"अथातो घाटजिज्ञासा" - भाग २ रा

दिलीप वाटवे's picture
दिलीप वाटवे in भटकंती
29 May 2018 - 11:29 pm

'घाटवाटा म्हणजे काय'?

शिवकालीन इतिहासाचा अभ्यास करताना 'सह्याद्री आपले सामर्थ्य आणि आपल्या शत्रूंचे दौर्बल्य आहे' हे महाराजांनी पुर्णपणे ओळखलं होतं हे जाणवतं. तसं पहायला गेलं तर शिवकाळात मराठ्यांची मनुष्यबळ, युद्धसामग्री आणि आर्थिक बाजू अतिशय कमकुवत होती. पण केवळ याच सह्याद्रीच्या मदतीने त्यांनी आखलेले आपले डावपेच पुर्णत्वास नेले. त्या वेळचं मराठ्यांचं सैन्य म्हणजे समाजातील सामान्यातलं सामान्य घटक होतं. मोजके अपवाद वगळता ज्यांना विळा, कोयता फारफार तर कुऱ्हाड या पलिकडे शस्त्र माहिती नव्हतं त्यांच्या मनात आपण संख्येने कमी असूनसुध्दा केवळ सह्याद्रीच्या मदतीने बलाढ्य सैन्याविरुद्ध लढून सहज जिंकू शकतो हा आत्मविश्वास महाराजांनी जागवला. स्वराज्यासाठी महाराजांच्या एका शब्दाखातर हे लोक कोणतेही धाडस करायला मागेपुढे पहात नसत हे बाजीप्रभू, मुरारबाजी किंवा जिवा महाला वगैरे उदाहरणांवरुन हे व्यवस्थितपणे स्पष्ट होतं. मराठ्यांचं सैन्य हे कसं होतं हे कवि भूषणाचा छंद वाचल्यावर अतिशय चांगल्या प्रकारे समजतं.

छूटत कमान और तीर गोली बानन के होत कठिनाई मुरचानहू की ओट में l
ताही समय सिवराज हांक मारि हल्ला कियो, दावा बांधि परा हल्ला वीर वर जोट में l
भूषन भनत तेरी हिम्मती कहाँ लौ कहों, किम्मति यहां लगि है जा की भटझोट में l
ताव दै दै मूँछन कँगूरन पै पाँव दै दै अरिमुख घाव दै दै कूदी परै कोट में ll २३ ll

अर्थ :- युद्धात जेव्हा शत्रूच्या बाजूने बाणांचा व गोळ्यांचा सारखा वर्षाव सुरु झाला व मोर्चाच्या आड उभे राहून सुद्धां जीव
वाचवणे कठिण झाले तेंव्हा शिवरायांनी सर्व मावळ्यांना ललकारुन शत्रूवर हल्ला केला. दोन्ही बाजूंकडील वीरांमध्ये चकमक
उडाली. कविभूषन म्हणतो, हे शिवराज! मी तुमच्या साहसाचे किती व कोठवर वर्णन करु? तुमच्या शूरत्वाची ख्याती शूरवीर
मंडळीत इतकी पसरली आहें की, युद्धभूमीवर तुम्हांस नुसते पाहूनच मराठे गडी मिशांवर ताव देत देत, उंचीवरुन किल्ल्यांत
उड्या घालतात व शत्रूवर पाय देत देत त्यांची मुंडकी उडवितात

उंबरखिंडीत अशा कडव्या सैन्यासमोर, पिण्यास पाणी नसताना आणि अतिशय अवघड जागी लढताना कारतलबखानाच्या सैन्याची काय दैना झाली असेल याची कल्पनाच करवत नाही.
मराठ्यांच्या इतिहासाचा अभ्यास करताना सुरवातीला आम्ही भटके मंडळी त्यात उल्लेख आलेल्या संदर्भ ठिकाणांवर जात असू. प्रत्यक्षपणे गेल्यावर तेथील भौगोलिक परिस्थितीचा मागोवा घेऊन ते युद्ध कसे लढले गेले असेल हे पाहण्यात नंतरच्या काळात जास्त रस वाटू लागला. हे सगळं करत असतानाच नकळत घाटवाटांच्या नादी लागलो ते आजतागायत. हल्ली किल्ले पाहण्यापेक्षा घाटवाटाच धुंडाळ्याव्याशा वाटतात. ट्रेकींगमधे घाटवाटा हे प्रकरण थोडं अवघडच आहे. एकदा का घाटवाटेचा नाद लागला की त्यातुन बाहेर पडणं अतिशय अवघड. खरं म्हणजे अशा या घाटवाटा का बरं तयार केल्या गेल्या असाव्यात? हे जर का जाणून घ्यायचं असेल तर आपल्याला जवळजवळ दोन हजार वर्षे मागं जावं लागेल.
इसवी सन पूर्व पहिल्या शतकात भारताच्या मोठया भूप्रदेशावर सातवाहन राजे राज्य करत असत. हे राजे सुमारे चारशे वर्षे सलग राज्य करत होते. त्यामुळे साहजिकच सातवाहनांच्या राजवटीत महाराष्ट्रासह इतर प्रदेशांचीही भरभराट झाली. प्रतिष्ठान म्हणजे सध्याचे पैठण, जीर्णनगर म्हणजे जुन्न्नर, तगर म्हणजे तेर, नेवासा आणि नाशिक अशी भरभराटीला आलेली घाटमाथ्यावरील शहरे या राजवटीत उदयास आली. शुर्पारक म्हणजेच आताचे नालासोपारा तसेच कल्याण आणि चौल ही प्राचीन काळी पश्चिम किनाऱ्यावरची अत्यंत महत्त्वाची बंदरे होती. सातवाहनांचा घाटमाथ्यावरील व्यापारी केंद्रांचा या बंदरांच्या मदतीने परदेशात व्यापार चालत असे. त्यासाठी सह्याद्री ओलांडण्याची प्रक्रिया सुरू झाली आणि नाणेघाटासारख्या घाटवाटा तयार केल्या गेल्या. युरोपातील रोम, ग्रीस, इजिप्त, आफ्रिकेचा पूर्वकिनारा, इराणी व अरबी आखातातील प्रदेशातून आयात होणारा माल सोपारा वगैरे बंदरात उतरवला जाऊन तेथून कल्याण, नाणेघाटातून जुन्नर मार्गे पैठणला नेला जात असे. त्याच प्रमाणे निर्यात होणारा माल याच मार्गाने युरोपात जात असे. नाणेघाटाच्या पायथ्याशी वैशाखरे नावाचे गाव आहे की जे "वैश्यखेडे" या नावावरून आले आहे. घाटवाटेखाली असल्याने या गावात व्यापारी व त्यांच्या नोकरांच्या विश्रांतीसाठी इमारती बांधलेल्या होत्या. त्यामुळे सह्याद्रीत नाणेघाटासारखे लहानमोठे घाट दोन हजार वर्षांपूर्वीच अस्तित्वात आले.
अशा या घाटवाटांचा सामरिक उपयोग शिवाजी महाराजांनी अतिशय चांगल्या प्रकारे करून घेतला. 'जावळी' जिंकून घेतल्याने दाभोळ बंदरातुन हातलोट घाटाने जो माल विजापूरला जात असे त्यावर काही प्रमाणात नियंत्रण महाराज ठेऊ शकत होते. जावळी जिंकण्याचं हेही एक प्रमुख कारण असू शकतं. शिवकाळात तर उंबरखिंडीसारख्या अवघड घाटवाटा होत्याच पण आजही या ऐतिहासिक घाटवाटा भटक्यांची कसोटी पाहणार्‍याच आहेत. घाटवाटांबद्दल सांगायचं झालं तर दाट जंगल, निर्मनुष्यता, अत्यंत कमी वापर, पाण्याची कमतरता आणि दृष्टीभय यामुळे आज त्या अधिकच खडतर झाल्या आहेत. त्यामुळे घाटवाटांच्या डोंगरयात्रा ह्या इतर डोंगरयात्रांपेक्षा थोड्या जास्तच आव्हानात्मक असतात. पण जैवविविधता, निसर्गरम्य परिसर, अतिशय उंची असणारी आणि खडी चढाई वा उतराई, क्वचितच निर्भयतेची क्षमता पाहणार्‍या कातळावरील वाटांमुळे या घाटवाटा अधिक आनंद देऊन जातात. खरं म्हणजे सगळा 'सह्याद्री'च वेड लावणारा आहे. कसा का होईना, पण एकदा का कुणी या सह्याद्रीच्या वाटेला गेला कि तो कायमचा त्याचाच होऊन जातो. सह्याद्रीतली भटकंती ही एखाद्या व्यसनासारखी आहे. असं या सह्याद्रीतल्या घाटवाटांच्यात काय आहे, की त्याची चटक लागल्यावर तो स्वस्थ बसुच देत नाही? हे समजून घेण्याआधी सह्याद्री भौगोलिक दृष्ट्या कसा आहे हे थोडं समजून घ्यावं लागेल.

पश्चिम घाट--

भारताच्या दक्षिणेस असणार्‍या पश्चिम घाटाची उत्क्रांती ज्वालामुखीच्या उद्रेकातुन झालेली आहे. त्यामुळे पश्चिम घाटाएवढी जैवविविधता आपणांस क्वचितच कुठे पाहवयास मिळते. पश्चिम घाट हा गुजरात आणि महाराष्ट्राच्या सीमेवर असणार्‍या तापी नदीपासुन दक्षिणेस महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, तामिळनाडू आणि केरळ राज्यात पसरलेला आहे. याची दक्षिणोत्तर लांबी जवळजवळ १६०० किलोमीटरच्या पेक्षा जास्त आहे. याचे दक्षिणेकडील शेवटचे ठिकाण कन्याकुमारी येथे आहे. पश्चिम घाटाला महाराष्ट्रात सह्याद्री, कर्नाटक आणि तामिळनाडू येथे निलगिरी किंवा पालघाट तर केरळमधे अनैमलै असं म्हटलं जातं.

.

पश्चिम घाटातील सर्वात उंच शिखरे--

.

वरील कोष्टक पाहिल्यावर एक लक्षात येईल की जसजसं आपण दक्षिणेकडे जाऊ तसतशी पश्चिम घाटाची उंची वाढत जाते. पण त्याचप्रमाणे त्याचे स्वरुप सुद्धा बदलत जाते. तो डोंगराळ होऊ लागतो. म्हणजे साध्या सोप्या भाषेत सांगायचं झालं तर महाराष्ट्रात दृष्टीभय निर्माण करणारे जसे ताशीव कडे आणि खोल दर्‍या आहेत तसे दक्षिणेत मात्र नाहीत.

सह्याद्री--

महाराष्ट्राचा विचार करता तापी नदीपासुन तिलारी नदीपर्यंत दक्षिणोत्तर पसरलेल्या सह्याद्री पर्वत रांगेमुळे कोकण, घाटमाथा आणि देश किंवा सह्यपठार असे तीन भौगोलीक विभाग पडलेले दिसुन येतात. कोकणातुन पुर्वेकडे पाहिलं तर सह्याद्रीची मुख्यरांग साधारणपणे सातशे ते हजार मीटर्सपर्यंत उठावलेली दिसून येते. घाटमाथ्याच्या बाजुला असणार्‍या दोन भागातल्या उंचीतल्या फरकामुळे जडणघडणीत वैविध्य पाहवयास मिळते.

.

.

स.आ.जोगळेकर यांनी लिहिलेल्या "सह्याद्री" ग्रंथात ते म्हणतात- 'एकीकडे घाटमाथ्यावरील उत्तुंग व प्रचंड प्रस्तर आणि दुसरीकडे सपाट व सुपीक मळई, एकीकडे निरक्षर व संस्कारशून्य जंगली जमाती तर दुसरीकडे संस्कारांनाच सर्वस्व मानणार्‍या पंडीतांच्या वसाहती. एकीकडे मनुष्यवस्तीने गजबजलेली सुसंपन्न शहरे व दुसरीकडे खोपटांची खेडी व निर्मनुष्य अरण्ये. एकीकडे झुडपेही उगवणार नाहीत असे कोरडे माळ तर दुसरीकडे झुडूप रुजण्यासही अवसर नाही अशी घनदाट अरण्ये. इकडे घाटांच्या उतारांवर बीजमात्रांसाठी खडकात छेद घेऊन धान्याची लागवड करण्याची दरिद्री शेती तर तिकडे आजतागाईत शास्त्रीय साधनांनी युक्त व समृद्ध अशा व्यापारी पिकांची पैदास. एकीकडे पावसाची समृद्धी तर दुसरीकडे सदैव अवर्षणाची धास्ती. या विविधतेचे कारण सह्याद्री'.
अशा या दक्षिणोत्तर पसरलेल्या सह्याद्री पर्वत रांगेला काटकोनात म्हणजे पुर्व-पश्चिम उपफाटे वा उपरांगा जोडलेल्या आहेत. त्यांची शैलबारी-डौलबारी, सातमाळ-अजिंठा, त्र्यंबक, कळसुबाई, बाळेश्वर, हरिश्चंद्र-बालाघाट, भुलेश्वर, महादेव, कोळेश्वर आणि महाबळेश्वर वगैरे फारच सुरेख नावे आहेत. फक्त तीन डोंगररांगा सह्याद्रीच्या मुख्य रांगेला समांतर आहेत त्या म्हणजे घाटमाथ्यावरच्या भाडळी-कुंडल आणि दातेगड रांगा तर कोकणात असलेली एकमेव महिपतगड रांग.

.

थोडं सोपं करून सांगतो. आपण शाळेत वह्या वापरतो ना, हे प्रकरण तसंच आहे. वहीच्या पानाच्या डाव्या बाजूला जी समासाची उभी रेघ असते ना ती म्हणजे सह्याद्रीची मुख्य रांग. या रेषेच्या डाव्या बाजूला कोकण तर उजव्या बाजूला सह्यपठार. उजव्या बाजूच्या आडव्या रेघा म्हणजे ज्यावर आपण लिहितो त्या म्हणजे सह्याद्रीच्या उपरांगा. त्या दरम्यानची जागा म्हणजे नद्यांची खोरी. तर समासाच्या डाव्या बाजूच्या आडव्या रेघा म्हणजे कोकणात उतरणारे दांड किंवा नाळा आहेत ज्यातुन कोकणात उतरणाऱ्या घाटवाटा आहेत.

.

सह्याद्रीतील घाटवाटा--

सुट्टीत गावाला जाताना किंवा कोणत्याही कामानिमीत्त प्रवास करताना रस्ता डोंगरावर चढू लागला की PWD ने किंवा MSRDC ने रस्त्याच्या बाजूलाच पाटी लिहलेली दिसुन येते 'घाट सुरु'. म्हणजे आता आपली गाडी वळणावळणाच्या वाटेने डोंगर चढून जाणार. वर म्हटल्या प्रमाणे घाटवाटा तर कोकणात उतरणार्‍या दांडांवर किंवा नाळेतून आहेत. मग हे नेमकं काय गौडबंगाल आहे? तर मग घाटवाटा नेमकं कशाला म्हणायचं? हे आधी समजून घेऊया.

घाटवाटा म्हणजे काय?

सर्वसाधारणपणे डोंगररांग चढत किंवा उतरत जाणार्‍या वळणावळणाच्या वाटेला 'घाटवाट' असं म्हटलं जातं. सह्याद्रीच्या मुख्य रांगेमुळे विभागलेल्या कोकण, घाटमाथा आणि उपरांगांच्या आजूबाजूच्या गावांतील लोकांच्यात नातेसंबंध निर्माण झाले. त्यामुळे धार्मिक आणि सांस्कृतिक देवाणघेवाणीसाठी सह्याद्री ओलांडण्याची प्रक्रिया सुरु झाली. त्यातुनच सहजपणे पायी जाता-येता येईल अशा ज्या वाटा तयार केल्या गेल्या त्यांना साधारणपणे 'घाटवाटा' असं म्हटलं जातं. घाटवाटेवर दृष्टीभय असणार्‍या ठिकाणी कठडे असणं, कातळटप्प्यात पायर्‍या खोदलेल्या असणं तर गरजेच्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची टाकीसुद्धा असतात. नंतरच्या काळात मोटारींचा शोध लागला. त्यांच्यासाठी रस्ते आणि रेल्वेमार्ग असलेले घाट तयार केले गेले. अशा या घाटवाटांचे तीन मुख्य प्रकार पडतात.

पहिला प्रकार म्हणजे सह्याद्रीची मुख्य रांग ओलांडणारी मोटारींसारखी वाहने जाणारी कसारा, ताम्हीणी घाटासारखी रस्त्यांची किंवा रेल्वेमार्ग असणारी खंडाळ्यासारखी घाटवाट.
नंतरच्या काळात इंजिनाचा शोध लागला आणि रस्त्यावरुन मोटारी धावू लागल्या. त्यामुळे ब्रिटीशांनी मोटारवाहतुक करता येईल अशा घाटांची निर्मीती केली. माळशेज, वरंध, आंबेनळी, कुंभार्ली, आंबा, भुईबावडा, करूळ, फोंडा, आंबोली, अणुस्कुरा अशा काही परीचित घाटवाटांची नावं सांगता येतील.
स्वातंत्र्यानंतरच्या काळात, महाराष्ट्र शासनाने काही वर्षांपुर्वीच ताम्हीणी आणि माळशेज घाट बांधून पुर्ण केले आहेत. अजुनही काही घाट त्यांच्या यादीत आहेत की त्यांची कामे सुरु आहेत वा काही कारणांमुळे अर्धवट स्थितीत आहेत. उदाहरणच सांगायचं झालं तर उपांड्या घाट जो पुणे जिल्ह्यातील केळदहून शिवथरघळीच्या परीसरात उतरतो, दुसरा आहे कुंभ्या घाट जो पानशेत धरणामागच्या घोळ-कुंभ्यामाची गावातुन ताम्हीणी घाट उतरल्यावर लागणार्‍या निजामपुरात उतरतो तर कुंडी घाट हा चांदोली अभयारण्यातून मार्लेश्वर परीसरात उतरतो. हे घाट पुर्ण झाले तर घाटावरील लोकांना कोकणातील बरीच ठिकाणं जवळ येतील.

दुसर्‍या प्रकारात घाटवाटा येतात त्या म्हणजे सह्यपठारावर असलेल्या सह्याद्रीच्या उपरांगा ओलांडणार्‍या रस्त्यांच्या, रेल्वेमार्गांच्या आणि सर्व प्रकारच्या पायवाटा.
याचं उदाहरणच सांगायची झाली तर पुणे-सासवड दरम्यान असणारा भुलेश्वर रांगेवरचा दिवेघाटाचं किंवा पुण्याहून नाशिकला जाताना बाळेश्वर रांगेवरच्या चंदनापुरी घाटाचं देता येईल. खरंतर महाराष्ट्रात अशा प्रकारच्या असंख्य घाटवाटा आहेत. सातमाळ रांगेत असलेल्या कांचन खिंडीच्या घाटवाटेजवळ १६७० साली दुसर्‍यांदा सुरत लुटून परतताना दाऊदखानाशी लढाई झाली होती. ही लढाई तर मराठ्यांनी जिंकलीच पण याच रांगेवरचे मार्कंड्या, जवळ्या-रवळ्या आणि अहीवंत हे किल्लेही जिंकून घेतले. गाडेखिंडीतल्या घाटात मावळातल्या दोन देशमुखांच्यात झालेली लढाई तर सर्वश्रुतच आहे.
खरं म्हणजे अशा प्रकारच्या घाटवाटांची बरीच उदाहरणे देता येतील, ज्या ऐतिहासिक आणि सामरिक दृष्ट्या अतिशय महत्वाच्या आहेत पण वरील दोन्ही प्रकारच्या घाटवाटांची माहिती या लेखात केवळ विस्तारभयावह देण्याचे टाळले आहे.

तिसरा आणि अतिशय महत्वाचा प्रकार म्हणजे सह्याद्रीची मुख्य रांग ओलांडणार्‍या अनगड आणि अवघड पाऊलवाटा.
नाणेघाटासारख्या अनेक पुरातन घाटवाटा या प्रकारात मोडतात. डोंगरयात्रा या पुस्तकात तर अशा प्रकारच्या तब्बल २२० घाटवाटांची यादीच दिलेली आहे. कोकण आणि देश याच्यात असणार्‍या जवळपास सातशे ते हजार मीटर्सच्या फरकामुळे दळणवळण, संपर्क यंत्रणेवर काहीसा परिणाम झाला. घाटमाथ्यावरच्या आणि कोकणातल्या लोकांनी त्यांच्या सोयीसाठी अशा प्रकारच्या असंख्य वाटा तयार केल्या.
प्रस्तुत लेखात आपण फक्त याच प्रकारच्या वाटांची म्हणजेच सह्याद्रीची मुख्य रांग पायी ओलांडणार्‍या अवघड डोंगरयात्रांच्या घाटवाटांबद्दल माहिती घेणार आहोत. घाटवाटा म्हणजे नक्की काय ते आत्ताच आपण पाहिलं पण घाटवाटा कोणत्या प्रकारच्या असतात ते आता आपण पाहणार आहोत.

.

(अ) घाटवाटांचे प्रकार

एकंदरीत घाटवाटांचे मुख्यत्वे दोन प्रकार सांगता येतील. त्यातला पहिला प्रकार सांगता येईल तो म्हणजे घाटवाटेच्या भौगोलिक परिस्थितीवरुन तर दुसरा त्या घाटवाटेचा कोणत्या कारणासाठी वापर केला जात होता त्याच्या उपयोगावरुन.

(अ-१) भौगोलिक परिस्थितीवरुन

घाटवाटा साधारणपणे नाळेतुन असतात किंवा दांडांवरून. नाळ म्हणजे ओढ्याची वाट. घाटमाथ्यावरचं पावसाचं पाणी ज्या वाटेने कोकणात वाहून येतं अशा ओढ्याच्या वाटेला 'नाळ' असं म्हणतात. या नाळांना घाटमाथ्याकडे अरुंद खिंडीसारखा आकार असतो. पण जसजसं कोकणात उतरत जातो तसतसा तो मोठा होत जातो. दरवर्षी पावसाळ्यानंतर दरड कोसळल्यामुळं या वाटा थोड्याफार बदलत असतात. ज्या सोप्या नाळेतून वहिवाट करता येईल त्या नाळेतून काही वाटा तयार केल्या गेल्या. पण काही नाळा अतिशय खड्या, चिंचोळ्या किंवा मोठे कातळटप्पे असलेल्या आहेत ज्यातून चढणे किंवा उतरणे अतिशय अवघड असते. अशा नाळेतुनही चढाई किंवा उतराई करता येऊ शकते नाही असं नाही. पण ती अत्यंत कठीण स्वरुपाची असते. पावसाळ्यात पाण्याच्या लोटाबरोबर दरड कोसळल्यामुळे यातील वाटा दरवर्षी मोडतात. त्यामुळे अशा वाटा काही अपरिहार्य कारणांमुळेच वापरल्या जातात त्यामुळे त्यांना 'घाटवाटा' असं नक्कीच म्हणता येणार नाही. नाळेतल्या घाटवाटांची सिंगापुर नाळ, फडताड नाळ, गुयरीदार ही उदाहरणे सांगता येतील तर सांधणदरी, बाणची नाळ किंवा बारसदरा या नाळांमधून जाता येतं पण यांना घाटवाटा असं नक्कीच म्हणता येणार नाही.

.

दुसरा प्रकार आहे दांडावरची वाट. या दांडालाच सोंड किंवा धार असं सुद्धा म्हटलं जातं. घाटमाथ्यावरुन कोकणापर्यंत जोडलेल्या डोंगरसोंडेवरुन जी वाट असते तीला दांडावरची घाटवाट असं म्हणतात. दांडांवरून उतरणाऱ्या घाटवाटा थोड्या अवघड प्रकारच्या असतात याचं कारण म्हणजे दृष्टीभय, झाडांची सावली नाही, पाण्याची शक्यताच नाही आणि बर्‍याचवेळा असलेली अतिशय निसरडी वाट. याची चिकणा घाट, चोरकणा घाट, घोडेजिन दांड अशी काही उदाहरणे देता येतील.

.

या व्यतिरिक्त तिसर्‍या प्रकारात असलेल्या घाटवाटेला मिश्र स्वरुपाची घाटवाट म्हणता येईल. अशा प्रकारच्या एकाच घाटवाटेत नाळ आणि दांड असा दोन्हीचा समावेश असतो. उदाहरणच सांगायचं झालं तर पाथर्‍याचं किंवा मढेघाटाचं देता येईल.

.

(अ-२) उपयोगावरुन
घाटवाटेचा अनेक विधायक कामांसाठी उपयोग केला जात होता. त्याचा वापर नेमका कोणत्या कामासाठी होतोय त्यावरुनही घाटवाटेचा प्रकार ओळखता येऊ शकतो किंवा असंही म्हणता येईल की ज्या कारणासाठी घाटवाटेचा उपयोग करायचा आहे त्यानुसार ती घाटवाट तयार केली जात असे.

व्यापारी घाटवाटा :- कोकणात समुद्रकिनारी असणारी बंदरे विकसित झाली आणि देशावर असणार्‍या राजसत्तांचा युरोप, आफ्रिकेत व्यापार सुरु झाला. त्यामुळे देशावरचा माल परदेशात विक्रीस नेण्यासाठी आणि परदेशी माल देशावर आणण्यासाठी व्यापारी मार्ग तयार केले गेले. ज्या राजसत्तेच्या ताब्यात अशी बंदरे असत त्यांची आर्थिक भरभराट होई त्यामुळे अशा व्यापारी मार्गांवर बैल, गाढवं, घोडे, सैन्य जाऊ शकेल अशा घाटवाटांची गरज भासु लागली. त्यामुळे नाणेघाटासारखे घाट बांधले गेले. असे घाट हळूहळू चढाई वा उतराई असलेले असतात. सहाजिकच या प्रकारच्या घाटवाटा लांबलचक, रुंद आणि दोन व्यापारी केंद्रांना किंवा बंदरांना जोडलेल्या असतात.

.

सध्या कमालीचा भेडसावणारा 'ट्रॅफीक जॅम' चा प्रश्न त्याकाळीसुद्धा नक्कीच भेडसावत असणार. त्याकरीता मुख्य व्यापारी घाटवाटेला पर्यायी वाट म्हणून अगदी मुख्यवाटेसारखी नाही पण त्यासारखी दुसरी व्यापारी वाट शेजारी तयार केली गेली. अशा वाटा मुख्यत्वेकरुन डोक्यावरुन ओझी वाहून नेणार्‍यांसाठी असत तर काही फक्त चालत जाणार्‍यांसाठी असत. अशा अनेक पर्यायी वाटा आजही आपल्याला सह्याद्रीत पाहवयास मिळतात. ज्या अगदी मुख्य वाटेसारख्या नाहीत पण त्यांच्याशी बऱ्यापैकी साम्य दाखवणार्‍या आहेत. नाणेघाटाशेजारी असलेले भोरांड्याचे दार किंवा दार्‍याघाट ही त्याची उत्तम उदाहरणे सांगता येतील.

.

माणसांच्या घाटवाटा :- सह्याद्रीच्या मुख्य रांगेला लागुन असलेल्या कोकणातल्या आणि सह्यपठारावरच्या गावांतील लोकांना कौटूंबिक आणि धार्मिक आदानप्रदानासाठी उपयोगी पडतील आणि पायीसुद्धा सहजपणे जाता-येता येईल अशा सोप्या असणार्‍या वाटा तयार केल्या गेल्या. अशा प्रकारच्या वाटा घसारा असलेल्या ठिकाणी दगड-माती मिश्रित बांधलेल्या, कातळटप्प्यात पावट्या खोदलेल्या तर गरजेच्या ठिकाणी पाण्याच्या टाक्या खोदलेल्या बघायला मिळतात. या वाटा शेतीत पिकवलेले धान्य घाटमाथ्यावरच्या किंवा कोकणातल्या गावात नेण्यासाठी फारफार तर वापरल्या जातात. म्हणजेच वाट वापरताना जास्त वजन वाहून न्यायचे नसल्याने या व्यापारी मार्गांपेक्षा थोड्या अवघड स्वरुपाच्या, अरुंद पण कमी अंतराच्या असतात. भीमाशंकरजवळचे गणपती घाट, रानशिळ घाट हे जास्त करुन धार्मिक कामासाठीच वापरले जात.

.

.

शिकारीच्या वा कोळ्यांच्या घाटवाटा :- 'फक्त जाता येऊ शकतं' अशा वाटा या प्रकारात मोडतात. साहजिकच या वाटा अत्यंत अवघड स्वरुपाच्या असतात. मुख्य रांगेशेजारील गावातील शिकारी, कातकरी, महादेव कोळी, धनगर मंडळीच अशा वाटा वापरताना दिसतात. जंगलात शिकारीला जाणे, हिरडा-बेहडा सारख्या औषधी वनस्पती किंवा मध, करवंदे, कढीपत्ता गोळा करणे या कामासाठीच या वाटा वापरल्या जातात. या वाटा नाळेतुनही असतात, दांडावरुनही असतात किंवा अतिशय अवघड कड्यांमधूनही असतात. नगण्य वापर असल्यामुळे किंवा नवीन पिढी वर दिलेली कामे करण्यासाठी उदासीन असल्यामुळे अशा वाटा आता जवळजवळ बंदच झाल्या आहेत. अगदी बोटावर मोजण्याइतक्याच वाटा लोक हल्ली वापरताना दिसून येतात. त्यात भिकनाळ, बिबनाळ ही नावे घेता येतील.

.

.

.

लष्करी घाटवाटा :- दोन मुख्य लष्करी ठाण्यांदरम्यान ज्या घाटवाटा असतात त्याही अतिशय महत्वाच्या असतात. साधारणपणे सैन्य जाऊ शकेल एवढ्या त्या मोठ्या असतात. या वाटांवर संरक्षणासाठी चौक्या असतात ज्यांना 'मेट' असं म्हटलं जातं. आजही महाराष्ट्रात मेट नावापासुन सुरु होणारी गावं आहेत जी मुख्य लष्करी ठाण्याकडे जाणार्‍या वाटांवर आहेत. वाई ते प्रतापगड मार्गावर असलेल्या रडतोंडी घाटमार्गावरील वाटेवर 'मेट गुताड' आणि 'मेट तळे' अशी दोन गावे आपल्याला आजही पहायला मिळतात. पैकी मेट तळे हे गाव तर ऐन घाटवाटेत आहे. चौक्या नसलेल्या किंवा सद्य परिस्थितीत तरी त्या सापडत नसलेल्या लष्करी घाटवाटांची अजुनही काही उदाहरणे सांगता येतील जसं रायगडाकडे जाणारा कावळ्या घाट, प्रतापगडाजवळचे रडतोंडी घाट, पारघाट आणि दाभिळटोक घाट.

.

(ब) घाटवाटांची श्रेणी :- घाटवाटा लोकांनी स्वतःच्या सोईसाठी जास्तीतजास्त सोप्या तयार करण्याचा प्रयत्न केला. पण तरीही भौगोलीक परिस्थितीमुळे त्या कमीअधिक अवघड तयार झाल्या. तरीही वापरावरुन त्याचे वर्गीकरण एकूण चार श्रेणीत करता येईल. सोप्या, अवघड, कठीण आणि अत्यंत कठीण. सोप्या श्रेणीत साधारणपणे व्यापारी मार्ग येतात, जे जास्त अंतराचे असुन कमी चढावाचे असतात. अवघड श्रेणीत माणसांच्या वहीवाटीच्या वाटा येतात, ज्या कमी अंतराच्या, चढाव जास्त असलेल्या, गरजेच्या ठिकाणी पावट्या खोदलेल्या असतात. कठीण श्रेणीत लष्करी वाटा येतात, ज्या जास्त वळणावळणाच्या, जास्त रुंदीच्या, दाट जंगलाच्या, गरजेच्या ठिकाणी बांधलेल्या पायऱ्या, दरीकडील बाजुला बांधलेली संरक्षक भिंत, वळणावर सहजपणे वळता येईल असे घडीव दगडांनी बांधलेले टप्पे असलेल्या असतात तर अत्यंत कठीण श्रेणीत शिकारीच्या वा कोळ्यांच्या वाटा येतात, ज्या कातळटप्पे असलेल्या, अरुंद वाटेच्या, दृष्टीभय असलेल्या आणि अत्यंत कमी वापराच्या असतात.

(क) घाटवाटांची नावं

सह्याद्रीची मुख्य रांग तापी ते तिलारी पसरलेली आहे. त्यामुळे या घाटवाटा, मुख्य रांगेला लागुन असलेल्या, घाटमाथ्यावरच्या धुळे, नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापुर जिल्ह्यातुन कोकणातल्या ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यात उतरतात. जसजसा प्रदेश बदलत जातो तसतसा घाटवाटा वापरणार्‍या लोकांच्या राहणीमानात आणि बोलीभाषेतही फरक पडत जातो. साधारणपणे धुळे, नाशिक कडील बर्‍याच घाटवाटांना 'बारी' असं म्हटलं जातं. जसजसं दक्षिणेकडे सरकत जाऊ तसतसं घाटवाटांच्या नावात 'दार', 'नाळ', 'खिंड', 'सरी', 'व्हळ', 'पाज' असा बदल होत जातो. वाघाची बारी, गुयरीदार, बोराटा नाळ, अस्वलखिंड, अंगठेसरी, मोरंगेची व्हळ आणि मुडागडाची पाज अशी त्यांची नावं सांगता येतील. एवढंच काय तर एकाच घाटवाटेला कोकणात आणि घाटमाथ्यावर वेगवेगळ्या नावांनी देखील ओळखलं जातं.
'निसणी' किंवा 'निसण' असं घाटाचं नाव बर्‍याच ठिकाणी ऐकायला मिळतं. निसणी हा शब्द 'नि:श्रेणी' या नावावरुन आलेला आहे. नि:श्रेणी म्हणजे ज्याची श्रेणी सांगता येणार नाही अशी अत्यंत अवघड वाट. अशा प्रकारच्या वाटेवर कातळटप्प्याच्या जागेवर पावट्या किंवा पायर्‍या खोदलेल्या आढळतात. ही निसण जर जास्त वापरातली असेल तर पावट्यांच्या ऐवजी बांबुची, जंगलात मिळणार्‍या लाकडाची वेलींनी बांधलेली शिडी असते. दरवर्षी पावसाळ्यानंतर या शिडीतली कुजलेली लाकडं बदलत असत. या शिड्या इतक्या अवघड जागी असूनही त्याच्यावरुन पडून कुणी दगावल्याचं ऐकिवात नाही. सध्याच्या काळात बहूतेक सर्व ठिकाणी लाकडी शिड्यांची जागा आता लोखंडी शिड्यांनी घेतलेली आहे.

.

घाटात असलेल्या देवाच्या नावानेही काही घाट ओळखले जातात. खांडसहून भीमाशंकरला चढून येणारा गणपती घाट, आहूप्याहून मिल्ह्यात उतरणारा भैरवनाथ दार घाट, सिद्धगडाजवळचा नारमाता घाट तर कुंभेनळी-तळीये भागातून उंबर्डीत येणारे वाघजाई घाट अशी काही सहजपणे उदाहरणं सांगता येतील.

.

काही घाटवाटा को़कणातल्या किंवा घाटमाथ्यावरच्या गावांच्या नावानेही आहेत. घाटमाथ्यावर 'घाट'घर आहे त्या घराचं कोकणातल्या भोरांडे गावाकडील दार म्हणून ते 'भोरांड्याचे दार'. त्याच्या जवळच असलेल्या उंब्रोली गावाजवळचा उंब्रोली घाट.
एवढच काय तर ताम्हीणी घाटाकडे जाताना डोंगरवाडी लागते. तिथुन एक घाट कोकणातल्या भिरा गावात उतरतो, त्याचं नाव लेंड घाट. या घाटाच्या धारेवरुन टाटा पॉवर कंपनीने डोंगरवाडीतुन पाईपलाईनद्वारे पाणी भिर्‍यात नेले आहे. सध्या सुरक्षेच्या कारणामुळे टाटा पॉवरचे रखवालदार या वाटेने जाऊ देत नाहीत. घाटात हे सगळं टाटाने केलं म्हणून आता या घाटाला 'टाटा घाट' म्हणून ओळखतात.
शेक्सपियर म्हणाला होता 'नावात काय आहे?' पण त्याला कुठं माहिती होतं की आमच्याकडे असलेल्या घाटांच्या नावातंच 'सगळं' आहे ते. आता घाटांची हीच नावं बघा ना! 'मढे','चौंढ्यामेंढ्या','घोडेपडी','पायमोडी','लेंड','सवत्या','चिकणा','लिंग्या','कावळ्या' आणि चक्क 'बोचेघोळ'.

(ड) घाटवाटा बंद आणि नवीन सुरू होण्याची कारणं

कोकणातल्या घाटवाटेच्या पायथ्याशी असलेल्या गावातुन जवळच असलेल्या बाजाराच्या गावाला एसटीची तसंच खाजगी वाहनांची अखंड सेवा सुरु असते तशी घाटमाथ्यावरील गावांना साधारणपणे नसते. त्यामुळे अगदी मागील काही वर्षांपर्यंत घाटमाथ्यावरच्या लोकांना दैनंदीन आणि वैद्यकीय गरजांसाठी कोकणातल्या गावांवर अवलंबुन रहावे लागत असे. त्यामुळे घाटवाटांवर काही प्रमाणात तरी राबता असे. पण आता घाटमाथ्यावरच्या खेडेगावातही एसटी सुरु झाली आणि या घाटवाटांवरची वाहतूक जवळजवळ बंदच झाली. त्यामुळे बर्‍याच घाटवाटा बंद झाल्या. घाटमाथ्यावर पावसाचं प्रमाण अधिक असतं. त्यामुळे साहजिकच घाटवाटेवरचे कडे कोसळतात. जर त्याच्यावर कायम राबता राहिला असता तर पावसाळ्यानंतर त्या वाटा लगेच दुरुस्त तरी केल्या गेल्या असत्या. पण राबता नसल्यामुळे कडे, दरड कोसळून बर्‍याच घाटवाटा पुर्णपणे बंद झाल्या. अशा घाटवाटा बंद होऊन बराच काळ लोटल्याने 'अशी इथे घाटवाट होती' हे सुद्धा घाटमाथ्यावरच्या पुढच्या पिढीला आता माहिती नाही. त्या मानाने कोकणात असलेल्या गावातल्या पुढच्या पिढीला बर्‍याच घाटवाटा माहिती असतात. चांदर जवळची गायनाळ, एकलगावातून पुढे गेल्यावर असलेली फडताड नाळ तर मावळभासेची निसणी अशी काही घाटवाटांची नावे सांगता येतील.
रेडेखिंड, तिवरे घाट वगैरे काही घाटवाटा कोयना, चांदोली आणि राधानगरी या राखीव वनक्षेत्रात असल्याने बंद झाल्या आहेत.
मानवनिर्मीत सुधारणा झाल्यामुळेही काही घाटवाटा बंद झाल्या. लेंड घाटात टाटा पॉवर कंपनीने पाण्याची पाईपलाईन टाकल्याने, कुरवंडा घाटात रिलायन्स कंपनीने गॅसची पाईपलाईन टाकल्याने तर वर उल्लेखलेला उंबरखिंड ऊर्फ आंबेनळी घाटाचा घाटमाथ्याकडील भाग हा आय.एन.एस. शिवाजीने घातलेल्या तारेच्या कुंपणामुळे बंद झाला आहे. तसेही त्यांची दरीच्या बाजूला 'फायरींग रेंज' असल्यामुळे त्या वाटेने जाताच येत नाही.
जशा काही वाटा बंद झाल्या आहेत तशा काही नवीन सुरु सुद्धा झाल्या आहेत. घाटमाथ्यावरची गावे मुख्य रांगेपासून तुलनेने लांब आहेत पण कोकणातली गावे अगदी जवळजवळ आहेत. त्यामुळे गावातल्या गावकर्‍यांनी कामानिमीत्त किंवा सगेसोयर्‍यांकडे जाण्यासाठी त्यांच्या सोईच्या असंख्य नवीन घाटवाटा तयार केल्या आहेत. ताम्हीणी घाटात आधरवाडी नावाचं गाव आहे. या आधरवाडी लोकांनी कोकणात असलेल्या भिरा पॉवर स्टेशनमधे कामाला जाण्यासाठी चोरपायरी नावाचा नवीनच घाट तयार केला. वरंध घाटाजवळच्या कोपीदांडावरच्या लोकांनी वस्तीतुन कुंभेनळीवाडीत जाण्यासाठी वारदरा ऊर्फ वाव्हळाची वाट शोधून काढली तर रायरेश्वराच्या नाखिंद्याखाली असलेल्या कुडली गावातले लोक मंगळगडाच्या पायथ्याशी असलेल्या पिंपळवाडीत जाण्यासाठी नवीनच शोधलेली नाळेची वाट वापरतात.

(इ) घाटदेवता

बहूतेक घाटात देवांची ठाणी असतात. त्या देवाच्या नावानेही ते घाट ओळखले जातात. वाघजाई, गणपती, भैरव, जननी, नारमाता, बहिरी, वेताळ अशी त्यांची काही नावं आहेत. हे देव अगदी आडबाजूला असल्याने त्यांना जंगली फुलंच नाही तर झाडांची पानं वाहिली तरी चालतात. हे देव घाटवाटांचं रक्षण करतात अशी स्थानिकांची श्रद्धा असते. अगदी घाटवाट वापरताना काही इजा किंवा अपघात होऊ नये म्हणून जातायेता ते त्या देवांना साकडंही घालतात.

.

.

(फ) घाटवाटेतल्या वस्त्यांवरचे पाणवठे, विहीरी / हौद / टाकी

घाटात पिण्याच्या पाण्याची अत्यंत गरज भासते. त्यामुळे बर्‍यापैकी वाहतुक असणार्‍या घाटवाटांवर पिण्याच्या पाण्याच्या उत्तम सोई केलेल्या आढळून येतात. काही घाटवाटेत तर वस्त्या आहेत. पावसाळ्यानंतर साधारणपणे जानेवारीपर्यंत वाडी-वस्त्यांजवळ काही ठराविक ठिकाणी नैसर्गिक पाण्याचा उकळा असतो. त्या उकळ्याला वाडीतले लोक छोटंसं कुंड बांधतात. गुरं त्या पाण्यापाशी जाऊ नयेत म्हणुन त्याला काट्याचं कुंपणही करतात. बहूतेक वस्त्यांवर अशी कुंडे बघायला मिळतात. हल्ली शासनाच्या मदतीने काही वस्त्यांवर पाण्याच्या सोईसाठी विहिरी किंवा दगडात हौद खोदले गेले आहेत. पण ज्या घाटवाटेत अशा वस्त्या नाहीत त्या वाटेवरही बारमाही पाण्याची टाकी दगडात खोदलेली दिसून येतात.

.

.

.

फोटो सौजन्य :- अमोल तळेकर, निनाद बारटक्के, मंदार दंडवते, जितेंद्र परदेशी, संजय तारू आणि सुजय पुजारी

या लेखात दिलेली माहिती शंभर टक्के खरी आहे असा माझा दावा नाही. मी सह्याद्रीत आतापर्यंत जी काही थोडीफार भटकंती केली आहे किंवा कागदपत्रांची जी शोधाशोध केली आहे त्यावरून मिळालेल्या माहितीवर हा लेख बेतला आहे. माझ्या या प्रयत्नात काही चुका, उणिवा जाणवल्यास किंवा माहितीमध्ये बदल करावयाचा असल्यास जरूर कळवा.

क्रमशः

प्रतिक्रिया

कपिलमुनी's picture

29 May 2018 - 11:51 pm | कपिलमुनी

खूप छान माहितीपूर्ण लेख !

आता एक एक घाटवाट घेऊन बैजवार लिहा . वाट बघत आहे.

दिलीप वाटवे's picture

1 Jun 2018 - 9:01 pm | दिलीप वाटवे

धन्यवाद.
छान कल्पना आहे. जमवतो लवकरच.

दीपा माने's picture

30 May 2018 - 6:26 am | दीपा माने

अशा प्रकारचे लेखन आपणाकडून सतत होवो. शुभेच्छा आहेतच.

दिलीप वाटवे's picture

1 Jun 2018 - 9:01 pm | दिलीप वाटवे

धन्यवाद.

प्रचेतस's picture

30 May 2018 - 8:37 am | प्रचेतस

घाटवाटांविषयी अत्यंत सखोल माहिती देणारा लेख.

दिलीप वाटवे's picture

1 Jun 2018 - 9:12 pm | दिलीप वाटवे

धन्यवाद.
घाटवाटांविषयी चौथ्या भागात प्रतिक्रियांमधे आलेल्या आणि ज्या मुद्द्यांवर लिहिता येईल अशा मुद्द्यांचं एकत्रितपणे संकलन करायचा विचार आहे. तुम्हांला काय वाटतं?

प्रचेतस's picture

1 Jun 2018 - 11:31 pm | प्रचेतस

नक्कीच.
मी ही ह्या वाटांवरचे प्राचीन संदर्भ तपासून बघतो.

दिलीप वाटवे's picture

2 Jun 2018 - 8:18 am | दिलीप वाटवे

नाणेघाटाचा जो पुरातन व्यापारी मार्ग आहे त्या मार्गाला शुर्पारक(सोपारा) बंदर जोडलेले होते असा संदर्भ मिळतो. पण सोपारा किंवा त्याच्या जवळपास व्यापारी मोठी जहाजे नांगरता येतील अशी बंदरे नाहीत. संरक्षणासाठी जवळ अर्नाळा किल्ला आहे पण तोही उथळ समुद्रात आहे.
मग शुर्पारक ऊर्फ सोपारा म्हणजे आत्ताचं नक्की 'नालासोपारा' च आहे का?
दुसरं असं की चौल बंदरातून प्रतिष्ठान ऊर्फ पैठणला जायचं झाल्यास नाणेघाटापेक्षा खंडाळा घाट जवळचा आहे. तर मग नाणेघाटासारखी खंडाळा घाटाच्या आसपास जनावरे ओझी वाहून नेऊ शकतील अशी फरसबंदी घाटवाट का नाही?

प्रचेतस's picture

2 Jun 2018 - 6:44 pm | प्रचेतस

शुर्पारक म्हणजेच आजचे नालासोपारा. तिथून श्रीस्थानक म्हणजे ठाणे, तिथून माळशेज घाट, नाणेघाट हे दोन महत्वाचे मार्ग होतेच. प्राचीन माळशेज घाटात पायऱ्या, पाण्याच्या टाक्या बघायला मिळतातच.

आता बंदरांचा विचार केला तर तत्कालीन जहाजे ही छोटी आणि शिडाची असत, ती थेट कोकणात आतपर्यंत येऊ शकत. महाडपासून समुद्र बराच लांब पण जहाजे थेट खाडीतून महाड बंदरापर्यंत येत.

चौल बंदरातून वरघाटी यायला बहुधा सुधागडाजवळच्या घाटवाटा वापरात असाव्यात कारण ह्याच मार्गावर पायथ्याला कुडे, मांदाड, घाटात ठाणाळे, खडसांबळे ह्या लेणी आहेत तर ह्यांचे संरक्षक दुर्ग देखील आहेत.

गामा पैलवान's picture

3 Jun 2018 - 2:00 pm | गामा पैलवान

प्रचेतस,

स्पष्टीकरण पटणारं आहे. ज्याला आपण खंडाळ्याचा घाट म्हणतो त्याचं अधिकृत नाव भोरघाट आहे. त्याच्या संरक्षणासाठी दुर्ग नाही. त्यामुळे नाणेघाट आडवळणाचा असला तरी सुरक्षेच्या दृष्टीने उचित ठरावा.

जाताजाता : शूर्पारकचं मूळ नाव सौपर्यम् होतं असं ऐकिवात आहे (संदर्भ : http://prahaar.in/वसई-प्रांताच्या-गतकाळाचा )

आ.न.,
-गा.पै.

प्रचेतस's picture

3 Jun 2018 - 2:50 pm | प्रचेतस

सोनगिरी, राजमाची, लोहगड, विसापूर हे संरक्षक दुर्ग, कोंडाणे, कार्ले, भाजे ह्या लेण्या.

एस's picture

30 May 2018 - 6:00 pm | एस

लेख खूप आवडला. छान दस्तऐवजीकरण होते आहे.

दिलीप वाटवे's picture

1 Jun 2018 - 9:13 pm | दिलीप वाटवे

धन्यवाद

सुरेख लेख. मस्त लिहिलं आहेत.

डॉ सुहास म्हात्रे's picture

30 May 2018 - 8:33 pm | डॉ सुहास म्हात्रे

एका वेगळ्याच विषयावर माहितीपूर्ण लेख. पुभाप्र.

न्युक्लीअर सायन्स च्या नादात असं काही असू शकेल याचा आम्ही विचारच केला नाही....तीन चारशे वर्षांपूर्वी आपल्याकडे दळणवळणाचा कुणी विचार केला असेल याचा आम्ही विचारच केला नाही....
आम्ही केवळ हेच समजतोय, की दळणवळणाची साधने इंग्रजांनी भारतात आणली.
इतिहासाकडे जाण्यापेक्षा भविष्याकडे जा असे असे अनेक मिपाकर नक्की म्हणणार .....
तुम्ही जे करताय ते नक्की स्तुत्यआहे!
अनेकानेक शुभेच्छा!!
सर्व प्रकाशचित्रे सुंदर!

अर्धवटराव's picture

31 May 2018 - 9:34 am | अर्धवटराव

शूर मर्दाचा पोवाडा शूर मर्दाने गावा म्हणतात. सह्याद्रीच्या घाटवाटांची आख्यायीका अशीच लाजवाब झाली आहे.
पुभाप्र

खुपच माहितीपुर्ण आणि उत्कृष्ट धागा. हि माहिती जमा करण्यात तुमची मेहनत जाणवते आहे. फक्त एक दुरुस्ती सुचवावीशी वाटते आहे.

अशा या दक्षिणोत्तर पसरलेल्या सह्याद्री पर्वत रांगेला काटकोनात म्हणजे पुर्व-पश्चिम उपफाटे वा उपरांगा जोडलेल्या आहेत. त्यांची शैलबारी-डौलबारी, सातमाळ-अजिंठा, त्र्यंबक, कळसुबाई, बाळेश्वर, हरिश्चंद्र-बालाघाट, भुलेश्वर, महादेव, कोळेश्वर आणि महाबळेश्वर वगैरे फारच सुरेख नावे आहेत. फक्त तीन डोंगररांगा सह्याद्रीच्या मुख्य रांगेला समांतर आहेत त्या म्हणजे घाटमाथ्यावरच्या भाडळी-कुंडल आणि दातेगड रांगा तर कोकणात असलेली एकमेव महिपतगड रांग.

चौथी रायगड जिल्ह्यातील हाजीमलंग-माथेरान रांगसुध्दा सह्याद्रीला संमातर आहे. पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत.

राजेंद्र मेहेंदळे's picture

31 May 2018 - 12:52 pm | राजेंद्र मेहेंदळे

या विषयावर अजुन वाचायला आवडेल. तसेही ईतर ब्लॉगवर अशा प्रकारचे वाचन करायला मजा येतेच. आणि त्यामागच्या परीश्रमाचीही कल्पना येते. पण सध्या केवळ हापिसात बसुन वाचण्यावर तहान भागवतोय :(

http://www.bankapure.com

http://www.onkaroak.com

दिलीप वाटवे's picture

1 Jun 2018 - 9:33 pm | दिलीप वाटवे

जितेंद्र बंकापुरे आणि ओंकारचे ब्लॉग वाचणं म्हणजे पर्वणीच असते. भन्नाट लिहितात दोघेही. त्यामुळे तुमची तहान नक्कीच भागत असेल.

दिलीप वाटवे's picture

1 Jun 2018 - 9:26 pm | दिलीप वाटवे

सर्वांना मनःपुर्वक धन्यवाद

सुधीर कांदळकर's picture

2 Jun 2018 - 9:09 am | सुधीर कांदळकर

चित्रांची जोड सुरेख.

लेख आवडलाच. धन्यवाद

सुधीर कांदळकर's picture

2 Jun 2018 - 9:09 am | सुधीर कांदळकर

चित्रांची जोड सुरेख.

लेख आवडलाच. धन्यवाद

पैसा's picture

2 Jun 2018 - 10:30 am | पैसा

खूप मेहनत घेऊन सुरेख लिहिले आहे. महाराष्ट्राप्रमाणे गोव्यातही खानापूर कडे जाणाऱ्या पायवाटा chorla घाटाच्या आजूबाजूने आहेत. लोक त्यांचा अजून वापर करतात. पोर्तुगिज काळात स्वातंत्र्य सैनिकांनी त्यांचा व्यवस्थित वापर केला आहे.

मार्गी's picture

2 Jun 2018 - 4:55 pm | मार्गी

सुंदर लेख व माहिती!!

सतिश गावडे's picture

3 Jun 2018 - 8:40 am | सतिश गावडे

ही लेखमाला मिपावरील अनेक चांगल्या लेखमालेपैकी एक आहे.

'निसणी' किंवा 'निसण' असं घाटाचं नाव बर्‍याच ठिकाणी ऐकायला मिळतं. निसणी हा शब्द 'नि:श्रेणी' या नावावरुन आलेला आहे. नि:श्रेणी म्हणजे ज्याची श्रेणी सांगता येणार नाही अशी अत्यंत अवघड वाट.

हे स्पष्टीकरण चुकीचे आहे असे वाटते. कोकणात शिडीला निसण म्हणतात. त्यामुळे निसण असलेला घाट तो निसणीचा घाट इतकी सरळ उत्पत्ती असावी असं वाटते.

गामा पैलवान's picture

3 Jun 2018 - 1:53 pm | गामा पैलवान

सतिश गावडे,

ज्याची श्रेणी सांगता येणार नाही अशी अत्यंत अवघड वाट असल्यामुळेच तर शिडी लावली की काय? असाही विचार करता येऊ शकतो.

आ.न.,
-गा.पै.

जबरदस्त माहितीपूर्ण लेख, आमचा दंडवत घ्या मालक

नाखु's picture

3 Jun 2018 - 3:04 pm | नाखु

दम लागला (इतका माहीतीपूर्ण व रोमांचक) लेख आहे हा!!!
साथ्या सोप्या घाटवाटेवर वल्लीं महोदयांनी घेऊन जावे हीच प्रार्थना (आकाशातल्या बाप्पा ला)

फक्त पवना घाटावरचा नाखु

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

3 Jun 2018 - 3:13 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सुरेख....! माहितीपूर्ण लेखन आहे. भाग मोठे झालेत त्यामुळे सलग वाचायला कंटाळा येऊ शकतो.
तेव्हा थोडे भाग लहान असावे असे वाटले. करावेच असा आग्रह नाही.

-दिलीप बिरुटे

किसन शिंदे's picture

3 Jun 2018 - 7:31 pm | किसन शिंदे

जबरदस्त आहे हा भाग. सह्याद्रीतल्या घाटवाटांवर भटकंती करणाऱ्या भटक्यांसाठी माहितीचा अतिशय बहुमुल्य खजिना तुम्ही उपलब्ध करून देताय. बाकी या एकाच मोठ्या भागाचे दोन भाग सहज शक्य झाले असते, ज्याने वाचकाला वाचताना सहसा कंटाळा येत नाही.

अत्रुप्त आत्मा's picture

4 Jun 2018 - 7:52 am | अत्रुप्त आत्मा

जबराट लिवताय. असेच लिवा.

बिपिन कार्यकर्ते's picture

6 Jun 2018 - 7:03 pm | बिपिन कार्यकर्ते

साष्टांग दंडवत! साष्टांग दंडवत!! साष्टांग दंडवत!!!

सोमनाथ खांदवे's picture

16 Jun 2018 - 6:32 pm | सोमनाथ खांदवे

आरामदायक चारचाकी मध्ये सलग 4 तास प्रवास केला तर अंग अखडत , आणि असल्या या घाटवाटा मध्ये पूर्वीचे लोक कसे ये जा करत असतील ? धन्य ते लोक आणि धन्यवाद तुम्हाला घाटवाटा च्या माहिती चा खजिनाच उघडलाय तुम्ही .

गामा पैलवान's picture

16 Jun 2018 - 8:23 pm | गामा पैलवान

सोमनाथ खांदवे,

बरोब्बर उलटी परिस्थिती आहे. गाडीत बसल्यावर हालचाल शून्य. याउलट घाटवाटांवर चढण्या-उतरण्यासाठी संपूर्ण शरीरास मस्तपैकी व्यायाम. :-)

आ.न.,
-गा.पै.