माझी ट्रेक कोण उचलेल? ;)

मनसोक्त खादाडी आणि फोटोसेक्षण करून बाहेर पडलो, तर फूजी ला लॉक होतं. म्हणजे आमच्या सायकली व्हल्नरेबल होत्याच! नशीब, कोणी काही उंगली केली नव्हती. मग चहा घेतला, अजून थोडे फोटो काढले आणि माझ्याप्रमाणे सिद्जो आणि मिलिंद्दा यांना पण आजच्या राईड मुळे घरून तडी पडली आहे हे ऐकून निर्धास्त झालो. आता निघायचं ठरलं. एव्हाना माझे 54 किमी झालेले. जर प दृ मा ने गेलो तर 85 झाले असते. म्हणून मग मी आलो त्याच रस्त्यानं जायचं ठरवलं. कारण आज 100 करायचेच होते.

सिपर मध्ये पाणी भरून घेतलं, प्रासदा आणि मिलिंद्दा यांचा निरोप घेऊन निघालो आणि पु दृ मा ला लागलो. आता उन्हाचे चटके जाणवायला लागलेले. या उन्हात घोडबंदर चे चढ भारी पडले असते. म्हणून विक्रोळी-पवई-जोगेश्वरी- प दृ मा असं जायचं ठरवलं. विक्रोळी ला दोस्तांचा निरोप घेतला. 70किमी. आता शेवटचे 30किमी एकला चालो रे... पण रस्ता चाकांखलचा होता. ऊन सोसत निघालो. वाटेत पाणी पीत राहिलो होतो. सिपर रिकामा झाला तसा एका दुकानातून पाण्याची बाटली घेऊन त्याला परत भरला. उरलेलं 400 मिली पाणी बसून प्यायलो आणि पुढं निघालो. नशिबानं आज ट्रॅफिक कमी होतं. त्यामुळे तो पण त्रास कमी होता. तरी घरी पोचेपर्यंत 100 होत नव्हते. मग घराजवळ थोडा फिरलो, आणि 100 पूर्ण झाले तेव्हाच घरी गेलो.

घरी पोचलो तेव्हा थोडा दमलेलो, पण शतक पूर्ण केल्याचं समाधान थकव्यापेक्षा जास्त होतं!

थोडक्यात लिहायचं म्हणता म्हणता पुष्कळच लिहिलं... पण तुम्ही लोक्स चालवून घ्याल याची खात्री आहे... तो माझा हक्क असल्याचं समजण्याचा आगाऊपणा नेहमीप्रमाणे करतोय.

आणि लेखात कुणाचा उल्लेख करायचा राहून गेला असल्यास तो केवळ अनवधानाने आहे. तरी कुणाला राग आला असल्यास फटके देण्यासाठी अगत्य येणेचे करावे!

लोभ आहेच, तो वाढावा!
-मयुरेश
७ नोव्हेम्बर २०१८ (लक्ष्मीपूजन)

क्रीडाप्रकटनअनुभवविरंगुळा

प्रतिक्रिया

नया है वह's picture

8 Nov 2018 - 7:02 pm | नया है वह

लै भारी

झेन's picture

9 Nov 2018 - 9:12 am | झेन

शतकपूर्ती साठी मनःपूर्वक अभिनंदन आणि याहून मोठ्या मोहीमांसाठी शूभेच्छा.

अजूनही ८०-८५ च्या पुढे न गेलेला . . . . झेन

मस्तच रे भाऊ. भरपूर राइड्स साठी शुभेच्छा.