वॉल्डन...

जयंत कुलकर्णी's picture
जयंत कुलकर्णी in जनातलं, मनातलं
2 Sep 2018 - 3:29 pm

- नुकतेच हेन्री डेव्हिड थोरोच्या वॉल्डन या पुस्तकाचा अनुवाद व त्याचे चरित्र लिहून संपवले...

बरेच दिवस लिहित होतो. भाषा जुन्या वळणाची असल्यामुळे कळण्यास अवघड वाटली पण या अनुवादाच्या प्रवासात बरेच विचार मंथन घडले. काही गोष्टी पटल्या तर काही नाही. ज्या पटल्या नाहीत त्याचा आता हल्लीच्या युगात काही संदर्भ राहिला नसल्यामुळे. पण ज्या पटल्या त्या मात्र कायमच्या उपयोगी पडणार्‍या आहेत हे निश्चित... असो. त्यातील काही परिच्छेद येथे टाकत आहे.... मी झपाटल्यासारखे ही सगळी पाने लिहिली त्यामुळे प्रकाशक मिळेल का इ इ. विचारच केला नाही.. :-) बघूया आता... मिळाला तर बरे... याबाबतीत कोणाला काही सुचवायचे असल्यास स्वागत आहे....

जरा समजण्यास अवघड आहे. आणि नाही समजले तर तो दोष माझाच आहे.... खाली जे लिहिले आहे त्यातील काही माझ्या वॉलवरील कॉपी पेस्ट केले आहे... त्याकडे दुर्लक्ष करावे ही विनंती...

.... मे महिन्याच्या सुरुवातीला ओक, हिकरी, मॅपल आणि इतर झाडे देवदाराच्या रानातून डोकावू लागली आणि त्यांच्या झळाळीने जंगलातील वातावरणात एकदम उजेड पडला. ते उजळून गेले. जणू काही एखाद्या ढगाळ दिवशी जंगलातील वृक्षातून सूर्याची किरणे फाकली आहेत. मे महिन्याच्या तीन तारखेला (किंवा चार तारीख असेल) मी तळ्यावर लून पक्षी पाहिला आणि पहिल्या आठवड्यात मी व्हिपुरविलची शीळ ऐकली. नंतर आले ब्राऊन थ्रॅशर, व्हिरी, वुड पेवी, च्युविंक आणि असे अनेक इतर पक्षी. त्यांचा किलबिलाट मी भान विसरुन ऐकत राहिलो. मी वुड थ्रशचा आवाज केव्हाच ऐकला होता. याला कसा विसरलो बरे मी ! माझे घर एखाद्या कपारीसारखे सुरक्षित आहे का हे पाहण्यासाठी फिबी पक्षाची मादी पंख फडफडवत, गाणे गुणगुणत माझ्या दरवाज्यात दुसर्‍यांदा डोकावून गेली. पिच देवदारांच्या गंधकासारख्या रंगाच्या परागकणांचा तळ्याच्या पाण्यावर, किनार्‍यावर, ओंडक्यांवर, आणि खडकांवर एक थर साठला. इतका दाट की तुम्ही ते कण पिंपात सहज भरू शकला असता. गंधकाची वृष्टी म्हणतात ती हीच असावी. कालिदासाच्या शाकुंतल नाटकातही त्याने ‘झरा, कमळांच्या परागकणांनी पिवळा धमक झाला’ अशी कल्पना वापरली आहे. शेवटी ऋतूचक्र फिरले आणि जंगलात फेरफटका मारणारा माणूस जसा उंच गवतात लुप्त होतो तसा हिवाळा लुप्त होत होत वसंत ऋतू अवतरला... जंगलातील माझे पहिले वर्ष हे असे संपले. दुसरे वर्षही मी असेच व्यतीत केले. अखेरीस जड अंत:करणाने मी सप्टेंबर ,६, १८४७ या दिवशी वॉल्डनचा निरोप घेतला... ....

आज वॉल्डनचे भाषांतर संपवले. वॉल्डनने मला काय दिले हे विचारण्याऐवजी काय दिले नाही हे विचारणे जास्त संयुक्तिक होईल. वॉल्डनने मला दिला एक वेगळा विचार आणि आज शेतकर्‍यांची अशी अवस्था का आहे याचेही उत्तर दिले.. असो.

आता कोणी छापतंय का ते पहावे लागेल.. अर्थात प्रकाशक शोधताना थोरोचे हे वाक्य माझ्या लक्षात असेलच... .... मी बराच काळ एका जर्नल मधे वार्ताहर म्हणून काम करत होतो. या जर्नलचा खप विशेष नव्हता. या जर्नलच्या संपादकांना माझे लेख कोण वाचणार अशी शंका होती म्हणून संपादक ते छापत नव्हते. हा अनुभव बहुतेक लेखकांना कधी ना कधीतरी येतोच. किंबहुना हे जर्नल फक्त एकच वाचक वाचत असे. याचा संपादकही मीच होतो व तो एकमेव वाचकही मीच होतो....

......या जगात सतत काही ना काहीतरी नवीन घडत असते. जगात नवनवीन, नावीन्यपूर्ण वस्तूंचा पाऊस कोसळत असतो, तरी पण आपण अजून आपली निराशा दूर करू शकलेलो नाही हे आपले दुर्दैव. यासाठी तुम्ही पुढारलेल्या देशांमधे ज्या प्रार्थना म्हटल्या जातात आणि आणि जी प्रवचने ऐकली जातात त्याच्या वर जरा लक्ष दिलेत तर मी काय म्हणतोय हे तुम्हाला उमजेल. दु:ख आणि आनंद हे केवळ दोन शब्द आहेत पण त्या प्रवचनांमुळे त्यांचे मानवी मनावर ओझेच लादले जाते. त्याचे का बरे ओझे वाटत असेल ? कारण आपला त्यावर मनापासून विश्वास नसतो. आपला विश्वास असतो जे प्रत्यक्षात घडतंय त्यावर. आपल्याला वाटते की बदलण्यासारखे आपल्याकडे फक्त एकच गोष्ट आहे ती म्हणजे आपले कपडे. किती संकुचित विचार ! असं म्हणतात या पृथ्वीवर इंग्लंड आणि अमेरिका या दोन प्रथम दर्जाच्या शक्ती आहेत. माणसाच्या मनात सतत लाटा उसळत असतात आणि त्यात जर या साम्राज्यांना काही स्थान असेल तर ते ब्रिटिश साम्राज्य एका चुटकीसरशी वाहून जाऊ शकते. शिवाय निसर्गाची अवकृपा आपल्यावर केव्हा होईल हेही सांगता येत नाही. ज्या जगात मी राहातो त्या जगाचे कायदे कानून हे ब्रिटिश कायद्यांसारखे मद्याचे घुटके घेता घेता तयार झालेले नाहीत. त्याची मुस वेगळीच आहे....

ले. हेन्री डेव्हिड थोरो
जन्म : जुलै १२, १८१७
मृत्यू : मे ६, १८६२
एकूण आयुष्य : ४४ वर्षे.

... मला एकांतात राहायला आवडते. ज्याची संगत हवीहवीशी वाटावी असा माझा एकच सोबती आहे आणि तो म्हणजे एकांत. मी जेव्हा गर्दीत जातो तेव्हा मी खरेतर एकटाच असतो कारण जेव्हा माणूस विचार करतो तेव्हा तो एकटाच असतो मग तो कुठेही असू देत...

वॉल्डन - १८५४...

.... माझ्यातील वनमाणूस माणसाळला हे खरं, पण फार थोड्या काळासाठी... उबदार आणि थंडगार दिवसातही मी एखाद्या डोंगर माथ्यावरून क्षितिजापलीकडे भिरभिरती नजर टाकण्याची स्वप्ने पाहतो. हा दिसणारा निसर्ग माझ्या सगळ्या दुखण्यांवर औषध आहे फक्त या निसर्गाकडे निसर्गातूनच पाहिले पाहिजे. म्हणजे आपण या निसर्गाचा भाग आहोत हे लक्षात घेऊन निसर्गाकडे पाहिले पाहिजे. ज्या प्रमाणे मोकळ्या रानावरील गवताच्या पात्यावरील निळे फूल आकाशाकडे पाहते, त्याच अनुभूतीने मी निसर्गाकडे पाहतो. मग ज्याप्रमाणे फांद्यांना पालवी फुटते त्याच प्रमाणे माझ्या विचारांनाही पालवी फुटेल. इतरांची पावले सूर्यास्ताला घराकडे वळतात पण माझी डोंगर माथ्याकडे सूर्यास्त पाहण्यासाठी वळतात. गावातील गडबड गोंधळात मी पार मागे पडलोय, पण मला सूर्यास्त दिसतो आणि माझ्या शांत निवांत आयुष्यासाठी तो रेंगाळू शकतो हेच माझ्यासाठी खूप आहे.....

हेन्री डेव्हिड थोरो - १८४१

थोरो जर्नल लिहायचा. वैयक्तिक जर्नल ठेवण्याची त्या काळात अमेरिकेत फॅशन होती. त्यात दिवसभराच्या नोंदी असत आणि त्यावर विचारही प्रकट केले जात. अशीच एक नोंद...

.... एकदोन टवाळखोरांबरोबरचे प्रसंग सोडल्यास थोरोला कॉन्कॉर्डमधे तसा काहीच त्रास नव्हता आणि खरं सांगायचे तर थोरोला त्याची तमा ही नव्हती. तो त्याच्या प्रतिष्ठेची, कोण काय म्हणेल याची फिकीरच करत नसे. पण एक दिवस जेव्हा चार्ल्स् स्क्राईब्नर कडून त्याला पत्र आल्यावर त्याला आश्चर्यच वाटले. त्याने अमेरिकन लेखकांच्या कोशात त्याचे नाव अंतर्भूत करण्यासाठी त्याची माहिती मागवली होती... थोरोचे नेहमीप्रमाणे काम सुरूच होते. गरीब आयरीश स्थलांतरीतांना मदत करणे, सर्वेक्षण करणे, पळून जाणार्‍या गुलामांना मदत करणे, निसर्गातील घडामोडींच्या नोंदी ठेवणे, हिंडणे, भटकणे, पक्षांच्या येण्याजाण्याच्या नोंदी ठेवणे, कीटकांचा अभ्यास करणे इ. इ. पण संध्याकाळी उन्हे उतरली की अंधूक संध्याछायातून आणि रात्रीच्या अंधारात त्याचे रानावनातून भटकणे मात्र वाढलेच होते. त्याच्या लिखाणाचा तो आत्माच होता असे म्हटले तरी चालेल. त्या भटकंतीची वर्णने म्हणजे फक्त निसर्गरम्य जंगलाची वर्णने होती असे नव्हते.

एकदा त्याने लिहिले,

“ त्या खडतर भूभागावर चालणे...
कधी कुरणातून आंधळेपणाने गवत तुडवत चालणे
तर कधी पाणथळीत गुडघाभर चिखल तुडवीत रस्ता कापणे.
कधी खड्डयांवरून उड्या मारत
तर कधी रांगत,
कधी छातीपर्यंत पाण्यातून ओढे पार करीत आम्ही चालत असू.
काट्याकुट्यातून,
करवंदांच्या बोचकारणार्‍या जाळ्यातून आम्ही रस्ता काढत असू
तर कधी बर्चच्या जंगलातून पिसवांनी भरलेल्या झाडा झुडपातून आम्ही चालत असू.
त्यावेळेस आमच्या चेहर्‍यावर या पिसवा डसत असत तर आमचे कपडे त्यांनी भरून जात.
कधी निसर्गरम्य झाडांच्या खाली,
तर कधी हिरव्यागार झुडपांच्या मखमली काठावरून,
तर कधी लाकूडतोड्यांनी तेथेच टाकलेल्या, पायाखाली कुरकुरणाऱ्या झाडांच्या फांद्यांवरून,
तर कधी निसरड्या पाऊल वाटेवरून,
तर कधी गुरांच्या घसरड्या वाटांवरून आम्ही फिरत असू.
कधी जंगलातील पायवाटेवरून
तर कधी देवदारांच्या दाट जंगलातून जाणारे रस्ते पार करून आम्ही परत रानात घुसत असू.
कधी आम्ही डोक्यापेक्षा उंच वाढलेल्या गवतात लुप्त होत असू
तर कधी कडे उतरत असू.
आम्ही कधी श्रब ओकच्या झाडीतून टेकड्यांना वळसे मारत असू. या काटेरी झुडपातून फिरताना आमच्या कपड्यांच्या चिंध्या होत असत तर शरीर खरचटत असे.
कधी मोठ्या कष्टाने डोंगरावरील पायवाटा चढून गेल्यावर तेथून पुढे जाणे शक्य नाही हे पाहून निराश होत असू.
कधी आखीव रेखीव मक्याच्या शेतातून फिरत असू तर कधी अनोळखी टेकड्यांवरून...”

माणसांना माहीत असते की त्यांनी ज्या जीवन पद्धतीचा अंगीकार केला आहे ते त्यांच्या अनारोग्याच्या मागचे मूळ कारण आहे. ते न बदलता आपण उपचार करीत राहातो आणि मग दैवाला, देवाला, नशिबाला, वैद्याला दुषणे देत बसतो. जीवन पद्धतीत थोडा जरी बदल केला तर मनाचे आणि शरीराचे आरोग्य सुधारण्यास निसर्ग निश्चितच मदत करतो. थोरो म्हणतो ते त्याचे (निसर्गाचे) कामच आहे...

...ऋतू चक्रातील प्रत्येक ऋतूवर मनापासून प्रेम करा, उत्कटपणे तो ऋतू जगा. प्रत्येक ऋतूत हवा वेगळी असते, पाणी वेगळे असते, फळे वेगळी असतात त्यामुळे प्रत्येक ऋतूत या सगळ्याचा आस्वाद घ्या. त्या त्या ऋतूत मिळणारी फळे, हवा, पाणी हाच तुमचा आहार असू देत. तुमची पेयं आणि तीच तुमची औषधे असू देत. ऑगस्ट महिन्यात फक्त बेरीज वर राहा. त्या महिन्यात मांसाहार वर्ज्य करा. असे समजा की तुम्ही एखाद्या निर्जन वाळवंटातून किंवा सागरातून प्रवास करत आहात आणि बेरीज शिवाय तेथे काही मिळत नाही. अंगावर जरा वारा घ्या. शरीरातील रंध्रे उघडू द्या आणि निसर्गाच्या लाटांमध्ये, झर्‍यांच्या पाण्यामध्ये, महासागरांच्या लाटांवर स्वार होत त्यात स्नान करा. संसर्ग हा शरीराच्या आतूनच होत असतो. अनैसर्गिक जीवन पद्धतीने थडग्याच्या काठावर येऊन बसलेला आजारी माणूस गवती चहा पितो आणि तेच अनैसर्गिक जीवन जगतो मग तो बरा कसा होणार? हे म्हणजे मोरीला बोळा आणि दरवाजा उघडा असाच प्रकार झाला. त्याचे त्याच्या जीवनावर आणि निसर्गावर मुळी प्रेमच नसते त्यामुळे तो आजारी पडतो आणि खंगत जातो आणि कदाचित मरू ही शकतो. कुठलाही डॉक्टर त्याला बरं करू शकेल असं मला तरी वाटत नाही. वसंत ऋतूत तुम्हाला पालवी फुटू दे ! शिशिरामधे तुमचा रंग पानांप्रमाणे बदलू दे ! परिपक्व होऊ दे ! कुपीतील औषधासारखं प्रत्येक ऋतूचा अर्क, जो खास तुमच्यासाठी निसर्गाने तयार केला आहे त्याचे प्राशन करा. ग्रीष्म ऋतूच्या अर्काने तुम्ही कधीच आजारी पडणार नाही पण तुमच्या कपाटात ठेवलेल्या मद्याच्या बाटल्यांनी मात्र तुम्ही आजारी पडू शकता. पिण्यासारखे मद्य असेल तर निसर्गाने बाटलीबंद केलेले मद्यच ! तुम्ही पिता ते नाही ! कातडी पिशव्यांतून भरलेले मद्य पिऊ नका तर फळांच्या गरात भरलेले सुमधूर मद्य प्या. निसर्गालाच तुझ्यासाठी खर्‍या मद्याचे प्याले भरू देत कारण निसर्ग प्रत्येक क्षणी आपल्याला बरं करण्याचा प्रयत्न करत असतो. शिवाय तो हे काम तो खास तुझ्यासाठी आणि विनामोबदला करत असतो. त्याचे अस्तित्व यासाठीच तर आहे. त्याला प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष विरोध करणे हा आपला मूर्खपणा ! निरोगी राहाण्याची तुमची इच्छा जर तीव्र असेल तर निसर्ग तुम्हाला निरोगी राहाण्यासाठी मदतच करणार हे निश्‍चित. माणसाला आरोग्यासाठी निसर्गातील काही गोष्टींचाच फायदा कळला आहे.. अजून त्याला त्याचे बरेच फायदे कळायचे आहेत असे मला वाटते. मी तर म्हणतो चांगल्या आरोग्याचे दुसरे नावच मुळी निसर्ग आहे आणि ऋतू आपल्या आरोग्याची वेगवेगळी रुपं आहेत. काही माणसांना वाटते की त्यांना शिशिरात बरं वाटत नाही, किंवा हिवाळ्यात ते आजारी पडतात पण त्याचे खरे कारण हे आहे की ते त्या ऋतूशी एक रुप झालेले नसतात...”

- थोरोने हे लिहिले त्याच्या जर्नल मधे १८५३ साली.

.....आज झोप येणे शक्य नाही...

आज वॉल्डन पूर्णपणे संपले. म्हणजे वॉल्डन आधीच संपले होते...आज थोरोचे चरित्रही लिहून संपले. ही दोन्ही पुस्तके एकच करण्याचा विचार आहे कारण थोरोचे चरित्र वाचले नाही तर वॉल्डन समजणे अवघड आहे...

..... तो मरणाच्या दारात होता आणि त्याच्या मागचे कारण होते त्याला झालेला क्षयरोग. हे त्याला आता कळून चुकले होते. आता तो भटकण्यासाठी जाऊ शकत नव्हता. तेवढी शक्तीच त्याच्या अंगात उरली नव्हती. पण त्याने पूर्वी भटकताना, हिंडताना जी वर्णने लिहिली होती ती वर्णने परत परत वाचून तो तेवढाच आनंद मिळवीत असे. “ मला निसर्गाबद्दल दोन शब्द लिहायचे आहेत. पूर्ण स्वातंत्र्य आणि स्वातंत्र्य, अफाट गूढ निसर्ग आणि मानवाची संस्कृती या वेगवेगळ्या गोष्टी आहेत हे मला समजून सांगायचे आहे.... मी चालण्या बद्दल जे बोलतो तो चालणे एक स्वतंत्र व्यवसायच आहे हे मला लोकांना समजवून सांगायचे आहे... माझा जंगलांवर, त्यांच्या मूक गूढ आफाटतेवर विश्वास आहे... माझा गवताळ कुरणांवर लोभ आहे आणि त्या रात्रीवर ही, ज्यात मक्याची कणसे वाढतात...

मला खात्री आहे त्या काळात तो मनाने परत सर्व जंगले, तळी, डोंगर दर्‍या भटकून आला असणार. तेच आयुष्य परत मनाने का होईना जगला असणार. जुन्या दिवसांचे प्रहर मनाने त्याने परत अनुभवले असणार. जशी तब्येत अधिकाधिक बिघडत गेली तशी त्याच्या बहिणीने त्याला त्याचे लेख तपासण्यास मदत केली. हे सगळे लेख द आटलांटिक मधे छापून येणार होते. त्याचे मित्र त्याला भेटून जात होते. तो जेव्हा तुरुंगात होता तेव्हाचा त्याचा जेलर सॅम स्टेपल्सही त्याला भेटण्यास आला होता. या माणसाने नंतर थोरोला सर्वेक्षणामध्ये मदतनीस म्हणून काम केले होते. नंतर त्याने एमर्सनला सांगितले, “ एवढ्या आनंदाने आणि शांत चित्ताने मरताना मी आजवर एकही माणूस पाहिलेला नाही. त्याच्या बरोबर मी एक तास काढला असेल पण एवढे समाधान मला आयुष्यात कधीही लाभले नसेल. थोरोच्या आत्याने थोरोला विचारले, “ तुझे आणि परमेश्वराचे भांडण मिटले की नाही ? तुमच्यात तह झाला की नाही शेवटी ?” थोरोने उत्तर दिले, “आमचे भांडण होते हे मला आत्ताच कळतंय !” चॅनिंगला तो जाणार हे पाहून अत्यंत दु:ख झाले. त्याने त्याचे दु:ख बोलून दाखवल्यावर थोरोनेचे त्याचे सांत्वन केले. “चॅनिंग, काही गोष्टींचा शेवट झालेलाच चांगला असतो.”

एक माणूस भेटायला आल्यावर थोरो त्याला म्हणाला, “मरण कोणाला चुकले आहे ? मी लहान होतो तेव्हाच मला समजले होते की सगळ्यांना एक ना एक दिवस मरायचे आहे. त्यामुळे मला आता त्याचा खेद होत नाही आणि मला त्याचा शोक ही नाही. मृत्यू जेवढा तुमच्या जवळ आहे तेवढाच माझ्याही. अजून एक माणूस त्याला भेटायला आला होता. हा बहुधा धार्मिक असावा. त्याने त्याला मृत्यूनंतरच्या जगाबद्दल सांगण्यास सुरुवात केल्यावर थोरोने त्याला रोखले व म्हणाला, “एका वेळी एकाच जगाबद्दल बोललेले बरे !”

६ मे उजाडला. सकाळ सूर्यकिरणांनी उजळून निघाली होती. हवा मस्त पडली होती. शेजार्‍याने थोरोला काही हायसिंथची फुले आणून दिली. ती हातात घेत थोरो शांतपणे त्याच्या कोचावर मागे रेलला. त्याने डोळे मिटले व पुटपुटला, “मुस” “इंडियन”.
त्या क्षणी वयाच्या ४४व्या वर्षी त्याने जे डोळे मिटले ते परत कधीही न उघडण्यासाठी..

त्याचा दफन विधी कॉन्कॉर्डच्या पॅरिश चर्चमधे करण्यात आला. त्यावेळी त्याला श्रद्धांजली वाहताना एमर्सन म्हणाला, “ याच्या एवढा सच्चा अमेरिकन आजवर झाला नाही आणि पुढे होईल असं वाटत नाही.” त्याने त्याच्या निरोगी शरीराचे आणि मनाचे कौतुक केले. तो अचूकपणे सोळा रॉड चालू शकत असे जे इतरांना पट्टीने ही मोजता येणार नाही. तो भर रात्री जंगलात रस्ता चुकत नसे कारण तो नजरेने जंगल पाहात नसे तर पायाने पाहात असे. झाडांचा घेर व उंची तो नुसत्या नजरेने पाहून सांगू शकत असे. कुठल्याही प्राण्याचे अचूक वजन तो नजरेने पाहून सांगत असे. डब्यातून पेन्सील काढायच्या वेळी प्रत्येक वेळा तो एक डझन पेन्सिली बरोबर काढायचा. तो उत्कृष्ट पोहायचा, बोट वल्हवायचा. पळायचा, स्केटींग करायचा आणि मला वाटते पायी प्रवास करण्यामध्ये त्याचा हात धरणारा या राज्यात सापडणार नाही. त्याचे शरीर आणि मन जणू एका अज्ञात धाग्याने बांधले गेले होते.

त्याने नंतर म्हटले, “ एवढे तारतम्य बाळगणारा माणूस माझ्या पाहाण्यात नाही. त्याचे हात कणखर होते तर इच्छाशक्ती प्रबळ होती. त्याच्या बुद्धिमत्तेविषयी तर बोलायलाच नको.” भाषणाचा शेवट त्याने एखादी भविष्यवाणी करावी तसा केला.

“आपल्या देशाने किती महान पुत्र गमावला आहे याची अजून आपल्या देशवासियांना कल्पना नाही. त्याने जे काम सुरु केले आहे ते पूर्ण करणे कोणाला शक्य होईल की नाही याबद्दल माझ्या मनात शंका आहे. हे काम अर्धवट टाकून या माणसाने विश्वाच्या रंगभूमी वरून निघून जावे हे कोणाच्याही मनास न पटणारी गोष्ट आहे. चीड आणणारी गोष्ट आहे. त्याने त्याच्या कामाची ओळख त्याच्या एवढ्याच थोर माणसांना करून दिली असती तर बरं झाले असते एवढेच म्हणणे आपल्या हातात आहे. पण मला खात्री आहे तो समाधानातच गेला असणार. त्याचे ह्रदय विशाल, प्रेमळ व अनुकंपेने सदा भरलेले असायचे. जेथे सद्गुण आहेत, सौंदर्य आहे, निसर्ग आहे तेथे त्याला त्याचे घर सापडो हीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना !

ही प्रार्थना झाल्यावर थोरोचे शव ‘न्यु बरिईंग ग्राऊंड” वर नेण्यात आले. ही दफन भूमी बेडफोर्ड स्ट्रीटच्या शेवटी आहे. काही वर्षांनंतर त्याचे अवशेष स्लीपी हॉलो सेमेटरी येथे सन्मानाने परत दफन करण्यात आले. कॉन्कॉर्डने आपला सर्वोत्तम पुत्र गमावला होता आणि देशाने एक सच्चा माणूस व त्या काळातील एक अद्वितीय लेखक गमावला होता....

हेन्री डेव्हिड थोरो
जन्म : जुलै १२, १८१७
मृत्यू : मे ६, १८६२
एकूण आयुष्य : ४४ वर्षे.

..... कुठला सारासार विचार करणारा माणूस बाह्य स्वरुप अत्यंत महत्त्वाचे आहे असे समजेल? कासवाच्या पाठीवर ठिपके असणारे कवच असते पण त्याला त्याची जाणीवही नसते. ब्रॉडवेवरील चर्चला जसे एका करारानुसार चर्चची इमारत बांधून मिळाली तसा एखादा करार कासवाशी कोणी केला होता की काय? जेवढे कासवाला त्याच्या कवचाशी घेणे असते तेवढेच घेणे सामान्य माणसाला त्याच्या घराच्या सजवलेल्या बाह्य स्वरूपाशी असते हे लक्षात घ्या.

युद्धभूमीवर जाताना सैनिक सर्व पदके व मानचिन्हे उतरवून जातो कारण ती चमकतात. शत्रूला दुरुन ती दिसू शकतात. आणि शत्रूची अचानक समक्ष गाठ पडल्यावर सैनिकाचा चेहरा पांढराफटक पडू शकतो.

हा माणूस (वास्तुविशारद) कळसावरून आतील माणसांना उपदेश करतो पण त्या घरात जे राहणार आहेत त्यांना खरोखरीच त्याच्यापेक्षा जास्त माहिती असते. माझ्या दृष्टीने जी काही सुंदर घरं आहेत आणि जेव्हा केव्हा मी ती पाहतो तेव्हा मला ती आतून बाहेरच्या दिशेने सुंदर होत असतात हे जाणवते. म्हणजे आत राहणार्‍या माणसांच्या गरजा काय आहेत हे समजून घेऊन जी घरे आकारास येतात तीच घरे मला सुंदर भासतात. ही घरं बाहेरुन कशी दिसतात याच्याशी त्या घराला काही देणेघेणे नसते. कासवासारखेच. यापुढे या घरात ज्या काही सुधारणा होणार आहेत किंवा त्याच्या सौंदर्यात जी काही भर पडणार आहे ती आपल्या आयुष्याच्या सौंदर्यात जी जाणता अजाणता भर पडणार आहे त्याप्रमाणेच असणार आहे. त्याचा जास्त गाजावाजा करण्याची खरोखरीच गरज नाही.

या देशातील कुठल्या घरात मला स्वारस्य असेल तर ते गरीबाच्या घरात. कुठल्याही तैलचित्र रंगविणार्‍या कलाकाराला विचारा तो हेच सांगेल की प्रामाणिक, साधेसुधे घरच त्याला कॅनव्हासवर रंगवण्यासाठी आवडते. ही घरं सुंदर दिसतात ते त्यात राहणार्‍या माणसांच्या आयुष्यामुळे. घरांवर असलेल्या नक्षीकामामुळे नाही. उपनगरातील नागरिकांची चौकोनी घरंही मला तेवढी रम्य वाटतात. पण केव्हा? जेव्हा त्यांची घरं साधीसुधी असतील आणि आयुष्य मात्र रम्य असेल, ते घर ताणतणावमुक्त असेल तेव्हा. घराची सजावट करण्यासाठी ज्या रचना घरावर केल्या जातात, त्या जवळजवळ सगळ्या पोकळ असतात आणि सप्टेंबर महिन्यात येणारी वादळे त्यांच्या चिंध्या उडवतात. ज्यांच्या घरात मीठ मोहरीसाठी कष्ट उपसावे लागतात त्यांना कसले वास्तूशिल्प आणि कसले काय..

साहित्यातही बर्‍याच वेळा विचारांवर शब्दांचे अलंकार चढवले जातात तो प्रकारही असाच आहे. विचार पडतो मागे आणि पुस्तकाच्या सजावटीकडेच जास्त लक्ष दिले जाते. ज्या प्रकारे चर्चच्या बांधणीत वास्तुविशारद कळसावर जास्त लक्ष पुरवतो तसेच बायबलच्या लेखकाने त्याच्या मुखपृष्ठावर जास्त वेळ घालवला असता तर तुम्हाला कसे वाटले असते?

विश्वास बसणे कठीण आहे पण माणूस डोक्यावर आणि पायाखाली किती खण बांधतो आणि त्याची ती राहाण्याची पेटी कुठल्या रंगाने रंगवतो याचा जास्त विचार करतो. त्यांनी ते मनापासून केले असेल तर मी तेही समजू शकतो. पण बहुतेक वेळा ते इतरांनी केले म्हणून केले जाते. ज्या घराचा आत्मा हरवला आहे ते घर आणि स्वत:च्या शवपेटीत तसा काय फरक उरतो? आणि मग ते बांधणार्‍यास शवपेट्यांचा कारागीर का म्हणू नये?

एका उद्विग्न झालेल्या माणसाने वर्डस्वर्थच्या काही शब्दांचा भलताच अर्थ लावला आहे. कदाचित त्याला आयुष्याचा उबग आला असावा. त्याच्या मते वर्डस्वर्थ म्हणतो, “जर तुम्हाला तुमच्या घरासाठी रंग निवडायचा असेल तर पायाखालील गवत उपटा. त्याच्या मुळांना जी माती लागली असेल त्याचा रंग तुमच्या घराला द्या.” तो माणूस काय त्याला त्याचे शेवटचे घर रंगवायला सांगतोय की काय! मग मूठभर माती कशाला ? तुमच्या वर्णाने रंगवा ना ते घर म्हणजे ते घरही भावना व्यक्त करण्यास मागेपुढे पाहणार नाही. कठीण आहे...हे लोक सामान्य माणसांच्या का मागे लागले आहेत कोण जाणे !....

हेन्री डेव्हिड थोरो वॉल्डनमधे..

.....साथसंगत सहजपणे उपलब्ध असते त्यामुळे आपण वारंवार भेटत राहतो. मधे इतका कमी वेळ जातो की बर्‍याच वेळा आपण नवीन, महत्त्वाचे, अर्थपूर्ण असे आपल्या मित्रमंडळींना काही सांगू शकत नाही. दिवसातून तीन वेळा आपण एकमेकांना भेटतो आणि शिळ्या कढीला उत आणतो. मग अशा भेटी सुसह्य व्हाव्यात म्हणून आपण रीतिरिवाज, शिष्टाचाराचे नियम बनवतो व इतरांना ते पाळण्यासाठी भाग पाडतो किंवा इतर तुम्हाला ते पाळण्यास भाग पाडतात जेणे करुन उघड उघड वाद निर्माण होणार नाहीत. आपण कुठे भेटत नाही ? पोस्टात भेटतो, कार्यक्रमात भेटतो, रात्री शेकोटीपाशी भेटतो, मग आपली घसट वाढते व त्याचे रुपांतर लवकरच घर्षणात होते व परस्परांबद्दल वाटणारा आदर मग कमी होऊ लागतो. मला वाटते यापेक्षा फक्त महत्त्वाच्या बाबींसाठी व ते सुद्धा मनापासून भेटणेच योग्य ठरेल. लोवेल्सच्या कारखान्यामध्ये काम करणार्‍या मुली एकत्र राहतात. एका खोलीत सहा सहा मुली राहतात. त्यांना कसलाही एकांत मिळत नाही ना खाजगी वेळ...त्या स्वप्नात तरी एकट्या असतील का नाही याची मला शंकाच आहे. हे अतिक्रमण अमानवी आहे असे मला वाटते. माझ्या मते प्रत्येक चौरस मैलात एकच माणूस राहावा, जसा आत्ता मी राहतोय. माणसाची किंमत आपण त्याच्या किती जवळ जाऊ शकतो यावर ठरत नसते. त्याच्या अंगाला अंग घासत चालण्याची, मला नाही वाटत, काही आवश्यकता आहे....
१८५४ साली लिहिलेल्या या ओळी आजही आपल्याला लागू पडतात. पूर्वी भेटण्यासाठी प्रत्यक्ष जावे लागे पण आता आपण फोनवर भेटतो, व्हॉट्स्अ‍ॅपवर भेटतो, फेसबूकवर भेटतो, ई-मेलने भेटतो. त्यामुळे काय होत असावे हे वरील ओळींमध्ये समजते. जर खरी मैत्री असेल तर शेवटचे वाक्य लक्षात घ्या. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे मैत्री आणि ओळख यामधील फरक समजून घ्या. एकदोन खटके उडाले की आपणच स्वतःवर बंधने घालून घेतो. बंधने आली की नाटकीपणा आला. नाटकीपणा आला की खरी मते तुम्ही मांडू शकत नाही. मग उरते फक्त औपचारिकताच.. आता यासाठी भेटायचे का हे तुम्ही ठरवा... नसेल तर कमी भेटा आणि भेटाल तेव्हा हृदयापासून भेटा...

थोरो... वॉल्डन मधे (१८५४)

.... तुम्हाला जर तुमच्यावर चाललेली टीका ऐकायची असेल तर क्षणभर स्तब्ध उभे रहा, हवेच्या प्रत्येक झुळुकेला कान द्या. ती टीका तेथे निश्‍चितच आहे. ज्यांना ती टीका ऐकू येत नाही ते अभागी म्हणायचे. मैफिलीत वाद्ये जेव्हा लावली जातात तेव्हा कुठलीही सुरावट नसताना आपल्या कानावर पडणार्‍या त्यांच्या झंकांरांनी आपण मंत्रमुग्ध होतो, मोहरून उठतो आणि कितीतरी वेळा गोंगाट दूरवर पोहोचतो आणि दुर्दैवाने संगीत म्हणून ऐकला जातो हे आपल्या नीच दर्जाचे एक विडंबनच म्हणावे लागेल....

हेन्री डेव्हिड थोरो वॉल्डनमधे (१८५४)

जयंत कुलकर्णी

वाङ्मयलेख

प्रतिक्रिया

कुमार१'s picture

2 Sep 2018 - 4:08 pm | कुमार१

सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे मैत्री आणि ओळख यामधील फरक समजून घ्या. >>> + १०००००० .................. !

रश्मिन's picture

2 Sep 2018 - 5:35 pm | रश्मिन

अप्रतिम भावानुवाद ! याची पहिली प्रत मी घेणार हे नोंदवतो .. खूप खूप शुभेच्छा !

माझ प्रचन्ड आवडत पुस्तक आहे हे.

जयंत कुलकर्णी's picture

3 Sep 2018 - 11:20 am | जयंत कुलकर्णी

सर्वांना धन्यवाद !

पुंबा's picture

3 Sep 2018 - 12:40 pm | पुंबा

अ प्र ती म! केवळ अप्रतीम.
वॉल्डन वाचायचा किमान तीनदा प्रयत्न केलाय मी. कधी जमेल काय माहित! तुमचा अनुवाद अवश्य वाचणार.

श्वेता२४'s picture

7 Sep 2018 - 2:27 pm | श्वेता२४

कितीसुंदर विचार आणि त्याचा तितकाच नेमका अनुवाद. भारावून जावं इतकं सुंदर आहे हे. खूपच आवडलं.

यशोधरा's picture

7 Sep 2018 - 4:23 pm | यशोधरा

वॉल्डन सुरेख आहे! अनुवाद प्रकाशित झाला की नक्की सांगा.

जयंत जी, आपण पुण्यात असता हे आज कळले. आपल्या कलाकृतींना वाचायला प्रत्यक्ष भेट घ्यायला आवडेल.
सवडीनुसार कुठे भेटायचे ते कळवा. 9881901049

जयंत कुलकर्णी's picture

12 Oct 2018 - 4:37 pm | जयंत कुलकर्णी

नमस्कार !
मी पुण्यातच असतो. माझा फोन नं आहे - ९८२३२३०३९४
पण सध्या वॉल्डनच्या पॅकिंगच्या व डिस्पॅचच्या गडबडीत आहे कारण मला १५ ला अमेरिकेला जायचे आहे.. त्यामुळे... बाकी काही नाही. मला अर्थातच तुमची भेट घेण्यास आवडेलच. पण आत १६ फेब. नंतर... आपण क्षमा कराल अशी आशा आहे...
आपला,
जयंत कुलकर्णी

कलम's picture

12 Oct 2018 - 4:28 pm | कलम

छान लेख