आठवणीतली गाणी... नव्हे गाण्यांच्या आठवणी

सजन's picture
सजन in दिवाळी अंक
6 Nov 2018 - 12:00 am

H

आठवणीतली गाणी... नव्हे गाण्यांच्या आठवणी

गाणी सगळ्यांनाच आवडतात. असं म्हणतात की, प्रत्येक मराठी घरात एक तरी ‘महागायक’ असतो. नाही, अतिशयोक्ती मुळीच नाही ही. त्यामुळेच डोहाळेजेवण असलं की डोहाळे म्हणा, बारसं असलं की पाळणे म्हणा, लग्नाला मंगलाष्टका म्हणून पकवा, अशी जन्माआधीपासून ते पार पुढे पोहोचेपर्यंत संस्कृती-परंपरांशी संलग्न गाणी तर आहेतच. पण साधा शाळेचा समारंभ असला की, पोरींना स्वागतगीत-ईशस्तवन म्हणायला लावा, किंवा चार जण कुठेही जमले तरी सगळ्यात पहिल्यांदा चटकन सुरू होतात ती गाणी. थोडक्यात काय, तर या गाण्यांची आणि आपली गाठ पक्की आहे. त्यामुळे ही आठवणीतली गाणी जशी जवळची आहेत, तशाच या गाण्यांच्या आठवणी.

असं म्हणतात की, every song brings back a memory. हे खरंही आहे. पण अर्थात एक कोणतंही गाणं लागलं तर ते ऐकणार्‍या माणसाच्या मनात कोणती आठवण जागी होईल, हे मात्र सांगता येणं कठीण. नाही समजलं? आता हेच पाहा ना. काही गाणी आणि त्यांच्या गाण्यांच्या आठवणी किती गमतीशीर असू शकतात.

आमचा एक मित्र आहे, त्याची बायको वेळेला अगदी पक्की, तर आमचा मित्र मुलखाचा वेंधळा आणि सगळीकडे सगळ्यात उशिरा पोहोचणारा. त्याचं नुकतं लग्न झालं होतं, तेव्हा त्यांच्या एका मित्राने त्यांना घरी जेवायला बोलावलं होतं. बायकोने आपल्या नवर्‍याला आधीच बजावलं की, आपल्याला वेळेला पोहोचलंच पाहिजे. हो-नाही करता करता मंडळी चांगली तास-दीडतास उशिरा पोहोचली. ज्यांच्या घरी जेवायला बोलावलं होतं, ते सगळेच जण संगीताचे भोक्ते आणि मृदू स्वभावाचे होते. या लोकांसाठी त्यांनी मंद संगीत लावलं होतं, चार-पाच चांगले पदार्थ केले होते. उशीर झाल्यामुळे नवर्‍यावर चिडलेली बायको आणि बाकी सगळे जेवायला बसले. जेवता-जेवता नवरा काहीतरी बोलला आणि आधीच चिडलेली बायको वस्सकन् त्याच्या अंगावर ओरडली. हे सर्व पाहून या यजमानांच्या मृदू स्वभावाच्या आईला भावना अनावर होऊन त्या आत निघून गेल्या. बराच वेळ झाला, त्या बाहेर येईनात म्हणून या नवरा-बायकोने चौकशी केली. तेव्हा यजमान म्हणाले, "नाही, तिच्या जरा छातीत दुखायला लागलंय..." आणि नेमकं याच वेळी मागे, 'दर्दे दिल दर्दे जिगर, दिलमें जगाया आपने' हे गाणं चालू होतं. आणि हा सगळा प्रसंग पाहून अस्मादिकांसह उपस्थित असलेल्या सगळ्यांनी जे काही हास्याचे लोट फोडले, ते पाहता त्या मृदू स्वभावाच्या यजमानांनी पुढची काही वर्षं तरी कुणाला जेवाला बोलावल्याची शक्यता दिसत नाही.
आजही ‘दर्दे दिल, दर्दे जिगर’ ऐकलं की, तो दिवस, मित्राची बायको आणि नंतर आयुष्यभर तिला “हिच्या बोलण्यामुळे लोकांच्या छातीत दुखू लागतं” अशी पसरलेली अफवाच आठवते.

तसाच आणखी एक प्रसंग आमच्या मित्राचा. इयत्ता ११वीत आमच्या क्लासची सहल गेली होती. ११वीच्या वर्गातली बराचशी मुलं आधीपासून माहीत होती, त्यामुळे सगळ्यांच्याच आपसांत वागण्यात एक सहजता होती. हा मित्र अतिशय निरागस आणि साधा. बसमध्ये गाण्याच्या भेंड्या चालू झाल्या. आमचे सर फारच सोवळे होते, त्यामुळे सगळेच जरा जपून गाणी होते. खेळता-खेळता या भाईच्या टीमवर ‘र’ अक्षर आलं. भाईने सगळी ‘र’ची गाणी सोडून, 'रुक्मणी रुक्मणी, शादी के बाद क्या क्या हुआ' हे गाणं चालू केलं. बरं, आम्ही त्याला थांबवायचा खोटा प्रयत्न केला, पण भाई इतक्या जोशमध्ये होता की, त्याने संपूर्ण गाणं स-भावना आणि स-अभिनय सादर केलं, त्यानेच केलेल्या ‘अकापेला’ पार्श्वसंगीतासह. आजही इतक्या वर्षांनी रुक्मणी ऐकलं की, दर ओळीगणिक आमच्या सरांचा संतापाने लाल झालेला चेहरा, हसू दाबून लाल झालेली आमची तोंडं, आधी स-भावना गाणं म्हणून आणि मग सरांनी धुतला म्हणून शरमेने लाल झालेला मित्राचा चेहरा, असे सगळे सीन डोळ्यापुढे येतात.

यानंतरच्या प्रसंगात मुख्य कलाकार मी आहे. मी अगदी लहान असल्यापासून गाणं म्हणतेय. एकदा आमच्या नात्यात कुणा बहिणीला पाहायला मुलाकडचे आले होते. मी तिथेच खेळत होते. आपल्याकडे पाहुण्यांसमोर घरातल्या पोराटोरांना विविधगुणकलादर्शन करायला लावतात, त्यानुसार "हीसुद्धा गाणं शिकते, तर म्हण गं एखादं ताला-सुरातलं गाणं" असं मला सांगण्यात आलं. ते दिवस दिवाळीचे होते, मी आपल्याच दिवशी किल्ल्यावर ठेवायचे मावळे आणायला कुंभारवाड्यात गेले होते. तिथे नुकते रंगवलेले मावळे वाळवत ठेवले होते, कुंभारकाका म्हणाले थोड्या वेळाने वाळले की घेऊन जा म्हणून तिथेच बसले असता, शेजारच्या घरात टीव्हीवर अगदी ताला-सुरातलं गाणं लागलं होतं. स्मरणशक्ती कमालीची असल्याने, ते एकदा पाहून डोक्यात फिट्ट बसलं होतं. गाणं म्हण असं सांगितल्यावर, तेच तेच नेहमीची भाव/भक्तिगीत म्हणण्याऐवजी हे गाणं म्हणावं या उदात्त हेतूने मी, “छतपे सोया था बेहनोई, में उनको समझकर सो गई” असं गाणं व त्या गाण्यात बायका अंगात देवी आल्यावर करतात तशी, स्टेप करतात, त्या स्टेपसकट म्हणून दाखवलं. त्यानंतरचा आलेल्या पाहुण्यांचा चेहरा आणि घरातल्यांचा जमीन दुभंगून पोटात घेईल तरं बरं हा चेहरा, या त्या गाण्याने दिलेल्या ‘देन’ आहेत. आजही ते गाणं लागलं की, त्या दिवशी आलेल्या नकाराचं कारण मी कसं आहे, हे मला आता आजी व्हायची वेळ आलेल्या बहिणीकडून ऐकावं लागतं, आणि तो न झालेला बहनोई मला धन्यवाद देतोय हेही जाणवतं.

आता थोडं प्रेमगीतांकडे वळू या. प्रेमगीतांची तशी गंमत आहे. प्रेमात पडल्यावर खरं तर सगळीच गाणी आपली आणि त्याची वाटायला लागतात, पण त्यातही आपल्या सगळ्यांच्या मनात अशी एक दोन-पाच गाणी तर असतातच; जी खरं तर आपलं आपल्या मनातलं प्रेम कसं असावं हे कधीकधी जणू इनॅक्टमेंटच्या स्वरूपात आपल्याला दाखवतात.

भारतीय चित्रपटसृष्टीतल्या खाना-वळीला कितीही शिव्या घातल्या तरी, या तीन खानांनी एक-दोन पिढ्यांना प्रेम करायला शिकवलंय. त्यामुळे आजही “हो गया है तुझको तो प्यार सजना” म्हटलं की बारीकसं, पुसटसं हास्य ओठांवर येणारे ‘य’ लाख लोक असतील.
बिग बॉसमधल्या जूही चावलाच्या पुढे-मागे करत, “मैं कोई ऐसा गीत गाऊँ, के आरज़ू जगाऊँ.. अगर तुम कहो” हे गाणं माझी ऑलमोस्ट फॅन्टसी आहे. आपण कुणासाठी तरी इतकं महत्त्वाचं असावं, हे अर्थातच आवडण्यासारखंच आहे.

पुढे प्रेमाच्या काही बाजू, बरेच पैलू अनुभवल्यावर ग्रेसचं काव्य - जे खरं तर खूप खूप लहान असताना ‘महाश्वेता’ नावाच्या मालिकेच्या शीर्षकगीताद्वारे कानी पडले होतं ते, “हे सरता संपत नाही, चांदणे तुझ्या स्मरणांचे” कधी जणू अॅन्थम होऊन गेलं ते कळलंदेखील नाही.
तशा खूप गोष्टी, काही स्वत:च्या तर काही दुसर्‍यांच्या प्रेमाच्या गाण्यांच्या माहीत आहेत, पण नाही सांगाव्याशा वाटत त्या. ये तो मेहसूस करनेवाली बात है, बोलनेवाली नहीं, त्यामुळे इतकं काफी आहे.

काही गाणी प्रसिद्ध किंवा सांगितिकदृष्ट्या उच्च दर्जाची असावी लागतात असंही नाही. पण ती गाणी अशा कोणत्यातरी वेळी येतात-भेटतात की, आपल्या आयुष्याचा, व्यक्तीमत्त्वाचा एक भाग बनून जातात. हळवं करतात. एमरी ऑस्टीनने म्हटलंय तसं, some days there won’t be a song in your heart, sing anyway.
आयुष्यात अगदी तरुण वयात फटके पडले परिस्थितीचे की, आपण दीर्घकाळ जमिनीवर राहतो.
कोणी जास्त मित्र-मैत्रिणी नाही, पुढे भविष्य काय माहीत नाही, आयुष्यात काहीच चांगलं घडणार नाही की काय, अशा अत्यंत विमनस्क मन:स्थितीत केलेल्या ट्रेकला भर रात्री, थंडीत त्या कातळावर विझत्या-बुझत्या शेकोटीच्या धगीत म्हटलेलं “ये हौसला कैसे झुके” हे नितांतसुंदर गाणं तेव्हा त्या दुखर्‍या मनाला किती दिलासा देऊन गेलं होतं, ते माझं मलाच माहीत.

मध्ये कोणीतरी सांगत होतं की, काही गाणी त्याला त्रास देतात. सावत्र आईचा मार खात मोठं झालेलं हे लेकरू, वडील कामावर गेले की आई रेडिओ लावून मारझोड करत असे. त्या वेळी रेडिओवर लागणारं कोणतंही गाणं आजही लागलं की पटकन चिडून तो ते बंद करायला लावतो. ‘नववधू प्रिया मी बावरते'सारखं गाणं कोणा नवथर होऊ घातलेल्या वधूला रोमांचित करत असेलही, पण कुणाच्या अंगावर काटाही आणत असेल, बेचैन करत असेल.
मागे एक वाक्य वाचलं होतं - every favorite song says an untold story. कदाचित every not so favorite song also might have an untold story.

राग, लोभ, आनंद, दु:ख अशा एकानेक आठवणी आणि त्या देणारी माणसं यांना आपल्याशी जोडून ठेवणारी ही आठवणीतली गाणी आणि त्या गाण्यांच्या आठवणी आपल्या संचिताचा एक मोठा हिस्सा आहेत. वेळ चटाचटा बदलते, कितीही पकडून ठेवावीशी वाटली, तरी दोन बोटांच्या फटीतून वाळू निसटावी तशी निसटते. अशा वेळी आपल्या हातात एवढंच असतं की, ती वेळ तो नगमा जपून ठेवायचा. कारण, गुलज़ार म्हणतात तसं,
'इतनी सी जान होती है गाने की, एक लम्हे की जितनी,
हाँ कुछ लम्हे बरसों जिन्दा रहते हैं...
गीत बूढ़े नहीं होते उनके चेहरे पे झुर्रियां नहीं गिरती,
वो पलते रहते हैं चलते रहते हैं...
सुनने वाले बूढ़े हो जाते है तो कहेते है -
“हाँ … वोह उस पहाड़ का टीला जब बादल से ढक जाता है, तो एक आवाज सुनाई देती है”

- सजन

H

दिवाळी अंक २०१८

प्रतिक्रिया

यशोधरा's picture

6 Nov 2018 - 1:29 pm | यशोधरा

क्या बात!

तुषार काळभोर's picture

6 Nov 2018 - 2:45 pm | तुषार काळभोर

गाणी आवडली

गुल्लू दादा's picture

6 Nov 2018 - 5:32 pm | गुल्लू दादा

खूप छान लिहिलंय...

टर्मीनेटर's picture

7 Nov 2018 - 1:19 pm | टर्मीनेटर

संगीतमय लेखन आवडले. किस्से मजेशीर आहेत.

मुक्त विहारि's picture

7 Nov 2018 - 3:33 pm | मुक्त विहारि

मस्त लेख..

सविता००१'s picture

7 Nov 2018 - 5:29 pm | सविता००१

अगदी पटणारं लेखन

प्राची अश्विनी's picture

8 Nov 2018 - 7:24 am | प्राची अश्विनी

खरंय. Every song has a story

चांदणे संदीप's picture

8 Nov 2018 - 10:32 am | चांदणे संदीप

वाचता वाचता कधी संपला कळालेच नाही.
गाणी मनाचा एक कोपरा व्यापून असतातच. त्या कोपऱ्याला आज तुमच्या लेखाने आवरून-सावरून चकाचक केल्यासारखे वाटले.

Sandy

गामा पैलवान's picture

8 Nov 2018 - 1:36 pm | गामा पैलवान

सजन,

लेख छान आहे. निरीक्षणं अचूक आहेत. छतावरच्या बहेणोईचा किस्सा आवडला. अपरिचितांसमोर लहान मुलांना गायला सांगतांना नेहमी गाण्याची फर्माईश आपणंच करायची असते हा धडा. :-D

आ.न.,
-गा.पै.

दुर्गविहारी's picture

8 Nov 2018 - 4:45 pm | दुर्गविहारी

मस्त लिहीलेत किस्से. छान. पु.ले.शु.

नाखु's picture

8 Nov 2018 - 5:20 pm | नाखु

व गीतकार , संगीतकार घालवतो पण आयुष्याचं गाणं , गीतांत रूपांतर काही गाणीच करतात.

पुनर्जन्म घेण्याची जिगीविषू असलेला नाखु पिटातल्या प्रेक्षकांचा प्रतिनिधी.

जुइ's picture

11 Nov 2018 - 8:50 am | जुइ

काही आठवणीतील गाणी आणि त्या मागचे किस्से सांगणारा हा लेख आवडला. या निमित्याने माझ्या बाबांनी सांगितलेली आठवण. दररोज सकाळी रेडियो सिलोनवर लागणारे के. एल. सैगल यांचे गाणे ते आवर्जून ऐकत असत. त्यामुळे आजही कधी सैगल यांचे गाणे ऐकले की ही आठवण येते.

नूतन सावंत's picture

11 Nov 2018 - 3:07 pm | नूतन सावंत

प्रत्येक गाण्याच्यासोबत एक तरी आठवण लगडलेली असतेच असते.लेक आवडला.

मित्रहो's picture

11 Nov 2018 - 6:32 pm | मित्रहो

छान किस्से आवडले

चौथा कोनाडा's picture

14 Nov 2018 - 1:26 pm | चौथा कोनाडा

वाह, क्लासिकच लिहिलंय सजनजी !
तुअम्च्या या लेखाne आमच्यापण काही आठवणी जाग्या झाल्या.

'इतनी सी जान होती है गाने की, एक लम्हे की जितनी,
हाँ कुछ लम्हे बरसों जिन्दा रहते हैं...
गीत बूढ़े नहीं होते उनके चेहरे पे झुर्रियां नहीं गिरती,
वो पलते रहते हैं चलते रहते हैं...
सुनने वाले बूढ़े हो जाते है तो कहेते है -
“हाँ … वोह उस पहाड़ का टीला जब बादल से ढक जाता है, तो एक आवाज सुनाई देती है”

समीरसूर's picture

14 Nov 2018 - 2:55 pm | समीरसूर

बहनोईवाला किस्सा अफलातून! :-) आणि रुक्मिणीवाला तर एक नंबर!

गामा पैलवान's picture

14 Nov 2018 - 6:35 pm | गामा पैलवान

सजन,

मुद्दाम गुगलून पाहिलं छतपे बहेणोईचं गाणं : https://www.youtube.com/watch?v=C7jsIkQh4Cc

हे सगळं तुम्ही लक्षात ठेवलंत? आणि पाहायला आलेल्या पाहुण्यांसमोर मुद्राभिनयासहित सादर केलंत?

:हसून हसून गडबडा लोळणारा बाहुला:

आ.न.,
-गा.पै.

अविनाशकुलकर्णी's picture

22 Nov 2018 - 11:41 am | अविनाशकुलकर्णी

छान लिहिलंय..

राघव's picture

1 Dec 2018 - 12:38 pm | राघव

जबराट! :-)
मला वाटले आठवणी म्हणजे कलाकारांचे त्यावेळचे किस्से असावेत.. पण हे जास्त रिलेट करू शकतो. मस्त!

छान लेख आहे

कानडाऊ योगेशु's picture

21 Aug 2019 - 9:00 pm | कानडाऊ योगेशु

९० च्या दशकात दूरदर्शनवर कुटुंब नियोजनाच्या जाहीरातींचा भडिमार होत असे आणि विशेष म्हणजे त्या जिंगल्स ची गुणवत्ता ही चांगल्या दर्जाची होती त्यामुळे त्याकाळच्या आम्हा बाळगोपाळांच्या तोंडात हीच जिंगल्स रुळली गेली होती त्यामूळे कधी कधी वडिलधारी मंडळी समोर असताना सुध्दा अनवधानाने "जरासी सावधानी जिंदगी भर आसानी" किंवा "माला डी माला डी माला डी" ही गीते त्यात येणार्य सांगितीक ट्युनसहीत ओठांवर येत असत. आता ते आठवले कि हसु येते.

कानडाऊ योगेशु's picture

21 Aug 2019 - 9:02 pm | कानडाऊ योगेशु

९० च्या दशकात नव्हे तर ८० च्या दशकाच्या उत्तरार्धात असे हवे होते. तेव्हा मध्यमवर्गीय कुटुंबांकडे नुकतेच टी.वी यायला सुरवात झाली होती.