एका गुरूची गोष्ट !

दिनेश५७'s picture
दिनेश५७ in जनातलं, मनातलं
20 Sep 2018 - 4:27 pm

एका गुरूची गोष्ट.

दिवेलागणीची वेळ. मंदिराच्या गाभाऱ्यात मंदपणे तेवणाऱ्या समईच्या शांत प्रकाशाची संधिप्रकाशी तिरीप सोडली, तर मंदिराच्या सभागारात उजेडाचे अस्तित्वही नव्हते. भगवंताकडे पाठ करून गाभाऱ्याच्या द्वाराशी बसलेल्या महाराजांचा चेहरा त्या प्रकाशात काहीसा अधिकच उजळ भासत होता. ती वेळ, प्रकाशाची तिरीप, महाराजांचे आसन, सारे काही जाणीवपूर्वक घडविल्यासारखे जुळून आल्याने मंदिराच्या अवघ्या सभागाराला भक्तिमय साज चढला होता, आणि महाराजांची वाणी कानातून मनात साठविण्यासाठी समोरचा भक्तसमुदाय जणू आतुरलेले होता.
गाभाऱ्यात घंटेचा कोमल किंकिणाट झाला, ओवाळलेल्या निरांजनातून निघालेली आणखी एक हलकीशी प्रकाशरेषा महाराजांच्या चेहऱ्यावरून वर्तुळाकार फिरली आणि जणू तेजोवलयाच्या दिव्य आभासाने भक्तगण भारावून गेला. भक्तिरसाचा एक आर्त स्वर सर्वांच्या मुखातून गाभाऱ्यात घुमला. महाराजांनी मंद स्मित करत दोन्ही हात हवेत उंचावले. ओठ बंद करून ओमकारा सूर लावला, आणि मांडी ठीकठाक करून प्रवचन सुरू केले.
‘ब्रह्मं सत्यं जगन्मिथ्या’ हे आजच्या सत्संग विवेचनाचे सूत्र होते.
महाराज बोलत होते आणि त्यांच्या अमोघ वाणीने भारावलेला भक्तवर्ग काळाचे भान विसरला होता...
... ‘म्हणून मायबापहो, हे विश्व नश्वर आहे. हे भवताल जरी नजरेस दिसत असले तरी तो निव्वळ आभास आहे. सारे मिथक - मिथ्या- आहे.
मग, भक्तहो, सत्य काय आहे?’
एवढे बोलून महाराज थांबले.
सभागारात भक्तिमय शांतता पसरली होती.
पुन्हा मंदस्मित करत महाराजांनी आपली मान किंचित उजवीकडे वळविली.
गाभाऱ्यातून पुन्हा एक प्रकाशरेषा महाराजांच्या चेहऱ्यावर स्थिरावली अन् दिव्य तेजाच्या आभासाने पुन्हा भक्तगण भारावले...
‘मायबापहो, हे आसपास दिसते ते सारे आभासी आहे.. मी आभास आहे, तुम्ही आभास आहात, हे मंदिर, हा दिवस, ही रात्र, हा अंधार, हा उजेड... सारे काही आभास. सत्य ते एकच! ब्रह्म!’....
महाराज बोलत होते.
अचानक मंदिकाबाहेर अंधारात जोरदार खुसपूस ऐकू येऊ लागली.
कुणी जंगली जनावर संतप्तपणे चालून येत असल्याची चाहूल त्या अंधारातही सर्वांना लागली... सारे भक्त भयभीत झाले. चुळबूळू लागले.
त्या जनावराचे संतप्त फूत्कार आता सर्वांनाच स्पष्ट ऐकू येत होते. सारे जागेवरून उठले. एकच पळापळ सुरू झाली.
महाराज तर कमालीचे घाबरले होते. त्यांनी पळतच मंदिराचा गाभारा गाठला आणि भयभरल्या नजरेने ते बाहेर पाहू लागले....
काही वेळातच सारे शांत झाले.
ते जंगली जनावर मंदिराला बगल देऊन निघून गेले होते.
भक्तांनी सुटकेचा निश्वास टाकला. पुन्हा सारेजण सभागारात गोळा होऊन आपापल्या जागी बसले.
सगळे काही सुरक्षित झाल्याची खात्री होताच महाराजही गाभाऱ्यातून बाहेर आले व आसनावर बसले.
प्रवचन पुढे सुरू करणार एवढ्यात श्रोतृगणातून एक हात उंचावला गेला.
महाराजांनी खुणेनेच त्याला बोलावयास सांगितले.
‘महाराज, थोड्या वेळापूर्वी आपण म्हणालात की हे भवताल केवळ मिथ्या आहे... आभास आहे... मग तो जंगली जनावराचा हल्ला हादेखील एक आभासच ना?... तरीदेखील आम्हां सामान्यजनांप्रमाणे आपणही पळ काढलात, भिऊन दडी मारलीत.. हे कसे?’
... प्रश्न संपला आणि श्रोत्यांमध्ये सन्नाटा पसरला.
आता महाराज काय सांगतात याकडे सारे कान एकवटले!
... महाराजांनी पुन्हा एकवार मान किंचित उजवीकडे वळविली. गाभाऱ्यातून येणाऱ्या प्रकाषरेषेत त्यांच्या भाळावर गोळा झालेला घर्मबिंदूंचा पुंजका क्षणभर चमकून गेला.
महाराजांनी खांद्यावरच्या रेशीमवस्त्राने कपाळावरचा घाम पुसला.
मंद स्मित करत त्यांनी सभोवार नजर फिरवली.
भक्तगणांच्या नजरेतील भक्तिभाव तीळभरही कमी झालेला नाही याची खात्री करून घेत ते गदागदा हसले.
आणि म्हणाले, ‘बापहो, तो हल्ला हा जसा आभास होता, तसा मी पळालो, घाबरलो, दडून बसलो, हादेखील आभासच होता... बोला पुंडलिक वरदे...’
असे म्हणून महाराजांनी हात हवेत उंचावले.
‘... हाsss री विठ्ठल!...’ श्रोत्यांनी गजर केला.
आणि प्रवचन पुढे सुरू झाले.

बाहेरचा अंधाराचा आभास अधिकच गडद झाला होता, आणि समईची मंद ज्योत अधिकच प्रकाशमान भासत होती!!

मुक्तकविरंगुळा

प्रतिक्रिया

ज्योति अळवणी's picture

20 Sep 2018 - 5:08 pm | ज्योति अळवणी

भले! महाराज आभासी आणि त्यांचे भक्तगण दहा आभासी!!!

आजच सत्य! छान लिहिलं आहात

आजकालच्या गुरुचं माहित नाही पण देव कधीकधी मनाचं ऐकतो बरं का ?

तास मी ट्रेनने प्रवास करत नाही कधी पण वाशीवरून गाडीने सँडहर्स्ट रोडला जायचे आणि परत यायचे म्हणून मी ट्रेनने गेलो होतो .बँकेचे काम होते . मला वाटलं दुपारची वेळ आहे ट्रेन खाली असेल पण कसलं .. चक्क भरून आली होती बसायला जागाही नव्हती . मी दरवाज्यावर उभा होतो आणि कमालीचा कंटाळा आला होता उभं राहून राहून . मनात विचार आला, " सालं कोणच जागेवरून उठत नाही आहे , बसायला मिळाल तर किती बरं होईल . "
या विचारात थोडा वेळ होतो नंतर ते सर्व देवावर सोडून बाहेरचं दृश्य बघता चाललो होतो . दोन एक स्टेशन गेल्यावर , काहीतरी आवाज आला आणि खूप धुराळा उडाला . काहीच समजलं नाही . लोक जी दरवाज्यावर होती आणि आत बसलेली होती , ती धपाधप उड्या मारून बाहेर पळाली. मी मात्र बाहेर उडी ना मारता पटकन एक खिडकीशेजारची जागा पकडली .. थोड्या वेळाने परत सर्व जण आत आले .मी एकाला विचारलं तेव्हा समजलं कि ट्रेनचा खालचा भाग कठड्याला घासला आणि धुराळा उडाला म्हणून ...

विवेकपटाईत's picture

21 Sep 2018 - 11:03 am | विवेकपटाईत

हा! हा! हा! स्वप्न आभासी असते तरी हि पाहताना आपल्याला सत्यच वाटते व भयंकर असेल तर भीती हि वाटते, खरोखरची. घाबरून आपण उठतोच कि.

जयन्त बा शिम्पि's picture

23 Sep 2018 - 1:51 am | जयन्त बा शिम्पि

माझ्या मनात विचार आला की ते जनावर जर खरोखर गाभार्‍यातच घुसले असते तर किती मजा आली असती ? बिचारे अंध भक्त सुटले असते एका लबाड गुरुच्या तडाख्यातून ! ! हा ! हा ! हा!.

काहीसा पेच फेस केलेला आहे