चहा-साखरेचे डबे

कवितानागेश's picture
कवितानागेश in जनातलं, मनातलं
2 Jul 2018 - 9:35 pm

चहा-साखरेचे डबे

.... प्रत्येक घरात असतात. त्यांनी तसंच राहायचं असतं, एकमेकांच्या बाजूला, एकत्र शोभतील अश्या डब्यात!
त्यांची जागाही ठरलेली असते. हाताशी सहज येतील, पटकन दिसतील अशी सोयीची जागा. आणि डबे सुध्दा ठरलेले असतात. जवळजवळ एकसारखे, थोडे लहानमोठे. त्यांनी तसं च राहायचं असतं. एकमेकांच्या बाजूला, एकत्र शोभतील अश्या डब्यात!
त्यांच्या खुणेनी इतरही वस्तू आजूबाजूला येतात आणि जातात. पण या दोघांचा मात्र उल्लेखही एकत्रच होतो. चहासाखरेच्या डब्यांची फळी, असाच पत्ता असतो तिथला.
वास्तविक चहा आणि साखरेत काहीही साम्य नाही. पण सोयीसाठी म्हणून, कधीतरी, कुणीतरी त्यांना एकमेकांजवळ मांडलं. आणि तीच त्यांची जागा ठरून गेली. एकमेकांच्या बाजूला, एकत्र शोभतील अश्या डब्यात!
चहाच्या नशिबी दिवसातून दोनवेळा खळखळून उकळून घेणं. पण उकळूनही तो काही विरघळत नाही. तो कुणी खातही नाही. त्याचा अर्क तेवढा कामाचा- बाकीचा चोथा!
पण बाकी स्वैपाकाशी त्याचा काहीकाही संबंध नसतो.
साखर मात्र सगळीकडे हवी. दिवसाच्या सुरुवातीला एकदा का चहात विरघळून झालं, की पुन्हा अजून सतराशेसाठ पदार्थांच्या चवीची तिला संभाळायच्या असतात. प्रत्येकच पदार्थात विरघळून स्वतः चे वेगळे अस्तित्वच नाहीसं करून टाकते ती. त्याशिवाय चव चढेलच कशी त्या वस्तूला?
पण म्हणून काही तिची जागा बदलत नाही! ती कायम तिथेच उभी. हाताशी, सहज सापडेल अशी. अन चहाही तिथेच. साखरेच्या बाजूला.
आता चहाच्या सोयीसाठी साखरेला ती जागा मिळाली, की साखरेपायी चहाला ती जागा घ्यावी लागली, कुणास ठाऊक?
पण गुण कितीही वेगळे का असेनात, त्यांनी आपली ठरवून दिलेली जागा सोडायची नाही.त्यांनी तसंच राहायचं असतं, एकमेकांच्या बाजूला, एकत्र शोभतील अश्या डब्यात!

- कविता

मुक्तकप्रकटन

प्रतिक्रिया

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

2 Jul 2018 - 9:48 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

बऱ्याचशा या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात येत नाहीत किंवा आपण त्याचा विचार करत नाही. अस कोणी काही लिहिले की एकदम जाणवतं.

गवि's picture

2 Jul 2018 - 10:26 pm | गवि

उत्तम..

निनाद's picture

3 Jul 2018 - 2:17 am | निनाद

खूप छान

तुषार काळभोर's picture

3 Jul 2018 - 7:02 am | तुषार काळभोर

आवडलं..

मूकवाचक's picture

3 Jul 2018 - 9:13 am | मूकवाचक

१+१

टर्मीनेटर's picture

3 Jul 2018 - 12:50 pm | टर्मीनेटर

ध्रुव ताऱ्या प्रमाणे अढळपद मिळालाय त्या डब्यांच्या जोडीला. छान लिहिलंय.

मराठी कथालेखक's picture

3 Jul 2018 - 1:46 pm | मराठी कथालेखक

सामान्यतः रोज साखरही चहापुरतीच लागते.. भाजी / वरणात साखर टाकणारे लोक कमीच. त्यामुळेच त्यांची जोडी आणि बर्‍यापैकी कॉफी पिणार्‍यांकडे तिसरा डबा कॉफीचा.. पण कॉफी वर ओलसर वातावरणाचा लवकर प्रभाव पडतो म्हणून तिला हवाबंद डब्यात ठेवावे लागते.

एमी's picture

5 Jul 2018 - 7:38 am | एमी

+१

दुर्गविहारी's picture

3 Jul 2018 - 1:54 pm | दुर्गविहारी

मस्त ! :-) एक वेगळाच विचार.

संजय पाटिल's picture

3 Jul 2018 - 3:26 pm | संजय पाटिल

छान!!!

सस्नेह's picture

3 Jul 2018 - 5:22 pm | सस्नेह

छान लिहिलंय.

राजेंद्र मेहेंदळे's picture

3 Jul 2018 - 6:06 pm | राजेंद्र मेहेंदळे

आता मिसळणाच्या दब्याबद्दल (मसाले /हळद/तिखट वगैरे) पण येउ द्या

सध्या साखरेच्या एवजी गुळाचा डब्बा जोडीला ठेवला आहे.

अर्धवटराव's picture

4 Jul 2018 - 11:02 am | अर्धवटराव

चहा-साखर फक्कड जमली हो.

रातराणी's picture

4 Jul 2018 - 11:53 am | रातराणी

मस्त! आवडलं मुक्तक!

श्वेता२४'s picture

4 Jul 2018 - 1:50 pm | श्वेता२४

वेगळा विषय छान मांडलाय

कवितानागेश's picture

19 Jul 2018 - 3:36 pm | कवितानागेश

सर्व वाचकांचे आभार.

स्वाती दिनेश's picture

22 Jul 2018 - 9:02 pm | स्वाती दिनेश

मुक्तक छान आहे माऊ,
स्वाती

चित्रगुप्त's picture

22 Dec 2018 - 5:28 am | चित्रगुप्त

'थोडक्यात गोडी' असलेलं लिखाण आवडलं.

राघव's picture

23 Dec 2018 - 9:08 pm | राघव

असेच म्हणतो. खूप सुंदर लेखन!

हे कसं सुटलं म्हणायचं वाचनातून! :-)

सविता००१'s picture

22 Dec 2018 - 7:05 pm | सविता००१

मस्त लेखन