आकाश के उस पार भी आकाश है

पुष्कर's picture
पुष्कर in जनातलं, मनातलं
30 May 2018 - 2:01 pm

आपल्याला असा कधी प्रश्न पडला आहे का, की माणूस नेहमी सगळ्या वस्तूंना ठराविक आकारच का देतो? आमची घरे चौकोनी असतात. आमची पुस्तके चौकोनी, संगणकसुद्धा एका विशिष्ट आकाराचा; सगळीकडे चौकोन, आयत, त्रिकोण, गोल हेच आकार. आम्ही एखादे वेळी त्रिकोण किंवा पिरेमिड बांधतो. पण पृथ्वीवर सगळीकडे जमीन उंच-सखल आहे, आम्ही ती सपाट करून टाकतो. खोल भागात भराव टाकतो, डोंगर फोडून काढतो. पण सृष्टी अशी कुठे आहे? कुठला डोंगर अगदी बरोबर त्रिकोणी अथवा शंकू आकाराचा असतो? ढगांना कधी विशिष्ट आकार असतो का? आपले हात, पाय, नाक, डोळे, सगळेच वेगळे आकार. हे आकार आपण भूमितीमध्ये शिकतच नाही. सगळ्या गोष्टींना आपण सोप्या आकृत्यांमध्ये पाहायला शिकतो. लहानपणी आपण माणसाचे चित्र काढताना डोके गोल काढतो. हात-पाय सरळ रेषांनी दाखवतो. किंबहुना भूमितीच्या ठराविक आकृत्यांचा मनावर पगडा बसल्यामुळे आपल्याला सृष्टीमधल्या खऱ्या आकृत्या चित्राच्या रूपात रेखाटणे अवघड जाते.

Ferntree leaves
Brocoli

Basic drawing
(आपण काढतो तसे बाळबोध चित्र)

तर ते असो. ह्याबाबत आणखी पुढे सविस्तर बोलूच; पण त्या आधी ऐका एक कहाणी. एक आट-पाट कंपनी होती. तिचे नाव IBM. तिथे मँडेलब्रॉट नावाचा एक हुशार शास्त्रज्ञ काम करीत होता. तसा तो हाडाचा गणितज्ञ, पण भूमितीसह अर्थशास्त्र, माहिती-सिद्धांत (information theory), वहन-यांत्रिकी (fluid mechanics) सारख्या अनेक क्षेत्रांमध्ये त्याने नाक खुपसले होते. तो नेहमी म्हणायचा - "Clouds are not spheres, mountains are not cones, lightening does not travel in a straight line". खरी भूमिती ही उंच-सखलपणा, खड्डे, वळणे, घड्या, गुंता अश्या गोष्टींनी भरलेली आहे. मँडेलब्रॉटचे म्हणणे होते की या सर्व वर-वर अनियमित वाटणाऱ्या गोष्टींना अर्थ आहे आणि यांमध्येच अनेक गोष्टींचे मर्म दडलेले आहे. उदाहरणार्थ समुद्रकिनाऱ्याच्या लांबीचे मर्म काय आहे? मँडेलब्रॉटने असा प्रश्न एका शोधनिबंधामध्ये विचारला कि "ब्रिटनचा समुद्रकिनारा किती लांबीचा आहे?" आणि या प्रश्नाने जणू काही विचारांना नवी दिशाच मिळाली. सांगतो कसे ते.

१९३० च्या दशकात ल्युईस रिचर्डसन या ब्रिटीश शास्त्रज्ञाला समुद्रकिनारे आणि दोन राष्ट्रांमधल्या सीमारेषा यांच्या बद्दल कुतूहल होते. त्याने स्पेन आणि पोर्तुगाल, बेल्जियम आणि नेदरलंडस् या देशांमधले एनसाय्क्लोपिडीया पाहिले आणि त्याच्या असे ध्यानात आले की सामायिक (common) सीमारेषा असल्या तरी दोन देशांच्या नोंदींमध्ये (सीमारेषांची लांबी) साधारण २० टक्क्यांचा फरक आहे. अनेकांना तो खोटा वाटला. काहीजण म्हणाले, 'असेल बुवा. हे काही माझे क्षेत्र नाही'; काहीजण म्हणाले, 'मी एनसाय्क्लोपिडीया बघून सांगतो.' मँडेलब्रॉटच्या वाचनात हा लेख आला. त्याचे काय म्हणणे होते, की कुठलीही भौगोलिक सीमा ही एका अर्थाने अनंत लांबीची असते. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर तुम्ही मोजमापासाठी कोणती पट्टी वापरता त्यावर तुम्ही मोजलेली एकूण लांबी किती भरेल हे ठरते.

brit1
(अ)
brit2
(आ)
(ब्रिटनच्या समुद्रकिनाऱ्याची लांबी मोजायचा एक प्रयत्न (अ) एक २०० किलोमीटर लांबीची पट्टी वापरून आणि (आ) एक ५० किलोमीटर लांबीची पट्टी वापरून)

आता एक प्रात्यक्षिकच पाहू. वर दिलेल्या आकृती (अ) मध्ये ती लांबी मोजण्यासाठी २०० कि.मी. लांबीची पट्टी वापरली आहे, तर (आ) मध्ये ५० कि.मी. लांबीची पट्टी. (अ) मधल्या पट्टीने मोजल्यास एकूण लांबी २४०० किलोमीटर भरते तर (आ) मधल्या पट्टीने मोजल्यास ती ३४०० किलोमीटर भरते. इथे आपल्या डोळ्यांना सहज लक्षात येण्यासारखी गोष्ट आहे कि २०० कि.मी. ची पट्टी बरीच वळणे, ओबड-धोबडपणा पाहू शकत नाही. आता आपण पट्टी आणखी छोटी करत गेलो, तर आणखीन छोटी छोटी नागमोडी वळणे आपण मोजू शकू. पट्टी जितकी छोटी तितके जास्त बारकावे आपल्याला कळतील आणि एकूण लांबीचा आकडा तितकाच जास्त फुगत जाईल. दूर यानातून आपल्याला जितकी लांबी मोजता येईल, त्यापेक्षा जास्त लांबी समुद्र-किनाऱ्यावर चालत फिरणारा माणूस मोजू शकेल. त्याही पेक्षा जास्त लांबी एकेक खडा पार करत जाणारी गोगलगाय मोजू शकेल (अर्थात तिला तितका संयम हवा).

आता काही वेळापुरते आपण भूमितीकडे वळू आणि नंतर पुन्हा या भौगोलिक प्रश्नाकडे येऊ. त्याचे काय झाले, की १९व्या शतकाच्या सुरुवातीला 'कोख' नावाचा एक स्वीडिश गणितज्ञ होऊन गेला. त्याने आकृत्यांबाबत अनेक खेळ केले. त्याच्या नावाने 'कोखचा वक्र’ (Koch's curve) म्हणून एक आकृती ओळखली जाते. अत्यंत सोपी, पण त्यात एक मर्म दडले आहे अशी ही आकृती. ती कशी आहे ते आता आपण पाहू.

सुरुवातीला एक त्रिकोण घ्या. (त्याच्या प्रत्येक बाजूची लांबी '३' इतकी आहे असे आपण समजू. त्या ३ ला परिमाण काय हवे ते! म्हणजे त्रिकोणाची परिमिती ९ इतकी झाली.) त्याची प्रत्येक बाजू तिनात भागा. आता प्रत्येक मधल्या छोट्या भागावर आणखी एक छोटा त्रिकोण बांधा (ज्याची प्रत्येक बाजू अर्थात १ इतकी असेल). तयार झालेल्या आकृतीची बाह्य परिमिती १२ इतकी होईल. अशातऱ्हेने त्या छोट्या त्रिकोणांनाही भागून त्यांच्यावर आणखी छोटे छोटे त्रिकोण बांधत राहिल्यास पुढची बाह्य परिमिती १६ इतकी होईल. (बाह्य परिमिती म्हणजे काय? - खाली दिलेल्या आकृत्यांमध्ये केवळ काळ्या रंगाच्या रेषा पहा).

Koch's curve
(त्रिकोणापासून सुरुवात करून त्यावर आणखीन छोटे छोटे असे त्रिकोण रचत गेल्यास मिळणारी आकृती)

म्हणजे थोडक्यात, आपण जसे आणखी छोटे छोटे त्रिकोण बांधत जाऊ, तशी नवीन आकृतीची परिमिती आधीच्या आकृतीच्या ४/३ पट होते. आता असे छोटे छोटे त्रिकोण अनंत काळ बांधत बसल्यास एकूण परिमिती ४/३ च्या पटीत वाढत वाढत जाऊन अनंत होईल. याच आकृतीचे नाव ‘कोखचा वक्र’. गंमत म्हणजे पहिल्या त्रिकोणाच्या तीनही बिंदूंमधून जाणारे एक वर्तुळ काढले तर असे लक्षात येईल की आपण पुढे कितीही त्रिकोण-त्रिकोण वाढवत बसलो तरी संपूर्ण आकृती त्या वर्तुळाच्या आतच राहते आहे. म्हणजे ही अनंत लांबीची रेषा एका छोट्याच्या वर्तुळाच्या आताच वस्ती करून बसली आहे!

आता आपण एक काम करू. ह्या आकृतीच्या कोणत्याही एका भागात भिंगाने पाहण्याचा प्रयत्न करू. खाली दिलेल्या आकृतीमध्ये एकेका चित्रात त्यातील छोटे भाग हळू-हळू मोठे करून दाखवले आहेत. ते पाहता असे लक्षात येईल की जसे जसे आपण त्या आकृतीच्या आत जात राहू तसे तसे तोच तोच आकार आपल्याला दिसतो आहे. ह्या प्रकाराला 'स्व-साधर्म्य' (self-similarity) असे म्हटले जाते. म्हणजे एखादी आकृती लांबून जशी दिसते, तशीच ती जवळूनही दिसते. तिला कितीही सूक्ष्मतर रुपात पाहत जाऊ, ती तशीच दिसते.

Koch2

अश्या आकृत्यांमध्ये नागमोडी वळणे आपल्याला लांबून दिसत नाहीत, पण जवळ जाता ते दृष्टिगोचर होतात. जितके त्याच्या आत शिरू तितकी आणखी नागमोडी वळणे दिसायला लागतात. हेच ते कारण ज्यामुळे मँडेलब्रॉट म्हणाला कि समुद्रकिनाऱ्याची लांबी अनंत आहे. (वास्तविक ह्या आत आत शिरण्याला मर्यादा आहेत. कोणती तरी अशी स्थिती येईल ज्यापुढे ह्या रेषेची एकसंधता तुटेल.).

पण यावरून मँडेलब्रॉटच्या असे लक्षात आले की हे स्वसाधर्म्य अनेक गोष्टी विषद करू शकेल. ह्या स्वसाधर्म्याचा गुणधर्म वस्तूंना एका ठराविक छोट्या आकारात सामावून देखील खूप मोठी लांबी देतो. मग याची पुढची पायरी येते ती म्हणजे त्रिमितीमध्ये (3D) ठराविक आकाराच्या आत प्रचंड मोठे क्षेत्र सामावून दाखवणे. एक गंमत म्हणून तुम्ही स्वतः अशी एखादी आकृती काढून पहायचा प्रयत्न करू शकता. किंवा पुढच्या भागाची प्रतीक्षा करा.

या स्वसाधर्म्यामुळे मँडेलब्रॉट जणू काही सगळीकडे तेच पाहू लागला. जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी सगळीकडे स्वसाधर्म्य! झाडाच्या पानांत, फुलाच्या पाकळ्यांत इतकेच नाही तर आपल्या शरीरात - रक्तवाहिनींच्या जाळ्यात, फुफ्फुसांच्या जंजाळात - सगळीकडे एक नवीन प्रकारची भूमिती वसते आहे. युक्लीडच्या १, २ किंवा ३ मिती त्या भूमितीला विषद करण्यास अपुऱ्या आहेत. ह्यातूनच 'अपूर्णांक भूमिती (Fractals)' ह्या नवीन भूमितीचा जन्म झाला. ह्या भूमितीने जगाकडे पाहण्याचा एक वेगळाच दृष्टीकोन दिला. लताचे 'आकाश के उस पार भी आकाश है' हे गाणे ऐकताना त्यामागे स्वसाधर्म्य किंवा अपूर्णांक भूमितीच आहे की काय असा मला भास झाला. काय आहे ही भूमिती? पाना-फुलात, रक्तवाहिन्यात तिचा काय उपयोग ? पाहूया पुढच्या भागात.

- शंतनु
(काही वर्षांपूर्वी मी इथेच 'हलकल्लोळ' या नावाने हाच लेख अर्धवट लिहिला होता. तो डागडुजी करून पूर्ण केला आहे. आता पुढचा लेख टाकायला तेवढा वेळ लावणार नाही.)
मूळ लेख माझ्या स्वतःच्या ब्लॉगवरून पुनःप्रकाशित. हा लेख इतरत्रही प्रकाशित.
Material licensed under a Creative Commons Attribution-NoDerivatives 4.0 International.
(तिसरे रेखाचित्र सोडून सर्व चित्रे विकिपिडीयावरून साभार)

क्रमशः

तंत्रलेख

प्रतिक्रिया

अनिंद्य's picture

30 May 2018 - 2:16 pm | अनिंद्य

@ पुष्कर,

Don’t let your experience limit your imagination. More so, don’t let anyone else’s rules limit your experiences. तसे केले की सर्व घरे चौकोनी आणि चपात्या गोल होणार नाहीत, life will be more fun ☺

थोड्या वेगळ्या विषयावर फारच छान लिहिले आहे. आवडले.

अनिंद्य

पुष्कर's picture

31 May 2018 - 12:51 pm | पुष्कर

या लेखावर फिलॉसॉफिकल ट्विस्ट येईल असं वाटलं नव्हतं. आभारी आहे!

सस्नेह's picture

30 May 2018 - 4:14 pm | सस्नेह

अगदीच वेगळ्या विषयावर आणि शास्त्रीय दृष्टीकोनातून. आवडले.
क्रमश: लिहायचे राहिलेले दिसते.

पुष्कर's picture

31 May 2018 - 12:52 pm | पुष्कर

अरेच्चा! हो की! क्रमश: लिहायचे राहिले. लगेच लिहितो. प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

पुष्कर's picture

2 Jun 2018 - 8:56 am | पुष्कर

येथे संपादन करण्याची मुभा दिसत नाही. त्यामुळे 'क्रमशः' आता टाकता आले नाही.

ज्ञानोबाचे पैजार's picture

30 May 2018 - 5:11 pm | ज्ञानोबाचे पैजार

लेख अवडला
पुभाप्र,
पैजारबुवा,

पुष्कर's picture

31 May 2018 - 12:52 pm | पुष्कर

आभारी आहे.

टवाळ कार्टा's picture

30 May 2018 - 5:28 pm | टवाळ कार्टा

आवडेश

पुष्कर's picture

31 May 2018 - 12:53 pm | पुष्कर

धन्येश

शाम भागवत's picture

30 May 2018 - 5:51 pm | शाम भागवत

मस्त

पुष्कर's picture

31 May 2018 - 12:56 pm | पुष्कर

थँक यू

पुंबा's picture

30 May 2018 - 6:09 pm | पुंबा

उत्कृष्ट लेख.
पुभाप्र.
फ्रॅक्टल्सविषयी अधिक वाचायला लागणार.

पुष्कर's picture

31 May 2018 - 12:56 pm | पुष्कर

आभारी आहे.

एस's picture

30 May 2018 - 10:47 pm | एस

लेख आवडला.

पुष्कर's picture

31 May 2018 - 12:57 pm | पुष्कर

आभारी आहे.

रुपी's picture

31 May 2018 - 5:15 am | रुपी

उत्तम लेख! आवडला.

पुष्कर's picture

31 May 2018 - 12:57 pm | पुष्कर

आभारी आहे.

अर्धवटराव's picture

31 May 2018 - 9:56 am | अर्धवटराव

पाय(२२/७) चि व्हेल्यु अजुनही पूर्णपणे उलगडली नसण्याला हेच कारण आहे का ? एका वर्तुळात अनंत लांबीची रेषा...

पुष्कर's picture

31 May 2018 - 1:01 pm | पुष्कर

ह्याला फ्रॅक्टल्सने उत्तर देता येत नाही बहुतेक. शेवटचं 'एका वर्तुळात अनंत लांबीची रेषा' - कळलं नाही. त्या वक्ररेषेची लांबी अनंत नाही (परिमिती).

अर्धवटराव's picture

10 Jun 2018 - 8:39 am | अर्धवटराव

पण किती फ्रॅक्टल्स लागतील याला काहि सीमा नाहि ना... सुदर्शन चक्राला किती दात लावले म्हणजे ते वर्तुळ बनेल ?? किती डिजीटल सॅम्पक्स एक पर्फेक्ट अ‍ॅनॉलॉग सिग्नल बनवेल? म्हणुनच मर्यादीत वर्तुळात अमर्याद रेषा...

पुष्कर's picture

15 Jun 2018 - 10:19 am | पुष्कर

असं म्हणायचं आहे तर! म्हणजे वर्तुळ हे तुम्ही एका सलग वक्रापासून न बनवता बारीक बारीक रेषा जोडून आणि त्यांना अनंतकाळ फोडत, त्यावर छोटे त्रिकोण वगैरे बांधत राहून बनवलं आहे. ही प्रक्रिया अनंत काळ करता येईल. पण यात लक्षात घ्यायची गोष्ट म्हनजे यात स्व-साधर्म्य नाही. दुरून ते वर्तुळ दिसेल, पण जवळ जाता छोटे छोटे त्रिकोण वगैरे डीटेल्स दिसायला लागतील आणि आकृती मुळात वेगळीच असल्याचा भास होईल. स्वसाधर्म्य असलेल्या आकृत्या लांबून जश्या दिसतात, तसाच आकार यांच्या आतमध्ये सुद्धा छोट्या छोट्या आकारात दिसतो. कृपया हा दुसरा भाग वाचा, म्हणजे अधिक स्पष्ट होईल.
जीवनात ही घडी अशीच राहू दे

सिद्धार्थ ४'s picture

31 May 2018 - 1:05 pm | सिद्धार्थ ४

आवडला.

पुष्कर's picture

1 Jun 2018 - 1:56 pm | पुष्कर

धन्यवाद

मराठी कथालेखक's picture

31 May 2018 - 1:52 pm | मराठी कथालेखक

लेख आवडला

पुष्कर's picture

1 Jun 2018 - 1:57 pm | पुष्कर

अनेक आभार!

मनिमौ's picture

1 Jun 2018 - 3:29 pm | मनिमौ

असा विचार कधी केलाच नव्हता. या लेखाने चालना मिळाली

खूपच मस्त माहिती. भारी लिहिलंय तुम्ही. पुढील भागाच्या प्रतिक्षेत.

पुष्कर's picture

2 Jun 2018 - 8:58 am | पुष्कर

मनिमौ आणि शलभ, प्रतिसादाबद्दल आभार! पुढचा भाग लवकरच येत आहे.

शेखरमोघे's picture

2 Jun 2018 - 9:29 am | शेखरमोघे

लेख आवडला.

पुष्कर's picture

3 Jun 2018 - 5:32 pm | पुष्कर

धन्यवाद

शेखरमोघे's picture

2 Jun 2018 - 9:29 am | शेखरमोघे

लेख आवडला.

पैसा's picture

2 Jun 2018 - 10:08 am | पैसा

Dan Brown च्या पुस्तकात golden ratio, Fibonacci Numbers वगैरे वाचलेले पुसटसे आठवले!

पुष्कर's picture

3 Jun 2018 - 5:33 pm | पुष्कर

धन्यवाद

डॉ सुहास म्हात्रे's picture

2 Jun 2018 - 12:46 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर लेख ! हा एक वेगळा आणि फार रोचक विषय आहे... कधी कधी सर्वसामान्य समजूतींना त्यांच्या डोक्यांवर उभा करणारा !! मजा आ गया !

हे सगळे जगच गणिताने सिद्ध करणे शक्य असलेल्या मूलभूत भौमितीक आकारांनी बनले आहे. शेवटी, कोणत्याही अणूतील प्रत्येक परमाणू कोठे स्थीर* होणार हे त्यांच्या सबअ‍ॅटोमिक पार्टिकल्सच्या एलेक्ट्रोमॅग्नेटिक, गुरुत्वाकर्षण, इत्यादींच्या प्रभावांवर (फोर्सेस) अवलंबून आहे... जे नियमित आहेत. तेच अनेक अणू एकत्र आल्यावर कोणत्या स्थितीत/आकारात स्थीर* होणार हे पण त्याच नियमांनी बांधलेले आहे. भरपूर किचकट असले तरी त्यांची समीकरणे मांडणे शास्त्रिय शक्यता आहे ! :)

झाडांच्या खोडाची, पानांची आणि फुलांची वाढ होण्यामगे हेच गणिती कारण असल्याचे वाचल्याचे आठवते... प्रत्येकाचा वेगळा आकार दिसत असला तरी हिमस्फटिकही याच नियमांनी बांधलेले असतात !

* : हा शब्द वाचून, क्वांटम थियरीवाले मला मारायला धावून येतील ! =)) . लेकीन भाईलोग, भावनांओं को समझो ;)

पुष्कर's picture

3 Jun 2018 - 7:35 pm | पुष्कर

मला वाटतं की काही गोष्टी प्रेडिक्ट करण्यासाठी अगदी सर्वच्या सर्व इनिशियल कंडिशन्स माहिती असणे आवश्यक आहे, नाहीतर बटरफ्ल्याय इफेक्टमुळे उत्तर ब्लो अप होऊ शकतं आणि प्रेडिक्शन चुकू शकतं. सध्याच्या परिस्थितीत पाहता १००% सर्व इनिशियल कंडिशन्स माहिती असणे अशक्यप्राय वाटते.

जब्बरदस्त लेख . फार म्हणजे फार स्क्वेअर आवडला . सुंदर लिखाण आणि क्रमशः पाहून आले आनंदाला उधाण . येऊन द्यात वाट पाहतोय पुढील भागाची .

सिद्धेश्वर विलास पाटणकर

पुष्कर's picture

3 Jun 2018 - 7:38 pm | पुष्कर

धन्यवाद रेज टू फोर! तुमचे आनंदमिश्रीत यमक पाहून माझा उत्साह द्विगुणीत झाला याहून. पुढचा भाग टाकला आहे, कृपया लाभ घ्यावा: जीवनात ही घडी अशीच राहू दे

मार्गी's picture

2 Jun 2018 - 4:54 pm | मार्गी

खूपच जबरदस्त लेख!!

पुष्कर's picture

3 Jun 2018 - 7:39 pm | पुष्कर

आभारी आहे

पुष्कर's picture

3 Jun 2018 - 7:40 pm | पुष्कर

लेख संपादित करून क्रमशः शब्द टाकल्याबद्दल संपादक्/सरपंच (जे कुणी आहात), तुमचे आभार!

मदनबाण's picture

10 Jun 2018 - 9:20 am | मदनबाण

छान माहिती... यावर मधल्या काळात तू नळीवर काही तरी शोध घेताना समजले होते,पण तो इडियो कोणता ते आता आठवत नाहीये. सापडल्यास इथे देइन.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- बादरवा बरसनको आये... :- Irish Malhar

पुष्कर's picture

15 Jun 2018 - 10:10 am | पुष्कर

इडियो सापडला तर नक्की लिंक द्या. आभारी आहे!

तू-नळीवर बरीच शोधा शोधी करुन विविध किवर्ड्स चे सर्च मारुन शेवटी एकदाचा मिळालाच !

मला नीटस आठवतं नाही परंतु विविध डॉक्युमेंट्री,कॉप्युटर टेक्नॉलॉजी,मेडिटेशन ,ब्रेन एनहान्समेंट, न्युरोप्लास्टिसीटी इत्यादी वगरै वर शोध घेत असताना किंवा त्यावरचे व्हिडियो पाहताना मी वरील व्हिडियो पर्यंत पोहचलो होतो त्यामुळे नक्की कुठला,कुठे आणि कधी हा पाहिला होता हे सगळं परत आठवुन वरील व्हिडियो परत मिळवणे यात बरेच "गणित" मेंदुत करावे लागले ! :)))

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- बरखा रीतु आयी... :- Sanjeev Abhayankar [ Raag Dhuliya Malhar ]

पुष्कर's picture

17 Jun 2018 - 2:32 pm | पुष्कर

फार भारी आहे ही डॉक्यूमेंटरी. या लोकंकडून प्रेझेंटेशन स्किल्स शिकायला हवेत.
व्हिडियो मिळवण्यासाठी इतके कष्टप्रद गणित केल्याबद्दल खूप आभार :) _/\_

ह्यावर मराठी विश्वकोशावर मी लिहिलेली नोंद गेल्याच वर्षी प्रकाशित झाली आहे. https://marathivishwakosh.org/35237/ तेथिल माहिती जास्त तांत्रिक आहे. मिपावरचा हा लेख त्याला पूरक ठरावा. ह्याशिवाय मायबोलीवर भास्कराचार्य ह्यांनी आणि नुकतेच मिपावर केदार भिडे ह्यांनीही अगदी ह्याच विषयावर लेखन केले आहे. ह्या विषयाचे वेगवेगळे पैलू आणि विविध लेखकांची वैविध्यपूर्ण शैली ह्यामुळे सर्वच वाचनीय झाले आहेत. ज्यांना रस आहे, त्यांना मी ते लेखही नक्की वाचावयास सुचवेन.

आपणास माहित असलेल्या चार मिती पलीकडे अजून दोन मिती (एकूण सहा मिती )आहेत असं म्हणतात त्या कोणत्या यावर लेख लिहावा विनंती.

Bhakti's picture

10 Nov 2021 - 7:45 am | Bhakti

लेख आवडला.