फेसबुकवरचे आश्चर्यकारक जाहिरातविश्व : रु. १२० खर्चून प्राप्त झालेले ज्ञान

Primary tabs

चहाबिस्कीट's picture
चहाबिस्कीट in तंत्रजगत
23 Jun 2018 - 9:26 am

या लेखाची पीडीएफ लिंक (अद्ययावत नाही)

नमस्कार,

आमचा सध्या चालू असलेला उपक्रम, म्हणजे वेगवेगळ्या खेळांचे नियम सांगणारी वेब सिरीज, हिची माहिती अधिकाधिक लोकांना व्हावी म्हणून काय करता येईल याचा आम्ही विचार करत होतो. वॉट्सअप वर सर्वाना लिंक पाठवूनही व्यूझ फारसे वाढेनात, म्हणून कोणीतरी सजेस्ट केलं फेसबुकवर लिंक टाकून पहा.

मग आम्ही एक फेसबुक पेज तयार करून त्या वर लिंक शेअर केली. पण हे फेसबुक पेज कोणालाच माहिती नसल्यामुळे पोस्ट कोणी बघण्याचा प्रश्नच नव्हता. ओळखीच्या सर्व मित्रांना स्पॅम वाटेल असे “प्लिज पेज ला लाईक करा” छाप मेसेजेस पाठवायचा काही विचार नव्हता.

आता आली का पंचाईत!

मग कुठून तरी माहिती मिळाली कि आपल्या पेज ची जाहिरात पण करता येते फेसबुक वर. आधीच आमच्या चॅनेल चे मोनेटायझेशन बंद असल्यामुळे जाहिरातींवर खर्च करण्याची इच्छा नव्हती. पण “फेसबुकवर जाहिरात करतात तरी कशी”, याबद्दल प्रचंड उत्सुकता मनात होती.

म्हणून हे ज्ञान मिळवण्यासाठी रु. १२० (फक्त) खर्च केले. त्यातून बरेच रोचक मुद्दे ध्यानात आले आहेत. ते सर्वांसमोर मांडत आहे, जेणेकरून या जाहिरातविश्वाची माहिती अधिकाधिक लोकांना होईल.

लेखात खालील भाग आहेत
१. फेसबुक वर जाहिरात कशी द्यावी
२. फेसबुक पोस्टला लाईक कसे मिळवावेत
३. लोकांनी लिंक वर क्लिक करावे म्हणून कशी जाहिरात बनवावी?
४. आपल्याला हव्या त्या लोकांनाच जाहिरात कशी दाखवावी?

-----------------------------------------------------------------------------------------

१. फेसबुक वर जाहिरात कशी द्यावी

सर्वप्रथम फेसबुक पेज सुरु करण्यासाठी http://business.facebook.com वर जाऊन नवे पेज बनवावे. हे काम मोफत होते.

जाहिरात करण्यासाठी तुम्हाला तुमचे ऍड मॅनेजर वर खाते उघडावे लागते. पत्ता आहे http://fb.com/adsmanager

जाहिरात बनवण्यासाठी मोबाईलवर काम करू नये. सर्वात जास्त ऑप्शन्स डेस्कटॉप वर दिसतात म्हणून तिथूनच ऍड मॅनेजर ची साईट उघडावी. अधिक माहिती साठी हे पहा
https://www.facebook.com/business/help/1361486070635113

फेसबुक मार्केटिंग मध्ये दोन व्याख्या महत्वाच्या आहेत.

1. ऑरगॅनिक रिच (organic reach)
- म्हणजे आपल्या फेसबुक मित्रांनी एखाद्या पेजवरच्या/प्रोफाइलवरच्या पोस्टवर लाईक/कमेंट केल्यावर या लाईक/कमेंट चे नोटीफिकेशन आपल्या फेसबुक फीड वर येणे.

2. पेड रिच (paid reach) - ज्या पोस्ट वर कोणीतरी जाहिरातीसाठी खर्च केला आहे, ती पोस्ट आपल्या फेसबुक फीड वर येणे.

कमी भांडवल असलेल्या उद्योजकांना एक फुकट सल्ला - पेड रिच (paid reach) सोबत तुलना केल्यास फेसबुक पेज ची ऑरगॅनिक रिच (organic reach) फार कमी असते. बऱ्याचदा जी लोकं आपलं पेज फॉलो करतात त्यांनाच आपल्या पोस्ट्स दिसत नाहीत. अशावेळी आपली पोस्ट अधिकाधिक लोकांनी पहावी म्हणून खर्च करावा लागतो.

त्यामुळे ज्यांना या जाहिराती परवडण्यासारख्या नाहीत ते खालील मार्गांचा अवलंब करू शकतात.

1. आपल्या प्रॉडक्टशी संबंधित एखादा फेसबुक ग्रुप असेल, तर तिथे (ऍडमिनची परवानगी घेऊन) आपल्या प्रॉडक्टची माहिती लोकांना देणे. असा कोणताच ग्रुप अस्तित्वात नसल्यास स्वतः असा ग्रुप तयार करणे.

2. आपल्या पर्सनल अकौंटवरून लोकांना अप्रोच करणे.

२. फेसबुक पोस्टला लाईक कसे मिळवावेत

कधीकधी तुम्हाला प्रश्न पडत असेल, की एखाद्या वाह्यात (किंवा पॉप्युलर होण्यासारखे प्रथमदर्शनी काहीच नसलेल्या) पोस्टला सुद्धा फेसबुकवर हजारो लाईक्स मिळाले असतात. कोण लोक असतात जे अशा पोस्ट्सला लाईक करतात? काहीही कसे लाईक करतात लोक?

या सर्व प्रश्नांची उत्तरे आम्हाला पहिली जाहिरात बनवल्यावर मिळाली! यासाठी खर्च आला साठ रुपये! आपलं बजेट जेवढं जास्त असेल तेवढ्या जास्त लोकांना फेसबुक आपली जाहिरात दाखवतं. साठ रुपयांत साधारण ६०० ते १००० लोकांना तुमची जाहिरात दिसू शकते

आमच्या पोस्टचे स्वरूप असे होते “यु ट्यूब व्हिडिओची लिंक आणि थोडक्यात व्हिडिओबद्दल माहिती”. ही पोस्ट जाहिरात म्हणून पब्लिश केल्यावर लोकांना आपल्या फेसबुक फीड मध्ये, इंस्टाग्राम वर, मेसेंजर इनबॉक्स मध्ये, आणि अजून बऱ्याच ठिकाणी (जसे की ऑडियन्स नेटवर्क http://www.businessinsider.com/what-is-facebook-audience-network-and-why-does-it-matter-2016-2 ) फेसबुक दाखवतं. जाहिरातींखाली “Sponsored” असं लिहिलेलं असतं.

जाहिरात बनवताना काही उद्दिष्ट समोर ठेवावे लागते. फेसबुक बाय डिफॉल्ट “पोस्ट एंगेजमेंट (Post Engagement)” असे उद्दिष्ट ठेवते. पोस्ट एंगेजमेंट म्हणजे पोस्ट वर आलेले लाईक्स/कमेंट्स/शेअर्स वगैरे. यात तुम्हाला प्रति एंगेजमेंट खर्च येतो. तुमच्या जाहिरातीला कसा रिस्पॉन्स मिळत आहे यावर फेसबुक ऑटोमॅटिकली ठरवतं की प्रति एंगेजमेंट खर्च किती आहे. साधारण १ रुपयाला १ लाईक असे प्रमाण ठोबळमानाने समजावे.

जाहिरात बनवल्यावर ती आधी फेसबुककडून रिव्ह्यू होते. हा रिव्ह्यू बराचसा आर्टिफिशिअल इंटेलिजन्स वर आधारित असावा असा आमचा अंदाज आहे. या रिव्ह्यू मध्ये खालील गोष्टी फेसबुक चेक करते.

 • जाहिरातीच्या मजकुरामध्ये किंवा चित्रांमध्ये काही आक्षेपार्ह गोष्टीत आहेत का?
 • जाहिरात लोकांना फसवणारी आहे का?
 • जाहिरातीत जर एखादे चित्र वापरले असेल, तर त्या चित्रात टेक्स्ट (मजकूर) चे प्रमाण किती आहे? तुमच्या चित्रात मजकुराचे प्रमाण २०-३०% पेक्षा जास्त असेल तर फेसबुक तुम्हाला जाहिरात सुधारा असं सुचवतं.
 • जाहिरात लहान मुलांना टारगेट करणारी असेल तर त्यात बंदुका किंवा दारू असे घटक आहेत का? असले तर ती जाहिरात लहान मुलांना दाखवता येत नाही.

रिव्ह्यूला काही तास लागू शकतात. कधी कधी एखादा दिवसही लागू शकतो. त्यामुळे आपली जाहिरात आधीच शेड्युल करून ठेवावी. रिव्यू सक्सेसफुल झाला की जाहिरात "ऍक्टिव्ह" होते.

आमची जाहिरात "ऍक्टिव्ह" झाल्यावर ८ तासात आम्हाला खालील गोष्टी आढळल्या.

 1. पोस्टवर पन्नास लाईक्स, त्यातले दोन “लव्ह” सिम्बॉल
 2. पोस्टवर एकही कमेंट नाही
 3. व्हिडीओचा एकच व्यू वाढला

आम्हाला प्रश्न पडला. असं कसं शक्य आहे? एवढे लोक लाईक करत आहेत पण व्हिडिओला कोणीच बघत नाही! पोस्ट वर एक कमेंट सुद्धा नाही!

याचे उत्तर शोधताना Veritasium चॅनेल वरचा हा २०१४ साली पब्लिश झालेला व्हिडीओ सापडला (या व्हिडिओत सांगितलेली माहिती किती खरी आहे हे आम्हाला माहिती नाही, पण या व्हिडिओवर बरीच चर्चा इंटरनेटवर झालेली आहे, आणि अजूनपर्यंत हा व्हिडीओ युट्युबवरून काढून टाकलेला नाही म्हणजे काही प्रमाणात तरी खरा असावा)

https://www.youtube.com/watch?v=oVfHeWTKjag

थोडक्यात, त्यांचं म्हणणं असं आहे की अशा बऱ्याच कम्पन्या असतात ज्या लोकांना फेक (खोट्या) लाईक्स मिळवून देतात. तुम्हाला तुमच्या पेजवर लाखांत लाईक्स हवे असतील तर अशा कम्पन्यांकडे जाऊन तुम्ही पैसे देऊन लाईक्स खरेदी करू शकता. हे लाईक्स कोण देतं? तर या कम्पन्यांचे विकसनशील देशांत ब्रॅंचेस असतात. त्यात काम करणाऱ्या लोकांना दिवसभर एकच काम असतं - नवीन नवीन अकाउंट्स फेसबुकवर उघडणे आणि बॉसने सांगितलेल्या पोस्ट्सला/पेजेसना लाईक करणे.

फेसबुक अशा फेक अकाउंट्स ना आळा घालण्याचा प्रयत्न करतं, पण अजूनही त्यांची डिटेक्शन सिस्टीम तेवढी स्ट्रॉंग नाही म्हणून रोज अशी अनेक अकाउंट्स उघडली जातात.

या कम्पन्यांचा आणि जेनुइन फेसबुक जाहिरातींवर मिळालेल्या लाईक्सचा काय संबंध?

संबंध असा आहे - की या कम्पन्यांतली लोकं फेसबुक अल्गोरिथम मधून सापडले जाऊ नये म्हणून बरेच फ्री लाईक्स फेसबुक पोस्ट वर वाटतात. दिवसभर ऑनलाईन असल्यामुळे जी पण “स्पॉन्सर्ड” जाहिरात त्यांना दिसते ते तिला “न वाचताच” लाईक करतात.
आमच्या पहिल्या जाहिरातीला लाईक केलेले बरेचसे लोक हेच असावेत असं आम्हाला वाटतं.

याचा अर्थ पोस्ट ला लाईक आले म्हणजे लोकांनी तुमची लिंक बघितलेलीच आहे असं नाही!

३. लोकांनी लिंक वर क्लिक करावे म्हणून कशी जाहिरात बनवावी?

तर मग अशा फेक अकाउंट्स ना कसं टाळायचं? यासाठीचा उपाय शोधताना एक नवीन माहिती मिळाली.
ती म्हणजे जाहिरात बनवत असताना “पोस्ट एंगेजमेंट” असा उद्दिष्ट न ठेवता “Traffic / Link Click” असं उद्दिष्ट ठेवावे. असं उद्दिष्ट ठेवलं म्हणजे फेसबुक आपली जाहिरात अशाच लोकांना दाखवतं जे लोक सहसा फेसबुकवरच्या लिकांवर क्लीक करतात.

या प्रकारच्या जाहिरातीवर साठ रुपये खर्च केल्यावर आम्हाला असं आढळून आलं की आता पोस्ट वर लाईक्स येत नाहीयेत पण व्हिडीओवरचे वीस व्युज वाढले आहेत. फेसबुक सांगतं की पन्नास लिंक क्लिक आहेत, पण प्रत्यक्षात सगळे लोक व्हिडीओ बघत नाहीत (जरी लिंक वर क्लिक केलं तरी)

अजून एक माहिती आम्हाला मिळाली ती म्हणजे जाहिरात अमुकअमुक विषयांत रस असलेल्या लोकांनाच कशी दाखवावी?

४. आपल्याला हव्या त्या लोकांनाच जाहिरात कशी दाखवावी?

फेसबुकवर जाहिरात देताना अक्षरश: हजारो वेगवेगळे वॅरिएबल्स नी आपण लोकांना टारगेट करू शकतो. अगदी अचंभित करणारी माहिती आहे ही!

 • ठिकाण - (उदा. कोथरूड, पुणे, महाराष्ट्र किंवा भारत वगैरे वगैरे)
 • भाषा - उदा मराठी
 • वयाची रेंज आणि लिंग (स्त्री/पुरुष/सर्व)
 • जाहिरात दाखवताना मोबाईल वाय-फाय ला कनेक्टेड आहे का?
 • डेमोग्राफिक्स - रिलेशनशिप स्टेट्स, शिक्षण, कोणत्या प्रकारचा जॉब करतात, मुले आहेत का, मुले असली तर मुलांचे वय काय (बालवाडीत आहेत का टीनएजर आहेत), वाढदिवस किंवा लग्नाचा वाढदिवस नुकताच झाला आहे किंवा होणार आहे का? वगैरे वगैरे. तुम्ही अमेरिकेतल्या लोकांना टारगेट करत असाल तर लोकांचा राजकारणात झुकाव कोणीकडे असावा, हे सुद्धा स्पेसिफाय करता येते (उदा. रिपब्लिकन, डेमोक्रॅटिक वगैरे)
 • इंटरेस्ट्स - कशा कशात इंटरेस्ट आहे - काय काय खायला आवडते? टीव्हीवर कोणत्या टाईपचे कार्यक्रम पहायला आवडतं, फिटनेस मध्ये रस आहे का, मुव्हीज मध्ये रस आहे का आणि अजून बरंच काही.
 • बिहेवियर - कोणत्या ब्रँड चा मोबाईल वापरतात? इंटरनेटवर शॉपिंग करतात का? सतत बाहेरगावी प्रवास करतात का? त्यांच्या सध्याच्या राहत्या ठिकाणी किती वर्ष रहात आहेत? आणि अजून बरच काही.

अधिक माहितीसाठी ही लिंक पहा https://www.closerscafe.com/facebook-ad-targeting-options-infographic/

मोठ्यामोठ्या कंपन्या हजारो डॉलर्स खर्च करून फेसबुक वर जाहिराती करत असतात
एकूणच अतिशय रोचक आणि तेवढेच खर्चिक असं हे फेसबुकचं जाहिरातविश्व् आहे!

-- लेख समाप्त --
चहा-बिस्कीट प्रोडक्शन

आम्ही कोण आहोत

प्रतिक्रिया

छान, उपयुक्त आणि रोखक माहिती. धन्यवाद..!

शाली's picture

23 Jun 2018 - 10:07 am | शाली

छान माहिती दिलीत.

जव्हेरगंज's picture

23 Jun 2018 - 10:41 am | जव्हेरगंज

रोचक!!

डॉ सुहास म्हात्रे's picture

23 Jun 2018 - 1:40 pm | डॉ सुहास म्हात्रे

रोचक आणि उपयोगी माहिती !

वरुण मोहिते's picture

23 Jun 2018 - 2:57 pm | वरुण मोहिते

माहिती.

चहाबिस्कीट's picture

23 Jun 2018 - 5:02 pm | चहाबिस्कीट

प्रतिसादांसाठी सर्वांचे आभार! लेख संपादित करून "जाहिरातीच्या रिव्यू प्रोसेस" बद्दल थोड्या माहितीची भर घातली आहे.

पिलीयन रायडर's picture

23 Jun 2018 - 5:34 pm | पिलीयन रायडर

मस्त माहिती!

अलबेला सजन's picture

23 Jun 2018 - 5:37 pm | अलबेला सजन

सुंदर माहीती. एका नविन गोश्टीची ओळख झाली.
"तुमच्या जाहिरातीला कसा रिस्पॉन्स मिळत आहे यावर फेसबुक ऑटोमॅटिकली ठरवतं की प्रति एंगेजमेंट खर्च किती आहे. साधारण १ रुपयाला १ लाईक असे प्रमाण ठोबळमानाने समजावे."
फेसबूक वर काही वेळा एखाद्या अपघातात वगैरे जखमी झालेल्या मुलाचा किंवा किडनी हवी असलेल्या मुलाचा फोटो येतो आणि "तुमचा एक लाईक त्या मुलाला १ रु मिळवुन देइल" असे आवाहन असते. हे खरच काम करते का त्या मुलाला असे पैसे मिळवुन देता येतात का?

चहाबिस्कीट's picture

23 Jun 2018 - 5:44 pm | चहाबिस्कीट

"तुमचा एक लाईक त्या मुलाला १ रु मिळवुन देइल" असे आवाहन असते. हे खरच काम करते का त्या मुलाला असे पैसे मिळवुन देता येतात का?

छान प्रश्न. पण असं प्रत्यक्षात होत नाही. लाईक मिळवण्याची फक्त एक ट्रिक आहे ही. मी असं वाचलं होतं की फेसबुक एका नवीन अल्गोरिदम द्वारे अशा "क्लिकबेट (clickbait)" पोस्ट्स ला आळा घालणार आहे.

अवांतर: Clickbait साठी चांगला मराठी प्रतिशब्द कोणता?

---------------------------------
स्वाक्षरी: आमची वेब सिरीज पाहिली का?

गामा पैलवान's picture

24 Jun 2018 - 2:03 pm | गामा पैलवान

अलबेला सजन,

मला अशी जाहिरात येते तेव्हा मी त्या मुलासाठी पाच सेकंदांची प्रार्थना करतो. माझ्या प्रर्थेनेत एका रुपयापेक्षा नक्कीच जास्त शक्ती आहे.

आ.न.,
-गा.पै.

खूपच छान माहिती देताय. आवडलं तुमचं काम. लगे रहो.

श्वेता२४'s picture

23 Jun 2018 - 7:06 pm | श्वेता२४

वेगळ्याच विषयावर लिहिलेत हि माहिती नव्हती

नाखु's picture

23 Jun 2018 - 7:29 pm | नाखु

आणि लाईक यातला नेमका फरक समजावून सांगत आहात, धन्यवाद

फेसबुक अनभिज्ञ नाखु

टर्मीनेटर's picture

23 Jun 2018 - 8:42 pm | टर्मीनेटर

चांगली माहिती दिलीत.

अवांतर: Clickbait साठी चांगला मराठी प्रतिशब्द कोणता?

क्लिक करण्यासाठी दाखवलेले आमिष म्हणून "क्लिमिष" कसा वाटतो?

हरवलेला's picture

24 Jun 2018 - 8:22 pm | हरवलेला

+1

चहाबिस्कीट's picture

24 Jun 2018 - 6:46 am | चहाबिस्कीट

@टर्मिनेटर

मस्त आहे प्रतिशब्द.

@मिपाकर

पाहिलं सेक्शन संपादित करून पेड रिच आणि ऑरगॅनिक रिच बद्दल थोडया माहितीची भर टाकली आहे. प्रतिसदांसाठी सर्वांचे आभार!

पाटीलभाऊ's picture

25 Jun 2018 - 5:27 pm | पाटीलभाऊ

उपयुक्त आणि रोचक माहिती

लई भारी's picture

27 Jun 2018 - 3:16 pm | लई भारी

खूपच भारी माहिती आहे. वरवर कल्पना होती पण व्यावसायिक दृष्टिकोनातून एवढा विचार नव्हता केला.
गुगलच्या रिजल्टवर आणि फेसबुक वापरात होतो तेव्हा तिथल्या, 'sponsored' असं लिहिलेल्या लिंकवर कधीच गेलो नाही.

आपल्या उपक्रमास शुभेच्छा!

आशुतोष-म्हैसेकर's picture

17 Dec 2018 - 11:04 pm | आशुतोष-म्हैसेकर

मी देखील फेसबुकवर पेज चालवतो, मी हा जाहिरातीचा प्रकार केला आहे, मला अपेक्षित असा उपयोग झाला नाही, तुम्ही त्याबद्दलची माहिती मांडलीत त्याचा नक्कीच इतरांना उपयोग होईल. कारण सुरुवातीस कळत नाही नेमके कसे वापरावे, अन जे काय वापरतोय त्याचा फारसा उपयोग होताना दिसत नाही.