परवाच मला काही कामानिमित्त वासिलिकी नावाच्या व्यक्तीशी संपर्क साधायचा होता (ह्या व्यक्तीचे आडनाव देवनागरीत टंकणे हे माझ्या आवाक्यापलीकडचे आहे!). ही व्यक्ती अमुक एका कंपनीत, अमुक एका विभागात, अमुक एका हुद्द्यावर काम करते आणि त्यामुळे मला हवी असलेली माहिती ही व्यक्ती देऊ शकते, इतकीच माहिती मला देण्यात आली होती. आता वसिलिकी ही बाई आहे की बुवा याचा कुणालाच काही अंदाज नव्हता. अर्थात त्यामुळे कामात काही फरक पडत होता असे नाही, पण उगाच एक उत्सुकता होती.
माझ्या पुढे होता त्या वसिलिकीचा फोन नंबर आणि इमेल. मी फोन लावला. फोन काही वेळ वाजला आणि वॉइस मेसेजवर गेला. अमेरिकन उच्चारात एका बाईचा आवाज ऐकू आला, "आपण विकीशी संपर्क साधू इच्छीत आहात. परंतु, काही अपरिहार्य कारणामुळे मी आपला फोन घेऊ शकत नाही. कृपया आपले नाव आणि संदेश......".
अच्छा, ही बया आहे तर, मी मनाशीच विचार केला. विकी हे घेतलेले नाव वाटते. आडनावावरून तर ग्रीक वाटत आहे, माझे विचारचक्र चालूच होते.
ही ग्रीसमधून स्थलांतरीत झाली असावी काय? नसेल, कारण उच्चार पूर्णपणे अमेरिकन होते. जन्म-शिक्षण अमेरिकेतीलच असावे. मग काय आई-वडील आले असावेत? मग त्या आधीची पिढी का नसेल? नसेल, कारण मग हिचे नाव वसिलिकी न ठेवता काही तरी अन्ग्लो-सॅक्सन नाव ठेवले असते. मुलीचे नाव त्यांच्या संस्कृतीतील ठेवले आहे म्हणजे ते पहिल्या पिढीतील स्थलांतरीत असावेत!
वास्तविक या सर्व गोष्टींचा विचार करायची मला काहीही गरज नव्हती. माझ्या कामाशी याचा सुतराम संबंध नव्हता. तरीही, पुढे-मागे, ओळख वाढलीच तर या गोष्टी मी तिला विचारणारच!
मागे स्टोलार्स्की ह्या आडनावाचा माझा एक सहकारी होता. त्याचे आजोबा पोलंडहून अमेरिकेत आले. ते फक्त पोलीश भाषा बोलीत. वडील इंग्लीश आणि पोलीश दोन्ही बोलीत. तर हा फक्त इंग्लीश. ही सगळी माहिती, थोडीशी ओळख वाढल्यावर मी त्याच्याकडून काढून घेतली होती. उगाचच!
जित्याची खोड. काय करणार?
आता वादाकरिता गृहित धरा की, बराक ओबामा हे राजकारणात नाहीत. किमानपक्षी अमेरिकन अध्यक्षपदाच्या शर्यतीत तरी नाहीत. किंबहुना, त्यांचे नातेवाईक, मित्रमडळी आणि सहकारी इ. सोडले तर त्यांना कोणीही ओळखत नाही.
आता, हे गृहितक मानून "बराक हुसेन ओबामा" हे नाव समोर आले, तर तुम्ही ही व्यक्ती कोण असेल असा विचार कराल? बहुसंख्य लोक हे नाव अफ्रिकेतील कृष्णवर्णिय मुस्लीम व्यक्तीशी निगडीत करतील. का?
हुसेन हे नाव मुस्लिम धर्माशी निगडीत आहे. तुमचा मेंदू झटकन तुमच्या पूर्व-आठवणीतील हुसेन दलवाई, झाकीर हुसेन किंवा अन्य कोणी हुसेन हे नाव काढेल. त्या सर्वांचा लघुत्तम सामान्य घटक कोणता हे शोधेल. तो अर्थातच मुस्लिम धर्मीय असा असेल.
आता राहिला प्रश्न बराक ओबामा ह्या नावांचा. तुमचा मेंदू पुन्हा तसाच विचार करेल. ही नावे उत्तर किंवा दक्षिण भारतीय नाहीत. पाश्चिमात्यही नाहीत. चिनी-जपानी अशी अती-पूर्वेकडीलदेखिल वाटत नाहीत. राहता राहिली अफ्रिका!
शाळेत असताना विंदा करंदीकर हे नाव पहिल्यांदा कधी ऐकले ते आठवत नाही. पण ती स्त्री असावी असे मात्र बरेच दिवस वाटत होते. खरे म्हणजे, विंदा ह्या नावाची कोणतीही मुलगी माझ्या परिचयाची नव्हती. फारतर एखादी वृंदा किंवा ब्रिंदा असावी! पण, आकारान्त नाव हे सहसा स्त्रीलिंगी असते, अशी एक सांगड मेंदूतच कुठेतरी घातली गेली असावी.
यावरून आठवले - निकिता क्रुश्चेव ह्या पुरुष रशियन नेत्याच्या नावावरून भारतातील कित्येक पालकांनी आपल्या मुलीचे नाव निकिता ठेवले होते!
माझ्या ओळखीची एक मुलगी आहे. नाव आहे वल्लरी. तिचे तिच्या पाश्चात्य सहकार्यांनी केले वॅलरी! आता सांगा, तीनशे वर्षांपूर्वी इंग्रज स्टुअर्डचा आम्ही मराठ्यांनी इष्टूर केला, तर आता त्यांनी वल्लरीचे वॅलरी केले तर काय बिघडले?
हां, आता एक फरक आहे. तो स्टुअर्ड स्वतःला इष्टूर म्हणवून घेत होता की नाही याची कल्पना नाही, पण वल्लरीला मात्र वॅलरी म्हणवून घ्यायला आवडते!
आजकाल कॉल सेंटर मधील तरुण-तरुणी आपल्या नावांचे पाश्चात्यकरण करतात याबद्दल अनेकजण नाके मुरडतात. पण सांगा, नावे बदलण्याची प्रथा काय आपल्याकडे कॉल सेंटर सुरू झाल्यावर आली?
नक्कीच नाही.
शांताराम वणकुद्रेंना काय उत्तम दिग्दर्शन करता आले नसते की हरिभाई जरीवाल्याला सहज-सुंदर अभिनय जमला नसता? अहो, एखादी दाक्षिणात्य सत्यभामा नावाची बारबालादेखिल आपले नाव हीना म्हणून सांगते!
शेक्सपियरभौ तुम्हारा चुक्याच! नावात काय आहे काय म्हणता?
नावात बरेच काही आहे!
प्रतिक्रिया
24 Oct 2008 - 3:48 pm | सखाराम_गटणे™
यावरून आठवले - निकिता क्रुश्चेव ह्या पुरुष रशियन नेत्याच्या नावावरून भारतातील कित्येक पालकांनी आपल्या मुलीचे नाव निकिता ठेवले होते!
ज्योती बसु विसरलात.
तुम्हाला थंडी वाजेल, तेव्हा लक्षात ठेवा की कोणाच्या तरी उबीने तुमची थंडी दुर होउ शकते. त्या उबीला लाख सलाम.
24 Oct 2008 - 3:56 pm | श्रावण मोडक
बरेच काही आहे. माझ्याच इथल्या एका लेखाची आणि भोचक यांच्या एका लेखाची आठवण झाली. भोचक यांचा तसा तो लेख नाही, काथ्याकूट स्वरूपाचे लेखन आहे.
24 Oct 2008 - 4:15 pm | सुनील
श्रावण सर,
शीर्षकाची समानता आहे हे खरेच. पण तुमचा लेख थोडासा खोल, भावनिक विचार करणारा वाटतो. माझा त्यामानाने निव्वळ विरंगुळा या सदरात मोडणारा.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
24 Oct 2008 - 4:37 pm | श्रावण मोडक
तो गंमतीदार योगायोग आहे. त्यात वावगे काही नाही. त्या शीर्षकावर माझा स्वामीत्त्वहक्क थोडाच आहे. शेक्सपिअरच हा प्रश्न विचारून गेल्यानंतर आपल्या मनात त्याची प्रतिबिंबे उमटणारच.
खरे तर, नावात खूप काही आहे हेच या शीर्षकांच्या साधर्म्यातून सिद्ध होते.